व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अब्राहाम एक प्रेमळ व्यक्‍ती

अब्राहाम एक प्रेमळ व्यक्‍ती

अब्राहाम एक प्रेमळ व्यक्‍ती

अब्राहाम दुःखाने विव्हळ झाला आहे. त्याची प्रिय पत्नी, साराचा मृत्यू झाला आहे. तिला शेवटचा निरोप देताना त्याचे मन तिच्या असंख्य आठवणींनी दाटून आले आहे. या दुःखामुळे त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. (उत्पत्ति २३:१, २) अश्रू गाळणे त्याच्या दुर्बलतेला सूचित करत नसून ते त्याच्या उत्तम गुणाची, म्हणजेच प्रेमाची साक्ष देत आहेत.

प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे, एखाद्या व्यक्‍तीबद्दल वाटणारी जिव्हाळ्याची भावना किंवा आपुलकी. एक प्रेमळ व्यक्‍ती आपल्या कार्यांतून इतरांबद्दल वाटणारी प्रेमाची भावना व्यक्‍त करते आणि असे करताना ती व्यक्‍तिगत त्याग करायलाही तयार असते.

अब्राहामाने प्रेम कसे दाखवले? अब्राहामाने आपल्या कृत्यांतून दाखवले की त्याचे त्याच्या कुटुंबावर प्रेम होते. अब्राहाम खूप व्यस्त होता. तरीही त्याने कधीही त्याच्या कुटुंबाच्या भावनिक आणि आध्यात्मिक गरजांकडे दुर्लक्ष केले नाही. याउलट, कुटुंबप्रमुख या नात्याने अब्राहाम उपासनेत पुढाकार घेत होता म्हणूनच यहोवाने त्याची निवड केली. (उत्पत्ति १८:१९) एवढेच नाही तर अब्राहामाने दाखवलेल्या प्रेमाचा उल्लेखही यहोवाने केला. अब्राहामाशी बोलताना, त्याने इसहाकाचा उल्लेख “तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय” असा केला.—उत्पत्ति २२:२.

अब्राहामाची प्रिय पत्नी साराचा मृत्यू झाला तेव्हा त्याने ज्या प्रकारे भावना व्यक्‍त केल्या त्यावरून त्याचे प्रेम आणखी चांगल्या प्रकारे दिसून आले. तिच्यासाठी अश्रू वाहून त्याने खूप शोक केला. तो जरी शूर आणि धाडसी होता तरीही आपले दुःख व्यक्‍त करण्यास तो संकोचला नाही. खंबीरपणा व प्रेम हे दोन्ही गुण त्याने अगदी चांगल्या प्रकारे प्रदर्शित केले.

अब्राहामाने दाखवले की त्याचे देवावर प्रेम होते. त्याच्या संपूर्ण जीवनक्रमातून त्याचे हे प्रेम दिसले. ते कसे? १ योहान ५:३ मध्ये जे म्हटले आहे ते कदाचित आपल्याला आठवत असेल: “देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय.” या व्याख्येनुसार देवाप्रती प्रेम दाखवण्यात अब्राहामाने एक उत्तम उदाहरण मांडले.

यहोवाने जेव्हा-जेव्हा अब्राहामाला आज्ञा दिल्या तेव्हा-तेव्हा त्याने लगेच त्या पाळल्या. (उत्पत्ति १२:४; १७:२२, २३; २१:१२-१४; २२:१-३) दिलेली आज्ञा सोपी आहे की कठीण याचा त्याने विचार केला नाही; तसेच यहोवाने ती आज्ञा का दिली याचे कारण माहीत असो वा नसो, अब्राहामाने ती पाळली. त्याच्या देवाने त्याला जर काही करायला सांगितले तर ते तो आनंदाने करण्यास तयार होता. यहोवाच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करण्याद्वारे त्याच्यावरील आपले प्रेम आपण व्यक्‍त करतो असे अब्राहामाने मानले.

आपण काय शिकतो? इतरांना, खासकरून कुटुंबातील सदस्यांना जिव्हाळ्याची भावना दाखवण्याद्वारे आपण अब्राहामाचे अनुकरण करू शकतो. आपण आपल्या जीवनाच्या चिंतांमध्ये इतकेही गुंतू नये की आपल्या जवळच्या लोकांसाठी वेळच उरणार नाही.

तसेच आपण यहोवाबद्दल मनस्वी प्रेम विकसित केले पाहिजे. असे प्रेम आपल्या जीवनासाठी एक शक्‍तिशाली प्रेरणा ठरू शकते. उदाहरणार्थ, ते प्रेम देवाच्या इच्छेनुसार वागण्यासाठी आपल्या मनोवृत्तीत, बोलण्याच्या शैलीत, आणि आचरणात बदल करण्यास आपल्याला प्रेरित करू शकते.—१ पेत्र १:१४-१६.

हे खरे आहे की, यहोवाच्या आज्ञांचे पालन करणे नेहमीच सोपे नसते. पण आपण एका गोष्टीची खातरी बाळगू शकतो, ती म्हणजे ज्याने अब्राहामाला मदत केली, ज्याने त्याला “माझा मित्र” म्हणून संबोधले, तो नेहमी आपल्या पाठीशी राहील. (यशया ४१:८) त्याचे वचन आपल्याला आश्‍वासन देते की, तो “स्वतः तुम्हास पूर्ण, दृढ व सबळ करेल.” (१ पेत्र ५:१०) अब्राहामाच्या त्या विश्‍वासू मित्राकडून किती हृदयस्पर्शी आश्‍वासन! (w१२-E ०१/०१)

[१३ पानांवरील चौकट]

पुरुषाचे रडणे हे दुर्बलतेचे लक्षण आहे का?

बरेच जण उत्तर देतील, होय. त्यांना कदाचित हे जाणून आश्‍चर्य वाटेल की बायबलमध्ये सांगितलेल्या आवेशी व विश्‍वासू व्यक्‍तींपैकी एक असलेल्या अब्राहामाने दुःखाच्या वेळी अश्रूंना वाट करून दिली. अब्राहामाप्रमाणेच योसेफ, दावीद, प्रेषित पेत्र, इफिस मंडळीचे वडील, आणि येशू यांनीही दुःखाच्या वेळी अश्रूंना वाट करून दिली. (उत्पत्ति ५०:१; २ शमुवेल १८:३३; लूक २२:६१, ६२; योहान ११:३५; प्रेषितांची कृत्ये २०:३६-३८) तर मग, या उदाहरणांवरून स्पष्टच होते की पुरुषाचे रडणे हे दुर्बलतेचे लक्षण आहे असे बायबल मुळीच शिकवत नाही.