व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मी यहोवा “तुझा देव तुझा उजवा हात धरून” आहे

मी यहोवा “तुझा देव तुझा उजवा हात धरून” आहे

देवाच्या जवळ या

मी यहोवा “तुझा देव तुझा उजवा हात धरून” आहे

“माझा हात धरून ठेव.” रहदारीचा रस्ता ओलांडताना एक वडील आपल्या मुलाला असे म्हणतात. ते त्या चिमुकल्याचा हात घट्ट धरतात त्यामुळे त्याला खूप सुरक्षित वाटते, त्याला कशाचीही भीती वाटत नाही. जीवनातील समस्यांचा सामना करत असताना कोणीतरी तुमचाही हात धरून तुम्हाला त्यांतून सुखरूप बाहेर पडण्यास मदत करावी असे तुम्हाला कधी वाटले आहे का? असे असल्यास, तुम्हाला यशयाच्या पुस्तकातील शब्दांतून सांत्वन मिळेल.—यशया ४१:१०, १३ वाचा.

यशयाने हे शब्द इस्राएल राष्ट्रासाठी लिहिले होते. हे राष्ट्र देवाची “खास” संपत्ती असली तरी त्यांना चारही बाजूंनी शत्रू राष्ट्रांनी घेरले होते. (निर्गम १९:५) पण, इस्राएल राष्ट्राला घाबरण्याचे कारण होते का? यहोवाने यशयाद्वारे त्यांना एक दिलासा देणारा संदेश दिला. त्या शब्दांचे परीक्षण करत असताना हे लक्षात असू द्या की ते शब्द आजही देवाच्या उपासकांना लागू होतात.—रोमकर १५:४.

“तू भिऊ नको,” असे यहोवा आर्जवतो. (वचन १०) हे काही पोकळ शब्द नाहीत. आपल्या लोकांनी का घाबरू नये हे तो पुढे सांगतो. तो म्हणतो: “कारण मी तुझ्याबरोबर आहे.” यहोवा आपल्यापासून दूर असणाऱ्‍या कोणा व्यक्‍तीसारखा नाही जी फक्‍त गरजेच्या वेळी मदतीला धावून येण्याचे आश्‍वासन देते. तर यहोवा आपल्या सेवकांना ही हमी देऊ इच्छितो की त्यांना साहाय्य करण्यासाठी तो नेहमी त्यांच्यासोबत आहे, जणू त्यांच्या बाजूला उभा आहे. हे जाणून आपल्याला किती सांत्वन मिळते!

यहोवा पुढे आश्‍वासन देतो: “घाबरू नको.” (वचन १०) येथे वापरण्यात आलेले इब्री क्रियापद, “आपल्याला कोणी इजा पोचवेल या भीतीने सभोवताली पाहणाऱ्‍यांना” सूचित करते. आपल्या लोकांनी भीतीने येथे-तेथे पाहण्याची गरज का नाही हे यहोवा पुढे सांगतो: “कारण मी तुझा देव आहे.” यापेक्षा आणखी आश्‍वासन देणारे शब्द काय असू शकतात? यहोवा या जगाचा परात्पर आणि सर्वसमर्थ आहे. (स्तोत्र ९१:१) सर्वशक्‍तिमान यहोवा देव त्यांच्या बाजूने असल्यावर त्यांना घाबरण्याचे काय कारण आहे?

तर मग, यहोवाचे उपासक त्याच्याकडून कशाची अपेक्षा करू शकतात? तो अभिवचन देतो: “मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो.” (वचन १०) तो पुढे असेही म्हणतो: “मी परमेश्‍वर [“यहोवा,” NW] तुझा देव तुझा उजवा हात धरून” आहे. (वचन १३) हे शब्द ऐकल्यावर तुमच्या मनात कोणते चित्र तयार होते? एका संदर्भानुसार “ही दोन्ही वचने वाचल्यावर मनात एका पित्याचे व मुलाचे जिवंत चित्र तयार होते. [तो पिता] फक्‍त गरजेच्या वेळी मुलाचे संरक्षण करण्यास येत नाही, तर तो त्या मुलासोबत त्याचा हात धरून उभा आहे. तो कधीही आपल्या मुलाला स्वतःपासून दूर होऊ देणार नाही.” जरा विचार करा, यहोवाही त्याच्या लोकांना स्वतःपासून कधीही दूर होऊ देणार नाही, त्यांच्या जीवनातील सर्वात कठीण समयीही तो त्यांचा हात धरून त्यांच्यासोबत उभा राहील.—इब्री लोकांस १३:५, ६.

आज यहोवाच्या उपासकांना यशयाच्या या शब्दांतून बरेच सांत्वन मिळू शकते. आपण “कठीण” दिवसांत जगत असल्यामुळे जीवनाच्या चिंता कधीकधी आपल्याला निराश करू शकतात. (२ तीमथ्य ३:१) पण या चिंतांचा सामना करताना आपण एकटे नाही. आपल्याला साहाय्य करण्यासाठी यहोवा आपला हात धरण्यास तयार आहे. आपल्या पित्यावर भरवसा ठेवणाऱ्‍या मुलाप्रमाणे आपणही आपल्या स्वर्गीय पित्याचा हात धरू शकतो आणि तो आपल्याला योग्य दिशा दाखवेल व गरजेच्या वेळी आपली मदत नक्की करेल असा विश्‍वास आपण बाळगू शकतो.—स्तोत्र ६३:७, ८. (w१२-E ०१/०१)