व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या राज्याच्या नागरिकांना शोभेल असे आचरण ठेवा!

देवाच्या राज्याच्या नागरिकांना शोभेल असे आचरण ठेवा!

देवाच्या राज्याच्या नागरिकांना शोभेल असे आचरण ठेवा!

“ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा.” —फिलिप्पै. १:२७.

तुमचे उत्तर काय असेल?

देवाच्या राज्याचे नागरिक कोण बनू शकतात?

देवाच्या राज्याची भाषा, इतिहास व कायदे यांबाबत आपण काय करण्याची गरज आहे?

देवाच्या राज्याच्या नागरिकांना देवाचे स्तर प्रिय असल्याचे ते कशा प्रकारे दाखवतात?

१, २. पौलाने फिलिप्पै येथील मंडळीला दिलेल्या सल्ल्याचा खास अर्थ का होता?

 प्रेषित पौलाने फिलिप्पै येथील मंडळीला असे प्रोत्साहन दिले: “ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा.” (फिलिप्पैकर १:२७ वाचा.) “आचरण ठेवा” या शब्दांसाठी पौलाने वापरलेल्या ग्रीक वाक्यांशाचे भाषांतर “नागरिकांसारखे आचरण ठेवा,” असेही केले जाऊ शकते. फिलिप्पै येथील मंडळीकरता या वाक्यांशाचा खास अर्थ होता. का? कारण, असे दिसते की फिलिप्पै हे शहर त्या मोजक्या शहरांपैकी एक होते ज्यांतील रहिवाशांना रोमन नागरिकत्व देण्यात आले होते. फिलिप्पैमधील व सबंध रोमन साम्राज्यातील रहिवाशांना त्यांच्या रोमन नागरिकत्वाचा अभिमान होता आणि त्यांना रोमन कायद्याचे खास संरक्षण मिळाले होते.

पण, फिलिप्पै येथील मंडळीच्या सदस्यांनी अभिमान बाळगण्याचे यापेक्षाही एक मोठे कारण होते. पौलाने त्यांना आठवण करून दिली, की ते अभिषिक्‍त ख्रिस्ती असल्यामुळे त्यांचे नागरिकत्व “स्वर्गात” होते. (फिलिप्पै. ३:२०) ते कोणत्याही मानवी साम्राज्याचे नव्हे, तर देवाच्या राज्याचे नागरिक होते. त्यामुळे, त्यांना अतुलनीय संरक्षण व फायदे मिळाले होते.—इफिस. २:१९-२२.

३. (क) देवाच्या राज्याचे नागरिक बनण्याची संधी कोणाला आहे? (ख) आपण या लेखात कशाविषयी चर्चा करणार आहोत?

“नागरिकांसारखे आचरण ठेवा” हा पौलाने दिलेला सल्ला प्रामुख्याने, जे ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करतील त्यांना लागू होतो. (फिलिप्पै. ३:२०) पण, जे देवाच्या राज्याची पृथ्वीवरील प्रजा बनतील त्यांनादेखील हा सल्ला लागू होऊ शकतो. का? कारण सर्वच समर्पित ख्रिस्ती एकाच राजाची म्हणजे यहोवाची सेवा करतात आणि त्यांनी सारख्याच स्तरांचे पालन केले पाहिजे. (इफिस. ४:४-६) आज लोक, एखाद्या समृद्ध देशाचे नागरिक बनण्यास पात्र ठरण्यासाठी जिवापाड प्रयत्न करतात. तर मग, देवाच्या राज्याचे नागरिक बनण्याची जी संधी आपल्याला मिळाली आहे तिला आपण किती जास्त मौल्यवान लेखले पाहिजे! आपल्याला मिळालेल्या या विशेषाधिकाराबद्दल आपली कदर आणखी वाढवण्यासाठी, मानवी सरकारांचे नागरिक आणि देवाच्या राज्याचे नागरिक बनण्यास आपण ज्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत त्यांच्यापैकी काही समान अपेक्षांचा विचार करू या. त्यानंतर, देवाच्या राज्याचे नागरिक असण्याचा सन्मान टिकवून ठेवण्यासाठी ज्या तीन गोष्टी केल्या पाहिजेत त्यांचे आपण परीक्षण करणार आहोत.

नागरिकांकडून केल्या जाणाऱ्‍या अपेक्षा

४. शुद्ध भाषा काय आहे, आणि आपण ती कशा प्रकारे बोलू शकतो?

भाषा शिकून घ्या. नागरिकत्वासाठी अर्ज करणाऱ्‍यांना आपल्या देशाची प्रमुख भाषा बोलायला आली पाहिजे अशी अपेक्षा काही मानवी सरकारे करतात. नागरिकत्व देण्यात आल्यानंतरही, लोकांना ती नवीन भाषा शिकण्यासाठी कितीतरी वर्षे प्रयत्न करावे लागू शकतात. ते कदाचित व्याकरणाचे नियम लवकर शिकून घेतील, पण शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करता येण्यासाठी आणखी काही काळ लागू शकतो. त्याच प्रकारे, देवाचे राज्य आपल्या नागरिकांकडून अपेक्षा करते की त्यांनी बायबलमध्ये जिला “शुद्ध वाणी” किंवा भाषा असे म्हटले आहे ती शिकून घ्यावी. (सफन्या ३:९ वाचा.) ही भाषा काय आहे? ही भाषा म्हणजे बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे देवाबद्दल व त्याच्या उद्देशांबद्दलचे सत्य होय. आपण जेव्हा देवाच्या नियमांनुसार व तत्त्वांनुसार आचरण करतो, तेव्हा खरेतर आपण ही शुद्ध भाषा ‘बोलत’ असतो. देवाच्या राज्याचे नागरिक कदाचित बायबलच्या मूलभूत शिकवणी लवकर शिकून बाप्तिस्मा घेतील. पण, त्यांच्या बाप्तिस्म्यानंतरही त्यांनी शुद्ध भाषा आणखी चांगल्या प्रकारे ‘बोलत’ राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे कसे करता येईल? आपल्यापैकी प्रत्येकाने बायबलमधून शिकलेल्या गोष्टींनुसार आचरण करण्याचा जिवापाड प्रयत्न केला पाहिजे.

५. यहोवाच्या संघटनेच्या इतिहासाविषयी आपण होताहोईल तितके का शिकून घेतले पाहिजे?

इतिहास जाणून घ्या. जी व्यक्‍ती एखाद्या मानवी सरकारची नागरिक बनू इच्छिते तिला कदाचित त्या सरकारच्या इतिहासाविषयी शिकून घ्यावे लागेल. त्याच प्रकारे, देवाच्या राज्याचे नागरिक बनू इच्छिणाऱ्‍यांनी देवाच्या राज्याबद्दल होताहोईल तितके शिकून घेतले पाहिजे. कोरहाच्या पुत्रांचे उदाहरण विचारात घ्या, जे प्राचीन इस्राएलात सेवा करायचे. त्यांचे जेरूसलेमवर व तेथे जे उपासनेचे ठिकाण होते त्यावर खूप प्रेम होते आणि ते मोठ्या आनंदाने त्या शहराच्या इतिहासाविषयी सांगायचे. त्या शहराच्या सुंदरतेमुळे नव्हे, तर ते शहर “राजाधिराजाचे” म्हणजे यहोवाचे “नगर” होते त्यामुळे ते त्यांना प्रिय होते. जेरूसलेममधील उपासनास्थळात यहोवाचे नियमशास्त्र शिकवले जायचे व लोक तेथे त्याची उपासना करायचे. जेरूसलेमचा राजाधिराज या नात्याने यहोवाने आपल्या प्रजेबद्दल प्रेमदया व्यक्‍त केली. (स्तोत्र ४८:१, २, ९, १२, १३ वाचा.) कोरहाच्या पुत्रांप्रमाणे, तुम्हालासुद्धा यहोवाच्या संघटनेच्या पृथ्वीवरील भागाच्या इतिहासाविषयी जाणून घेण्याची आणि त्याविषयी इतरांना सांगण्याची इच्छा आहे का? यहोवा देवाच्या संघटनेविषयी आणि तो कशा प्रकारे त्याच्या लोकांना साहाय्य करतो याविषयी तुम्ही जितके जास्त शिकाल, तितकेच जास्त तुम्हाला देवाचे राज्य खरे वाटेल. आणि राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याची तुमची इच्छा आपोआपच वाढेल.—यिर्म. ९:२४; लूक ४:४३.

६. आपण देवाच्या राज्याच्या कायद्यांविषयी व तत्त्वांविषयी शिकून घ्यावे अशी अपेक्षा यहोवा आपल्याकडून करतो ते योग्यच का आहे?

कायद्यांबद्दल जाणून घ्या. आपल्या नागरिकांनी देशातील कायद्यांबद्दल जाणून घ्यावे आणि त्यांचे पालन करावे अशी अपेक्षा मानवी सरकारे करतात. तर मग, देवाच्या राज्याच्या सर्व नागरिकांना लागू होणाऱ्‍या कायद्यांबद्दल व तत्त्वांबद्दल आपण शिकून घ्यावे व त्यांचे पालन करावे अशी अपेक्षा यहोवा आपल्याकडून करतो ते योग्यच आहे असे म्हणता येईल. (यश. २:३; योहा. १५:१०; १ योहा. ५:३) मानवी कायद्यांमध्ये सहसा उणिवा असतात व कधीकधी ते अन्यायी वाटू शकतात. त्याउलट, यहोवाचे “नियमशास्त्र परिपूर्ण आहे.” (स्तो. १९:७) तर मग, देवाचे नियम आपल्याला प्रिय वाटतात का आणि आपण दररोज त्याचे वचन बायबल वाचतो का? (स्तो. १:१, २) देवाचे नियम शिकून घेण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे आपण स्वतः त्यांचा अभ्यास केला पाहिजे. हे आपल्याकरता इतर कोणीही करू शकत नाही.

राज्याच्या नागरिकांना देवाचे स्तर प्रिय वाटतात

७. देवाच्या राज्याचे नागरिक कोणत्या उच्च स्तरांनुसार जगतात?

देवाच्या राज्याचे नागरिकत्व टिकवून ठेवण्यासाठी, आपल्याला देवाच्या स्तरांची माहिती असणेच पुरेसे नाही, तर ते स्तर आपल्याला प्रिय वाटले पाहिजेत. मानवी सरकारांचे अनेक नागरिक म्हणतात, की ते ज्या देशात राहतात त्या देशाचे कायदे व स्तर त्यांना मान्य आहेत. पण, जेव्हा त्यांना एखादा कायदा गैरसोयीचा वाटतो आणि आपल्याला कोणीच पाहत नाही असे त्यांना वाटते, तेव्हा ते त्या कायद्याचे उल्लंघन करतात. सहसा, हे लोक “माणसांना” संतोषविणारे असतात. (कलस्सै. ३:२२) पण, देवाच्या राज्याचे नागरिक उच्च स्तरांनुसार जगतात. आपण आनंदाने देवाच्या नियमांचे पालन करतो; इतर माणसे आपल्याला पाहत नसतात तेव्हासुद्धा. का? कारण, ज्याने हे कायदे बनवले आहेत त्याच्यावर आपले प्रेम आहे.—यश. ३३:२२; लूक १०:२७ वाचा.

८, ९. देवाचे कायदे तुम्हाला खरोखर प्रिय वाटतात की नाही हे तुम्ही कसे ओळखू शकता?

देवाचे कायदे तुम्हाला खरोखर प्रिय वाटतात की नाही हे तुम्ही कसे ओळखू शकता? वैयक्‍तिक आवडीनिवडींच्या बाबतीत—जसे की पेहरावाच्या बाबतीत तुम्हाला सल्ला दिला जातो तेव्हा तुम्ही कशी प्रतिक्रिया व्यक्‍त करता याचे परीक्षण करा. देवाच्या राज्याचे नागरिक बनण्यापूर्वी तुमचा पेहराव कदाचित गबाळा किंवा उत्तेजक असेल. पण, जसजसे देवाबद्दलचे तुमचे प्रेम वाढत गेले, तसतसे तुम्ही अशा प्रकारचा पेहराव करण्याचे शिकून घेतले ज्यामुळे देवाचा सन्मान होतो. (१ तीम. २:९, १०; १ पेत्र ३:३, ४) आता तुमचा पेहराव सभ्य आहे असे कदाचित तुम्हाला वाटत असेल. पण, तुमचा पेहराव मंडळीतील अनेकांना गंभीर अडखळण ठरत आहे असे एखाद्या वडिलाने तुम्हाला सांगितल्यास, तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्ही बचावात्मक पवित्रा घ्याल का, चिडाल का, किंवा आपल्याच आवडीनिवडींवर अडून राहाल का? देवाच्या राज्याचा एक मूलभूत नियम म्हणजे त्या राज्याच्या सर्व नागरिकांनी ख्रिस्ताचे अनुकरण केले पाहिजे. (१ पेत्र २:२१) येशूने मांडलेल्या उदाहरणाबद्दल प्रेषित पौलाने असे लिहिले: “आपणापैकी प्रत्येक जणाने शेजाऱ्‍याची उन्‍नती होण्याकरिता त्याचे बरे करून त्याच्या सुखाकडे पाहावे. कारण ख्रिस्तानेही स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही.” (रोम. १५:२, ३) मंडळीतील शांती टिकवून ठेवण्यासाठी, प्रौढ ख्रिस्ती इतरांच्या विवेकाचा आदर करून, न चिडता नमते घेण्यास तयार असतात.—रोम. १४:१९-२१.

आणखी दोन महत्त्वाच्या मुद्द्‌यांचा विचार करा: लैंगिक संबंधांबद्दल आपली मनोवृत्ती आणि विवाहाबद्दल असलेला आपला दृष्टिकोन. जे अद्याप देवाच्या राज्याचे नागरिक नाहीत ते कदाचित समलैंगिक संबंधांचे समर्थन करत असतील, पोर्नोग्राफी (अश्‍लील साहित्य) एक प्रकारचे मनोरंजन आहे आणि त्यामुळे काहीच नुकसान होणार नाही असे मानत असतील; तसेच, व्यभिचार आणि घटस्फोट या सर्वस्वी वैयक्‍तिक बाबी आहेत असा विचार ते करत असतील. पण, देवाच्या राज्याचे नागरिक मात्र आपल्या वर्तनाचा आपल्या भविष्यावर व इतर लोकांवर कोणता परिणाम होऊ शकतो याचा विचार करण्यास शिकले आहेत. ख्रिस्ती बनण्यापूर्वी त्यांपैकी अनेक जण अनैतिक जीवन जगत होते. पण, आता ते लैंगिक संबंध व विवाह या देवाकडून मिळालेल्या देणग्या आहेत असे मानतात. ते यहोवाच्या उच्च नैतिक स्तरांची कदर करतात; आणि मनापासून हे कबूल करतात, की लैंगिक गैरवर्तन करत राहणारे देवाच्या राज्याचे नागरिक बनण्यास लायक नाहीत. (१ करिंथ. ६:९-११) पण, राज्याचे नागरिक हेदेखील ओळखतात, की हृदय हे कपटी आहे. (यिर्म. १७:९) म्हणून, उच्च नैतिक स्तर टिकवून ठेवण्यासाठी त्यांना मिळणाऱ्‍या सुस्पष्ट सूचनांची ते खूप कदर करतात.

देवाच्या राज्याचे नागरिक इशाऱ्‍यांची कदर करतात

१०, ११. देवाचे राज्य वेळोवेळी कोणत्या सूचना देते, आणि अशा सूचनांबद्दल तुम्हाला कसे वाटते?

१० मानवी सरकारे कधीकधी खाद्यपदार्थांविषयी व औषधींविषयी नागरिकांना धोक्याच्या सूचना देतात. अर्थात, सर्वच खाद्यपदार्थ व औषधी हानिकारक नसतात. पण, एखाद्या विशिष्ट वस्तूपासून धोका असेल, तर आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी सरकार कदाचित काही विशिष्ट सूचना देईल. असे केले नाही, तर सरकार नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याविषयी दोषी ठरेल. त्याच प्रकारे, देवाचे राज्य नैतिक व आध्यात्मिक धोक्यांविषयी वेळोवेळी सूचना किंवा ताकीद देते. उदाहरणार्थ, आज इंटरनेट संपर्क करण्याचे, शिक्षण देण्याचे आणि मनोरंजनाचे एक उपयोगी माध्यम बनले आहे. देवाची संघटना इंटरनेटचा वापर करते आणि त्याद्वारे अनेक चांगल्या गोष्टी साध्य करते. पण, इंटरनेटवरील अनेक साइट्‌स नैतिक व आध्यात्मिकदृष्ट्या धोकादायक आहेत. ज्या वेब साइट्‌सवर पोर्नोग्राफी असते त्या साइट्‌स राज्याच्या नागरिकांच्या आध्यात्मिक आरोग्याला साहजिकच धोका निर्माण करतात. अशा साइट्‌सबद्दल विश्‍वासू दासवर्ग आपल्याला अनेक दशकांपासून सूचना देत आला आहे. आपल्या आध्यात्मिक आरोग्याबद्दल मिळणाऱ्‍या या सूचनांसाठी आपण किती कृतज्ञ आहोत!

११ अलीकडच्या काळात, आणखी एका प्रकारच्या वेब साइट्‌स खूप लोकप्रिय झाल्या आहेत. या साइट्‌सना सोशल नेटवर्किंग साइट्‌स या नावाने ओळखले जाते. या साइट्‌सचा खूप काळजीपूर्वक वापर केल्यास त्या आपल्याकरता उपयोगी ठरू शकतात. पण, या साइट्‌समुळे धोकेदेखील संभवू शकतात. त्यांमुळे एक व्यक्‍ती वाईट लोकांच्या संगतीत अडकू शकते. (१ करिंथ. १५:३३) म्हणूनच, देवाच्या संघटनेने अशा साइट्‌सच्या वापराबद्दल काही विशिष्ट सूचना दिल्या आहेत याचे आपल्याला आश्‍चर्य वाटू नये. * अशा साइट्‌सचा वापर करताना या सूचनांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे एखाद्या शक्‍तिशाली औषधाच्या बाटलीवर लिहिलेल्या सूचना न वाचता ते औषध घेण्यासारखे आहे.

१२. सूचनांकडे दुर्लक्ष करणे मूर्खपणाचे का आहे?

१२ विश्‍वासू दासाने दिलेल्या सूचनांकडे जे दुर्लक्ष करतात ते स्वतःचे व त्यांच्या प्रियजनांचे नक्कीच नुकसान करून बसतात. उदाहरणार्थ, काही जणांना पोर्नोग्राफी पाहण्याची सवय जडली आहे किंवा त्यांनी अनैतिक कृत्य केले आहे. आणि आपण केलेले कृत्य यहोवा पाहू शकत नाही असा विचार करण्याद्वारे त्यांनी स्वतःची फसवणूक केली आहे. आपण यहोवापासून आपली कृत्ये लपवू शकतो असा विचार करणे खरोखर किती मूर्खपणाचे आहे! (नीति. १५:३; इब्री लोकांस ४:१३ वाचा.) देव अशा व्यक्‍तींना साहाय्य करू इच्छितो. आणि त्यांना मदत करण्यासाठी तो पृथ्वीवरील त्याच्या प्रतिनिधींना प्रेरित करतो. (गलती. ६:१) पण, ज्या प्रकारे मानवी सरकारे एखाद्या नागरिकाने केलेल्या गैरकृत्यामुळे त्याचे नागरिकत्व काढून घेऊ शकतात, त्याच प्रकारे जे लोक अपश्‍चात्तापीपणे यहोवाच्या स्तरांविरुद्ध वागतात त्यांचे नागरिकत्व तो काढून घेईल. * (१ करिंथ. ५:११-१३) असे असले, तरीसुद्धा यहोवा दयाळू आहे. त्यामुळे, जे पश्‍चात्ताप करून आपले वर्तन सुधारतात ते पुन्हा एकदा यहोवासोबत चांगला नातेसंबंध जोडू शकतात आणि त्याच्या राज्याचे नागरिक म्हणून टिकून राहू शकतात. (२ करिंथ. २:५-८) आपल्याला अशा प्रेमळ राजाची सेवा करण्याचा किती मोठा सन्मान लाभला आहे!

राज्याचे नागरिक शिक्षणाला मौल्यवान समजतात

१३. देवाच्या राज्याचे नागरिक शिक्षणाची कदर करतात हे ते कशा प्रकारे दाखवू शकतात?

१३ अनेक मानवी सरकारे आपल्या नागरिकांना शिक्षण देण्यासाठी खूप मेहनत घेतात. नागरिकांना साक्षर करण्यासाठी आणि त्यांना व्यावहारिक कौशल्ये शिकवण्यासाठी ही सरकारे शाळा-महाविद्यालये स्थापन करतात. देवाच्या राज्याचे नागरिक या शाळांचे महत्त्व ओळखून लिहिण्या-वाचण्यास शिकण्यासाठी मेहनत करतात, जेणेकरून त्यांना स्वतःचा उदरनिर्वाह करता येईल. पण, देवाच्या राज्याचे नागरिक या नात्याने ते या शिक्षणापेक्षाही देवाच्या राज्याकडून मिळणाऱ्‍या शिक्षणाची आणखी जास्त कदर करतात. यहोवा ख्रिस्ती मंडळीद्वारे आपल्या नागरिकांना शिक्षण देतो. पालकांना प्रोत्साहन दिले जाते की त्यांनी आपल्या मुलांना वाचून दाखवावे. विश्‍वासू दास दर महिन्याला टेहळणी बुरूज नियतकालिकात बायबलवर आधारित कितीतरी माहिती प्रकाशित करतो. जर तुम्ही दररोज या नियतकालिकाची एखाद-दोन पाने वाचली, तर महिन्याभरात तुम्ही ते वाचून पूर्ण करू शकता. अशा रीतीने, आज यहोवा त्याच्या राज्याबद्दल देत असलेल्या शिक्षणापासून तुम्हाला खूप फायदा होईल.

१४. (क) आपल्याला कोणते शिक्षण मिळत आहे? (ख) कौटुंबिक उपासनेविषयी दिलेल्या कोणत्या सूचना तुम्हाला खासकरून आवडल्या आहेत?

१४ देवाच्या राज्याच्या नागरिकांना दर आठवड्याला होणाऱ्‍या सभांमध्ये शिक्षण दिले जाते. उदाहरणार्थ, मागील ६० पेक्षा जास्त वर्षांपासून ईश्‍वरशासित सेवा प्रशालेने विद्यार्थ्यांना देवाच्या वचनाचे परिणामकारक शिक्षक होण्यास साहाय्य केले आहे. या प्रशालेत तुम्ही आपले नाव नोंदवले आहे का? अलीकडील वर्षांत विश्‍वासू दासाने कुटुंबांना दर आठवड्याला कौटुंबिक उपासना करण्याचे खास प्रोत्साहन दिले आहे. या व्यवस्थेमुळे कुटुंबे आणखी मजबूत बनतात. कौटुंबिक उपासनेविषयी आपल्या प्रकाशनांमध्ये दिलेल्या सूचना लागू करण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे का? *

१५. आपल्याला लाभलेला एक अतिशय मोठा विशेषाधिकार कोणता आहे?

१५ मानवी सरकारांचे नागरिक एखाद्या राजकीय पक्षाला पाठिंबा देण्यासाठी सार्वजनिक रीत्या प्रचार करतात. कधीकधी तर प्रचार करण्यासाठी ते घरोघरीही जातात. देवाच्या राज्याचे नागरिक यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणावर, आवेशाने देवाच्या राज्याला आपला पाठिंबा दर्शवतात. रस्त्यांवर आणि घरोघरी सुवार्तेची घोषणा करण्याद्वारे ते असे करतात. याआधीच्या अभ्यास लेखात उल्लेख केल्याप्रमाणे, यहोवाच्या राज्याची घोषणा करणारे टेहळणी बुरूज नियतकालिक आजच्या तारखेला जगातील सर्वात जास्त प्रमाणात वितरित केले जाणारे नियतकालिक आहे! देवाच्या राज्याबद्दल इतरांना सांगणे हा आपल्याला लाभलेला एक अतिशय मोठा विशेषाधिकार आहे. तर मग, तुम्ही या प्रचार कार्यात आवेशाने सहभाग घेत आहात का?—मत्त. २८:१९, २०.

१६. तुम्ही देवाच्या राज्याचे एक उत्तम नागरिक आहात हे तुम्ही कसे दाखवून देऊ शकता?

१६ लवकरच, देवाचे राज्य हे पृथ्वीवर शासन चालवणारे एकमेव सरकार असेल. लोकांच्या दैनंदिन जीवनातील आध्यात्मिक बाबींवरच नव्हे, तर इतर सर्व व्यवहारांवरही ते देखरेख करेल. तो दिवस येईल तेव्हा तुम्हीही देवाच्या राज्याच्या उत्तम नागरिकांपैकी एक असाल का? तर मग, आजच तुम्ही हे सिद्ध करून दाखवू शकता. दैनंदिन जीवनात तुम्ही जे काही लहानमोठे निर्णय घेता त्या सर्वांतून देवाचे गौरव होईल याची काळजी घ्या. आणि अशा रीतीने, तुम्ही देवाच्या राज्याच्या एका उत्तम नागरिकाला शोभेल असे आचरण करत आहात हे दाखवून द्या.—१ करिंथ. १०:३१.

[तळटीपा]

^ परि. 11 उदाहरणार्थ, सजग होइए! जानेवारी – मार्च २०१२, पृष्ठे १४-२० पाहा.

^ परि. 14 टेहळणी बुरूज, १५ ऑगस्ट २०११, पृष्ठे ६-७ आणि आमची राज्य सेवा, जानेवारी २०११, पृष्ठे ३-६ पाहा.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१४ पानांवरील संक्षिप्त आशय]

इंटरनेटविषयी दिल्या जाणाऱ्‍या बायबल आधारित इशाऱ्‍यांकडे तुम्ही लक्ष देता का?

[१२ पानांवरील चित्र]

कोरहाच्या पुत्रांप्रमाणे, तुम्हाला शुद्ध उपासना व तिचा इतिहास प्रिय आहे का?

[१५ पानांवरील चित्र]

दर आठवड्याची तुमची कौटुंबिक उपासना तुम्हाला व तुमच्या प्रियजनांना देवाच्या राज्याचे उत्तम नागरिक बनण्यास बरीच प्रेरणा देऊ शकते