व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पती व पत्नी मिळून आपली आध्यात्मिकता वाढवा

पती व पत्नी मिळून आपली आध्यात्मिकता वाढवा

कौटुंबिक सौख्यानंदाच्या गुरुकिल्ल्या

पती व पत्नी मिळून आपली आध्यात्मिकता वाढवा

प्रतीक *: “आमचं नवीनंच लग्न झालं होतं तेव्हा, लतिकानं व मी एकत्र मिळून बायबलचा अभ्यास केला पाहिजे, असा माझा हट्ट असायचा. अभ्यासाच्या वेळी तिचं लक्ष आहे किंवा नाही याची मी वेळोवेळी खात्री करायचो. पण लतिकाला काही केल्या शांत बसवत नव्हतं. मी तिला प्रश्‍न विचारायचो तेव्हा ती फक्‍त हो किंवा नाही अशीच उत्तरं द्यायची. बायबलचा अभ्यास असा असला पाहिजे, असं मला वाटत नव्हतं.”

लतिका: “माझं लग्न झालं तेव्हा मी फक्‍त १८ वर्षांची होते. आमचा नियमित बायबल अभ्यास व्हायचा. पण प्रत्येक अभ्यासाच्या वेळी प्रतीक मला माझ्या चुका दाखवायचे आणि मी बायको म्हणून कुठं कुठं सुधारणा केल्या पाहिजेत, ते जास्त सांगायचे. त्यामुळं मग मी निराश व्हायचे आणि मला वाईट वाटायचं.”

प्रतीक व लतिका यांच्या नातेसंबंधात कोणती समस्या होती, असे तुम्हाला वाटते? दोघांचे हेतू चांगले होते. दोघांचे देवावर प्रेम होते. एकत्र मिळून बायबलचा अभ्यास केला पाहिजे, याची दोघांनाही जाणीव होती. पण ज्या गोष्टीमुळे त्यांनी एकत्र यायला हवे होते त्या गोष्टीचे उलट परिणाम होत होते. ते दोघे मिळून अभ्यास तर करत होते पण एक जोडपे या नात्याने ते आपली आध्यात्मिकता वाढवत नव्हते.

आध्यात्मिकता म्हणजे काय? विवाहित जोडप्यांनी आध्यात्मिकता वाढवण्याचा प्रयत्न का केला पाहिजे? त्यांच्यासमोर कोणकोणत्या समस्या येऊ शकतात व ते दोघे मिळून त्यांचा सामना कसा करू शकतात?

आध्यात्मिकता म्हणजे काय?

बायबलमध्ये वापरण्यात आलेला “आध्यात्मिकता” हा शब्द, मनोवृत्ती किंवा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन याला सूचित होतो. (१ करिंथकर २:१५) जसे की, पौल नावाच्या बायबलच्या एका लेखकाने, आध्यात्मिक मनोवृत्तीच्या व शारीरिक मनोवृत्ती असलेल्या व्यक्‍तीतला फरक दाखवला. तो म्हणतो, की शारीरिक मनोवृत्तीची व्यक्‍ती इतरांपेक्षा स्वतःचा जास्त विचार करते. देवाच्या स्तरांनुसार जगण्याचा प्रयत्न करण्याऐवजी अशी व्यक्‍ती स्वतःला जे बरोबर वाटते त्यानुसार वागते.—१ करिंथकर २:१४; गलतीकर ५:१९, २०.

याच्याउलट, आध्यात्मिक मनोवृत्तीची व्यक्‍ती देवाच्या स्तरांना महत्त्व देते. ती यहोवा देवाला मित्र समजते आणि त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करते. (इफिसकर ५:१) त्यामुळे ती इतरांबरोबर वागताना प्रेमाने, दयाळूपणे व सौम्यपणे वागते. (निर्गम ३४:६) आणि ती देवाच्या आज्ञा पाळते; कधीकधी आज्ञा पाळणे तिला कठीण वाटत असले तरीसुद्धा ती त्या पाळते. (स्तोत्र १५:१, ४) कॅनडात राहणाऱ्‍या डॅरन यांच्या लग्नाला ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ते म्हणतात: “माझ्या मते, आध्यात्मिक मनोवृत्तीची व्यक्‍ती नेहमी, आपल्या बोलण्याचा व कार्यांचा देवाबरोबर असलेल्या तिच्या मैत्रीवर कसा परिणाम होईल, याचा विचार करते.” डॅरन यांच्या पत्नी जेन याला दुजोरा देत म्हणतात: “आणि मला वाटतं, की आध्यात्मिक मनोवृत्ती असलेली स्त्री दररोज, देवाच्या आत्म्याच्या फळात असलेले गुण आपल्या व्यक्‍तिमत्त्वात आणण्याचा खरोखरच प्रयत्न करते.”—गलतीकर ५:२२, २३.

अर्थात, आध्यात्मिक मनोवृत्ती विकसित करण्यासाठी एखाद्या व्यक्‍तीने विवाहित असले पाहिजे असे नाही. खरेतर, देवाबद्दल शिकून घेण्याची व त्याचे अनुकरण करण्याची प्रत्येक व्यक्‍तीची जबाबदारी आहे, असे बायबल शिकवते.—प्रेषितांची कृत्ये १७:२६, २७.

जोडपे या नात्याने आध्यात्मिक मनोवृत्ती का विकसित केली पाहिजे?

पती व पत्नी दोघांनी मिळून आध्यात्मिक मनोवृत्ती विकसित करण्याचा प्रयत्न का केला पाहिजे? या उदाहरणावर विचार करा: दोघे जण एक जागा घेतात आणि त्यांना या जागेवर भाज्या लावायच्या आहेत. वर्षाच्या एका विशिष्ट वेळी आपण बिया लावू या, असा यातील एक जण विचार करतो; तर दुसऱ्‍याला असे वाटते, की नाही, बिया आपण नंतर लावू यात. एकाला एका विशिष्ट प्रकारचे खत वापरायचे असते तर दुसरा त्याला कडाडून विरोध करतो आणि म्हणतो, की रोपांना खतांची मुळीच गरज नाही. एक जण दररोज बागेत खूप कष्ट करतो. आणि दुसरा, काहीही काम न करता फळ मिळण्याची अपेक्षा करतो; तसेच जो काम करतो त्याला तो मदतही करत नाही. या उदाहरणात, बागेत त्यांना काही प्रमाणात फळ मिळेल. पण जर त्या दोघांनी एकमताने व एकजुटीने त्यांचा हेतू साध्य करायचा प्रयत्न केला असता तर त्यांना आणखी जास्त यश आले असते.

पती व पत्नी हे वरील उदाहरणात सांगितल्याप्रमाणे दोघे जण आहेत. फक्‍त एकाच सोबत्याने आध्यात्मिक मनोवृत्ती विकसित केली तर त्यांच्यातील नातेसंबंध कदाचित काही प्रमाणात सुधारेल. (१ पेत्र ३:१, २) पण जर दोघा पतीपत्नीने देवाच्या स्तरांनुसार जगायचे ठरवले आणि देवाची सेवा करत असताना एकमेकांना आधार देण्याचा आपल्या परीने होईल तो प्रयत्न केला तर त्यांच्यातील नातेसंबंध आणखी चांगला होणार नाही का? “एकट्यापेक्षा दोघे बरे,” असे सुज्ञ राजा शलमोनाने लिहिले. का? “कारण त्यांच्या श्रमांचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. त्यांतला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल.”—उपदेशक ४:९, १०.

आपल्या विवाह सोबत्याबरोबर आध्यात्मिक मनोवृत्ती विकसित करण्याची तुमची मनापासून इच्छा असेल. पण बागकामाच्या बाबतीत आहे तसे, फक्‍त इच्छा बाळगल्याने फळ मिळत नाही. तुम्ही प्रयत्न करत असताना तुमच्यासमोर कोणत्या दोन समस्या येऊ शकतात ते पाहा व या समस्यांवर तुम्ही कशा प्रकारे मात करू शकता तेही पाहा.

समस्या १: आम्हाला वेळच मिळत नाही. अलीकडेच लग्न झालेल्या सुचित्रा म्हणतात: “माझे पती मला संध्याकाळी ७ वाजता ऑफिसमधून घ्यायला येतात. घरी आल्यावर घरातली कामं आमच्याकडे आ वासून बघत असतात. आपण एकत्र मिळून देवाबद्दल शिकलं पाहिजे, असं आमचं मन आम्हाला सांगत असतं, पण शरीर मात्र साथ देत नाही.”

संभाव्य उपाय: जुळवून घेण्यास तयार राहा आणि सहकार्य करा. सुचित्रा म्हणतात: “आम्ही दोघांनी ठरवलं, की सकाळी जरा लवकर उठायचं आणि कामाला निघण्याआधी बायबलमधला एखादा भाग वाचून त्यावर चर्चा करायची. हे मला घरातल्या काही कामांमध्ये मदत करतात त्यामुळं मला त्यांच्याबरोबर बसता येतं.” या प्रयत्नांचा त्यांना काय फायदा झाला आहे? सुचित्राचे पती आदित्य यांचे असे म्हणणे आहे: “माझ्या असं पाहण्यात आलं आहे, की आम्ही दोघं जेव्हा एकत्र मिळून आध्यात्मिक गोष्टींवर नियमित चर्चा करतो तेव्हा आमच्यासमोर येणाऱ्‍या समस्यांना आम्ही यशस्वी रीत्या हाताळतो; त्यामुळे आमची बरीच डोकेदुखीसुद्धा कमी होते.”

एकमेकांशी बोलण्याव्यतिरिक्‍त तुम्ही दररोज सोबत मिळून प्रार्थनादेखील केली पाहिजे. असे केल्याने काय होईल? राकेश यांच्या लग्नाला १६ वर्षे झाली आहेत. ते म्हणतात: “काही काळ आधी, आमच्या दोघांतील नातेसंबंध खरोखरच तणावपूर्ण झाले होते. पण आम्ही दररोज रात्री सोबत मिळून प्रार्थना करायला वेळ काढायचो आणि देवाला आमच्या मनातल्या चिंता सांगायचो. मला वाटतं, सोबत प्रार्थना केल्यामुळं आम्हाला आमच्या समस्या सोडवता आल्या आणि वैवाहिक जीवनातला आनंद पुन्हा मिळवता आला.”

हे करून पाहा: प्रत्येक दिवसाच्या शेवटी, दिवसभरात तुम्हा दोघांच्या बाबतीत झालेल्या चांगल्या गोष्टींची, म्हणजे अशा गोष्टींची ज्यांबद्दल तुम्ही देवाला आभार मानू इच्छिता, त्यांची चर्चा करायला थोडासा वेळ काढा. तुमच्यासमोर आलेल्या समस्यांबद्दल आणि खासकरून अशा समस्या ज्यांवर मात करायला तुम्हाला देवाची मदत हवी आहे यांच्याबद्दल तुम्ही बोलू शकता. पण एक सावधानतेचा इशारा आहे. तुमच्या सोबत्याच्या चुका दाखवण्याची तुम्हाला संधी मिळाली आहे, असे समजू नका. त्याऐवजी, तुम्ही दोघांनी मिळून ज्यांत सुधारणा केल्या पाहिजेत केवळ अशाच गोष्टींचा प्रार्थनेत उल्लेख करा. आणि दुसऱ्‍या दिवशी, तुम्ही देवाला केलेल्या विनंतीनुसार वागायचा तुमच्या परीने प्रयत्न करा.

समस्या २: आमची वेगवेगळी कुवत आहे. तन्मय म्हणतात: “मला वाचन करायला, अभ्यास करायला आवडत नाही.” त्यांची बायको नेहा या असे म्हणतात: “मला वाचन खूप आवडतं आणि मी जे काही वाचते त्यावर बोलायला आवडतं. कधीकधी जेव्हा आम्ही, अभ्यासलेल्या बायबल विषयांची चर्चा करतो तेव्हा मला वाटतं, तन्मय यांना थोडीशी भीती वाटते.”

संभाव्य उपाय: स्पर्धात्मक किंवा टीकात्मक मनोवृत्ती बाळगू नका तर समंजस असा. तुमचा सोबती जे काही करत आहे त्याची तुम्हाला कदर आहे हे त्याला सांगा आणि यहोवाच्या सेवेत जे बरोबर आहे ते तसेच करत राहण्याचा निर्धार ठेवण्याचे उत्तेजन द्या. तन्मय म्हणतात: “बायबल विषयांची चर्चा करायला नेहा कधीकधी जरा जास्तच उत्सुक असते. आणि तिच्याबरोबर आध्यात्मिक विषयांवर चर्चा करायला पूर्वी मी जरा कुचराई करायचो. पण नेहा खूप समंजस आहे. आता आम्ही एकत्र मिळून नियमाने आध्यात्मिक गोष्टींवर चर्चा करतो आणि मला दिसून आलं आहे, की मला घाबरण्याचं काही कारण नाही. आता मलाही तिच्याबरोबर या विषयांची चर्चा करायला आवडतं. आम्हा दोघांनाही एकमेकांच्या सहवासात कसलाच संकोच वाटत नाही, उलट छान वाटतं.”

दर आठवडी एकत्र मिळून बायबलचे वाचन करण्यासाठी व त्याचा अभ्यास करण्यासाठी वेळ काढल्याने वैवाहिक जीवन सुधारले आहे असे अनेक पतीपत्नींना दिसून आले आहे. पण इथेही एक सावधानतेचा इशारा आहे: या चर्चांदरम्यान तुम्ही जे काही शिकता ते स्वतःला लागू करा, तुमच्या सोबत्याला नव्हे. (गलतीकर ६:४) वैवाहिक जीवनातील वादाच्या विषयांची चर्चा अभ्यासाच्या वेळी करू नका. का?

समजा: तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर जेवायला बसला आहात. जेवताना तुम्ही, चिघळणाऱ्‍या जखमेची मलमपट्टी कराल का? मुळीच नाही. अशाने कोणालाच जेवायची इच्छा होणार नाही. येशूने देवाबद्दल शिकण्याची व त्याची इच्छा पूर्ण करण्याची तुलना अन्‍न खाण्याशी केली. (मत्तय ४:४; योहान ४:३४) तुम्ही जेव्हा जेव्हा बायबल विषयांची चर्चा करायला बसता तेव्हा तेव्हा तुम्ही जर मानसिक जखमांवर बोलायला सुरू केले तर तुमच्या सोबत्याचे आध्यात्मिक अन्‍नावरून मन उडेल. हे खरे आहे, की तुम्ही समस्यांची तर चर्चा केलीच पाहिजे. परंतु या समस्यांची चर्चा तुम्ही, त्या वेळी केली पाहिजे जी वेळ तुम्ही खास ती चर्चा करण्यासाठी ठरवली आहे.—नीतिसूत्रे १०:१९; १५:२३.

हे करून पाहा: तुमच्या सोबत्याचे तुम्हाला सर्वात जास्त आवडत असलेले दोन-तीन गुण एका कागदावर लिहून ठेवा. आणि पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही त्या गुणांशी संबंधित आध्यात्मिक विषयांची चर्चा कराल तेव्हा, तुमचा सोबती ज्या प्रकारे ते गुण दाखवतो ते तुम्हाला किती आवडते हे त्याला सांगा.

तुम्ही जे काही पेरता त्याचीच कापणी कराल

पती व पत्नी म्हणून तुम्ही आध्यात्मिक मनोवृत्ती विकसित करण्याचा प्रयत्न केला तर कालांतराने तुमचे वैवाहिक जीवन सुखकारक व आनंदी होईल. देवाचे वचन अशी हमी देते, की “माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल.”—गलतीकर ६:७.

लेखाच्या सुरुवातीला उल्लेखण्यात आलेल्या प्रतीक व लतिका या जोडप्याला बायबलमधील या तत्त्वाची सत्यता पटली. त्यांच्या लग्नाला ४५ वर्षे पूर्ण झाली आहेत. दोघांनी एकत्र मिळून आध्यात्मिक मनोवृत्ती विकसित करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना फायदा झाला आहे. प्रतीक म्हणतात: “लतिका व्यवस्थित बोलत नाही, असा मी तिला दोष लावायचो. पण हळूहळू मला जाणवलं, की मीसुद्धा काही बाबतीत सुधारणा केल्या पाहिजेत.” लतिका म्हणतात: “आमचं दोघांचंही यहोवा देवावर प्रेम असल्यामुळंच आम्ही आमच्या वैवाहिक जीवनातील तणावपूर्ण काळात तग धरून राहू शकलो. आम्ही दोघांनी बायबलचा नियमित अभ्यास व प्रार्थना करायचं सोडून दिलं नाही. प्रतीक ख्रिस्ती गुण दाखवण्याचा किती प्रयत्न करतात हे जेव्हा मी पाहते तेव्हा मलाही त्यांच्यावर प्रेम करायला सोपं जातं.” (w११-E ११/०१)

[तळटीप]

^ परि. 3 काही नावे बदलण्यात आली आहेत.

स्वतःला विचारा . . .

▪ आम्ही दोघांनी मिळून शेवटी प्रार्थना केव्हा केली होती?

▪ माझ्या सोबत्याला माझ्याबरोबर आध्यात्मिक गोष्टींवर खुल्या मनाने चर्चा करायला उत्तेजन देण्याकरता मी काय केले पाहिजे?