व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मंडळीतील सकारात्मक आत्मा टिकवून ठेवा

मंडळीतील सकारात्मक आत्मा टिकवून ठेवा

मंडळीतील सकारात्मक आत्मा टिकवून ठेवा

“प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.”—फिलिप्पै. ४:२३.

आपण मंडळीतील प्रेमळ आत्मा पुढील मार्गांनी कसा वाढीस लावू शकतो?

आपल्या बंधुभगिनींसोबत सहवास करताना

क्षेत्र सेवेतील आपल्या आवेशाद्वारे

गंभीर पापाबद्दल वडिलांना सांगण्याद्वारे

१. फिलिप्पै आणि थुवतीरा येथील मंडळ्यांची प्रशंसा का करण्यात आली?

 पहिल्या शतकातील फिलिप्पै येथील ख्रिस्ती बंधुभगिनी गरीब होते. पण, ते आपल्या बांधवांसोबत उदारतेने व अतिशय प्रेमळपणे वागायचे. (फिलिप्पै. १:३-५, ९; ४:१५, १६) म्हणून, प्रेषित पौलाने देवाच्या प्रेरणेने त्यांना लिहिलेल्या पत्राच्या शेवटी असे म्हटले: “प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.” (फिलिप्पै. ४:२३) अशाच प्रकारचा आत्मा थुवतीरा मंडळीनेदेखील दाखवला होता. त्यामुळे येशू ख्रिस्ताने त्या मंडळीला असे म्हटले: “तुझी कृत्ये, आणि तुझी प्रीति, विश्‍वास, सेवा व धीर ही मला ठाऊक आहेत; आणि तुझी शेवटची कृत्ये पहिल्या कृत्यांपेक्षा अधिक आहेत.”—प्रकटी. २:१९.

२. आपण जी मनोवृत्ती दाखवतो तिचा आपल्या मंडळीवर कसा प्रभाव पडतो?

त्याचप्रमाणे, आज यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रत्येक मंडळीतसुद्धा एक विशिष्ट आत्मा अर्थात मनोवृत्ती स्पष्टपणे पाहायला मिळते. उदाहरणार्थ, काही मंडळ्या, खासकरून प्रेमळ आत्मा दाखवण्यासाठी ओळखल्या जातात. तर इतर काही मंडळ्या, राज्य प्रचाराच्या कार्याला मोठ्या आवेशाने पाठिंबा देतात व पूर्ण वेळेच्या सेवेला खूप महत्त्व देतात. आपण एक व्यक्‍ती या नात्याने सकारात्मक आत्मा विकसित करतो तेव्हा मंडळीच्या एकतेला व मंडळीच्या एकंदरीत आध्यात्मिक प्रगतीला हातभार लावतो. (१ करिंथ. १:१०) दुसरीकडे पाहता, आपण नकारात्मक मनोवृत्ती बाळगली, तर मंडळीतील सदस्यांवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. ते आध्यात्मिक रीत्या झोपी जाऊ शकतात, “कोमट” होऊ शकतात, इतकेच नव्हे तर गंभीर पापही खपवून घेऊ शकतात. (१ करिंथ. ५:१; प्रकटी. ३:१५, १६) तुमच्या मंडळीत कोणता आत्मा पाहायला मिळतो? मंडळीत सकारात्मक आत्मा वाढीस लावण्यासाठी तुम्ही व्यक्‍तिगत रीत्या काय करू शकता?

सकारात्मक आत्मा राखण्याचे प्रोत्साहन द्या

३, ४. आपण मोठ्या मंडळीत यहोवाचे उपकारस्मरण कसे करू शकतो?

स्तोत्रकर्त्याने यहोवाची स्तुती करताना असे म्हटले: “मोठ्या मंडळीत मी तुझे उपकारस्मरण करीन. बलिष्ठ लोकांमध्ये मी तुझे स्तवन करीन.” (स्तो. ३५:१८) होय, सहउपासकांमध्ये यहोवाचे गुणगान करण्यास स्तोत्रकर्ता कचरला नाही. त्याचप्रमाणे, आपण टेहळणी बुरूज अभ्यासामध्ये तसेच आठवड्यातील इतर सभांमध्ये उत्तरे देतो व आपला विश्‍वास व्यक्‍त करतो तेव्हा आपण आवेशी आत्मा प्रदर्शित करतो. तेव्हा, आपण प्रत्येक जण स्वतःला असे विचारू शकतो: ‘सभांमध्ये भाग घेण्याच्या संधीचा मी पूर्ण फायदा घेत आहे का? मी सभांची चांगली तयारी करतो का आणि अर्थपूर्ण उत्तरे देतो का? कुटुंबप्रमुख या नात्याने मी माझ्या मुलांना आधीपासूनच उत्तरे तयार करण्यास मदत करतो का व त्यांना त्यांच्या स्वतःच्या शब्दांत उत्तरे देण्यास शिकवतो का?’

स्तोत्रकर्त्या दाविदाने स्थिर मनाचा संबंध गायनाशी जोडला. त्याने म्हटले: “हे देवा, माझे अंतःकरण स्थिर आहे माझे अंतःकरण स्थिर आहे; मी गाईन, मी स्तोत्रे गाईन.” (स्तो. ५७:७) आपण ख्रिस्ती सभांमध्ये गीत गातो, तेव्हा स्थिर अंतःकरणाने यहोवाचे स्तवन करण्याची उत्तम संधी आपल्याला मिळते. आपल्याला जर काही गाणी येत नसतील तर आपल्या कौटुंबिक उपासनेत आपण त्यांचा सराव करू शकतो का? स्तोत्रकर्त्याप्रमाणे आपणही ‘आपल्या जिवात जीव आहे तोपर्यंत परमेश्‍वराचे गुणगान गाण्याचा व आपण जिवंत आहोत तोपर्यंत त्याचे स्तोत्र गाण्याचा’ दृढनिश्‍चय करू या.—स्तो. १०४:३३.

५, ६. आपण इतरांना आदरातिथ्य व उदारता कशी दाखवू शकतो, आणि असे केल्याने मंडळीत काय वाढीस लागते?

मंडळीत प्रेमळ आत्म्याला चालना देण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे आपल्या बंधुभगिनींना आदरातिथ्य दाखवणे. पौलाने इब्री लोकांस लिहिलेल्या पत्राच्या शेवटच्या अध्यायात त्यांना असे प्रोत्साहन दिले: “बंधुप्रेम टिकून राहो. अतिथिप्रेमाचा विसर पडू देऊ नका.” (इब्री १३:१, २) आदरातिथ्य दाखवण्याचा एक सर्वोत्तम मार्ग म्हणजे विभागीय पर्यवेक्षकांना व त्यांच्या पत्नीला किंवा मंडळीतील पूर्ण-वेळच्या सेवकांना जेवायला बोलवणे. तसेच आपण विधवांना, एकटे पालकांना किंवा इतरांना अधूनमधून जेवणासाठी किंवा आपल्या कौटुंबिक उपासनेसाठी बोलवू शकतो.

पौलाने तीमथ्याला इतरांना पुढील सल्ला देण्यास सांगितले: “चांगले ते करावे; सत्कर्माविषयी धनवान असावे; परोपकारी व दानशूर असावे; जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल, असा साठा स्वतःसाठी करावा.” (१ तीम. ६:१७-१९) आपल्या सहविश्‍वासू बांधवांनी उदारतेचा आत्मा विकसित करावा असा सल्ला पौल त्यांना देत होता. सध्याची आर्थिक परिस्थिती बिकट असली, तरी आपण उदारतेचा आत्मा दाखवू शकतो. असा आत्मा दाखवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे गरजू बांधवांना आपल्या गाडीतून क्षेत्र सेवेला व सभांना घेऊन जाणे. ज्यांना या प्रेमळ मदतीचा फायदा होतो त्यांच्याविषयी काय म्हणता येईल? पेट्रोल-डीझेलचे दिवसेंदिवस वाढणारे दर लक्षात घेता, ते आपल्या परीने शक्य तेवढे योगदान करून कृतज्ञता व्यक्‍त करू शकतात आणि असे करण्याद्वारे ते मंडळीत सकारात्मक आत्म्याला चालना देऊ शकतात. तसेच, आपल्या आध्यात्मिक बंधुभगिनींच्या सहवासात वेळ घालवण्याद्वारे आपल्याला त्यांची गरज आहे व आपले त्यांच्यावर प्रेम आहे याची जाणीव आपण त्यांना करून देतो. ‘विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांसाठी,’ आपण अशी प्रेमळ कृत्ये करतो आणि आपला वेळ व आपली साधनसंपत्ती त्यांच्यासाठी खर्च करण्यास तयार असतो तेव्हा त्यांच्याबद्दलचे आपले प्रेम वाढते; शिवाय, मंडळीत प्रेमळ व सकारात्मक आत्मा वाढीस लावण्यासाठीही आपण हातभार लावतो.—गलती. ६:१०.

७. इतरांच्या खासगी गोष्टी गोपनीय ठेवण्याद्वारे आपण मंडळीत सकारात्मक आत्मा कसा टिकवून ठेवू शकतो?

मैत्री व गोपनीयता यांमुळेदेखील आपल्या बंधुभगिनींसोबत असलेले आपले प्रेमाचे बंधन आणखी मजबूत होऊ शकते. (नीतिसूत्रे १८:२४ वाचा.) खरे मित्र एकमेकांच्या खासगी गोष्टी दुसऱ्‍यांना सांगत नाहीत. आपले बंधुभगिनी त्यांच्या मनातले विचार व भावना आपल्याला सांगतात आणि या गोष्टी आपण इतरांना सांगणार नाही याची खातरी बाळगतात तेव्हा आपल्यातील प्रेमाचे बंधन आणखी मजबूत होते. तेव्हा, गोपनीयता पाळणारा विश्‍वसनीय मित्र बनण्याद्वारे आपण मंडळीत प्रेमळ व कुटुंबासारखे वातावरण टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करू या.—नीति. २०:१९.

सेवाकार्यात आवेशी असा

८. लावदिकीयातील मंडळीला कोणता सल्ला देण्यात आला, आणि का?

लावदिकीयातील मंडळीला संबोधून येशूने म्हटले: “तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत; तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते; पण तू तसा नाहीस, कोमट आहेस; म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे.” (प्रकटी. ३:१५, १६) लावदिकीयातील बांधवांना ख्रिस्ती सेवेबद्दल आवेश नव्हता. त्यांच्या या मनोवृत्तीचा बहुधा एकमेकांसोबतच्या त्यांच्या नातेसंबंधावरही परिणाम झाला. म्हणून येशूने त्यांना प्रेमळपणे असा सल्ला दिला: “जितक्यांवर मी प्रेम करितो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करितो; म्हणून आस्था [“आवेश,” NW] बाळग आणि पश्‍चात्ताप कर.”—प्रकटी. ३:१९.

९. क्षेत्र सेवेबद्दल असलेल्या आपल्या मनोवृत्तीचा मंडळीतील बंधुभगिनींवर कसा प्रभाव पडू शकतो?

मंडळीत प्रेमळ व सकारात्मक आत्मा वाढीस लावायचा असल्यास, क्षेत्र सेवेबद्दल आपल्याला किती आवेश आहे याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. मंडळीची व्यवस्था ही मेंढरांसमान लोकांना शोधून काढण्यासाठी व त्यांना आध्यात्मिक रीत्या मदत करण्यासाठी करण्यात आली आहे. तेव्हा, येशूप्रमाणे आपणसुद्धा शिष्य बनवण्याच्या कार्यात आवेशाने भाग घेतला पाहिजे. (मत्त. २८:१९, २०; लूक ४:४३) सेवाकार्याबद्दल आपल्याला जितका अधिक आवेश असेल, तितकीच “देवाचे सहकारी” या नात्याने आपल्यातील एकता वाढेल. (१ करिंथ. ३:९) क्षेत्र सेवेत आपण आपल्या बंधुभगिनींना त्यांच्या विश्‍वासाचे समर्थन करताना व आध्यात्मिक गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करताना पाहतो तेव्हा त्यांच्यावर अधिक प्रेम करण्यास व त्यांचा अधिक आदर करण्यास आपण प्रवृत्त होतो. तसेच, आपल्या बंधुभगिनींसोबत “एकचित्ताने” सेवाकार्यात सहभाग घेतल्यानेसुद्धा मंडळीत एकतेचा आत्मा वाढीस लागतो.—सफन्या ३:९ वाचा.

१०. आपण आपल्या सेवेचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मंडळीतील सदस्यांवर त्याचा काय परिणाम होतो?

१० आपण आपल्या सेवेचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा इतरांवर त्याचा चांगला परिणाम होतो. सेवेत भेटणाऱ्‍या लोकांबद्दल आपण मनस्वी काळजी व्यक्‍त करतो व त्यांच्या अंतःकरणापर्यंत पोचण्यासाठी आपण प्रयत्न करतो तेव्हा सेवेबद्दल आपला आवेश आणखी वाढतो. (मत्त. ९:३६, ३७) आपल्या आवेशाचा प्रभाव सहसा आपल्या बंधुभगिनींवरही पडतो. येशूने आपल्या शिष्यांना प्रचार करण्यासाठी एकटे पाठवण्याऐवजी दोघा-दोघांना पाठवले. (लूक १०:१) यामुळे त्यांना प्रोत्साहन व प्रशिक्षण तर मिळालेच, शिवाय सेवाकार्यातील त्यांचा आवेश आणखी वाढला. तर मग, आवेशी राज्य प्रचारकांसोबत कार्य करण्यास आपल्याला आवडणार नाही का? त्यांचा आवेशी आत्मा आपल्याला प्रोत्साहन देतो आणि प्रचार कार्य करत राहण्याचे उत्तेजन देतो.—रोम. १:१२.

कुरकुरण्यापासून व गंभीर पापांपासून सावध राहा

११. मोशेच्या दिवसांत काही इस्राएल लोकांनी कोणती प्रवृत्ती दाखवली, आणि याचा कोणता परिणाम त्यांना भोगावा लागला?

११ इस्राएल लोक एक नवे राष्ट्र म्हणून अस्तित्वात आले त्याच्या केवळ काही आठवड्यांनंतर त्यांनी असंतुष्ट वृत्ती दाखवली व ते कुरकूर करू लागले. याचा परिणाम असा झाला की त्यांनी यहोवाविरुद्ध व त्याच्या प्रतिनिधींविरुद्ध बंड केले. (निर्ग. १६:१, २) इजिप्तमधून बाहेर पडलेल्या इस्राएल लोकांपैकी केवळ काही जण प्रतिज्ञात देश पाहण्यास जिवंत राहिले. इतकेच काय, तर इस्राएल लोकांनी दाखवलेल्या वाईट प्रवृत्तीबद्दल मोशेने चुकीची प्रतिक्रिया दाखवल्यामुळे त्यालासुद्धा प्रतिज्ञात देशात जाण्याची परवानगी मिळाली नाही! (अनु. ३२:४८-५२) अशा नकारात्मक प्रवृत्तीला आपण बळी पडू नये म्हणून आपण काय करू शकतो?

१२. आपल्यामध्ये कुरकूर करण्याची प्रवृत्ती निर्माण होऊ नये म्हणून आपण काय केले पाहिजे?

१२ आपल्यामध्ये कुरकूर करण्याची प्रवृत्ती निर्माण होऊ नये म्हणून आपण नेहमी दक्ष असले पाहिजे. आपण नम्र असलो व जबाबदारीच्या पदावर असलेल्यांविषयी आपल्याला आदर असेल, तर ही वृत्ती टाळण्यास आपल्याला मदत मिळेल. आणि यासोबतच आणखी एक गोष्ट आपली मदत करू शकते. ती म्हणजे, आपली संगती. मनोरंजनाच्या बाबतीत आपण चुकीची निवड केली किंवा ज्यांना बायबलच्या नीतिमान तत्त्वांबद्दल आदर नाही अशा कर्मचाऱ्‍यांसोबत किंवा शाळकरी मित्रांसोबत आपण वाजवीपेक्षा जास्त वेळ घालवला तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतील. तेव्हा, अशी नकारात्मक व स्वतंत्र वृत्ती असलेल्या लोकांसोबत आपण जास्त संबंध न ठेवणे बुद्धिमानीचे ठरेल.—नीति. १३:२०.

१३. कुरकूर करण्याच्या वाईट प्रवृत्तीमुळे मंडळीत आध्यात्मिक रीत्या इतर कोणते घातक परिणाम होऊ शकतात?

१३ कुरकूर करण्याच्या वाईट प्रवृत्तीमुळे आध्यात्मिक रीत्या इतरही घातक परिणाम होऊ शकतात. उदाहरणार्थ, या प्रवृत्तीमुळे मंडळीची शांती आणि एकता भंग होऊ शकते. शिवाय, आपल्या बंधुभगिनींविरुद्ध आपण चारचौघांत बोलतो तेव्हा त्यांच्या भावना तर दुखावतातच, पण यामुळे आपल्या हातून चहाडी व निंदा यांसारखी पापेही घडू शकतात. (लेवी. १९:१६; १ करिंथ. ५:११) पहिल्या शतकातील मंडळीत कुरकूर करणारे काही जण ‘प्रभुत्व तुच्छ लेखत होते व थोरांची निंदा करत होते.’ (यहू. ८, १६) मंडळीत जबाबदारीच्या पदावर असलेल्यांविरुद्ध अशा प्रकारे कुरकूर करणाऱ्‍यांना नक्कीच देवाची स्वीकृती नव्हती.

१४, १५. (क) अपराध खपवून घेतल्याने संपूर्ण मंडळीवर कोणता परिणाम होऊ शकतो? (ख) एखादी व्यक्‍ती गुप्तपणे पाप करत असल्याचे आपल्याला समजल्यास आपण काय केले पाहिजे?

१४ मंडळीतील एखादी व्यक्‍ती गुप्तपणे एखादे पाप करत असल्याचे म्हणजे अतिमद्यपान करत असल्याचे, पोर्नोग्राफी (अश्‍लील चित्रे) पाहत असल्याचे किंवा अनैतिक जीवन जगत असल्याचे आपल्याला समजल्यास काय? (इफिस. ५:११, १२) अशा गंभीर पापाकडे आपण कानाडोळा केला, तर मंडळीवर यहोवाचा पवित्र आत्मा काम करू शकणार नाही आणि संपूर्ण मंडळीची शांती धोक्यात येऊ शकते. (गलती. ५:१९-२३) ज्याप्रमाणे पहिल्या शतकातील करिंथ मंडळीला तिच्यातील दुष्टाई काढून टाकणे गरजेचे होते, त्याचप्रमाणे आज मंडळीतील प्रेमळ, सकारात्मक आत्मा टिकवून ठेवण्यासाठी मंडळीला कोणत्याही भ्रष्ट प्रभावापासून दूर ठेवणे आवश्‍यक आहे. तर मग, मंडळीच्या शांतीला हातभार लावण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

१५ आधी सांगितल्याप्रमाणे, आपण काही गोष्टी खासगी ठेवल्या पाहिजे; आणि खासकरून तेव्हा, जेव्हा इतर जण आपल्याजवळ विश्‍वासाने त्यांच्या भावना आणि त्यांचे विचार व्यक्‍त करतात. तेव्हा, एखाद्या व्यक्‍तीविषयीची खासगी माहिती इतरांना सांगणे किती चुकीचे आहे! असे केल्याने त्या व्यक्‍तीच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. पण, एक व्यक्‍ती गंभीर पाप करते तेव्हा मंडळीत अशा बाबी हाताळण्यास ज्यांना नियुक्‍त करण्यात आले आहे अर्थात ख्रिस्ती वडिलांना त्याविषयी सांगणे आवश्‍यक आहे. (लेवीय ५:१ वाचा.) तर मग, एका बंधू किंवा भगिनीने एखादा अपराध केल्याचे आपल्याला समजले तर आपण त्या व्यक्‍तीला वडिलांशी बोलण्याचे व त्यांची मदत घेण्याचे प्रोत्साहन दिले पाहिजे. (याको. ५:१३-१५) त्या बंधू किंवा भगिनीने एका ठरावीक वेळेपर्यंत तसे केले नाही तर त्याच्या किंवा तिच्या अपराधाबद्दल आपण वडिलांना सांगितले पाहिजे.

१६. गंभीर पाप करणाऱ्‍यांबद्दल वडिलांना सांगितल्याने मंडळीतील सकारात्मक आत्मा कसा टिकून राहतो?

१६ ख्रिस्ती मंडळी एक आध्यात्मिक आश्रयस्थान आहे आणि या आश्रयस्थानाचे संरक्षण करण्यासाठी गंभीर पाप करणाऱ्‍यांबद्दल आपण वडिलांना सांगितले पाहिजे. वडिलांनी पाप करणाऱ्‍याला त्याची चूक दाखवून दिली आणि पाप करणाऱ्‍याने पश्‍चात्तापी भावनेने सल्ला व सुधारणा स्वीकारली तर मंडळीचे संरक्षण होते. पण, पाप करणारी व्यक्‍ती पश्‍चात्तापी वृत्ती दाखवत नसेल आणि वडिलांनी दिलेला प्रेमळ सल्ला स्वीकारत नसेल तर काय? अशा वेळी त्या व्यक्‍तीला मंडळीतून बहिष्कृत करण्यात येते. यामुळे मंडळीतील भ्रष्ट प्रभावाचा ‘नाश’ होतो आणि मंडळीतील सकारात्मक आत्मा टिकवून ठेवला जातो. (१ करिंथकर ५:५ वाचा.) होय, मंडळीतील सकारात्मक आत्मा टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने उचित पाऊल उचलले पाहिजे, वडील वर्गाला सहकार्य केले पाहिजे आणि आपल्या बंधुभगिनींचे हित साधले पाहिजे.

‘आत्म्याच्याद्वारे घडून आलेल्या ऐक्याला’ चालना द्या

१७, १८. “आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य” टिकवून ठेवण्यास कोणती गोष्ट आपली मदत करेल?

१७ येशूचे सुरुवातीचे शिष्य ‘प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात तत्पर,’ असल्यामुळे मंडळीत एकतेच्या आत्म्याला चालना मिळाली. (प्रे. कृत्ये २:४२) वडील जनांनी दिलेल्या शास्त्रवचनीय सल्ल्याची व मार्गदर्शनाची त्यांनी कदर केली. आज ख्रिस्ती वडील विश्‍वासू व बुद्धिमान दासासोबत सहकार्य करत असल्यामुळे मंडळीतील सर्वांना ऐक्याच्या बंधनात टिकून राहण्याचे प्रोत्साहन व साहाय्य मिळते. (१ करिंथ. १:१०) आपण यहोवाच्या संघटनेकडून मिळणाऱ्‍या बायबल आधारित शिक्षणाचे आणि वडिलांनी दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करतो तेव्हा आपण “आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटत” असल्याचा पुरावा देतो.—इफिस. ४:३.

१८ तर मग, आपण सर्व जण मंडळीत प्रेमळ, सकारात्मक आत्मा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करू या. आपण असे केले तर, ‘प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा आपल्या आत्म्याबरोबर असेल,’ याची खातरी आपण बाळगू शकतो.—फिलिप्पै. ४:२३.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१९ पानांवरील चित्र]

अर्थपूर्ण उत्तरे तयार करण्याद्वारे तुम्ही मंडळीतील सकारात्मक आत्म्याला हातभार लावता का?

[२० पानांवरील चित्र]

आपली राज्य गीते शिकण्याद्वारे मंडळीतील सकारात्मक आत्म्याला हातभार लावा