व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“पवित्र आत्म्याने प्रेरित” झालेले

“पवित्र आत्म्याने प्रेरित” झालेले

“पवित्र आत्म्याने प्रेरित” झालेले

“संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही; तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे.” —२ पेत्र १:२१.

मनन करण्यासाठी मुद्दे

बायबलच्या लेखकांना देवाचा संदेश पवित्र आत्म्याद्वारे कशा प्रकारे कळवण्यात आला?

बायबल देवाच्या प्रेरणेने लिहिलेले आहे हे कोणत्या पुराव्यांवरून सिद्ध होते?

देवाच्या वचनाकरता असलेली कदर टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही दररोज काय करू शकता?

१. आपल्याला देवाच्या प्रेरित वचनाची गरज का आहे?

 मानवांची उत्पत्ती कशी झाली? जीवनाचा उद्देश काय? आपले भविष्य काय असेल? जगाची परिस्थिती इतकी बिकट का आहे? मृत्यूनंतर मानवाचे काय होते? हे प्रश्‍न जगभरातील लोक विचारतात. देवाचे प्रेरित वचन आपल्याजवळ नसते तर या व अशा इतर महत्त्वाच्या प्रश्‍नांचे उत्तर आपल्याला मिळू शकले असते का? बायबल नसते तर जीवनाविषयीच्या या प्रश्‍नांची उत्तरे आपल्याला स्वतःच्या अनुभवाच्या आधारावरच मिळवावी लागली असती. पण जीवनाविषयी ज्ञान मिळवण्याकरता जर आपण स्वतःच्याच अनुभवावर अवलंबून राहिलो असतो तर स्तोत्रकर्त्याने यहोवाच्या नियमशास्त्राबद्दल व्यक्‍त केलेल्या भावना आपण कधी व्यक्‍त करू शकलो असतो का?—स्तोत्र १९:७ वाचा.

२. देवाने आपल्याला बायबलच्या रूपात दिलेल्या मौल्यवान देणगीबद्दल आपली कदर आपण कशी टिकवून ठेवू शकतो?

पण दुःखाची गोष्ट म्हणजे काही जणांना पूर्वी बायबलमधील सत्याबद्दल असलेले प्रेम आता राहिलेले नाही. (प्रकटीकरण २:४ पडताळून पाहा.) यहोवाच्या इच्छेप्रमाणे चालण्याचे त्यांनी सोडून दिले आहे. (यश. ३०:२१) आपल्या बाबतीत असे घडण्याचे कारण नाही. बायबलबद्दल आणि त्यातील शिकवणींबद्दल आपल्याला वाटणारी कदर टिकवून ठेवण्याचा आपण प्रयत्न करू शकतो, नव्हे केलाच पाहिजे. बायबल ही आपल्या प्रेमळ निर्माणकर्त्याने आपल्याला दिलेली एक महत्त्वाची देणगी आहे. (याको. १:१७) तर मग, देवाच्या वचनाबद्दल आपल्याला वाटणारी कदर आपण कशी वाढवू शकतो? असे करण्याचा एक प्रमुख मार्ग म्हणजे बायबलच्या लेखकांना शास्त्रवचने लिहिण्यास कशा प्रकारे मार्गदर्शित करण्यात आले यावर मनन करणे. यासाठी, बायबल देवप्रेरित असल्याचे सिद्ध करणारे भरमसाट पुरावे आपण आठवणीत आणू शकतो. असे केल्यामुळे दररोज देवाच्या वचनातील काही भाग वाचण्याची आणि त्यातील मार्गदर्शनाचे पालन करण्याची आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळेल.—इब्री ४:१२.

“पवित्र आत्म्याने प्रेरित”—ते कसे?

३. बायबलचे संदेष्टे व लेखक “पवित्र आत्म्याने प्रेरित” झाले होते याचा काय अर्थ होतो?

इ.स.पू. १५१३ पासून इ.स. ९८ पर्यंतच्या १,६१० वर्षांत जवळजवळ ४० मनुष्यांनी बायबलचे लिखाण केले. यांपैकी काही, “पवित्र आत्म्याने प्रेरित” झालेले संदेष्टे होते. (२ पेत्र १:२०, २१ वाचा.) “प्रेरित झालेल्या” असे भाषांतरित मूळ ग्रीक संज्ञेचा अर्थ “एका ठिकाणाहून दुसऱ्‍या ठिकाणी वाहून किंवा उचलून नेणे” असा होतो. शिवाय, “प्रेरित होणे, उद्युक्‍त होणे, स्वतःस प्रेरित होऊ देणे असेही या संज्ञेचे भाषांतर केले जाऊ शकते.” * प्रेषितांची कृत्ये २७:१५ या वचनात, वाऱ्‍यामुळे विशिष्ट दिशेला वाहवत गेलेल्या जहाजाचे वर्णन करण्यासाठी ही संज्ञा वापरण्यात आली आहे. बायबलचे संदेष्टे व लेखक “पवित्र आत्म्याने प्रेरित” झालेले होते, याचा असा अर्थ होतो की देवाने आपल्या क्रियाशील शक्‍तीच्या माध्यमाने त्यांना आपले विचार कळवले, त्यांना प्रेरणा दिली व मार्गदर्शित केले. त्याअर्थी, त्यांनी स्वतःचे नव्हे तर देवाचे विचार लिहिले. कधीकधी तर या देवप्रेरित संदेष्ट्यांना व लेखकांना त्यांनी भाकीत केलेल्या किंवा लिहिलेल्या संदेशाचा अर्थसुद्धा कळत नसे. (दानी. १२:८, ९) खरोखर, संपूर्ण बायबल हे “देवप्रेरित” असून कोणत्याही मानवाची मते त्यात नाहीत.—२ तीम. ३:१६.

४-६. यहोवाने बायबल लेखकांना त्याचा संदेश कोणकोणत्या स्वरूपांत कळवला? उदाहरण देऊन स्पष्ट करा.

पण, देवाचा संदेश बायबलच्या लेखकांना कोणत्या स्वरूपात कळवण्यात आला? त्यांना नेमके शब्द सांगण्यात आले का? की, फक्‍त काही विचार कळवण्यात आले जे त्यांना स्वतःच्या शब्दांत मांडायचे होते? हे समजून घेण्यासाठी एखाद्या कंपनीचा मालक कशा प्रकारे पत्र लिहितो याचा विचार करा. विशिष्ट मजकूर नेमक्या शब्दांत मांडणे गरजेचे असते तेव्हा तो स्वतःच पत्र लिहितो किंवा आपल्या सेक्रेटरीला प्रत्येक शब्द सांगतो. त्याने सांगितल्यानुसार सेक्रेटरी पत्र टाईप करते आणि पत्राच्या शेवटी मालक सही करतो. इतर वेळी, तो फक्‍त महत्त्वाचे काही मुद्दे सेक्रेटरीला सांगतो आणि सेक्रेटरी त्यांच्या आधारावर, स्वतःच्या शैलीत किंवा स्वतःच्या शब्दांत पत्राचा मजकूर तयार करते. पत्र लिहून झाल्यावर मालक ते वाचतो आणि आवश्‍यक असल्यास काही दुरुस्त्या करण्याचे सुचवतो. पत्राच्या शेवटी त्याची सही असते आणि ते पत्र त्याचेच मानले जाते.

त्याच प्रकारे, बायबलमधील काही भाग देवाने “आपल्या बोटाने” लिहिलेले होते. (निर्ग. ३१:१८) तसेच, काही माहिती नेमक्या शब्दांत सांगणे गरजेचे होते तेव्हा यहोवाने ते नेमके शब्द आपल्या सेवकांना कळवले. उदाहरणार्थ, निर्गम ३४:२७ येथे आपण असे वाचतो: “मग परमेश्‍वर मोशेला म्हणाला, ही वचने लिहून ठेव, कारण ह्‍याच वचनांप्रमाणे मी तुझ्याशी व इस्राएल लोकांशी करार केला आहे.” तसेच, यिर्मया संदेष्ट्याला यहोवाने असे सांगितले: “परमेश्‍वर इस्राएलाचा देव असे म्हणतो की जी वचने मी तुला सांगितली ती सर्व पुस्तकात लिहून ठेव.”—यिर्म. ३०:२.

पण बहुतेक वेळा, बायबल लेखकांच्या मनांत नेमक्या शब्दांऐवजी चमत्कारिक रीत्या काही विचार घालण्यात आले. हे विचार स्वतःच्या शब्दांत व्यक्‍त करण्याची मोकळीक त्यांना होती. उपदेशक १२:१० म्हणते, “सरळ लिहिलेली सत्य व मनोहर वचने शोधण्याचा उपदेशकाने प्रयत्न केला.” शुभवर्तमान लिहिणाऱ्‍या लूकने “सर्व गोष्टींचा मुळापासून नीट शोध” केला जेणेकरून त्याला त्या “अनुक्रमाने” लिहिता येतील. (लूक १:३) मानवी अपरिपूर्णतेमुळे देवाचा मूळ संदेश बदलणार नाही याची पवित्र आत्म्याने खातरी केली.

७. बायबलचे लेखन करण्यासाठी देवाने मानवांचा वापर केला, यावरून त्याची बुद्धी कशा प्रकारे दिसून येते?

बायबलचे लेखन करण्यासाठी देवाने मानवांचा वापर केला, यावरून त्याची अतुलनीय बुद्धी दिसून येते. शब्दांतून फक्‍त माहितीच नव्हे, तर भावभावनादेखील पोचवल्या जातात. यहोवाने जर बायबलचे लेखन करण्यासाठी देवदूतांचा वापर केला असता तर काय झाले असते? भीती, दुःख व निराशा यांसारख्या मानवसुलभ भावना ते तितक्याच प्रभावी रीत्या व्यक्‍त करू शकले असते का? अपरिपूर्ण मानवांना पवित्र आत्म्याद्वारे कळवण्यात आलेले विचार स्वतःच्या शब्दांत मांडण्याची अनुमती दिल्यामुळे देवाने आपला संदेश भावनांसहित, वैविध्यपूर्ण रीतीने आणि मानवांच्या मनाला भिडेल अशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोचवला.

पुराव्यांकडे लक्ष द्या

८. बायबल हे इतर सर्व धर्मग्रंथांपेक्षा वेगळे आहे असे का म्हणता येते?

बायबल देवाचे प्रेरित वचन आहे हे सिद्ध करणारे भरमसाट पुरावे उपलब्ध आहेत. इतर कोणत्याही धर्मग्रंथाच्या तुलनेत बायबल आपल्याला देवाचा अधिक चांगल्या प्रकारे परिचय करून देते. उदाहरणार्थ, हिंदू धर्माच्या लिखाणांत श्‍लोकांच्या स्वरूपात लिहिलेले वेद, या श्‍लोकांवरील भाष्यांचा संग्रह, उपनिषद म्हटलेली तत्त्वज्ञानविषयक लिखाणे, आणि रामायणमहाभारत या महाकाव्यांच्या रूपात सांगितलेल्या कथा समाविष्ट आहेत. नैतिक नियम असलेला भगवद्‌गीता हा ग्रंथ महाभारत याचाच भाग आहे. बौद्धांचा त्रिपिटक (तीन संग्रह) यातील एका खंडात मुख्यतः मठांत राहणाऱ्‍या भिक्षुकांसाठी दिलेली नियमावली आहे. दुसरा खंड बौद्ध धर्माच्या सिद्धान्तांविषयी सांगतो. तर तिसऱ्‍या खंडात बुद्धाच्या मौखिक शिकवणी नमूद आहेत. बुद्धाने कधीही आपण देव असल्याचा दावा केला नाही, आणि देवाबद्दल त्याने फारशी माहितीही दिली नाही. कन्फ्‌यूशस पंथाची लिखाणे ही निरनिराळ्या घटना, नीतिनियम, जादूची सूत्रे आणि गीते यांनी मिळून बनलेली आहेत. मुसलमानांच्या पवित्र ग्रंथात एकच देव असल्याचे, आणि तो सर्वज्ञानी असून भविष्याचेही त्याला ज्ञान असल्याचे सांगण्यात आले आहे हे खरे आहे; पण, देवाचे नाव यहोवा आहे हे मात्र त्यात प्रकट केलेले नाही. बायबलमध्ये हे नाव हजारो वेळा येते.

९, १०. बायबलमधून आपण देवाविषयी काय शिकू शकतो?

धर्माविषयी असलेल्या बहुतेक प्रमुख ग्रंथांमध्ये देवाविषयी फारसे काही सांगितलेले नाही. पण, बायबल यहोवा देवाविषयी व त्याच्या कार्यांविषयी बरेच काही सांगते. ते आपल्याला यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वातील अनेक पैलू पाहण्यास मदत करते. देव सर्वशक्‍तिमान, बुद्धिमान आणि न्यायी आहे एवढेच बायबल सांगत नाही, तर तो आपल्यावर प्रेम करतो हेदेखील बायबल सांगते. (योहान ३:१६; १ योहान ४:१९ वाचा.) शिवाय, बायबल आपल्याला असे सांगते: “देव पक्षपाती नाही, . . . तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.” (प्रे. कृत्ये १०:३४, ३५) आणि याचा पुरावा म्हणजे बायबल आज कितीतरी भाषांत उपलब्ध आहे. भाषाविषयक तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की आज जगभरात जवळजवळ ६,७०० भाषा बोलल्या जातात आणि त्यांपैकी १०० भाषा जगातील ९० टक्के लोक बोलतात. तरीसुद्धा, संपूर्ण बायबलचे किंवा बायबलच्या काही भागांचे २,४०० पेक्षा जास्त भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले आहे. यावरून दिसते की जगातील जवळजवळ प्रत्येकाला बायबलचा निदान काही भाग वाचणे शक्य आहे.

१० येशूने म्हटले: “माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीही काम करीत आहे.” (योहा. ५:१७) यहोवा “अनादिकालापासून अनंतकालापर्यंत” देव आहे. तेव्हा, त्याने आजपर्यंत काय काय साध्य केले आहे त्याचा विचार करा. (स्तो. ९०:२) देवाने गतकाळात जे केले आणि सध्या तो जे काही करत आहे त्याविषयी सांगण्यासोबतच, भविष्यात तो काय काय करणार आहे हेदेखील केवळ बायबल प्रकट करते. देवाला काय आवडते आणि काय आवडत नाही हेदेखील बायबल आपल्याला सांगते; आणि आपण कशा प्रकारे देवाच्या जवळ जाऊ शकतो हेदेखील बायबल दाखवते. (याको. ४:८) तर मग, वैयक्‍तिक महत्त्वाकांक्षांमुळे किंवा आपल्या चिंतांमुळे आपण त्याच्यापासून दूर जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

११. बायबलमध्ये बुद्धीचा कोणता विपुल व भरवशालायक भांडार सापडतो?

११ बायबलमध्ये बुद्धीचा विपुल व भरवशालायक भांडार आहे. यावरूनदेखील दिसून येते की बायबलचा स्रोत मानव नव्हे, तर देव आहे. प्रेषित पौलाने लिहिले: “प्रभूचे मन असे कोणी ओळखले आहे की त्याने त्याला शिकवावे?” (१ करिंथ. २:१६) हे वचन यशयाने त्याच्या दिवसांतील लोकांना जे विचारले होते त्याच्यावर आधारित आहे. त्याने म्हटले: “परमेश्‍वराच्या आत्म्याचे नियमन कोणी केले आहे? त्याचा मंत्री होऊन त्याला कोणी शिकविले आहे?” (यश. ४०:१३) अर्थातच, उत्तर आहे कोणीच नाही. म्हणूनच, विवाह, मुले, मनोरंजन, मित्रमैत्रिणी, परिश्रमी वृत्ती, प्रामाणिकपणा आणि नैतिकता यांविषयी बायबलमधील सल्ल्याचे पालन केल्याने आपल्याला सर्वोत्तम परिणाम मिळतात. बायबलमधून आपल्याला कधीही वाईट सल्ला मिळणार नाही. पण दुसरीकडे पाहता, नेहमीच उपयुक्‍त ठरेल असा सल्ला देण्याइतकी बुद्धी मानवांमध्ये नाही. (यिर्म. १०:२३) पूर्वीच्या सल्ल्यात काहीतरी कमतरता होती हे जेव्हा त्यांना कळते तेव्हा त्यांच्या सल्ल्यात सुधारणा करण्यात येते. “मानवाचे विचार वायफळ आहेत” असे बायबल म्हणते.—स्तो. ९४:११.

१२. मागील शतकांत बायबलचा नाश करण्याचे कोणकोणते प्रयत्न करूनही ते सुरक्षित आहे?

१२ खरा देवच बायबलचा लेखक आहे याचा आणखी एक पुरावा इतिहासातून दिसून येतो. इतिहास सांगतो, की बायबलमधील संदेश मिटवून टाकण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले. इ.स.पू. १६८ मध्ये, सिरियाचा राजा अँटियोकस चौथा याने नियमशास्त्राची सर्व पुस्तके शोधून ती जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. रोमचा सम्राट डायोक्लीशन याने इ.स. ३०३ मध्ये ख्रिश्‍चनांची सभास्थाने उद्‌ध्वस्त करण्याचा आणि त्यांचे पवित्र शास्त्र जाळून टाकण्याचा हुकूम जारी केला. हा नाश दहा वर्षे चालला. अकराव्या शतकानंतर वेगवेगळ्या पोप्सनी सर्वसामान्य लोकांच्या भाषेत बायबलचे भाषांतर केल्या जाण्याचा विरोध करण्याद्वारे बायबलच्या ज्ञानाचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न केला. सैतान व त्याच्या प्रतिनिधींद्वारे बायबलचा नाश करण्याचे प्रयत्न होऊनही बायबल आज आपल्या काळापर्यंत सुरक्षित राहिले आहे. यहोवाकडून मानवजातीला मिळालेल्या या देणगीचा नाश करण्याची अनुमती त्याने कोणालाही दिली नाही.

पुष्कळांना खातरी पटवून देणारे पुरावे

१३. बायबल हे देवाच्या प्रेरणेने लिहिले आहे याचे आणखी कोणते पुरावे देता येतील?

१३ बायबल हे देवाच्या प्रेरणेने लिहिले आहे याचे आणखीही पुरावे आहेत. आंतरिक सुसंगतता, वैज्ञानिक अचूकता, पूर्ण झालेल्या भविष्यवाण्या, असाधारण प्रामाणिकपणा, जीवनात बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य, अचूक इतिहास, आणि या लेखाच्या पहिल्या परिच्छेदात उल्लेख करण्यात आलेल्या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे हे ते पुरावे आहेत. बायबल हे देवाकडून आहे हे ओळखण्यास काही लोकांना कशा प्रकारे मदत मिळाली ते पाहा.

१४-१६. (क) बायबल देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आले आहे याची खातरी एका मुस्लीम, हिंदू आणि देवाच्या अस्तित्वावर शंका घेणाऱ्‍या व्यक्‍तीला कशी पटली? (ख) बायबल देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आले आहे हे पटवून देण्यासाठी तुम्ही सेवाकार्यात कोणत्या पुराव्याचा उपयोग कराल?

१४ अनवर * हा मध्यपूर्वेतील एका देशात मुस्लीम कुटुंबात लहानाचा मोठा झाला. तो काही काळाकरता उत्तर अमेरिकेत होता त्या वेळी यहोवाचे साक्षीदार त्याच्या घरी गेले. अनवर सांगतो: “धर्मयुद्धे आणि इन्क्‌विझिशन (लोकांना पाखंडी ठरवून केलेला छळ) यांमुळे त्या वेळी ख्रिस्ती धर्माविषयी माझे मत नकारात्मक होते. पण, स्वभावानेच जिज्ञासू असल्यामुळे, मी बायबल अभ्यास करायला तयार झालो.” त्यानंतर, काही काळाने अनवर घरी परतला आणि यहोवाच्या साक्षीदारांशी त्याचा संपर्क तुटला. काही वर्षांनंतर, तो युरोपमध्ये राहायला गेला. तेथे त्याने पुन्हा एकदा बायबल अभ्यास करायला सुरुवात केली आणि तो या निष्कर्षावर पोहचला: “बायबलमधील पूर्ण झालेल्या भविष्यवाण्या, शास्त्रवचनांमधील आंतरिक सुसंगतता व विरोधाभासाचा अभाव, आणि यहोवाच्या उपासकांमधील प्रेम हे सर्व पाहून बायबल हे देवाचे वचन आहे याची मला खातरी पटली.” अनवरने १९९८ मध्ये बाप्तिस्मा घेतला.

१५ सोळा वर्षांची आशा, एका धर्मपरायण हिंदू कुटुंबात लहानाची मोठी झाली. ती म्हणते: “मी जेव्हा मंदिरात जायचे तेव्हा, किंवा मला काही समस्या असेल तेव्हाच प्रार्थना करायचे. सर्व काही ठीक चाललेलं असायचं तेव्हा मी कधीच देवाविषयी विचार करायचे नाही.” ती पुढे म्हणते: “पण जेव्हा यहोवाचे साक्षीदार आमच्या घरी आले तेव्हा माझं संपूर्ण जीवन पार बदलून गेलं.” आशाने बायबलचा अभ्यास केला आणि देवाशी मैत्री करणे शक्य आहे हे तिला कळले. बायबल हे देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आले आहे याची खातरी आशाला कशी पटली? ती सांगते: “बायबलमधून मला माझ्या सर्वच प्रश्‍नांची उत्तरं मिळाली. देवाला न पाहता म्हणजे मंदिरात जाऊन मूर्तीला दंडवत न करता, देवावर विश्‍वास ठेवण्यास बायबलनं मला मदत केली.”

१६ पॉला हिच्यावर कॅथलिक धर्माचे संस्कार करण्यात आले होते. पण, मोठी झाल्यावर ती देवाच्या अस्तित्वावर शंका घेऊ लागली. नंतर, काहीतरी अनपेक्षित घडले. ती म्हणते: “माझी भेट माझ्या अशा एका मित्राशी झाली, ज्याला मी कितीतरी महिन्यांपासून पाहिलं नव्हतं. ही हिप्पींच्या काळातील गोष्ट आहे; तेव्हा लोक लांब केस ठेवायचे व मादक पदार्थांचे सेवन करायचे. पण मी पाहिलं की आता माझा मित्र पूर्णपणे बदलला होता. त्याने केस व्यवस्थित कापले होते आणि तो आनंदी दिसत होता. मी त्याला विचारलं, ‘काय झालं तुला, आणि इतके दिवस कुठं होतास?’ तो यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करत होता असं त्यानं मला सांगितलं आणि तो मला बायबलविषयी सांगू लागला.” बायबलमध्ये जीवन बदलून टाकण्याचे सामर्थ्य आहे हे पाहून आधी देवाच्या अस्तित्वाबद्दल शंका घेणारी पॉला बायबलमधील संदेशाकडे आकर्षित झाली, आणि बायबल देवाचे प्रेरित वचन आहे हे तिने मान्य केले.

तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे आहे

१७. दररोज देवाच्या वचनाचे वाचन केल्याने आणि त्यावर मनन केल्याने तुम्हाला कोणता फायदा होऊ शकतो?

१७ बायबल हे यहोवाने त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला दिलेली एक अद्‌भुत देणगी आहे. तेव्हा दररोज त्याचे वाचन करण्याद्वारे आनंद मिळवा. असे केल्याने, बायबलबद्दल व त्याच्या लेखकाबद्दल तुमचे प्रेम आणखी वाढेल. (स्तो. १:१, २) तुम्ही जेव्हा जेव्हा बायबलचा अभ्यास करण्यासाठी बसता, तेव्हा तेव्हा देवाने त्याच्या आत्म्याद्वारे तुमच्या विचारांना चालना द्यावी म्हणून प्रार्थना करा. (लूक ११:१३) बायबलमध्ये देवाचे विचार आहेत, त्यामुळे ते काय म्हणते यावर तुम्ही मनन करता तेव्हा तुम्ही देवाचे विचार आत्मसात करू शकता.

१८. बायबलमधून नेहमी शिकत राहण्याची इच्छा तुम्ही का बाळगली पाहिजे?

१८ तुम्ही जसजसे सत्याचे खरे ज्ञान घेता, तसतसे त्यानुसार जगण्याचा प्रयत्न करा. (स्तोत्र ११९:१०५ वाचा.) तुम्ही जसे स्वतःला आरशात पाहता, तसे शास्त्रवचनांमध्ये डोकावून पाहा. तुम्हाला तुमच्या जीवनात बदल करावे लागतील असे जाणवल्यास आवश्‍यक ते बदल करा. (याको. १:२३-२५) तुमच्या विश्‍वासांचे समर्थन करण्यासाठी आणि नम्र लोकांच्या मनातील खोट्या शिकवणींचे उच्चाटन करण्यासाठी देवाच्या वचनाचा तरवारीप्रमाणे वापर करा. (इफिस. ६:१७) आणि असे करत असताना, बायबलचा संदेश लिहून काढण्यासाठी ज्या संदेष्ट्यांचा व मनुष्यांचा उपयोग करण्यात आला होता ते सर्व “पवित्र आत्म्याने प्रेरित” झालेले होते याबद्दल कृतज्ञता बाळगा.

[तळटीपा]

^ परि. 3 अ ग्रीक-इंग्लिश लेक्सिकन ऑफ द न्यू टेस्टामेंट ॲन्ड अदर अर्ली ख्रिश्‍चन लिटरेचर.

^ परि. 14 काही नावे बदलण्यात आली आहेत.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२९ पानांवरील संक्षिप्त आशय]

दररोज बायबल वाचा; असे केल्याने बायबलच्या लेखकाबद्दल तुमचे प्रेम आणखी वाढेल

[२६ पानांवरील चित्र]

पत्राच्या शेवटी ज्याची सही असते त्याचेच ते पत्र मानले जाते