व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जागृत राहण्याच्या बाबतीत येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करा

जागृत राहण्याच्या बाबतीत येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करा

जागृत राहण्याच्या बाबतीत येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करा

“जागृत राहा व प्रार्थना करा.”—मत्त. २६:४१.

तुमचे उत्तर काय असेल?

आपण जागृत आहोत हे आपल्या प्रार्थनांवरून कसे दिसून येऊ शकते?

सेवाकार्याच्या बाबतीत आपण जागृत आहोत हे आपण कोणत्या मार्गांनी दाखवू शकतो?

परीक्षेच्या काळात जागृत राहणे का महत्त्वाचे आहे, आणि आपण ते कसे करू शकतो?

१, २. (क) जागृत राहण्याविषयी येशूच्या उदाहरणावरून कोणते प्रश्‍न उद्‌भवू शकतात? (ख) येशूचे परिपूर्ण उदाहरण पापी मानवांकरता साहाय्यक आहे का? उदाहरण द्या.

 तुम्ही कदाचित विचार कराल: ‘जागृत राहण्याच्या बाबतीत येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करणं खरंच शक्य आहे का? कारण, येशू तर परिपूर्ण होता! शिवाय, काही वेळा भविष्यात होणाऱ्‍या, अगदी हजारो वर्षं पुढं होणाऱ्‍या गोष्टीही येशू सुस्पष्टपणे पाहू शकत होता! तर मग, येशूला जागृत राहणं खरंच आवश्‍यक होतं का?’ (मत्त. २४:३७-३९; इब्री ४:१५) हा विषय आपल्या काळाकरता किती उचित आणि तातडीचा आहे हे जाणून घेण्यासाठी आधी आपण वरील प्रश्‍नांची उत्तरे पाहू या.

येशूचे परिपूर्ण उदाहरण पापी मानवांकरता साहाय्यक ठरू शकते का? होय, कारण एका उत्तम शिक्षकाडून व त्याच्या उदाहरणावरून शिकणे शक्य आहे. उदाहरणार्थ, तिरंदाजीचे प्रशिक्षण घेणाऱ्‍या एका माणसाची कल्पना करा. तो पहिल्यांदा बाण मारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा बाण लक्ष्यापर्यंतही पोहचत नाही. पण, तो आणखी प्रशिक्षण घेतो आणि प्रयत्न करत राहतो. आणखी सुधारणा करण्यासाठी, तो तिरंदाजीत कुशल असलेल्या आपल्या प्रशिक्षकाच्या उदाहरणाचा काळजीपूर्वक अभ्यास करतो. आपला प्रशिक्षक कसा उभा राहतो, धनुष्यबाण कसा पकडतो आणि धनुष्याची दोरी पकडण्यासाठी आपल्या बोटांचा कसा उपयोग करतो याकडे तो लक्ष देतो. हळूहळू, धनुष्याची दोरी किती ताणावी हे तो दृढनिश्‍चयी नवशिका शिकतो. तो वाऱ्‍याचा प्रभावही विचारात घेतो आणि प्रयत्न करत राहतो. त्याचा प्रशिक्षक काय करत आहे हे तो पाहतो व त्याचे अनुकरण करून तो आपले बाण अशा प्रकारे मारतो जेणेकरून ते कालांतराने लक्ष्याच्या जवळपास लागतील. त्याचप्रमाणे, आपणदेखील येशूच्या शिकवणींचे आणि त्याच्या परिपूर्ण उदाहरणाचे अनुकरण करण्याद्वारे चांगले ख्रिस्ती बनण्याचा प्रयत्न करत राहतो.

३. (क) येशूला जागृत राहण्याची गरज होती हे त्याने कशा प्रकारे दाखवून दिले? (ख) या लेखात आपण कशाची चर्चा करणार आहोत?

पण, जागृत राहण्याच्या बाबतीत काय म्हणता येईल? येशूला जागृत राहण्याची खरेच गरज होती का? होय, नक्कीच गरज होती. उदाहरणार्थ, पृथ्वीवर येशूच्या जीवनाच्या शेवटल्या रात्री त्याने आपल्या विश्‍वासू प्रेषितांना असे आर्जवले: “माझ्याबरोबर जागे राहा.” त्याने पुढे म्हटले: “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा.” (मत्त. २६:३८, ४१) येशू नेहमीच जागृत राहिला असला, तरी खासकरून त्या कठीण समयी तो जागृत राहू इच्छित होता व आपल्या स्वर्गातील पित्याच्या शक्य तितक्या जवळ राहू इच्छित होता. त्याच्या अनुयायांनीदेखील त्याच्याप्रमाणेच जागृत राहणे—केवळ त्या वेळेपुरतेच नव्हे, तर भविष्यातही जागृत राहणे आवश्‍यक आहे हे त्याला माहीत होते. तर मग, आज आपण जागृत राहावे अशी येशूची इच्छा का आहे याची आपण चर्चा करू या. त्यानंतर, जागृत राहण्याच्या बाबतीत आपण आपल्या दैनंदिन जीवनात कोणत्या तीन मार्गांनी येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करू शकतो त्याचे आपण परीक्षण करणार आहोत.

आपण जागृत राहावे अशी येशूची इच्छा का आहे?

४. भविष्याबद्दल आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टींचा आपल्या जागृत राहण्याशी काय संबंध आहे?

थोडक्यात सांगायचे झाल्यास, आपल्याला काही गोष्टी माहीत आहेत आणि काही गोष्टी माहीत नाहीत, त्यामुळे आपण जागृत राहावे अशी येशूची इच्छा आहे. येशू एक मानव या नात्याने पृथ्वीवर होता तेव्हा भविष्याबद्दल त्याला सर्व काही माहीत होते का? नाही. कारण त्याने नम्रतेने हे मान्य केले: “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतांस नाही, पुत्रालाहि नाही.” (मत्त. २४:३६) या दुष्ट जगाचा अंत नेमका केव्हा होईल हे त्या वेळी ‘पुत्राला’ अर्थात येशूला माहीत नव्हते. आज आपल्याबद्दल काय? भविष्याबद्दल आपले ज्ञान मर्यादित आहे का? नक्कीच मर्यादित आहे! या दुष्ट जगाचा अंत करण्यासाठी यहोवा त्याच्या पुत्राला नेमके केव्हा पाठवेल हे आपल्याला माहीत नाही. माहीत असते, तर आपल्याला जागृत राहण्याची खरोखर गरज असती का? येशूने म्हटले की अंत अचानक, अनपेक्षितपणे येईल; त्यामुळे आपण सदैव जागृत राहणे गरजेचे आहे.मत्तय २४:४३ वाचा.

५, ६. (क) भविष्याविषयी आणि देवाच्या उद्देशांविषयी आपल्याला असलेल्या ज्ञानाचा आपल्या जागृत राहण्यावर कसा प्रभाव पडतो? (ख) सैतानाविषयी असलेल्या ज्ञानामुळे जागृत राहण्याचा आपला निश्‍चय आणखी दृढ का झाला पाहिजे?

दुसरीकडे पाहता, येशूला भविष्याविषयी अनेक अद्‌भुत गोष्टी माहीत होत्या. म्हणजे त्याला भविष्याविषयी अशी सत्ये माहीत होती जी त्याच्या अवतीभोवती असलेल्यांना मुळीच माहीत नव्हती. येशूला भविष्याबद्दल जितके ज्ञान होते तितके ज्ञान आपल्याजवळ नाही. तरीसुद्धा, येशूमुळे आपल्याला देवाच्या राज्याविषयी व ते राज्य भविष्यात काय साध्य करेल याविषयी नक्कीच बरेच काही माहीत आहे. आपल्या सभोवताली, मग ते शाळेत असो, कामाच्या ठिकाणी असो, किंवा क्षेत्र सेवेत असो, आपल्याला असे बरेच लोक दिसत नाहीत का ज्यांना या अद्‌भुत सत्यांविषयी काहीच माहिती नाही? जागृत राहण्याचे हे आणखी एक कारण आहे. येशूप्रमाणे, आपण नेहमी जागरूक असणे आणि देवाच्या राज्याविषयी आपल्याला जे माहीत आहे त्याविषयी इतरांना सांगण्यासाठी संधी शोधणे गरजेचे आहे. अशी प्रत्येक संधी अनमोल आहे आणि ही संधी आपण मुळीच गमावू इच्छित नाही. कारण लोकांचे जीवन धोक्यात आहे!—१ तीम. ४:१६.

येशूला आणखीही काही माहीत होते ज्यामुळे तो जागृत राहू इच्छित होता. त्याला माहीत होते की सैतानाने त्याच्यावर प्रलोभने आणण्याची, त्याचा छळ करण्याची आणि त्याची एकनिष्ठा भंग करण्याची खूणगाठ बांधली होती. तो क्रूर शत्रू, येशूवर परीक्षा आणण्यासाठी योग्य ‘संधीची’ सतत वाट पाहत होता. (लूक ४:१३) पण, येशू कधीही बेसावध झाला नाही. तो कोणत्याही प्रकारच्या परीक्षेचा सामना करण्यासाठी तयार राहू इच्छित होता, मग ते प्रलोभन असो, विरोध असो किंवा छळ असो. आपल्या बाबतीतही असेच म्हटले जाऊ शकते, नाही का? सैतान अजूनही “गर्जणाऱ्‍या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो” हे आपल्याला माहीत आहे. म्हणूनच, देवाचे वचन सर्व ख्रिश्‍चनांना, “सावध असा, जागे राहा” असा सल्ला देते. (१ पेत्र ५:८) पण, आपण त्या सल्ल्याचे पालन कसे करू शकतो?

प्रार्थनेच्या बाबतीत जागृत राहा

७, ८. प्रार्थनेच्या बाबतीत येशूने कोणता सल्ला दिला, आणि त्या बाबतीत त्याने कोणते उदाहरण मांडले?

आध्यात्मिक रीत्या जागृत राहण्याचा व प्रार्थनेचा एकमेकांशी खूप जवळचा संबंध असल्याचे बायबलमध्ये सांगितले आहे. (कलस्सै. ४:२; १ पेत्र ४:७) येशूने त्याच्या अनुयायांना त्याच्यासोबत जागृत राहण्यास आर्जवल्याच्या काही वेळानंतर त्यांना म्हटले: “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा.” (मत्त. २६:४१) त्याने जो सल्ला दिला तो केवळ त्या कठीण प्रसंगापुरताच मर्यादित होता का? नाही, त्याच्या सल्ल्यात आपल्याला एक तत्त्व सापडते ज्यानुसार आपण दैनंदिन जीवन जगले पाहिजे.

प्रार्थनेच्या बाबतीत येशूने सर्वोत्तम उदाहरण मांडले. तुम्हाला आठवत असेल, की त्याने त्याच्या पित्याला प्रार्थना करण्यात एक संपूर्ण रात्र घालवली होती. त्या घटनेचे चित्र आपण आपल्या डोळ्यांसमोर उभे करण्याचा प्रयत्न करू या. (लूक ६:१२, १३ वाचा.) वसंत ऋतूचा काळ आहे आणि ठिकाण बहुधा कफर्णहूम या मासेमारी करणाऱ्‍या शहराजवळचे आहे. संध्याकाळ होऊ लागते तेव्हा, येशू एका डोंगरावर जातो जेथून गालील समुद्राचे दृश्‍य स्पष्टपणे दिसते. हळूहळू अंधारात बुडणारा निसर्गरम्य परिसर तो पाहतो, तेव्हा कफर्णहूम शहरातील आणि त्याच्या जवळपासच्या इतर गावांतील लुकलुकणारे तेलाचे दिवे कदाचित त्याच्या दृष्टीस पडतात. पण, येशू जेव्हा यहोवाला प्रार्थना करतो, तेव्हा त्याचे पूर्ण लक्ष केवळ त्याच्या प्रार्थनेवर आहे. घटकेमागून घटका आणि तासामागून तास सरत जातात. डोंगराखालच्या परिसरातील दिवे एकापाठोपाठ एक विझू लागतात, आकाशात चंद्र हळूहळू सरकू लागतो आणि निशाचर प्राणी झाडाझुडपांत भक्ष्य शोधू लागतात. पण, यांपैकी कोणत्याही गोष्टीकडे येशू लक्ष देत नाही. तर, त्याचे लक्ष बहुधा तो घेणार असलेल्या एका मोठ्या निर्णयावर केंद्रित आहे; तो निर्णय १२ प्रेषितांना निवडण्याविषयी आहे. मार्गदर्शनासाठी व बुद्धीसाठी कळकळीने आपल्या पित्याला प्रार्थना करत असताना, आपल्या प्रत्येक शिष्याबद्दल वाटणाऱ्‍या भावना व चिंता आपल्या पित्याजवळ व्यक्‍त करण्यात येशू गढून गेला आहे अशी कल्पना आपण करू शकतो.

९. येशूने रात्रभर प्रार्थना केली होती. त्याच्या या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?

येशूच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो? हेच का, की प्रार्थना करण्यात आपण तास न्‌ तास घालवावेत? नाही, कारण त्याने आपल्या शिष्यांच्या बाबतीत प्रेमळपणे मान्य केले, की “आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्‍त आहे.” (मत्त. २६:४१) असे असले, तरी प्रार्थनेच्या बाबतीत आपण येशूचे अनुकरण करू शकतो. उदाहरणार्थ, ज्या निर्णयाचा आध्यात्मिकदृष्ट्या आपल्यावर, आपल्या कुटुंबावर किंवा आपल्या सहविश्‍वासू बांधवांवर प्रभाव पडेल असा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपण आपल्या स्वर्गातील पित्याचा सल्ला घेतो का? आपण आपल्या प्रार्थनांमध्ये आपल्या बंधुभगिनींविषयीच्या चिंता व्यक्‍त करतो का? प्रार्थनेत तेच ते शब्द बोलण्याऐवजी आपण मनापासून प्रार्थना करतो का? याकडेदेखील लक्ष द्या, की येशूने एकांतात आपल्या पित्याशी बोलण्याला मौल्यवान लेखले. आजच्या व्यस्त व धकाधकीच्या जीवनात आपण सहजपणे इतके गुंतले जाऊ शकतो की कोणत्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत ते आपण विसरून जातो. आपण एकांतात, मनापासून प्रार्थना करण्यासाठी पुरेसा वेळ काढल्यास, आपण आध्यात्मिक रीत्या जास्त जागरूक राहू. (मत्त. ६:६, ७) आपण यहोवाच्या आणखी जवळ येऊ आणि त्याच्यासोबत असलेला आपला नातेसंबंध आणखी मजबूत करण्यास व ज्यामुळे हा नातेसंबंध कमजोर होईल असे काहीही न करण्यास आपण जास्त इच्छुक असू.—स्तो. २५:१४.

प्रचार कार्याच्या बाबतीत जागृत राहा

१०. साक्ष देण्यासाठी प्रत्येक संधीचा फायदा घेण्यास येशू जागरूक होता हे कोणत्या उदाहरणावरून दिसते?

१० यहोवाने येशूवर जी कामगिरी सोपवली होती त्याबाबतीत तो जागृत होता. अशी काही कामे असू शकतात ज्यांवरून कामगाराचे लक्ष विचलित झाले, तरी त्याचे फारसे गंभीर परिणाम होत नाहीत. पण, अशी बरीच कामे असतात जी करताना जागरूक राहणे व त्यांवर लक्ष केंद्रित करणे अत्यावश्‍यक असते. आपले ख्रिस्ती सेवाकार्य नक्कीच अशा कामांपैकी एक आहे. येशू त्याच्या कार्याच्या बाबतीत नेहमी जागरूक होता आणि सुवार्ता सांगण्यासाठी त्याने नेहमी संधी शोधली. उदाहरणार्थ, येशू आणि त्याचे शिष्य सकाळपासून दुपारपर्यंत चालून सूखार नावाच्या नगरात पोहचले तेव्हा शिष्य अन्‍न विकत घेण्यास नगरात गेले. विश्रांती घेण्यासाठी येशू त्या नगरातील एका विहिरीजवळ थांबला. पण, तो जागरूक होता आणि त्यामुळे साक्ष देण्याची एक संधी त्याला मिळाली. एक शोमरोनी स्त्री विहिरीतून पाणी काढण्यासाठी तेथे आली. येशू थोडीशी झोप घेऊ शकला असता. त्या स्त्रीशी न बोलण्याची अनेक कारणे तो सांगू शकला असता. पण, तो त्या स्त्रीशी बोलला, त्याने तिला संभाषणात गोवून घेतले आणि तिला उत्तम साक्ष दिली. त्यामुळे त्या शहरातील अनेक लोकांचे जीवन प्रभावित झाले. (योहा. ४:४-२६, ३९-४२) आपणही, दैनंदिन जीवनात आपल्याला भेटणाऱ्‍या लोकांना सुवार्ता सांगण्याची प्रत्येक संधी शोधण्याच्या बाबतीत आणखी जागृत राहण्याद्वारे, येशूच्या उदाहरणाचे आणखी जवळून अनुकरण करू शकतो का?

११, १२. (क) लोकांनी येशूला त्याच्या कार्यापासून विचलित करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने कशी प्रतिक्रिया दाखवली? (ख) येशूने त्याच्या कार्याच्या बाबतीत कशा प्रकारे संतुलन राखले?

११ काही वेळा, येशूच्या हितचिंतकांनी त्याला त्याच्या कार्यापासून विचलित करण्याचा प्रयत्न केला. कफर्णहूममध्ये येशूने चमत्कारिक रीत्या लोकांना बरे केले, तेव्हा तेथील लोक इतके प्रभावित झाले की ते त्याला आपल्याजवळ ठेवून घेऊ इच्छित होते. हे समजण्याजोगे आहे. पण, येशूचे कार्य त्या एका नगरापुरतेच मर्यादित नव्हते; तर, त्याचे कार्य ‘इस्राएलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांना’ प्रचार करणे हे होते. (मत्त. १५:२४) म्हणून त्याने त्या लोकांना असे सांगितले: “मला इतर गावीहि देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठविले आहे.” (लूक ४:४०-४४) यावरून स्पष्टपणे दिसते, की येशूचे संपूर्ण जीवन त्याच्या सेवाकार्यावर केंद्रित होते. त्याने कोणत्याही गोष्टीला त्या कार्यापासून स्वतःला विचलित होऊ दिले नाही.

१२ पण येशू, धर्मवेडा किंवा वैरागी होण्याइतपत आपल्या कार्यात गुंतला होता का? तो त्याच्या सेवाकार्यात इतका व्यस्त होता का, की त्याला कुटुंबांच्या गरजांविषयी काहीच माहिती नव्हती? नाही, या बाबतीत संतुलन राखून त्याने एक उत्तम उदाहरण मांडले. त्याने मित्रांच्या सहवासात वेळ घालवण्याद्वारे जीवनाचा आनंद घेतला. कुटुंबांच्या गरजांविषयी व समस्यांविषयी त्याने सहानुभूती दाखवण्याद्वारे कुटुंबांना मौल्यवान लेखले. आणि त्याने मुलांबद्दल मनापासून प्रेम व्यक्‍त केले.मार्क १०:१३-१६ वाचा.

१३. प्रचार कार्याच्या बाबतीत येशू जागृत व संतुलित होता. त्याच्या या उदाहरणाचे आपण कशा प्रकारे अनुकरण करू शकतो?

१३ जागृत राहण्याच्या बाबतीत आपण येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करतो, तेव्हा आपण येशूसारखे संतुलन राखण्याचा प्रयत्न कसा करू शकतो? त्यासाठी आपण या जगाला आपल्या कार्यापासून आपल्याला विचलित करू देऊ नये. आपले मित्र आणि नातेवाईकही आपल्याला आपले सेवाकार्य कमी करण्याचा किंवा त्यांच्या दृष्टीने सर्वसामान्य असलेले जीवन व्यतीत करण्याचा आर्जव करतील. आणि यामागे कदाचित त्यांचा चांगला हेतू असेल. पण, आपण जर येशूचे अनुकरण करत असू, तर आपले सेवाकार्य जणू आपले अन्‍न आहे या दृष्टिकोनातून आपण त्याकडे पाहू. (योहा. ४:३४) आपल्या सेवाकार्यामुळे आपले आध्यात्मिक रीत्या पोषण होते आणि आपल्याला आनंदही मिळतो. असे असले, तरी आपण इतरांपेक्षा फार धार्मिक आहोत अशी मनोवृत्ती दाखवण्याद्वारे किंवा वैराग्यासारखी मनोवृत्ती दाखवण्याद्वारे आपण कधीही अतिरेक करू इच्छित नाही. येशूप्रमाणेच आपण, आपल्या ‘धन्यवादित देवाचे,’ म्हणजे आपल्या आनंदी देवाचे, आनंदी व संतुलित सेवक बनू इच्छितो.—१ तीम. १:११.

परीक्षांच्या काळात जागृत राहा

१४. परीक्षांच्या वेळी आपण काय करण्याचे टाळले पाहिजे, आणि का?

१४ आपण पाहिल्याप्रमाणे, येशूने जागृत राहण्याविषयी दिलेल्या सगळ्यात तातडीच्या सल्ल्यांपैकी काही सल्ले त्याने अतिशय कठीण परीक्षेचा सामना करत असताना दिले होते. (मार्क १४:३७ वाचा.) आपल्यासमोर अडचणी येतात तेव्हा आपण कधी नव्हे इतके येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याची गरज आहे. कठीण प्रसंग येतात तेव्हा बरेच लोक सहसा एक महत्त्वाचे सत्य विसरून जातात. हे सत्य इतके महत्त्वाचे आहे की नीतिसूत्रे पुस्तकात त्याचा दोनदा उल्लेख करण्यात आला आहे: “मनुष्याला एक सरळ मार्ग दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्युपथ फुटतात.” (नीति. १४:१२; १६:२५) आपण समस्यांचा सामना करत असतो, आणि खासकरून गंभीर समस्यांचा सामना करत असतो त्या वेळी आपण स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहिलो, तर आपण स्वतःचे व आपल्या प्रियजनांचे जीवन धोक्यात घालण्याची शक्यता असते.

१५. आर्थिक तंगीच्या काळात एखाद्या कुटुंबप्रमुखाला काय करण्याचा मोह होऊ शकतो?

१५ उदाहरणार्थ, ‘आपल्या घरच्यांच्या’ भौतिक गरजा पूर्ण करत असताना एखाद्या कुटुंबप्रमुखावर प्रचंड दबाव येऊ शकतो. (१ तीम. ५:८) त्याला कदाचित अशी एखादी नोकरी स्वीकारण्याचा मोह होऊ शकतो, ज्यामुळे त्याला नियमितपणे ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे, कौटुंबिक उपासनेत पुढाकार घेणे, किंवा सेवाकार्यात भाग घेणे कठीण जाऊ शकते. तो सर्वस्वी मानवी बुद्धीवर अवलंबून राहिला, तर असे करणे त्याला न्याय्य व उचितही वाटू शकते. पण, यामुळे तो आध्यात्मिक रीत्या आजारी किंवा मृत होऊ शकतो. तेव्हा, नीतिसूत्रे ३:५, ६ मध्ये असलेल्या सल्ल्याचे पालन करणे किती उत्तम ठरेल! तेथे शलमोनाने म्हटले: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्‍वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.”

१६. (क) स्वतःच्या बुद्धीऐवजी यहोवाच्या बुद्धीवर अवलंबून राहण्याच्या बाबतीत येशूने कोणते उदाहरण मांडले? (ख) अडचणींच्या काळात यहोवावर भरवसा ठेवण्याच्या बाबतीत अनेक कुटुंबप्रमुख कशा प्रकारे येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करत आहेत?

१६ येशूची परीक्षा होत होती तेव्हा त्याने स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहण्याचे ठामपणे नाकारले. जरा विचार करा! या पृथ्वीवर होऊन गेलेला सगळ्यात बुद्धिमान मनुष्य स्वतःच्या बुद्धीवर विसंबून राहिला नाही. उदाहरणार्थ, सैतानाने त्याच्यासमोर प्रलोभने आणली तेव्हा त्याने वारंवार, “असा शास्त्रलेख आहे” असे म्हणून सैतानाला उत्तर दिले. (मत्त. ४:४, ७, १०) प्रलोभनांचा प्रतिकार करण्यासाठी येशू आपल्या पित्याच्या बुद्धीवर अवलंबून राहिला. असे करण्याद्वारे त्याने ती नम्रता दाखवली जी सैतानामध्ये मुळीच पाहायला मिळत नाही व जिचा सैतान तिरस्कार करतो. येशूप्रमाणे आपणही देवाच्या बुद्धीवर अवलंबून राहतो का? जो कुटुंबप्रमुख जागृत राहण्याच्या बाबतीत येशूचे अनुकरण करतो, तो खासकरून संकट-परीक्षेच्या काळात देवाच्या वचनाला आपले मार्गदर्शन करू देतो. सबंध जगभरात, हजारो कुटुंबप्रमुख नेमके हेच करत आहेत. ते खंबीरपणे देवाच्या राज्याला आणि शुद्ध उपासनेला जीवनात पहिले स्थान देत आहेत; म्हणजे ते या गोष्टीला भौतिक गरजांपेक्षाही जास्त महत्त्व देत आहेत. अशा प्रकारे, ते आपल्या कुटुंबांची सगळ्यात उत्तम काळजी घेतात. कुटुंबप्रमुख आपल्या कुटुंबाच्या भौतिक गरजा भागवण्यासाठी प्रयत्न करतात तेव्हा यहोवाने वचन दिल्याप्रमाणे तो त्यांचे प्रयत्न आशीर्वादित करतो.—मत्त. ६:३३.

१७. जागृत राहण्याच्या बाबतीत येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याची प्रेरणा तुम्हाला कशामुळे मिळते?

१७ जागृत राहण्याच्या बाबतीत येशूने सगळ्यात उत्तम उदाहरण मांडले यात काहीच शंका नाही. त्याचे उदाहरण व्यावहारिक, लाभदायक आणि जीवनदायीदेखील आहे. हे आठवणीत असू द्या, की सैतान तुम्हाला आध्यात्मिक रीत्या झोपी घालण्यास, म्हणजे तुमचा विश्‍वास कमकुवत करण्यास, उपासनेत तुम्हाला सुस्त करण्यास, आणि तुमची एकनिष्ठा मोडण्यास उत्सुक आहे. (१ थेस्सलनी. ५:६) पण, त्याला मुळीच यशस्वी होऊ देऊ नका! येशूप्रमाणे प्रार्थनेच्या बाबतीत, सेवाकार्याच्या बाबतीत आणि परीक्षांचा सामना करण्याच्या बाबतीत जागृत राहा. असे केल्याने, तुम्ही आतादेखील म्हणजे नाशाच्या मार्गावर असलेल्या या दुष्ट जगाच्या अखेरच्या काळातही एक अर्थपूर्ण, आनंदी व समृद्ध जीवन जगाल. तुम्ही सदैव जागृत राहिलात, तर या दुष्ट जगाचा नाश करण्यासाठी येशू येईल तेव्हा त्याच्या पित्याची इच्छा पूर्ण करण्याच्या बाबतीत तुम्ही जागरूक व क्रियाशील आहात हे त्याला नक्कीच दिसून येईल. आणि तुमच्या विश्‍वासू जीवनक्रमासाठी तुम्हाला प्रतिफळ देण्यात यहोवाला किती आनंद होईल!—प्रकटी. १६:१५.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[६ पानांवरील चित्र]

येशूने विहिरीजवळ शोमरोनी स्त्रीला प्रचार केला. तुमच्या दैनंदिन जीवनात प्रचार करण्याच्या कोणत्या संधी तुम्ही निर्माण करू शकता?

[७ पानांवरील चित्र]

तुमच्या कुटुंबाच्या आध्यात्मिक भल्याची तुम्ही काळजी करता तेव्हा तुम्ही जागृत आहात हे दिसून येते