व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

एखाद्या ख्रिश्‍चनाची पोर्नोग्राफी पाहायची सवय इतक्या खालच्या थराला पोचू शकते का, की ज्यामुळे त्याला ख्रिस्ती मंडळीतून बहिष्कृत केले जाऊ शकते?

▪ होय, असे होऊ शकते. यावरून कळते, की आपण सर्व प्रकारच्या पोर्नोग्राफीचा, मग ती, मासिकांत, चित्रपटांत, व्हिडिओंत व इंटरनेटवर लेखी मजकुराच्या व चित्रांच्या स्वरूपात असली तरी तिचा तिटकारा करणे आवश्‍यक आहे.

अश्‍लील साहित्य विश्‍वभरात कोठेही गेलो तरी पाहायला मिळते. इंटरनेटमुळे तर आज हे अश्‍लील साहित्य अगदी सहजगत्या उपलब्ध होते आणि या भयंकर साथीची लागण झालेल्यांची संख्यादेखील वाढली आहे. काही तरुण व वृद्ध इंटरनेटवर मुद्दामहून अश्‍लील साईट्‌स शोधत नाहीत, तर अचानक अशा साईट्‌स त्यांच्या कॉम्प्युटरवर उघडतात. पण इतर जण मुद्दामहून अश्‍लील साईट्‌सवर जातात. आपण घरात किंवा ऑफिसमध्ये लपूनछपून हे अश्‍लील साहित्य वाचू किंवा पाहू शकत असल्यामुळे कोणीही आपल्याला अडवू शकत नाही, असे त्यांना वाटते. पण ख्रिश्‍चनांनी ही गोष्ट गांभीर्याने का घेतली पाहिजे?

याचे एक मूलभूत कारण, येशूने दिलेल्या ताकिदीत आहे. त्याने अशी ताकीद दिली होती: “जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.” (मत्त. ५:२८) अर्थात, वैवाहिक जोडीदारांतील नैसर्गिक लैंगिक संबंध हे उचित आहेत आणि त्यातून त्यांना आनंदही मिळतो. (नीति. ५:१५-१९; १ करिंथ. ७:२-५) पण पोर्नोग्राफीचा तो मुख्य हेतू नसतो. पोर्नोग्राफीत अनैतिक सेक्ससंबंध दाखवले जातात ज्यामुळे मनात असे घाणेरडे विचार निर्माण होतात ज्यांच्याविरुद्ध येशूने ताकीद दिली होती. स्पष्टपणे सांगायचे तर, अश्‍लील साहित्य पाहणे किंवा वाचणे हे, “पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ—ह्‍याला मूर्तिपूजा म्हणावे—हे जिवे मारा,” या देवाने दिलेल्या मार्गदर्शनाच्या अगदी विपरीत आहे.—कलस्सै. ३:५.

एखाद्या ख्रिश्‍चनाने एकदा किंवा दोनदाच हे अश्‍लील साहित्य पाहिले असेल तर? अशा ख्रिश्‍चनाची तुलना स्तोत्रकर्ता आसाफ याच्याशी करता येऊ शकेल. स्तोत्रकर्ता आसाफ एकदा एका घातक परिस्थितीत आला होता. त्याविषयी तो म्हणतो: “माझ्याविषयी म्हणाल तर माझे पाय लटपटण्याच्या लागास आले होते; माझी पावले बहुतेक घसरणार होती.” नग्न स्त्रियांची वा पुरुषांची किंवा एखाद्या स्त्री-पुरुषाला जारकर्म करत असतानाची अश्‍लील चित्रे पाहून एक ख्रिश्‍चन त्याचा विवेक शुद्ध ठेवू शकतो का, व देवाबरोबर शांतीमय नातेसंबंध राखू शकतो का? आसाफालासुद्धा ही मानसिक शांती नव्हती. “मी दिवसभर पीडा भोगिली आहे; प्रतिदिवशी सकाळी मला शिक्षा झाली,” असे तो म्हणतो.—स्तो. ७३:२, १४.

एखाद्या ख्रिश्‍चनाने हा वाईटपणा केला असेल तर त्याने शुद्धीवर यावे आणि त्याला आध्यात्मिक मदतीची गरज आहे, हे ओळखावे. ही मदत मंडळीत उपलब्ध आहे. “कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहा ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा; तूहि परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष दे.” (गलती. ६:१) मंडळीतील एक किंवा दोन ख्रिस्ती वडील अशा ख्रिश्‍चनाला हवी ती मदत देऊ शकतात आणि ते या ‘दुःखणाइतासाठी विश्‍वासाची प्रार्थना करू शकतात जेणेकरून तो बरा होईल; व त्याच्या पापांची क्षमा होऊ शकेल.’ (याको. ५:१३-१५) अश्‍लील गोष्टी पाहिल्यामुळे त्यांच्यावर लागलेला डाग काढून टाकण्यासाठी ज्यांनी वडिलांची मदत घेतली त्यांना दिसून आले आहे, की आसाफाप्रमाणे त्यांनादेखील देवाच्या जवळ गेल्याने फायदा झाला आहे.—स्तो. ७३:२८.

पण प्रेषित पौलाने अशा काहींविषयी सांगितले ज्यांनी पाप केले पण त्यांच्या “अशुद्धपणाचा, जारकर्माचा व कामातुरपणाचा पश्‍चात्ताप केला नाही.” * (२ करिंथ. १२:२१) येथे ‘अशुद्धपणा,’ असे भाषांतरीत करण्यात आलेल्या ग्रीक शब्दाविषयी प्राध्यापक मार्व्हन आर. विन्संट यांनी असे लिहिले, की ‘अशुद्धपणा या शब्दात गलिच्छपणाचा अर्थ आहे.’ काही अश्‍लील साहित्य तर अतिशय घाणेरड्या स्वरूपाची असतात; त्यात फक्‍त, नग्नतेची किंवा स्त्री-पुरुषांतील जारकर्माची दृश्‍येच नसतात. तर, अतिशय नीच अश्‍लील चित्रे असतात; जसे की, समलैंगिक (एकाच लिंगाच्या दोन व्यक्‍तींतील सेक्स), काही लोकांतील लैंगिक संबंध (ग्रूप सेक्स), पशूंबरोबरचे लैंगिक संबंध, मुलांबरोबरचे तिरस्कार येईल असे चाळे, सामूहिक बलात्कार, स्त्रियांबरोबरचे अतिशय पाशवी वर्तन, स्वतःला अथवा जोडीदाराचे हातपाय बांधून सेक्ससंबंधाची दृश्‍ये, किंवा विकृत प्रकारच्या लैंगिक छळाची दृश्‍ये दाखवली जातात. पौलाच्या दिवसात काहींची “बुद्धी अंधकारमय झाली” होती; “कोडगे झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्वप्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वत:ला कामातुरपणास वाहून घेतले” होते.—इफिस. ४:१८, १९.

पौलाने गलतीकर ५:१९ या वचनातही “अशुद्धपणा” हा शब्द वापरला आहे. “येथे वापरण्यात आलेला शब्द जास्तकरून, सर्व प्रकारच्या अनैसर्गिक वासनांना कदाचित सूचित करत असावा,” असे एका ब्रिटिश विद्वानाने म्हटले. वर उल्लेखण्यात आलेली घृणास्पद, अश्‍लील हीणकस लैंगिक कृत्ये ‘अनैसर्गिक वासना’ नाहीत व ती किती गलिच्छ आहेत, हे कोणता ख्रिस्ती अमान्य करेल? ही अशुद्ध “कर्मे करणाऱ्‍यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही,” असे पौलाने गलतीकर ५:१९-२१ मध्ये म्हटले. त्यामुळे, जर कोणा ख्रिश्‍चनाला घृणास्पद, अश्‍लील हीणकस लैंगिक कृत्ये पाहण्याची पक्की सवय कदाचित बऱ्‍याच काळापासून लागली असेल व तो पश्‍चात्ताप करून मागे वळत नसेल तर तो ख्रिस्ती मंडळीत राहू शकत नाही. मंडळीची शुद्धता व पवित्र वातावरण टिकवून ठेवण्याकरता अशा ख्रिश्‍चनाला बहिष्कृत करावेच लागेल.—१ करिंथ. ५:५, ११.

आनंदाची गोष्ट म्हणजे, हीणकस अश्‍लील साहित्य पाहण्याची सवय जडलेल्यांपैकी काही जण मंडळीतील वडिलांकडे गेले आणि स्वतःत मोठा बदल करण्यासाठी हवी असलेली आध्यात्मिक मदत त्यांना मिळाली. प्राचीन सार्दीस येथील ख्रिश्‍चनांना येशूने अशी विनंती केली: “जे मरणाच्या पंथास लागले आहे ते सावरून धर; . . . तू कसे स्वीकारले व ऐकले ह्‍याची आठवण कर; ते जतन करून ठेव व पश्‍चात्ताप कर; कारण तू जागृत झाला नाहीस तर मी . . . कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईन हे तुला मुळीच कळणार नाही.” (प्रकटी. ३:२, ३) या वचनावरून कळते, की पश्‍चात्ताप करणे व या वाईट सवयीच्या अग्नीतून बाहेर ओढले जाणे शक्य आहे.—यहू. २२, २३.

या घातक स्थितीच्या जवळही न जाण्याचा आपल्यातील प्रत्येकाने निश्‍चय करणे किती फायद्याचे ठरेल. होय आपण सर्वांनी सर्व प्रकारच्या अश्‍लील गोष्टींपासून दूर राहण्याचा ठाम निर्धार केला पाहिजे.

[तळटीप]

^ परि. 8 ‘अशुद्धपणा, जारकर्म व कामातुरपणा’ यांत काय फरक आहे, त्याबद्दलची अधिक माहिती हवी असेल तर टेहळणी बुरूज, १ ऑक्टोबर २००९, पृ. १८-२० पाहा.

[३० पानांवरील संक्षिप्त आशय]

एखाद्या ख्रिश्‍चनाने वाईटपणा केला असेल, तर त्याने शुद्धीवर यावे आणि त्याला आध्यात्मिक मदतीची गरज आहे हे ओळखावे