व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“तुम्हास तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही”

“तुम्हास तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही”

“तुम्हास तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही”

“म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हास तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही.” —मत्त. २५:१३.

तुमचे उत्तर काय असेल?

अंत येण्याचा दिवस व घटका माहीत नसल्यामुळे आपल्याला कोणकोणत्या मार्गांनी फायदा होतो?

अभिषिक्‍त जन कशा प्रकारे जागृत राहिले आहेत?

ख्रिस्ताच्या आगमनासाठी आपण तयार आहोत हे आपण कोणकोणत्या मार्गांनी दाखवू शकतो?

१-३. (क) येशूच्या दृष्टान्तांतील मुख्य मुद्दा कोणत्या प्रसंगांतून स्पष्ट होतो? (ख) कोणत्या प्रश्‍नांवर विचार करणे गरजेचे आहे?

 अशी कल्पना करा, की मोठ्या पदावर असलेल्या एका अधिकाऱ्‍याला एका महत्त्वाच्या कामासाठी जायचे आहे, आणि तेथे गाडीने पोचवून देण्याची विनंती त्याने तुम्हाला केली आहे. अधिकाऱ्‍याला घ्यायला जाण्याच्या काही मिनिटांआधी तुमच्या लक्षात येते की तुमच्या गाडीत पुरेसे पेट्रोल नाही. तुम्ही लगबगीने गाडीत पेट्रोल भरण्यासाठी जाता. तेवढ्यात अधिकारी तेथे येऊन तुम्हाला शोधू लागतो, पण तुम्ही त्याला दिसत नाही. त्याला तुमच्यासाठी थांबणे शक्य नसते, त्यामुळे आपल्याला पोचवून देण्याची तो दुसऱ्‍या कोणाला तरी विनंती करतो. थोड्याच वेळात तुम्ही परत येता पण अधिकारी तुमची वाट न पाहता निघून गेल्याचे तुमच्या लक्षात येते. तुम्हाला कसे वाटेल?

आता अशी कल्पना करा, की तुम्ही एक अधिकारी आहात आणि एका महत्त्वाच्या कामाची देखरेख करण्यासाठी तुम्ही तीन सुयोग्य माणसांना निवडले आहे. तुम्ही त्यांना काम समजावून सांगता आणि तिघेही जण ते आनंदाने स्वीकारतात. पण काही काळाने तुम्ही परतता तेव्हा तिघांपैकी दोघांनीच काम केले आहे असे तुमच्या लक्षात येते. इतकेच काय, तर ज्याने काम केले नाही तो त्यासाठी वेगवेगळ्या सबबी देत आहे. मुळात त्याने काम पूर्ण करण्यासाठी स्वतःकडून कोणताही प्रयत्न केलेला नाही. तुम्हाला कसे वाटेल?

वरील दोन्ही प्रसंग येशूने दिलेल्या दहा कुमाऱ्‍यांच्या व रुपयांच्या दृष्टान्तांशी मिळतेजुळते आहेत. अंतसमयात काही अभिषिक्‍त ख्रिस्ती विश्‍वासू व बुद्धिमान असल्याचे का दाखवून देतील, पण काही जण असे का करणार नाहीत हे स्पष्ट करण्यासाठी येशूने या दृष्टान्तांचा उपयोग केला. * (मत्त. २५:१-३०) या दृष्टान्तांद्वारे येशू जे शिकवू इच्छित होता त्यावर जोर देण्यासाठी त्याने म्हटले: “म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हास तो दिवस किंवा ती घटका”—म्हणजेच सैतानाच्या जगावर येशू जेव्हा देवाचा न्यायदंड बजावेल ती नेमकी वेळ—“ठाऊक नाही.” (मत्त. २५:१३) येशूने दिलेला हा सल्ला आज आपल्याकरता उपयोगी आहे. त्याने प्रोत्साहन दिल्याप्रमाणे जागृत राहिल्यामुळे आपल्याला कोणता फायदा होऊ शकतो? अंतातून बचावण्याकरता तयार असल्याचे कोणी दाखवून दिले आहे? आणि जागृत राहण्यासाठी आज आपण काय केले पाहिजे?

जागृत राहण्याचे फायदे

४. जागृत राहण्याचा अर्थ, अंत केव्हा येईल याचाच सतत विचार करणे असा का होत नाही?

काही कामे, जसे की कारखान्यात काम करणे, डॉक्टरांची भेट घेणे किंवा बस अथवा ट्रेन पकडणे यासाठी निश्‍चित वेळेचे पालन करणे गरजेचे असते. दुसरीकडे पाहता, आग विझवणे, किंवा नैसर्गिक विपत्ती आल्यानंतर बचाव कार्य करणे अशा प्रकारची कामे करताना वेळ-काळ विसरून काम करावे लागते. अशा आणीबाणीच्या प्रसंगांत घड्याळाकडे पाहत काम केल्यास, कामात व्यत्यय येऊ शकतो किंवा धोकाही संभवू शकतो. या जगाचा अंत दिवसेंदिवस जवळ येत आहे. त्यामुळे, बचावाकरता यहोवाने ज्या तरतुदी केल्या आहेत त्यांविषयी लोकांना सांगण्याचे काम आज सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. ख्रिस्ती या नात्याने जागृत राहण्याचा अर्थ, अंत केव्हा येईल याचाच सतत विचार करणे असा होत नाही. खरेतर, अंत येण्याचा नेमका दिवस व घटका माहीत नसल्यामुळे आपल्याला किमान पाच मार्गांनी फायदा होतो.

५. अंत येण्याचा दिवस व घटका माहीत नसल्यामुळे आपल्या अंतःकरणात काय आहे हे दाखवण्यास कशा प्रकारे मदत मिळू शकते?

पहिली गोष्ट म्हणजे, अंत केव्हा येईल हे माहीत नसल्यामुळे आपल्या अंतःकरणात खरोखर काय आहे हे दाखवण्याची आपल्याला संधी मिळते. यहोवाला एकनिष्ठ राहावे अथवा नाही हे ठरवण्याचे स्वातंत्र्य देण्याद्वारे खरे पाहता त्याने आपल्याला आदर दाखवला आहे. या जगाच्या अंतातून बचावण्यास आपण उत्सुक असलो, तरी यहोवाची सेवा आपण फक्‍त जीवन मिळवण्याकरता नव्हे, तर त्याच्यावर असलेल्या प्रेमाखातर करतो. (स्तोत्र ३७:४ वाचा.) त्याच्या इच्छेनुसार वागण्यास आपल्याला आनंद वाटतो आणि तो आपल्याला जे काही शिकवतो ते आपल्या भल्याकरता आहे हे आपण ओळखतो. (यश. ४८:१७) त्याच्या आज्ञा आपल्याला कधीही त्रासदायक वाटत नाहीत.—१ योहा. ५:३.

६. आपण प्रेमापोटी देवाची सेवा करतो तेव्हा त्याला कसे वाटते आणि का?

अंत येण्याचा दिवस व घटका माहीत नसण्याचा दुसरा फायदा म्हणजे यामुळे आपल्याला यहोवाचे मन आनंदित करण्याची संधी मिळते. जेव्हा आपण केवळ एखादी तारीख मनात ठेवून किंवा काहीतरी प्रतिफळ मिळण्याच्या अपेक्षेने नव्हे, तर प्रेमापोटी यहोवाची सेवा करतो, तेव्हा आपण देवाचा शत्रू सैतान याने त्याच्यावर केलेल्या निराधार दोषारोपांना प्रत्युत्तर देण्यास साहाय्य करत असतो. (ईयो. २:४, ५; नीतिसूत्रे २७:११ वाचा.) दियाबलामुळे आजपर्यंत जगात जी सर्व दुःखे व संकटे ओढवली आहेत ती लक्षात ठेवून आपण आनंदाने यहोवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करतो आणि सैतानाच्या दुष्ट शासनाचा धिक्कार करतो.

७. जीवनात आत्मत्यागी मनोवृत्ती दाखवणे ही एक चांगली गोष्ट आहे असे तुम्हाला का वाटते?

तिसरा फायदा म्हणजे एक खास तारीख मनात न ठेवता यहोवाची सेवा केल्यामुळे आपल्याला जीवनात आत्मत्यागी मनोवृत्ती दाखवण्याचे प्रोत्साहन मिळते. आज देवाला न ओळखणाऱ्‍यांपैकीही काही जण मानतात की सध्याच्या परिस्थितीत हे जग फार काळ टिकू शकत नाही. जगावर काहीतरी मोठे संकट येणार आहे या भीतीने ते असा विचार करतात, “चला, आपण खाऊ, पिऊ कारण उद्या मरावयाचे आहे.” (१ करिंथ. १५:३२) पण, आपल्या मनात अशा प्रकारची भीती नाही. आपण आत्मकेंद्री बनून स्वतःचे स्वार्थ पूर्ण करण्यात गढून जात नाही. (नीति. १८:१) उलट, आपण स्वतःच्या इच्छा-आकांक्षा बाजूला सारून इतरांना देवाच्या राज्याची सुवार्ता सांगण्यासाठी उदारतेने आपला वेळ, शक्‍ती व इतर साधनसंपत्ती खर्च करतो. (मत्तय १६:२४ वाचा.) देवाची सेवा करण्यास, विशेषतः इतरांना त्याच्याविषयी जाणून घ्यायला मदत करण्यास आपल्याला आनंद वाटतो.

८. आपण यहोवावर व त्याच्या वचनावर अधिकाधिक विसंबून राहिले पाहिजे हे बायबलमधील कोणत्या उदाहरणावरून दिसून येते?

तो दिवस व ती घटका माहीत नसण्याचा चौथा फायदा म्हणजे यामुळे यहोवावर अधिकाधिक विसंबून राहण्यास आणि जीवनात त्याच्या वचनाचे काळजीपूर्वक पालन करण्यास आपल्याला साहाय्य मिळते. आपण अपरिपूर्ण असल्यामुळे स्वभावतःच आपल्यामध्ये स्वतःच्या बुद्धीवर विसंबून राहण्याची प्रवृत्ती आहे. पौलाने सर्व ख्रिश्‍चनांना असा सल्ला दिला: “आपण उभे आहो असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून संभाळावे.” यहोशवा देवाच्या लोकांना प्रतिज्ञात देशात नेणार, त्याच्या थोड्याच काळाआधी तेवीस हजार लोकांनी यहोवाच्या विरुद्ध पाप केले व ते त्याची मर्जी गमावून बसले. पौलाने म्हटले की “ह्‍या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत.”—१ करिंथ. १०:८, ११, १२.

९. कठीण परिस्थितीमुळे कशा प्रकारे आपल्यामध्ये ख्रिस्ती गुण विकसित होऊ शकतात आणि आपल्याला देवाच्या जवळ येण्यास कशा प्रकारे मदत मिळू शकते?

अंत केव्हा येईल हे माहीत नसण्याचा पाचवा फायदा म्हणजे सध्या आपल्याला ज्या परीक्षांना तोंड द्यावे लागते त्यांमुळे आपल्याला अनेक उत्तम ख्रिस्ती गुण विकसित करण्यास मदत मिळते. (स्तोत्र ११९:७१ वाचा.) या जगाचे शेवटले दिवस खरोखर अतिशय “कठीण” आहेत. (२ तीम. ३:१-५) सैतानाच्या जगातील बहुतेक लोक आपला द्वेष करतात आणि त्यामुळे आपल्या विश्‍वासासाठी कदाचित आपला छळ केला जाईल. (योहा. १५:१९; १६:२) अशा परीक्षांना तोंड देताना आपण नम्र मनोवृत्ती बाळगून देवाचे मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न केल्यास आपला विश्‍वास आगीत टाकून शुद्ध केलेल्या सोन्यासारखा बनेल. परीक्षा आल्या तरीसुद्धा आपण खचून जाणार नाही. उलट, कधी कल्पनाही केली नसेल इतके आपण यहोवाच्या जवळ येऊ.—याको. १:२-४; ४:८.

१०. कोणत्या कारणामुळे वेळ लवकर निघून गेल्याचा भास होतो?

१० वेळेकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहतो हे काही अंशी आपल्यावर अवलंबून असते. जेव्हा आपण घड्याळाकडे पाहत राहण्याऐवजी एखाद्या कामात पूर्णपणे तल्लीन होतो तेव्हा वेळ कसा निघून गेला हे आपल्याला कळतसुद्धा नाही. त्याच प्रकारे यहोवाने आपल्यावर सोपवलेल्या रोमांचक कार्यात जर आपण स्वतःला झोकून दिले, तर अंताचा दिवस व घटका आपल्या कल्पनेपेक्षाही लवकर येईल. या बाबतीत बहुतेक अभिषिक्‍त जनांनी आपल्यापुढे उत्तम उदाहरण मांडले आहे. आता आपण १९१४ साली येशूला राजपदी नियुक्‍त करण्यात आल्यानंतर जे घडले त्याचा संक्षिप्त आढावा घेऊ या, आणि कशा प्रकारे काही जणांनी या घटनेसाठी तयार असल्याचे दाखवले तर इतरांनी दाखवले नाही, हे पाहू या.

अभिषिक्‍त जन तयार असल्याचे दाखवून देतात

११. अभिषिक्‍त जनांपैकी काहींनी, १९१४ सालानंतर प्रभू विलंब लावत आहे असा निष्कर्ष का काढला?

११ येशूने दिलेल्या दहा कुमाऱ्‍यांच्या व रुपयांच्या दृष्टान्तांची आठवण करा. या दृष्टान्तांतील कुमाऱ्‍यांना किंवा दासांना त्यांचा वर किंवा धनी केव्हा येणार हे माहीत असते तर साहजिकच त्यांनी जागृत राहण्याची गरजच उरली नसती. पण तो केव्हा येणार हे त्यांना माहीत नसल्यामुळे त्यांनी तयार राहणे गरजेचे होते. अभिषिक्‍त जनांना कित्येक दशकांपासून माहीत होते की १९१४ हे एक खास वर्ष असेल. पण त्यावर्षी नेमके काय घडेल हे त्यांना स्पष्टपणे समजलेले नव्हते. जेव्हा त्यांच्या अपेक्षेप्रमाणे घटना घडल्या नाहीत, तेव्हा वराला येण्यास उशीर होत आहे असे कदाचित त्यांना वाटले असेल. एका बांधवाने नंतर असे सांगितले, “आमच्यापैकी काही जणांना खरोखरच असं वाटत होतं की त्या वर्षी [१९१४] ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आम्ही स्वर्गात जाणार आहोत.”

१२. अभिषिक्‍त जनांनी विश्‍वासू व बुद्धिमान असल्याचे कशा प्रकारे दाखवून दिले?

१२ अंत येईल अशी अपेक्षा केल्यावर जेव्हा तो आला नाही, तेव्हा त्या बांधवांना किती निराशा वाटली असेल याची कल्पना करा! शिवाय, पहिल्या महायुद्धाशी संबंधित बाबींवरून त्यांचा विरोधही होत होता. त्यामुळे, प्रचाराचे कार्य जवळजवळ ठप्पच झाले. अभिषिक्‍त जन जणू झोपी गेले होते. पण, १९१९ साली जागे होण्याचे आवाहन करण्यात आले! त्या वेळी येशू, देवाच्या आध्यात्मिक मंदिराची पाहणी करण्यासाठी आला होता. पण काही जण कसोटीवर खरे उतरले नाहीत आणि परिणामस्वरूप राजाच्या मालमत्तेवर देखरेख करण्याचा विशेषाधिकार ते गमावून बसले. (मत्त. २५:१६) मूर्ख कुमाऱ्‍यांप्रमाणे त्यांनी आपल्या दिव्यांमध्ये पुरेसे तेल भरण्याची काळजी घेतली नव्हती. आणि आळशी दासाप्रमाणे राज्याच्या कार्यांसाठी कोणतेही वैयक्‍तिक त्याग करण्यास ते तयार नव्हते. पण, अभिषिक्‍त जनांपैकी बहुतेक जण मात्र ख्रिस्ताला एकनिष्ठ राहिले आणि युद्धाच्या त्या बिकट काळातही त्यांनी आपल्या धन्याची सेवा करण्याची उत्कट इच्छा प्रदर्शित केली.

१३. एकोणीसशे चौदानंतर दास वर्गाची काय मनोवृत्ती होती आणि आज ते कशा प्रकारची मनोवृत्ती बाळगतात?

१३ एकोणीसशे चौदानंतर टेहळणी बुरूज नियतकालिकात हे महत्त्वपूर्ण विधान करण्यात आले: “बंधूंनो, आपल्यापैकी ज्यांची देवाप्रती योग्य मनोवृत्ती आहे ते त्याच्या कोणत्याही तरतुदींबाबत निराश झालेले नाहीत. आपल्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे घडावे अशी आपली अभिलाषा नव्हतीच; त्यामुळे, १९१४ सालच्या ऑक्टोबरमध्ये आपण ज्याची वाट पाहत होतो ते योग्य नव्हते हे लक्षात आले, तेव्हा आपल्या इच्छेप्रमाणे घडवून आणण्याकरता प्रभूने त्याच्या योजनेत बदल केला नाही याचा आपल्याला आनंदच वाटला. त्याने असा बदल करावा अशी आपली मुळीच इच्छा नव्हती. केवळ, त्याच्या योजना व संकल्प आपल्याला समजून घेता यावेत एवढीच आपली इच्छा आहे.” आजही प्रभूचे अभिषिक्‍त जन अशाच प्रकारची नम्र व एकनिष्ठ मनोवृत्ती दाखवतात. ते जे काही सांगतात ते देवप्रेरित असल्याचा दावा ते करत नाहीत, पण पृथ्वीवर प्रभूच्या कारभाराची देखरेख करण्याचा त्यांचा निर्धार आहे. आणि आज दुसऱ्‍या मेंढरांचा एक “मोठा लोकसमुदाय,” अर्थात पृथ्वीवरील जीवनाची आशा असलेले ख्रिस्ती, या अभिषिक्‍त जनांच्या सतर्क व आवेशी मनोवृत्तीचे अनुकरण करत आहेत.—प्रकटी. ७:९; योहा. १०:१६.

आपण तयार आहोत हे दाखवू या

१४. विश्‍वासू व बुद्धिमान दास जे शिकवतो त्याचे पालन करणे चांगले का आहे?

१४ आध्यात्मिक अन्‍न पुरवण्याकरता देवाने आज विश्‍वासू व बुद्धिमान दासाला नियुक्‍त केले आहे. अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांप्रमाणेच, मोठ्या लोकसमुदायातील जागरूक सदस्य या दासाला एकनिष्ठपणे जडून राहतात. जणू ते देवाच्या वचनातून व त्याच्या आत्म्याद्वारे आपल्या दिव्यांमध्ये आध्यात्मिक तेल भरून घेतात. (स्तोत्र ११९:१३०; योहान १६:१३ वाचा.) अशा प्रकारे आध्यात्मिक बळ व प्रोत्साहन मिळाल्यामुळे ते ख्रिस्ताच्या परतण्यासाठी तयार असल्याचे दाखवून देतात. अभिषिक्‍त जनांप्रमाणेच, तेदेखील कठीण परीक्षा आल्या तरीसुद्धा प्रचाराच्या कार्यात आवेशी राहतात. उदाहरणार्थ, एका नात्झी तुरुंग छावणीत, सुरुवातीला बांधवांजवळ केवळ एकच बायबल होते. त्यामुळे, आणखी आध्यात्मिक अन्‍न मिळावे अशी त्यांनी प्रार्थना केली. त्याच्या थोड्याच काळानंतर त्यांना समजले की तुरुंगात नवीनच आलेल्या एका बांधवाने आपल्या कृत्रिम पायात टेहळणी बुरूज नियतकालिकाचे अलीकडचे काही अंक लपवून आणले होते. नात्झी छळातून जिवंत बचावलेल्यांपैकी एक अभिषिक्‍त बंधू अर्न्‌स्ट वाउअर यांनी नंतर सांगितले: “त्या लेखांतील प्रोत्साहनदायक विचार आठवणीत ठेवण्यास यहोवानं अतिशय अद्‌भुत रीत्या आम्हाला साहाय्य केलं.” पुढे ते म्हणाले: “आज आध्यात्मिक अन्‍न आपल्याला किती सहजपणे उपलब्ध होतं, पण आपण नेहमीच त्याची कदर बाळगतो का? मला खातरी आहे की जे यहोवावर भरवसा ठेवतात, त्याला एकनिष्ठ राहतात आणि त्याच्या मेजावरून अन्‍न ग्रहण करतात त्यांच्यासाठी त्यानं विपुल आशीर्वाद राखून ठेवले आहेत.”

१५, १६. ख्रिस्ती सेवाकार्याबद्दल एका जोडप्याने दाखवलेल्या आवेशामुळे त्यांना कोणते आशीर्वाद मिळाले आणि अशा अनुभवांवरून तुम्ही काय शिकू शकता?

१५ तसेच, दुसरी मेंढरे ख्रिस्ताच्या बांधवांना पूर्ण सहकार्य देतात आणि प्रभूच्या कार्यात आवेशाने सहभाग घेतात. (मत्त. २५:४०) ते येशूच्या दृष्टान्तातील दुष्ट व आळशी दासासारखे नाहीत. तर, ते राज्याच्या कार्यांना प्राधान्य देतात आणि त्यांसाठी त्याग करायला व परिश्रम घ्यायलाही ते तयार असतात. उदाहरणार्थ, जॉन व मासाको यांना केनिया येथील चिनी-भाषक क्षेत्रात मदत करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले, तेव्हा सुरुवातीला त्यांच्या मनात काही शंका होत्या. पण आपल्या परिस्थितीचा प्रार्थनापूर्वक विचार केल्यानंतर त्यांनी तेथे जाण्याचा निर्णय घेतला.

१६ त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांना अनेक आशीर्वाद मिळाले. त्यांनी सांगितले, “या ठिकाणी सेवाकार्य करणं खूपच आनंददायक आहे.” त्यांनी सात बायबल अभ्यास सुरू केले. आणखीही अनेक रोमांचक अनुभव त्यांना आले. शेवटी ते म्हणाले, “आम्हाला इथं येऊ दिल्याबद्दल आम्ही दररोज यहोवाचे आभार मानतो.” अर्थातच, असे इतरही अनेक बंधुभगिनी आहेत, ज्यांनी आपल्या निर्णयांतून हे दाखवून दिले आहे की अंत कधीही आला, तरीसुद्धा देवाच्या सेवेत पूर्णपणे तल्लीन राहण्याचा त्यांचा दृढ संकल्प आहे. गिलियड प्रशालेतून पदवीधर होऊन मिशनरी कार्य हाती घेतलेल्या हजारो जणांचा विचार करा. टेहळणी बुरूज, १५ ऑक्टोबर २००१ अंकातील, “आम्ही जमेल तितका प्रयत्न करतो!” असे शीर्षक असलेल्या लेखातून मिशनरी सेवेची एक झलक पाहण्यास तुम्हाला आवडेल का? मिशनऱ्‍यांच्या दैनंदिन जीवनाचे या लेखातील रोचक वर्णन वाचताना, देवाची अधिकाधिक स्तुती करण्यासाठी आणि आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी तुम्हालाही कशा प्रकारे आपली सेवा वाढवता येईल याचा विचार करा.

तुम्हीसुद्धा जागृत राहा

१७. या जगाचा अंत होण्याचा नेमका दिवस व घटका माहीत नसणे हा कशा प्रकारे आपल्याकरता एक आशीर्वादच ठरला आहे?

१७ खरोखर, या जगाचा अंत होण्याचा नेमका दिवस व घटका माहीत नसणे हा आपल्याकरता एक आशीर्वादच ठरला आहे. निराश होण्याऐवजी किंवा खचून जाण्याऐवजी, आपण यहोवाच्या इच्छेप्रमाणे कार्य करण्यास स्वतःला वाहून घेतो आणि असे केल्यामुळे आपल्या प्रेमळ पित्याच्या अधिकाधिक जवळ येतो. नांगराला हात घातल्यावर, लक्ष विचलित करणाऱ्‍या सर्व गोष्टी टाळल्यामुळे आणि आपल्या धन्याचे कार्य करत राहिल्यामुळे आपल्याला त्याच्या कार्यात मनस्वी समाधान मिळते.—लूक ९:६२.

१८. आपण विश्‍वासूपणे देवाची सेवा का करत राहू इच्छितो?

१८ देवाचा न्यायाचा दिवस वेगाने जवळ येत आहे. आपल्यापैकी कोणालाही यहोवाला किंवा येशूला निराश करण्याची इच्छा नाही. त्यांनी या शेवटल्या दिवसांत आपल्यावर एक अतिशय महत्त्वाची व मोलाची सेवा सोपवली आहे. त्यांनी आपल्यावर जो विश्‍वास टाकला आहे त्याची आपण मनापासून कदर करतो!—१ तीमथ्य १:१२ वाचा.

१९. आपण यहोवाच्या दिवसाकरता तयार असल्याचे कसे दाखवू शकतो?

१९ आपल्याला स्वर्गात जीवन उपभोगण्याची आशा असो किंवा पृथ्वीवरील नंदनवनात, आपण देवाने दिलेल्या प्रचार करण्याच्या व शिष्य बनवण्याच्या कार्यात विश्‍वासूपणे टिकून राहण्याचा दृढ संकल्प करू या. यहोवाचा दिवस येण्याची नेमकी तारीख व घटका अजूनही आपल्याला माहीत नाही आणि ती जाणून घेण्याची खरोखरच काही गरज आहे का? आपण त्या दिवसासाठी तयार आहोत हे आज व पुढेही दाखवत राहू या. (मत्त. २४:३६, ४४) आपल्याला याची पक्की खातरी आहे की यहोवावर पूर्ण भरवसा ठेवून त्याच्या राज्याला जीवनात सर्वाधिक महत्त्व दिल्यास आपली कधीही निराशा होणार नाही.—रोम. १०:११.

[तळटीप]

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२६ पानांवरील चित्र]

कठीण परिस्थितीतही आध्यात्मिक अन्‍न मिळवण्याचा प्रयत्न करा

[२७ पानांवरील चित्र]

आपण ख्रिस्ती कार्यांत स्वतःला झोकून देतो तेव्हा वेळ सहसा लवकर निघून जातो