व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाने अब्राहामाला त्याच्या पुत्राचे बलिदान देण्यास का सांगितले?

देवाने अब्राहामाला त्याच्या पुत्राचे बलिदान देण्यास का सांगितले?

वाचक विचारतात . . .

देवाने अब्राहामाला त्याच्या पुत्राचे बलिदान देण्यास का सांगितले?

▪ बायबलमधील उत्पत्तिच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे, यहोवा देवाने अब्राहामाला त्याचा पुत्र इसहाक याचे बलिदान देण्यास सांगितले. (उत्पत्ति २२:२) बायबलमधील हा वृत्तान्त वाचून काही जण खूप अस्वस्थ होतात. उदाहरणार्थ, कॅरल नावाची एक प्राध्यापिका म्हणते: “लहानपणी मी पहिल्यांदा ही गोष्ट ऐकली तेव्हा मला खूप राग आला. देव अशी कशी मागणी करू शकतो असं मला वाटलं?” अर्थात, असे वाटणे स्वाभाविक असले, तरी या संदर्भात काही गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

प्रथम, यहोवाने काय केले नाही त्याचा विचार करा. अब्राहाम आपल्या पुत्राचे बलिदान देण्यास तयार असला, तरी यहोवाने त्याला ते बलिदान देऊ दिले नाही; शिवाय, अशा प्रकारची मागणी यहोवाने पुन्हा कधीच कोणाकडून केली नाही. आपल्या सर्व उपासकांनी, अगदी मुलांनीसुद्धा दीर्घायुष्य जगावे व सुखीसमाधानी राहावे अशी यहोवाची इच्छा आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे, यहोवाने अब्राहामाला त्याच्या पुत्राचे बलिदान देण्यास सांगितले त्यामागे त्याचे एक खास कारण होते असे बायबल सूचित करते. देवाला माहीत होते, की अनेक शतकांनंतर तो आपल्या स्वतःच्या पुत्राला * अर्थात येशूला मानवजातीसाठी मरण पत्करू देणार होता. (मत्तय २०:२८) हे बलिदान देण्यासाठी यहोवाला किती मोठी किंमत मोजावी लागणार होती हे त्याला आपल्याला सांगायचे होते. त्याने अब्राहामाकडून जी मागणी केली त्यावरून त्याने अत्यंत प्रभावीपणे भविष्यातील त्या बलिदानाची पूर्वझलक दिली. ती कशी?

यहोवा अब्राहामाला काय बोलला त्याकडे लक्ष द्या. देव त्याला म्हणाला: “तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन . . . त्याचे होमार्पण कर.” (उत्पत्ति २२:२) या ठिकाणी यहोवाने इसहाकाचा उल्लेख “प्रिय” असा केला याची नोंद घ्या. अब्राहामासाठी इसहाक किती मौल्यवान होता याची यहोवाला जाणीव होती. आणि आपल्या पुत्रावर अर्थात येशूवर आपले किती प्रेम आहे याचीही यहोवाला जाणीव होती. यहोवाच्या नजरेत येशू इतका प्रिय होता की स्वर्गातून बोलताना दोन वेळा त्याने येशूविषयी असे म्हटले: “तू माझा पुत्र, मला परमप्रिय आहेस.”—मार्क १:११; ९:७.

विचारात घेण्याजोगी आणखी एक गोष्ट म्हणजे यहोवाने अब्राहामाला इसहाकाचे बलिदान देण्यास सांगितले तेव्हा त्याने इब्री भाषेतील अशा एका शब्दाचा उपयोग केला ज्यावरून यहोवा त्याला एक नम्र विनंती करत असल्याचे सूचित होते. एका बायबल विद्वानानुसार, या शब्दाचा उपयोग करण्याद्वारे देवाने हे सूचित केले, की अब्राहामाला मागितलेली गोष्ट त्याच्यासाठी किती मौल्यवान आहे याची देवाला जाणीव आहे. देवाने अब्राहामाला आपल्या पुत्राचे बलिदान देण्याची विनंती केली तेव्हा अब्राहामाला किती दुःख झाले असेल याची कल्पना करणे कठीण आहे; तर मग, आपल्या प्रिय पुत्राला यातनामय मरण सोसताना पाहून यहोवाला किती दुःख झाले असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. होय, यापेक्षा मोठे दुःख यहोवासाठी कोणतेच असू शकत नाही.

यहोवाने अब्राहामाकडून ज्या गोष्टीची मागणी केली ती जाणून आपल्याला कदाचित धक्का बसेल. पण, यहोवाने त्या विश्‍वासू कुलपित्याला त्याच्या पुत्राचे बलिदान देऊ दिले नाही ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. कोणत्याही पालकासाठी पोटचे मूल गमावण्याइतके वाईट दुःख असू शकत नाही; आणि त्यामुळेच यहोवाने अब्राहामाला ते दुःख सोसू दिले नाही; आणि इसहाकाला त्या क्षणी मरण सोसू दिले नाही. पण, यहोवाने मात्र “आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपणासर्वांकरिता समर्पण केले.” (रोमकर ८:३२) यहोवाने स्वतः इतके वाईट दुःख का सोसले? आपल्याला “जीवन प्राप्त व्हावे” म्हणून. (१ योहान ४:९) यावरून आपल्यावरील देवाच्या प्रेमाचा किती जबरदस्त पुरावा मिळतो! या प्रेमाच्या बदल्यात देवावर प्रेम करण्यास आपण प्रवृत्त होत नाही का? * (w१२-E ०१/०१)

[तळटीपा]

^ परि. 5 बायबलमध्ये येशूला देवाचा पुत्र असे म्हटले असले, तरी देवाला हा पुत्र स्त्रीसंबंधातून झाला असे बायबल शिकवत नाही; याउलट, यहोवाने एक आत्मिक प्राणी म्हणून त्याची निर्मिती केली आणि पुढे त्याला पृथ्वीवर पाठवले. पृथ्वीवर येण्यासाठी देवाने आपल्या पुत्राचे जीवन कुमारी मरीयेच्या पोटी स्थलांतरित केले. तर मग, येशूचा निर्माणकर्ता या नात्याने देव त्याचा पिता आहे असे उचितपणे म्हटले जाऊ शकते.

^ परि. 8 येशूला मरण सोसणे का गरजेचे होते आणि येशूच्या बलिदानाविषयी आपण कदर कशी दाखवू शकतो याबद्दल अधिक माहितीसाठी बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील अध्याय ५ पाहा.