व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या सेवेला प्राधान्य का दिले पाहिजे?

यहोवाच्या सेवेला प्राधान्य का दिले पाहिजे?

यहोवाच्या सेवेला प्राधान्य का दिले पाहिजे?

“माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे आणि तू सिद्ध केलेल्या तारणाच्या कृत्यांचे दिवसभर वर्णन करील.”—स्तो. ७१:१५.

तुमचे उत्तर काय असेल?

नोहा, मोशे, यिर्मया आणि पौल यांच्या जीवनक्रमावर कोणत्या गोष्टींचा प्रभाव पडला?

तुम्ही आपल्या जीवनाचा उपयोग कसा कराल हे कोणत्या गोष्टीच्या परीक्षणावरून ठरेल?

यहोवाच्या सेवेला जीवनात पहिले स्थान देण्याचे तुम्ही का ठरवले आहे?

१, २. (क) एक व्यक्‍ती यहोवाला आपले जीवन समर्पित करते तेव्हा काय सूचित होते? (ख) नोहा, मोशे, यिर्मया आणि पौल यांनी घेतलेल्या निर्णयांचे परीक्षण केल्यास आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?

 तुम्ही आपले जीवन समर्पित करून येशूचे बाप्तिस्माप्राप्त अनुयायी बनता तेव्हा तुम्ही एक अतिशय गंभीर पाऊल उचलता. एक व्यक्‍ती या नात्याने देवाला आपले जीवन समर्पित करणे हा तुम्ही घेतलेला सर्वात गंभीर निर्णय आहे. तुम्ही जणू असे म्हणत असता: ‘यहोवा, जीवनातील प्रत्येक पैलूत तू माझा मालक व्हावा अशी माझी इच्छा आहे. मी तुझा सेवक आहे. मी माझ्या वेळेचा उपयोग कसा करावा, कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे व माझ्या साधनांचा व कौशल्यांचा वापर कसा करावा हे तूच माझ्यासाठी ठरवावे अशी माझी इच्छा आहे.’

तुम्ही जर एक समर्पित ख्रिस्ती असाल, तर खरे पाहता तुम्ही यहोवाला हेच वचन दिले आहे. तुमच्या या निर्णयासाठी तुम्ही प्रशंसेस पात्र आहात; कारण तुम्ही एक योग्य व सुज्ञ निर्णय घेतला आहे. पण, यहोवाला आपला मालक मानण्याचा, तुम्ही ज्या प्रकारे तुमच्या वेळेचा उपयोग करता त्याच्याशी काय संबंध आहे? नोहा, मोशे, यिर्मया आणि प्रेषित पौल यांच्या उदाहरणाचे परीक्षण केल्यास आपल्याला या प्रश्‍नाचे उत्तर मिळेल. त्यांपैकी प्रत्येक जण यहोवाचा एक सच्चा सेवक होता. आपलीही परिस्थिती त्यांच्यासारखीच आहे. जीवनात कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे यासंबंधी त्यांनी जे निर्णय घेतले, ते आपल्याला आपण वेळेचा वापर कसा करत आहोत याचे परीक्षण करण्यास प्रोत्साहन देतात.—मत्त. २८:१९, २०; २ तीम. ३:१.

जलप्रलय येण्याआधी

३. नोहाच्या काळातील परिस्थिती व आपल्या काळातील परिस्थिती एकसारखी कशी आहे?

येशूने सांगितले की नोहाच्या काळातील परिस्थिती व आपल्या काळातील परिस्थिती एकसारखी आहे. त्याने म्हटले: “नोहाच्या दिवसांत होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. . . . नोहा तारवात गेला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत त्यांस समजले नाही.” (मत्त. २४:३७-३९) आज बहुतेक लोक त्यांच्या इच्छेनुसार जीवन जगतात व काळाच्या निकडीकडे दुर्लक्ष करतात. देवाचे सेवक जो इशारेवजा संदेश सांगतात त्याकडे ते लक्ष देत नाहीत. पुष्कळ जण तर मानवी घडामोडींमध्ये देव हस्तक्षेप करेल या कल्पनेची थट्टा करतात. नोहाच्या दिवसांतही लोकांनी असेच केले होते. (२ पेत्र ३:३-७) पण अशा प्रतिकूल परिस्थितीतही नोहाने त्याच्या वेळेचा उपयोग कसा केला?

४. यहोवाकडून आज्ञा मिळाल्यानंतर नोहाने त्याच्या वेळेचा वापर कसा केला, आणि का?

देवाच्या उद्देशाविषयी कळवण्यात आल्यानंतर आणि देवाकडून आज्ञा मिळाल्यानंतर नोहाने मानवांच्या व प्राण्यांच्या बचावासाठी तारू बांधले. (उत्प. ६:१३, १४, २२) नोहाने यहोवाकडून येणाऱ्‍या नाशाविषयीही सांगितले. प्रेषित पेत्र त्याला “नीतिमत्त्वाचा उपदेशक” असे म्हणतो; यावरून कळते की नोहा आपल्या शेजाऱ्‍यांना त्यांची परिस्थिती किती गंभीर होती हे सांगण्यास झटला. (२ पेत्र २:५ वाचा.) नोहा व त्याच्या कुटुंबाने त्यांचे लक्ष त्यांचा व्यवसाय वाढवण्यावर, इतरांपेक्षा जास्त यशस्वी होण्यावर किंवा सुखसोयीचे जीवन जगण्यावर केंद्रित केले असते तर ते योग्य ठरले असते का? साहजिकच नाही! भविष्यात काय होणार आहे हे माहीत असल्यामुळे, त्यांनी अशा गोष्टींनी विकर्षित होण्याचे टाळले.

इजिप्शियन राजपुत्राचे निर्णय

५, ६. (क) मोशेला जे शिक्षण मिळाले ते कदाचित त्याला कोणत्या गोष्टीसाठी तयार करण्यासाठी दिले असावे? (ख) मोशेने इजिप्तमध्ये त्याला मिळू शकणाऱ्‍या गोष्टी का नाकारल्या?

आता आपण मोशेच्या उदाहरणाचा विचार करू या. फारोच्या मुलीने त्याला दत्तक घेतल्यामुळे तो इजिप्शियन राजवाड्यात लहानाचा मोठा झाला. राजपुत्र या नात्याने त्याला “मिसरी लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले.” (प्रे. कृत्ये ७:२२; निर्ग. २:९, १०) या शिक्षणाचा उद्देश कदाचित त्याला फारोच्या दरबारातील कार्यासाठी तयार करणे हा असावा. त्या काळातील सर्वात शक्‍तिशाली राज्यात तो पद व प्रतिष्ठा मिळवू शकला असता, ऐशआरामाचे जीवन जगू शकला असता व त्याला अनेक विशेषाधिकार मिळू शकले असते. पण या गोष्टींचा आनंद उपभोगणे हाच मोशेचा उद्देश होता का?

लहानपणी मोशेच्या खऱ्‍या पालकांकडून त्याला जे शिक्षण मिळाले, त्यामुळे त्याचे पूर्वज अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना यहोवाने कोणते अभिवचन दिले होते ते बहुधा त्याला माहीत असावे. मोशेला या अभिवचनांवर पूर्ण विश्‍वास होता. त्याने त्याच्या भविष्याबद्दल व यहोवासोबत एकनिष्ठ राहण्याबद्दल काळजीपूर्वक विचार केला असावा. म्हणून जेव्हा मोशेसमोर इजिप्शियन राजपुत्र व एक इस्राएली दास यांपैकी काय बनावे याची निवड करण्याची वेळ आली तेव्हा त्याने कोणता निर्णय घेतला? “पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्‍यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे” हे मोशेने पसंत केले. (इब्री लोकांस ११:२४-२६ वाचा.) नंतर तो यहोवाच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगला. (निर्ग. ३:२, ६-१०) मोशेने असे का केले? कारण देवाच्या अभिवचनांवर त्याचा विश्‍वास होता. त्याने असा निष्कर्ष काढला की इजिप्तमध्ये त्याच्यासाठी काहीच राखून ठेवलेले नाही. आणि खरेच काही काळातच देवाने दहा पीडा आणून या राष्ट्राला शिक्षा दिली. आज यहोवाच्या समर्पित सेवकांना यातून काही धडा शिकायला मिळतो का? आपल्या करियरवर किंवा या जगातील ऐशआरामांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपण यहोवा व त्याच्या सेवेवर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे.

भविष्यात काय होणार हे यिर्मयाला माहीत होते

७. यिर्मयाची परिस्थिती आपल्यासारखीच कशी होती?

जीवनात यहोवाच्या सेवेला प्राधान्य देणाऱ्‍यांपैकी आणखी एक जण होता यिर्मया संदेष्टा. यहोवाने यिर्मयाला त्याचा संदेष्टा या नात्याने धर्मत्यागी जेरूसलेमवर व यहूदावर येणाऱ्‍या नाशाविषयीचा प्रचार करण्यास सांगितले. एका अर्थाने तो शेवटल्या काळातच जगत होता. (यिर्म. २३:१९, २०) त्याला हे चांगल्या प्रकारे माहीत होते की तो ज्या व्यवस्थेत राहत होता ती जास्त दिवस टिकणार नव्हती.

८, ९. (क) बारूखाला त्याची विचारसरणी सुधारण्याची गरज का होती? (ख) भविष्यासाठी योजना करताना आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

यिर्मयाच्या विश्‍वासाचा परिणाम काय झाला? लवकरच नाश होणाऱ्‍या त्या शहरात त्याला त्याचे भविष्य घडवायचे नव्हते. असे करण्यात नाहीतरी काय अर्थ होता? पण सुरुवातीला यिर्मयाचा सचिव, बारूख याने भविष्याविषयी यिर्मयासारखा विचार केला नाही. म्हणून देवाने यिर्मयाला बारूखास हे सांगण्यास प्रेरित केले: “पाहा, मी जे उभारिले ते मोडून टाकीन, मी जे लाविले ते उपटून टाकीन; सर्व पृथ्वीची हीच वाट. तू आपणासाठी मोठाल्या गोष्टीची वांच्छा करितोस काय? ती करू नको, पाहा, मी सर्व मानवांवर अरिष्ट आणीन, . . . पण जेथे जेथे तू जाशील तेथे तेथे तू जिवानिशी सुटशील.”—यिर्म. ४५:४, ५.

बारूख कोणत्या मोठ्या गोष्टींच्या मागे लागला होता हे आपल्याला खातरीने सांगता येत नाही. * पण आपल्याला हे माहीत आहे की त्या गोष्टी फार काळ टिकणार नव्हत्या, कारण इ.स.पू. ६०७ मध्ये बॅबिलोनी सैन्याने जेरूसलेमवर केलेल्या हल्ल्यात त्या गोष्टी नाश होणार होत्या. यावरून आपण कोणता धडा शिकू शकतो? जीवनातील गरजा पूर्ण करण्याकरता आपल्याला भविष्यासाठी काही योजना करणे गरजेचे आहे. (नीति. ६:६-११) पण ज्या गोष्टी फार काळ टिकणार नाहीत अशा गोष्टी मिळवण्यासाठी पुष्कळ वेळ व शक्‍ती खर्च करणे सुज्ञपणाचे ठरेल का? यहोवाची संघटना नवी राज्य सभागृहे, शाखा कार्यालये बांधण्याची योजना करत आहे व इतर ईश्‍वरशासित प्रकल्पेही हाती घेत आहे हे खरे आहे. पण, त्यांच्या या प्रयत्नांचे भविष्य उज्ज्वल आहे, कारण राज्याशी संबंधित कार्यांना वाढीस लावणे हा त्यांमागचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे, यहोवाच्या प्रत्येक समर्पित सेवकाने भविष्यासाठी योजना करताना राज्याशी संबंधित कार्यांना प्राधान्य देणे योग्य ठरेल. तर मग, तुम्ही “पहिल्याने [देवाचे] राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास” झटत आहात याची तुम्हाला मनापासून खातरी आहे का?—मत्त. ६:३३.

“त्या केरकचरा अशा लेखतो”

१०, ११. (क) ख्रिस्ती बनण्याआधी पौलाने आपले लक्ष कशावर केंद्रित केले होते? (ख) पौलाने त्याचा दृष्टिकोन पूर्णपणे का बदलला?

१० शेवटी आपण पौलाचे उदाहरण पाहू या. ख्रिस्ती बनण्याआधी त्याचे भविष्य उज्ज्वल आहे असे सगळ्यांना वाटायचे. त्याने त्याच्या काळातील एका नामवंत शिक्षकाकडून यहुदी नियमशास्त्राचे शिक्षण घेतले होते. त्याला यहुदी महायाजकाकडून अधिकारही मिळाला होता. पौल त्याच्या इतर साथीदारांच्या तुलनेत यहुदी धर्मव्यवस्थेत खूप प्रगती करत होता. (प्रे. कृत्ये ९:१, २; २२:३; २६:१०; गलती. १:१३, १४) पण, पौलाला जेव्हा कळले की राष्ट्र या नात्याने यहुदी लोकांवर यहोवाचा आशीर्वाद आता नाही तेव्हा त्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला.

११ यहुदी व्यवस्थेत नाव कमवण्याला यहोवाच्या दृष्टीत काहीच मोल नाही आणि त्याचे काहीच भविष्य नाही हे पौलाने ओळखले. (मत्त. २४:२) पौलाला देवाच्या उद्देशांविषयी समजले आणि प्रचार कार्य करणे किती मोठा सन्मान आहे हे त्याने ओळखले. त्यामुळे, एके काळी त्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्‍या गोष्टींना त्याने आता “केरकचरा” असे लेखले. पौलाने यहुदी धर्मव्यवस्थेतील ध्येये सोडून दिली आणि त्याने पृथ्वीवरील त्याच्या उरलेल्या आयुष्यात सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी स्वतःला वाहून घेतले.—फिलिप्पैकर ३:४-८, १५ वाचा; प्रे. कृत्ये ९:१५.

तुमचे प्राधान्यक्रम तपासून पाहा

१२. बाप्तिस्मा झाल्यानंतर येशूने त्याचे लक्ष कशावर केंद्रित केले?

१२ नोहा, मोशे, यिर्मया, पौल आणि अशा इतर अनेकांनी ईश्‍वरशासित कार्ये करण्यासाठी आपला बहुतेक वेळ व शक्‍ती खर्च केली. त्यांचे उदाहरण खरोखर अनुकरणीय आहे. अर्थातच, यहोवाच्या समर्पित सेवकांपैकी सर्वात उत्तम उदाहरण येशूचे आहे. (१ पेत्र २:२१) त्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतर त्याने पृथ्वीवरील त्याचे उर्वरित जीवन सुवार्तेचा प्रचार करण्यात आणि यहोवाचे गौरव करण्यात घालवले. येशूच्या उदाहरणावरून हे स्पष्टच आहे की जी ख्रिस्ती व्यक्‍ती यहोवाला आपला मालक मानते ती तिच्या जीवनात यहोवाच्या सेवेला प्राधान्य देते. तुम्ही तुमच्या जीवनात यहोवाच्या सेवेला प्राधान्य देता का? आणि ईश्‍वरशासित ध्येये गाठण्याचा प्रयत्न करत असताना तुम्ही इतर आवश्‍यक जबाबदाऱ्‍यांशी त्यांचा मेळ कसा बसवू शकता?—स्तोत्र ७१:१५; १४५:२ वाचा.

१३, १४. (क) सर्व समर्पित ख्रिश्‍चनांना कशाविषयी विचार करण्याचे प्रोत्साहन देण्यात आले आहे? (ख) देवाचे लोक कोणते समाधान अनुभवू शकतात?

१३ अनेक वर्षांपासून यहोवाची संघटना ख्रिश्‍चनांना, ते पायनियर सेवा करू शकतात का, याविषयी प्रार्थनापूर्वक विचार करण्याचे प्रोत्साहन देत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे, यहोवाच्या काही विश्‍वासू सेवकांची परिस्थिती त्यांना दर महिन्याला साधारण ७० तास प्रचार कार्यात भाग घेण्याची अनुमती देत नाही. त्यांनी याबद्दल वाईट वाटून घेऊ नये. (१ तीम. ५:८) पण तुमच्याबद्दल काय? पायनियर सेवा करणे तुमच्यासाठी खरोखरच अशक्य आहे का?

१४ या वर्षी स्मारक विधीच्या काळादरम्यान देवाच्या लोकांपैकी अनेकांनी जो आनंद अनुभवला त्याचा विचार करा. मार्च महिन्यासाठी करण्यात आलेल्या एका खास तरतुदीनुसार साहाय्यक पायनियरांना क्षेत्र सेवेत एकतर ३० किंवा ५० तास घालवण्याची मुभा होती. (स्तो. ११०:३) लाखो बंधुभगिनींनी साहाय्यक पायनियर सेवा केली आणि मंडळ्यांमध्ये उल्लेखनीय आनंद व उत्साह दिसून आला. हा आनंद पुनःपुन्हा अनुभवण्यासाठी तुम्ही आपल्या नित्यक्रमात काही फेरबदल करू शकता का? प्रत्येक दिवसाच्या शेवटी, “यहोवा, तुझी सेवा करण्यासाठी मी माझ्या परीनं सर्व काही केलं आहे,” असे म्हणता येणे ही एका समर्पित ख्रिस्ती व्यक्‍तीसाठी फार मोठ्या समाधानाची गोष्ट आहे.

१५. शिक्षण घेण्याविषयी तरुण ख्रिश्‍चनांचा दृष्टिकोन काय असला पाहिजे?

१५ कदाचित लवकरच तुमचे शालेय शिक्षण पूर्ण होणार असेल, तुमचे आरोग्यही चांगले असेल आणि तुमच्यावर जास्त जबाबदाऱ्‍याही नसतील. असे असल्यास, पायनियर म्हणून सेवा करण्याविषयी तुम्ही गांभीर्याने विचार केला आहे का? अर्थातच, शाळा-महाविद्यालयांतील तुमच्या समुपदेशकांना प्रामाणिकपणे असे वाटत असेल की तुम्ही उच्च शिक्षण घ्यावे आणि एक चांगले करियर करावे, यातच तुमचे भले आहे. पण, त्यांचा भरवसा अशा एका सामाजिक व आर्थिक व्यवस्थेवर आहे जी फार काळ टिकणार नाही. दुसरीकडे पाहता, देवाच्या राज्याशी संबंधित ध्येयांचा पाठपुरावा करण्याद्वारे तुम्ही खऱ्‍या अर्थाने मौल्यवान व जास्त काळ टिकणाऱ्‍या ध्येयांचा पाठपुरावा करत असता. आणि असे करण्याद्वारे येशूच्या परिपूर्ण उदाहरणाचे तुम्ही अनुकरण करत असता. अशा सुज्ञ निर्णयामुळे तुम्ही आनंदी व्हाल; तुमचे रक्षण होईल. आणि यहोवाला केलेल्या समर्पणानुसार जगण्याचा तुमचा पक्का निर्धार आहे हे त्याद्वारे दिसून येईल.—मत्त. ६:१९-२१; १ तीम. ६:९-१२.

१६, १७. नोकरीविषयी आणि इतर ध्येयांविषयी कोणते प्रश्‍न उद्‌भवतात?

१६ आज देवाचे अनेक सेवक आपल्या कुटुंबाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी बरेच तास काम करतात. असे असले, तरी काही जण कदाचित आवश्‍यकतेपेक्षा जास्त तास काम करत असतील. (१ तीम. ६:८) आज बाजारात अनेक उत्पादने आणि वस्तूंचे नवनवीन मॉडेल उपलब्ध आहेत. आणि कंपन्या व जाहिरातदार आपल्याला अशी खातरी पटवून देण्याच्या प्रयत्नात असतात की या नवनवीन उत्पादनांशिवाय आपण जगूच शकत नाही. पण, सैतानाच्या जगाने आपल्यासाठी प्राधान्यक्रम ठरवावे अशी खऱ्‍या ख्रिश्‍चनांची इच्छा नाही. (१ योहा. २:१५-१७) जे नोकरीवरून निवृत्त झाले आहेत ते पायनियर सेवा करण्याद्वारे यहोवाच्या सेवेला पहिल्या स्थानी ठेवू शकतात. त्यांच्यासाठी वेळेचा सदुपयोग करण्याचा उत्तम मार्ग आणखी कोणता असू शकतो?

१७ यहोवाचे सर्व समर्पित सेवक स्वतःला असे विचारू शकतात: माझ्या जीवनातील प्रमुख उद्दिष्ट काय आहे? मी राज्याशी संबंधित कार्यांना पहिल्या स्थानी ठेवत आहे का? मी येशूच्या आत्मत्यागी मनोवृत्तीचे अनुकरण करत आहे का? येशूचे निरंतर अनुकरण करण्याविषयी त्याने दिलेल्या सल्ल्याचे मी पालन करत आहे का? राज्य प्रचार कार्यात किंवा राज्याशी संबंधित इतर कार्यांत आणखी जास्त वेळ खर्च करता यावा म्हणून मी माझ्या आराखड्यात फेरबदल करू शकतो का? सध्याची माझी परिस्थिती आणखी जास्त सेवा करण्यास अनुमती देत नसली, तरी मी आत्मत्यागी मनोवृत्ती विकसित करण्याचा सतत प्रयत्न करत आहे का?

“इच्छा करणे आणि कृती करणे”

१८, १९. तुम्ही कशाविषयी प्रार्थना करू शकता, आणि अशी प्रार्थना केल्याने यहोवाचे मन का आनंदित होईल?

१८ देवाच्या सेवेसाठी त्याच्या लोकांना असलेला आवेश पाहून अतिशय आनंद होतो. पण, काही जणांची परिस्थिती त्यांना पायनियर सेवा करण्याची अनुमती देत असूनही, कदाचित त्यांना पायनियरिंग करण्याची खास इच्छा नसेल किंवा त्यासाठी आपण तितके कुशल नाही असे त्यांना वाटत असेल. (निर्ग. ४:१०; यिर्म. १:६) असे असेल तर काय? याविषयी प्रार्थना करणे योग्य नाही का? निश्‍चितच. पौलाने त्याच्या सहविश्‍वासू बांधवांना सांगितले, की “इच्छा करणे व कृती करणे ही तुमच्या ठायी आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे.” (फिलिप्पै. २:१३) तुम्हाला जर तुमची सेवा वाढवण्याची प्रेरणा होत नसेल, तर यहोवाने तुम्हाला तसे करण्याची इच्छा व क्षमता या दोन्ही गोष्टी द्याव्यात अशी त्याला प्रार्थना करा.—२ पेत्र ३:९, ११.

१९ नोहा, मोशे, यिर्मया, पौल आणि येशू हे सर्व यहोवाचे विश्‍वासू सेवक होते. त्यांनी यहोवाचे इशारेवजा संदेश घोषित करण्यासाठी त्यांचा वेळ व शक्‍ती खर्च केली. त्यांनी आपले लक्ष विचलित होऊ दिले नाही. या जगाचा अंत अगदी जवळ येऊन ठेपला आहे; त्यामुळे, देवाला जीवन समर्पित केलेल्या आपण सर्वांनी, बायबलमधील या उत्तम उदाहरणांचे अनुकरण करण्यासाठी आपल्याकडून होता होईल तितका प्रयत्न करत आहोत याची खातरी केली पाहिजे. (मत्त. २४:४२; २ तीम. २:१५) असे केल्याने, यहोवाचे मन आनंदित होईल आणि आपल्याला त्याच्याकडून अनेक आशीर्वाद मिळतील.—मलाखी ३:१० वाचा.

[तळटीप]

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२१ पानांवरील चित्र]

नोहाच्या इशारेवजा संदेशाकडे लोकांनी लक्ष दिले नाही

[२४ पानांवरील चित्र]

पायनियर सेवा करण्याविषयी तुम्ही गांभीर्याने विचार केला आहे का?