व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा माझा वाटा आहे

यहोवा माझा वाटा आहे

यहोवा माझा वाटा आहे

“इस्राएल लोकांमध्ये मीच तुझा वाटा व वतन आहे.”—गण. १८:२०.

१, २. (क) प्रतिज्ञात देशात वतन मिळण्याबाबत लेवी वंशजांची काय स्थिती होती? (ख) यहोवाने लेवी वंशजांना कोणते आश्‍वासन दिले?

 इस्राएल लोकांनी प्रतिज्ञात देशाचा बराच प्रदेश हस्तगत केल्यावर, यहोशवाने चिठ्ठ्या टाकून देशाची वाटणी करण्यास सुरुवात केली. या कामात मुख्य याजक एलाजार आणि इस्राएल वंशांच्या सरदारांनी त्याला मदत केली. (गण. ३४:१३-२९) पण, इस्राएलातील इतर वंशांप्रमाणे लेव्यांना त्या देशात वाटा मिळणार नव्हता. (यहो. १४:१-५) प्रतिज्ञात देशात लेवी वंशाला आपले स्वतःचे वतन, किंवा वाटा का मिळाला नाही? वतन वाटून देणारे त्यांना विसरले होते का?

याचे उत्तर, यहोवाने लेव्यांना जे सांगितले त्यावरून आपल्याला मिळते. यहोवाने त्यांना आश्‍वासन दिले की तो कधीच त्यांचा त्याग करणार नाही. त्याने म्हटले: “इस्राएल लोकांमध्ये मीच तुझा वाटा व वतन आहे.” (गण. १८:२०) ‘मीच तुझा वाटा आहे,’ असे म्हणून यहोवाने त्यांना किती मोठे आश्‍वासन दिले! असे जर यहोवाने तुम्हाला म्हटले, तर तुम्हाला कसे वाटेल? सुरुवातीला कदाचित तुम्ही असा विचार कराल, की ‘सर्वशक्‍तिमान देव माझ्यासारख्याला असे आश्‍वासन देईल का?’ तुम्हाला कदाचित असाही प्रश्‍न पडेल, की ‘यहोवा आज एखाद्या अपरिपूर्ण ख्रिस्ती व्यक्‍तीचा खरोखर वाटा होऊ शकतो का?’ हे प्रश्‍न तुमच्यासाठी व तुमच्या प्रियजनांसाठी महत्त्वाचे आहेत. तेव्हा, ‘मीच तुझा वाटा आहे’ असे जे यहोवाने म्हटले त्याचा काय अर्थ होतो हे आपण पाहू या. यामुळे, आज यहोवा कशा प्रकारे ख्रिश्‍चनांचा वाटा होऊ शकतो हे समजण्यास आपल्याला मदत मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तो तुमचा वाटा होऊ शकतो, मग तुम्हाला स्वर्गीय जीवनाची आशा असो अथवा पृथ्वीवरील नंदनवनात जीवन जगण्याची आशा असो.

यहोवा लेवी वंशजांचा सांभाळ करतो

३. देवाची सेवा करण्यासाठी लेवी वंशातून याजकवर्गाची व सहायकांची व्यवस्था करण्यात आली. ही व्यवस्था कशी उदयास आली?

यहोवाने इस्राएल लोकांना नियमशास्त्र दिले त्याआधीच्या काळात कुटुंबप्रमुख आपापल्या कुटुंबात याजक या नात्याने सेवा करायचे. पण, देवाने इस्राएल लोकांना नियमशास्त्र दिले, तेव्हा त्याने त्याची पूर्णवेळ सेवा करण्यासाठी लेवी वंशातून याजकवर्गाची व सहायकांची व्यवस्था केली. ही व्यवस्था कशी उदयास आली? देवाने इजिप्तमधील प्रथम जन्मलेल्यांचा नाश केला, तेव्हा त्याने इस्राएलातील प्रथम जन्मलेल्यांना पवित्र केले व त्यांना आपल्या स्वतःकरता वेगळे केले. पण, नंतर त्याने एक महत्त्वपूर्ण बदल केला. त्याने म्हटले: “इस्राएलातल्या सर्व प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी मी इस्राएल लोकांतून लेवी वंश घेतला आहे.” पण, एका गणणेवरून दिसून आले, की इस्राएलातील प्रथम जन्मलेल्यांची संख्या लेव्यांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. त्यामुळे हा फरक भरून काढण्यासाठी एक खंडणी देण्यात आली. (गण. ३:११-१३, ४१, ४६, ४७) अशा प्रकारे, लेव्यांनी देवाची सेवा करण्यास सुरुवात केली.

४, ५. (क) देव लेव्यांचा वाटा होता याचा त्यांच्यासाठी काय अर्थ होता? (ख) देवाने लेव्यांच्या भौतिक गरजा कशा प्रकारे पूर्ण केल्या?

या नेमणुकीचा लेव्यांकरता काय अर्थ होता? यहोवाने म्हटले की तो त्यांचा वाटा होणार होता, म्हणजे त्यांना प्रतिज्ञात देशात वतन देण्याऐवजी, त्याने त्यांच्यावर सेवेचा मौल्यवान विशेषाधिकार सोपवला होता. “परमेश्‍वराने त्यांना दिलेली याजकवृत्ति” हेच त्यांचे वतन होते. (यहो. १८:७) गणना १८:२० च्या संदर्भावरून दिसून येते की यामुळे ते दरिद्री बनले नाहीत. (गणना १८:१९, २१, २४ वाचा.) लेवी जी सेवा करत होते त्याबद्दल इस्राएल लोकांकडून त्यांना दशमांश दिला जाणार होता. त्यांना इस्राएल राष्ट्राच्या उत्पन्‍नाचा आणि पाळीव प्राण्यांच्या वाढलेल्या संख्येचा दहा टक्के भाग मिळणार होता. लेव्यांना मिळालेल्या या दशमांशाचा दहा टक्के भाग, म्हणजे सर्वात ‘उत्तम भाग’ त्यांनी याजकवर्गाला द्यायचा होता. * (गण. १८:२५-२९) इस्राएल लोकांनी देवाच्या उपासनेसाठी आणलेली सर्व ‘पवित्र समर्पणेदेखील’ त्यांनी याजकांना द्यायची होती. अशा प्रकारे, यहोवा आपला सांभाळ करेल असा विश्‍वास बाळगण्याचे सबळ कारण याजकवर्गाच्या सदस्यांजवळ होते.

मोशेच्या नियमशास्त्रात दुसऱ्‍या एका दशमांशाचीही तरतूद करण्यात आली होती असे दिसते. इस्राएल लोक, दरवर्षी होणाऱ्‍या पवित्र मेळाव्यांच्या वेळी खाण्यापिण्यासाठी व आनंद करण्यासाठी या दशमांशाचा उपयोग करायचे. (अनु. १४:२२-२७) या दशमांशाचा आणखीनही एक उपयोग होता. इस्राएल लोक दर सात वर्षांनी शब्बाथाचे वर्ष पाळायचे. या सात वर्षांदरम्यान, दर तीन वर्षांच्या आणि सहा वर्षांच्या शेवटी ते या दशमांशाचा उपयोग गरिबांना व लेव्यांना मदत करण्यासाठी करायचे. या व्यवस्थेत लेव्यांचा समावेश का करण्यात आला होता? कारण, इस्राएलात त्यांना “हिस्सा किंवा वतन” नव्हते.—अनु. १४:२८, २९.

६. इस्राएलात लेवी वंशजांना जमिनीचा वाटा नव्हता, तर मग ते कोठे राहणार होते?

तुम्हाला कदाचित प्रश्‍न पडेल, की ‘जर लेव्यांना जमिनीचा वाटा देण्यात आला नव्हता, तर मग ते कोठे राहणार होते?’ याची तरतूद देवाने केली. त्याने त्यांना ४८ नगरे आणि त्यांच्या सभोवतालची कुरणे दिली. यात सहा शरणपुरांचा समावेश होता. (गण. ३५:६-८) अशा प्रकारे, लेवी जेव्हा उपासना स्थळी सेवा करत नसायचे, तेव्हा ते या नगरांत राहायचे. ज्यांनी स्वतःला यहोवाच्या सेवेकरता वाहून घेतले होते, अशांकरता त्याने भरपूर तरतुदी केल्या. तर मग, देव आपला वाटा आहे हे लेवी कशा प्रकारे दाखवू शकत होते? देवाजवळ आपल्या गरजा पूर्ण करण्याचे सामर्थ्य आहे व त्या पूर्ण करण्याची त्याची इच्छा आहे हा विश्‍वास बाळगण्याद्वारे ते हे दाखवू शकत होते.

७. यहोवा आपला वाटा असावा म्हणून लेव्यांनी काय करणे गरजेचे होते?

नियमशास्त्रात, दशमांश न देणाऱ्‍या इस्राएली व्यक्‍तीला कोणताही दंड देण्याची तरतूद नव्हती. दशमांश देण्याच्या बाबतीत लोक हयगय करायचे तेव्हा याजकांवर व लेव्यांवर याचा विपरित परिणाम व्हायचा. नहेम्याच्या दिवसांत असेच घडले होते. परिणामस्वरूप, लेव्यांना आपली सेवा सोडून आपापल्या शेतात काम करावे लागले. (नहेम्या १३:१० वाचा.) यावरून स्पष्ट होते की लेवी वंशजांचे भरणपोषण इस्राएल लोकांच्या आध्यात्मिकतेवर अवलंबून होते. शिवाय, याजकांना व लेव्यांना यहोवावर व त्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या त्याच्या माध्यमावर विश्‍वास ठेवणे अत्यंत गरजेचे होते.

असे व्यक्‍ती ज्यांनी यहोवाला आपला वाटा मानला

८. आसाफ या लेव्याची काय समस्या होती याचे वर्णन करा.

लेव्यांनी इस्राएलातील एक वंश या नात्याने यहोवाला आपला वाटा मानायचे होते. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, लेवी वंशातील काही व्यक्‍तींनीसुद्धा देवावरील आपली भक्‍ती व भरवसा व्यक्‍त करण्यासाठी “परमेश्‍वर माझा वतनभाग आहे” असे म्हटले. (विलाप. ३:२४) एका लेव्यानेसुद्धा असेच म्हटले. तो एक गायक व संगीतकार होता. हा लेवी, दाविदाच्या काळात गायकांमध्ये मुख्य गायक असलेल्या आसाफाच्या घराण्यातील एक सदस्य असावा; असे असले, तरी आपण त्या लेव्याचा उल्लेख आसाफ असाच करू. (१ इति. ६:३१-४३) ७३ व्या स्तोत्रात आपण वाचतो की आसाफ (किंवा त्याचा एक वंशज) पेचात पडला. दुष्ट लोक ऐशआरामाचे जीवन जगत आहेत हे पाहून त्याला त्यांचा हेवा वाटला आणि त्याने असेही म्हटले: “मी आपले मन स्वच्छ राखिले, आपले हात निर्दोषतेने धुतले, खचित हे सगळे व्यर्थ.” काही वेळासाठी कदाचित त्याला आपल्या सेवेच्या विशेषाधिकाराचा व यहोवा आपला वाटा आहे या गोष्टीचा विसर पडला असावा. तो “देवाच्या पवित्रस्थानात” गेला तोपर्यंत तो अस्वस्थ होता.—स्तो. ७३:२, ३, १२, १३, १७.

९, १०. देव ‘आपला सर्वकाळचा वाटा’ आहे असे आसाफ का म्हणू शकला?

देवाच्या पवित्रस्थानात आल्यानंतर, आसाफ देवाच्या दृष्टिकोनातून विचार करू लागला. कदाचित तुम्हालाही असाच अनुभव आला असेल. तुमच्या जीवनात अशी एखादी वेळ आली असेल, जेव्हा काही प्रमाणात तुम्हालासुद्धा आपल्या आध्यात्मिक विशेषाधिकारांचा विसर पडला असेल आणि तुमच्याजवळ नसलेल्या भौतिक गोष्टींवर तुम्ही आपले लक्ष केंद्रित केले असेल. पण, देवाच्या वचनाचा अभ्यास केल्यामुळे व ख्रिस्ती सभांना गेल्यामुळे तुम्ही देवाच्या दृष्टिकोनातून विचार करू लागला. दुष्ट लोकांचे शेवटी काय होईल हे आसाफाला समजले. त्याने आपल्या विशेषाधिकारांचा विचार केला आणि यहोवा आपला उजवा हात धरून आपले मार्गदर्शन करत असल्याची जाणीव त्याला झाली. म्हणूनच आसाफ यहोवाला असे म्हणू शकला: “पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय दुसरा कोणीहि प्रिय नाही.” (स्तो. ७३:२३, २५) त्याने नंतर, देव आपला वाटा आहे असे म्हटले. (स्तोत्र ७३:२६ वाचा.) स्तोत्रकर्त्याचा ‘देह व हृदय खचले,’ तरी देव ‘सर्वकाळ त्याचा वाटा’ असणार होता. स्तोत्रकर्त्याला भरवसा होता की यहोवा एक मित्र म्हणून त्याची आठवण करेल. त्याने विश्‍वासूपणे केलेली सेवा देव विसरणार नव्हता. (उप. ७:१) यामुळे आसाफाला किती दिलासा मिळाला असेल! त्याने स्तोत्रात गायिले: “माझ्याविषयी म्हटले तर देवाजवळ जाणे ह्‍यातच माझे कल्याण आहे; मी प्रभु परमेश्‍वराला आपले आश्रयस्थान केले आहे.”—स्तो. ७३:२८.

१० देव आपला वाटा आहे असे आसाफाने म्हटले तेव्हा एक लेवी या नात्याने त्याला मिळणाऱ्‍या भौतिक गोष्टींविषयीच तो बोलत नव्हता. तर, तो प्रामुख्याने यहोवाच्या सेवेतील आपल्या विशेषाधिकाराबद्दल व सर्वसमर्थ देवासोबतच्या आपल्या मैत्रीबद्दल बोलत होता. (याको. २:२१-२३) हा नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी स्तोत्रकर्त्याने यहोवावर नेहमी विश्‍वास व भरवसा ठेवायचा होता. आपण जर देवाच्या स्तरांनुसार जीवन जगलो, तर शेवटी आपल्याला आशीर्वाद मिळतील असा भरवसा आसाफाने बाळगायचा होता. तुम्हीदेखील सर्वसमर्थ देवावर असाच भरवसा ठेवू शकता.

११. यिर्मयाला कोणता प्रश्‍न पडला होता, आणि त्याचे उत्तर त्याला कसे मिळाले?

११ आणखी एका लेव्याने यहोवाला आपला वतनभाग मानला. तो होता यिर्मया संदेष्टा. त्याने असे म्हटले तेव्हा त्याच्या म्हणण्याचा काय अर्थ होता ते आपण पाहू या. यिर्मया, जेरूसलेमजवळ असलेल्या अनाथोथ नावाच्या एका लेव्यांच्या नगरात राहत होता. (यिर्म. १:१) त्याच्या जीवनात अशी एक वेळ आली जेव्हा त्याला प्रश्‍न पडला: नीतिमान दुःख सोसत असताना दुष्ट लोक ऐशआरामाचे जीवन का जगत आहेत? (यिर्म. १२:१) जेरूसलेम आणि यहूदामध्ये घडत असलेल्या गोष्टी पाहून तो ‘तक्रार’ करण्यास प्रवृत्त झाला. यहोवा नीतिमान आहे हे यिर्मयाला माहीत होते. त्यानंतर यहोवाने यिर्मयाला जी भविष्यवाणी करण्याची प्रेरणा दिली आणि देवाने ती भविष्यवाणी ज्या प्रकारे पूर्ण केली त्यावरून यिर्मया संदेष्ट्याला त्याच्या प्रश्‍नाचे अचूक उत्तर मिळाले. देवाच्या भविष्यवाण्यांच्या सुसंगतेत, ज्यांनी यहोवाच्या मार्गदर्शनाचे पालन केले ते ‘जिवानिशी सुटले.’ पण, ऐशआरामाचे जीवन जगणाऱ्‍या दुष्ट लोकांनी देवाच्या ताकिदीकडे दुर्लक्ष केले व त्यांचा नाश झाला.—यिर्म. २१:९.

१२, १३. (क) “परमेश्‍वर माझा वतनभाग आहे,” असे म्हणण्यास यिर्मया कशामुळे प्रवृत्त झाला आणि त्याने कशी मनोवृत्ती दाखवली? (ख) इस्राएलाच्या सर्व वंशांनी आशेने वाट पाहण्याची गरज का होती?

१२ यिर्मयाने नंतर, उद्‌ध्वस्त झालेल्या आपल्या मायदेशाला पाहिले, तेव्हा आपण अंधारात चालत आहोत असे त्याला वाटले. यहोवाने जणू त्याला, ‘मागेच मरून गेलेल्यांप्रमाणे बसवले’ होते. (विलाप. १:१, १६; ३:६) यिर्मयाने, देवापासून दूर गेलेल्या इस्राएल राष्ट्राला आपल्या स्वर्गीय पित्याकडे परतण्यास सांगितले होते; पण त्यांची दुष्टाई इतकी वाढली होती की देवाने जेरूसलेम व यहूदा यांचा नाश होऊ दिला. यात यिर्मयाची काहीच चूक नव्हती, तरीसुद्धा त्याला खूप दुःख झाले. या दुःखाच्या काळात यिर्मयाला देवाच्या अपार दयेचे स्मरण झाले. “आम्ही भस्म झालो नाही” असे त्याने म्हटले. खरोखर, यहोवाची दया “रोज सकाळी नवी होते!” त्यानंतर यिर्मयाने म्हटले: “परमेश्‍वर माझा वतनभाग आहे.” आणि तो संदेष्टा या नात्याने यहोवाची सेवा करत राहिला.विलापगीत ३:२२-२४ वाचा.

१३ इस्राएल लोकांचा मायदेश ७० वर्षांपर्यंत ओसाड व वैराण पडणार होता. (यिर्म. २५:११) पण यिर्मयाने, “परमेश्‍वर माझा वतनभाग आहे,” असे म्हटले तेव्हा त्याचा देवाच्या दयेवरील भरवसा दिसून आला आणि त्यामुळे तो ‘आशेने’ वाट पाहू शकला. इस्राएलातील सर्व वंशांनी आपला वतनभाग गमावला होता, त्यामुळे त्यांनीदेखील यिर्मया संदेष्ट्यासारखीच मनोवृत्ती विकसित करण्याची गरज होती. ते केवळ यहोवावर आशा ठेवू शकत होते. ७० वर्षांनंतर, देवाचे लोक आपल्या मायदेशी परतले आणि तेथे त्यांना देवाची सेवा करण्याची सुसंधी मिळाली.—२ इति. ३६:२०-२३.

इतर जणही यहोवाला आपला वाटा मानू शकत होते

१४, १५. लेव्यांशिवाय आणखी कोणी यहोवाला आपला वाटा मानला, आणि का?

१४ आसाफ आणि यिर्मया हे दोघेही लेवी वंशातील होते. पण, केवळ लेवी वंशातील लोकांनाच देवाची सेवा करण्याचा विशेषाधिकार होता का? नाही! इस्राएलाचा भावी राजा, तरुण दावीद यानेही देवाला आपला वाटा मानला होता. त्याने म्हटले: “जिवंतांच्या भूमीत तू माझा वाटा आहेस.” (स्तोत्र १४२:१,  वाचा.) दाविदाने या स्तोत्राची रचना केली तेव्हा तो राजमहालात किंवा घरात राहत नव्हता. तर, शत्रूंपासून आपला जीव वाचवण्यासाठी तो एका गुहेत लपून बसला होता. कमीतकमी दोन प्रसंगी, दाविदाने गुहांमध्ये आश्रय घेतला; एकदा अदुल्लामजवळ, आणि दुसऱ्‍यांदा एन-गेदीच्या अरण्यात. यांपैकीच एखाद्या गुहेत त्याने १४२ व्या स्तोत्राची रचना केली असावी.

१५ दाविदाने एका गुहेत या स्तोत्राची रचना केली, त्याचे कारण शौल राजा त्याचा जीव घेण्यासाठी त्याचा पाठलाग करत होता. दावीद अशा एका गुहेत लपून बसला होता जेथे पोहचणे सोपे नव्हते. (१ शमु. २२:१, ४) या दुर्गम भागात असताना, आपल्याला आधार देणारा एकही मित्र आपल्याजवळ नाही असे कदाचित दाविदाला वाटले असावे. (स्तो. १४२:४) त्या वेळी दाविदाने देवाचा धावा केला.

१६, १७. (क) कोणत्या गोष्टींमुळे दाविदाला असहाय वाटले? (ख) मदतीसाठी दावीद कोणाचा धावा करू शकत होता?

१६ दाविदाने १४२ व्या स्तोत्राची रचना केली तोपर्यंत मुख्य याजक अहीमलेख याचे काय झाले हे त्याला कळले असेल. दावीद शौल राजापासून पळून जात आहे हे अहीमलेखाला माहीत नसल्यामुळे त्याने दाविदाला मदत केली होती. त्यामुळे, मत्सराने पेटलेल्या शौल राजाने अहीमलेखाला व त्याच्या घराण्यातील लोकांना मारून टाकले. (१ शमु. २२:११, १८, १९) त्यांच्या मृत्यूसाठी दाविदाने स्वतःला जबाबदार धरले; जणू त्याला मदत करणाऱ्‍या याजकाला त्यानेच मारून टाकले होते. तुम्ही दाविदाच्या जागी असता, तर तुम्हालाही असेच वाटले असते का? शिवाय, शौल सतत दाविदाचा पाठलाग करत असल्यामुळे त्याला विश्रांती घेण्याचीही उसंत नव्हती.

१७ याच्या थोड्याच काळानंतर, शमुवेल संदेष्ट्याचाही मृत्यू झाला ज्याने दाविदाला इस्राएलाचा भावी राजा म्हणून अभिषिक्‍त केले होते. (१ शमु. २५:१) यामुळे दाविदाला आणखीनच असहाय वाटले असेल. पण, मदतीसाठी आपण यहोवाचा धावा केला पाहिजे हे दाविदाला माहीत होते. दाविदाला लेव्यांसारखा सेवेचा विशेषाधिकार नव्हता, पण त्याला एक वेगळ्या प्रकारची सेवा करण्यासाठी अर्थात कालांतराने देवाच्या लोकांचा राजा बनण्यासाठी आधीच अभिषिक्‍त करण्यात आले होते. (१ शमु. १६:१, १३) म्हणून, दाविदाने यहोवाजवळ आपल्या भावना व्यक्‍त केल्या आणि मार्गदर्शनासाठी तो नेहमी देवावर विसंबून राहिला. तुम्ही जिवेभावे यहोवाची सेवा करत राहण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्हीदेखील देवाला आपला वाटा मानू शकता, किंबहुना तुम्ही यहोवाला आपला वाटा मानलाच पाहिजे.

१८. या लेखात आपण ज्यांच्याविषयी चर्चा केली त्यांनी यहोवा आपला वाटा आहे हे कसे दाखवले?

१८ आतापर्यंत आपण ज्यांच्याविषयी चर्चा केली त्यांनी यहोवाला आपला वाटा मानला होता. याचा अर्थ, देवाच्या सेवेत त्यांना एक नेमणूक मिळाली होती आणि ही सेवा करत असताना, देव आपल्या गरजा पूर्ण करेल असा भरवसा त्यांनी बाळगला. लेवी वंशातील सदस्य व इस्राएलाच्या बाकीच्या वंशांतील दाविदासारखे इतर सदस्यही देवाला आपला वाटा मानू शकले. त्यांच्याप्रमाणे, तुम्हीसुद्धा यहोवाला आपला वाटा कसे मानू शकता? याविषयी आपण पुढील लेखात चर्चा करणार आहोत.

[तळटीप]

^ याजकवर्गाच्या भौतिक गरजा कशा प्रकारे भागवल्या जायच्या याविषयीच्या सविस्तर माहितीसाठी इंसाईट ऑन द स्क्रिप्चर्स, खंड २, पृष्ठ ६८४ पाहा.

तुमचे उत्तर काय असेल?

• यहोवा कोणत्या अर्थाने लेव्यांचा वाटा होता?

• आसाफ, यिर्मया आणि दावीद यांनी काय केले ज्यावरून दिसून येते की त्यांनी यहोवाला आपला वाटा मानला होता?

• देव आपला वाटा असावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला कोणत्या गुणाची गरज आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[८ पानांवरील संक्षिप्त आशय]

लेव्यांना जमिनीचे वतन मिळाले नाही. त्याऐवजी, यहोवाच त्यांचा वाटा होता, कारण त्याची सेवा करण्याचा मोठा विशेषाधिकार त्यांना लाभला होता

[७ पानांवरील चित्र]

यहोवा कशा प्रकारे याजकांचा व लेव्यांचा वाटा होता?

[९ पानांवरील चित्र]

यहोवा आपला वाटा आहे असे सतत मानण्यासाठी कोणत्या गोष्टीने आसाफाला मदत केली?