व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा आणि येशू यांच्या धीराचे अनुकरण करा

यहोवा आणि येशू यांच्या धीराचे अनुकरण करा

यहोवा आणि येशू यांच्या धीराचे अनुकरण करा

“ही गोष्ट मनामध्ये ठेवा की, आपल्या प्रभूचा धीर म्हणजे तारण.”—२ पेत्र ३:१५, ईझी-टू-रीड व्हर्शन.

तुमचे उत्तर काय असेल?

यहोवाने कशा प्रकारे धीर दाखवला आहे?

येशूला बराच काळ धीर का धरावा लागला?

देवासारखा धीर अधिकाधिक प्रमाणात दाखवण्यासाठी आपण कोणती पावले उचलू शकतो?

१. काही विश्‍वासू जनांना कोणता प्रश्‍न पडतो?

 अनेक दशके धीराने कठीण समस्यांचा सामना करूनही विश्‍वासू राहिलेल्या एका बहिणीने नम्रपणे असे विचारले, “माझ्या मृत्यूपूर्वी मी जगाचा अंत पाहू शकेन का?” कितीतरी वर्षे यहोवाची सेवा केलेल्या इतर काहींना असाच प्रश्‍न पडतो. आपण त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहोत, जेव्हा देव आपल्या सर्व समस्यांना काढून टाकेल आणि सर्वकाही नवे करेल. (प्रकटी. २१:५) सैतानाच्या जगाचा अंत अगदी जवळ आहे असा विश्‍वास ठेवण्याची अनेक कारणे आपल्याजवळ आहेत. तरीसुद्धा, त्या दिवसाची धीराने वाट पाहणे आपल्याकरता कठीण असू शकते.

२. आपण देवाच्या धीराविषयी कोणत्या प्रश्‍नांची चर्चा करणार आहोत?

पण, बायबल दाखवते की आपण धीर धरला पाहिजे. देवाने दिलेली अभिवचने पूर्ण करण्याची त्याची वेळ येईपर्यंत, आपण आपला विश्‍वास दृढ ठेवल्यास आणि धीराने वाट पाहिल्यास, देवाच्या गतकाळातील सेवकांप्रमाणे आपल्यालाही त्याने अभिवचन दिलेले आशीर्वाद मिळतील. (इब्री लोकांस ६:११, १२ वाचा.) यहोवाने स्वतः धीर धरला आहे. तो कोणत्याही वेळी दुष्टाईचा अंत करू शकला असता, पण तो योग्य वेळेची वाट पाहत आहे. (रोम. ९:२०-२४) त्याने इतका धीर का धरला आहे? देवाप्रमाणे धीर दाखवण्यात येशूने कोणते उदाहरण मांडले आहे? आपण देवाप्रमाणे धीर विकसित केला, तर आपल्याला कोणते फायदे मिळतील? यहोवा पाऊल उचलण्यास विलंब लावत आहे असे कदाचित आपल्याला वाटू शकते. पण, धीर उत्पन्‍न करण्यास आणि आपला विश्‍वास आणखी मजबूत करण्यास, वरील प्रश्‍नांची उत्तरे आपल्याला साहाय्यक ठरू शकतात.

यहोवाने धीर का धरला आहे?

३, ४. (क) यहोवाने पृथ्वीसाठी असलेला आपला उद्देश पूर्ण करण्याकरता इतका धीर का धरला आहे? (ख) यहोवाने एदेन बागेत झालेल्या बंडाळीला कसा प्रतिसाद दिला?

यहोवाने चांगल्या कारणामुळे धीर धरला आहे. हे खरे आहे, की या विश्‍वावर केवळ यहोवाचाच सार्वभौम अधिकार आहे. तरीसुद्धा, एदेन बागेत झालेल्या बंडाळीमुळे, या विश्‍वातील सर्वांना प्रभावित करणारे प्रश्‍न निर्माण झाले. या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे देण्यासाठी वेळेची गरज आहे हे यहोवाला माहीत असल्यामुळे त्याने धीर धरला आहे. स्वर्गात व पृथ्वीवर राहणाऱ्‍यांच्या कार्यांविषयी व मनोवृत्तींविषयी त्याला सर्वकाही माहीत असल्यामुळे, आपल्या सर्वांच्या फायद्यासाठी जे जास्त योग्य आहे त्यानुसार तो कार्य करत आहे.—इब्री ४:१३.

यहोवाचा उद्देश होता की आदाम व हव्वा यांच्या वंशजांद्वारे ही पृथ्वी भरून जावी. सैतानाने जेव्हा हव्वेला फसवले आणि नंतर आदामानेही देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केले, तेव्हा देवाने त्याचा उद्देश बदलला नाही. तो गोंधळून गेला नाही, त्याने घाई-गडबडीत निर्णय घेतले नाहीत, किंवा मानवी कुटुंबाचे आता काहीच होऊ शकत नाही, असा टोकाचा विचारदेखील केला नाही. त्याऐवजी, मानवांसाठी व या पृथ्वीसाठी त्याचा उद्देश तो कशा प्रकारे साध्य करेल हे त्याने ठरवले. (यश. ५५:११) यहोवाने त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी आणि त्याचे सार्वभौमत्व शाबीत करण्यासाठी खूप संयम बाळगला आणि धीर धरला आहे. इतकेच काय, तर त्याच्या उद्देशाचे काही पैलू सर्वात चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी त्याने हजारो वर्षे वाट पाहिली आहे.

५. यहोवाच्या धीरामुळे कोणते आशीर्वाद शक्य होतात?

यहोवाने इतका धीर का धरला आहे याचे आणखी एक कारण म्हणजे जास्तीत जास्त लोकांना सार्वकालिक जीवन मिळावे अशी त्याची इच्छा आहे. सध्या तो एका मोठ्या लोकसमुदायाचे तारण करण्यासाठी आवश्‍यक ती सर्व तयारी करत आहे. (प्रकटी. ७:९, १४; १४:६) प्रचार कार्याद्वारे तो लोकांना साहाय्य करत आहे आणि त्यांना त्याच्या राज्याविषयी व त्याच्या नीतिमान स्तरांविषयी शिकून घेण्याचे आमंत्रण देत आहे. देवाच्या राज्याचा संदेश हा मानवजातीसाठी सर्वात चांगला संदेश आहे—खऱ्‍या अर्थाने एक “सुवार्ता” आहे. (मत्त. २४:१४) यहोवा ज्या कोणाला त्याच्याकडे आकर्षित करतो ती प्रत्येक व्यक्‍ती खऱ्‍या मित्रांच्या विश्‍वव्यापी मंडळीचा भाग बनते, जिच्या सदस्यांना देवाचे स्तर प्रिय वाटतात. (योहा. ६:४४-४७) आपला प्रेमळ देव अशा लोकांना त्याची स्वीकृती प्राप्त व्हावी म्हणून मदत करतो. शिवाय, भविष्यात देवाच्या स्वर्गीय सरकारचे सदस्य बनण्यासाठी तो काही मानवांची निवडदेखील करत आहे. स्वर्गातील त्यांचे स्थान त्यांना मिळाल्यावर, ते पृथ्वीवरील आज्ञाधारक मानवांना परिपूर्ण बनण्यासाठी आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी मदत करतील. यावरून स्पष्टच आहे, की यहोवा धीराने वाट पाहत असूनही, तो आपल्या भल्यासाठी, त्याने दिलेली अभिवचने पूर्ण करण्याकरता कार्य करत आहे.

६. (क) नोहाच्या दिवसांत यहोवाने कशा प्रकारे धीर दाखवला होता? (ख) आज आपल्या दिवसांत यहोवा कशा प्रकारे धीर दाखवत आहे?

यहोवाचा अपमान करण्यासाठी मानव अतिशय दुष्ट कृत्ये करत असले, तरी त्याने धीर धरला आहे. जलप्रलयापूर्वी त्याने दुष्ट लोकांशी ज्या प्रकारे व्यवहार केला होता त्यावरून हे दिसून येते. त्या वेळी पृथ्वी अनैतिकता व हिंसा यांनी भरलेली होती, आणि मानवांच्या अत्यंत नीच कृत्यांमुळे यहोवाच्या “चित्ताला खेद झाला.” (उत्प. ६:२-८) तो सदासर्वकाळ ही गोष्ट सहन करणार नव्हता, त्यामुळे अवज्ञाकारी मानवांवर जलप्रलय आणण्याचे त्याने ठरवले. “नोहाच्या दिवसांत . . . देव सहन करीत वाट पाहत होता,” आणि त्याच वेळी त्याने नोहा व त्याच्या कुटुंबाच्या बचावाकरता आवश्‍यक ती सर्व तयारी केली. (१ पेत्र ३:२०) योग्य वेळ आली तेव्हा यहोवाने नोहाला आपल्या निर्णयाविषयी कळवले आणि त्याच्यावर तारू बांधण्याचे काम सोपवले. (उत्प. ६:१४-२२) त्याव्यतिरिक्‍त, नोहा “नीतिमत्त्वाचा उपदेशक” होता, आणि त्याने लवकरच येणाऱ्‍या नाशाविषयी लोकांना सांगितले. (२ पेत्र २:५) येशूने म्हटले की आज आपल्या काळातील दिवसही नोहाच्या काळातील दिवसांप्रमाणेच आहेत. या दुष्ट जगाचा नाश केव्हा करायचा हे यहोवाने ठरवले आहे. नाश केव्हा होईल “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी” कोणाही मानवाला माहीत नाही. (मत्त. २४:३६) सध्या आपल्याला देवाने, लोकांना ताकीद देण्याचे आणि या नाशातून ते कसे वाचू शकतात याविषयी त्यांना सांगण्याचे काम दिले आहे.

७. यहोवा आपली अभिवचने पूर्ण करण्याच्या बाबतीत विलंब करत आहे का? स्पष्ट करा.

यहोवा धीर धरत आहे याचा अर्थ, तो निष्क्रियपणे केवळ काळ सरण्याची वाट पाहत बसलेला नाही. त्याचे आपल्याकडे लक्ष नाही किंवा त्याला आपल्याबद्दल आस्था नाही असा आपण कधीही विचार करू नये! पण, आपण वृद्ध होत असल्यामुळे किंवा या दुष्ट जगात आपल्याला समस्यांचा सामना करावा लागत असल्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवणे आपल्याला कठीण जाऊ शकते. कदाचित आपण निरुत्साहित होऊ शकतो किंवा देव आपली अभिवचने पूर्ण करण्यास विलंब करत आहे असे आपल्याला वाटू शकते. (इब्री १०:३६) पण हे कधीही विसरू नका, की यहोवाजवळ धीर दाखवण्याची चांगली कारणे आहेत आणि या उरलेल्या काळाचा उपयोग तो त्याच्या एकनिष्ठ सेवकांच्या फायद्यासाठी करत आहे. (२ पेत्र २:३; ३:९) देवाप्रमाणेच येशूनेही कशा प्रकारे धीर दाखवला याचा आता आपण विचार करू या.

धीर दाखवण्याच्या बाबतीत येशूने कशा प्रकारे चांगले उदाहरण मांडले?

८. कोणत्या परिस्थितींत येशूने धीर दाखवला?

येशू, देवाच्या इच्छेनुसार कार्य करत आहे आणि त्याने हजारो वर्षे आनंदाने असे केले आहे. सैतानाने बंड केले तेव्हा यहोवाने ठरवले की आपला एकुलता एक पुत्र, मशीहा या नात्याने पृथ्वीवर येईल. येशूसाठी याचा काय अर्थ होता त्याचा विचार करा—ठरलेली वेळ येईपर्यंत त्याला हजारो वर्षे धीराने वाट पाहायची होती. (गलतीकरांस ४:४ वाचा.) या काळादरम्यान तो निष्क्रियपणे वाट पाहत बसला नव्हता; तर, त्याच्या पित्याने त्याला दिलेले काम करण्यात तो व्यस्त होता. शेवटी, जेव्हा तो पृथ्वीवर आला, तेव्हा भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे सैतानाच्या हातून त्याचा मृत्यू होणार हे त्याला माहीत होते. (उत्प. ३:१५; मत्त. १६:२१) त्याने धीराने सर्व दुःख सहन केले, कारण अशा प्रकारे यातना सहन करण्याद्वारे मृत्यूला सामोरे जावे अशी देवाची इच्छा होती. एकनिष्ठेच्या बाबतीत त्याने सर्वश्रेष्ठ उदाहरण मांडले. त्याने स्वतःवर आणि स्वतःच्या पदावर लक्ष केंद्रित केले नाही. त्याच्या या उदाहरणामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो.—इब्री ५:८, ९.

९, १०. (क) यहोवाने ठरवलेली वेळ येईपर्यंत धीराने वाट पाहत असण्यासोबत येशू काय करत होता? (ख) यहोवाने ठरवलेल्या वेळेकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे?

येशूचे पुनरुत्थान झाल्यावर, त्याला स्वर्गात आणि पृथ्वीवर अधिकार देण्यात आला. (मत्त. २८:१८) यहोवाने ठरवलेल्या वेळेनुसार त्याच्या उद्देशाची पूर्तता करण्यासाठी येशू त्याच्या अधिकाराचा वापर करतो. येशूने देवाच्या उजवीकडे राहून १९१४ पर्यंत म्हणजे त्याच्या शत्रूंना त्याचे पदासन करेपर्यंत धीराने वाट पाहिली. (स्तो. ११०:१, २; इब्री १०:१२, १३) लवकरच तो सैतानाच्या जगाचा नाश करण्यासाठी पाऊल उचलणार आहे. पण तोपर्यंत, येशू लोकांना देवाची स्वीकृती प्राप्त करण्यासाठी धीराने मदत करण्याद्वारे त्यांना “जीवनाच्या पाण्याच्या झऱ्‍यांजवळ” नेत आहे.—प्रकटी. ७:१७.

१० यहोवाने ठरवलेल्या वेळेकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे? या बाबतीत आपण येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करू शकतो. पित्याने येशूकडून जी अपेक्षा केली होती त्याप्रमाणे करण्यास तो उत्सुक होता; तरीपण, तो देवाची वेळ येईपर्यंत प्रतीक्षा करण्यास तयार होता. सैतानाच्या दुष्ट जगाच्या अंताची वाट पाहत असताना, आपणही देवासारखा धीर दाखवणे गरजेचे आहे. आपण कधीही देवाच्या पुढे पळण्याचा प्रयत्न करू नये आणि निरुत्साहित होऊन कधीही हार मानू नये. तर मग, देवासारखा धीर उत्पन्‍न करण्यासाठी आपण काय करू शकतो?

देवासारखा धीर उत्पन्‍न करण्यासाठी मी काय केले पाहिजे?

११. (क) विश्‍वास आणि धीर यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे? (ख) आपल्याजवळ भक्कम विश्‍वास बाळगण्याची उचित कारणे का आहेत?

११ अपरिपूर्ण मानवही कशा प्रकारे धीर दाखवू शकतात हे येशू पृथ्वीवर येण्याआधी, देवाच्या संदेष्ट्यांनी व इतर विश्‍वासू सेवकांनी आपल्या उदाहरणातून दाखवून दिले. त्यांच्या विश्‍वासाचा आणि धीराचा एकमेकांशी थेट संबंध होता. (याकोब ५:१०, ११ वाचा.) यहोवाने जे सांगितले होते त्याच्यावर जर त्यांचा खरोखर भरवसा नसता—त्यांच्यामध्ये जर विश्‍वासाचा अभाव असता—तर त्याच्या अभिवचनांची पूर्तता होण्यासाठी त्यांनी धीराने वाट पाहिली असती का? त्यांनी अनेकदा भयंकर किंवा कठीण परीक्षांचा सामना केला. त्यांना भरवसा होता की सरतेशेवटी देव त्याच्या अभिवचनांची पूर्तता करेल. (इब्री ११:१३, ३५-४०) आपल्याजवळ भक्कम विश्‍वास बाळगण्याचे याहूनही मोठे कारण आहे, कारण आता येशू “आपल्या विश्‍वासाचा . . . पूर्ण करणारा” या नात्याने सेवा करत आहे. (इब्री १२:२) त्याने ज्या प्रकारे भविष्यवाण्या पूर्ण केल्या आणि देवाचे उद्देश प्रकट केले त्यामुळे आपल्याजवळ विश्‍वास बाळगण्याची उचित कारणे आहेत.

१२. आपला विश्‍वास मजबूत करण्यासाठी आपण काय करू शकतो?

१२ आपला विश्‍वास मजबूत करण्यासाठी आणि धीर वाढवण्यासाठी आपण कोणती व्यावहारिक पावले उचलू शकतो? असे करण्यासाठी देवाचा सल्ला लागू करणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, तुम्ही जीवनात देवाच्या राज्याला पहिले स्थान का देता याच्या कारणांवर मनन करा. मत्तय ६:३३ मध्ये असलेला सल्ला लागू करण्यासाठी तुम्ही आणखी जास्त मेहनत करू शकता का? याचा अर्थ, तुम्हाला सेवाकार्यासाठी जास्त वेळ द्यावा लागेल किंवा जीवनातील काही गोष्टींमध्ये फेरबदल करावा लागेल. यहोवाने आजपर्यंत तुमचे प्रयत्न कशा प्रकारे आशीर्वादित केले आहेत हे विसरू नका. त्याने कदाचित तुमच्याकरता एक नवीन बायबल अभ्यास सुरू करणे शक्य केले असेल किंवा “सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती” प्राप्त करण्यास तुम्हाला मदत केली असेल. (फिलिप्पैकर ४:७ वाचा.) यहोवाच्या मार्गदर्शनाचे पालन केल्यामुळे तुम्हाला वैयक्‍तिक रीत्या जे फायदे झाले असतील त्यांवर तुम्ही अशा प्रकारे मनन करता, तेव्हा धीर धरण्याच्या बाबतीत तुमची कदर आणखी वाढेल.—स्तो. ३४:८.

१३. आपला विश्‍वास आणि धीर आपण कसा वाढवू शकतो हे कोणत्या उदाहरणावरून स्पष्ट होते?

१३ आपल्या विश्‍वासामुळे कशा प्रकारे आपला धीर आणखी वाढू शकतो हे समजण्यासाठी एक उदाहरण पाहू या. एक शेतकरी बी पेरतो, पिकाची देखभाल करतो, आणि कापणी करतो. शेतकरी जेव्हा प्रत्येक वेळी विपुल प्रमाणात कापणी करतो, तेव्हा पुढील हंगामात पेरणी करण्याचा त्याचा आत्मविश्‍वास आणखी बळावतो. अर्थातच, कापणी करण्यासाठी त्याला धीराने वाट पाहावी लागेल. पण, यामुळे तो बी पेरण्यापासून मागे हटत नाही; त्याऐवजी तो कदाचित मागील हंगामापेक्षाही जास्त जमिनीत पेरणी करतो. आपण कापणी करू असा त्याला भरवसा असतो. त्याच प्रकारे, आपण जेव्हा वारंवार यहोवाच्या मार्गदर्शनाविषयी शिकतो, त्याचे पालन करतो, आणि त्यामुळे आपल्याला फायदे होतात तेव्हा यहोवावरील आपला भरवसा आणखी वाढतो. शिवाय, आपला विश्‍वासही वाढतो आणि भविष्यात आपल्याला जे आशीर्वाद मिळणार आहेत त्यांची वाट पाहणे आपल्याकरता सोपे जाते.—याकोब ५:७, ८ वाचा.

१४, १५. मानवांच्या दुःखाविषयी आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे?

१४ धीर उत्पन्‍न करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे या जगाकडे आणि आपल्या स्वतःच्या परिस्थितीकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे याचा विचार करणे. या बाबतीत यहोवाचा दृष्टिकोन बाळगण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, मानवांच्या दुःखाबद्दल यहोवाला कसे वाटते याचा विचार करा. कितीतरी काळापासून त्याने मानवांचे दुःख पाहिले आहे आणि यामुळे त्याचे मन खूप दुःखित झाले आहे. पण, तो दुःखात इतका बुडाला नाही, की त्याला चांगले करणे शक्यच होत नाही. त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला “सैतानाची कृत्ये नष्ट” करण्यासाठी आणि सैतानामुळे मानवांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी पाठवले. (१ योहा. ३:८) खरे पाहता, मानवांचे दुःख तात्पुरते असल्याचे सिद्ध होईल; देव लवकरच दुःख कायमचे नाहीसे करेल. त्याचप्रमाणे, सैतानाच्या जगात सध्या असलेल्या दुष्टाईमुळे आपण आपला विश्‍वास कमकुवत होऊ देण्याऐवजी किंवा अंत केव्हा येईल याविषयी अधीर होण्याऐवजी, सर्वकाळ टिकणाऱ्‍या पण अद्यापही आपण न पाहिलेल्या गोष्टींवर विश्‍वास बाळगू या. यहोवाने दुष्टाईचा अंत करण्याची एक खास वेळ ठरवली आहे आणि तो अगदी योग्य वेळी कार्य करेल.—यश. ४६:१३; नहू. १:९.

१५ या दुष्ट जगाच्या शेवटल्या कठीण दिवसांत आपल्याला अतिशय बिकट समस्यांचा सामना करावा लागू शकतो ज्यांमुळे आपल्या विश्‍वासाची परीक्षा होऊ शकते. जेव्हा आपण हिंसेला बळी पडतो किंवा आपल्या प्रियजनांना त्रास सहन करावा लागतो, तेव्हा संतापण्याऐवजी, आपण यहोवावर पूर्णपणे भरवसा ठेवण्याचा निर्धार केला पाहिजे. आपण अपरिपूर्ण असल्यामुळे, असे करणे मुळीच सोपे नाही. पण, अशा वेळी मत्तय २६:३९ (वाचा.) मध्ये सांगितल्याप्रमाणे येशूने काय केले होते याची आठवण करा.

१६. या दुष्ट जगाच्या उरलेल्या काळात आपण काय करण्याचे टाळले पाहिजे?

१६ देवासारखा धीर दाखवण्याच्या आड येणारी एक गोष्ट म्हणजे ‘होईल तेव्हा बघून घेऊ’ अशी मनोवृत्ती बाळगणे. याचा काय अर्थ आहे? अंत जवळ आहे याविषयी एखाद्या व्यक्‍तीला शंका असेल, तर ती व्यक्‍ती ‘यहोवाने अभिवचन दिल्याप्रमाणे गोष्टी न घडल्यास काय,’ असा विचार करून कदाचित स्वतःच्या योजना आखण्यास सुरुवात करेल. दुसऱ्‍या शब्दांत सांगायचे झाल्यास, ती कदाचित असा विचार करेल, ‘यहोवा खरोखरच आपलं अभिवचन पूर्ण करतो का हे पाहू या.’ ती व्यक्‍ती कदाचित या जगात नाव कमावण्याचा, देवाच्या राज्याला प्राधान्य देण्याऐवजी आर्थिक रीत्या सुरक्षित होण्याचा, किंवा आरामदायक जीवन जगता यावे म्हणून उच्च शिक्षण घेण्याचा प्रयत्न करेल. पण, असे करणे हा विश्‍वासाचा अभाव असल्याचा पुरावा नाही का? ज्या विश्‍वासू जनांनी त्यांच्या “विश्‍वासाच्या व धीराच्या योगे” यहोवाकडून आशीर्वाद प्राप्त केले होते त्यांचे अनुकरण करण्यास पौलाने आपल्याला आर्जवले याची आठवण ठेवा. (इब्री ६:१२) यहोवाच्या उद्देशाच्या पूर्ततेसाठी आवश्‍यक असेल, त्यापेक्षा थोडाही जास्त काळ तो या दुष्ट जगाला अस्तित्वात राहू देणार नाही. (हब. २:३) पण तोपर्यंत, आपण केवळ नावापुरती यहोवाची सेवा करण्याचे टाळले पाहिजे. त्याऐवजी, आपण जागृत राहिले पाहिजे आणि आपल्याला अतोनात समाधान देणाऱ्‍या सुवार्ता प्रचार कार्यात सहभागी होण्याचा मनस्वी प्रयत्न केला पाहिजे.—लूक २१:३६.

धीर धरल्यामुळे कोणते आशीर्वाद मिळतात?

१७, १८. (क) धीर धरण्याच्या बाबतीत आज आपल्याला कोणती संधी उपलब्ध आहे? (ख) सध्याच्या या काळात धीर धरल्यामुळे आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतील?

१७ आपण देवाची सेवा केवळ काही महिन्यांपासून करत असलो किंवा अनेक दशकांपासून, त्याची सेवा सदासर्वकाळ करण्याची आपली इच्छा आहे. धीर धरल्यामुळे, जोपर्यंत आपल्याला तारण मिळत नाही तोपर्यंत विश्‍वासात टिकून राहण्यास आपल्याला मदत मिळेल, मग या जगाचा अंत होण्यास आणखी कितीही काळ लागला तरीसुद्धा. आपल्याला यहोवाच्या निर्णयांवर पूर्ण भरवसा आहे आणि गरज पडल्यास आपण त्याच्या नावासाठी दुःख सहन करण्यासही तयार आहोत, हे दाखवून देण्याची तो आज आपल्याला संधी देत आहे. (१ पेत्र ४:१३, १४) तसेच, तारण मिळेपर्यंत धीर धरण्यासाठी तो आपल्याला आवश्‍यक ते मार्गदर्शनदेखील पुरवत आहे.—१ पेत्र ५:१०.

१८ येशूला स्वर्गातील व पृथ्वीवरील सर्व अधिकार देण्यात आला आहे आणि तुमच्याशिवाय आणखी कोणीही त्याच्या प्रेमळ संरक्षणातून तुम्हाला हिरावून घेऊ शकत नाही. (योहा. १०:२८, २९) आपण भविष्याची, इतकेच काय तर मृत्यूचीही भीती बाळगण्याचे काहीएक कारण नाही. जे शेवटपर्यंत धीर धरतील आणि विश्‍वासात टिकून राहतील त्यांचे तारण होईल. म्हणूनच या जगाच्या भुलवणुकीला बळी पडून यहोवावर विसंबून राहण्याचे आपण कधीही सोडू नये. त्याऐवजी, आपला विश्‍वास आणखी मजबूत करण्याचा आणि देवाने धीर दाखवल्यामुळे मिळालेल्या या उर्वरित वेळेचा सदुपयोग करण्याचा आपण निर्धार करू या.—मत्त. २४:१३; २ पेत्र ३:१७, १८ वाचा.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२१ पानांवरील चित्रे]

देवासारखा धीर दाखवल्यामुळे राज्याच्या कार्यांवर लक्ष केंद्रित करण्यास आणि अनेक आशीर्वाद प्राप्त करण्यास साहाय्य मिळेल!