व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा आपल्या आनंदित लोकांना एकत्र जमवतो

यहोवा आपल्या आनंदित लोकांना एकत्र जमवतो

यहोवा आपल्या आनंदित लोकांना एकत्र जमवतो

“सर्व लोकांना म्हणजे पुरुष, स्त्रिया, बालके आणि तुझ्या नगरातला उपरी ह्‍यांना जमव.” —अनु. ३१:१२.

तुमचे उत्तर काय असेल?

यहोवाच्या लोकांच्या इतिहासात अधिवेशने उल्लेखनीय प्रसंग राहिले आहेत असे आपण का म्हणू शकतो?

जेरूसलेममधील सणांना उपस्थित राहण्यासाठी प्राचीन इस्राएली लोकांना कोणते त्याग करावे लागायचे?

तुम्ही एकही अधिवेशन का चुकवू नये?

१, २. या लेखात आपण अधिवेशनांविषयी काय शिकणार आहोत?

 आंतरराष्ट्रीय व प्रांतीय अधिवेशने ही यहोवाच्या साक्षीदारांच्या आधुनिक काळातील इतिहासाची वैशिष्ट्ये राहिली आहेत. आपल्यापैकी बहुतेक जण मागील दशकांत अशा कितीतरी आनंददायी अधिवेशनांना उपस्थित राहिलो आहोत.

हजारो वर्षांपूर्वीदेखील, देवाचे लोक पवित्र अधिवेशने भरवायचे. बायबलमध्ये उल्लेख केलेल्या त्या अधिवेशनांविषयी आपण जाणून घेऊ या. प्राचीन काळातील अधिवेशने व आधुनिक काळातील अधिवेशने यांत कोणती समान वैशिष्ट्ये आहेत हे आपण पाहू या, आणि त्या अधिवेशनांना उपस्थित झाल्यामुळे कोणते फायदे झाले हेदेखील पाहू या.—स्तो. ४४:१; रोम. १५:४.

प्राचीन व आधुनिक काळातील उल्लेखनीय अधिवेशने

३. (क) बायबलमध्ये उल्लेख केलेल्या सर्वात पहिल्या अधिवेशनाचे वैशिष्ट्य काय होते? (ख) इस्राएल लोकांना कशा प्रकारे एकत्र जमवले जायचे?

देवाच्या लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन देण्यासाठी सीनाय पर्वताच्या पायथ्याशी एक सभा भरवण्यात आली होती. बायबलमध्ये नमूद असलेली ही सर्वात पहिली मोठी सभा होती. शुद्ध उपासनेच्या इतिहासात ही सभा एक उल्लेखनीय घटना होती. त्या रोमहर्षक प्रसंगी यहोवाने इस्राएली लोकांना नियमशास्त्र दिले तेव्हा त्याचे अफाट सामर्थ्य दिसून आले. त्या प्रसंगी उपस्थित असलेले कोणीही नक्कीच ही घटना विसरले नसतील. (निर्ग. १९:२-९, १६-१९; निर्गम २०:१८; अनुवाद ४:९, १० वाचा.) तेव्हापासून इस्राएल लोकांसोबत देवाच्या व्यवहारांत महत्त्वाचा बदल झाला. त्यानंतर थोड्याच काळाने, यहोवाने आपल्या लोकांना एकत्र बोलावण्याकरता खास व्यवस्था केली. त्याने मोशेला दोन चांदीचे कर्णे बनवायला सांगितले. या कर्ण्यांचा उपयोग “दर्शनमंडपाच्या दारापाशी” इस्राएलच्या सर्व “मंडळीला” जमवण्यासाठी केला जाणार होता. (गण. १०:१-४) अशा प्रसंगी उपस्थित होणाऱ्‍यांना किती आनंद होत असेल याची कल्पना करा!

४, ५. मोशे व यहोशवा यांनी भरवलेली अधिवेशने खासकरून महत्त्वाची का होती?

इस्राएल लोकांनी ४० वर्षे अरण्यातून प्रवास केला होता. त्या प्रवासाच्या शेवटी, या नव्यानेच स्थापन झालेल्या राष्ट्राच्या इतिहासातील एका सर्वात महत्त्वाच्या क्षणी मोशेने आपल्या इस्राएली बांधवांना एकत्र जमवले. ते प्रतिज्ञात देशात प्रवेश करण्यास सज्ज होते. यहोवाने त्यांच्याकरता जे काही केले होते आणि पुढेही तो जे काही करणार होता त्याविषयी मोशेने इस्राएली लोकांना आठवण करून देण्याची ही योग्य वेळ होती.—अनु. २९:१-१५; ३०:१५-२०; ३१:३०.

कदाचित याच अधिवेशनाच्या वेळी, मोशेने लोकांना सांगितले असावे की एक खास अधिवेशन नियमितपणे भरवले जाईल. दर सात वर्षांनी मांडवांच्या सणादरम्यान पुरुषांनी, स्त्रियांनी, लहान मुलांनी आणि इस्राएलमध्ये राहणाऱ्‍या विदेश्‍यांनी यहोवाने ठरवलेल्या ठिकाणी एकत्र जमायचे होते. तेथे ते यहोवाच्या नियमशास्त्राविषयी शिकणार होते ज्यामुळे त्यांना त्याचे भय धरता येणार होते आणि त्याच्या आज्ञांचे पालन करता येणार होते. (अनुवाद ३१:१, १०-१२ वाचा.) अशा रीतीने, यहोवाच्या लोकांनी त्याच्या वचनाविषयी आणि त्याच्या उद्देशांविषयी चर्चा करण्यासाठी वारंवार एकत्र यायचे होते हे इस्राएलांच्या इतिहासातील या सुरुवातीच्या टप्प्यावरच स्पष्ट करण्यात आले. इस्राएल लोकांनी प्रतिज्ञात देशावर विजय मिळवला होता, पण त्यांच्या सभोवताली अजूनही मूर्तिपूजक राष्ट्रे होती. तेव्हा, यहोशवाने इस्राएल लोकांची यहोवाप्रती असलेली एकनिष्ठा आणखी मजबूत करण्याच्या हेतूने त्यांना एकत्र जमवले. त्याला प्रतिसाद म्हणून त्यांनी देवाची सेवा गंभीरतेने करण्याचे वचन दिले.—यहो. २३:१, २; २४:१, १५, २१-२४.

६, ७. यहोवाच्या लोकांची आधुनिक काळातील अधिवेशने महत्त्वाचे प्रसंग होते हे कशावरून म्हणता येईल?

यहोवाच्या लोकांच्या आधुनिक काळातील इतिहासातही उल्लेखनीय अधिवेशने भरवण्यात आली आहेत. या प्रसंगी ईश्‍वरशासित कार्यपद्धतीतील मोठ्या बदलांविषयी सांगण्यात आले आणि शास्त्रवचनांची नवीन स्पष्टीकरणे देण्यात आली. (नीति. ४:१८) १९१९ मध्ये अमेरिकेच्या ओहायो राज्यातील सीडर पॉईंट येथे भरलेले अधिवेशन हे पहिल्या महायुद्धानंतर बायबल विद्यार्थ्यांनी भरवलेले पहिले मोठे अधिवेशन होते. त्या अधिवेशनाला जवळजवळ ७,००० जण उपस्थित होते आणि त्या वेळी जगभरात प्रचार कार्य करण्याविषयी घोषणा करण्यात आली. १९२२ मध्ये याच ठिकाणी भरलेल्या ९-दिवसीय अधिवेशनादरम्यान, जोसेफ एफ. रदरफर्ड यांनी एक जबरदस्त भाषण दिले आणि सर्वत्र प्रचार करायला श्रोत्यांना आर्जवले: “प्रभूचे विश्‍वासू व खरे साक्षी व्हा. लढाईत पुढे व्हा आणि बॅबिलोनचा लवलेशही उरणार नाही तोपर्यंत संघर्ष करा. सगळीकडे संदेशाची घोषणा करा. यहोवा हा देव आहे आणि येशू ख्रिस्त हा राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे हे सर्व जगाला कळू द्या. हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. पाहा, राजा राज्य करत आहे! तुम्ही लोकांसमोर त्याचे प्रतिनिधी आहात. म्हणून राजा व त्याच्या राज्याची घोषणा करा, घोषणा करा, घोषणा करा.” तेथे उपस्थित असलेल्यांनी व जगभरातील देवाच्या लोकांनी त्या आवाहनाला आनंदाने प्रतिसाद दिला.

सन १९३१ मध्ये ओहायोतील कलंबस येथे बायबल विद्यार्थ्यांनी यहोवाचे साक्षीदार हे नाव स्वीकारले तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला. त्यानंतर, १९३५ मध्ये वॉशिंग्टन, डी.सी. येथे बंधू रदरफर्ड यांनी प्रकटीकरण पुस्तकात वर्णन केलेला “मोठा लोकसमुदाय” जो “राजासनासमोर व कोकऱ्‍यासमोर उभा राहिलेला” होता त्याची ओळख सांगितली. (प्रकटी. ७:९-१७) १९४२ मध्ये दुसऱ्‍या महायुद्धाच्या काळात नेथन एच. नॉर यांनी “शांती—ती टिकू शकेल का?” या विषयावर प्रोत्साहनदायक भाषण दिले. त्या भाषणात त्यांनी प्रकटीकरण पुस्तकातील १७ व्या अध्यायात उल्लेख केलेल्या “किरमिजी रंगाच्या” श्‍वापदाची ओळख सांगितली आणि हेही सूचित केले की दुसऱ्‍या महायुद्धानंतरही मोठ्या प्रमाणात प्रचार केला जाईल.

८, ९. काही अधिवेशने खासकरून हृदयस्पर्शी का होती?

सन १९४६ मध्ये ओहायोतील क्लीवलँड येथे भरलेल्या “आनंदी राष्ट्रे” या अधिवेशनात बंधू नॉर यांनी दिलेले “पुनर्बांधणी आणि विस्ताराच्या अडचणी” या शीर्षकाचे भाषण खासकरून उल्लेखनीय होते. या भाषणामुळे लोकांमध्ये किती उत्साह संचारला होता त्याविषयी अधिवेशनाला उपस्थित राहिलेल्या एकाने असे लिहिले: “त्या संध्याकाळी स्टेजवर त्यांच्या मागं उभं राहण्याचा सुहक्क मला लाभला होता. त्यांनी बांधकामाविषयी स्पष्ट केलं व नंतर ब्रुकलिन बेथेलगृहाचा व फॅक्टरीचा विस्तार करण्याच्या योजनेविषयी सांगितलं तेव्हा उपस्थित असलेल्या हजारो लोकांनी वारंवार टाळ्यांचा गडगडाट केला. स्टेजवरून उपस्थितांचे चेहरे स्पष्ट दिसत नसले, तरी त्यांच्या चेहऱ्‍यांवरून आनंद ओसंडून वाहत होता हे स्पष्टपणे दिसत होतं.” १९५० साली न्यू यॉर्क सिटीत भरलेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात, देवाच्या नावाचा त्याच्या वचनात योग्य रीत्या वापर करणाऱ्‍या आधुनिक भाषेतील बायबलचा पहिला भाग, अर्थात न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द ख्रिश्‍चन ग्रीक स्क्रिप्चर्स प्रकाशित करण्यात आले, तेव्हा उपस्थितांना अतिशय आनंद झाला.—यिर्म. १६:२१, पं.र.भा.

पूर्वी अनेक देशांमध्ये यहोवाच्या लोकांचा छळ करण्यात आला होता किंवा त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. अशा देशांमध्ये यहोवाने आपल्या विश्‍वासू लोकांना अधिवेशनांत एकत्र जमवले. ही अधिवेशनेदेखील अतिशय हृदयस्पर्शी होती. उदाहरणार्थ, ॲडाल्फ हिटलरने जर्मनीतील यहोवाच्या साक्षीदारांचा समूळ नाश करण्याची प्रतिज्ञा केली होती. पण, न्यूरेमबर्गमध्ये पूर्वी ज्या मैदानात हिटलरचे सैनिक परेड करायचे तेथे १९५५ मध्ये भरवण्यात आलेल्या अधिवेशनाला १,०७,००० जण उपस्थित राहिले. उपस्थितांपैकी अनेकांना आपले आनंदाश्रू आवरता आले नाहीत! १९८९ साली पोलंडमध्ये भरलेल्या “ईश्‍वरी भक्‍ती” नावाच्या तीन अधिवेशनांना १,६६,५१८ जण जमले होते. त्यांच्यापैकी बहुतेक जण त्या काळच्या सोव्हिएत संघ व चेकोस्लोवाकिया या देशांतून, तसेच पूर्व युरोपियन देशांतून आले होते. काही जण तर याआधी देवाच्या लोकांच्या इतक्या मोठ्या सभांना कधीच उपस्थित राहिले नव्हते; केवळ १५ ते २० जणांच्या सभांनाच ते उपस्थित राहिले होते. १९९३ मध्ये युक्रेनमधील कियेफ येथे भरलेल्या “ईश्‍वरी शिक्षण” आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहिलेल्यांना किती आनंद झाला असेल याचा विचार करा! त्या अधिवेशनात ७,४०२ जणांनी बाप्तिस्मा घेतला होता—एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात बाप्तिस्मा घेतलेल्यांचा यहोवाच्या साक्षीदारांच्या इतिहासातील हा एक रेकॉर्ड आहे.—यश. ६०:२२; हाग्ग. २:७.

१०. खासकरून कोणती अधिवेशने तुमच्याकरता अविस्मरणीय आहेत, आणि का?

१० कदाचित अशी काही प्रांतीय किंवा आंतरराष्ट्रीय अधिवेशने असतील जी तुमच्याकरता अविस्मरणीय ठरली असतील. तुम्ही पहिल्यांदा ज्या अधिवेशनाला उपस्थित राहिला होता ते अधिवेशन किंवा ज्या अधिवेशनात तुमचा बाप्तिस्मा झाला ते अधिवेशन तुम्हाला आठवते का? ही अधिवेशने तुमच्यासाठी विशेष प्रसंग होते. त्यांविषयीच्या आठवणी जपून ठेवा!—स्तो. ४२:४.

आनंद करण्याचे नियमित प्रसंग

११. देवाने प्राचीन इस्राएलातील लोकांकरता कोणत्या नियमित सणांची व्यवस्था केली होती?

११ यहोवाने इस्राएल लोकांना आज्ञा दिली, की त्यांनी दरवर्षी तीन वेळा सण पाळण्यासाठी जेरूसलेममध्ये एकत्र यावे. हे सण होते—बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण (ज्याला नंतर पेन्टेकॉस्ट म्हणण्यात आले), आणि मांडवांचा सण. या सणांविषयी देवाने त्यांना म्हटले: “वर्षातून तीनदा तुझ्या सर्व पुरुषांनी प्रभू परमेश्‍वरासमोर हजर राहावे.” (निर्ग. २३:१४-१७) हे सण आध्यात्मिकदृष्ट्या खूप मोलाचे आहेत हे ओळखून, अनेक कुटुंबप्रमुख आपल्या सबंध कुटुंबासोबत या सणांना उपस्थित राहायचे.—१ शमु. १:१-७; लूक २:४१, ४२.

१२, १३. इस्राएली लोकांकरता वार्षिक सणांना उपस्थित राहण्याचा काय अर्थ होता?

१२ सण पाळण्यासाठी जेरूसलेमपर्यंत प्रवास करण्याचा एका इस्राएली कुटुंबाकरता काय अर्थ होता याचा विचार करा. उदाहरणार्थ, योसेफ आणि मरीया यांना नासरेथहून जेरूसलेमला जाण्याकरता सुमारे १०० किलोमीटरचा प्रवास करावा लागणार होता. तुम्हाला काय वाटते, छोट्या बालकांना सोबत घेऊन पायी हा प्रवास पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? येशूने लहानपणी जेरूसलेमला केलेल्या प्रवासाविषयीच्या अहवालातून दिसून येते की नातेवाईक व ओळखीचे लोक कदाचित एकत्र प्रवास करायचे. सोबत मिळून प्रवास करण्याचा व एकत्र मिळून जेवण तयार करण्याचा, तसेच अनोळखी ठिकाणी झोपण्याची व्यवस्था करण्याचा अनुभव कसा असावा याचा विचार करा. तरीसुद्धा, त्या काळची परिस्थिती इतकी सुरक्षित होती, की येशूसारख्या १२-वर्षांच्या मुलाला थोडीफार स्वतंत्रता दिली जाऊ शकत होती. खासकरून लहान मुलांकरता हा किती अविस्मरणीय अनुभव राहिला असेल याचा विचार करा!—लूक २:४४-४६.

१३ इस्राएली लोक जेव्हा आपला मायदेश सोडून दूर-दूरच्या ठिकाणी जाऊन वसले, तेव्हा सण पाळण्यासाठी ते इतर देशांतून जेरूसलेमला यायचे. इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी, यहुदी व यहुदी-मतानुसारी इटली, लिबिया, क्रीट, आशिया मायनर, आणि मेसोपोटेमिया अशा ठिकाणांहून जेरूसलेमला आले होते.—प्रे. कृत्ये २:५-११; २०:१६.

१४. वार्षिक सणांना उपस्थित राहिल्याने इस्राएली लोकांना कसा फायदा व्हायचा?

१४ विश्‍वासू इस्राएली लोकांकरता अशा प्रकारच्या प्रवासातील सर्वात महत्त्वाचा व आनंददायक पैलू, यहोवाच्या इतर हजारो उपासकांसोबत मिळून त्याची उपासना करणे हा होता. उपस्थित असणाऱ्‍यांवर याचा काय प्रभाव पडायचा? याचे उत्तर, मांडवांच्या सणाच्या संदर्भात यहोवाने त्याच्या लोकांना जे मार्गदर्शन दिले होते त्यात सापडते: “ह्‍या सणात तुझा मुलगा व मुलगी, दास व दासी व तुझ्या गावात असलेला लेवी, उपरी, अनाथ व विधवा ह्‍यांच्यासह आनंदोत्सव करावा. जे स्थान परमेश्‍वर निवडील तेथे तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्याप्रीत्यर्थ सात दिवस सण पाळावा, कारण तुझे सर्व उत्पन्‍न व तू हाती घेतलेली कामे ह्‍यात तुझा देव परमेश्‍वर ह्‍याने तुला बरकत दिल्यामुळे तुला अत्यानंद होईल.”—अनु. १६:१४, १५; मत्तय ५:३ वाचा.

आधुनिक काळातील अधिवेशनांबद्दल कदर का बाळगावी?

१५, १६. अधिवेशनांना उपस्थित राहण्यासाठी तुम्हाला कोणते त्याग करावे लागले आहेत? पण त्यामुळे तुम्हाला कोणते फायदे झाले आहेत?

१५ प्राचीन काळातील अधिवेशनांतून आज देवाचे लोक कितीतरी उत्तम गोष्टी शिकू शकतात. काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलल्या असल्या, तरी अधिवेशनांच्या बाबतीत आवश्‍यक पैलू बदललेले नाहीत. प्राचीन काळात, अधिवेशनांना उपस्थित राहण्याकरता लोकांना काही त्याग करावे लागायचे. आजही अनेकांना तसेच त्याग करावे लागतात. असे असले, तरी अधिवेशनांना उपस्थित राहिल्याने आपल्याला अनेक फायदे होतात. प्राचीन काळातील हे प्रसंग महत्त्वाचे आध्यात्मिक प्रसंग होते, आणि आजही आहेत. देवासोबत घनिष्ठ नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी हवी असलेली महत्त्वाची माहिती आणि समज आपल्याला अधिवेशनांत दिली जाते. अधिवेशनांतून आपल्याला शिकलेल्या गोष्टी लागू करण्याची प्रेरणा मिळते व समस्या टाळण्यास मदत मिळते; आणि अशा गोष्टींचा पाठपुरावा करण्याचे प्रोत्साहन मिळते ज्यांमुळे आपल्या चिंतांमध्ये भर पडण्याऐवजी आपला उत्साह वाढेल.—स्तो. १२२:१-४.

१६ अधिवेशनांना उपस्थित राहणाऱ्‍यांना नेहमीच आनंद होतो. १९४६ मध्ये झालेल्या एका मोठ्या अधिवेशनाच्या अहवालात असे म्हटले होते: “हजारो साक्षीदारांना एकाच ठिकाणी एकत्र जमलेले पाहणे खूप उत्साहवर्धक होते, आणि यहोवाची स्तुती करण्यासाठी एका मोठ्या ऑर्केस्ट्रासोबत हजारो बंधुभगिनींना आनंदाने राज्य गीते गाताना ऐकणे हे त्याहूनही आनंददायी होते.” अहवालात पुढे असे म्हटले होते: “वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करण्यासाठी उपस्थितांपैकी अनेकांनी स्वयंसेवक विभागात नावे नोंदवली, ते केवळ आपल्या बंधुभगिनींची सेवा केल्याचा आनंद अनुभवण्यासाठी.” तुम्हीही प्रांतीय अधिवेशनांमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय अधिवेशनांमध्ये असा उत्साह अनुभवला आहे का?—स्तो. ११०:३; यश. ४२:१०-१२.

१७. अलीकडच्या काळात अधिवेशने आयोजित करण्याच्या बाबतीत कोणते बदल करण्यात आले आहेत?

१७ आज अधिवेशने आयोजित करण्याच्या बाबतीत काही गोष्टी बदलल्या आहेत. उदाहरणार्थ, पूर्वी अधिवेशने आठ दिवसांची असायची हे आपल्या काही बंधुभगिनींना आठवत असेल! त्या वेळी सकाळचे, दुपारचे, आणि संध्याकाळचे सत्र असायचे. कार्यक्रमात नियमितपणे क्षेत्र सेवेचा भागही असायचा. अधिवेशनातील काही भाग सकाळी नऊ वाजता सुरू व्हायचे आणि सहसा रात्री नऊ वाजेपर्यंत सत्रे असायची. उपस्थितांसाठी सकाळची न्याहारी, दुपारचे आणि संध्याकाळचे जेवण तयार करण्यासाठी स्वयंसेवक कितीतरी तास मेहनत करायचे. आता अधिवेशने कमी दिवसांची असतात, आणि बंधुभगिनी स्वतःच्या जेवणाची व्यवस्था करतात. त्यामुळे आध्यात्मिक अन्‍न ग्रहण करण्याकडे जास्त लक्ष लावण्यासाठी सर्वांना वेळ मिळतो.

१८, १९. अधिवेशनांच्या कोणत्या भागांची तुम्ही उत्सुकतेने वाट पाहता, आणि का?

१८ कितीतरी काळापासून अधिवेशन कार्यक्रमाचा अविभाज्य अंग असलेल्या काही भागांची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहिली जाते. उदाहरणार्थ, बायबलमधील भविष्यवाण्यांची आणि शिकवणींची स्पष्ट समज देणारी भाषणे व नवीन प्रकाशने यांच्या माध्यमातून आपल्याला “यथाकाळी” आध्यात्मिक अन्‍न मिळते. (मत्त. २४:४५) सहसा या नवीन प्रकाशनांचा प्रामाणिक मनाच्या लोकांना बायबलमधील सत्ये समजण्यास मदत करण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो. बायबलवर आधारित प्रेरणादायक नाटकांमुळे लहान-मोठ्या सर्वांनाच आपल्या हेतूंचे परीक्षण करण्याचे आणि या दुष्ट जगाच्या विचारसरणीपासून स्वतःचे संरक्षण करण्याचे प्रोत्साहन मिळते. बाप्तिस्म्याच्या भाषणामुळेदेखील आपल्या सर्वांना जीवनातील प्राधान्यक्रमाचे परीक्षण करण्याची आणि यहोवाला समर्पण केल्याचे प्रतीक म्हणून इतर जण बाप्तिस्मा घेतात तो आनंद अनुभवण्याची संधी मिळते.

१९ खरोखर, अधिवेशने ही हजारो वर्षांपासून शुद्ध उपासनेचा अविभाज्य भाग राहिली आहेत. त्यांमुळे यहोवाचे लोक कठीण काळातही आनंदाने त्याची सेवा करण्यास व त्याला विश्‍वासू राहण्यास सुसज्ज बनतात. अशा सभांमुळे आपल्याला आध्यात्मिक प्रोत्साहन, नवीन मित्र बनवण्याची संधी, आणि जगभरातील आपल्या बंधुसमाजाची कदर करण्यास मदत मिळते. शिवाय, अधिवेशने हा एक महत्त्वाचा मार्ग आहे ज्याद्वारे यहोवा त्याच्या लोकांना आशीर्वादित करतो आणि त्यांची काळजी घेतो. तर मग, प्रत्येक अधिवेशनाला उपस्थित राहता यावे म्हणून आपण चांगले नियोजन करू या आणि अधिवेशनाच्या प्रत्येक सत्रापासून फायदा घेऊ या.—नीति. १०:२२.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[३० पानांवरील चित्र]

न्यू यॉर्क सिटीत १९५० मध्ये भरलेले आंतरराष्ट्रीय अधिवेशन

[३२ पानांवरील चित्र]

मोझंबिक

[३२ पानांवरील चित्रे]

दक्षिण कोरिया