व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खंबीर व धैर्यवान व्हा

खंबीर व धैर्यवान व्हा

खंबीर व धैर्यवान व्हा

“खंबीर हो व खूप हिंमत धर [“धैर्यवान हो,” NW], . . . तुझा देव परमेश्‍वर तुझ्याबरोबर असेल.”—यहो. १:७-९.

तुमचे उत्तर काय असेल?

हनोख व नोहा यांनी कोणत्या मार्गांनी धैर्य दाखवले?

प्राचीन काळातील काही स्त्रियांनी विश्‍वास व धैर्याच्या बाबतीत कशा प्रकारे उत्तम उदाहरण मांडले?

लहान वयात धैर्य दाखवलेल्या कोणत्या मुलांची उदाहरणे तुम्हाला प्रभावित करतात?

१, २. (क) सरळ मार्गाने दैनंदिन जीवन व्यतीत करण्यासाठी काही वेळा कशाची गरज असते? (ख) आपण कशाचे परीक्षण करणार आहोत?

 धैर्य हा गुण भीती, बुजरेपणा व भेकडपणा या गुणांच्या अगदी उलट आहे. जी व्यक्‍ती बलवान, शूर व धाडसी असते ती धैर्यवान असते असे कदाचित आपल्याला वाटेल. पण, सरळ मार्गाने दैनंदिन जीवन व्यतीत करण्यासाठी काही वेळा सुप्त धैर्याची गरज असते.

बायबलमध्ये उल्लेखलेल्या काही लोकांनी अतिशय बिकट परिस्थितींत निर्भयता दाखवली. इतर काहींनी, यहोवाच्या सेवकांना सर्वसामान्यपणे तोंड द्याव्या लागतात अशा परिस्थितींमध्ये धैर्य दाखवले. बायबलमध्ये नमूद असलेल्या या धैर्यवान व्यक्‍तींच्या उदाहरणांवरून आपण काय शिकू शकतो? आपण धैर्यवान कसे बनू शकतो?

एका भक्‍तिहीन जगात धैर्याने साक्ष देणे

३. भक्‍तिहीन लोकांच्या बाबतीत हनोखाने कोणते भविष्य वर्तवले होते?

नोहाच्या दिवसांत जलप्रलय आला त्याआधीच्या काळात यहोवाबद्दल पृथ्वीवरील दुष्ट लोकांना साक्ष देण्यासाठी धैर्याची खूप गरज होती. असे असले, तरी “आदामापासून सातवा पुरुष” असलेल्या हनोखाने मोठ्या धैर्याने पुढील भविष्यसूचक संदेश दिला: “पाहा, सर्वांचा न्यायनिवाडा करावयास, आणि भक्‍तिहीन लोकांनी अभक्‍तीने केलेल्या आपल्या सर्व भक्‍तिहीन कृत्यांवरून आणि ज्या सर्व कठोर गोष्टी भक्‍तिहीन पापी जनांनी त्याच्याविरुद्ध सांगितल्या त्यांवरून, त्या सर्वांस दोषी ठरवावयास प्रभु आपल्या लाखो पवित्र जनांसहित आला.” (यहू. १४, १५) ही भविष्यवाणी इतक्या खात्रीने पूर्ण होणार होती की ती जणू पूर्ण झाली अशा रीतीने हनोख बोलला. हनोखाने म्हटले अगदी त्याप्रमाणे त्या भक्‍तिहीन लोकांचा एका जगव्याप्त जलप्रलयात नाश झाला!

४. नोहा कोणत्या परिस्थितींत “देवाबरोबर चालला”?

हनोखाने संदेष्टा या नात्याने आपले कार्य केले त्याच्या ६५० हून अधिक वर्षांनंतर, म्हणजे इ.स.पू. २३७० मध्ये जलप्रलय आला. मधल्या काळात, नोहाचा जन्म झाला, त्याने लग्न केले व त्याला मुले झाली आणि त्याने आपल्या मुलांसह तारू बांधले. दुष्ट देवदूतांनी मानवी शरीरे धारण केली, त्यांनी पृथ्वीवरील सुंदर स्त्रियांशी लैंगिक संबंध ठेवले आणि त्यांच्यापासून नेफिलीम जन्मले. शिवाय, मानवांची दुष्टाई फार वाढली व पृथ्वीवर हिंसाचार फोफावला. (उत्प. ६:१-५, ९, ११) पण, अशा परिस्थितीतसुद्धा नोहा खऱ्‍या “देवाबरोबर चालला” आणि त्याने “नीतिमत्त्वाचा उपदेशक” या नात्याने धैर्याने साक्ष दिली. (२ पेत्र २:४, ५ वाचा.) आपल्यालाही या शेवटल्या काळात तशाच धैर्याची गरज आहे.

त्यांनी विश्‍वास व धैर्य दाखवले

५. मोशेने कशा प्रकारे विश्‍वास व धैर्य दाखवले?

मोशेने आपल्या जीवनकाळात उल्लेखनीय विश्‍वास व धैर्य दाखवले. (इब्री ११:२४-२७) इ.स.पू. १५१३ ते इ.स.पू. १४७३ या काळादरम्यान, इस्राएल लोकांना इजिप्तमधून बाहेर आणण्यासाठी व अरण्यात त्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी देवाने मोशेचा उपयोग केला. ही कामगिरी पार पाडण्यासाठी आपण मुळीच पात्र नाही असे मोशेला वाटले. पण, तरीसुद्धा त्याने ती कामगिरी स्वीकारली. (निर्ग. ६:१२) मोशे व त्याचा भाऊ अहरोन कितीतरी वेळा इजिप्तच्या जुलमी फारोकडे गेले व यहोवाने ज्या दहा पीडांद्वारे इजिप्तच्या दैवतांना हिणवले व आपल्या लोकांची सुटका केली त्या पीडांविषयी त्यांनी धैर्याने घोषणा केली. (निर्ग., अध्या. ७-१२) मोशेने विश्‍वास व धैर्य दाखवले कारण त्याला देवाचा अढळ पाठिंबा होता. आज आपल्यालासुद्धा देव असाच पाठिंबा देतो.—अनु. ३३:२७.

६. जगातील अधिकाऱ्‍यांनी कधी आपली चौकशी केली, तर आपल्याला विश्‍वासाने व धैर्याने साक्ष देणे कसे शक्य होईल?

आज आपल्यालासुद्धा मोशेप्रमाणे धैर्य दाखवण्याची गरज आहे, कारण येशूने म्हटले: “तुम्हाला माझ्यामुळे देशाधिकारी व राजे ह्‍यांच्यापुढे नेण्यात येईल, आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल. जेव्हा तुम्हाला त्यांच्या स्वाधीन करितील तेव्हा कसे अथवा काय बोलावे ह्‍याची काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे हे त्याच घटकेस तुम्हास सुचविले जाईल. कारण बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठायी बोलणारा आहे.” (मत्त. १०:१८-२०) जगातील अधिकाऱ्‍यांनी कधी आपली चौकशी केली, तर यहोवाचा आत्मा आपल्याला विश्‍वासाने व धैर्याने आदरपूर्वक साक्ष देण्यास समर्थ करू शकतो.—लूक १२:११, १२ वाचा.

७. यहोशवाच्या धैर्याचे व यशाचे रहस्य काय होते?

मोशेचा उत्तराधिकारी यहोशवा याने देवाच्या नियमशास्त्राचा नियमितपणे अभ्यास केला, त्यामुळे त्याचा विश्‍वास दृढ झाला व तो धैर्यवान झाला. इ.स.पू. १४७३ मध्ये इस्राएल लोक प्रतिज्ञात देशाच्या उंबरठ्यावर होते, तेव्हा देवाने यहोशवाला अशी आज्ञा दिली: “खंबीर हो व धैर्यवान हो.” यहोशवाने या आज्ञेचे पालन केल्यास त्याला सुज्ञपणे वागण्यास व यशस्वी होण्यास मदत मिळणार होती. देवाने त्याला म्हटले होते: “घाबरू नको, कचरू नको; कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्‍वर तुझ्याबरोबर असेल.” (यहो. १:७-९) या शब्दांमुळे यहोशवाला किती बळ मिळाले असेल! देव नक्कीच यहोशवाच्या बरोबर होता असे म्हणता येईल, कारण केवळ सहा वर्षांत म्हणजे इ.स.पू. १४६७ पर्यंत इस्राएल लोकांनी प्रतिज्ञात देशाचा बहुतेक प्रदेश हस्तगत केला होता.

खंबीर भूमिका घेणाऱ्‍या पराक्रमी स्त्रिया

८. विश्‍वास व धैर्याच्या बाबतीत राहाबेने कोणते उदाहरण मांडले?

आजवर अनेक धैर्यवान स्त्रियांनी यहोवाच्या उपासक या नात्याने खंबीर भूमिका घेतली आहे. उदाहरणार्थ, यरीहो शहरात राहणाऱ्‍या राहाब वेश्‍येने देवावर विश्‍वास असल्याचे दाखवले. यहोशवाने पाठवलेल्या दोन हेरांना तिने धैर्याने लपवून ठेवले आणि मग त्या शहराच्या राजाच्या माणसांची दिशाभूल केली. इस्राएल लोकांनी यरीहो शहराचा पाडाव केला तेव्हा राहाबेचा व तिच्या घराण्याचा त्यातून बचाव झाला. राहाबेने आपला पापपूर्ण पेशा सोडून दिला, विश्‍वासूपणे यहोवाची उपासना केली आणि ती मशीहाची पूर्वज बनली. (यहो. २:१-६; ६:२२, २३; मत्त. १:१, ५) तिने दाखवलेल्या विश्‍वासाबद्दल व धैर्याबद्दल तिला किती आशीर्वाद मिळाले!

९. दबोरा, बाराक व याएल यांनी कशा प्रकारे धैर्य दाखवले?

इ.स.पू. १४५० च्या सुमारास यहोशवाचा मृत्यू झाला त्यानंतर इस्राएलमध्ये न्यायिक बाबी शास्ते हाताळायचे. कनानाचा राजा याबीन याने २० वर्षे इस्राएल लोकांचा छळ केला होता. त्यामुळे देवाने संदेशहारिका दबोरा हिच्याद्वारे बाराक या शास्त्याला कारवाई करण्यास प्रवृत्त केले. याबीनाचा सेनापती सीसरा आपले सैन्य व ९०० रथ घेऊन कीशोन नदीपाशी आला तेव्हा बाराकाने ताबोर डोंगरावर १०,००० पुरुष एकत्र केले आणि तो सीसराविरुद्ध युद्ध लढण्यास सज्ज झाला. इस्राएली पुरुष नदीपाशी आले तेव्हा देवाने अचानक एक मोठा पूर आणला. त्यामुळे युद्धभूमीचे रूपांतर दलदलीत झाले आणि त्यात कनानी सैन्याचे रथ अडकून पडले. अशा प्रकारे, बाराकाचे सैन्य प्रबळ ठरले, आणि “सीसराची सर्व सेना तरवारीने पडली.” सीसराने आपला जीव वाचवण्यासाठी याएलेच्या तंबूत आश्रय घेतला. पण, तो झोपलेला असताना तिने त्याला ठार मारले. अशा प्रकारे, दबोराने बाराकाला सांगितलेल्या भविष्यसूचक शब्दांनुसार या विजयाची “प्रतिष्ठा” याएल या स्त्रीला मिळाली. दबोरा, बाराक व याएल यांनी धैर्य दाखवल्यामुळे इस्राएल देशाला शत्रूंपासून “चाळीस वर्षे विसावा मिळाला.” (शास्ते ४:१-९, १४-२२; ५:२०, २१, ३१) अनेक देवभीरू स्त्री-पुरुषांनी अशाच प्रकारचा विश्‍वास व धैर्य दाखवले आहे.

आपल्या शब्दांमुळे इतरांना धीर मिळू शकतो

१०. आपल्या शब्दांमुळे इतरांना धीर मिळू शकतो असे का म्हणता येईल?

१० आपण जे काही बोलतो त्यामुळे आपल्या बंधुभगिनींना धीर मिळू शकतो. इ.स.पू. ११ व्या शतकात दावीद राजाने आपला पुत्र शलमोन याला असे सांगितले: “हिंमत बांध, धैर्य धर आणि हे कार्य कर; भिऊ नको, खचू नको, कारण परमेश्‍वर देव माझा देव तुझ्याबरोबर आहे; परमेश्‍वराच्या मंदिराच्या सेवेचे सर्व काम समाप्त होईपर्यंत तो तुला अंतरणार नाही, तुला सोडणार नाही.” (१ इति. २८:२०) दाविदाने सांगितल्याप्रमाणे शलमोनाने धैर्य दाखवले व जेरूसलेममध्ये यहोवासाठी एक भव्य मंदिर बांधले.

११. एका धाडसी इस्राएली मुलीच्या शब्दांचा एका माणसाच्या जीवनावर कसा प्रभाव पडला?

११ इ.स.पू. दहाव्या शतकात, एका धाडसी इस्राएली मुलीच्या शब्दांमुळे एका कोड्याच्या जीवनावर विलक्षण प्रभाव पडला. या मुलीला एका युद्ध टोळीने कैद करून नेले व ती एका कोड्याच्या अर्थात अरामी सेनापती नामान याच्या घरची दासी बनली. यहोवाने अलीशाद्वारे जे चमत्कार केले होते ते या मुलीने ऐकले होते. त्यामुळे तिने नामानाच्या पत्नीला सांगितले, की जर तिचा पती इस्राएल देशात गेला तर देवाचा संदेष्टा त्याचा रोग बरा करू शकतो. तिच्या सांगण्यावरून नामान इस्राएल देशात गेला, त्याचा रोग चमत्कारिक रीत्या बरा झाला आणि तो यहोवाचा एक उपासक बनला. (२ राजे ५:१-३, १०-१७) तुम्ही लहान असाल व त्या इस्राएली मुलीप्रमाणे तुमचे देवावर प्रेम असेल, तर तुम्हाला तुमच्या शिक्षकांना, शाळासोबत्यांना व इतरांना साक्ष देता यावी म्हणून देव तुम्हालाही धैर्य देऊ शकतो.

१२. हिज्कीया राजाच्या शब्दांचा त्याच्या प्रजेवर कसा प्रभाव पडला?

१२ आपल्या विचारशील शब्दांमुळे संकटाच्या काळात इतरांना धीर मिळू शकतो. इ.स.पू. आठव्या शतकात, अश्‍शूरी सैन्याने जेरूसलेमवर चढाई केली, तेव्हा हिज्कीया राजाने आपल्या प्रजेला म्हटले: “दृढ व्हा, हिंमत धरा, अश्‍शूरचा राजा व त्याजबरोबरचा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका; त्याच्यापेक्षा आमच्या पक्षाचा जो आहे तो मोठा आहे. मांसमय भुजांचा त्यास आधार आहे, पण आम्हास मदत करावयास व आमच्या लढाया लढावयास आमचा देव परमेश्‍वर आम्हाबरोबर आहे.” हिज्कीयाच्या या शब्दांचा लोकांवर कसा प्रभाव पडला? बायबल म्हणते: “हिज्कीया याच्या ह्‍या बोलण्यावर सर्व प्रजेने भरवसा ठेविला!” (२ इति. ३२:७, ८) आज विरोधक आपला छळ करतात तेव्हा अशा विचारशील शब्दांमुळे आपल्या स्वतःचे व आपल्या बंधुभगिनींचे धैर्य वाढू शकते.

१३. अहाब राजाचा घरकारभारी ओबद्या याने धैर्य दाखवण्याच्या बाबतीत कशा प्रकारे उत्तम उदाहरण मांडले?

१३ कधीकधी काही न बोलताही आपण धैर्य दाखवू शकतो. इ.स.पू. दहाव्या शतकात, दुष्ट राणी ईजबेलच्या हातून यहोवाच्या संदेष्ट्यांचा वध होऊ नये म्हणून अहाब राजाचा घरकारभारी ओबद्या याने धैर्याने शंभर संदेष्ट्यांना नेऊन “एका गुहेत पन्‍नास व दुसऱ्‍या गुहेत पन्‍नास असे लपविले.” (१ राजे १८:४) देवभीरू ओबद्याप्रमाणेच, आधुनिक काळातील यहोवाच्या निष्ठावंत सेवकांनीही आपल्या बंधुभगिनींविषयी कोणतीही माहिती विरोधकांना न देण्याद्वारे धैर्याने त्यांचे संरक्षण केले आहे.

एस्तेर—एक धैर्यवान राणी

१४, १५. एस्तेर राणीने कशा प्रकारे विश्‍वास व धैर्य दाखवले आणि याचा काय परिणाम झाला?

१४ इ.स.पू. पाचव्या शतकात, एस्तेर राणीने उल्लेखनीय विश्‍वास व धैर्य दाखवले. हामान नावाच्या एक दुष्ट व्यक्‍तीने पारस साम्राज्यातील सर्व यहुदी लोकांचा संहार करण्याचा कट रचल्यामुळे सर्व यहुद्यांचे जीवन धोक्यात आले होते. त्यामुळे साहजिकच सर्व यहुद्यांनी शोक व उपास केला आणि मदतीसाठी पूर्ण मनाने देवाचा धावा केला! (एस्ते. ४:१-३) हे ऐकून एस्तेर राणीला खूप दुःख झाले. तिचा चुलत भाऊ मर्दखय याने यहुद्यांचा संहार करण्याची अधिकृत परवानगी देणाऱ्‍या आज्ञेची एक प्रत तिला पाठवली व आपल्या यहुदी बांधवांच्या वतीने राजाकडे जाऊन विनवणी करण्यास तिला सांगितले. पण, राजाने बोलविल्यावाचून कोणी राजाकडे गेला, तर त्याला ठार मारले जायचे.—एस्ते. ४:४-११.

१५ असे असले, तरी मर्दखयाने एस्तेरला सांगितले: ‘तू या प्रसंगी गप्प राहिलीस तरी दुसऱ्‍या कोठूनहि यहूद्यांची सुटका व उद्धार होईलच. तुला या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावरून?’ त्यावर, एस्तेरने मर्दखयाला निरोप पाठवून शूशन येथील सर्व यहुद्यांना जमा करण्यास व तिच्याकरता उपास करण्यास आर्जवले. तिने पुढे म्हटले: ‘मीहि तसाच उपास करीन. असल्या स्थितीत मी आत राजाकडे जाईन; मग मी मेल्ये तर मेल्ये.’ (एस्ते. ४:१२-१७) अशा प्रकारे, एस्तेरने धैर्य दाखवले आणि बायबलमधील तिच्या नावाच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे देवाने त्याच्या लोकांचा बचाव केला. आज आपल्या काळात, अभिषिक्‍त ख्रिस्ती व त्यांचे समर्पित सोबती परीक्षेच्या काळात अशाच प्रकारचे धैर्य दाखवतात आणि ‘प्रार्थना ऐकणारा’ देव यहोवा सदैव त्यांच्या पाठीशी असतो.—स्तोत्र ६५:२; ११८:६ वाचा.

“धीर धरा”

१६. येशूने लहान मुलांसाठी कोणते उदाहरण मांडले?

१६ इसवी सन पहिल्या शतकात एका प्रसंगी, १२ वर्षांचा येशू मंदिरात “गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यांस प्रश्‍न करताना” आढळला. शिवाय, “त्याचे बोलणे जे ऐकत होते, ते सर्व त्याच्या बुद्धीवरून व उत्तरांवरून थक्क झाले.” (लूक २:४१-५०) येशू लहान असला, तरी वयाने त्याच्यापेक्षा मोठे असलेल्या मंदिरातील त्या शिक्षकांना प्रश्‍न विचारण्याचा विश्‍वास व धैर्य त्याच्याजवळ होते. आज ख्रिस्ती मंडळीतील लहान मुलांनी येशूचे हे उदाहरण लक्षात ठेवल्यास, त्यांच्या ‘आशेविषयी विचारपूस करणाऱ्‍या प्रत्येकाला उत्तर देण्यासाठी’ हरएक संधीचा पुरेपूर फायदा घेण्याचे प्रोत्साहन त्यांना मिळेल.—१ पेत्र ३:१५.

१७. येशूने आपल्या शिष्यांना ‘धीर धरण्यास’ का आर्जवले, आणि आज आपल्याला धैर्य दाखवण्याची गरज का आहे?

१७ येशूने इतरांना ‘धीर धरण्यास’ आर्जवले. (मत्त. ९:२, २२) त्याने आपल्या शिष्यांना म्हटले: “पाहा, अशी वेळ येत आहे, किंबहुना आली आहे, की तुमची दाणादाण होऊन तुम्ही सर्व आपआपल्या घरी जाल व मला एकटे सोडाल; तरी मी एकटा नाही, कारण पिता माझ्याबरोबर आहे. माझ्या ठायी तुम्हाला शांति मिळावी म्हणून मी तुम्हाला ह्‍या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे.” (योहा. १६:३२, ३३) येशूच्या सुरुवातीच्या अनुयायांचा जगाने द्वेष केला त्याप्रमाणे आज हे जग आपलाही द्वेष करते. पण, आपण जगासारखे होऊ नये. धैर्याच्या बाबतीत देवाच्या पुत्राने मांडलेल्या उदाहरणावर मनन केल्याने आपल्याला या जगापासून निष्कलंक राहण्याचे उत्तेजन मिळेल. त्याने जगावर विजय मिळवला तसा आपणही मिळवू शकतो.—योहा. १७:१६; याको. १:२७.

१८, १९. प्रेषित पौलाजवळ विश्‍वास व धैर्य होते हे कशावरून दिसून येते?

१८ प्रेषित पौलाने अनेक परीक्षांचा सामना केला. एके प्रसंगी, रोमी शिपाई त्याच्या मदतीला धावून आले नसते, तर जेरूसलेममधील यहुद्यांनी त्याला फाडून त्याचे तुकडे-तुकडे केले असते. त्याच रात्री, “प्रभु त्याच्यापुढे उभा राहून म्हणाला, धीर धर; जशी तू यरुशलेमेत माझ्याविषयी साक्ष दिली तशी रोम शहरातहि तुला द्यावी लागेल.” (प्रे. कृत्ये २३:११) आणि पौलाने तसेच केले.

१९ पौलाने करिंथमधील मंडळीला भ्रष्ट करू पाहणाऱ्‍या ‘अतिश्रेष्ठ प्रेषितांना’ निर्भीडपणे फटकारले. (२ करिंथ. ११:५; १२:११) त्या प्रेषितांच्या अगदी उलट, पौल आपल्या प्रेषितपणाचा पुरावा देऊ शकत होता. कारण त्याने तुरुंगवास, मारहाण, खडतर प्रवास, इतर संकटे, तहानभूक व रात्रीची जागरणे या सर्व गोष्टी सोसल्या होत्या. तसेच, त्याला आपल्या सहउपासकांविषयी मनस्वी चिंता होती. (२ करिंथकर ११:२३-२८ वाचा.) विश्‍वास व धैर्याच्या बाबतीत पौलाने किती उत्कृष्ठ उदाहरण मांडले! यावरून त्याला देवाचा पाठिंबा होता हे दिसून येत नाही का?

२०, २१. (क) आपल्याला धैर्याची सतत गरज आहे हे दाखवणारे एक उदाहरण द्या. (ख) कोणकोणत्या परिस्थितींत आपल्याला धैर्य दाखवण्याची गरज आहे, आणि आपण कशाची खातरी बाळगू शकतो?

२० सर्वच ख्रिश्‍चनांना तीव्र छळाचा सामना करावा लागेल असे नाही. पण, जीवनातील आव्हानांवर मात करण्यासाठी आपल्या सर्वांनाच धैर्याची गरज आहे. याचे एक उदाहरण विचारात घ्या. ब्राझीलमधील एक तरुण, गुंडांच्या एका टोळीचा सदस्य होता. बायबलचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला जीवनात बदल करण्याची गरज आहे हे त्याला जाणवले. पण, टोळीतून बाहेर पडणाऱ्‍या कोणत्याही व्यक्‍तीला सहसा ठार मारले जायचे. त्यामुळे त्या तरुणाने यहोवाला प्रार्थना केली आणि आपण टोळीचे सदस्य का राहू शकत नाही हे त्याने टोळीच्या म्होरक्याला बायबलमधील वचनांवरून सांगितले. याचा परिणाम असा झाला, की त्या तरुणाला कोणताही त्रास न देता सोडून देण्यात आले आणि तो एक राज्य प्रचारक बनला.

२१ आपल्याला सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी धैर्याची गरज आहे. ख्रिस्ती मुलांना शाळेत आपली एकनिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी या गुणाची गरज आहे. अधिवेशनाच्या सर्व सत्रांना उपस्थित राहता यावे म्हणून आपल्या वरिष्ठांजवळ सुट्टी मागण्याकरता आपल्याला धैर्याची गरज असेल. याशिवाय, आणखी कितीतरी प्रसंगी आपल्याला धैर्याची गरज भासू शकते. जीवनात आपल्याला कोणत्याही आव्हानांचा सामना करावा लागला, तरी यहोवा जरूर आपल्या ‘विश्‍वासाच्या प्रार्थना’ ऐकेल. (याको. ५:१५) आणि आपण खंबीर व धैर्यवान व्हावे म्हणून तो आपल्याला त्याचा पवित्र आत्मा देईल याची खातरी आपण बाळगू शकतो!

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[११ पानांवरील चित्र]

हनोखाने एका भक्‍तिहीन जगात धैर्याने प्रचार केला

[१२ पानांवरील चित्र]

याएल धैर्यवान व खंबीर होती