व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आमच्या पवित्र सेवेनं आम्हाला शिकवलेलं “रहस्य”

आमच्या पवित्र सेवेनं आम्हाला शिकवलेलं “रहस्य”

जीवन कथा

आमच्या पवित्र सेवेनं आम्हाला शिकवलेलं “रहस्य”

ओलीवियर रान्ड्रियामोरा यांच्याद्वारे कथित

“दैन्यावस्थेत राहणे मला समजते, संपन्‍नतेतही राहणे समजते; हरएक प्रसंगी अन्‍नतृप्त असणे व क्षुधित असणे, . . . ह्‍यांचे रहस्य मला शिकविण्यात आले आहे. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्‍तिमान आहे.”—फिलिप्पै. ४:१२, १३.

प्रेषित पौलाच्या या शब्दांनी मला व माझी पत्नी ऊली हिला नेहमीच खूप प्रोत्साहन दिलं आहे. इथं मादागास्करमध्ये यहोवाची सेवा करत असताना, पौलाप्रमाणेच आम्हालाही यहोवावर पूर्णपणे विसंबून राहण्याचं “रहस्य” शिकायला मिळालं आहे.

१९८२ साली यहोवाच्या साक्षीदारांनी ऊलीच्या आईसोबत बायबल अभ्यास सुरू केला, तेव्हा ऊलीशी माझी मागणी झाली होती. मीसुद्धा बायबल अभ्यास करण्याची तयारी दाखवली आणि काही काळानं ऊलीही बायबल अभ्यासाला बसू लागली. १९८३ साली आमचं लग्न झालं आणि १९८५ साली आम्ही बाप्तिस्मा घेतला. त्यानंतर लगेचच आम्ही साहाय्यक पायनियर सेवा सुरू केली. १९८६ च्या जुलै महिन्यात आम्ही सामान्य पायनियर बनलो.

१९८७ सालच्या सप्टेंबर महिन्यात आम्ही खास पायनियर म्हणून सेवा करू लागलो. आमची सर्वात पहिली नेमणूक मादागास्करच्या उत्तर-पश्‍चिम भागात असलेल्या एका लहानशा गावात होती. तिथं एकही मंडळी नव्हती. मादागास्करमध्ये वेगवेगळ्या रितीभाती व परंपरा जोपासणारे जवळजवळ १८ मुख्य वांशिक समूह आणि असंख्य जमाती आहेत. मलागासी ही अधिकृत भाषा आहे, पण अनेक पोटभाषादेखील इथं बोलल्या जातात. त्यामुळं, नवीन नेमणूक मिळताच आम्ही तिथं बोलली जाणारी पोटभाषा शिकून घेण्यास सुरुवात केली. आणि यामुळं इथल्या लोकांमध्ये मिसळणं आम्हाला जास्त सोपं गेलं.

सुरुवातीला मी दर रविवारी जाहीर भाषण द्यायचो आणि भाषण संपल्यावर ऊली प्रामाणिकपणे टाळ्या वाजवायची. सभेला आम्ही दोघंच असायचो. ईश्‍वरशासित सेवा प्रशालेचाही संपूर्ण कार्यक्रम आम्ही सादर करायचो. प्रात्यक्षिकाच्या रूपात भाषण सादर करताना ऊली एका काल्पनिक घरमालकाशी चर्चा करायची. पण विभागीय पर्यवेक्षकांनी आम्हाला भेट दिली तेव्हा आम्ही अशा प्रकारे सभेचे भाग सादर न करता वेगळ्या पद्धतीनं सभा चालवू शकतो असं त्यांनी सुचवलं तेव्हा आम्हाला खूप हायसं वाटलं!

टपाल सेवा तितकी भरवशालायक नसल्यामुळं आमचा मासिक भत्ता आम्हाला नियमितपणे सहसा वेळेवर मिळत नसे. यामुळं आम्ही काटकसरीनं राहायला शिकलो. एकदा सुमारे १३० किमी अंतरावर असलेल्या ठिकाणी विभागीय संमेलन होतं. पण तिथं जायला आमच्याजवळ बसचं भाडं भरण्याइतके पैसे नव्हते. तेव्हा आम्हाला एका बांधवानं दिलेला हा सल्ला आठवला: “आपल्या समस्यांविषयी यहोवाला सांगा. शेवटी तुम्ही त्याचंच काम करत आहात.” म्हणून आम्ही प्रार्थना केली आणि पायीच जायचं ठरवलं. पण, आम्ही निघणार इतक्यात एक बांधव अचानक आमच्या घरी आले आणि त्यांनी आम्हाला भेट म्हणून काही पैसे दिले. ते पैसे बरोबर बसच्या भाड्याइतकेच होते!

विभागीय कार्य

१९९१ च्या फेब्रुवारीत मला विभागीय पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलं. एव्हाना आमच्या लहानशा गटात ९ प्रचारक होते. त्यांपैकी तिघांचा बाप्तिस्माही झाला होता आणि सभेला सहसा ५० लोक उपस्थित राहायचे. विभागीय कार्याचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर आम्ही एंटनेनरीवो या राजधानी शहरात विभागीय सेवा करू लागलो. १९९३ मध्ये आम्हाला देशाच्या पूर्वेकडील एका विभागात नेमण्यात आलं. या भागातलं राहणीमान व परिस्थिती शहरी भागापेक्षा अगदीच वेगळी होती.

मंडळ्यांपर्यंत आणि दूरच्या क्षेत्रांतील लहान गटांपर्यंत पोचण्यासाठी आम्ही पायीच प्रवास करायचो. कधीकधी आम्हाला डोंगरांतील दाट जंगलातून १४५ किमी चालावं लागायचं. त्यामुळं, आम्ही अगदीच आवश्‍यक असेल तेवढंच सामान सोबत न्यायचो. त्या काळात कधीकधी विभागीय पर्यवेक्षकाच्या जाहीर भाषणात सरकचित्रं दाखवली जायची. अशा वेळी, अर्थातच आम्हाला जास्त ओझं वाहून न्यावं लागायचं. ऊली सरकचित्रं दाखवण्याचं यंत्र, तर मी १२ व्होल्टची वजनदार कार बॅटरी घेऊन चालायचो.

पुढच्या मंडळीपर्यंत पोचण्यासाठी सहसा आम्ही दिवसाला जवळजवळ ४० किलोमीटरचं अंतर पार करायचो. आम्हाला कधी डोंगरांतील उतार-चढावांचे कच्चे रस्ते व नद्या पार कराव्या लागायच्या, तर कधी चिखलातून चालावं लागायचं. कधीकधी आम्ही रस्त्याच्या कडेलाच झोपायचो. पण, सहसा आम्ही संध्याकाळपर्यंत एखाद्या खेड्यात पोचायचा प्रयत्न करायचो. तिथं आम्ही रात्री मुक्कामासाठी एखादं ठिकाण शोधायचो. केव्हा केव्हा तर आम्ही अगदी अनोळखी लोकांना रात्री त्यांच्याकडे मुक्काम करू देण्याची विनंती करायचो. मुक्कामाची व्यवस्था झाल्यावर आम्ही स्वयंपाकाच्या तयारीला लागायचो. ऊली स्वयंपाकासाठी कुठूनतरी एखादं भांडं मागून आणायची आणि मग जवळच्याच एखाद्या नदीवर किंवा तलावावर जाऊन पाणी आणायची. तोपर्यंत मी कोणालातरी कुऱ्‍हाड मागून स्वयंपाकासाठी लाकूड तोडायचो. सर्व गोष्टींसाठी वेळ लागायचा. अधूनमधून आम्ही कोंबडी विकत आणायचो. मग ती कापून स्वच्छ करावी लागायची.

जेवणानंतर, अंघोळीसाठी आणखी पाणी आणावं लागायचं. कधीकधी आम्ही स्वयंपाकघरात झोपायचो. पावसाच्या दिवसांत, गळक्या छतापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी केव्हा केव्हा आम्हाला भिंतीला टेकून झोपावं लागायचं.

वाटेत आम्ही ज्या ज्या लोकांकडे थांबायचो त्यांना साक्ष जरूर द्यायचो. प्रवास करून एखाद्या मंडळीपर्यंत पोचल्यावर, ख्रिस्ती बंधुभगिनी आम्हाला इतका दयाळूपणा व आदरसत्कार दाखवायचे की आम्ही हरखून जायचो. आमच्या भेटीबद्दल त्यांना किती मनापासून कदर वाटते हे पाहिल्यावर प्रवासात आलेल्या सर्व अडचणी आम्ही विसरून जायचो.

बांधवांच्या घरी राहताना, त्यांना घरकामांत मदत करायला आम्हाला आनंद वाटायचा. यामुळं त्यांनाही आमच्यासोबत सेवाकार्याला येणं शक्य व्हायचं. बांधवांना परवडणार नाहीत अशा सुखसोयींची किंवा खास प्रकारच्या खाद्य पदार्थांची आम्ही कधीही अपेक्षा केली नाही.

दूरदूरच्या भागांतील गटांना भेटी

दूरदूरच्या भागांत असलेल्या लहान गटांना भेटी द्यायला आम्हाला आनंद वाटायचा. बांधव आमचं स्वागत करताच पुढच्या दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमाची आम्हाला कल्पना द्यायचे. “थोडा विसावा” घेण्याचीही आम्हाला सवड मिळत नसे. (मार्क ६:३१) एकदा एका साक्षीदार जोडप्यानं आपल्या सर्वच्या सर्व—४० बायबल विद्यार्थ्यांना आपल्या घरी बोलावलं होतं. आम्ही त्यांच्यासोबत त्या सर्वांच्या बायबल अभ्यासाला बसावं अशी त्यांची इच्छा होती. ऊली बहिणीसोबत तिच्या वीसेक अभ्यासांना बसली, तर मी बांधवाच्या २० अभ्यासांत सहभागी झालो. एक विद्यार्थी गेला की लगेच पुढचा अभ्यास सुरू व्हायचा. नंतर आम्ही मंडळीच्या सभांसाठी काही वेळ बायबल अभ्यास थांबवला. सभा झाल्यानंतर पुन्हा बायबल अभ्यासांना सुरुवात केली. कधीकधी रात्री आठपर्यंत आम्ही व्यस्त असायचो!

दुसऱ्‍या एका गटाला भेट देत असताना, आम्ही सर्व जण सकाळी आठच्या सुमारास जवळच्या खेड्यात जायला पायी निघालो. सर्वांनी जुने कपडे घातलेले होते. जंगलातून बराच वेळ चालत गेल्यानंतर दुपारच्या सुमारास आम्ही आमच्या क्षेत्रात पोचलो. मग लगेच स्वच्छ कपडे घालून आम्ही घरोघरचं प्रचार कार्य सुरू केलं. खेड्यात घरं मोजकीच होती पण प्रचारक मात्र भरपूर होते. त्यामुळं संपूर्ण क्षेत्र जवळजवळ ३० मिनिटांत पूर्ण झालं. मग आम्ही पुढच्या खेड्यात गेलो. तिथं प्रचार केल्यावर आम्हाला पुन्हा इतका लांबचा प्रवास करून घरी परतायचं होतं. आम्ही काहीसं निराश झालो, कारण इतका वेळ व शक्‍ती खर्च केल्यानंतर आम्ही फक्‍त एकच तास घरोघरचं कार्य करू शकलो होतो. पण तिथल्या साक्षीदारांची मात्र काहीही तक्रार नव्हती. ते आनंदी होते.

टवीरानाम्बो इथं एक लहानसा गट एका डोंगरमाथ्याजवळ होता. तिथं आम्ही एकाच खोलीच्या घरात राहत असलेल्या एका साक्षीदार कुटुंबाला भेट दिली. जवळच असलेल्या आणखी एका खोलीत त्यांच्या सभा व्हायच्या. आम्ही ज्यांच्या घरी गेलो होतो तो बांधव अचानक मोठ्यानं “भावांनो!” असं म्हणून हाक मारू लागला. समोरच्या डोंगरमाथ्यावरून कुणीतरी “ओ” असं म्हणून प्रतिसाद दिला. बांधव पुन्हा मोठ्यानं म्हणाला, “सर्किट ओवरसियर आले आहेत!” पुन्हा उत्तर आलं “ठीकंय!” हा निरोप बऱ्‍याच दूरवर राहणाऱ्‍या इतरांपर्यंत अशाच रीतीनं पोचवण्यात आला. काही वेळातच लोक जमा होऊ लागले. सभा सुरू झाली तोपर्यंत १०० पेक्षा जास्त लोक जमा झाले होते.

प्रवासाच्या अडचणी

१९९६ मध्ये आम्हाला एंटनेनरीवोच्या जवळच असलेल्या एका विभागात नेमण्यात आलं. या विभागातही आम्हाला काही समस्यांना तोंड द्यावं लागलं. खेड्यापाड्यांत जाण्यासाठी इथं कोणतंही नियमित सार्वजनिक वाहन नव्हतं. एकदा आम्हाला एंटनेनरीवोपासून २४० किमी अंतरावर असलेल्या बियान्काना (बेसाके) इथं एका गटाला भेट द्यायला जायचं होतं. एक लहानसा ट्रक त्याच दिशेनं जात असल्यामुळं, ड्रायव्हरशी भाड्याविषयी बोलणी केल्यावर आम्ही ट्रकमध्ये चढलो. आमच्याशिवाय ट्रकमध्ये आणि ट्रकच्या छतावर साधारण ३० जण होते. काही जण छतावर झोपलेले तर काही पाठीमागं लटकलेले होते.

नेहमीप्रमाणं, काही वेळानंतर ट्रकमध्ये काहीतरी बिघाड झाला. पुढचा प्रवास आम्ही पायीच सुरू केला. काही तास चालल्यानंतर मागून एक मोठा ट्रक आला. तो आधीच लोकांनी व सामानानं खचाखच भरलेला होता. पण तरीही ड्रायव्हरनं आमच्यासाठी ट्रक थांबवली. ट्रकमध्ये फक्‍त उभं राहण्याची जागा होती, पण तरीही आम्ही चढलो. काही वेळानंतर आम्ही एका पुलाजवळ पोचलो. पण तिथं पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं. पुन्हा एकदा आम्ही पायी निघालो आणि शेवटी एका खेडेगावात पोचलो, जिथं काही खास पायनियर राहत होते. या ठिकाणी विभागीय भेट द्यायचं ठरलं नव्हतं. तरीपण, पुलाची दुरुस्ती होईपर्यंत आणि पुढच्या प्रवासासाठी दुसरं वाहन मिळेपर्यंत आम्ही त्या खास पायनियरांसोबत प्रचार कार्य केलं.

एका आठवड्यानंतर एक गाडी आली आणि आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे होते. आम्हाला पुन्हापुन्हा खाली, गुडघ्यापर्यंत असलेल्या पाण्यात उतरून गाडीला धक्का मारावा लागायचा. बरेचदा आम्ही ठेच लागून खाली पडायचो. पहाटेच्या सुमारास आम्ही एका लहानशा खेड्यात पोचलो. तिथं उतरल्यानंतर आम्ही मुख्य रस्ता सोडून कच्च्या रस्त्यानं चालू लागलो. भातशेतांतून, कमरेपर्यंत असलेल्या गढूळ पाण्यातून चालत आम्ही पुढचा प्रवास पूर्ण केला.

या भागात ही आमची पहिलीच भेट होती. त्यामुळं भातशेतांत काम करत असलेल्या लोकांना साक्ष द्यावी आणि त्यांच्याजवळ तिथल्या साक्षीदारांविषयी विचारपूस करावी असं आम्ही ठरवलं. पण, ज्यांच्याशी आम्ही बोलायला गेलो ते आपले बांधवच आहेत हे समजलं तेव्हा आम्हाला किती आनंद झाला!

पूर्ण-वेळेची सेवा सुरू करण्याचं इतरांनाही प्रोत्साहन

आतापर्यंत आम्ही अनेकांना पूर्ण-वेळेची सेवा सुरू करण्याचं प्रोत्साहन दिलं आहे आणि यामुळं झालेले परिणाम पाहून आम्हाला खूप आनंद वाटतो. एका मंडळीत नऊ सामान्य पायनियर होते. या मंडळीला भेट देताना आम्ही प्रत्येक पायनियरला प्रोत्साहन दिलं की त्यांनी निदान एका प्रचारकाला पायनियर सेवा सुरू करायला साहाय्य करण्याचं ध्येय ठेवावं. सहा महिन्यांनंतर जेव्हा आम्ही या मंडळीला पुन्हा भेट दिली तेव्हा तिथं तब्बल २२ सामान्य पायनियर झाले होते. दोन पायनियर बहिणींनी आपल्या वडिलांना सामान्य पायनियर सेवा सुरू करण्याचं प्रोत्साहन दिलं. हे दोघेही बांधव मंडळीत वडील म्हणून सेवा करत होते. त्यांनी मंडळीतल्या आणखी एका वडिलाला आपल्यासोबत सामान्य पायनियर सेवेत सहभागी होण्याची प्रेरणा दिली. काही काळातच या तिसऱ्‍या वडिलाला खास पायनियर म्हणून नेमण्यात आलं. नंतर त्यानं आपल्या पत्नीसोबत विभागीय कार्य करण्यास सुरुवात केली. दुसऱ्‍या दोन वडिलांचं पुढं काय झालं? त्यांपैकी एक वडील विभागीय पर्यवेक्षक तर दुसरे राज्य सभागृह बांधकाम स्वयंसेवक म्हणून सेवा करत आहेत.

यहोवाच्या मदतीशिवाय आम्ही काहीही साध्य करू शकत नाही याची आम्हाला जाणीव आहे आणि त्यामुळं आम्ही दररोज त्याच्या साहाय्याबद्दल त्याचे आभार मानतो. हे खरं आहे की कधीकधी आम्ही थकतो किंवा आजारी पडतो. पण, जेव्हा आमच्या सेवेमुळं घडून येणाऱ्‍या चांगल्या परिणामांचा आम्ही विचार करतो तेव्हा आम्हाला खूप समाधान वाटतं. यहोवा त्याच्या कार्यात प्रगती घडवून आणत आहे. आणि सध्या खास पायनियर या नात्यानं यहोवाच्या या कार्यात लहानसं योगदान देण्याची सुसंधी मिळाल्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत. यहोवाच आम्हाला त्याची सेवा करण्याचं “सामर्थ्य देतो.” खरोखरच, आमच्या सेवेनं आम्हाला त्याच्यावर विसंबून राहण्याचं “रहस्य” शिकवलं आहे.

[६ पानांवरील संक्षिप्त आशय]

आमच्या सेवेनं आम्हाला यहोवावर विसंबून राहण्याचं “रहस्य” शिकवलं आहे

[४ पानांवरील नकाशा/चित्रे]

मादागास्करला बिग रेड आयलंड (तांबड्या मातीचे बेट) असंही म्हणतात आणि हे जगातील चौथ्या क्रमांकाचं मोठं बेट आहे. इथली माती तांबडी आहे व अनेक दुर्मिळ जातीच्या वनस्पती व प्राणी इथं आढळतात

[५ पानांवरील चित्र]

सर्वात मोठी अडचण प्रवासाची होती

[५ पानांवरील चित्रे]

बायबल अभ्यास चालवण्यात आनंदानं सहभागी होताना