व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धार्मिक रीत्या विभाजित कुटुंबांतही शक्य आहे आनंदी राहणे

धार्मिक रीत्या विभाजित कुटुंबांतही शक्य आहे आनंदी राहणे

धार्मिक रीत्या विभाजित कुटुंबांतही शक्य आहे आनंदी राहणे

“तू आपल्या [जोडीदाराला] तारशील किंवा नाही हे तुला काय ठाऊक?”—१ करिंथ. ७:१६.

तुम्ही या प्रश्‍नांची उत्तरे शोधू शकता का?

धार्मिक रीत्या विभाजित कुटुंबांत शांतीचे वातावरण राखण्यासाठी सत्यात असलेल्या व्यक्‍ती काय करू शकतात?

ख्रिस्ती व्यक्‍ती, सत्यात नसलेल्या आपल्या कुटुंबीयांना खरी उपासना स्वीकारण्यास कशी मदत करू शकते?

धार्मिक रीत्या विभाजित कुटुंबांत राहणाऱ्‍या बांधवांना मदत करण्यासाठी मंडळीतील इतर जण काय करू शकतात?

१. राज्याचा संदेश स्वीकारल्यामुळे कुटुंबावर कोणता परिणाम होऊ शकतो?

 येशूने एकदा आपल्या प्रेषितांना प्रचार कार्याला पाठवताना त्यांना म्हटले: “जात असताना अशी घोषणा करीत जा की, ‘स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.’” (मत्त. १०:१, ७) ही सुवार्ता जे मनापासून स्वीकारतील त्यांना खरी शांती व आनंद मिळणार होता. पण राज्याचा प्रचार करताना अनेकांकडून विरोधही होईल असा इशारा येशूने आपल्या प्रेषितांना दिला होता. (मत्त. १०:१६-२३) विशेषतः कुटुंबातील सदस्य राज्याच्या संदेशाला विरोध करतात तेव्हा हा एक अतिशय दुःखदायक अनुभव असतो.—मत्तय १०:३४-३६ वाचा.

२. धार्मिक रीत्या विभाजित कुटुंबांतही आनंदी राहणे ख्रिश्‍चनांकरता अशक्य नाही असे आपण का म्हणू शकतो?

पण जे ख्रिस्ती, धार्मिक रीत्या विभाजित कुटुंबांत राहतात ते आनंदी होऊच शकत नाहीत असा याचा अर्थ होतो का? मुळीच नाही! कुटुंबीयांकडून होणारा विरोध कधीकधी अतिशय तीव्र स्वरूपाचा असतो, पण सर्वांच्याच बाबतीत असे नसते. शिवाय, आज कुटुंबाकडून विरोध होत आहे याचा अर्थ पुढेही तो होत राहील असेही म्हणता येत नाही. विश्‍वासात असलेली व्यक्‍ती, होणाऱ्‍या विरोधाला किंवा सत्याप्रती कुटुंबीयांच्या उदासीनतेला कसा प्रतिसाद देते यावर बरेच काही अवलंबून असते. तसेच, जे यहोवाला एकनिष्ठ राहतात त्यांना तो आशीर्वाद देतो आणि प्रतिकूल परिस्थितीतही आनंदी राहण्यास त्यांना साहाय्य करतो. सत्यात असणाऱ्‍या व्यक्‍ती पुढील गोष्टी करण्याद्वारे आपल्या आनंदात भर घालू शकतात (१) घरात शांतीचे वातावरण टिकवून ठेवण्यास प्रयत्नशील असण्याद्वारे आणि (२) सत्यात नसलेल्या कुटुंबीयांना खरी उपासना स्वीकारण्यास साहाय्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याद्वारे.

घरात शांती टिकवून ठेवण्यास प्रयत्नशील असा

३. विभाजित कुटुंबात ख्रिस्ती व्यक्‍तीने शांती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न का केला पाहिजे?

नीतिमत्त्वाचे बीज फलद्रूप होण्यासाठी कुटुंबात शांतीचे वातावरण असणे अतिशय महत्त्वाचे आहे. (याकोब ३:१८ वाचा.) एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीच्या कुटुंबीयांनी अद्याप खऱ्‍या उपासनेचा स्वीकार केला नसेल, तरीसुद्धा तिने घरात शांतीचे वातावरण टिकवून ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. हे कसे करता येईल?

४. ख्रिस्ती कशा प्रकारे आपली मनःशांती टिकवून ठेवू शकतात?

ख्रिश्‍चनांनी आपली मनःशांती टिकवून ठेवली पाहिजे. याकरता मनःपूर्वक प्रार्थना करणे गरजेचे आहे. असे केल्यामुळे आपल्याला “देवाची शांती” मिळते, जी अतुलनीय आहे. (फिलिप्पै. ४:६, ७) यहोवाविषयी ज्ञान घेतल्याने आणि बायबलमधील तत्त्वांचे जीवनात पालन केल्याने आपल्याला आनंद व शांती लाभते. (यश. ५४:१३) तसेच, ही शांती व आनंद अनुभवत राहण्यासाठी मंडळीच्या सभांमध्ये व क्षेत्र सेवाकार्यात आवेशाने सहभाग घेणेही गरजेचे आहे. धार्मिक रीत्या विभाजित कुटुंबात राहणाऱ्‍या ख्रिस्ती व्यक्‍तींना कोणत्या ना कोणत्या प्रकारे ख्रिस्ती कार्यांत सहभाग घेणे सहसा शक्य असते. जसे की, अंजलीचे * उदाहरण लक्षात घ्या. तिचे पती तिला विरोध करतात व प्रसंगी मारहाणही करतात. ती घरातील सर्व कामे केल्यानंतर प्रचार कार्यात सहभाग घेते. अंजली म्हणते, “इतरांना सुवार्ता सांगण्यासाठी मी स्वतःकडून जेव्हा जेव्हा प्रयत्न करते तेव्हा तेव्हा यहोवा मला खूप आशीर्वाद देतो.” या आशीर्वादांमुळे शांती, समाधान व आनंद मिळतो यात शंका नाही.

५. विभाजित कुटुंबात राहणाऱ्‍या व्यक्‍तींना सहसा कोणत्या कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागते आणि त्यांच्यासाठी कोणती मदत उपलब्ध आहे?

सत्यात नसलेल्या कुटुंबीयांसोबत शांतीपूर्ण संबंध टिकवून ठेवण्यासाठी मनःपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. कधीकधी हे कठीण जाऊ शकते, कारण ते आपल्याकडून अशा गोष्टी करण्याची अपेक्षा करू शकतात, ज्या बायबलमधील तत्त्वांच्या विरोधात आहेत. आपण योग्य तत्त्वांना जडून राहतो तेव्हा सत्यात नसलेल्या कुटुंबीयांना कदाचित आपला राग येईल. पण, अशी खंबीर भूमिका घेतल्यामुळे दीर्घ पल्ल्यात शांती टिकवून ठेवण्यास हातभारच लागेल. अर्थात, बायबलमधील कोणत्याही तत्त्वांचे उल्लंघन होत नसतानाही आपण कठोर मनोवृत्ती दाखवल्यास कुटुंबात अनावश्‍यक ताण निर्माण होऊ शकतो. (नीतिसूत्रे १६:७ वाचा.) कठीण परिस्थितीत निर्णय घेताना विश्‍वासू व बुद्धिमान दासवर्गाने पुरवलेल्या प्रकाशनांतून व मंडळीतील वडिलांकडून बायबलचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.—नीति. ११:१४.

६, ७. (क) यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास सुरू करणाऱ्‍या काही व्यक्‍तींच्या कुटुंबातील सदस्य त्यांचा विरोध का करू लागतात? (ख) बायबलचा अभ्यास करणारी किंवा सत्यात असणारी व्यक्‍ती कुटुंबीयांच्या विरोधाला कशी प्रतिक्रिया दाखवू शकते?

कुटुंबात शांतीचे वातावरण राखण्यासाठी यहोवावर भरवसा ठेवणे आणि सत्यात नसलेल्या कुटुंबीयांच्या भावनांबाबत समजूतदारपणा दाखवणे महत्त्वाचे आहे. (नीति. १६:२०) या बाबतीत नव्यानेच बायबल अभ्यास सुरू केलेल्या व्यक्‍तीही विचारशीलता दाखवू शकतात. आपल्या जोडीदाराच्या बायबल अभ्यास करण्याला कदाचित काही पती व पत्नींचा विरोध नसेल. उलट हे कुटुंबासाठी चांगलेच आहे असेही ते कबूल करत असतील. पण काही पती व पत्नी मात्र विरोध करतील. सरिता, जी आता यहोवाची साक्षीदार आहे ती सांगते की तिच्या पतीने साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा ती “जाम चिडली” होती. ती सांगते, “मी त्याची पुस्तकं, मासिकं एकतर फेकून तरी द्यायची, नाहीतर ती जाळून तरी टाकायची.” आपल्या पत्नीच्या बायबल अभ्यासाला सुरुवातीला विरोध करणारा हरीश म्हणतो: “बऱ्‍याच पतींना अशी भीती असते की त्यांच्या पत्नींना विशिष्ट धार्मिक गटात सामील करून घेण्यासाठी त्यांची फसवणूक केली जातेय. या काल्पनिक भीतीचं कसं निरसन करावं हे कळत नसल्यामुळं ते विरोध करू लागतात.”

जोडीदाराकडून विरोध होत असलेल्या बायबल विद्यार्थ्याला हे समजण्यास मदत केली पाहिजे की त्याने बायबल अभ्यास थांबवण्याची गरज नाही. सत्यात नसलेल्या जोडीदाराशी सौम्यतेने आणि आदरपूर्वक वागल्याने बरेच प्रश्‍न सोडवले जाऊ शकतात. (१ पेत्र ३:१५) हरीश म्हणतो, “माझी बायको शांत राहिली आणि तिनं कोणतीही टोकाची प्रतिक्रिया दाखवली नाही हे किती बरं झालं!” त्याची पत्नी सांगते: “हरीशनं मला बायबल अभ्यास बंद करायला सांगितला. त्याच्या मते साक्षीदार माझं ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न करत होते. पण त्याच्याशी वाद घालण्याऐवजी मी त्याला म्हणाले की कदाचित तुझं बरोबर असेलही. पण, मला तरी असं मानण्याचं कोणतंही कारण दिसत नाही. मी ज्या पुस्तकाचा अभ्यास करत होते, ते मी त्याला वाचून पाहायला सांगितलं. त्यानं ते वाचलं आणि त्याला त्यातली माहिती पटली. याचा त्याच्या मनावर फार मोठा प्रभाव पडला.” सत्यात असलेला जोडीदार ख्रिस्ती कार्यांत सहभागी होण्यासाठी घराबाहेर पडतो तेव्हा त्याच्या जोडीदाराच्या मनात एकाकीपणाच्या किंवा असुरक्षिततेच्या भावना येऊ शकतात हे आपण आठवणीत ठेवले पाहिजे. पण, पती किंवा पत्नीने त्यांना आपल्या प्रेमाचे आश्‍वासन दिल्यास अशा भावना बऱ्‍याच प्रमाणात दूर केल्या जाऊ शकतात.

त्यांना खरी उपासना स्वीकारण्यास साहाय्य करा

८. ज्यांचे जोडीदार सत्यात नाहीत अशांना प्रेषित पौलाने कोणता सल्ला दिला?

केवळ सत्यात नसल्यामुळे विवाह जोडीदाराला सोडून देऊ नये असा प्रेषित पौलाने ख्रिश्‍चनांना सल्ला दिला. * (१ करिंथकर ७:१२-१६ वाचा.) सत्यात नसलेला जोडीदार आज ना उद्या ख्रिस्ती बनू शकतो हे सत्यात असलेल्या जोडीदाराने आठवणीत ठेवल्यास विभाजित कुटुंबात राहत असूनही त्याला आपला आनंद टिकवून ठेवणे शक्य होईल. पण पुढील अनुभवांवरून दिसून येते त्याप्रमाणे, जोडीदाराला सत्य स्वीकारण्यास मदत करताना एका गोष्टीबाबत खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.

९. सत्यात नसलेल्या कुटुंबीयांना बायबलविषयी माहिती देताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे?

बायबलमधील सत्य शिकल्यावर आपल्याला कसे वाटले याविषयी जेसन म्हणतो, “कुणाला सांगू न्‌ कुणाला नाही असं मला झालं होतं!” बायबल विद्यार्थ्याला शास्त्रवचनांतून शिकलेल्या गोष्टींची सत्यता मनापासून पटते तेव्हा त्याला इतका आनंद होतो की तो सतत त्याविषयीच बोलत असतो. सत्यात नसलेल्या आपल्या कुटुंबीयांनीही लगेच राज्याचा संदेश स्वीकारावा अशी त्याची अपेक्षा असू शकते, पण कधीकधी अगदी याउलट घडते. जेसनच्या सुरुवातीच्या त्या उत्साहाचा त्याच्या पत्नीवर काय परिणाम झाला? ती सांगते, “मी तर अगदीच भांबावून गेले.” पतीने सत्य स्वीकारल्याच्या १८ वर्षांनंतर सत्य स्वीकारलेली एक स्त्री म्हणते, “माझ्या बाबतीत म्हणाल तर मला हळूहळू सत्य शिकण्याची गरज होती.” तुमच्याही एखाद्या बायबल विद्यार्थ्याच्या जोडीदाराला कदाचित खऱ्‍या उपासनेत सहभागी होण्याची इच्छा नसेल. अशा जोडीदाराच्या भावना न दुखवता त्याला सत्याविषयी कसे सांगता येईल हे बायबल विद्यार्थ्याला शिकवण्याकरता तुम्ही त्याच्यासोबत नियमित सराव करू शकता का? मोशेने म्हटले: ‘पर्जन्याप्रमाणे माझ्या बोधाची वृष्टि होवो, माझे भाषण दहिवराप्रमाणे ठिबको; कोवळ्या गवतावर जशी पावसाची झिमझिम तसे ते वर्षो.’ (अनु. ३२:२) मुसळधार पावसाप्रमाणे एकदम सगळ्या माहितीचा भडिमार करण्याऐवजी, रिमझिम पावसाप्रमाणे हळुवारपणे सत्याविषयी माहिती देणे अधिक परिणामकारक ठरेल.

१०-१२. (क) ज्यांचा जोडीदार सत्यात नाही अशांना प्रेषित पेत्राने कोणते मार्गदर्शन दिले? (ख) बायबलचा अभ्यास करणारी एक व्यक्‍ती कशा प्रकारे १ पेत्र ३:१, २ यातील सल्ल्याचे पालन करण्यास शिकली?

१० धार्मिक रीत्या विभाजित कुटुंबांत राहणाऱ्‍या ख्रिस्ती पत्नींना प्रेषित पेत्राने देवप्रेरित मार्गदर्शन दिले. त्याने लिहिले, “आपआपल्या पतीच्या अधीन असा; ह्‍यासाठी की, कोणी वचनाला अमान्य असले, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते वचनावाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे.” (१ पेत्र ३:१, २) पती कठोरतेने व्यवहार करत असला तरीसुद्धा त्याच्या अधीन राहण्याद्वारे आणि त्याचा मनापासून आदर करण्याद्वारे पत्नी त्याचे मन जिंकून त्याला सत्याकडे आकर्षित करू शकते. त्याच प्रकारे, सत्यात असलेल्या पतीनेही आपल्या पत्नीकडून विरोध होत असला तरीसुद्धा नेहमी ख्रिस्ती व्यक्‍तीला शोभेल अशा रीतीने व्यवहार केला पाहिजे आणि प्रेमळपणे आपल्या कुटुंबाची देखरेख केली पाहिजे.—१ पेत्र ३:७-९.

११ पेत्राच्या या सल्ल्याचे पालन करणे किती फायदेकारक आहे हे आधुनिक काळातील अनेक उदाहरणांवरून दिसून येते. सुषमाचे उदाहरण पाहा. तिने यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करण्यास सुरुवात केली तेव्हा तिच्या पतीला, संजयला हे आवडले नाही. तो सांगतो, “मला खूप राग आला, ईर्ष्या वाटू लागली. मी तिच्यावर जास्तच हक्क गाजवू लागलो आणि मला असुरक्षित वाटू लागलं.” सुषमा सांगते: “सत्यात येण्याआधीही संजयसोबत राहणं सोपं नव्हतं. आपल्या हातून काहीतरी चूक होईल असं दडपण सतत माझ्या मनावर असायचं. तो अतिशय तापट स्वभावाचा होता. आणि मी बायबलचा अभ्यास करू लागले तेव्हा तर त्याचं हे वागणं आणखीनच वाढलं.” तिला कशामुळे मदत मिळाली?

१२ सुषमासोबत अभ्यास करणाऱ्‍या बहिणीकडून तिला एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळाला असे ती सांगते. सुषमा म्हणते, “मला तो दिवस अजूनही आठवतो. त्या दिवशी मला बायबल अभ्यास करायची इच्छा नव्हती. आदल्या रात्री मी संजयला माझं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न केल्यामुळं त्यानं मला मारलं होतं. त्यामुळं मी खूप उदास होते. मला स्वतःचीच दया येत होती. मी घडलेला प्रकार बहिणीला सांगितला आणि मला किती वाईट वाटत होतं हेही सांगितलं. तेव्हा, तिनं मला १ करिंथकर १३:४-७ ही वचनं वाचायला सांगितली. ती वचनं वाचताना मी विचार करू लागले, की ‘यात सांगितलेल्या कोणत्याच प्रेमळ गोष्टी संजय माझ्यासाठी कधीच करत नाही.’ पण बहिणीनं मला वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला लावला. तिनं मला विचारलं, ‘तू आपल्या पतीसाठी यांपैकी कोणकोणत्या प्रेमळ गोष्टी करतेस?’ मी उत्तर दिलं, ‘कोणत्याच नाही, कारण त्याचा स्वभाव अगदीच विचित्र आहे.’ तेव्हा बहिणीनं प्रेमळपणे मला म्हटलं, ‘सुषमा, इथं ख्रिस्ताचा अनुयायी होण्याचा प्रयत्न कोण करतंय? तू की संजय?’ मला जाणीव झाली की मला माझी विचारसरणी बदलण्याची गरज होती. त्यामुळं मी यहोवाला प्रार्थना केली आणि संजयशी आणखी प्रेमळपणे वागण्यास साहाय्य करण्याची त्याला विनंती केली. हळूहळू आमच्या कुटुंबातली परिस्थिती बदलू लागली.” १७ वर्षांनंतर संजयने सत्य स्वीकारले.

इतर जण कशा प्रकारे मदत करू शकतात?

१३, १४. धार्मिक रीत्या विभाजित कुटुंबांत राहणाऱ्‍यांना मंडळीतील इतर जण कशा प्रकारे साहाय्य करू शकतात?

१३ रिमझिम पावसाचे थेंब ज्याप्रमाणे मातीला ओलावा देतात आणि रोपांना वाढण्यास मदत करतात, त्याचप्रमाणे मंडळीतील अनेक जण विभाजित कुटुंबातील ख्रिस्ती व्यक्‍तीच्या आनंदात भर घालतात. ब्राझीलमध्ये राहणारी एलव्हीना म्हणते, “माझ्या भाऊ-बहिणींच्या प्रेमामुळेच मला सत्यात टिकून राहणं शक्य झालं.”

१४ मंडळीतील सदस्य प्रेमळपणे व आपुलकीने वागतात तेव्हा सत्यात नसलेल्या जोडीदाराच्या मनावर फार चांगला प्रभाव पडू शकतो. नायजीरिया येथील एक पती, ज्याने आपल्या पत्नीने सत्य स्वीकारल्याच्या १३ वर्षांनंतर सत्य स्वीकारले, तो सांगतो: “एकदा एका साक्षीदारासोबत प्रवास करताना त्याची गाडी बिघडली. त्यानं जवळच्याच गावातल्या साक्षीदार बांधवांचा पत्ता लावला आणि त्यांनी आमच्या रात्रीच्या मुक्कामाची सोय केली. त्यांनी आमची इतक्या प्रेमळपणे काळजी घेतली, जणू काही ते आम्हाला लहानपणापासून ओळखत होते. तेव्हा मला जाणीव झाली की हेच ते ख्रिस्ती प्रेम आहे ज्याविषयी माझी पत्नी नेहमी बोलत असते.” इंग्लंडमध्ये एक पत्नी जी आपल्या पतीच्या १८ वर्षांनंतर सत्यात आली, ती सांगते: “मंडळीतील बांधव आम्हा दोघांना जेवणाचं आमंत्रण द्यायचे. त्यांच्यात मला कधीही परक्यासारखं वाटलं नाही.” * त्याच देशात राहणारा एक पती जो कालांतराने साक्षीदार बनला, तो म्हणतो: “मंडळीतील भाऊ-बहिणी आम्हाला भेटायला यायचे किंवा कधी आम्हाला आपल्या घरी बोलवायचे. मला जाणीव झाली की त्यांना खरोखरच आमच्याबद्दल काळजी होती. विशेषतः एकदा मला हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागलं, तेव्हा मला याची जाणीव झाली कारण अनेक जण मला भेटायला आले.” तुम्हीही मंडळीतील सदस्यांच्या सत्यात नसलेल्या कुटुंबीयांबद्दल काळजी व्यक्‍त करण्याचे यांसारखे मार्ग शोधू शकता का?

१५, १६. कुटुंबातील सदस्य सत्य स्वीकारत नाहीत तेव्हा सत्यात असलेल्या व्यक्‍तीला आनंदी मनोवृत्ती टिकवून ठेवण्यास कशामुळे मदत मिळू शकते?

१५ अर्थात, सत्यात असलेल्या व्यक्‍तीने अनेक वर्षे विश्‍वासू राहून व विचारशीलतेने साक्ष देण्याचा प्रयत्न करूनही, सत्यात नसलेले सगळेच जोडीदार, मुले, आईवडील किंवा इतर नातेवाईक खरी उपासना स्वीकारत नाहीत. काही जण सत्याविषयी पूर्वीप्रमाणेच उदासीन राहतात किंवा विरोध करतच राहतात. (मत्त. १०:३५-३७) पण, ख्रिस्ती व्यक्‍ती देवाला आवडणारे गुण प्रदर्शित करते तेव्हा याचा फार चांगला परिणाम होऊ शकतो. पूर्वी सत्यात नसलेला एक पती म्हणतो: “सत्यात असलेला जोडीदार आपल्या वागणुकीत हे उत्तम गुण प्रदर्शित करू लागतो, तेव्हा सत्यात नसलेल्या जोडीदाराच्या मनात नेमकं काय चाललेलं असतं हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळं आपल्या जोडीदाराबाबत कधीही आशा सोडू नका.”

१६ कुटुंबातील एखाद्या सदस्याने सत्य स्वीकारले नाही तरीसुद्धा सत्यात असलेली व्यक्‍ती आपला आनंद टिकवून ठेवू शकते. एका बहिणीने २१ वर्षांपासून प्रयत्न करूनही तिच्या पतीने अद्याप राज्याच्या संदेशाला प्रतिसाद दिलेला नाही. ही बहीण म्हणते: “यहोवाला संतुष्ट करण्याचा, त्याला एकनिष्ठ राहण्याचा आणि आध्यात्मिक रीत्या सुदृढ राहण्याचा प्रयत्न करण्याद्वारे मी आपला आनंद टिकवून ठेवते. वैयक्‍तिक अभ्यास, सभांना, क्षेत्र सेवेला जाणं आणि मंडळीतल्या इतरांना मदत करणं यांसारख्या आध्यात्मिक कार्यांत स्वतःला गुंतवून ठेवल्यामुळं मी यहोवाच्या आणखी जवळ आलेय आणि यामुळं मला माझ्या हृदयाचं रक्षण करणं शक्य झालंय.”—नीति. ४:२३.

हिंमत हारू नका!

१७, १८. धार्मिक रीत्या विभाजित कुटुंबातही एक ख्रिस्ती व्यक्‍ती कशा प्रकारे आशादायी मनोवृत्ती बाळगू शकते?

१७ जर तुम्ही धार्मिक रीत्या विभाजित कुटुंबात राहणारी एक विश्‍वासू ख्रिस्ती व्यक्‍ती असाल, तर हिंमत हारू नका. यहोवा “आपल्या थोर नामास्तव आपल्या लोकांचा त्याग करणार नाही” हे नेहमी आठवणीत असू द्या. (१ शमु. १२:२२) तुम्ही त्याला जडून राहिल्यास तो सदैव तुमच्या पाठीशी राहील. (२ इतिहास १५:२ वाचा.) तेव्हा, यहोवाच्या ठायी आनंद माना. ‘आपला जीवितक्रम परमेश्‍वरावर सोपवून द्या; त्याच्यावर भाव ठेवा.’ (स्तो. ३७:४, ५) “प्रार्थनेत तत्पर राहा” आणि हा भरवसा बाळगा की आपला प्रेमळ स्वर्गीय पिता तुम्हाला सर्व प्रकारच्या कठीण परिस्थितींत टिकून राहण्याचे बळ देण्यास समर्थ आहे.—रोम. १२:१२.

१८ घरात शांती टिकवून ठेवण्यासाठी पवित्र आत्म्याचे साहाय्य मिळावे म्हणून यहोवाला याचना करा. (इब्री १२:१४) होय, घरात शांतीपूर्ण वातावरण जोपासल्यास सत्यात नसलेल्या कुटुंबातील सदस्यांचे मन कालांतराने तुम्हाला जिंकता येईल. तुम्ही “जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी” करत राहिल्यास तुम्हाला आनंद व मनःशांती लाभेल. (१ करिंथ. १०:३१) शिवाय, तुमच्या या प्रयत्नांत ख्रिस्ती मंडळीतील प्रेमळ बंधुभगिनीदेखील तुमच्यासोबत आहेत ही जाणीव खरोखरच दिलासादायक नाही का?

[तळटीपा]

^ परि. 4 नावे बदलण्यात आली आहेत.

^ परि. 8 टोकाच्या परिस्थितीतही जोडीदारापासून कायदेशीर फारकत घेतली जाऊ शकत नाही असा पौलाच्या या सल्ल्याचा अर्थ घेतला जाऊ नये. हा एक वैयक्‍तिक निर्णय आहे जो गांभीर्याने विचार करून घेतला जावा. कृपया, देवाच्या प्रेमात टिकून राहा या पुस्तकातील पृष्ठे २५१-२५३ पाहा.

^ परि. 14 सत्यात नसलेल्या व्यक्‍तींसोबत जेवण्यास बायबल मनाई करत नाही.—१ करिंथ. १०:२७.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२८ पानांवरील चित्र]

आपल्या विश्‍वासांबद्दल सांगण्यासाठी योग्य वेळ निवडा

[२९ पानांवरील चित्र]

सत्यात नसलेल्या जोडीदारांबद्दल काळजी व्यक्‍त करा