व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाने दिलेल्या विवाहाच्या देणगीची तुम्ही मनापासून कदर करता का?

देवाने दिलेल्या विवाहाच्या देणगीची तुम्ही मनापासून कदर करता का?

देवाने दिलेल्या विवाहाच्या देणगीची तुम्ही मनापासून कदर करता का?

“परमेश्‍वर करो आणि तुम्हास पतीगृह प्राप्त होऊन विसावा मिळो.”—रूथ १:९.

या प्रश्‍नांची उत्तरे शोधा:

देवाच्या गतकाळातील सेवकांनी त्याने दिलेल्या विवाहाच्या देणगीची कदर केली असे आपण का म्हणू शकतो?

विवाह जोडीदार निवडताना आपण योग्य निर्णय घ्यावा असे यहोवाला वाटते हे आपण कशावरून म्हणू शकतो?

विवाहासंबंधी बायबलचा कोणता सल्ला तुम्ही तुमच्या जीवनात लागू करण्याचे ठरवले आहे?

१. पत्नी मिळाल्यावर आदामाची प्रतिक्रिया काय होती त्याचे वर्णन करा.

 “ही मात्र माझ्या हाडांतले हाड व मांसातले मांस आहे, हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनविली आहे.” (उत्प. २:२३) पत्नी मिळाल्यामुळे पहिला पुरुष आदाम किती खूश झाला होता! म्हणूनच त्याने आपल्या भावना अशा रीतीने काव्य रूपात व्यक्‍त केल्या. यहोवाने आदामाला गाढ झोपवले आणि त्याच्या एका फासळीपासून एक सुंदर स्त्री बनवली. आदामाने तिचे नाव हव्वा ठेवले. देवाने या दोघांना लग्नाच्या बंधनात एकत्र जोडले. यहोवाने स्त्रीची रचना आदामाच्या फासळीपासून केली होती, त्यामुळे आजच्या कोणत्याही पती पत्नीच्या तुलनेत आदाम व हव्वेचे नाते जास्त जवळचे होते.

२. स्त्री-पुरुष एकमेकांकडे आकर्षित का होतात?

यहोवाच्या अतुलनीय बुद्धीमुळे त्याने मानवांना प्रणयभावना अनुभवण्याची क्षमता दिली, जिच्यामुळे स्त्री-पुरुष एकमेकांकडे आकर्षित होतात. द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपीडिया असे म्हणतो: “स्त्री-पुरुष विवाह करतात तेव्हा ते या नात्यातून लैंगिक तृप्ती मिळण्याची व एकमेकांप्रती असलेले आकर्षण नेहमी टिकून राहण्याची अपेक्षा करतात.” यहोवाच्या लोकांबद्दलही हे खरे आहे.

विवाहाच्या देणगीबद्दल त्यांनी कृतज्ञता दाखवली

३. इसहाकासाठी पत्नी शोधण्याकरता अब्राहामाने काय केले?

विश्‍वासू अब्राहामाला विवाह व्यवस्थेबद्दल गाढ आदर होता. म्हणूनच त्याने इसहाकासाठी पत्नी शोधण्याकरता त्याच्या सर्वात जुन्या सेवकाला मेसोपोटेमियास पाठवले. या सेवकाने केलेल्या प्रार्थनेमुळे चांगले परिणाम घडून आले. देवभीरू रिबका इसहाकाची प्रिय पत्नी बनली आणि अब्राहामाचा वंश टिकवून ठेवण्याच्या यहोवाच्या व्यवस्थेत तिने एक भूमिका बजावली. (उत्प. २२:१८; २४:१२-१४, ६७) पण यावरून आपण असा निष्कर्ष काढू नये की एक व्यक्‍ती स्वतःहूनच मुला-मुलींच्या जोड्या लावायचे काम करू शकते, मग तिचे हेतू कितीही चांगले असोत. आजच्या काळात बहुतेक जण विवाहसोबत्याची निवड स्वतःच करतात. अर्थात बरेच जण मानतात त्याप्रमाणे लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जात नाहीत. पण, आपण जर देवाच्या मार्गदर्शनासाठी प्रार्थना केली आणि त्याच्या आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चाललो तर तो जीवनातील या आणि अशा इतर पैलूंतही योग्य निर्णय घेण्यास आपले साहाय्य करेल.—गलती. ५:१८, २५.

४, ५. शुलेमकरणीचे व मेंढपाळाचे एकमेकांवर प्रेम होते असे तुम्हाला का वाटते?

प्राचीन इस्राएलच्या एका सुंदर शुलेमकरणीच्या मैत्रिणी, शलमोन राजाच्या पुष्कळ पत्नींपैकी एक होण्याची तिच्यावर जबरदस्ती करत होत्या. पण तिची इच्छा नव्हती. तिने म्हटले: “यरुशलेमच्या स्त्रियांनो, मला वचन द्या. माझी तयारी होईपर्यंत प्रेमाला जागवू नका, चेतवू नका.” (गीत. ८:४, ईझी-टू-रीड व्हर्शन) शुलेमकरणीचे आणि एका मेंढपाळाचे एकमेकांवर प्रेम होते. तिने सर्वसाधारण फुलांशी स्वतःची तुलना करत नम्रपणे म्हटले: “मी शारोनाचे कुंकुमपुष्प आहे; मी खोऱ्‍यातले भुईकमळ आहे.” पण मेंढपाळाने म्हटले: “काटेरी झुडुपांमध्ये जसे भुईकमळ, तशी इतर युवतींमध्ये माझी सखी आहे.” (गीत. २:१, २) त्यांचे एकमेकांवर खरोखरच प्रेम होते.

शुलेमकरीण व मेंढपाळ यांचे मुळात देवावर प्रेम असल्यामुळे त्यांचे विवाहबंधन नक्कीच अतिशय मजबूत बनले असते. तिने आपल्या प्रिय मेंढपाळाला म्हटले: “आपल्या हृदयाशी मला मुद्रेप्रमाणे ठेव, मुद्रेप्रमाणे मला आपल्या बाहूंवर ठेव; कारण प्रेम मृत्यूसारखे प्रबळ आहे; प्रेमसंशय अधोलोकासारखा निष्ठुर आहे; त्याची ज्वाला अग्निज्वालेसारखी किंबहुना परमेशाने प्रदीप्त केलेला तो अग्नीच आहे. असले प्रेम महाजलांच्यानेही विझवणार नाही; महापुरांनाही ते बुडवून टाकिता येणार नाही; मनुष्याने प्रेमासाठी आपल्या घरची सगळी संपत्ती दिली तरी ती त्यापुढे तुच्छ होय.” (गीत. ८:६, ७) लग्नाचा विचार करत असताना यहोवाच्या सेवकांनीही आपल्या विवाहसोबत्याकडून इतक्याच उत्कट प्रेमाची व अशाच वचनबद्धतेची अपेक्षा करू नये का?

देवाला महत्त्वाची वाटणारी निवड

६, ७. विवाह जोडीदार निवडताना आपण योग्य निर्णय घ्यावा असे यहोवाला वाटते हे आपण कशावरून म्हणू शकतो?

विवाह जोडीदार निवडताना तुम्ही योग्य निर्णय घ्यावा असे यहोवाला वाटते. या संदर्भात, कनानच्या रहिवाशांविषयी इस्राएली लोकांना अशी आज्ञा देण्यात आली होती: “त्यांच्याशी सोयरीक करू नको; आपली मुलगी त्यांच्या मुलाला देऊ नको व त्यांची मुलगी आपल्या मुलाला करू नको; कारण ते लोक तुझ्या मुलाला माझ्यापासून बहकवितील आणि अन्य देवांची सेवा करावयाला लावितील; त्यामुळे तुमच्यावर परमेश्‍वराचा कोप भडकेल व तो तात्काळ तुमचा नाश करील.” (अनु. ७:३, ४) अनेक शतकांनंतर एज्रा याजकाने असे म्हटले: “तुम्ही आज्ञेचे उल्लंघन करून अन्य जातीच्या स्त्रियांशी विवाह केल्यामुळे इस्राएलाच्या अपराधांत भर घातली.” (एज्रा १०:१०) आणि प्रेषित पौलाने सहविश्‍वासू बांधवांना सांगितले: “पती जिवंत आहे तोपर्यंत पत्नी बांधलेली आहे; पती मेल्यावर तिची इच्छा असेल त्याच्याबरोबर, पण केवळ प्रभूमध्ये, लग्न करावयाला ती मोकळी आहे.”—१ करिंथ. ७:३९.

यहोवाच्या एका समर्पित सेवकाने सत्यात नसलेल्या व्यक्‍तीशी लग्न केल्यास हे देवाची आज्ञा मोडणारे कृत्य ठरेल. एज्राच्या काळातील इस्राएली लोक “अन्य जातीच्या स्त्रियांशी विवाह” करून अविश्‍वासूपणे वागले. आजही, पवित्र शास्त्रातील सुस्पष्ट विधानांना क्षुल्लक लेखणे चुकीचे ठरेल. (एज्रा १०:१०; २ करिंथ. ६:१४, १५) जी ख्रिस्ती व्यक्‍ती सत्यात नसलेल्या व्यक्‍तीशी लग्न करते तिचे आचरण नक्कीच अनुकरणीय नाही आणि ती देवाने दिलेल्या विवाहाच्या देणगीबद्दल खरा आदर दाखवत नाही. बाप्तिस्मा झालेल्या ख्रिश्‍चनाने सत्यात नसलेल्या व्यक्‍तीशी लग्न केले तर तो मंडळीत असलेल्या त्याच्या जबाबदाऱ्‍या गमावू शकतो. आणि अशा ख्रिश्‍चनाने यहोवाकडून आशीर्वादाची अपेक्षा करणे अगदीच निरर्थक ठरेल. कारण तो जणू यहोवाजवळ असे कबूल करत असेल: ‘यहोवा, मी जाणूनबुजून तुझी आज्ञा मोडली आहे. पण तरीही तू मला आशीर्वाद दे.’

सर्वात उत्तम मार्गदर्शन

८. विवाहासंबंधी देवाने दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन आपण का केले पाहिजे हे स्पष्ट करा.

यंत्र बनवणाऱ्‍या व्यक्‍तीला ते यंत्र कसे चालते हे चांगल्या प्रकारे माहीत असते. जर सुटे भाग जोडून हे यंत्र बनवायचे असेल, तर त्याविषयीची आवश्‍यक माहिती हीच व्यक्‍ती देऊ शकते. पण आपण जर तिच्या सूचनांकडे लक्ष न देता आपल्याच पद्धतीने ते भाग जोडण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? कदाचित ते यंत्र कामच करणार नाही, आणि केले तरी त्यामुळे कदाचित विनाशकारक परिणाम घडून येतील. त्याच प्रकारे, तुमचे विवाहबंधन आनंदी असावे असे तुम्हाला वाटत असेल तर विवाह व्यवस्थेची स्थापना करणाऱ्‍या यहोवा देवाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.

९. एकाकीपणाच्या भावनांची तसेच विवाहबंधनातून मिळणाऱ्‍या आनंदाचीही यहोवाला जाणीव आहे हे आपण कशावरून म्हणू शकतो?

मानवांबद्दल व वैवाहिक जीवनाबद्दल यहोवाला सर्व काही माहीत आहे. मानवांनी “फलद्रूप, . . . बहुगुणित” व्हावे म्हणून त्यानेच त्यांना लैंगिक क्षमतेसह निर्माण केले. (उत्प. १:२८) एकाकीपणाच्या भावनांची यहोवाला जाणीव आहे कारण पहिल्या स्त्रीची निर्मिती करण्याआधी त्याने म्हटले: “मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप साहाय्यक मी करीन.” (उत्प. २:१८) तसेच, विवाहबंधनातून मिळणाऱ्‍या आनंदाचीही यहोवाला पूर्णपणे जाणीव आहे.नीतिसूत्रे ५:१५-१८ वाचा.

१०. लैंगिक संबंधांच्या संदर्भात ख्रिस्ती जोडप्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत?

१० मानवजातीला आदामापासून मिळालेले पाप व अपरिपूर्णता यांमुळे आजच्या काळातील कोणताही विवाह परिपूर्ण नाही. पण यहोवाच्या सेवकांनी जर देवाच्या वचनाचे पालन केले तर ते त्यांच्या वैवाहिक जीवनात खरा आनंद मिळवू शकतात. उदाहरणार्थ, विवाह जोडीदारांमधील लैंगिक संबंधांविषयी पौलाने दिलेल्या स्पष्ट सल्ल्याचा विचार करा. (१ करिंथकर ७:१-५ वाचा.) विवाहित जोडप्यांनी केवळ मुले होण्यासाठीच जवळीक साधावी असे बायबल सांगत नाही. तर विवाह जोडीदारांतील अशी जवळीक त्यांच्या भावनिक व शारीरिक गरजा योग्य प्रकारे पूर्ण करू शकते. पण, विकृत लैंगिक कृत्ये देवाला मुळीच पसंत नाहीत. तर मग, ख्रिस्ती पती व पत्नीने त्यांच्या सहजीवनाचा हा महत्त्वपूर्ण पैलू नक्कीच अतिशय कोमलतेने हाताळला पाहिजे, जेणेकरून त्यांना एकमेकांप्रती खरे प्रेम व आपुलकी प्रदर्शित करता येईल. आणि यहोवाला आवडणार नाहीत अशी कोणतीही कृत्ये करण्याचे त्यांनी नक्कीच टाळले पाहिजे.

११. यहोवाच्या मार्गदर्शनानुसार कार्य केल्यामुळे रूथला कशा प्रकारे आशीर्वाद लाभले?

११ वैवाहिक जीवन आनंदी असले पाहिजे, दुःखी किंवा त्रासदायक असू नये. खासकरून ख्रिस्ती व्यक्‍तीचे घर हे विसाव्याचे व शांतीचे ठिकाण असले पाहिजे. उदाहरणार्थ, सुमारे ३,००० वर्षांपूर्वी काय घडले त्याचा विचार करू या. वृद्ध विधवा नामी आणि तिच्या विधवा सुना अर्पा व रूथ, मवाब येथून यहूदाला जाण्यास निघाल्या. नामीने त्या तरुण स्त्रियांना आपापल्या लोकांकडे परतण्यास सांगितले. पण, मवाबी रूथ नामीसोबतच राहिली आणि ती खऱ्‍या देवाला विश्‍वासू राहिली. यहोवाच्या पंखांखाली आश्रयास आल्यामुळे तिला यहोवाच्या आशीर्वादाचे आश्‍वासन मिळाले. (रूथ १:९; २:१२) विवाहाच्या देणगीबद्दल मनापासून कदर असल्यामुळे तिने वयस्क बवाज, जो यहोवाचा एक खरा उपासक होता, त्याच्यासोबत लग्न केले. पृथ्वीवरील नवीन जगात तिचे पुनरुत्थान होईल तेव्हा ती येशूची पूर्वज बनली हे समजल्यावर तिला खूप आनंद होईल. (मत्त. १:१, ५, ६; लूक ३:२३, ३२) यहोवाच्या मार्गदर्शनानुसार कार्य केल्याने तिला किती अद्‌भुत आशीर्वाद लाभले!

यशस्वी विवाहाकरता उपयुक्‍त सल्ला

१२. विवाहाविषयीचा उपयुक्‍त सल्ला कोठे मिळू शकतो?

१२ वैवाहिक जीवनात यशस्वी होण्यासाठी आपण काय केले पाहिजे हे विवाहाची रचना करणारा आपल्याला सांगतो. कोणाही मानवाजवळ त्याच्याइतपत ज्ञान नाही. बायबल जे काही सांगते ते नेहमी अचूक असते आणि म्हणून यशस्वी विवाहाकरता उपयुक्‍त सल्ला हा केव्हाही पवित्र शास्त्रात दिलेल्या तत्त्वांवरच आधारित असला पाहिजे. उदाहरणार्थ, प्रेषित पौलाने देवाच्या प्रेरणेने असे लिहिले: “तुम्हापैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी, आणि पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी.” (इफिस. ५:३३) बायबलमधील या सल्ल्यात प्रौढ ख्रिश्‍चनांना समजणार नाही असे काहीही नाही. पण प्रश्‍न हा आहे की यहोवाच्या वचनातून मिळणाऱ्‍या सल्ल्याचे ते पालन करतील का? जर त्यांना विवाहाच्या देणगीबद्दल खरोखरच कदर असेल, तर ते जरूर यहोवाच्या वचनातील सल्ल्याचे पालन करतील. *

१३. पहिले पेत्र ३:७ मधील सल्ला लागू न केल्यास काय परिणाम होऊ शकतो?

१३ ख्रिस्ती पतीने आपल्या पत्नीसोबत प्रेमळपणे व्यवहार केला पाहिजे. प्रेषित पेत्राने लिहिले: “पतींनो, तसेच तुम्हीही आपल्या स्त्रियांबरोबर, त्या अधिक नाजूक व्यक्‍ती आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा; तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे समाईक वतनदार आहा, म्हणून तुम्ही त्यांना मान द्या; म्हणजे तुमच्या प्रार्थनांत व्यत्यय येणार नाही.” (१ पेत्र ३:७) एका पतीने यहोवाच्या सल्ल्याचे पालन केले नाही तर त्याच्या प्रार्थनांत व्यत्यय येऊ शकतो. यामुळे दोघाही सोबत्यांवर आध्यात्मिक रीत्या वाईट परिणाम होऊ शकतो, त्यांच्यातील ताण वाढू शकतो, कुरबुरी होऊ शकतात आणि ते एकमेकांसोबत कठोरतेने वागू शकतात.

१४. एका प्रेमळ पत्नीचा तिच्या कुटुंबावर कोणता प्रभाव पडू शकतो?

१४ यहोवाच्या वचनाचे व त्याच्या पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन स्वीकारणारी पत्नी आपल्या घरात शांतीचे व आनंदाचे वातावरण टिकवून ठेवण्यास बरेच योगदान देऊ शकते. एक देवभीरू पती साहजिकच आपल्या पत्नीवर प्रेम करतो व शारीरिक आणि आध्यात्मिक रीत्या तिचे रक्षण करतो. ती मनापासून त्याच्या प्रेमाची अपेक्षा करते. पण, त्याने तिच्यावर प्रेम करावे अशा प्रकारचे गुण तिने दाखवणे गरजेचे आहे. नीतिसूत्रे १४:१ म्हणते की “प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधिते; पण मूर्ख स्त्री आपल्या हातांनी ते पाडून टाकिते.” एका समंजस व प्रेमळ पत्नीचा तिच्या कुटुंबाला समाधानी व आनंदी ठेवण्यात खूप मोठा वाटा असतो. तसेच, अशी स्त्री देवाने दिलेल्या विवाहाच्या देणगीबद्दल मनापासून कदर असल्याचेही दाखवते.

१५. इफिसकर ५:२२-२५ मध्ये कोणता सल्ला दिला आहे?

१५ येशूने मंडळीसोबत केलेल्या व्यवहाराचे अनुकरण करणारे पती-पत्नी, देवाने दिलेल्या विवाहाच्या देणगीबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करतात. (इफिसकर ५:२२-२५ वाचा.) एकमेकांवर खरे प्रेम करणारे पती-पत्नी गर्विष्टपणामुळे, अबोला धरण्याच्या बालिशपणामुळे, किंवा ख्रिस्ती व्यक्‍तींना न शोभणाऱ्‍या इतर कोणत्याही गुणांमुळे आपल्या वैवाहिक जीवनातील आनंदावर विरजण पडू देत नाहीत. अशा जोडप्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक आशीर्वाद लाभतात.

देवाने जे जोडले ते कोणीही तोडू नये

१६. काही ख्रिस्ती अविवाहित का राहतात?

१६ बहुतेक जण जीवनात कधी ना कधी लग्न करण्याचा विचार करतात. तरी, यहोवाचे काही सेवक त्यांना आवडणारा आणि यहोवाच्या दृष्टीनेही योग्य असेल असा सोबती न सापडल्यामुळे अविवाहित राहतात. इतर काही जण स्वेच्छेने अविवाहित राहण्याचे निवडतात, जेणेकरून विवाहाच्या जबाबदाऱ्‍यांमुळे विचलित न होता त्यांना यहोवाच्या सेवेकरता स्वतःस वाहून घेता येईल. अर्थात, अविवाहित राहण्याचा आनंद लुटतानादेखील यहोवाने ठरवलेल्या मर्यादांचे पालन करणे गरजेचे आहे.—मत्त. १९:१०-१२; १ करिंथ. ७:१, ६, ७, १७.

१७. (क) विवाहाविषयीचे येशूचे कोणते शब्द आपण लक्षात ठेवले पाहिजेत? (ख) एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीच्या मनात दुसऱ्‍याच्या विवाहसोबत्याची अभिलाषा उत्पन्‍न झाली, तर तिने लगेच काय केले पाहिजे?

१७ तर मग, आपण अविवाहित असो अथवा विवाहित, आपण सर्वांनी येशूचे हे शब्द लक्षात ठेवले पाहिजेत: “तुम्ही वाचले नाही काय की, उत्पन्‍नकर्त्याने [देवाने] सुरुवातीलाच नरनारी अशी ती निर्माण केली, व म्हटले, ह्‍याकरिता पुरुष आईबापास सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील? ह्‍यामुळे ती पुढे दोन नव्हत तर एकदेह अशी आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.” (मत्त. १९:४-६) दुसऱ्‍याच्या विवाहसोबत्याची अभिलाषा धरणे हे पाप आहे. (अनु. ५:२१) एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीने आपल्या मनात अशा अभिलाषेला थारा दिला असल्यास, तिने या अशुद्ध इच्छेला मनातून काढून टाकण्यासाठी लवकरात लवकर पाऊल उचलले पाहिजे. आपल्या मनात अशा भावना उत्पन्‍न होऊ दिल्यामुळे त्या काढून टाकताना कदाचित एका व्यक्‍तीला बराच मानसिक त्रास होऊ शकतो, पण तरीसुद्धा तिने हे पाऊल उचलले पाहिजे. (मत्त. ५:२७-३०) अशा अयोग्य विचारसरणीला दुरुस्त करणे व आपल्या कपटी हृदयाच्या पापपूर्ण इच्छांवर ताबा मिळवणे खूप गरजेचे आहे.—यिर्म. १७:९.

१८. देवाने दिलेल्या विवाहाच्या देणगीबद्दल आपण कोणता दृष्टिकोन बाळगला पाहिजे?

१८ ज्यांना यहोवा देवाविषयी व त्याने दिलेल्या विवाहाच्या मौल्यवान देणगीविषयी फार कमी किंवा काहीच माहीत नाही अशांपैकीही अनेकांनी विवाहबंधनाप्रती काही प्रमाणात कृतज्ञता दाखवली आहे. तर मग, आपल्या आनंदी देवाचे म्हणजेच यहोवाचे समर्पित सेवक या नात्याने आपण त्याने दिलेल्या सर्व तरतुदींविषयी किती आनंद व्यक्‍त केला पाहिजे; आणि त्याने दिलेल्या विवाहाच्या देणगीची मनापासून कदर करत असल्याचा किती जास्त प्रमाणात पुरावा दिला पाहिजे!—१ तीम. १:११.

[तळटीप]

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[६ पानांवरील संक्षिप्त आशय]

यशस्वी विवाहामुळे यहोवाचा गौरव होतो आणि यामुळे कुटुंबातील सर्वांना खूप आनंद प्राप्त होऊ शकतो

[५ पानांवरील चित्र]

देवाने दिलेल्या विवाहाच्या देणगीबद्दल रूथने कृतज्ञता व्यक्‍त केली

[७ पानांवरील चित्र]

यहोवाने दिलेल्या विवाहाच्या देणगीची मनापासून कदर करत असल्याचे तुम्ही दाखवता का?