व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बक्षीस मिळेल असे धावा

बक्षीस मिळेल असे धावा

बक्षीस मिळेल असे धावा

“असे धावा की तुम्हाला ते मिळेल.”—१ करिंथ. ९:२४.

१, २. (क) इब्री ख्रिश्‍चनांना प्रोत्साहन देण्यासाठी पौलाने कशाचा उपयोग केला? (ख) देवाच्या सेवकांना काय करण्याचा सल्ला देण्यात आला आहे?

 प्रेषित पौलाने आपल्या ख्रिस्ती बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी, इब्री लोकांस लिहिलेल्या पत्रात एका प्रभावी शब्दचित्राचा उपयोग केला. त्याने त्यांना याची आठवण करून दिली, की जीवनाच्या शर्यतीत धावणारे ते एकटेच नव्हते. तर गतकाळातील यहोवाचे अनेक निष्ठावंत सेवकदेखील या शर्यतीत धावले होते व त्यांनी यशस्वी रीत्या आपली शर्यत पूर्ण केली होती. पौलाने म्हटले की हे विश्‍वासू सेवक एका मोठ्या ‘साक्षीरूपी मेघाप्रमाणे’ असून त्या मेघाने त्यांना वेढले होते. गतकाळातील या धावपटूंच्या विश्‍वासू कृत्यांचे व कठोर मेहनतीचे सतत स्मरण केल्याने इब्री ख्रिश्‍चनांना जीवनाच्या शर्यतीत हार न मानता, आपली शर्यत यशस्वी रीत्या पूर्ण करण्याची प्रेरणा मिळणार होती.

मागील लेखात आपण, ‘साक्षीरूपी मेघात’ समाविष्ट असलेल्या देवाच्या अनेक सेवकांच्या जीवनक्रमाचे परीक्षण केले होते. त्या सर्वांनी दाखवून दिले, की देवावरील त्यांच्या अतूट विश्‍वासामुळे त्यांना शेवटपर्यंत देवाला निष्ठावान राहणे शक्य झाले, जणू जीवनाच्या शर्यतीत ते शेवटपर्यंत धावत राहिले. त्यांच्या यशावरून आपण एक धडा शिकू शकतो. त्या लेखात आपण पाहिले होते, की पौलाने त्याच्या ख्रिस्ती बांधवांना—ज्यात आपलादेखील समावेश होतो—असा सल्ला दिला: “आपणहि सर्व भार व सहज गुंतविणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे.”—इब्री १२:१.

३. धावण्याच्या शर्यतीत भाग घेणाऱ्‍यांविषयी पौलाने जे म्हटले त्यावरून आपण काय शिकू शकतो?

प्राचीन काळात लोकप्रिय असलेल्या धावण्याच्या शर्यतीविषयी सुरुवातीच्या ख्रिस्ती धर्माची पार्श्‍वभूमी (इंग्रजी) हे पुस्तक असे म्हणते, की “ग्रीक लोक कपडे न घालता व्यायाम करायचे व शर्यतीत धावायचे.” * आपल्या धावण्याची गती कमी होऊ नये व धावताना अडखळण निर्माण होऊ नये म्हणून धावपटू कपडे न घालता धावायचे. अशा प्रकारे धावणे, आज सभ्यतेचे व सामाजिक मूल्यांचे उल्लंघन वाटेल. पण, ते धावपटू केवळ एकमेव उद्देशाने अर्थात बक्षीस मिळवण्याच्या उद्देशाने असे धावायचे. पौलाच्या सांगण्याचा मुद्दा हा होता, की जीवनाच्या शर्यतीत बक्षीस मिळवण्यासाठी सर्व प्रकारचे अडथळे काढून टाकणे अत्यावश्‍यक आहे. हा सल्ला त्या काळातील ख्रिश्‍चनांकरता अगदी उचित होता, आणि आज आपल्याकरताही तो तितकाच उचित आहे. जीवनाच्या शर्यतीत असे कोणते काही भार किंवा ओझे आहेत ज्यांमुळे आपण बक्षीस गमावू शकतो?

‘सर्व भार टाकून द्या’

४. नोहाच्या दिवसांतील लोक काय करण्यात व्यस्त होते?

पौलाने असा सल्ला दिला: ‘सर्व भार टाकून द्या.’ या भारामध्ये, अशा सर्व गोष्टींचा समावेश होतो ज्यांमुळे जीवनाच्या शर्यतीवर आपण लक्ष केंद्रित करू शकणार नाही व सर्वतोपरी प्रयत्न करू शकणार नाही. या गोष्टी काय असू शकतात हे समजण्यास येशू आपली मदत करतो. पौलाने ज्या विश्‍वासू सेवकांचा उल्लेख केला होता त्यात नोहाचाही समावेश होता. नोहाच्या दिवसांविषयी येशूने असे म्हटले: “नोहाच्या दिवसांत झाले तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांतहि होईल.” (लूक १७:२६) येथे येशू, भविष्यात येणाऱ्‍या अभूतपूर्व नाशाविषयी प्रामुख्याने बोलत नव्हता; तर तो लोकांच्या जीवनशैलीविषयी बोलत होता. (मत्तय २४:३७-३९ वाचा.) नोहाच्या दिवसांतील बहुतेक लोकांनी, देवाचे मन आनंदी करणे तर दूर, देवाबद्दल आस्थाही दाखवली नाही. त्यांचे लक्ष कशामुळे विचलित झाले होते? फार मोठे असे काही नाही; तर निव्वळ खाणे-पिणे, लग्न करणे अशा दैनंदिन जीवनातील सर्वसामान्य गोष्टींमुळे त्यांचे लक्ष विचलित झाले होते. त्यांची खरी समस्या ही होती की त्यांनी परिस्थितीचे भान राखले नाही असे येशूने म्हटले.

५. जीवनाची शर्यत यशस्वी रीत्या पूर्ण करण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते?

नोहा व त्याच्या कुटुंबाप्रमाणे आपल्यालाही दररोज बरेच काही करावे लागते. आपल्या उदरनिर्वाहासाठी आपल्याला काम करावे लागते आणि स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी लागते. आपला जास्तीत जास्त वेळ व शक्‍ती यातच खर्च होऊ शकते. खासकरून, आर्थिक अडचणींच्या काळात आपल्या रोजच्या गरजांविषयी चिंतित होणे स्वाभाविक आहे. तसेच, देवाचे समर्पित सेवक या नात्याने आपल्याला अनेक ईश्‍वरशासित जबाबदाऱ्‍याही हाताळाव्या लागतात. उदाहरणार्थ, आपण सेवाकार्यात भाग घेतो, ख्रिस्ती सभांची तयारी करतो व सभांना उपस्थित राहतो, आणि आध्यात्मिक रीत्या सुदृढ राहण्यासाठी वैयक्‍तिक अभ्यास व कौटुंबिक उपासना करतो. देवाची सेवा करण्यासाठी नोहाला बरेच काही करायचे होते, तरीसुद्धा “देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले.” (उत्प. ६:२२) होय, ख्रिस्ती जीवनाची शर्यत यशस्वी रीत्या पूर्ण करायची असल्यास, धावताना अडखळण ठरेल असा कोणताही भार किंवा ओझे आपण टाळले पाहिजे.

६, ७. येशूने दिलेला कोणता सल्ला आपण लक्षात ठेवला पाहिजे?

पौलाने, “सर्व भार” टाकून द्या असे जे म्हटले त्याचा काय अर्थ होतो? अर्थात, आपल्यावर असलेल्या प्रत्येक जबाबदारीतून आपण स्वतःला पूर्णपणे मुक्‍त करू शकत नाही. या बाबतीत, येशूचे शब्द लक्षात ठेवा: “काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, असे म्हणत चिंता करीत बसू नका. कारण ही सर्व मिळविण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला ह्‍या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे.” (मत्त. ६:३१, ३२) येशूच्या शब्दांचा अर्थ असा होतो, की आपण अन्‍न, वस्त्र व निवारा यांसारख्या गोष्टींना जीवनात सर्वाधिक महत्त्व दिले तर अशा सर्वसामान्य गोष्टीदेखील आपल्यासाठी भार किंवा अडथळा बनू शकतात.

येशूने जे म्हटले त्याकडे लक्ष द्या. त्याने म्हटले: “तुम्हाला ह्‍या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे.” येशूचे हे शब्द दाखवून देतात, की आपला पिता यहोवा नक्कीच आपल्या गरजा तृप्त करेल. “ह्‍या सर्वांची” असे जे येशूने म्हटले ते आपल्याला हव्याहव्याशा वाटणाऱ्‍या गोष्टींविषयी नव्हे, तर आपल्या गरजांविषयी त्याने म्हटले. तेव्हा येशूच्या म्हणण्याचा हा अर्थ होता की आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टींचीदेखील आपण चिंता करू नये. नाहीतर, आपण परराष्ट्रीयांसारखे होऊ जे या गोष्टी “मिळविण्याची धडपड” करतात. आपल्या गरजांविषयी चिंता करत बसणे धोकेदायक का आहे? याचे उत्तर, येशूने दिले: “तुम्ही संभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्‍यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हावर पाशाप्रमाणे अकस्मात येईल.”—लूक २१:३४.

८. ‘सर्व भार टाकून देणे’ आज विशेष महत्त्वाचे का आहे?

अंतिम रेषा अगदी नजरेसमोर आहे. अंतिम रेषेच्या इतक्या जवळ असताना आपल्याला अडखळण ठरतील असे अनावश्‍यक भार घेणे किती चुकीचे ठरेल! म्हणून, प्रेषित पौलाने अगदी सुज्ञ सल्ला दिला: “चित्तसमाधानासह भक्‍ती हा तर मोठाच लाभ आहे.” (१ तीम. ६:६) पौलाच्या या शब्दांचे आपण मनापासून पालन केले, तर आपल्याला बक्षीस मिळण्याची जास्त शक्यता आहे.

“सहज गुंतविणारे पाप”

९, १०. (क) “सहज गुंतविणारे पाप” हे कशास सूचित करते? (ख) आपण कशा प्रकारे गुंतले जाऊ शकतो?

पौलाने ‘सर्व भाराचा’ उल्लेख करण्यासोबतच, ‘सहज गुंतविणाऱ्‍या पापाचाही’ उल्लेख केला. हे सहज गुंतविणारे पाप काय असू शकते? ज्या ग्रीक शब्दाचे भाषांतर “सहज गुंतविणारे” असे केले आहे, तो शब्द बायबलमध्ये केवळ एकदाच, या वचनात आढळतो. अल्बर्ट बार्न्झ नावाच्या एका विद्वानाने म्हटले, की त्या काळी धावपटू असे कोणतेही वस्त्र घालण्याचे टाळायचे जे धावताना त्यांच्या पायांमध्ये येऊ शकत होते व त्यामुळे धावण्यात अडथळा निर्माण होऊ शकत होता. त्याचप्रमाणे, एका ख्रिस्ती व्यक्‍तीनेदेखील जीवनाच्या शर्यतीत धावताना अडथळा निर्माण करू शकतील अशा सर्व गोष्टी टाळल्या पाहिजेत. एक ख्रिस्ती व्यक्‍ती कशा प्रकारे विश्‍वास कमकुवत करणाऱ्‍या गोष्टींत ‘गुंतली’ जाऊ शकते?

१० एक ख्रिस्ती व्यक्‍ती एका रात्रीत आपला विश्‍वास गमावून बसत नाही. हे अगदी हळूहळू व नकळत घडू शकते. पौलाने आपल्या पत्राच्या सुरुवातीच्या भागात, विश्‍वासापासून ‘वाहवत जाण्याच्या’ व “अविश्‍वासाचे दुष्ट मन” विकसित करण्याच्या धोक्याविषयी ताकीद दिली होती. (इब्री २:१; ३:१२) एका धावपटूचे पाय त्याच्या वस्त्रांत अडकतात, तेव्हा तो निश्‍चितच अडखळून पडू शकतो. धावताना कोणते वस्त्र घालणे धोक्याचे ठरू शकते हे माहीत असूनही धावपटूने त्याकडे दुर्लक्ष केले, तर अडखळून पडण्याचा धोका जास्त असतो. कोणत्या गोष्टीमुळे या धोक्याकडे त्याचे दुर्लक्ष होऊ शकते? निष्काळजीपणामुळे, फाजील आत्मविश्‍वासामुळे किंवा लक्ष विकर्षित करणाऱ्‍या एखाद्या गोष्टीमुळे असे घडू शकते. पौलाने दिलेल्या सल्ल्यापासून आपण कोणता धडा शिकू शकतो?

११. कोणत्या गोष्टींमुळे आपण आपला विश्‍वास गमावून बसू शकतो?

११ आपण हे लक्षात घेतले पाहिजे, की काही वेळा आपण आपल्या स्वतःच्या कृत्यांमुळेच आपला विश्‍वास गमावू शकतो. ‘सहज गुंतविणाऱ्‍या पापाविषयी’ बोलताना आणखी एका विद्वानाने असे स्पष्टीकरण दिले, की आपली परिस्थिती, आपला सहवास आणि आपल्या चुकीच्या इच्छा-अभिलाषा या सर्वांचा आपल्यावर जबरदस्त प्रभाव पडू शकतो. या गोष्टींमुळे आपला विश्‍वास कमकुवत होऊ शकतो किंवा आपण तो पूर्णपणे गमावून बसू शकतो.—मत्त. १३:३-९.

१२. आपण आपला विश्‍वास गमावू नये म्हणून आपण कोणत्या इशाऱ्‍यांकडे लक्ष दिले पाहिजे?

१२ आपण काय पाहतो व काय ऐकतो म्हणजे आपण आपले मन व अंतःकरण कशावर केंद्रित करतो याबद्दल आपण दक्षता बाळगावी असा सल्ला विश्‍वासू व बुद्धिमान दास वर्ग गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला देत आहे. पैसा व धनदौलत मिळवण्याच्या फंदात अडकण्याच्या धोक्याविषयी अनेकदा आपल्याला इशारा देण्यात आला आहे. आपण मनोरंजन जगताच्या झगमगाटीमुळे किंवा बाजारात दररोज येणाऱ्‍या नवनवीन उपकरणांमुळे भरकटले जाऊ शकतो. विश्‍वासू व बुद्धिमान दास वर्गाने दिलेला हा सल्ला फारच कडक आहे असा विचार करणे अत्यंत धोकेदायक ठरेल. तसेच, आपण आध्यात्मिक रीत्या दृढ आहोत, तेव्हा हा सल्ला इतरांसाठी आहे, आपल्यासाठी नाही असा विचारही आपण कधीच करू नये. सैतानाचे जग आपल्या मार्गांत जे पाश टाकते ते अतिशय धूर्त व फसवे असतात. निष्काळजीपणा, फाजील आत्मविश्‍वास आणि विकर्षणे यांमुळे काहींनी आपला विश्‍वास गमावला आहे. आपल्यासोबत तसे घडल्यास आपण जीवनाचे बक्षीस गमावू शकतो.—१ योहा. २:१५-१७.

१३. आपण हानिकारक प्रभावांपासून स्वतःचे संरक्षण कसे करू शकतो?

१३ आपण दररोज अशा लोकांच्या संपर्कात येतो जे या जगातील ध्येयांना, मूल्यांना व जगाच्या विचारसरणीला उत्तेजन देतात. (इफिसकर २:१, २ वाचा.) या गोष्टींचा आपल्यावर किती परिणाम होतो हे जास्तकरून आपल्यावर व या प्रभावांना आपण कसा प्रतिसाद देतो त्यावर अवलंबून आहे. पौल ज्या ‘अंतरिक्षाविषयी’ किंवा हवेविषयी बोलला ती अतिशय प्राणघातक आहे. या हवेमुळे आपण गुदमरून जाऊ शकतो व जीवनाची शर्यत हरू शकतो. तेव्हा आपण सतत दक्ष असले पाहिजे. कोणती गोष्ट आपल्याला धावमार्गावर टिकून राहण्यास मदत करेल? येशू ख्रिस्ताचे उदाहरण. येशूने आपली शर्यत यशस्वी रीत्या पूर्ण केली; त्यामुळे त्याच्या उदाहरणाचे आपण अनुकरण करू शकतो. (इब्री १२:२) या शिवाय, पौलानेदेखील एक उत्तम उदाहरण मांडले. त्यानेसुद्धा ख्रिस्ती जीवनाची शर्यत यशस्वी रीत्या पूर्ण केली आणि आपल्या उदाहरणाचे अनुकरण करण्याचे प्रोत्साहन आपल्या बांधवांना दिले.—१ करिंथ. ११:१; फिलिप्पै. ३:१४.

“तुम्हाला ते मिळेल”—कसे?

१४. जीवनाची शर्यत पूर्ण करणे पौलासाठी किती महत्त्वाचे होते?

१४ जीवनाची शर्यत पूर्ण करणे पौलासाठी किती महत्त्वाचे होते? इफिसमधील वडिलांशी तो शेवटच्या वेळी बोलला तेव्हा त्याने म्हटले: “मी तर आपल्या प्राणाची किंमत एवढीसुद्धा करीत नाही, ह्‍यासाठी की, मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्‍चितार्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभु येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी.” (प्रे. कृत्ये २०:२४) जीवनाची शर्यत पूर्ण करण्यासाठी तो सर्वकाही त्याग करण्यास, अगदी आपले जीवनही त्याग करण्यास तयार होता. त्याने जर जीवनाची शर्यत पूर्ण केली नसती, तर त्याने सुवार्तेसाठी केलेले सर्व श्रम व कठोर मेहनत वाया गेली असती. पण त्याच वेळी, आपण नक्कीच ही शर्यत जिंकू असा फाजील आत्मविश्‍वासही त्याने बाळगला नाही. (फिलिप्पैकर ३:१२, १३ वाचा.) फक्‍त आपल्या जीवनाच्या अखेरीस त्याने आत्मविश्‍वासाने असे म्हटले: “जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपविली आहे, विश्‍वास राखिला आहे.”—२ तीम. ४:७.

१५. जीवनाच्या शर्यतीत पौलासोबत धावणाऱ्‍या धावपटूंना त्याने कोणते प्रोत्साहन दिले?

१५ पौलाची अशी मनस्वी इच्छा होती, की आपल्या ख्रिस्ती बांधवांनीदेखील हार न मानता जीवनाची शर्यत पूर्ण करावी. उदाहरणार्थ, त्याने फिलिप्पै येथील ख्रिश्‍चनांना आपल्या तारणासाठी परिश्रम करण्याचा आर्जव केला. त्यांनी ‘जीवनाच्या वचनावर’ घट्ट पकड ठेवायची होती. त्याने पुढे असे म्हटले: “माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमहि व्यर्थ झाले नाहीत असा अभिमान मला ख्रिस्ताच्या दिवशी बाळगण्यास कारण होईल.” (फिलिप्पै. २:१५, १६) त्याचप्रमाणे, त्याने करिंथमधील ख्रिश्‍चनांनाही असे आर्जविले: “असे धावा की तुम्हाला [बक्षीस] मिळेल.”—१ करिंथ. ९:२४.

१६. आपले अंतिम ध्येय किंवा बक्षीस आपल्या डोळ्यांसमोर स्पष्ट का असले पाहिजे?

१६ मॅराथॉनसारख्या दीर्घ पल्ल्याच्या शर्यतीत धावताना सुरुवातीला अंतिम रेषा नजरेच्या टप्प्यात नसते. तरीसुद्धा, संपूर्ण शर्यतीदरम्यान धावपटूचे लक्ष अंतिम रेषेवर केंद्रित असते. आपले अंतिम ध्येय जवळ आहे हे त्याला समजते तेव्हा ते गाठण्याचा त्याचा निर्धार आणखी पक्का होतो. जीवनाच्या शर्यतीच्या बाबतीतही असेच असले पाहिजे. आपले अंतिम ध्येय किंवा बक्षीस आपल्याला खरेखुरे वाटले पाहिजे, तरच आपण ते मिळवू शकतो.

१७. बक्षिसावर लक्ष केंद्रित करण्यासाठी विश्‍वासाची गरज का आहे?

१७ “विश्‍वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्‍या गोष्टींबद्दलची खातरी आहे.” (इब्री ११:१) अब्राहाम व सारा एक आरामदायी जीवनाचा त्याग करण्यास आणि ‘परक्यांसारखे व प्रवाशांसारखे’ जीवन जगण्यास तयार होते. असे करणे त्यांना का शक्य झाले? कारण “त्यांनी [देवाच्या अभिवचनांची पूर्णता] दुरून पाहिली” होती. मोशेनेसुद्धा, ‘पापाच्या क्षणिक सुखाकडे’ व ‘मिसर देशातील धनसंचयाकडे’ पाठ फिरवली. असे करण्याचा विश्‍वास व सामर्थ्य त्याला मिळाले, कारण “त्याची दृष्टी प्रतिफळावर होती.” (इब्री ११:८-१३, २४-२६) म्हणूनच, देवाचे हे सर्व सेवक “विश्‍वासाने” वागले असे पौलाने म्हटले. देवावरील विश्‍वासामुळे त्यांनी आपल्या परीक्षांवर व हालअपेष्टांवर आपले लक्ष केंद्रित केले नाही, तर देव त्यांच्यासाठी जे काही करत होता व भविष्यातही तो त्यांच्यासाठी जे काही करणार होता त्यावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले.

१८. “सहज गुंतविणारे पाप” टाकून देण्यासाठी आपण कोणती सकारात्मक पावले उचलू शकतो?

१८ इब्री लोकांस पत्राच्या ११ व्या अध्यायात उल्लेखिलेल्या विश्‍वासू स्त्री-पुरुषांच्या उदाहरणांवर मनन केल्याने आणि त्यांचे अनुकरण केल्याने आपण विश्‍वास विकसित करू शकतो व “सहज गुंतविणारे पाप” टाकून देऊ शकतो. (इब्री १२:१) तसेच, असा विश्‍वास विकसित करणाऱ्‍या लोकांसोबत एकत्र येण्याद्वारे आपण एकमेकांना “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन” देऊ शकतो.—इब्री १०:२४.

१९. बक्षिसावर लक्ष केंद्रित करण्याबद्दल तुम्हाला कसे वाटते?

१९ जीवनाच्या शर्यतीत आपण अंतिम रेषेच्या अगदी जवळ आहोत. अंतिम रेषा जणू नजरेच्या टप्प्यात आहे. विश्‍वासाने व यहोवाच्या मदतीने आपणसुद्धा “सर्व भार व सहज गुंतविणारे पाप टाकून” देऊ शकतो. होय, आपण अशा रीतीने धावू शकतो जेणेकरून आपल्याला बक्षीस मिळेल म्हणजे आपला देव व पिता यहोवा याने प्रतिज्ञा केलेले आशीर्वाद आपल्याला मिळतील.

[तळटीप]

^ ही गोष्ट, प्राचीन काळातील यहुद्यांसाठी अतिशय घृणास्पद होती. दुसरे मक्काबी या पुस्तकात असे म्हटले आहे, की यासोन नावाच्या धर्मत्यागी महायाजकाने जेरूसलेममध्ये ग्रीकांप्रमाणे एक व्यायामशाळा बांधण्याचा प्रस्ताव मांडला तेव्हा यहुदी लोकांमध्ये बरीच खळबळ माजली.—२ मक्काबी ४:७-१७.

तुम्हाला आठवते का?

• “सर्व भार” टाकून देण्यात काय गोवले आहे?

• एक ख्रिस्ती कशामुळे आपला विश्‍वास गमावू शकतो?

• आपण जीवनाच्या बक्षिसावर आपले लक्ष केंद्रित का केले पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२३ पानांवरील चित्र]

‘सहज गुंतविणारे पाप’ काय आहे आणि ते आपल्याला कसे गुंतवू शकते?