व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबलने बदलले जीवन!

बायबलने बदलले जीवन!

बायबलने बदलले जीवन!

एका जुगार खेळणाऱ्‍या व चोरी करणाऱ्‍याला त्याचं हे व्यसन सोडून आपल्या जीवनात बदल करण्यासाठी कोणत्या गोष्टीनं प्रेरित केलं? याविषयी त्याचं काय म्हणणं आहे ते पाहू या.

“शर्यतीत धावणाऱ्‍या घोड्यांचं मला वेड होतं.”—रिचर्ड स्टिवर्ट

जन्म: १९६५

देश: जमैका

माझा गतकाळ: जुगार खेळणारा आणि गुन्हेगार

माझी पूर्व जीवनशैली: जमैकाची राजधानी किंग्स्‌टन येथील एका गरीब व गजबजलेल्या भागात मी लहानाचा मोठा झालो. तेथे बरेच लोक बेरोजगार होते आणि गुन्हेगारीचं प्रमाणही जास्त होतं. लोक गुंडांच्या दहशतीत राहात होते. गोळ्या झाडण्याचा आवाज मला सहसा रोजच ऐकायला मिळायचा.

माझ्या कष्टाळू आईनं माझ्यासाठी व माझ्या लहान भाऊ आणि बहिणीसाठी आपलं सर्वस्व दिलं. आम्हाला चांगलं शिक्षण मिळावं यासाठी तिनं खूप कष्ट घेतले. मला शिकण्यात आवड नव्हती पण शर्यतीत धावणाऱ्‍या घोड्यांचं मला वेड होतं. मी शाळा बुडवून घोड्यांच्या शर्यती पाहायला जायचो. मी घोडेस्वारीही करायचो.

लवकरच मी घोड्यांच्या शर्यतीत खूप पैसा लावायला लागलो. माझी जीवनशैली अनैतिक बनली आणि मी स्त्रीलंपट बनलो. मी गांजा ओढू लागलो आणि माझ्या व्यसनांसाठी चोऱ्‍या करू लागलो. माझ्याकडे बऱ्‍याच बंदुका होत्या पण मी केलेल्या असंख्य चोऱ्‍यांमध्ये कोणाचा जीव गेला नाही हे बरं झालं.

शेवटी मला पोलिसांनी पकडलं आणि तुरुंगात टाकलं. पण माझ्या जीवनशैलीत काहीच बदल झाला नाही; तुरुंगातून सुटका झाल्यावर मी पुन्हा तीच कामं करायला लागलो. खरंतर मी आणखीनच वाईट बनलो. चेहऱ्‍यानं जरी मी साधाभोळा दिसत असलो तरी मी एक हट्टी, रागीट आणि निर्दयी माणूस होतो. मला स्वतःशिवाय कोणाचीच पर्वा नव्हती.

बायबलनं माझं जीवन बदललं: माझ्या जीवनाच्या या अस्थिर काळात माझ्या आईनं बायबलचा अभ्यास केला आणि ती यहोवाची साक्षीदार बनली. तिच्या व्यक्‍तिमत्त्वात होणारे चांगले बदल पाहून मी आश्‍चर्यचकित झालो. माझ्या आईमध्ये हे बदल कशामुळं होत आहेत हे शोधण्याचं मी ठरवलं आणि म्हणून मी साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास सुरू केला.

मला असं आढळलं की यहोवाच्या साक्षीदारांच्या शिकवणी इतर धर्मांपेक्षा वेगळ्या आहेत आणि साक्षीदार जे काही शिकवतात ते बायबलवर आधारित असतं. पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांसारखं घरोघरी जाऊन प्रचार करणारे लोक माझ्या पाहण्यात तरी फक्‍त साक्षीदारच होते. (मत्तय २८:१९; प्रेषितांची कृत्ये २०:२०) त्यांचं एकमेकांप्रती असलेलं खरं प्रेम पाहून माझी खात्री पटली की हाच खरा धर्म आहे.—योहान १३:३५.

बायबलमधून मी जे शिकत होतो त्यावरून मला माझ्या जीवनात बरेच मोठे बदल करण्याची गरज आहे असं जाणवलं. मी शिकलो की यहोवा व्यभिचार करणाऱ्‍यांचा द्वेष करतो आणि जर मला यहोवाला खूष करायचं असेल तर मला माझ्या शरीराला अशुद्ध करणाऱ्‍या सर्व गोष्टींचा त्याग करावा लागणार आहे. (२ करिंथकर ७:१; इब्री लोकांस १३:४) यहोवाला भावना आहेत आणि आपण जे करतो त्यानं एकतर त्याचं मन दुखावतं किंवा त्याला आनंद होतो ही गोष्ट माझ्या मनाला भिडली. (नीतिसूत्रे २७:११) म्हणून मग मी गांजा, बंदुकांचा वापर सोडून द्यायचा निर्धार केला आणि आपलं जीवन सुधारण्याचं ठरवलं. माझ्या जीवनात केलेल्या बदलांपैकी अनैतिक जीवनशैली आणि जुगार सोडणं सर्वात कठीण होतं.

मी यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल शिकत आहे हे सुरुवातीला मला माझ्या मित्रांना कळू द्यायचं नव्हतं. पण जेव्हा मी मत्तय १०:३३ मधील: “जो कोणी माणसांसमोर मला नाकारेल त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारेन,” हे येशूचे शब्द वाचले तेव्हा माझे विचार बदलले. मी साक्षीदारांसोबत बायबल शिकत आहे हे मग मी माझ्या मित्रांना सांगितलं. जेव्हा मी त्यांना हे सांगितलं तेव्हा ते थक्कच झाले. त्यांचा विश्‍वासच बसत नव्हता की माझ्यासारख्या व्यक्‍तीला ख्रिश्‍चन बनायचं होतं. पण मी त्यांना सांगितलं की आता मला माझ्या आधीच्या जीवनाशी काहीही संबंध ठेवायचा नाही.

मला काय फायदा झाला: मी बायबल तत्त्वांनुसार जीवन जगत आहे हे पाहून माझ्या आईला खूप आनंद झाला. आता मी काही चुकीची कामं करेन याची तिला मुळीच चिंता नाही. आम्ही दोघंही यहोवाप्रती आम्हाला किती प्रेम आहे याविषयी बोलतो. मी जेव्हा माझ्या आधीच्या जीवनाविषयी विचार करतो तेव्हा मी देवाच्या मदतीमुळं इतके मोठे बदल करू शकलो यावर माझा विश्‍वासच बसत नाही. आता मला ती अनैतिक आणि भौतिक जीवनशैली पुन्हा जगायची कधीच इच्छा होत नाही.

जर मी बायबलमधील संदेश स्वीकारला नसता तर आज मी तुरुंगात असतो किंवा जिवंत नसतो. पण आता मी एक सुखी कौटुंबिक जीवन जगत आहे. मला नेहमी साथ देणाऱ्‍या पत्नीसोबत आणि माझ्या आज्ञाधारक मुलीसोबत मिळून यहोवा देवाची उपासना करण्यात अत्यंत आनंद मिळतो. यहोवानं मला ख्रिस्ती बंधुसमाजाचा भाग होऊ दिलं म्हणून मी त्याचे खूप आभार मानतो. कोणीतरी येऊन मला बायबल शिकवण्याचं कष्ट घेतलं त्यासाठीही मी खूप आभारी आहे. आणि इतरांना बायबलविषयी शिकवण्यास मला मिळालेल्या संधींचा मी पूर्ण उपयोग करतो. खासकरून, यहोवानं त्याच्याजवळ येण्यासाठी मला दाखवलेल्या प्रेमदयेविषयी मी मनापासून आभारी आहे. (w११-E ११/०१)

[१५ पानांवरील संक्षिप्त आशय]

“मी शिकलो की यहोवाला भावना आहेत आणि आपण जे करतो त्यानं एकतर त्याचं मन दुखावतं किंवा त्याला आनंद होतो”

[१५ पानांवरील चित्र]

माझ्या आईच्या व्यक्‍तिमत्त्वात होणारे चांगले बदल पाहून मी आश्‍चर्यचकित झालो

[१५ पानांवरील चित्र]

माझ्या पत्नी व मुलीसोबत