व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“तुमच्या कर्तृत्वाचे तुम्हास फळ मिळेल”

“तुमच्या कर्तृत्वाचे तुम्हास फळ मिळेल”

“तुमच्या कर्तृत्वाचे तुम्हास फळ मिळेल”

राजा आसा आपले सैन्य घेऊन यहूदीयातील डोंगरांच्या खोऱ्‍यातून समुद्रकिनाऱ्‍याच्या दिशेने लगबगीने निघाला आहे. दरी जेथे रुंद होते तेथे आसा थांबतो व समोरचे दृश्‍य पाहून त्याला धक्काच बसतो. खोऱ्‍यात शत्रूंची छावणी आहे जी प्रचंड मोठी आहे! इथियोपियाच्या (कूशी) सैन्याची संख्या अक्षरशः दहा लाख आहे. तर, आसाच्या सैन्याची संख्या फक्‍त याच्या अर्धी आहे.

युद्ध अटळ आहे. पण असे असताना, आसा सर्वप्रथम काय करतो? त्याच्या सेनापतींना हुकूम देतो? सैन्याला प्रोत्साहन देतो? की त्याच्या कुटुंबाला पत्र लिहितो? तो यांपैकी काहीही करत नाही. तर हे संकट पुढ्यात असताना सर्वप्रथम तो प्रार्थना करतो.

त्याच्या प्रार्थनेविषयी पाहण्याआधी आणि त्या प्रसंगी काय घडले याचे परीक्षण करण्याआधी, आसा कशा प्रकारचा मनुष्य होता हे पाहू या. तो असा का वागला? त्याचे देवाकडे मदत मागणे योग्य होते का? यहोवा त्याच्या सेवकांच्या कार्यांना कसे आशीर्वादित करतो हे आसाच्या अहवालावरून आपल्याला कसे कळते?

आसाचा पूर्वेतिहास

इस्राएल राष्ट्राची दोन राज्यांत विभागणी झाल्यानंतरच्या २० वर्षांदरम्यान यहूदा पूर्णपणे मूर्तिपूजक बनले होते. इ.स.पू. ९७७ मध्ये आसा राजा बनला. एव्हाना राजदरबारातसुद्धा कनानच्या सुपीकतेच्या देवतांची उपासना केली जात होती. पण, आसाच्या कारकीर्दीविषयी देवाच्या प्रेरणेने लिहिलेला इतिहास सांगतो की त्याने “आपला देव परमेश्‍वर याच्या दृष्टीने जे चांगले व नीट ते केले.” आसाने “अन्य देवींच्या वेद्या व उच्च स्थाने काढून टाकिली. मूर्तिस्तंभ मोडिले व अशेरा मूर्ती भंगिल्या.” (२ इति. १४:२, ३) त्याने यहूदा राज्यातून “पुरुषगमन करणाऱ्‍यांस” काढून टाकले जे धर्माच्या नावाखाली अनैतिक कृत्ये करत होते. पण आसा एवढ्यावरच थांबला नाही. त्याने लोकांना: “आपल्या पूर्वजांचा देव परमेश्‍वर याच्या चरणी लागावे आणि नियमशास्त्र व आज्ञा यांचे पालन” करावे असा आग्रह केला.—१ राजे १५:१२, १३; २ इति. १४:४.

खऱ्‍या उपासनेविषयी आसाचा आवेश पाहून यहोवा आनंदित झाला आणि त्याच्या आशीर्वादामुळे राजाने कितीतरी वर्षे शांती अनुभवली. म्हणून राजा म्हणू शकला: “आपण आपला देव परमेश्‍वर याची कास धरली आहे; आपण त्याची कास धरली आहे व त्याने आपल्याला चोहोकडून स्वास्थ्य दिले आहे.” लोकांनी या परिस्थितीचा फायदा घेऊन यहूदा राज्यातील शहरांना बळकट केले. अहवाल सांगतो: “लोक नगरे वसवून समृद्ध झाले.”—२ इति. १४:१, ६, ७.

युद्धक्षेत्रात

शास्त्रात उल्लेख केलेल्या सर्वात मोठ्या मानवी सैन्याला तोंड देण्याची वेळ आली तेव्हा आसाने प्रार्थना केली, याचे आपल्याला आश्‍चर्य वाटू नये. कारण, विश्‍वासाने केलेल्या कार्यांवर देव आशीर्वाद देतो हे आसाला माहीत होते. त्याने प्रार्थनेत यहोवाला मदतीची याचना केली. त्याला याची जाणीव होती की जर तो यहोवावर विसंबून राहिला व त्याला यहोवाची मदत मिळाली तर शत्रूंची संख्या कितीही असली व ते कितीही शक्‍तिशाली असले तरी काही फरक पडणार नाही. या युद्धात यहोवाचे नाव गोवलेले होते, आणि म्हणून आसाने देवाला या आधारावर अशी विनंती केली: “हे आमच्या देवा, परमेश्‍वरा, आमचे साहाय्य कर; आमची भिस्त तुजवर आहे; आम्ही तुझ्या नामावर भरवसा ठेवून या समूहाशी सामना करण्यास आलो आहो. हे परमेश्‍वरा, तू आमचा देव आहेस; मानवांचे तुजवर वर्चस्व होऊ देऊ नको.” (२ इति. १४:११) आसा जणू असे म्हणत होता: ‘यहोवा देवा, इथियोपियन सैन्याने आम्हाला नव्हे तर तुलाच ललकारले आहे. ज्यांनी तुझे नाव धारण केले आहे त्यांचा पाडाव करण्यास अशक्‍त मानवांना परवानगी देऊ नको.’ तेव्हा, “परमेश्‍वराने आसा व यहूदी यांच्यापुढे कूशी लोकांस असा मार दिला की ते पळून गेले.”—२ इति. १४:१२.

आज यहोवाच्या लोकांना बऱ्‍याच शक्‍तिशाली शत्रूंचा सामना करावा लागतो. आपण खरोखरच्या युद्धात शस्त्रांचा वापर करून त्यांच्याशी लढणार नाही. तरीही, आपण याची खातरी बाळगू शकतो की जे विश्‍वासू जन यहोवाच्या नावाकरता आध्यात्मिक युद्ध लढतात अशांना तो विजयी ठरवेल. व्यक्‍तिशः आपल्याला पुढील गोष्टींशी संघर्ष करावा लागू शकतो: सर्वत्र पसरत चाललेली नैतिक बेपर्वाईची वृत्ती, स्वतःचे दोष, किंवा आपल्या कुटुंबावर वाईट प्रभाव पाडणाऱ्‍या गोष्टी. आपल्यासमोर यांपैकी कोणतीही परिस्थिती असली, तरी आपण आसाच्या प्रार्थनेतून प्रोत्साहन मिळवू शकतो. त्याचा विजय हा यहोवाचा विजय होता. जे कोणी देवावर विसंबून राहतात त्यांचा नेहमी विजय होतो. कोणतीही मानवी शक्‍ती यहोवाला टक्कर देऊ शकत नाही.

प्रोत्साहन व एक इशारा

आसा युद्धानंतर परतला तेव्हा अजऱ्‍या संदेष्टा त्याला भेटायला गेला. अजऱ्‍याने प्रोत्साहन देण्यासोबतच एक इशाराही दिला: “हे आसा, अहो यहूदी व बन्यामिनी लोकहो, मी म्हणतो ते श्रवण करा; तुम्ही परमेश्‍वराच्या बरोबर राहाल तोवर तो तुमच्याबरोबर राहील; तुम्ही त्यास शरण जाल तर तो तुम्हास पावेल, पण तुम्ही त्यास सोडाल तर तो तुम्हास सोडील. . . . हिंमत धरा, तुमचे हात गळू देऊ नका, कारण तुमच्या कर्तृत्वाचे तुम्हास फळ मिळेल.”—२ इति. १५:१, २, ७.

या शब्दांमुळे आपला विश्‍वास आणखी मजबूत होतो. या शब्दांवरून दिसून येते की आपण यहोवाची सेवा विश्‍वासूपणे केल्यास तो आपल्याला कधीच सोडणार नाही. आपण त्याच्याजवळ मदतीची याचना करतो तेव्हा तो आपले नक्की ऐकेल अशी खातरी आपण बाळगू शकतो. अजऱ्‍या म्हणाला “हिंमत धरा.” योग्य ते करण्यासाठी सहसा खूप धैर्याची गरज असते, पण आपल्याला हे माहीत आहे की यहोवाच्या मदतीने आपण योग्य ते करू शकतो.

आसाची आजी माका हिने “अशेराप्रीत्यर्थ एक मूर्ती घडविली होती.” त्यामुळे, तिला “राजमाता” या पदावरून काढून टाकण्याचे कठीण काम आसाला करायचे होते. त्याने हे काम पूर्ण केले आणि तिची मूर्तीही जाळून टाकली. (१ राजे १५:१३, सुबोधभाषांतर) आसाच्या निश्‍चयामुळे व धैर्यामुळे देवाने त्याला आशीर्वादित केले. तर मग, आपले नातेवाईक देवाला एकनिष्ठ असोत अथवा नसोत, आपण यहोवाला व त्याच्या धार्मिक तत्त्वांना कायम जडून राहिले पाहिजे. असे केल्यास, यहोवा आपल्या विश्‍वासू आचरणासाठी आपल्याला आशीर्वाद देईल.

उत्तरेकडे असलेल्या धर्मत्यागी इस्राएल राज्यातील लोकांनी जेव्हा पाहिले की यहोवा आसासोबत आहे तेव्हा त्यांचे थवेच्या थवे यहूदात आले. हे पाहणे आसाला मिळालेल्या आशीर्वादांपैकी एक होते. त्या लोकांना खऱ्‍या उपासनेबद्दल इतकी कदर होती की यहोवाच्या सेवकांमध्ये राहता यावे म्हणून त्यांनी आपली घरेदारे सोडण्याचा निर्णय घेतला. मग आसा आणि सर्व यहूदी लोकांनी आनंदाने “असा करार केला की आम्ही जिवेभावे आपल्या पूर्वजांचा देव परमेश्‍वर यास शरण जाऊ.” याचा परिणाम? देव “त्यांस पावला, परमेश्‍वराने त्यांस चोहोकडून स्वास्थ्य दिले.” (२ इति. १५:९-१५) धार्मिकतेवर प्रेम करणारे जेव्हा यहोवाची खरी उपासना स्वीकारतात तेव्हा आपल्याला किती आनंद होतो!

पण अजऱ्‍या संदेष्ट्याच्या शब्दांतून एक ताकीदही मिळते. त्याने म्हटले: “तुम्ही [परमेश्‍वरास] सोडाल तर तो तुम्हास सोडील.” आपल्यासोबत असे कधीही घडू नये, कारण याचे दुःखद परिणाम होऊ शकतात! (२ पेत्र २:२०-२२) यहोवाने आसाला ही ताकीद का दिली हे बायबलमध्ये सांगितलेले नाही, पण राजा ती पाळण्यास चुकला.

“तू मूर्खपणा केला”

आसाच्या राज्याच्या ३६ व्या वर्षी इस्राएलचा राजा बाशा यहूदाच्या विरुद्ध उठला. त्याने जेरुसलेमच्या ८ किमी उत्तरेस असलेल्या रामा शहराला बळकट करण्यास सुरुवात केली. आपल्या प्रजेने आसाला व खऱ्‍या उपासनेला एकनिष्ठ राहू नये या उद्देशाने कदाचित बाशाने असे केले असावे. आसाने इथियोपियन सैन्याचा सामना करताना जशी देवाची मदत घेतली होती, तशी या वेळी न घेता त्याने मानवांची मदत घेतली. त्याने सिरियाच्या (अराम) राजाला एक भेट पाठवली, व त्याला उत्तरेकडील इस्राएल राज्यावर हल्ला करण्यास सांगितले. सिरियाच्या सैन्याने काही हल्ले केल्यानंतर, बाशाने रामा शहरातून माघार घेतली.—२ इति. १६:१-५.

आसाने जे केले त्यामुळे यहोवा त्याच्यावर नाराज झाला आणि आसाला हे सांगण्यास त्याने संदेष्टा हनानी याला पाठवले. इथियोपियन सैन्याशी देवाने कशा प्रकारे व्यवहार केला होता हे आसाला माहीत असल्यामुळे, “परमेश्‍वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करितो,” ही गोष्ट त्याने ओळखायला हवी होती. कदाचित, आसाला चुकीचा सल्ला मिळाला असावा किंवा बाशा व त्याच्या सैन्याकडून मोठा धोका नाही व त्यांना तो स्वतःहून हाताळू शकतो असा विचार त्याने केला असावा. काहीही असो, आसाने मानवी तर्काचा आधार घेतला आणि तो देवावर विसंबून राहण्यास चुकला. हनानी त्याला म्हणाला: “तू मूर्खपणा केला म्हणून यापुढे तुझ्यामागे लढाया लागणार.”—२ इति. १६:७-९.

आसाने चुकीची प्रतिक्रिया दाखवली. रागाच्या भरात, त्याने हनानी संदेष्ट्याला तुरुंगात टाकले. (२ इति. १६:१०) आसाने विचार केला असावा, ‘इतकी वर्षं विश्‍वासूपणे सेवा केल्यानंतर मला ताडनाची गरज आहे का?’ वाढत्या वयामुळे त्याची तर्क करण्याची शक्‍ती कमी झाली होती का? बायबल याविषयी काहीही सांगत नाही.

आसाच्या कारकीर्दीच्या ३९ व्या वर्षी पायाच्या व्याधीमुळे तो गंभीर रीत्या आजारी झाला. अहवाल सांगतो की “त्या रोगात तो परमेश्‍वरास शरण न जाता वैद्यांस शरण गेला.” त्या वेळी कदाचित आसा त्याच्या आध्यात्मिक आरोग्याकडे दुर्लक्ष करत असावा. त्याच परिस्थितीत तो त्याच्या कारकीर्दीच्या ४१ व्या वर्षी मरण पावला. शेवटपर्यंत त्याची मनोवृत्ती बदलली नव्हती.—२ इति. १६:१२-१४.

आसाच्या हातून चुका झाल्या, पण त्यांच्या तुलनेत त्याचे चांगले गुण व खऱ्‍या उपासनेबद्दल असलेला त्याचा आवेश वरचढ ठरला असे दिसते. त्याने यहोवाची सेवा करण्याचे कधीही सोडले नाही. (१ राजे १५:१४) हे लक्षात घेता, या जीवन कथेवरून आपण काय शिकू शकतो? गतकाळात यहोवाने आपल्याला कशा प्रकारे मदत केली यावर आपण मनन केले पाहिजे. या आठवणी आपल्याला नव्या समस्यांचा सामना करताना देवाच्या साहाय्यासाठी प्रार्थना करण्यास प्रवृत्त करतील. कित्येक वर्षांपासून देवाची सेवा विश्‍वासूपणे केली असल्यामुळे आपल्याला ताडनाची गरज नाही असा आपण विचार करू नये. आपला पूर्वेतिहास काहीही असो, आपण चुकल्यास यहोवा आपल्याला ताडन देईल. सुधारणा करण्यास सांगितले जाते तेव्हा आपण नम्रपणे त्याचा स्वीकार केला पाहिजे जेणेकरून आपल्याला फायदा होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपण जर आपल्या स्वर्गीय पित्याची सेवा करत राहिलो, तर तो आपल्याला कधीही सोडणार नाही. यहोवाचे नेत्र सबंध पृथ्वीवर विश्‍वासू लोकांचा शोध घेत असतात. अशा लोकांच्या साहाय्यासाठी आपल्या शक्‍तीचा वापर करण्याद्वारे तो त्यांना आशीर्वाद देतो. यहोवाने आसाच्या बाबतीत हे केले आणि आपल्याही बाबतीत तो हेच करेल.

[९ पानांवरील संक्षिप्त आशय]

जे आध्यात्मिक युद्ध लढतात अशा विश्‍वासू जनांना यहोवा आशीर्वादित करतो

[१० पानांवरील संक्षिप्त आशय]

यहोवाच्या दृष्टीत योग्य ते करण्यास धैर्याची गरज असते