व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा तुम्हाला ओळखतो का?

यहोवा तुम्हाला ओळखतो का?

यहोवा तुम्हाला ओळखतो का?

“प्रभु आपले जे आहेत त्यांना ओळखतो.”—२ तीम. २:१९.

१, २. (क) येशूला कशाविषयी काळजी होती? (ख) आपण कोणत्या प्रश्‍नांचा विचार केला पाहिजे?

 एके दिवशी एक परूशी येशूकडे आला आणि त्याने येशूला विचारले: “नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे?” येशूने त्याला उत्तर दिले: “तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर.” (मत्त. २२:३५-३७) येशू खुद्द या शब्दांनुसार जगला. त्याचे आपल्या स्वर्गीय पित्यावर अपार प्रेम होते. यहोवासोबत असलेल्या त्याच्या नातेसंबंधाविषयीही त्याला काळजी होती; आणि ही गोष्ट त्याने आपल्या संपूर्ण जीवनक्रमावरून दाखवली. म्हणूनच, आपल्या मृत्यूच्या काही काळाआधी तो म्हणू शकला, की देव आपल्याला त्याच्या आज्ञांचे विश्‍वासूपणे पालन करणारा म्हणून ओळखतो. अशा प्रकारे, येशू यहोवाच्या प्रेमात टिकून राहिला.—योहा. १५:१०.

आज अनेक जण, असा दावा करतात की देवावर त्यांचे प्रेम आहे. आपणही तोच दावा करतो यात काही शंका नाही. पण, या बाबतीत काही गंभीर बाबी आपण विचारात घेतल्या पाहिजेत. त्या म्हणजे: देव मला ओळखतो का? माझ्याविषयी यहोवा काय विचार करतो? यहोवा मला आपला म्हणून ओळखतो का? (२ तीम. २:१९) या विश्‍वाच्या सार्वभौम अधिकाऱ्‍यासोबत घनिष्ठ नातेसंबंध जोडणे शक्य आहे हा आपल्यासाठी किती मोठा विशेषाधिकार आहे!

३. आपण यहोवाचे होऊ शकतो याबद्दल काहींना शंका का वाटते, आणि अशा विचारसरणीवर मात करण्यास कोणती गोष्ट त्यांना मदत करू शकते?

पण, ज्यांचे यहोवावर खूप प्रेम आहे अशांना ही गोष्ट मान्य करणे कठीण वाटते, की यहोवा आपल्याबद्दल सकारात्मक विचार करू शकतो. स्वतःबद्दल कमीपणाची भावना असल्यामुळे, आपण यहोवाचे होऊ शकतो याबद्दल काहींना शंका वाटते. पण, देव आपल्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो ही किती आनंदाची गोष्ट आहे! (१ शमु. १६:७) प्रेषित पौलाने आपल्या ख्रिस्ती बांधवांना असे लिहिले: “जर कोणी देवावर प्रीती करीत असेल तर देवाला त्याची ओळख झालेली आहे.” (१ करिंथ. ८:३) देवाने तुम्हाला ओळखावे असे जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही त्याच्यावर प्रेम करणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. याचा विचार करा: तुम्ही हे नियतकालिक का वाचत आहात? तुम्ही यहोवाची सेवा पूर्ण अंतःकरणाने, जिवाने, मनाने आणि शक्‍तीने करण्याचा प्रयत्न का करत आहात? तुम्ही देवाला आपले जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतला असल्यास, कोणत्या गोष्टीने तुम्हाला हे पाऊल उचलण्याची प्रेरणा दिली? बायबल स्पष्टपणे सांगते की यहोवा हृदयांचे परीक्षण करतो व योग्य मनोवृत्तीच्या लोकांना आपल्याकडे आकर्षित करतो. (हाग्गय २:७; योहान ६:४४ वाचा.) तेव्हा, यहोवाने तुम्हाला त्याच्याकडे आकर्षित केले आहे म्हणून तुम्ही त्याची सेवा करत आहात हा निष्कर्ष तुम्ही काढू शकता. त्याने ज्यांना आपल्याकडे आकर्षित केले आहे ते जर त्याला विश्‍वासू राहिले, तर तो कधीही त्यांना सोडून देणार नाही. देव त्यांना बहुमूल्य समजतो आणि त्यांच्यावर मनस्वी प्रेम करतो.—स्तो. ९४:१४.

४. देव आपल्याला ओळखतो की नाही याचा आपण सतत विचार का केला पाहिजे?

यहोवाने आपल्याला त्याच्याकडे आकर्षित केल्यानंतर, आपण त्याच्या प्रेमात टिकून राहण्याची काळजी घेतली पाहिजे. (यहूदा. २०, २१ वाचा.) हे लक्षात असू द्या, की आपण देवापासून वाहवत जाण्याची वा देवाला सोडून देण्याची शक्यता आहे असे बायबल म्हणते. (इब्री २:१; ३:१२, १३) उदाहरणार्थ, २ तीमथ्य २:१९ मध्ये पौलाने जे म्हटले त्याच्याआधी त्याने हुमनाय व फिलेत यांचा उल्लेख केला. एके काळी हे दोघे बहुधा यहोवाचे होते. पण, नंतर ते सत्यापासून दूर गेले. (२ तीम. २:१६-१८) हेदेखील आठवणीत आणा, की गलतीच्या मंडळींत पूर्वी असे काही जण होते ज्यांना देव ओळखत होता. पण एके काळी अनुभवत असलेल्या आध्यात्मिक प्रकाशात ते टिकून राहिले नाहीत. (गलती. ४:९) तेव्हा, देवासोबतचा आपला मौल्यवान नातेसंबंध आपण कधीच गृहित धरू नये.

५. (क) असे कोणते काही गुण आहेत ज्यांस देव मौल्यवान समजतो? (ख) आपण कोणत्या उदाहरणांचे परीक्षण करणार आहोत?

असे काही गुण आहेत ज्यांस यहोवा मौल्यवान समजतो. (स्तो. १५:१-५; १ पेत्र ३:४) देव ज्यांना ओळखत होता त्यांनी आपल्या जीवनात विश्‍वास आणि नम्रता हे गुण दाखवले. अशा दोन पुरुषांची उदाहरणे आपण पाहू या. सोबतच आपण अशा एका पुरुषाचे उदाहरणही पाहू या, ज्याला असे वाटले होते की देव आपल्याला ओळखतो. पण त्याने गर्विष्ठपणा दाखवला आणि त्यामुळे यहोवाने त्याला नाकारले. या उदाहरणांवरून आपण मौल्यवान धडे शिकू शकतो.

विश्‍वास ठेवणाऱ्‍यांचा पिता

६. (क) अब्राहामाने यहोवाच्या अभिवचनांवर विश्‍वास असल्याचे कसे प्रदर्शित केले? (ख) यहोवा अब्राहामाला कशा प्रकारे ओळखत होता?

अब्राहामाचा “परमेश्‍वरावर विश्‍वास” होता. खरेतर, त्याला विश्‍वास ठेवणाऱ्‍या सर्वांचा पिता म्हटले आहे. (उत्प. १५:६; रोम. ४:११) विश्‍वासाच्या बळावरच अब्राहामाने एका दूरच्या देशात जाण्यासाठी आपल्या घरादाराचा, आपल्या मित्र-परिवाराचा आणि आपल्या साधनसंपत्तीचा त्याग केला. (उत्प. १२:१-४; इब्री ११:८-१०) याच्या अनेक वर्षांनतरही अब्राहामाचा विश्‍वास तितकाच बळकट होता. याचा एक पुरावा म्हणजे, यहोवाने दिलेल्या आज्ञेनुसार आपला पुत्र इसहाक याचे बलिदान करण्यास तो तयार झाला. (इब्री ११:१७-१९) अब्राहामाने यहोवाच्या अभिवचनांवर विश्‍वास प्रदर्शित केला. म्हणून यहोवाने त्याला खास गणले; तो खरोखर अब्राहामाला ओळखत होता. (उत्पत्ति १८:१९ वाचा.) यहोवाला केवळ अब्राहामाच्या अस्तित्वाची जाणीव नव्हती, तर यहोवाने त्याला एका मित्राप्रमाणे प्रिय मानले.—याको. २:२२, २३.

७. यहोवाने अब्राहामाला दिलेल्या अभिवचनांच्या पूर्णतेविषयी लक्षात घेण्याजोगे काय आहे, आणि याचा अब्राहामावर कसा प्रभाव पडला?

लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे यहोवाने अब्राहामाला जो देश वतन म्हणून देण्याचे अभिवचन दिले होते ते त्याला त्याच्या जीवनकाळात मिळाले नाही. तसेच, त्याची संतती “समुद्रतीरीच्या वाळूइतकी” होतानाही त्याने पाहिले नाही. (उत्प. २२:१७, १८) ही अभिवचने अब्राहामाच्या जीवनकाळात पूर्ण झाली नसली, तरी यहोवावर त्याचा अतूट विश्‍वास होता. त्याला माहीत होते, की देवाने जर शब्द दिला आहे, तर तो पूर्ण होणारच. होय, या विश्‍वासानुसार अब्राहाम जीवन जगला. (इब्री लोकांस ११:१३ वाचा.) यहोवाच्या नजरेत आज आपलासुद्धा विश्‍वास अब्राहामासारखाच आहे का?

यहोवाची वाट पाहणे हे विश्‍वासाचे चिन्ह आहे

८. आपल्या कोणत्या इच्छा-आकांक्षा पूर्ण व्हाव्यात अशी काहींची इच्छा असते?

आपल्या काही इच्छा-आकांक्षा असतील आणि त्या पूर्ण व्हाव्यात अशी आपली उत्कट इच्छा असेल. उदाहरणार्थ, आपले लग्न व्हावे, आपल्याला मुले असावीत, आणि आपले आरोग्य चांगले असावे असे आपल्याला वाटत असेल. अशा सर्व इच्छा स्वाभाविक व उचित आहेत. पण, अनेकांच्या बाबतीत यांपैकी एक किंवा अनेक इच्छा पूर्ण होत नाहीत. असे आपल्या बाबतीत घडल्यास, त्या परिस्थितीचा आपण ज्या प्रकारे सामना करतो त्यावरून आपला विश्‍वास किती दृढ आहे हे दिसून येऊ शकते.

९, १०. (क) काहींनी कशा प्रकारे आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे? (ख) देवाने दिलेल्या अभिवचनांच्या पूर्णतेविषयी तुम्हाला कसे वाटते?

देवाच्या बुद्धीच्या विरोधात जाऊन या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे किती निर्बुद्धपणाचे ठरेल. असे केल्यास, एखाद्याला आध्यात्मिक हानी पोहचू शकते. उदाहरणार्थ, काहींनी यहोवाच्या सल्ल्याच्या विरोधात असलेल्या उपचार-पद्धतींची निवड केली आहे. इतरांनी अशी नोकरी पत्करली आहे ज्यामुळे ते आपल्या कुटुंबाकरता किंवा मंडळीच्या सभांकरता वेळ देऊ शकत नाहीत. सत्यात नसलेल्या एखाद्या व्यक्‍तीशी प्रेमसंबंध जोडण्याविषयी काय म्हणता येईल? एक ख्रिस्ती व्यक्‍ती असे करते, तेव्हा ती खरोखर यहोवासोबत मैत्रिपूर्ण नातेसंबंध जोडण्याचा प्रयत्न करत आहे असे म्हणता येईल का? यहोवाने अब्राहामाला दिलेली अभिवचने पूर्ण व्हावीत म्हणून अब्राहाम अधीर झाला असता, तर यहोवाला कसे वाटले असते? यहोवावर विश्‍वास ठेवण्याऐवजी अब्राहामाने स्वतःच्या बळावर पुन्हा एकदा स्थिरस्थावर होण्याचा आणि मोठे नाव कमावण्याचा प्रयत्न केला असता तर काय झाले असते? (उत्पत्ति ११:४ पडताळून पाहा.) अब्राहाम आपला मित्र आहे असा विचार यहोवाने केला असता का?

१० तुमच्या कोणत्या इच्छा-आकांक्षा पूर्ण व्हाव्यात अशी तुमची इच्छा आहे? यहोवा तुमच्या उचित इच्छा पूर्ण करण्याचे अभिवचन देतो. पण, तो जोपर्यंत तुमच्या इच्छा पूर्ण करत नाही, तोपर्यंत वाट पाहत राहण्याइतका तुमचा विश्‍वास दृढ आहे का? (स्तो. १४५:१६) देवाने अब्राहामाला दिलेली काही अभिवचने त्याच्या जीवनकाळात पूर्ण झाली नाहीत. त्याचप्रमाणे, देवाने दिलेली काही अभिवचने आपण अपेक्षा केलेल्या वेळेनुसार कदाचित पूर्ण होणार नाहीत. तरीसुद्धा, आपण अब्राहामाप्रमाणे देवावर विश्‍वास ठेवतो आणि त्यानुसार जीवन जगतो, तेव्हा यहोवा आपली कदर करतो. यहोवावर विश्‍वास ठेवून जीवन जगल्याने शेवटी आपलाच फायदा होईल.—इब्री ११:६.

एकाने नम्रता दाखवली तर दुसऱ्‍याने गर्विष्ठपणा दाखवला

११. कोरहाला सेवेचे कोणते विशेषाधिकार मिळाले होते, आणि यावरून देवाप्रती त्याची कोणती मनोवृत्ती दिसून येते?

११ यहोवाच्या व्यवस्थेचा व त्याच्या निर्णयांचा आदर करण्याच्या बाबतीत मोशे व कोरह यांनी जी उदाहरणे मांडली ती एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत. त्यांनी जी प्रतिक्रिया दाखवली त्यावरून यहोवा त्यांच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हे दिसून आले. कोरह हा एक कहाथी लेवी होता आणि त्याला सेवेचे अनेक विशेषाधिकार मिळाले होते. यहोवाने कशा प्रकारे इस्राएल लोकांना तांबड्या समुद्रातून वाचवले होते हे पाहण्याची संधी बहुधा त्याला मिळाली होती. तसेच, सीनाय पर्वताजवळ अवज्ञाकारी इस्राएल लोकांवर यहोवाचे न्यायदंड बजावण्यात त्याने भाग घेतला असावा, आणि कराराचा कोश वाहून नेण्यातही त्याने मदत केली असावी. (निर्ग. ३२:२६-२९; गण. ३:३०, ३१) तो बहुधा अनेक वर्षे यहोवाला एकनिष्ठ राहिला होता आणि त्यामुळे इस्राएल लोकांच्या नजरेत तो आदरणीय होता.

१२. पृष्ठ २८ वर दाखवल्याप्रमाणे, कोरहाच्या गर्विष्ठ मनोवृत्तीचा देवासोबत असलेल्या त्याच्या मैत्रीवर कसा प्रभाव पडला?

१२ पण, इस्राएल राष्ट्र प्रतिज्ञात देशाकडे प्रवास करत असताना, देवाच्या व्यवस्थेत समस्या आहेत असे कोरहाला वाटले. त्या सुधारण्यासाठी इस्राएल राष्ट्रात पुढाकार घेणाऱ्‍या २५० पुरुषांनी कोरहाची बाजू घेतली. यहोवासोबत आपला नातेसंबंध घनिष्ठ आहे याची कोरहाला व इतरांना खातरी असावी. ते मोशेला व अहरोनाला म्हणाले: “तुमचे आता फारच झाले. सबंध मंडळी पवित्र आहे तसेच प्रत्येक मनुष्य पवित्र आहे आणि परमेश्‍वर त्यांच्याठायी आहे.” (गण. १६:१-३) किती फाजील आत्मविश्‍वास व गर्विष्ठ मनोवृत्ती! मोशे त्यांना म्हणाला: ‘परमेश्‍वराचे कोण हे परमेश्‍वर दाखवील.’ (गणना १६:५ वाचा.) दुसऱ्‍या दिवशी संध्याकाळ होईपर्यंत, कोरह आणि त्याची बाजू घेणारे सर्व जण मरण पावले.—गण. १६:३१-३५.

१३, १४. मोशेने कोणत्या मार्गांनी आपली नम्रता दाखवली?

१३ कोरहाच्या अगदी उलट, मोशे “हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता.” (गण. १२:३) त्याने यहोवाच्या मार्गदर्शनाचे पालन करण्याचा दृढनिश्‍चय केला होता. त्याद्वारे त्याने आपली लीनता व नम्रता दाखवली. (निर्ग. ७:६; ४०:१६) एखादी गोष्ट करण्याच्या यहोवाच्या मार्गांसंबंधी मोशेने वारंवार प्रश्‍न निर्माण केल्याचे किंवा यहोवाने ठरवून दिलेल्या व्यवस्थेचे पालन करणे त्याला त्रासदायक वाटल्याचे बायबलमध्ये वाचायला मिळत नाही. उदाहरणार्थ, निवासमंडप कसे बांधावे याविषयी यहोवाने मोशेला लहानातला लहान तपशील सांगितला होता; जसे की धाग्याचा रंग काय असावा आणि मंडपाचे पडदे एकमेकांना जोडण्यासाठी किती बिरड्या असावेत असा सर्व तपशील यहोवाने मोशेला दिला होता. (निर्ग. २६:१-६) जर देवाच्या संघटनेतील एखादा पर्यवेक्षक तुम्हाला प्रत्येक लहानसहान गोष्ट समजावून सांगत असेल, तर कदाचित तुम्ही निराश व्हाल. पण, यहोवा एक परिपूर्ण पर्यवेक्षक आहे, जो आपल्या सेवकांवर काम सोपवतो व त्यांच्यावर भरवसा ठेवतो. तो एखाद्या कामाबद्दल अनेक तपशील देतो, तेव्हा त्यामागे योग्य कारणे असतात. पण, एक गोष्ट लक्षात घ्या, की यहोवाने मोशेला लहानातला लहान तपशील सांगितला, तेव्हा यहोवा आपल्या कल्पनाशक्‍तीवर किंवा स्वातंत्र्यावर बंधन घालत आहे असा विचार करून मोशे यहोवावर रागावला नाही. त्याऐवजी, कामगारांनी “सर्व काही” अगदी देवाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार केले याची मोशेने खातरी केली. (निर्ग. ३९:३२) किती नम्र मनोवृत्ती! हे काम यहोवाचे आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी तो आपला उपयोग करत आहे याची जाणीव मोशेला होती.

१४ मोशेला प्रतिकूल परिस्थितींचा सामना करावा लागला, तेव्हादेखील त्याने नम्रता दाखवली. एके प्रसंगी, कुरकुर करणाऱ्‍या इस्राएल लोकांशी व्यवहार करताना मोशेचा राग भडकला आणि त्याने देवाला पवित्र केले नाही. परिणामस्वरूप, मोशे इस्राएल लोकांना प्रतिज्ञात देशात घेऊन जाणार नाही असे यहोवाने त्याला सांगितले. (गण. २०:२-१२) मोशे आणि त्याचा भाऊ अहरोन यांनी कितीतरी वर्षे इस्राएल लोकांचे गाऱ्‍हाणे धीराने सहन केले होते. पण, या प्रसंगी मोशेने चूक केल्यामुळे, अनेक वर्षांपासून तो ज्याची वाट पाहत होता त्याची पूर्णता तो पाहू शकला नाही. मोशेची प्रतिक्रिया काय होती? मोशे साहजिकच निराश झाला असेल, तरीसुद्धा त्याने यहोवाचा निर्णय नम्रतेने मान्य केला. त्याला माहीत होते की यहोवा एक नीतिमान देव आहे आणि तो कधीच अन्याय करत नाही. (अनु. ३:२५-२७; ३२:४) आज तुम्ही मोशेचा विचार करता, तेव्हा यहोवा त्याला ओळखत होता असे तुम्हाला वाटत नाही का?निर्गम ३३:१२, १३ वाचा.

यहोवाच्या अधीन होण्यासाठी नम्रता आवश्‍यक

१५. कोरहाच्या गर्विष्ठ वागणुकीवरून आपण काय शिकू शकतो?

१५ जगभरातील ख्रिस्ती मंडळीमध्ये केल्या जाणाऱ्‍या बदलांप्रती व त्यात पुढाकार घेणाऱ्‍यांनी घेतलेल्या निर्णयांप्रती आपण जी प्रतिक्रिया दाखवतो तिचा यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधावर प्रभाव पडतो. कोरह आणि त्याचे साथीदार आपल्या फाजील आत्मविश्‍वासामुळे, गर्विष्ठपणामुळे आणि विश्‍वासाच्या अभावामुळे देवापासून दूर गेले. कोरहाच्या दृष्टीत मोशे केवळ एक वयोवृद्ध पुरुष होता जो स्वतःच सर्व निर्णय घेत होता. पण, खरेतर यहोवा इस्राएल राष्ट्राचे मार्गदर्शन करत आहे ही गोष्ट कोरह विसरला. परिणामी, देव ज्यांचा उपयोग करत होता त्यांना तो एकनिष्ठ राहिला नाही. एखाद्या गोष्टीविषयी यहोवाकडून स्पष्ट समज मिळेपर्यंत किंवा बदल करण्याची खरोखर गरज असल्यास, ते बदल यहोवा करेपर्यंत कोरहाने वाट पाहायची होती. कोरहाने कितीतरी वर्षे विश्‍वासूपणे यहोवाची सेवा केली होती. पण, त्याच्या गर्विष्ठ कृत्यांमुळे आज आपण त्याच्या विश्‍वासू सेवेची आठवण करत नाही. उलट, यहोवाची अवज्ञा करणारा म्हणूनच आपण त्याची आठवण करतो.

१६. यहोवाने आपल्याला ओळखावे म्हणून मोशेचे उदाहरण आपल्याला कशी मदत करू शकते?

१६ कोरहाच्या अहवालात, आज मंडळीतील वडिलांकरता व इतरांकरता एक गंभीर ताकीद आहे. यहोवा जोपर्यंत पाऊल उचलत नाही तोपर्यंत वाट पाहण्याकरता व ज्यांना पुढाकार घेण्याकरता नेमण्यात आले आहे त्यांच्या मार्गदर्शनाचे पालन करण्याकरता नम्रतेची गरज आहे. मोशेप्रमाणे आपणही नम्र व लीन आहोत हे आपण दाखवतो का? आपल्यामध्ये जे पुढाकार घेतात त्यांचा अधिकार आपण मान्य करतो का, व आपल्याला मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाचे आपण पालन करतो का? आपण निराश होतो तेव्हा आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवतो का? असे केल्यास, आपल्यावरही यहोवाची कृपापसंती असेल. आपल्या नम्रतेमुळे व आपण दाखवत असलेल्या अधीनतेमुळे आपण यहोवाला प्रिय बनू.

जे यहोवाचे आहेत त्यांना तो ओळखतो

१७, १८. यहोवाने आपल्याला नेहमी ओळखावे म्हणून कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते?

१७ यहोवाने ज्यांना त्याच्याकडे आकर्षित केले व ज्यांच्यावर त्याची कृपापसंती होती त्यांच्या उदाहरणांवर मनन केल्याने आपल्याला फायदा होऊ शकतो. अब्राहाम व मोशे हे आपल्याप्रमाणेच अपरिपूर्ण होते व त्यांच्यामध्येदेखील आपल्याप्रमाणेच उणिवा होत्या. तरीसुद्धा, ते आपले आहेत असे यहोवाने मानले. पण, कोरहाच्या उदाहरणावरून दिसून येते, की आपण यहोवापासून दूर जाऊ शकतो व त्याची कृपापसंती गमावू शकतो. तेव्हा आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःला असे विचारले पाहिजे: ‘यहोवा माझ्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो? बायबलमधील या उदाहरणांवरून मी काय शिकू शकतो?’

१८ यहोवा ज्यांना आपल्याकडे आकर्षित करतो ते आपले आहेत असे तो मानतो हे जाणून तुम्हाला खूप सांत्वन मिळू शकते. तेव्हा, विश्‍वास, नम्रता, आणि ज्या गुणांमुळे तुम्ही देवाला अधिक प्रिय बनू शकता असे इतर गुण विकसित करत राहा. यहोवा आपल्याला ओळखतो हा नक्कीच एक विशेषाधिकार आहे ज्यामुळे आज आपल्याला समाधान मिळते, आणि भविष्यात अनेक अद्‌भुत आशीर्वादही मिळतील.—स्तो. ३७:१८.

तुम्हाला आठवते का?

• यहोवासोबत तुम्ही कोणत्या मौल्यवान नातेसंबंधाचा आनंद अनुभवू शकता?

• तुम्ही अब्राहामाच्या विश्‍वासाचे अनुकरण कसे करू शकता?

• कोरह आणि मोशे यांच्या उदाहरणांवरून आपण कोणते धडे शिकू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२६ पानांवरील चित्र]

यहोवा आपली अभिवचने तंतोतंत पूर्ण करेल, असा विश्‍वास अब्राहामाप्रमाणे आपणही बाळगतो का?

[२८ पानांवरील चित्र]

कोरह नम्रतेने मार्गदर्शनाचे पालन करण्यास तयार नव्हता

[२९ पानांवरील चित्र]

तुम्ही नम्रतेने मार्गदर्शनाचे पालन करणारे आहात असे यहोवा तुम्हाला ओळखतो का?