व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबलने बदलले जीवन!

बायबलने बदलले जीवन!

बायबलने बदलले जीवन!

वाईट मार्गाला लागलेल्या एका व्यक्‍तीला लहानपणी मिळालेल्या धार्मिक संस्कारांकडे वळण्यास कोणत्या गोष्टीनं मदत केली? आयुष्यभर वडिलांच्या प्रेमासाठी आसुसलेल्या एका तरुणाला ते प्रेम कसं मिळालं? त्यांच्याच शब्दांत त्यांचा अनुभव ऐकू या.

“मी यहोवाकडे परत वळलं पाहिजे.”—ईली कलील

जन्म: १९७६

देश: साइप्रस

माझा गतकाळ: वाट चुकलेला मुलगा

माझी पूर्व जीवनशैली: माझा जन्म साइप्रसमध्ये झाला पण मी ऑस्ट्रेलियात लहानाचा मोठा झालो. माझे आईवडील यहोवाचे साक्षीदार आहेत आणि त्यांनी यहोवाबद्दल व त्याचे वचन, बायबलबद्दल माझ्या मनात प्रेम रुजवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. पण तरुणवयात आल्यावर मी बंडखोर बनलो. मी माझ्या मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी रात्री चोरून बाहेर पडायचो. आम्ही गाड्यांच्या चोऱ्‍या केल्या आणि इतर बऱ्‍याच वाईट कामात फसत गेलो.

सुरुवातीला मी आईवडिलांच्या भीतीने लपूनछपून ही कामं करायचो. पण हळूहळू ती भीतीपण निघून गेली. माझ्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या लोकांसोबत मी मैत्री केली ज्यांचं यहोवावर प्रेम नव्हतं आणि त्यांचा माझ्यावर वाईट प्रभाव पडला. शेवटी एक दिवस मी आईवडिलांना सांगून टाकलं की मला त्यांचा धर्म पाळायचा नाहीये. त्यांनी खूप सहनशीलतेने मला समजावण्याचा प्रयत्न केला पण मी त्यांचं काहीएक ऐकून घेतलं नाही. माझ्या अशा वागण्यामुळे आईवडिलांचा जीव खूप तुटला.

घर सोडल्यावर मी ड्रग्स घेऊ लागलो, त्यासोबतच मोठ्या प्रमाणात गांजाचे उत्पादन करून ते विकू लागलो. मी अनैतिक जीवन जगू लागलो आणि जास्तीत जास्त वेळ क्लब्समध्येच घालवू लागलो. मी खूप रागीट बनलो. माझ्या मनाविरुद्ध कोणी काही केलं किंवा बोललं तर माझ्या तळपायाची आग मस्तकात शिरायची; मी सतत लोकांशी भांडायचो आणि मारहाण करायचो. एका ख्रिस्ती व्यक्‍तीला ज्या गोष्टींपासून दूर राहायला शिकवलं जातं त्या सर्व गोष्टी मी करत होतो.

बायबलनं माझं जीवन कसं बदललं: माझ्यासोबतच ड्रग्स घेणारा एक जण माझा चांगला मित्र बनला. तो लहान असतानाच त्याचे वडील वारले होते. आम्ही रात्री उशिरापर्यंत बोलत बसायचो. एका रात्री तो त्याच्या मनातलं बोलू लागला आणि त्याला त्याच्या वडिलांची किती आठवण येते ते सांगू लागला. मला पुनरुत्थानाच्या आशेविषयी माहीत असल्यामुळे येशूनं कशा प्रकारे मृतांना उठवलं होतं आणि भविष्यातही तो कशा प्रकारे मेलेल्या लोकांना पुन्हा जिवंत करेल याबद्दल मी त्याला सांगू लागलो. (योहान ५:२८, २९) मी त्याला म्हणायचो, “तू परत तुझ्या वडिलांना पाहू शकशील. आपण सर्व जण पृथ्वीवर एका नंदनवनात नेहमीसाठी जीवन जगू.” हे शब्द माझ्या मित्राच्या मनाला भिडले.

काही वेळा माझा मित्र माझ्याबरोबर शेवटल्या काळाविषयी किंवा त्रैक्याविषयी बोलायचा. मी त्याच्याच बायबलमधून त्याला यहोवा देव, येशू आणि शेवटला काळ यांबद्दलचं सत्य सांगणारी बरीच वचने दाखवायचो. (योहान १४:२८; २ तीमथ्य ३:१-५) मी जितकं जास्त माझ्या मित्रासोबत यहोवाबद्दल बोलू लागलो तितका जास्त मी यहोवाबद्दल विचार करू लागलो.

माझ्या मनात बऱ्‍याच वर्षांपासून असलेलं सत्याचं बीज, ज्याला रुजवण्याचा माझ्या आईवडिलांनी खूप प्रयत्न केला होता, त्या बीजाला हळूहळू अंकुर फुटू लागलं. जसं की कधीकधी मित्रांसोबत ड्रग्स घेऊन पार्टी करत असताना अचानकच माझ्या मनात यहोवाबद्दल विचार यायचा. माझे बरेच मित्र दावा करायचे की त्यांचं देवावर प्रेम आहे, पण त्यांच्या वागण्यातून दुसरंच काही दिसायचं. मला त्यांच्यासारखं बनायचं नव्हतं. मग मला जाणीव झाली की मी काहीतरी केलं पाहिजे, मी यहोवाकडे परत वळलं पाहिजे.

पण, योग्य काय ते माहीत असणं आणि त्याप्रमाणे करणं यात खूप फरक आहे. काही बदल करणे माझ्यासाठी सोपे होते, मला ड्रग्स सोडताना जास्त त्रास झाला नाही. मी माझे जुने मित्रदेखील सोडून दिले आणि ख्रिस्ती मंडळीतील एका वडिलांसोबत मी बायबल अभ्यास करू लागलो.

पण इतर काही बदल करायला मला खूप त्रास झाला. खासकरून रागावर नियंत्रण ठेवणं मला खूप कठीण गेलं. कधीकधी रागावर नियंत्रण ठेवण्यात मला यश यायचं, पण ते जास्त काळ टिकायचं नाही आणि मी परत आधिसारखाच व्हायचो. माझ्या अपयशाचा विचार करून मला खूप वाईट वाटायचं. निराश होऊन मी माझ्यासोबत बायबल अभ्यास करणाऱ्‍या वडिलांना माझी समस्या सांगितली. नेहमीसारखंच त्यांनी मला धीरानं व प्रेमानं दिलासा दिला. एकदा त्यांनी माझ्याकडून टेहळणी बुरूज मासिकातला एक लेख वाचून घेतला, ज्यात प्रयत्न करत राहणं किती महत्त्वाचं आहे ते सांगितलं होतं. * मला राग आल्यावर मी कोणती पावलं उचलू शकतो यावर आम्ही चर्चा केली. त्या लेखातील मुद्दे मनात ठेवल्यामुळे आणि यहोवाला सातत्यानं प्रार्थना केल्यामुळे हळूहळू मी माझ्या रागावर ताबा ठेवण्यात यशस्वी झालो. मग २००० सालच्या एप्रिल महिन्यात मी बाप्तिस्मा घेतला आणि यहोवाचा साक्षीदार बनलो. हे पाहून माझ्या आईवडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

मला काय फायदा झाला: मी ड्रग्स किंवा अनैतिक कामं करून माझ्या शरीराला हानी पोचवत नाहीये या जाणिवेमुळे मी आता मनःशांती अनुभवतो आणि माझा विवेकही शुद्ध आहे. काम करताना, ख्रिस्ती सभांना उपस्थित राहताना, मनोरंजन करताना किंवा दुसरं काहीही करत असताना मला आता खूप आनंद मिळतो. जीवनाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन आता सकारात्मक झाला आहे.

माझ्या आईवडिलांनी माझ्याबाबतीत कधीच आशा सोडली नाही यासाठी मी यहोवाचा खूप आभारी आहे. योहान ६:४४ मधील येशूचे शब्दही मी नेहमी आठवतो, त्यात म्हटलं आहे: “ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही.” यहोवानं मला परत त्याच्याकडे आकर्षित केल्यामुळेच मी जीवनात इतके बदल करून त्याच्याजवळ येऊ शकलो या गोष्टीनं माझं मन भरून येतं.

“वडिलांच्या प्रेमासाठी मी आसुसलो होतो.”—मार्को ऑन्टोनियो आल्वारेझ सॉटो

जन्म: १९७७

देश: चिली

माझा गतकाळ: हेवी-मेटल बॅन्डचा सदस्य

माझी पूर्व जीवनशैली: पुंटा अरेनास या शहरात मला माझ्या आईनं लहानाचं मोठं केलं. हे सुंदर शहर मगेलनच्या खाडीवर आहे जी दक्षिण अमेरिकेच्या दक्षिणी टोकाजवळ आहे. मी पाच वर्षांचा असतानाच माझे आईवडील वेगळे झाले, आणि तेव्हापासूनच त्यांनी मला टाकून दिलंय असं मला वाटू लागलं. मी वडिलांच्या प्रेमासाठी आसुसलो होतो.

माझ्या आईनं यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास केला आणि ती मला राज्य सभागृहात ख्रिस्ती सभांना घेऊन जायची. पण मला सभा मुळीच आवडत नव्हत्या आणि सभांना जाण्यासाठी मी खूप त्रागा करायचो. १३ वर्षांचा असताना तर मी सभांना जाणं पूर्णपणे थांबवलं.

त्या वयापर्यंत माझ्यात संगीताची आवड निर्माण झाली होती आणि मला जाणवलं की मी या क्षेत्रात खूप पुढं जाऊ शकतो. मी १५ वर्षांचा असताना उत्सवांत, समारंभात आणि क्लब्समध्ये हेवी-मेटल संगीत वाजवू लागलो. चांगल्या संगीतकारांच्या संगतीत राहिल्यामुळे माझ्यात शास्त्रीय संगीत शिकण्याची आवड निर्माण झाली. मी तिथल्याच एका संगीत विद्यापीठात संगीत शिकू लागलो. २० वर्षांचा असताना मी पुढील शिक्षण घेण्यासाठी चिलीची राजधानी सँटियागोला गेलो. शिक्षणासोबतच मी हेवी-मेटल संगीतही वाजवत होतो.

पण या प्रवासात मला एकटेपणाच्या भावनेनं ग्रासलं होतं. यातून बाहेर पडण्यासाठी मी माझ्या बॅन्डमधील मित्रांसोबत खूप दारू प्यायचो आणि ड्रग्स घ्यायचो. मी या मित्रांनाच माझं कुटुंब समजायचो. मी खूप विद्रोही बनलो होतो आणि ते माझ्या अवतारावरून स्पष्टच दिसायचं. मी कमरेपर्यंत केस वाढवले, दाढी वाढवली आणि नेहमी काळ्या रंगाचे कपडे घालायचो.

माझ्या अशा वागण्यामुळे अनेक वेळा मी भांडणात पडायचो आणि पोलिसांच्या तावडीत सापडायचो. एकदा तर मी इतकी दारू प्यायलो होतो की ड्रग्स विकणाऱ्‍या एका टोळीवरच मी हल्ला केला, कारण ते मला आणि माझ्या मित्राला त्रास देत होते. त्या टोळीनं मला इतक्या वाईट रीत्या मारलं की माझ्या तोंडाला जबरदस्त मार लागला.

पण मला सर्वात जास्त दुःख माझ्या जवळच्याच लोकांनी दिलं. एके दिवशी मला कळालं की माझ्या गर्लफ्रेंडचे माझ्या खास मित्रासोबत बऱ्‍याच वर्षांपासून संबंध आहेत आणि माझ्या सर्व मित्रांनी ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली होती. हे समजल्यावर मी पार उद्‌ध्वस्त झालो.

मी परत पुंटा अरेनासला गेलो. तिथं मी संगीत शिकवू लागलो आणि सेलो वाद्य वाजवण्याचं काम करू लागलो. त्यासोबतच मी हेवी-मेटल संगीत वाजवणं आणि रेकॉर्ड करणं चालू ठेवलं. मला सुसान नावाची एक सुंदर मुलगी भेटली आणि आम्ही सोबत राहू लागलो. काही काळानंतर सुसानला कळालं की तिची आई त्रैक्याची शिकवण मानते पण मी ती मानत नाही. “तर मग सत्य काय आहे?” असं तिनं मला विचारलं. मी तिला उत्तर दिलं की त्रैक्याची शिकवण खोटी आहे हे मला माहीत आहे पण बायबलमधून मी ती सिद्ध करू शकत नाही. पण कोण सिद्ध करू शकतं ते मला माहीत होतं. मी तिला सांगितलं की यहोवाचे साक्षीदार तिला बायबलमधून त्रैक्याबद्दलचं सत्य सांगू शकतात. त्यानंतर मी असं काहीतरी केलं जे मी बऱ्‍याच वर्षांपासून केलं नव्हतं. मी देवाला मदतीसाठी प्रार्थना केली.

काही दिवसांनंतर मला एक ओळखीचा वाटणारा मनुष्य दिसला. तो यहोवाचा साक्षीदार आहे का असं मी त्याला विचारलं. माझा अवतार पाहून तो थोडा घाबरलाच, तरी त्यानं राज्य सभागृहात होणाऱ्‍या सभांविषयी मी विचारलेल्या प्रश्‍नांची अगदी प्रेमानं उत्तरं दिली. मला आता खातरी पटली की त्या व्यक्‍तीसोबतची भेट हेच माझ्या प्रार्थनेचं उत्तर आहे. मी राज्य सभागृहात सभेसाठी गेलो आणि कोणी मला ओळखू नये म्हणून अगदी शेवटच्या रांगेत जाऊन बसलो. पण लहानपणी मी सभांना जात असल्यामुळे बऱ्‍याच लोकांनी मला ओळखलं. त्यांनी माझं स्वागत केलं आणि मला खूप प्रेमानं त्यांच्यामध्ये सामावून घेतलं. तिथं जाऊन माझ्या मनाला खूप शांती मिळाली, मी जणू घरीच परतलोय असं मला वाटलं. लहानपणी मला ज्या बांधवानं बायबल शिकवलं होतं त्याला मी सभागृहात पाहिलं तेव्हा मी त्यालाच माझ्यासोबत पुन्हा बायबलचा अभ्यास करायला सांगितला.

बायबलनं माझं जीवन कसं बदललं: एकदा मी नीतिसूत्रे २७:११ हे वचन वाचत होतो, त्यात म्हटलं आहे: “माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर.” एक क्षुद्र मानव विश्‍वाच्या निर्माणकर्त्याचं मन आनंदित करू शकतो ही गोष्ट माझ्या मनाला भावली. मला जाणीव झाली की आयुष्यभर मी ज्या प्रेमासाठी आसुसलो होतो ते प्रेम मला यहोवा देऊ शकतो.

मला माझ्या स्वर्गीय पित्याला खूश करायचं होतं आणि त्याच्या इच्छेनुसार वागायचं होतं. पण मी बऱ्‍याच वर्षांपासून ड्रग्स आणि दारूच्या आहारी गेलो होतो. मत्तय ६:२४ मधील येशूचे शब्द मला समजले की “कोणीही दोन धन्याची चाकरी करू शकत नाही.” मी बदल करण्याचा प्रयत्न करत असताना १ करिंथकर १५:३३ या वचनातील सिद्धांत माझ्या मनाला भिडला, त्यात म्हटलं आहे: “कुसंगतीने नीति बिघडते.” मला जाणवलं की जोपर्यंत मी माझ्या मित्रांसोबत सहवास राखला, त्यांच्यासोबत पूर्वी ज्या ठिकाणी जायचो तिथे जात राहिलो तोपर्यंत मी वाईट सवयींपासून कधीच सुटका मिळवू शकत नाही. बायबलचा सल्ला अगदी स्पष्ट होता, देवाला न आवडणाऱ्‍या गोष्टी मी कायमच्या सोडून दिल्या पाहिजेत आणि त्यासाठी मला माझ्या जीवनात काही कठोर पावलं उचलावी लागणार होती.—मत्तय ५:३०.

मला संगीताविषयी इतकं वेड होतं, की हेवी-मेटलच्या दुनियेतून स्वतःला बाहेर काढणं माझ्यासाठी सगळ्यात मुश्‍कील होतं. पण मंडळीतल्या मित्रांच्या मदतीनं मी शेवटी त्यातून बाहेर पडलो. मी बेसुमार दारू पिण्याचं आणि ड्रग्स घेण्याचं सोडून दिलं. मी माझे केस कापले, दाढी काढली आणि नेहमी काळ्या रंगाचे कपडे घालण्याचं सोडून दिलं. मला माझे केस कापायचेत असं मी सुसानला सांगितलं तेव्हा तिला विश्‍वासच बसेना; मी राज्य सभागृहात नेमकं काय करतो हे जाणून घेण्यास ती खूप उत्सुक झाली. ती म्हणाली: “हे राज्य सभागृह आहे तरी काय ते मला पाहायचंय!” सभागृहात गेल्यानंतर तिनं स्वतः जे काही पाहिलं ते तिला इतकं आवडलं की तिनंही लगेच बायबलचा अभ्यास करायला सुरुवात केली. पुढं आम्ही दोघांनी लग्न केलं. आणि २००८ साली यहोवाचे साक्षीदार या नात्यानं आम्ही बाप्तिस्मा घेतला. माझ्या आईच्या सोबतीनं आम्ही यहोवाची सेवा करत आहोत याचा आम्हाला खूप आनंद होतो.

मला कसा फायदा झाला: पूर्वी मी फसव्या आनंदाच्या आणि विश्‍वासघातकी मित्रांच्या मागे धावत होतो; पण, या सर्वांपासून आता मी स्वतःची सुटका करून घेतली आहे. संगीताविषयी माझ्या मनात अजूनही प्रेम आहे, पण आता संगीताची मी खूप विचारपूर्वक निवड करतो. मी माझ्या घरच्यांना, इतरांना आणि खासकरून तरुणांना मदत करण्यासाठी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मला त्यांना हे सांगायचंय की हे जग आपल्याला जे काही देतं ते वरवर पाहता खूप आकर्षक वाटतं, पण खरं पाहता ते निव्वळ “केरकचरा” आहे.—फिलिप्पैकर ३:८.

ख्रिस्ती मंडळीत मला खरं प्रेम आणि खरी शांती मिळते; तिथं मला खरे मित्रही मिळाले आहेत. सर्वात मुख्य म्हणजे, यहोवाच्या जवळ आल्यामुळे मी आयुष्यभर ज्याच्यासाठी आसुसलो होतो ते वडिलांचं प्रेम मला मिळालं आहे. (w१२-E ०४/०१)

[तळटीप]

^ परि. 14 “प्रयत्नांती . . .” हा लेख, टेहळणी बुरूज १ फेब्रुवारी २००० या अंकात पृष्ठे ४-६ वर प्रकाशित करण्यात आला होता.

[२९ पानांवरील संक्षिप्त आशय]

“यहोवानं मला परत त्याच्याकडे आकर्षित केल्यामुळेच मी त्याच्याजवळ येऊ शकलो”