व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत”

“पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत”

देवाच्या जवळ या

“पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत”

आठवणी वरदान असू शकतात. आपल्या जवळच्या व्यक्‍तींबरोबर घालवलेल्या सुखद क्षणांच्या आठवणींनी आपले मन सुखावू शकते. पण काही वेळा, आठवणी आपल्याला शाप वाटू शकतात. गतकाळातील वाईट अनुभवांच्या दुःखद आठवणींमुळे तुम्ही निराश आहात का? असल्यास, तुम्ही विचार करत असाल, ‘या दुःखद आठवणी माझ्या मनातून कधी नाहीशा होतील का?’ या प्रश्‍नाचे दिलासादायक उत्तर आपल्याला यशया संदेष्ट्याच्या शब्दांतून मिळते.—यशया ६५:१७ वाचा.

दुःखद आठवणींचे मूळच काढून टाकण्याचा यहोवाचा उद्देश आहे. ते तो कसे करेल? या दुष्ट जगाला आणि त्यातील सर्व दुःखद गोष्टींना काढून टाकून तो त्याऐवजी अशा सुखद गोष्टींनी हे जग भरेल ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. यहोवा यशयाद्वारे आपल्याला असे अभिवचन देतो: “मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करतो.” हे अभिवचन समजून घेतल्यास आपले अंतःकरण आशेने भरू शकते.

नवे आकाश म्हणजे काय? या प्रश्‍नाचे उत्तर मिळवण्यासाठी बायबल आपल्याला दोन सुगावे देते. सर्वात पहिला सुगावा म्हणजे, नवे आकाश याचा उल्लेख बायबलच्या आणखी दोन लेखकांनी केलेला आहे, आणि दोन्ही वेळेस हे शब्द पृथ्वीवर होणाऱ्‍या मोठ्या बदलांना सूचित करतात. (२ पेत्र ३:१३; प्रकटीकरण २१:१-४) दुसरा सुगावा म्हणजे, बायबलमध्ये “आकाश” हा शब्द शासनाला किंवा सरकारला सूचित करू शकतो. (यशया १४:४, १२; दानीएल ४:२५, २६) तर मग, नवे आकाश म्हणजे पृथ्वीवर नीतिमान परिस्थिती आणण्याची क्षमता असलेले नवीन सरकार. हे सर्व बदल घडवून आणणारे केवळ एकच शासन आहे, ते म्हणजे देवाचे स्वर्गीय राज्य, ज्याच्याविषयी येशूने आपल्याला प्रार्थना करण्यास शिकवले होते. हे राज्य संपूर्ण जगभरात देवाची नीतिमान इच्छा पूर्ण करेल.—मत्तय ६:९, १०.

नवी पृथ्वी म्हणजे काय? या प्रश्‍नाचे योग्य उत्तर मिळवण्यास आपल्याला मदत करतील असे दोन शास्त्रवचनीय पुरावे आपण पाहू या. पहिला पुरावा म्हणजे, बायबलमध्ये काही ठिकाणी “पृथ्वी” हा शब्द जगाला नाही तर, लोकांना सूचित करण्यासाठी वापरण्यात आला आहे. (स्तोत्र ९६:१) दुसरा पुरावा म्हणजे, बायबलमध्ये आधीच भाकीत करण्यात आले होते की, देवाच्या राज्यात विश्‍वासू मानव नीतिमत्त्व शिकतील आणि ही नीतिमत्ता संपूर्ण पृथ्वीवर पसरेल. (यशया २६:९) तर मग, नवी पृथ्वी अशा मानवसमाजाला सूचित करते जो देवाच्या शासनाच्या अधीन राहील आणि देवाच्या नीतिमान स्तरांनुसार जीवन जगेल.

देव दुःखद आठवणींचे मूळ कसे काढून टाकेल हे आता तुम्हाला समजलेच असेल. यहोवा लवकरच नीतिमान नवीन जग आणण्याद्वारे नवे आकाश आणि नवी पृथ्वी निर्माण करण्याचे त्याचे अभिवचन पूर्ण करेल. * त्या नवीन जगात, दुःखद आठवणींचे मूळ म्हणजेच शारीरिक, मानसिक आणि भावनिक रीत्या होणारा त्रास नाहीसा होईल. धार्मिक लोक जीवनाचा पुरेपूर आनंद लुटतील आणि प्रत्येक दिवसाच्या सुखद आठवणी ते आपल्या मनात साठवतील.

पण, आत्ता आपण जो मानसिक आणि भावनिक त्रास सहन करत आहोत त्याबद्दल काय? यहोवा यशयाद्वारेच आपल्याला पुढे अभिवचन देतो: “पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत.” या जगात आपण जे दुःख सहन केले आहे ते नाहीसे होईल. ही आशा तुम्हाला सांत्वनदायक वाटत नाही का? वाटत असल्यास, या उज्ज्वल भविष्याची आशा देणाऱ्‍या देवाजवळ येण्यास तुम्ही काय करावे हे शिकून घ्या. (w१२-E ०३/०१)

[तळटीप]

^ परि. 7 देवाच्या राज्याबद्दल आणि ते लवकरच काय करणार आहे याबद्दल जास्त माहितीसाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले, बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील अध्याय ३, ८ आणि पाहा.