व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कशा रीतीने होईल या जगाचा अंत?

कशा रीतीने होईल या जगाचा अंत?

कशा रीतीने होईल या जगाचा अंत?

“त्या दिवसाने चोरासारखे तुम्हास गाठावे असे तुम्ही अंधारात नाही.” —१ थेस्सलनी. ५:४.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

पुढील शास्त्रवचनांत अद्याप अदृश्‍य असणाऱ्‍या कोणत्या घटनांविषयी सांगितले आहे?

१ थेस्सलनीकाकर ५:३

प्रकटीकरण १७:१६

दानीएल २:४४

१. जागृत राहण्यास व परीक्षांना तोंड देण्यास कोणती गोष्ट आपल्याला साहाय्य करेल?

 लवकरच जगाला हादरवून टाकणाऱ्‍या घटना घडणार आहेत. बायबलमधील भविष्यवाण्यांची होत असलेली पूर्णता या गोष्टीची खातरी देते आणि म्हणूनच आपण जागृत राहणे गरजेचे आहे. यासाठी कोणती गोष्ट आपल्याला साहाय्य करेल? प्रेषित पौल आपल्याला “अदृश्‍य गोष्टींकडे लक्ष” लावण्याचे प्रोत्साहन देतो. याचा अर्थ, आपण सार्वकालिक जीवनाचे प्रतिफळ नेहमी डोळ्यांपुढे ठेवले पाहिजे, मग आपली आशा स्वर्गातील जीवनाची असो वा पृथ्वीवरील जीवनाची. संदर्भावरून लक्षात येते, की पौलाने हे शब्द ख्रिस्ती बांधवांना त्यांच्या विश्‍वासूपणाच्या आनंददायक परिणामावर लक्ष केंद्रित करण्याचे प्रोत्साहन देण्याकरता लिहिले होते. अशा प्रकारे लक्ष केंद्रित केल्यामुळे त्यांना परीक्षांना व छळाला यशस्वी रीत्या तोंड देण्यासही मदत मिळणार होती.—२ करिंथ. ४:८, ९, १६-१८; ५:७.

२. (क) आपली आशा दृढ ठेवण्यासाठी आपण काय केले पाहिजे? (ख) या व पुढील लेखात आपण कशाचे परीक्षण करणार आहोत?

पौलाने दिलेल्या सल्ल्यात एक महत्त्वाचे तत्त्व आपल्याला आढळते: आपली आशा दृढ ठेवण्यासाठी आपण प्रत्यक्ष आपल्यासमोर असलेल्या गोष्टींच्या पलीकडे पाहिले पाहिजे. म्हणजेच, अद्याप अदृश्‍य असलेल्या महत्त्वाच्या घटनांकडे आपण लक्ष लावले पाहिजे. (इब्री ११:१; १२:१, २) म्हणूनच, आता आपण भविष्यात घडणार असलेल्या अशा दहा घटनांचे परीक्षण करू या, ज्या आपल्या सार्वकालिक जीवनाच्या आशेशी निगडित आहेत. *

अंताच्या अगदी थोड्या काळाआधी काय घडेल?

३. (क) पहिले थेस्सलनीकाकर ५:२, ३ यात उल्लेख केलेली कोणती घटना भविष्यात घडणार आहे? (ख) राजकीय पुढारी काय करतील, आणि त्यांना कदाचित कोण साथ देतील?

भविष्यात होणार असलेल्या एका घटनेचा उल्लेख पौलाने थेस्सलनीकाकरांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. (१ थेस्सलनीकाकर ५:२, ३ वाचा.) तेथे तो यहोवाच्या दिवसाविषयी सांगतो. यहोवाचा हा दिवस त्या कालावधीला सूचित करतो, जो खोट्या धर्माच्या नाशासोबत सुरू होईल आणि हर्मगिदोनाच्या लढाईत समाप्त होईल. पण यहोवाचा हा दिवस सुरू होण्याच्या अगदी थोड्याच काळाआधी जगातील पुढारी “शांती आहे, निर्भय आहे!” असे म्हणत असतील. त्यांची ही घोषणा कदाचित एकाच खास घटनेला किंवा एकापाठोपाठ एक घडणाऱ्‍या अनेक घटनांना सूचित करू शकते. आपल्यासमोर असलेल्या मोठमोठ्या समस्यांचे निरसन करण्यात आपल्याला जवळजवळ यश आलेच आहे, असे कदाचित राजकीय पुढाऱ्‍यांना वाटेल. धार्मिक पुढाऱ्‍यांबाबत काय? तेदेखील जगाचाच भाग आहेत, त्यामुळे कदाचित तेदेखील राजकीय पुढाऱ्‍यांना साथ देतील. (प्रकटी. १७:१, २) असे करण्याद्वारे धार्मिक पुढारी प्राचीन यहूदातील खोट्या संदेष्ट्यांप्रमाणे वागतील. या खोट्या संदेष्ट्यांबद्दल यहोवाने असे म्हटले की ते “शांतीचे नाव नसता शांती शांती असे” म्हणतात.—यिर्म. ६:१४; २३:१६, १७.

४. सर्वसामान्य लोकांच्या तुलनेत आपण काय समजू शकतो?

“शांती आहे, निर्भय आहे!” असे म्हणण्यात कोणाचाही सहभाग असो, पण ही भविष्यवाणी पूर्ण होईल तेव्हा यहोवाचा दिवस सुरू होणार असल्याची ती एक सूचना असेल. म्हणूनच पौलाने म्हटले: “बंधुजनहो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हास गाठावे असे तुम्ही अंधारात नाही. कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहा.” (१ थेस्सलनी. ५:४, ५) सर्वसामान्य लोकांच्या तुलनेत, आपण सध्याच्या घटनांचा बायबलमध्ये सांगितलेला अर्थ समजू शकतो. “शांती आहे, निर्भय आहे!” असे म्हणण्याविषयीची ही भविष्यवाणी नेमकी कशी पूर्ण होईल? हे तर येणारा काळच सांगेल. म्हणूनच, आपण “जागे व सावध” राहण्याचा दृढनिश्‍चय करू या.—१ थेस्सलनी. ५:६; सफ. ३:८.

आपल्यावर कोणतेच संकट येऊ शकत नाही असे समजणारी “राणी”

५. (क) मोठ्या संकटाची सुरुवात कशा प्रकारे होईल? (ख) आपल्यावर कोणतेच संकट येऊ शकत नाही असा गैरसमज असलेली “राणी” कोण आहे?

अद्याप अदृश्‍य असलेली कोणती घटना यानंतर घडेल? पौलाने म्हटले: “शांती आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात तेव्हा . . . त्यांचा अकस्मात नाश होतो.” या “अकस्मात” होणाऱ्‍या नाशाचा पहिला टप्पा म्हणजे “मोठी बाबेल” अर्थात, खोट्या धर्माचे जागतिक साम्राज्य, जिला “कलावंतीण” असेही म्हणण्यात आले आहे, तिच्यावर केला जाणारा हल्ला. (प्रकटी. १७:५, ६, १५) ख्रिस्ती धर्मजगतासहित सर्व प्रकारच्या खोट्या धर्मांवर होणारा हा हल्ला म्हणजेच मोठ्या संकटाची सुरुवात असेल. (मत्त. २४:२१; २ थेस्सलनी. २:८) बऱ्‍याच लोकांना या घटनेचे खूप आश्‍चर्य वाटेल. का? कारण तोपर्यंत ही कलावंतीण मोठ्या आत्मविश्‍वासाने स्वतःला एक “राणी” समजत असेल, जी कधी “दुःख पाहणारच नाही.” पण आपला फार मोठा गैरसमज झाला आहे हे अचानक तिच्या लक्षात येईल. अगदी पाहता पाहता, जणू “एका दिवशीच” तिचा नाश होईल.—प्रकटी. १८:७, ८.

६. खोट्या धर्माचा नाश कोणाद्वारे केला जाईल?

देवाचे वचन सांगते की “दहा शिंगे” असलेले एक किरमिजी रंगाचे “श्‍वापद” कलावंतिणीवर हल्ला करेल. प्रकटीकरणाच्या पुस्तकाचे परीक्षण केल्यास, हे श्‍वापद संयुक्‍त राष्ट्रसंघाला सूचित करत असल्याचे दिसून येते. “दहा शिंगे” ही या “किरमिजी रंगाच्या” श्‍वापदाला पाठिंबा देत असलेल्या सध्याच्या सर्व राजकीय सत्तांना सूचित करतात. * (प्रकटी. १७:३, ५, ११, १२) कलावंतिणीवर होणारा हल्ला किती विनाशकारी असेल? संयुक्‍त राष्ट्रसंघाची सदस्य राष्ट्रे कलावंतिणीची धनसंपत्ती लुटतील, तिचे खरे स्वरूप उजेडात आणतील, तिचा नाश करतील आणि तिला “अग्नीत जाळून टाकतील.”—प्रकटीकरण १७:१६ वाचा.

७. श्‍वापदाद्वारे केला जाणारा हल्ला कशामुळे प्रवृत्त झालेला असेल?

हा हल्ला कशामुळे प्रवृत्त झालेला असेल हेदेखील बायबलमधील भविष्यवाणीत सांगण्यात आले आहे. यहोवा “आपली इच्छा पूर्ण करण्याचे” म्हणजेच कलावंतिणीचा संपूर्ण नाश करण्याचे राजकीय पुढाऱ्‍यांच्या मनात घालेल. (प्रक. १७:१७, पं.र.भा.) धर्मांनी पूर्वीपासूनच युद्धांना पाठिंबा दिला आहे. आणि आजही जगात अशांती पसरवण्यात धर्मांचे योगदान असल्याचे दिसून येते; त्यामुळे कलावंतिणीचा नाश करणे हे राजकीय दृष्ट्या आपल्या हिताचे आहे असा कदाचित राष्ट्रे विचार करतील. इतकेच काय, तर कलावंतिणीवर हल्ला करताना आपण “एकमताचे होऊन” कार्य करत आहोत असा या राष्ट्रांचा ग्रह असेल. पण खरे पाहता, सर्व खोट्या धर्मांचा समूळ नाश करण्यासाठी देव त्यांचा उपयोग करत असेल. अशा रीतीने, घटना एक अतिशय अनपेक्षित वळण घेतील. सैतानाच्याच जगाचा एक भाग दुसऱ्‍या भागावर हल्ला करेल आणि हे थांबवण्यासाठी सैतान काहीही करू शकणार नाही.—मत्त. १२:२५, २६.

देवाच्या लोकांवर हल्ला

८. “मागोग देशातील गोग”चा हल्ला काय आहे?

खोट्या धर्माचा नाश झाल्यानंतर, देवाचे सेवक अजूनही तटबंदीविना “स्वस्थपणे निर्भय राहत आहेत” असे दिसून येईल. (यहे. ३८:११, १४) यहोवाची अखंडपणे उपासना करणाऱ्‍यांचा समूह, ज्याला कोणतेही संरक्षण नाही असे भासेल, त्याचे पुढे काय होईल? भविष्यवाणीत सांगितल्यानुसार, बऱ्‍याच लोकांद्वारे यहोवाच्या उपासकांवर हल्ला केला जाईल. देवाच्या वचनात याला “मागोग देशातील गोग”ने केलेला हल्ला असे म्हणण्यात आले आहे. (यहेज्केल ३८:२, १५, १६ वाचा.) या हल्ल्याबाबत आपण कसा दृष्टिकोन बाळगावा?

९. (क) एका ख्रिस्ती व्यक्‍तीला सर्वात जास्त काळजी कशाची असली पाहिजे? (ख) आपला विश्‍वास बळकट करण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे?

देवाच्या लोकांवर होणाऱ्‍या या हल्ल्याबाबत आधीपासूनच माहीत झाल्यामुळे आपण अवास्तव चिंता करत नाही. आपल्याला स्वतःचे तारण होण्याची सर्वात जास्त काळजी नाही, तर यहोवाचे नाव पवित्र व्हावे आणि त्याचे सार्वभौमत्व शाबीत व्हावे याचीच आपल्याला सर्वात जास्त काळजी आहे. यहोवाने ६० पेक्षा अधिक वेळा असे घोषित केले: “तुम्ही जाणाल की मी यहोवा आहे.” (यहे. ६:७, पं.र.भा.) त्यामुळे, यहेज्केलच्या भविष्यवाणीच्या या पैलूची पूर्णता होण्याची आपण आतुरतेने वाट पाहतो आणि हा भरवसा बाळगतो की “भक्‍तिमान लोकांस परीक्षेतून कसे सोडवावे . . . हे प्रभूला कळते.” (२ पेत्र २:९) दरम्यानच्या काळात, आपण आपला विश्‍वास बळकट करण्याच्या प्रत्येक संधीचा फायदा घेतला पाहिजे, जेणेकरून भविष्यात आपल्याला कोणत्याही परीक्षांना तोंड द्यावे लागले तरी आपण यहोवाला विश्‍वासू राहू शकू. आपला विश्‍वास बळकट करण्यासाठी आपण काय केले पाहिजे? आपण प्रार्थना केली पाहिजे, देवाच्या वचनाचा अभ्यास आणि त्यावर मनन केले पाहिजे आणि इतरांना राज्याचा संदेश सांगितला पाहिजे. असे केल्यास, जहाजाच्या नांगराप्रमाणे सार्वकालिक जीवनाची आपली आशा स्थिर व अढळ राहील.—इब्री ६:१९; स्तो. २५:२१.

राष्ट्रांस यहोवाला कबूल करावेच लागेल

१०, ११. हर्मगिदोनाची सुरुवात कशा प्रकारे होईल आणि या लढाईत काय घडेल?

१० यहोवाच्या सेवकांवर झालेल्या हल्ल्यामुळे जगाला हादरवून टाकणारी कोणती घटना घडेल? येशूच्या व स्वर्गीय सैन्यांच्या माध्यमाने यहोवा आपल्या लोकांच्या वतीने कारवाई करेल. (प्रक. १९:११-१६) अशा रीतीने सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या लढाईला, म्हणजेच हर्मगिदोनाला सुरुवात होईल.—प्रकटी. १६:१४, १६.

११ या लढाईबद्दल, यहेज्केलाद्वारे यहोवा असे घोषित करतो: “प्रभू परमेश्‍वर म्हणतो, माझ्या सर्व पर्वतांकडे [गोगविरुद्ध] मी तरवार बोलावीन; प्रत्येकाची तरवार आपल्या भावावर चालेल.” सैतानाचे समर्थक गोंधळून जातील आणि आपल्याच साथीदारांविरुद्ध शस्त्रे चालवतील. पण, खुद्द सैतानसुद्धा या नाशातून बचावणार नाही. यहोवा म्हणतो: “[गोगवर], त्याच्या सैन्यांवर . . . अग्नी व गंधक यांची धो धो वृष्टी मी . . . करीन.” (यहे. ३८:२१, २२) देवाने केलेल्या या कारवाईचा परिणाम काय होईल?

१२. राष्ट्रांना काय करणे भाग पडेल?

१२ राष्ट्रांना हे मान्य करावेच लागेल की यहोवाने दिलेल्या आदेशामुळेच त्यांचा नाश केला जात आहे. मग सैतानाची सैन्येदेखील, तांबड्या समुद्राजवळ इस्राएली लोकांचा पाठलाग करत असलेल्या प्राचीन इजिप्तच्या सैन्याप्रमाणेच कदाचित असहायपणे असा आक्रोश करतील: “परमेश्‍वर त्यांच्या बाजूने . . . लढत आहे.” (निर्ग. १४:२५) अशा रीतीने, राष्ट्रांस यहोवाला कबूल करणे भाग पडेल. (यहेज्केल ३८:२३ वाचा.) आपण या घटनांची मालिका सुरू होण्याच्या किती जवळ येऊन पोचलो आहोत?

दुसरी कोणतीही महासत्ता आता उदयास येणार नाही

१३. दानीएलाने वर्णन केलेल्या पुतळ्याच्या पाचव्या भागाबद्दल आपल्याजवळ कोणती माहिती आहे?

१३ काळाच्या ओघात आपण कोठे आहोत हे समजण्यास दानीएलाच्या पुस्तकातील एक भविष्यवाणी आपल्याला मदत करते. दानीएल, वेगवेगळ्या धातूंपासून तयार केलेल्या मनुष्यासारख्या एका पुतळ्याचे वर्णन करतो. (दानी. २:२८, ३१-३३) हा पुतळा एकापाठोपाठ एक उदयास आलेल्या अशा जागतिक महासत्तांना सूचित करतो, ज्यांनी देवाच्या गतकाळातील व सध्याच्या काळातील लोकांवर मोठा प्रभाव पाडला आहे. या महासत्ता आहेत: बॅबिलोन, मेद व पारस, ग्रीस, रोम आणि शेवटी आपल्या काळातील आणखी एक महासत्ता. दानीएलाच्या भविष्यवाणीचे परीक्षण केल्यास हे दिसून येते की पुतळ्याची पावले व पावलांची बोटे या शेवटल्या जागतिक महासत्तेला सूचित करतात. पहिल्या महायुद्धादरम्यान ब्रिटन व अमेरिका यांनी आपसांत एक खास नातेसंबंध कायम केला. आणि हीच अँग्लो-अमेरिकन जागतिक महासत्ता दानीएलाच्या पुतळ्याचा पाचवा भाग आहे. पावले ही पुतळ्याचा शेवटला भाग आहेत. यावरून असे सूचित होते की आता दुसरी कोणतीही मानवी जागतिक महासत्ता उदयास येणार नाही. पावले व बोटे ही लोखंड व मातीपासून बनलेली असल्यामुळे ती अँग्लो-अमेरिकन जागतिक महासत्तेच्या दुर्बल स्थितीला सूचित करतात.

१४. हर्मगिदोनाला सुरुवात होईल तेव्हा कोणत्या महासत्तेचे जगावर वर्चस्व असेल?

१४ याच भविष्यवाणीत देवाच्या राज्याला एका मोठ्या पाषाणाद्वारे चित्रित करण्यात आले आहे. ही भविष्यवाणी दाखवते, की १९१४ साली हा पाषाण यहोवाच्या सार्वभौमत्वाला सूचित करणाऱ्‍या पर्वतापासून सुटला. आज तो पाषाण मोठ्या वेगाने त्याच्या निशाणाच्या, म्हणजेच पुतळ्याच्या पावलांच्या दिशेने येत आहे. हर्मगिदोनात पावलांचा आणि सबंध पुतळ्याचा चक्काचूर केला जाईल. (दानीएल २:४४, ४५ वाचा.) याचा अर्थ, हर्मगिदोनाला सुरुवात होईल तेव्हा अँग्लो-अमेरिकन महासत्तेचेच जगावर वर्चस्व असेल. दानीएलाच्या या भविष्यवाणीची पूर्णता होताना पाहणे किती रोमांचक असेल! * पण खुद्द सैतानाविरुद्ध यहोवा कोणती कारवाई करेल?

असा होईल देवाच्या प्रमुख शत्रूचा नायनाट!

१५. हर्मगिदोनानंतर सैतान व त्याच्या दुरात्म्यांसोबत काय घडेल?

१५ सर्वप्रथम, सैतानाला पृथ्वीवरील त्याच्या संपूर्ण संघटनेचा होणारा नाश सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल. यानंतर, खुद्द सैतानाकडे लक्ष वळवले जाईल. तेव्हा काय घडेल हे प्रेषित योहान आपल्याला सांगतो. (प्रकटीकरण २०:१-३ वाचा.) ज्याच्याजवळ अथांग डोहाची किल्ली होती तो देवदूत म्हणजेच येशू ख्रिस्त, सैतानाला व त्याच्या दुरात्म्यांना धरून अथांग डोहात टाकून देईल, जेथे त्यांना हजार वर्षांपर्यंत ठेवले जाईल. (लूक ८:३०, ३१; १ योहा. ३:८) सैतानाचे डोके फोडण्याचा हा पहिला टप्पा असेल. *उत्प. ३:१५.

१६. “अथांग डोहात” सैतानाची काय अवस्था होईल?

१६ सैतानाला व त्याच्या दुरात्म्यांना ज्या अथांग डोहात टाकले जाईल तो कशास सूचित करतो? योहानाने वापरलेल्या आवीसोस या ग्रीक शब्दाचा अर्थ “खूप किंवा अतिशय खोल” असा होतो. “ज्याची खोली मोजता येणार नाही, असीम” आणि “अमर्याद पोकळी” असेही या शब्दाचे भाषांतर करण्यात आले आहे. त्याअर्थी, ही एक अशी जागा आहे जेथे यहोवा आणि “अथांग डोहाची किल्ली” ज्याच्याजवळ आहे तो नियुक्‍त देवदूत, यांच्याशिवाय कोणीही पोचू शकत नाही. तेथे, सैतान मृतवत किंवा पूर्णपणे अक्रियाशील स्थितीत असेल आणि अशा रीतीने त्याला राष्ट्रांस आणखी ठकवणे शक्य होणार नाही. त्या गर्जणाऱ्‍या सिंहाचे तोंड खऱ्‍या अर्थाने बंद केले जाईल!—१ पेत्र ५:८.

शांतीचा काळ येण्याआधी घडणाऱ्‍या घटना

१७, १८. (क) आतापर्यंत आपण कोणत्या अदृश्‍य घटनांचे परीक्षण केले आहे? (ख) या घटनांनंतर आपण कोणत्या काळाचा उपभोग घेऊ?

१७ अतिशय महत्त्वाच्या आणि जगाला हादरवून टाकणाऱ्‍या घटना लवकरच घडणार आहेत. “शांती आहे, निर्भय आहे!” ही घोषणा कशा प्रकारे केली जाईल हे पाहण्यास आपण उत्सुक आहोत. त्यानंतर आपण मोठ्या बाबेलचा नाश, मागोग देशातील गोगचा हल्ला आणि हर्मगिदोनाची लढाई या घटना पाहू. सैतान व त्याच्या दुरात्म्यांना अथांग डोहात टाकले जाईल. या घटनांनंतर, जेव्हा दुष्टाईचे नामोनिशाणही राहिलेले नसेल, तेव्हा आपण जीवनात एका नव्या अध्यायाची, अर्थात ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्याची सुरुवात झालेली पाहू. आणि त्या राज्यात आपण “उदंड शांतिसुखाचा” उपभोग घेऊ.—स्तो. ३७:१०, ११.

१८ आतापर्यंत चर्चा केलेल्या पाच घटनांसोबतच, आपण इतरही काही “अदृश्‍य गोष्टींकडे लक्ष” लावणे गरजेचे आहे. या घटनांची पुढील लेखात चर्चा केली जाईल.

[तळटीपा]

^ परि. 2 या दहा घटनांची चर्चा या व पुढील लेखात करण्यात आली आहे.

^ परि. 6 प्रकटीकरणयाचा भव्य कळस जवळ आहे! यातील पृष्ठे २५१-२५८ पाहा.

^ परि. 14 “या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील” हा दानीएल २:४४ मधील वाक्यांश पुतळ्याच्या वेगवेगळ्या भागांद्वारे सूचित होणाऱ्‍या राज्यांना किंवा जागतिक महासत्तांना लागू होतो. पण याच विषयाशी संबंधित असलेली बायबलमधील आणखी एक भविष्यवाणी दाखवते की “सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी” यहोवाच्या विरोधात “संपूर्ण जगातील राजांस” एकत्र केले जाईल. (प्रकटी. १६:१४; १९:१९-२१) त्याअर्थी, हर्मगिदोनात फक्‍त पुतळ्याद्वारे सूचित होणारी राज्येच नव्हे, तर जगातील इतर सर्व राज्येदेखील नष्ट केली जातील.

^ परि. 15 सैतानाचे डोके कायमचे फोडले जाणे हे हजार वर्षांचा काळ संपल्यानंतर घडेल, जेव्हा सैतानाला व त्याच्या दुरात्म्यांना “अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात” टाकले जाईल.—प्रकटी. २०:७-१०; मत्त. २५:४१.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[४, ५ पानांवरील चौकट/चित्रे]

लवकरच घडणार असलेल्या पाच घटना:

१ “शांती आहे, निर्भय आहे!” अशी घोषणा

२ राष्ट्रे मोठ्या बाबेलवर हल्ला करतात व तिला नष्ट करतात

३ यहोवाच्या लोकांवर हल्ला

४ हर्मगिदोनाची लढाई

५ सैतान व त्याच्या दुरात्म्यांना अथांग डोहात टाकले जाणे