व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तारण प्राप्त होण्यासाठी यहोवा आपले रक्षण करतो

तारण प्राप्त होण्यासाठी यहोवा आपले रक्षण करतो

तारण प्राप्त होण्यासाठी यहोवा आपले रक्षण करतो

“जे तारण शेवटल्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे, ते प्राप्त व्हावे म्हणून . . . तुम्ही देवाच्या शक्‍तीने विश्‍वासाच्या योगे रक्षिलेले आहा.”—१ पेत्र १:३.

तुमचे उत्तर काय असेल?

यहोवाने आपल्याला खऱ्‍या उपासनेकडे कशा प्रकारे आकर्षित केले?

आपण यहोवाचे मार्गदर्शन कशा प्रकारे स्वीकारू शकतो?

यहोवा कशा प्रकारे आपल्याला प्रोत्साहन देतो?

१, २. (क) आपली एकनिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी देव आपल्याला मदत करेल याविषयी आपल्याला कोणते आश्‍वासन देण्यात आले आहे? (ख) यहोवा आपल्यापैकी प्रत्येकाला कितपत ओळखतो?

 “जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल.” (मत्त. २४:१३) असे म्हणून येशूने स्पष्ट केले की देव सैतानाच्या या जगाचा नाश करेल तेव्हा जिवंत बचावण्यासाठी आपण शेवटपर्यंत आपली एकनिष्ठा टिकवून ठेवली पाहिजे. पण यहोवा आपल्याकडून अशी अपेक्षा करत नाही की जीवनातील परीक्षांना आपण स्वतःच्याच बुद्धीने किंवा स्वतःच्याच बळावर तोंड द्यावे. बायबल आपल्याला असे आश्‍वासन देते: “देव विश्‍वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्‍तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील, ह्‍यासाठी की, तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे.” (१ करिंथ. १०:१३) या शब्दांचा काय अर्थ होतो?

आपल्या शक्‍तीपलीकडे आपली परीक्षा होणार नाही याची खातरी करण्यासाठी यहोवाला आपल्या प्रत्येकाबद्दल सर्वकाही माहीत असले पाहिजे. म्हणजेच, आपल्यासमोर असलेली आव्हाने, आपली विशिष्ट जडणघडण आणि आपण कितपत सहन करू शकतो. देव खरोखरच आपल्याला इतक्या चांगल्या प्रकारे ओळखतो का? हो, बायबल सांगते की यहोवा आपल्यापैकी प्रत्येकाला अगदी जवळून ओळखतो. आपला दैनंदिन नित्यक्रम आणि सवयी यांबद्दल यहोवाला माहीत आहे. एवढेच काय, तो आपल्या मनातील विचार व हेतूसुद्धा ओळखू शकतो.स्तोत्र १३९:१-६ वाचा.

३, ४. (क) यहोवा आपल्यापैकी प्रत्येकाकडे लक्ष देतो हे दाविदाच्या अनुभवावरून कशा प्रकारे दिसून येते? (ख) आज यहोवा कोणते अद्‌भुत कार्य घडवून आणत आहे?

क्षुल्लक मानवांबद्दल देव इतकी आस्था दाखवतो यावर विश्‍वास ठेवणे तुम्हाला कठीण वाटते का? स्तोत्रकर्त्या दाविदालाही हा प्रश्‍न पडला होता. त्याने यहोवाला म्हटले: “आकाश जे तुझे अंगुलीकार्य, व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे ह्‍यांच्याकडे पहावे तर—मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी?” (स्तो. ८:३, ४) दाविदाला कदाचित स्वतःच्या अनुभवामुळेच हा प्रश्‍न पडला असावा. तो इशायाचा सर्वात धाकटा मुलगा होता. पण यहोवाला मात्र तो “आपल्या मनासरखा मनुष्य” वाटला. “मेंढवाड्यातून मेंढरांच्यामागे” फिरणाऱ्‍या या मुलाला यहोवाने “इस्राएलांचा अधिपती” बनवले होते. (१ शमु. १३:१४; २ शमु. ७:८) एका साध्या मेंढपाळ मुलाने एकांतात केलेले मनन व त्याच्या मनात आलेले विचार यांकडे सबंध विश्‍वाच्या निर्माणकर्त्याने लक्ष दिले होते, याची जाणीव झाल्यावर दाविदाला किती धन्य वाटले असेल याची कल्पना करा!

आज आपल्यापैकी प्रत्येकाबद्दल यहोवा जी उल्लेखनीय आस्था व्यक्‍त करतो तिचा विचार केल्यावर आपणही दाविदासारखे आश्‍चर्यचकित होतो. यहोवा आज “सर्व राष्ट्रांतील निवडक वस्तू” म्हणजेच खऱ्‍या उपासकांना गोळा करत आहे आणि आपल्या सेवकांना त्यांची एकनिष्ठा टिकवून ठेवण्यास साहाय्य करत आहे. (हाग्ग. २:७) यहोवा कशा प्रकारे आपल्याला आपली एकनिष्ठा टिकवून ठेवण्यास साहाय्य करतो हे जास्त चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, मुळात तो लोकांना खऱ्‍या उपासनेकडे कसे आकर्षित करतो यावर विचार करू या.

देव आकर्षित करतो

५. यहोवा लोकांना त्याच्या पुत्राकडे कसे आकर्षित करतो? उदाहरण देऊन स्पष्ट करा.

येशूने म्हटले: “ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही.” (योहा. ६:४४) या शब्दांवरून दिसून येते, की ख्रिस्ताचा शिष्य बनण्याकरता आपल्याला देवाच्या साहाय्याची गरज आहे. तर मग, यहोवा मेंढरांसमान लोकांना त्याच्या पुत्राकडे कसे आकर्षित करतो? सुवार्तेच्या प्रचाराद्वारे आणि पवित्र आत्म्याच्या कार्याद्वारे. उदाहरणार्थ, पौल व त्याचे मिशनरी सोबती फिलिप्पै येथे आले तेव्हा त्यांना लुदिया नावाची एक स्त्री भेटली आणि त्यांनी तिला सुवार्ता सांगितली. देवप्रेरित अहवाल सांगतो: “देवाने तिचे अंतःकरण उघडले व तिने पौल जे सांगत होता ते सारे अंतःकरणपूर्वक स्वीकारले.” याचा अर्थ, देवाने त्याचा पवित्र आत्मा देऊन लुदियाला सुवार्तेचा अर्थ समजून घेण्यास साहाय्य केले. परिणामस्वरूप, तिचा व तिच्या घराण्याचा बाप्तिस्मा झाला.—प्रे. कृत्ये १६:१३-१५, सुबोधभाषांतर.

६. आपल्या सर्वांना देवाने खऱ्‍या उपासनेकडे कशा प्रकारे आकर्षित केले आहे?

लुदियाचा अनुभव एक अपवाद होता का? मुळीच नाही. तुम्ही एक समर्पित ख्रिस्ती असाल तर तुम्हालाही देवानेच खऱ्‍या उपासनेकडे आकर्षित केले आहे. ज्याप्रमाणे लुदियाच्या अंतःकरणात यहोवाला काहीतरी मौल्यवान असे आढळले, त्याचप्रमाणे तुमच्यातही त्याला नक्कीच काहीतरी चांगले आढळले असावे. तुम्ही सुवार्ता ऐकू लागला, तेव्हा यहोवाने पवित्र आत्मा देऊन तुम्हाला ती समजून घेण्यास साहाय्य केले. (१ करिंथ. २:११, १२) मग तुम्ही शिकलेल्या गोष्टींचे पालन करण्याचा प्रयत्न करू लागला, तेव्हा यहोवाने त्याची इच्छा पूर्ण करण्याच्या तुमच्या प्रयत्नांवर आशीर्वाद दिला. तुम्ही आपले जीवन त्याला समर्पित केले, तेव्हा त्याला मनापासून आनंद झाला. खरोखर, तुम्ही जीवनाच्या मार्गावर पहिले पाऊल ठेवले तेव्हापासून यहोवा पदोपदी तुमच्यासोबत आहे.

७. देव आपल्याला विश्‍वासू राहण्यास साहाय्य करेल असे आपण का म्हणू शकतो?

ज्याअर्थी यहोवाने आपल्याला त्याच्यासोबत चालण्यास सुरुवात करायला मदत केली, त्याअर्थी त्याला विश्‍वासू राहण्यासाठी आताही तो आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही. सत्य स्वीकारण्याकरता ज्याप्रमाणे आपल्याला मदतीची गरज होती, त्याचप्रमाणे सत्यात टिकून राहण्यासाठीही आपल्याला मदतीची गरज आहे हे यहोवाला माहीत आहे. अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना लिहिताना प्रेषित पेत्राने म्हटले: “जे तारण शेवटल्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे, ते प्राप्त व्हावे म्हणून . . . तुम्ही देवाच्या शक्‍तीने विश्‍वासाच्या योगे रक्षिलेले आहा.” (१ पेत्र १:३) हे शब्द जरी मुळात अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसाठी लिहिलेले असले, तरीसुद्धा ते सर्व ख्रिश्‍चनांना लागू होतात आणि आपल्याकरता त्यांचा काय अर्थ होतो हे जाणून घेण्यास आपण सर्वांनीच आज उत्सुक असले पाहिजे. का? कारण आपल्या सर्वांनाच देवाला विश्‍वासू राहण्याकरता त्याच्या साहाय्याची नितान्त गरज आहे.

चुकीचे पाऊल उचलण्यापासून आपल्याला आवरतो

८. एखादे चुकीचे पाऊल उचलण्याबाबत आपण सतर्क असणे का गरजेचे आहे?

जीवनातील ताणतणाव आणि आपल्या स्वतःच्या व्यक्‍तिमत्त्वातील उणिवा यांमुळे आध्यात्मिक गोष्टींवरून आपले लक्ष विचलित होऊ शकते. आणि परिणामस्वरूप आपल्याकडून नकळत एखादे चुकीचे पाऊल उचलले जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. (गलतीकर ६:१ वाचा.) दाविदाच्या जीवनात घडलेल्या एका घटनेवरून हे स्पष्ट होते.

९, १०. यहोवाने कशा प्रकारे दाविदाला एक चुकीचे पाऊल उचलण्यापासून आवरले आणि आज तो कशा प्रकारे आपले साहाय्य करतो?

शौल राजा दाविदाचा पाठलाग करत होता तेव्हा दाविदाने मत्सराने पेटलेल्या त्या राजाविरुद्ध सूड उगवला नाही. उलट त्याने कमालीचा आत्मसंयम दाखवला. (१ शमु. २४:२-७) पण याच्या थोड्याच काळानंतर दावीद आपल्या अपरिपूर्ण प्रवृत्तींना बळी पडला. दाविदाला त्याच्या माणसांसाठी अन्‍नधान्याची गरज होती आणि म्हणून त्याने नाबाल नावाच्या आपल्या एका इस्राएली बांधवाला आदरपूर्वक मदतीची विनंती केली. पण, मदत करण्याऐवजी नाबालाने दाविदाच्या माणसांचा अपमान केला, तेव्हा दाविदाचा क्रोध भडकला. तो नाबालाच्या घराण्यातील सर्व पुरुषांविरुद्ध सूड उगवण्यास निघाला. निर्दोष व्यक्‍तींची हत्या केल्याने आपण देवापुढे रक्‍तपाती ठरू याचेही भान त्याला राहिले नाही. केवळ, नाबालाची पत्नी अबीगईल हिने वेळीच अडवल्यामुळे दावीद एक अतिशय भयानक चूक करण्यापासून वाचला. खरेतर यहोवानेच आपल्याला वाचवले आहे हे ओळखून दावीद अबीगईलला म्हणाला: “ज्याने तुला आज माझ्या भेटीस पाठविले तो इस्राएलाचा देव परमेश्‍वर धन्य! धन्य तुझ्या दूरदर्शीपणाची! तू स्वतः धन्य! तू आज मला आपल्या हाताने रक्‍तपात करण्यापासून व सूड उगविण्यापासून आवरिले आहे.”—१ शमु. २५:९-१३, २१, २२, ३२, ३३.

१० या अहवालातून आपण काय शिकू शकतो? यहोवाने दाविदाला एक चुकीचे पाऊल उचलण्यापासून आवरण्यासाठी अबीगईलचा उपयोग केला. आज आपल्यालाही तो अशाच प्रकारे मदत करतो. अर्थात, जेव्हा जेव्हा आपण एखादी चूक करण्याच्या बेतात असतो तेव्हा तेव्हा आपल्याला अडवण्याकरता यहोवा कोणालातरी पाठवेल अशी अपेक्षा आपण करू नये. तसेच, कोणत्याही विशिष्ट परिस्थितीत यहोवा कशा प्रकारे कार्य करेल किंवा त्याच्या उद्देशाच्या पूर्णतेकरता तो कोणत्या गोष्टी घडू देईल हे जाणून घेणे आपल्या हातात नाही. (उप. ११:५) तरीपण, एका गोष्टीची आपण खातरी बाळगू शकतो. ती म्हणजे, यहोवाला नेहमीच आपल्या परिस्थितीची जाणीव असते आणि त्याला विश्‍वासू राहण्यास तो नक्कीच आपले साहाय्य करेल. तो आपल्याला असे आश्‍वासन देतो: “मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन.” (स्तो. ३२:८) यहोवा कशा प्रकारे आपल्याला बुद्धिवाद सांगतो, किंवा आपले मार्गदर्शन करतो? आपण कशा प्रकारे या मार्गदर्शनाचा फायदा घेऊ शकतो? आणि आज यहोवा आपल्या लोकांचे मार्गदर्शन करत आहे असे आपण खातरीने का म्हणू शकतो? या प्रश्‍नांची प्रकटीकरणाच्या पुस्तकात दिलेली उत्तरे आपण पाहू या.

सल्ला देऊन रक्षण करतो

११. आज यहोवाच्या लोकांच्या मंडळ्यांमध्ये जे घडत आहे ते तो कितपत जाणतो?

११ प्रकटीकरणाच्या २ ऱ्‍या व ३ ऱ्‍या अध्यायांत दिलेल्या दृष्टान्तात पुनरुत्थित येशू ख्रिस्त, आशिया मायनर येथील सात मंडळ्यांचे परीक्षण करतो. या दृष्टान्तातून दिसून येते, की मंडळ्यांमध्ये सर्वसाधारणपणे जे चालले आहे त्याचीच नव्हे, तर विशिष्ट परिस्थितींचीही ख्रिस्त दखल घेतो. काही मंडळ्यांविषयी बोलताना तर तो विशिष्ट व्यक्‍तींचाही उल्लेख करतो आणि प्रत्येक मंडळीच्या कार्यांनुसार त्यांची प्रशंसा करतो व सल्ला देतो. यावरून काय दिसून येते? दृष्टान्ताच्या पूर्णतेत त्या सात मंडळ्या १९१४ नंतरच्या अभिषिक्‍त जनांना सूचित करतात; आणि या सात मंडळ्यांना दिलेला सल्ला आज सबंध पृथ्वीवरील देवाच्या लोकांच्या सर्व मंडळ्यांनाही लागू होतो. त्यामुळे, आज यहोवा आपल्या पुत्राद्वारे आपल्या लोकांचे मार्गदर्शन करत आहे असा निष्कर्ष आपण काढू शकतो. तर मग, आपण या मार्गदर्शनापासून फायदा कसा करून घेऊ शकतो?

१२. आपण कशा प्रकारे यहोवाचे मार्गदर्शन स्वीकारू शकतो?

१२ यहोवाच्या प्रेमळ मार्गदर्शनाचा फायदा करून घेण्याचा एक मार्ग म्हणजे वैयक्‍तिक अभ्यास. विश्‍वासू व बुद्धिमान दासाने पुरवलेल्या प्रकाशनांद्वारे यहोवा आपल्याला मुबलक प्रमाणात बायबल आधारित सल्ला देतो. (मत्त. २४:४५) पण, या सल्ल्याचा फायदा करून घ्यायचा असेल तर आपण अभ्यास करण्यासाठी वेळ काढला पाहिजे आणि शिकलेल्या गोष्टींचे जीवनात पालन केले पाहिजे. वैयक्‍तिक अभ्यास हा एक मार्ग आहे ज्याद्वारे यहोवा आपल्याला “अडखळण्यापासून” राखू शकतो. (यहू. २४, पं.र.भा.) आपल्या प्रकाशनांचा अभ्यास करताना, ‘ही माहिती अगदी माझ्यासाठीच लिहिलेली आहे’ असे कधी तुम्हाला वाटले आहे का? मग, हे मार्गदर्शन यहोवाकडूनच आले आहे असे समजून ते स्वीकारा. कधीकधी, एखादा मित्र आपल्या खांद्यावर थाप मारून एखाद्या गोष्टीकडे आपले लक्ष वेधतो. त्याचप्रमाणे, यहोवा त्याच्या आत्म्याद्वारे तुमच्या आचरणाच्या किंवा व्यक्‍तिमत्त्वाच्या अशा एखाद्या पैलूकडे तुमचे लक्ष वेधू शकतो, ज्यात तुम्हाला—आणि तुमच्यासारख्या इतर अनेकांनाही—सुधारणा करण्याची गरज आहे. देवाचा आत्मा आपल्याला कोणत्या दिशेने नेत आहे हे समजून घेण्यास जागरूक राहण्याद्वारे आपण यहोवाचे मार्गदर्शन स्वीकारतो. (स्तोत्र १३९:२३, २४ वाचा.) तर मग, आपण वैयक्‍तिक अभ्यासाकरता किती वेळ काढतो व त्यासाठी किती परिश्रम घेतो यावर विचार करू या.

१३. वैयक्‍तिक अभ्यासासाठी आपण किती वेळ काढतो व किती मेहनत घेतो याचे परीक्षण करणे महत्त्वाचे का आहे?

१३ मनोरंजनासाठी खूप जास्त वेळ खर्च केल्यास आपल्याला वैयक्‍तिक अभ्यासाकरता वेळ मिळणार नाही. एका बांधवाने म्हटले: “वैयक्‍तिक अभ्यासाकडे अगदी सहज आपलं दुर्लक्ष होऊ शकतं. कारण आज मनोरंजन पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात उपलब्ध आहे आणि सर्वांना परवडण्यासारखं आहे. टीव्ही, कंप्युटर, फोन अशा विविध माध्यमांमुळे आज मनोरंजन सर्वत्र उपलब्ध झालं आहे.” काळजी न घेतल्यास, सखोल वैयक्‍तिक अभ्यासासाठी आपल्याजवळ असणारा वेळ कमी कमी होऊन अगदीच मिळेनासा होऊ शकतो. (इफिस. ५:१५-१७) म्हणूनच, प्रत्येकाने स्वतःला हे प्रश्‍न विचारले पाहिजेत: ‘देवाच्या वचनाचा अभ्यास करताना मी किती वेळा जास्त खोलवर जाऊन त्या माहितीचे परीक्षण करण्याचा प्रयत्न करतो? फक्‍त एखादे भाषण द्यायचे असते किंवा सभेकरता एखाद्या भागाची तयारी करायची असते तेव्हाच मी असे करतो का?’ आपल्या बाबतीत असे घडत असल्यास, कौटुंबिक उपासनेसाठी किंवा वैयक्‍तिक अभ्यासासाठी आपण जी संध्याकाळ राखून ठेवली आहे, तिचा आणखी चांगल्या प्रकारे उपयोग करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. असे केल्यास, तारणाकरता आपले रक्षण करण्यासाठी यहोवाने पुरवलेल्या आध्यात्मिक ज्ञानाचा आपण अधिकाधिक फायदा करून घेऊ शकतो.—नीति. २:१-५.

प्रोत्साहन देऊन सावरतो

१४. यहोवाला आपल्या भावनांची जाणीव आहे हे बायबल कशा प्रकारे दाखवते?

१४ दाविदाने जीवनात कितीतरी दुःखदायक परिस्थितींना तोंड दिले. (१ शमु. ३०:३-६) पण यहोवाला त्याच्या भावनांची जाणीव होती. दाविदाने लिहिलेल्या देवप्रेरित शब्दांवरून हे स्पष्ट होते. (स्तोत्र ३४:१८; ५६:८ वाचा.) आपल्याही भावनांची देवाला जाणीव आहे. जेव्हा आपण “भग्नहृदयी” म्हणजेच हताश व दुःखी असतो तेव्हा यहोवा आपल्या अधिक जवळ असतो. नुसता हा विचारदेखील आपल्याला काही प्रमाणात सांत्वन देऊ शकतो. दाविदालाही या विचाराने सांत्वन मिळाल्याचे त्याने एका स्तोत्रात व्यक्‍त केले: “मी तुझ्या वात्सल्यामुळे उल्लास व हर्ष पावेन; कारण तू माझी दैन्यावस्था पाहिली आहे; माझ्या जिवावरील संकटे तुला अवगत आहेत.” (स्तो. ३१:७) पण यहोवा आपले दुःख नुसतेच पाहत नाही; तर, सांत्वन व प्रोत्साहन देऊन तो आपल्याला दुःखातून सावरतो. एक मार्ग ज्याद्वारे यहोवा असे करतो, तो म्हणजे ख्रिस्ती सभा.

१५. आसाफाच्या अनुभवावरून आपण काय शिकू शकतो?

१५ सभांना उपस्थित राहण्याचा एक फायदा, आसाफ नावाच्या स्तोत्रकर्त्याच्या अनुभवावरून लक्षात येतो. आसाफ त्याच्या सभोवती होत असलेल्या अन्यायांबद्दल विचार करत राहिल्यामुळे, देवाची सेवा करण्यात खरोखरच काही अर्थ आहे का, असा प्रश्‍न त्याच्या मनात आला. तो अगदी हताश झाला. त्याने त्याच्या भावना या शब्दांत व्यक्‍त केल्या: “माझे मन खिन्‍न झाले व माझे अंतर्याम व्यथित झाले.” परिणामस्वरूप, आसाफाने यहोवाची सेवा करण्याचे जवळजवळ थांबवलेच होते. आसाफाला पुन्हा योग्य प्रकारे विचार करण्यास कशामुळे साहाय्य मिळाले? तो सांगतो: “मी देवाच्या पवित्रस्थानात गेलो.” तेथे, यहोवाच्या इतर उपासकांच्या सहवासात त्याला आपला दृष्टिकोन सुधारण्यास मदत मिळाली. दुष्ट लोकांचे यश हे तात्पुरते आहे आणि योग्य वेळ आल्यावर यहोवा सर्व अन्याय दूर करेल याची त्याला जाणीव झाली. (स्तो. ७३:२, १३-२२) आपलीही परिस्थिती आसाफासारखीच आहे. सैतानाच्या जगातील अन्यायांना तोंड देता देता आपण कधीकधी थकून जातो. पण, आपल्या बांधवांशी सहवास राखल्यामुळे आपल्याला नव्याने उत्साह मिळतो आणि आनंदाने यहोवाची सेवा करत राहण्याची प्रेरणा मिळते.

१६. हन्‍नाच्या उदाहरणावरून आपल्याला काय शिकायला मिळते?

१६ पण, मंडळीतील विशिष्ट परिस्थितीमुळे जर तुम्हाला सभांना उपस्थित राहणे कठीण वाटत असेल तर काय? कदाचित तुम्हाला देवाच्या सेवेतील एखादा विशेषाधिकार सोडावा लागला असेल आणि त्यामुळे तुम्हाला बांधवांमध्ये जायला लाज वाटत असेल. किंवा, एखाद्या भावासोबत किंवा बहिणीसोबत तुमचा काहीतरी मतभेद झाला असेल. असे असल्यास, तुम्हाला हन्‍नाच्या उदाहरणातून प्रोत्साहन मिळू शकते. (१ शमुवेल १:४-८ वाचा.) तुम्हाला आठवत असेल, की हन्‍ना व तिची सवत पनिन्‍ना यांच्यातील कौटुंबिक समस्यांमुळे हन्‍ना अतिशय दुःखी होती. शिवाय, दरवर्षी त्यांचे कुटुंब शिलो येथे यहोवाला बलिदाने अर्पण करायला जायचे तेव्हा तर हन्‍नाची समस्या आणखीनच बिकट व्हायची. हन्‍नाला इतके दुःख व्हायचे की “ती रडे व काही खात नसे.” पण तरीसुद्धा, यहोवाच्या उपासनेत सहभागी होण्याचे हन्‍नाने बंद केले नाही. यहोवाने तिच्या विश्‍वासूपणाची दखल घेतली आणि तिला आशीर्वादित केले.—१ शमु. १:११, २०.

१७, १८. (क) मंडळीच्या सभांमधून आपल्याला कशा प्रकारे प्रोत्साहन मिळते? (ख) आपल्याला तारण प्राप्त व्हावे म्हणून यहोवा प्रेमळपणे आपले रक्षण करतो याबद्दल तुम्हाला कसे वाटते?

१७ आज ख्रिश्‍चनांनी नेमाने सभांना उपस्थित राहण्याच्या बाबतीत हन्‍नाच्या उदाहरणाचे पालन केले पाहिजे. सभांमधून आपल्याला आवश्‍यक असलेले प्रोत्साहन मिळते हे आपण सर्वांनीच अनुभवलेले आहे. (इब्री १०:२४, २५) ख्रिस्ती बांधवांच्या प्रेमळ सहवासातून आपल्याला सांत्वन मिळते. एखाद्या भाषणातील अथवा एखाद्याने दिलेल्या उत्तरातील साध्याशा वाक्यामुळे आपल्या मनाला दिलासा मिळू शकतो. सभेच्या आधी व नंतर बांधवांशी संभाषण करताना एखादा भाऊ किंवा बहीण आपले बोलणे लक्षपूर्वक ऐकून घेते किंवा प्रेमाचे दोन शब्द बोलून आपले सांत्वन करते. (नीति. १५:२३; १७:१७) आपण गीत गाऊन यहोवाचे स्तवन करतो तेव्हा आपले मनोबल वाढते. विशेषतः जेव्हा आपले मन “अनेक चिंतांनी व्यग्र” असते, तेव्हा सभांमधून मिळणाऱ्‍या प्रोत्साहनाची आपल्याला अधिकच गरज असते. सभांमध्ये यहोवापासून लाभणारे “सांत्वन” आपल्याला दुःखातून सावरते आणि देवाला विश्‍वासू राहण्याचा आपला निर्धार पूर्ण करण्यास आपले साहाय्य करते.—स्तो. ९४:१८, १९.

१८ यहोवाच्या प्रेमळ पंखांच्या सावलीत आपल्याला अगदी सुरक्षित वाटते. आपल्या भावनाही स्तोत्रकर्त्या आसाफासारख्याच आहेत, ज्याने यहोवाला म्हटले: “तू माझा उजवा हात धरिला आहे. तू बोध करून मला मार्ग दाखविशील.” (स्तो. ७३:२३, २४) आपल्याला तारण प्राप्त व्हावे म्हणून यहोवा आपले रक्षण करतो याबद्दल आपण त्याचे किती कृतज्ञ आहोत!

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२८ पानांवरील चित्र]

तुम्हालाही यहोवाने आकर्षित केले आहे

[३० पानांवरील चित्र]

देवाच्या सल्ल्याचे पालन केल्याने आपले रक्षण होते

[३१ पानांवरील चित्र]

प्रोत्साहन मिळाल्यामुळे आपल्याला दुःखातून सावरण्यास मदत मिळते