व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ऐक्य व रोमांचक योजनांमुळे संस्मरणीय ठरलेली एक सभा

ऐक्य व रोमांचक योजनांमुळे संस्मरणीय ठरलेली एक सभा

वार्षिक सभेचा अहवाल

ऐक्य व रोमांचक योजनांमुळे संस्मरणीय ठरलेली एक सभा

वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेन्सिल्वेनियाच्या वार्षिक सभेकडे नेहमीच मोठ्या उत्साहाने पाहिले जाते. शनिवार १ ऑक्टोबर २०११ रोजी भरलेल्या १२७ व्या वार्षिक सभेबद्दलही हेच म्हणता येईल! या सभेसाठी, जगभरातील आमंत्रित पाहुणे अमेरिकेतील न्यू जर्झी राज्याच्या जर्झी सिटीत असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या संमेलनगृहात जमले होते.

नियमन मंडळाच्या गेरिट लॉश यांनी सभेसाठी जमलेल्या आनंदी पाहुण्यांचे स्वागत केले. जवळजवळ ८५ देशांतून आलेल्या पाहुण्यांना त्यांनी सांगितले की आपण एक खास आंतरराष्ट्रीय ऐक्य अनुभवत आहोत. अशा ऐक्यामुळे लोकांना चांगली साक्ष दिली जाते आणि यहोवाचा सन्मान होतो. खरेतर, या ऐक्याविषयी सबंध सभेदरम्यान अनेकदा उल्लेख करण्यात आला.

मेक्सिकोहून चांगला अहवाल

कार्यक्रमातील पहिल्या भागात यहोवाच्या लोकांमध्ये असलेल्या ऐक्याची काही उदाहरणे सांगण्यात आली. बाल्तासार पेरला यांनी मेक्सिको बेथेल कुटुंबात त्यांच्यासोबत सेवा करणाऱ्‍या तीन बांधवांची मुलाखत घेतली. अलीकडेच मध्य अमेरिकेतील सहा शाखा कार्यालयांना मेक्सिको शाखा कार्यालयात सामील करण्यात आले. त्याविषयी बंधू पेरला यांनी त्या तीन बांधवांना विचारले. या सहा शाखांना मेक्सिको शाखेसोबत एकत्र केल्यामुळे मेक्सिकोतील बेथेल कुटुंब आता बहुसांस्कृतिक व आंतरराष्ट्रीय बनले आहे. विविध देशांतील सहविश्‍वासू बंधुभगिनींच्या आगमनामुळे सर्वांनाच प्रोत्साहन मिळाले आहे. देवाने जणू एक मोठा खोडरबर घेऊन या राष्ट्रांच्या सीमारेषा मिटवल्या आहेत.

ज्या शाखांना मेक्सिको शाखेत सामील करण्यात आले आहे त्या देशांतील बंधुभगिनींना यहोवाच्या संघटनेपासून दूर झाल्यासारखे वाटू नये म्हणून त्यांना साहाय्य करण्याची गरज होती. त्यासाठी, प्रत्येक मंडळीला एक सुरक्षित ई-मेल कनेक्शन देण्यात आले आहे, जेणेकरून दुर्गम भागांतील मंडळ्यासुद्धा थेट शाखा कार्यालयाशी संपर्क साधू शकतील.

जपानचे अलीकडील वृत्त

मार्च २०११ मध्ये झालेल्या भूकंपामुळे व त्सुनामीमुळे जपानमधील आपले बंधुभगिनी कसे प्रभावित झाले होते त्याविषयी जपान शाखा कार्यालयाच्या जेम्स लिंटन यांनी स्पष्ट करून सांगितले. अनेक साक्षीदारांचे प्रियजन मरण पावले व त्यांनी आपली साधनसंपत्ती गमावली. प्रभावित क्षेत्रापासून दूर असलेल्या साक्षीदारांनी ३,१०० पेक्षा जास्त घरे व शेकडो गाड्या उपलब्ध करून दिल्या. बांधवांच्या घरांची दुरुस्ती करण्यासाठी प्रादेशिक बांधकाम समितीच्या स्वयंसेवकांनी दिवसरात्र काम केले. १,७०० पेक्षा जास्त स्वयंसेवक गरज पडेल तेथे सेवा करण्यासाठी पुढे आले. अमेरिकेहून आलेल्या स्वयंसेवकांच्या एका गटाने राज्य सभागृहांच्या दुरुस्ती कामात मदत केली. या प्रकल्पावर एकूण ५७५ स्वयंसेवकांनी कार्य केले.

प्रभावित झालेल्यांच्या आध्यात्मिक व भावनिक गरजांकडे खूप लक्ष देण्यात आले आहे. मेंढपाळ भेटी देण्याची गरज होती अशा ठिकाणी ४०० पेक्षा जास्त वडिलांनी सेवा केली. संकटग्रस्त क्षेत्रातील बंधुभगिनींना उत्तेजन देण्यासाठी जागतिक मुख्यालयातील दोन परिमंडळ पर्यवेक्षकांनी (झोन ओव्हरसियर) जपानला भेट दिली. यावरून नियमन मंडळाला बंधुभगिनींची किती काळजी आहे हे दिसून आले. जगभरातील साक्षीदारांनी व्यक्‍त केलेल्या भावनांमुळे प्रभावितांना खूप सांत्वन मिळाले आहे.

न्यायालयीन प्रकरणांत विजय

ब्रिटन शाखा कार्यालयाच्या स्टीफन हार्डी यांनी इतर काही बांधवांसोबत न्यायालयीन प्रकरणांत अलीकडे मिळालेल्या विजयांची चर्चा केली तेव्हा सर्व जण बारीक लक्ष देऊन ऐकत होते. उदाहरणार्थ, फ्रान्सच्या सरकारने फ्रान्समधील यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिकृत निगमाकडून ८ कोटी २० लाख अमेरिकन डॉलर्सचा कर भरण्याची मागणी केली होती. पण, मानवी हक्कांच्या युरोपियन न्यायालयाने (ईसीएचआर) आपल्या बाजूने निकाल दिला, तेव्हा हे प्रकरण मिटले. न्यायालयाने दिलेल्या निकालात म्हटले, की फ्रान्सच्या सरकारने युरोपियन करारातील, धार्मिक स्वातंत्र्याचे संरक्षण करणाऱ्‍या ९ व्या कलमाचे उल्लंघन केले होते. निकालात जे म्हटले होते त्यावरून दिसून येते, की हे प्रकरण आर्थिक बाबीविषयी नव्हते; कारण त्यात असे म्हटले होते: “एका धार्मिक संस्थेला मान्यता देण्याचे नाकारणे, धर्माचा अधिकृत निगम मिटवून टाकण्याचा प्रयत्न करणे, त्या धर्माविरुद्ध अपमानास्पद शब्दांचा वापर करणे, या सर्व गोष्टी युरोपियन करारातील कलम ९ मध्ये देण्यात आलेले धार्मिक हक्क नाकारण्याची उदाहरणे आहेत.”

ईसीएचआरने आर्मीनियातील एका प्रकरणातही आपल्या बाजूने निकाल दिला. १९६५ पासून ईसीएचआरची अशी भूमिका होती, की युरोपियन करार एका व्यक्‍तीला बंधनकारक लष्करी सेवेला नकार देण्याचा हक्क देत नाही. पण, ग्रँड चेंबरने—युरोपियन न्यायालयाच्या सर्वोच्च खंडपीठाने असा निर्णय दिला, की “एक व्यक्‍ती आपल्या धार्मिक विश्‍वासांमुळे लष्करी सेवेला नकार देत असेल, तर युरोपियन करार तसे करण्याचा हक्क त्या व्यक्‍तीला देतो.” न्यायलयाने दिलेल्या या निर्णयाचे पालन करणे आर्मीनियाला तसेच आझरबाइजान व टर्की यांसारख्या देशांना बंधनकारक आहे.

बांधकाम प्रकल्प

नंतर नियमन मंडळाच्या गाय पिअर्स यांनी भाषण दिले. त्यांनी म्हटले, की उपस्थित सर्व जण न्यू यॉर्क राज्यात होत असलेल्या आपल्या बांधकाम प्रकल्पांविषयी जाणून घेण्यास उत्सुक आहेत. त्यांनी वॉलकिल, पॅटरसन, आणि अलीकडेच न्यू यॉर्कमध्ये विकत घेतलेल्या वॉरविक व टक्सिडो येथील जमिनींवर चाललेल्या बांधकामाचा एक व्हिडिओ दाखवला. वॉलकिल येथे २०१४ पर्यंत एक इमारत बांधून पूर्ण झालेली असेल, ज्यामुळे राहण्यासाठी ३०० अतिरिक्‍त खोल्या उपलब्ध होतील.

वॉरविकमध्ये असलेल्या २४८ एकर (१०० हेक्टर) जमिनीवर बांधकाम सुरू करण्याची योजना आहे. बंधू पिअर्स यांनी म्हटले: “वॉरविकविषयी यहोवाची काय इच्छा आहे याबद्दल आताच आम्ही नेमकेपणाने सांगू शकत नाही. पण, यहोवाच्या साक्षीदारांचे जागतिक मुख्यालय येथे हलवण्याच्या उद्देशाने आम्ही बांधकामास सुरुवात करण्याची तयारी करत आहोत.” वॉरविकच्या उत्तरेकडे १० किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या ५० एकर (२० हेक्टर) जमिनीवर वॉरविकमधील बांधकामाला लागणारी यंत्रे व इतर बांधकाम साहित्य ठेवण्याची योजना आहे. बंधू पिअर्स पुढे म्हणाले: “बांधकामाची मंजुरी मिळाल्यावर, चार वर्षांच्या आत हा प्रकल्प पूर्ण होईल अशी आम्हाला आशा आहे. मग आपण ब्रुकलिनमधील आपली मालमत्ता विकू शकतो.”

“मोठे संकट जवळ असण्याबाबत नियमन मंडळाचा विचार बदलला आहे का?” असा प्रश्‍न बंधू पिअर्स यांनी केला. त्यांनी उत्तर दिले: “मुळीच नाही. बांधकाम सुरू असताना जर मोठे संकट आले, तर उत्तम, अगदीच उत्तम!”

गर्जणाऱ्‍या सिंहापासून सावध राहा

त्यानंतर, नियमन मंडळाच्या स्टीफन लेट्‌ यांनी १ पेत्र ५:८ या वचनावर चर्चा केली: “सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्‍या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो.” बंधू लेट्‌ म्हणाले, की सिंहांची अनेक वैशिष्ट्ये लक्षात घेता, पेत्राने सैतानाचे वर्णन करण्यासाठी वापरलेले हे उदाहरण अगदी योग्य वाटते.

सिंह मनुष्यांपेक्षा जास्त शक्‍तिशाली व चपळ असतात, त्यामुळे आपण स्वतःच्या बळावर सैतानाशी लढण्याचा किंवा त्याच्यापासून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करू नये. त्यासाठी आपल्याला यहोवाच्या साहाय्याची गरज आहे. (यश. ४०:३१) सिंह सहसा लपून-छपून शिकार करतो, त्यामुळे आपण आध्यात्मिक अंधकारात चालण्याचे टाळले पाहिजे, जेथे सैतान आपले भक्ष्य शोधत असतो. जसा सिंह एखाद्या निरुपद्रवी हरिणाला किंवा झोपेत असलेल्या झेब्र्याच्या पिलाला मारून टाकतो, तसेच सैतानही निर्दयी आहे आणि आपल्याला मारून टाकण्यास त्याला खूप आवडेल. आणि सिंह जेव्हा खाऊन तृप्त होतो तेव्हा त्याच्या भक्ष्याला ओळखणे शक्य नसते. त्याच प्रकारे, जे आध्यात्मिक रीत्या सैतानाचे भक्ष्य बनतात त्यांची “शेवटली दशा पहिल्या दशेपेक्षा वाईट” बनते. (२ पेत्र २:२०) तेव्हा, आपण सैतानाविरुद्ध खंबीरपणे उभे राहणे आणि बायबलमधून शिकलेल्या तत्त्वांना दृढतेने पकडून राहणे खूप गरजेचे आहे.—१ पेत्र ५:९.

यहोवाच्या घरातील तुमच्या स्थानाची कदर करा

त्यानंतर नियमन मंडळाच्या सॅम्युएल हर्ड्‌ यांनी आपल्या भाषणात म्हटले: “यहोवाच्या घरात आपल्या सर्वांचे एक स्थान आहे.” देवाच्या “घरात” किंवा त्याच्या आध्यात्मिक मंदिरात म्हणजेच, येशूच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर यहोवाची उपासना करण्याच्या व्यवस्थेत, सर्वच ख्रिश्‍चनांचे एक स्थान आहे. यहोवाच्या घरात आपल्याला एक स्थान आहे याबद्दल आपण कृतज्ञ असले पाहिजे. दाविदाप्रमाणे आपलीही “आयुष्यभर परमेश्‍वराच्या घरात” राहण्याची इच्छा आहे.—स्तो. २७:४.

बंधू हर्ड्‌ यांनी स्तोत्र ९२:१२-१४ या वचनांचा उल्लेख करून पुढील प्रश्‍न विचारला: “यहोवा कशा प्रकारे आपल्याला समृद्ध करतो?” त्यांनी उत्तर दिले: “आध्यात्मिक नंदनवनात देव आपल्याला ऊब देतो, आपले संरक्षण करतो, आणि ताजेतवाने करणाऱ्‍या सत्याच्या पाण्याची तरतूद करतो. म्हणून आपण यहोवाचे आभार मानू या.” यानंतर बंधू हर्ड यांनी सर्व उपस्थितांना आर्जवले: “आपण यहोवाच्या घरात समाधानी असू या—केवळ काही काळासाठी नव्हे, तर सदासर्वकाळासाठी.”

खरे ख्रिस्ती देवाच्या वचनाचा आदर करतात

नियमन मंडळाच्याच डेव्हिड स्प्लेन यांनी पुढच्या भाषणात स्पष्ट करून सांगितले, की खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी नेहमीच देवाच्या वचनाचा आदर केला आहे. पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी, सुंतेचा वाद मिटवण्यासाठी देवाच्या वचनाचा आधार घेतला. (प्रे. कृत्ये १५:१६, १७) पण, ज्यांना ग्रीक तत्त्वज्ञानाचे शिक्षण मिळाले होते अशा दुसऱ्‍या शतकातील काही नाममात्र ख्रिश्‍चनांनी देवाच्या वचनावर अवलंबून राहण्याऐवजी, ग्रीक तत्त्वज्ञानाचा अवलंब करण्यास सुरुवात केली. नंतर, इतर काही जण बायबल शिकवणींऐवजी, तथाकथित चर्च फादर्सची व रोमन सम्राटांची मते शिकवू लागले आणि अशा प्रकारे अनेक खोट्या शिकवणी उदयास आल्या.

बंधू स्प्लेन यांनी येशूच्या एका दृष्टान्ताविषयीसुद्धा सांगितले. या दृष्टान्तावरून दिसून येते, की सत्याचा पक्ष घेण्यासाठी पहिल्या शतकापासून पुढे पृथ्वीवर नेहमीच खरे अभिषिक्‍त ख्रिस्ती असणार होते. (मत्त. १३:२४-३०) ते कोण होते हे आपण निश्‍चितपणे सांगू शकत नाही. पण, मागील शतकांत अनेकांनी बायबलच्या विरुद्ध असलेल्या शिकवणींचा आणि प्रथांचा धिक्कार केला. त्यांच्यापैकी काही जण होते: ९ व्या शतकातील लियोन्सचा आर्चबिशप ॲगोबार्ड, १२ व्या शतकातील ब्रवीचा पीटर, लाऊसानचा हेन्री, आणि वॅल्डेस (किंवा वॉल्डो), १४ व्या शतकातील जॉन विक्लिफ, १६ व्या शतकातील विल्यम टिंडेल, १९ व्या शतकातील हेन्री ग्रू आणि जॉर्ज स्टॉर्झ. आजही यहोवाचे साक्षीदार बायबलच्या स्तरांचे पालन करतात आणि बायबल हे सत्याचा आधार आहे असे मानतात. त्यामुळे, नियमन मंडळाने योहान १७:१७ हे २०१२ चे वार्षिक वचन म्हणून निवडले आहे: “तुझे वचन हेच सत्य आहे.”

प्रशिक्षण व सेवेसंबंधी रोमांचक बदल

नंतर नियमन मंडळाच्या अँथनी मॉरिस यांनी एक घोषणा केली जी मिशनऱ्‍यांच्या व खास पायनियरांच्या सेवेतील बदलांच्या संदर्भात होती. सप्टेंबर २०१२ पासून इतर काही देशांमध्ये ख्रिस्ती जोडप्यांकरता बायबल प्रशाला चालवल्या जातील. मागील ऑक्टोबर महिन्यापासून गिलियड प्रशालेच्या उद्देशात फेरबदल करण्यात आला आहे. आता गिलियड प्रशालेत, आधीपासूनच खास पूर्ण-वेळ सेवेत असलेल्यांना प्रशिक्षण दिले जाईल—जसे की याआधी गिलियड प्रशालेला उपस्थित न राहिलेले मिशनरी, प्रवासी पर्यवेक्षक, किंवा बेथेलमध्ये सेवा करणारे. पदवीधरांना शाखा कार्यालयांत, प्रवासी कार्यात, किंवा दाट लोकवस्ती असलेल्या भागांतील मंडळ्यांमध्ये नियुक्‍त केले जाईल जेथे ते प्रचार कार्यात सहभाग घेतील. अशा रीतीने ते बंधुभगिनींना साहाय्य, आधार व प्रशिक्षण देऊ शकतील.

याशिवाय ज्यांना खास पायनियर म्हणून नियुक्‍त केले जाईल ते दुर्गम भागांतील नवीन क्षेत्रांत प्रचार कार्याची सुरुवात करतील. १ जानेवारी २०१२ पासून, अविवाहित बांधवांकरता बायबल प्रशाला आणि ख्रिस्ती जोडप्यांकरता बायबल प्रशाला यांतून पदवीधर झालेल्यांपैकी काहींना तात्पुरते खास पायनियर म्हणून नेमण्यात येईल असे घोषित करण्यात आले. दुर्गम भागांत प्रचार कार्याचा विस्तार करण्यासाठी व नवीन क्षेत्रांत प्रचार कार्याची सुरुवात करण्यासाठी या खास पायनियरांचा उपयोग केला जाईल. त्यांना सहसा एका वेळी एका वर्षाकरता खास पायनियर म्हणून नियुक्‍त केले जाईल. परिणामकारक ठरल्यास तीन वर्षांनंतर किंवा त्याआधी त्यांना कायमचे खास पायनियर या नात्याने नियुक्‍त केले जाऊ शकते.

सन २०११ ची वार्षिक सभा हा खरोखरच एक आनंदाचा प्रसंग होता. प्रचार कार्य आणखी मोठ्या प्रमाणात करण्याच्या व आपल्या बंधुसमाजातील ऐक्य आणखी दृढ करण्याच्या प्रयत्नांवर यहोवा आशीर्वाद देईल अशी आशा आम्ही बाळगतो. यामुळे यहोवाची महिमा व स्तुती होवो हीच आमची प्रार्थना.

[१८, १९ पानांवरील चौकट/चित्रे]

यांचा आणखी चांगला परिचय घडला

वार्षिक सभेच्या कार्यक्रमात नियमन मंडळाच्या पाच भूतपूर्व सदस्यांच्या विधवांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. मारिना सिडलिक्‌, ईडिथ सूटर, मेलिटा जॅरझ, मेल्बा बॅरी, आणि सिड्‌नी बार्बर या बहिणींनी त्यांना कशा प्रकारे सत्य शिकायला मिळाले आणि त्या कशा प्रकारे पूर्ण-वेळेच्या सेवेत उतरल्या याविषयी माहिती दिली. प्रत्येकीने जपून ठेवलेल्या काही आठवणी, आपल्या पतीचे चांगले गुण, आणि यहोवाच्या सेवेत त्यांनी एकत्र अनुभवलेले आशीर्वाद यांविषयी उपस्थितांना सांगितले. या मुलाखतींच्या शेवटी, उपस्थित असलेल्या सर्वांनी “फेथफुल विमेन, ख्रिश्‍चन सिस्टर्स” (“विश्‍वासू स्त्रिया, ख्रिस्ती भगिनी”) हे ८६ क्रमांकाचे हृदयस्पर्शी गीत गायिले.

[१९ पानांवरील चित्रे]

(वर) डॅनिएल आणि मारिना सिडलिक्‌; ग्रँट आणि ईडिथ सूटर; थिओडोर आणि मेलिटा जॅरझ

(खाली) लॉइड आणि मेल्बा बॅरी; कॅरी आणि सिड्‌नी बार्बर

[१६ पानांवरील नकाशा]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

सहा शाखा कार्यालयांना मेक्सिको शाखेत सामील करण्यात आले

मेक्सिको

ग्वाटेमाला

हाँड्युरस

एल साल्वाडॉर

निकाराग्वा

कोस्टारिका

पनामा

[१७ पानांवरील चित्र]

न्यू यॉर्कमधील वॉरविक येथे बांधण्यात येणार असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयाचा नमुना