व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या आज्ञा पाळा आणि त्याच्या शपथांपासून लाभ मिळवा

देवाच्या आज्ञा पाळा आणि त्याच्या शपथांपासून लाभ मिळवा

देवाच्या आज्ञा पाळा आणि त्याच्या शपथांपासून लाभ मिळवा

“शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा कोणी मोठा नसल्यामुळे [देवाने] आपलीच शपथ” वाहिली. —इब्री ६:१३.

तुम्ही उत्तर देऊ शकता का ते पाहा:

देवाचे उद्देश अवश्‍य पूर्ण होतील याची आपण खातरी का बाळगू शकतो?

आदाम व हव्वा यांनी पाप केल्यानंतर देवाने कोणते अभिवचन दिले?

देवाने अब्राहामाला शपथ वाहून दिलेल्या अभिवचनाचा आपल्याला कशा प्रकारे लाभ होतो?

१. आपण अपरिपूर्ण मानवांच्या तुलनेत यहोवावर नेहमीच भरवसा का ठेवू शकतो?

 यहोवा “सत्यस्वरूप” देव आहे. (स्तो. ३१:५) अपरिपूर्ण मानवांवर नेहमीच भरवसा ठेवला जाऊ शकत नाही, पण देवाला “खोटे बोलणे . . . अशक्य आहे.” (इब्री ६:१८; गणना २३:१९ वाचा.) मानवांच्या लाभाकरता तो जे काही संकल्प करतो ते नेहमीच खरे ठरतात. उदाहरणार्थ, निर्मितीच्या प्रत्येक कालावधीच्या सुरुवातीला देवाने त्या कालावधीत विशिष्ट गोष्टी घडवून आणण्याचा संकल्प व्यक्‍त केला आणि “तसे झाले.” शेवटी, निर्मितीच्या सहाव्या दिवसाच्या समाप्तीस, “आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले.”—उत्प. १:६, ७, ३०, ३१.

२. देवाच्या विसाव्याचा दिवस काय आहे आणि देवाने तो का “पवित्र केला”?

आपण निर्माण केलेल्या सर्व गोष्टींचे परीक्षण केल्यानंतर यहोवाने सातव्या दिवसाच्या सुरुवातीची घोषणा केली. हा २४ तासांचा दिवस नव्हता. तर, तो एक दीर्घ कालावधी होता ज्यादरम्यान देवाने पृथ्वीवरील आपले निर्मितीकार्य थांबवले व विसावा घेतला. (उत्प. २:२) देवाच्या विसाव्याचा दिवस अद्यापही संपलेला नाही. (इब्री ४:९, १०) हा दिवस नेमका केव्हा सुरू झाला हे बायबलमध्ये सांगितलेले नाही. सुमारे ६,००० वर्षांपूर्वी, आदामाच्या पत्नीची, हव्वेची निर्मिती करण्यात आल्याच्या काही काळानंतर तो सुरू झाला. भविष्यात आपण येशू ख्रिस्ताचे हजार वर्षांचे शासन सुरू होण्याची वाट पाहत आहोत, ज्याद्वारे पृथ्वी निर्माण करण्यामागचा देवाचा उद्देश, अर्थात पृथ्वीवरील नंदनवनात परिपूर्ण मानवांनी सर्वकाळ राहावे हा उद्देश पूर्ण होईल. (उत्प. १:२७, २८; प्रकटी. २०:६) हे आनंदी भवितव्य खरोखरच अनुभवायला मिळेल अशी खातरी तुम्ही बाळगू शकता का? हो, नक्कीच! कारण “देवाने सातवा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला.” असे करण्याद्वारे देवाने मानवांना हे आश्‍वासन दिले की कोणत्याही अनपेक्षित समस्या उद्‌भवल्या, तरीसुद्धा त्याच्या विसाव्याचा दिवस संपण्याअगोदर त्याचा उद्देश अवश्‍य पूर्ण होईल.—उत्प. २:३.

३. (क) देवाच्या विसाव्याचा दिवस सुरू झाल्यानंतर कशा प्रकारे देवाविरुद्ध बंड करण्यात आले? (ख) या बंडाळीचा अंत करण्यासंबंधी यहोवाने आपला इरादा कशा प्रकारे व्यक्‍त केला?

पण, देवाच्या विसाव्याचा दिवस सुरू झाल्याच्या काही काळानंतर एक संकट उद्‌भवले. स्वर्गदूतांपैकी असलेला एक देवपुत्र, अर्थात सैतान देवाचा प्रतिस्पर्धी बनला. खोटे बोलणारा तो पहिलाच होता. त्याने हव्वेची फसवणूक करून तिला देवाची आज्ञा मोडण्यास लावले. (१ तीम. २:१४) मग हव्वेने आपल्या पतीलाही देवाची आज्ञा मोडण्यास प्रवृत्त केले. (उत्प. ३:१-६) विश्‍वाच्या इतिहासाच्या त्या विशिष्ट टप्प्यावर जे काही घडले ते अतिशय खेदजनक होते. यहोवाच्या सत्यतेविषयी शंका घेण्यात आली. पण, अशाही परिस्थितीत आपला उद्देश अवश्‍य पूर्ण होईल याची हमी देण्याकरता शपथ वाहून अभिवचन देण्याची यहोवाला जरूर वाटली नाही. त्याऐवजी, एदेन बागेत करण्यात आलेल्या बंडाळीचा कशा प्रकारे अंत केला जाईल याविषयी यहोवाने एक विधान केले, ज्याचा अर्थ कालांतराने स्पष्ट होणार होता. त्याने म्हटले: “तू [सैतान] व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यांमध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती [प्रतिज्ञात संतती] तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडिशील.”—उत्प. ३:१५; प्रकटी. १२:९.

शपथ वाहणे—एक उपयोगी कायदेशीर तरतूद

४, ५. अब्राहामाने काही वेळा कोणत्या कायदेशीर तरतुदीचा उपयोग केला?

मानवांची निर्मिती झाल्यापासून त्या घटकेपर्यंत, एखाद्या गोष्टीची खातरी देण्याकरता शपथ वाहण्याची कधी गरज पडली असावी असे वाटत नाही. देवावर प्रेम करणाऱ्‍या आणि त्याचे अनुकरण करणाऱ्‍या परिपूर्ण व्यक्‍तींना शपथ घेण्याची गरज नाही; ते नेहमीच खरे बोलतात आणि त्यांना एकमेकांवर पूर्ण भरवसा असतो. पण मानवांनी पाप केले व ते अपरिपूर्ण बनले त्यानंतर परिस्थिती बदलली. कालांतराने, खोटे बोलणे व फसवणूक करणे मानवांमध्ये सर्वसामान्य झाले, तेव्हा महत्त्वाच्या गोष्टींची सत्यता पटवून देण्यासाठी शपथ वाहणे हे त्यांच्याकरता गरजेचे बनले.

शपथ वाहणे ही एक कायदेशीर तरतूद होती, जिचा कुलपिता अब्राहामाने निदान तीन प्रसंगी उपयोग केला. (उत्प. २१:२२-२४; २४:२-४, ९) उदाहरणार्थ, एलामाच्या राजाचा व त्याच्यासोबत चाल करून आलेल्या इतर राजांचा पराभव करून अब्राहाम परत येत होता त्या प्रसंगी त्याने असे केले. सदोमाचा राजा व शालेमाचा राजा अब्राहामाला भेटण्यास आले. शालेमाचा राजा मलकीसदेक हा “परात्पर देवाचा याजक” देखील होता. त्यामुळे त्याने अब्राहामाला आशीर्वाद दिला आणि अब्राहामाला त्याच्या शत्रूंवर विजय मिळवून दिल्याबद्दल देवाची स्तुती केली. (उत्प. १४:१७-२०) त्यानंतर सदोमाच्या राजाने हल्लेखोर सैन्यापासून आपल्या प्रजेचे रक्षण केल्याबद्दल अब्राहामाला इनाम देऊ केला तेव्हा अब्राहामाने शपथ वाहून म्हटले: “परमेश्‍वर परात्पर देव, आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी याजसमोर मी बाहू उभारून सांगतो की, तुमचा एक सुतळीचा तोडा किंवा वहाणेचा बंद मी घेणार नाही; मी अब्रामास संपन्‍न केले असे म्हणावयास कारण न मिळो.”—उत्प. १४:२१-२३.

यहोवाने अब्राहामाला शपथ वाहून दिलेले अभिवचन

६. (क) अब्राहामाकडून आपण काय शिकू शकतो? (ख) अब्राहामाच्या आज्ञापालनाचा आपल्याला कशा प्रकारे लाभ होतो?

अपरिपूर्ण मानवांच्या लाभाकरता यहोवा देवानेही शपथ वाहण्याच्या या तरतुदीचा उपयोग केला आहे. असे करताना त्याने “प्रभू परमेश्‍वर म्हणतो, ‘माझ्या जीविताची शपथ’ ” यांसारख्या वाक्यांशांचा उपयोग केला. (यहे. १७:१६) यहोवा देवाने शपथ वाहिल्याच्या ४० पेक्षा जास्त प्रसंगांचा बायबलमध्ये उल्लेख आढळतो. यांपैकीचे कदाचित सर्वात सुपरिचित उदाहरण म्हणजे त्याने अब्राहामाला शपथ वाहून दिलेली अभिवचने. अनेक वर्षांच्या काळादरम्यान यहोवाने कित्येकदा अब्राहामाला कराराची अभिवचने दिली. या अभिवचनांच्या माध्यमाने, प्रतिज्ञात संतती अब्राहामाच्या वंशातून, त्याचा पुत्र इसहाक याच्याद्वारे येईल हे दाखवण्यात आले. (उत्प. १२:१-३, ७; १३:१४-१७; १५:५, १८; २१:१२) त्यानंतर यहोवाने अब्राहामाची एक कठीण परीक्षा घेतली. त्याने त्याला आपल्या प्रिय पुत्राचे बलिदान देण्यास सांगितले. अब्राहामाने जराही विलंब न करता देवाच्या आज्ञेचे पालन केले. तो इसहाकाचा बळी देणार, इतक्यात देवाच्या दूताने त्याला अडवले. त्या प्रसंगी, देवाने अब्राहामाला ही शपथ वाहिली: “मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केले; आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एका मुलास माझ्यापासून राखून ठेवले नाही यास्तव मी तुला आशीर्वादित करीन व वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशातील ताऱ्‍यांइतकी, समुद्रतीरीच्या वाळूइतकी होईल असे करीन; तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करील; तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील.”—उत्प. २२:१-३, ९-१२, १५-१८.

७, ८. (क) देवाने अब्राहामाला शपथ का वाहिली? (ख) देवाने शपथ वाहून दिलेल्या अभिवचनाचा येशूच्या दुसऱ्‍या मेंढरांना कशा प्रकारे लाभ होईल?

अब्राहामाला दिलेली अभिवचने खरी ठरतील हे देवाने त्याला शपथ वाहून का सांगितले? ख्रिस्ताचे सहवारस बनण्याद्वारे जे प्रतिज्ञात संततीचा दुय्यम भाग बनणार होते त्यांना आश्‍वासन देण्यासाठी व त्यांचा विश्‍वास दृढ करण्यासाठी देवाने असे केले होते. (इब्री लोकांस ६:१३-१८ वाचा; गलती. ३:२९) प्रेषित पौलाने खुलासा केल्याप्रमाणे, “आपल्या संकल्पाची अचलता . . . दाखवावी ह्‍या इच्छेने देव शपथेच्या द्वारे मध्ये पडला, ह्‍यासाठी की, . . . आशा हस्तगत करण्याकरिता . . . आपणाला ज्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे अशा दोन अचल गोष्टींच्या [त्याचे वचन व शपथ] द्वारे चांगले उत्तेजन मिळावे.”

अब्राहामाला देवाने शपथ वाहून दिलेल्या अभिवचनाचा लाभ फक्‍त अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना होत नाही. यहोवाने अशी शपथ वाहिली की “पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे [अब्राहामाच्या] संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील.” (उत्प. २२:१८) आशीर्वादित होणाऱ्‍या या लोकांमध्ये ख्रिस्ताच्या आज्ञाधारक दुसऱ्‍या मेंढरांचाही समावेश होतो, ज्यांना पृथ्वीवरील नंदनवनात सार्वकालिक जीवन उपभोगण्याची आशा आहे. (योहा. १०:१६) तुमची आशा स्वर्गातील जीवनाची असो वा पृथ्वीवरील, सर्व बाबींत देवाला नेहमी आज्ञाधारक राहण्याद्वारे ती आशा “हस्तगत” करा.—इब्री लोकांस ६:११, १२ वाचा.

देवाने घेतलेल्या इतर शपथा

९. अब्राहामाचे वंशज इजिप्तच्या गुलामगिरीत होते तेव्हा देवाने कोणती शपथ वाहिली?

अनेक शतकांनंतर, यहोवाने मोशेला अब्राहामाच्या वंशजांकडे पाठवले, जे एव्हाना इजिप्तच्या गुलामगिरीत होते. त्या वेळी, वरील अभिवचनांच्या संदर्भात यहोवाने पुन्हा एकदा शपथ वाहिली. (निर्ग. ६:६-८) देवाने म्हटले: “ज्या दिवशी मी इस्राएलास निवडून घेतले, . . . त्या दिवशी मी हात उचलून त्यांच्याबरोबर शपथ केली की, मी तुम्हास मिसर देशातून काढून दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत अशा तुम्हासाठी पाहिलेल्या देशात आणीन.”—यहे. २०:५, ६.

१०. इजिप्तच्या गुलामगिरीतून इस्राएलांची सुटका केल्यानंतर देवाने त्यांना कोणते अभिवचन दिले?

१० इजिप्तमधून इस्राएलांची सुटका केल्यानंतर यहोवाने त्यांना शपथ वाहून आणखी एक अभिवचन दिले: “तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे; पण तुम्ही मला याजकराज्य, पवित्र राष्ट्र व्हाल.” (निर्ग. १९:५, ६) देवाने इस्राएल राष्ट्राला खरोखर किती अद्‌भुत विशेषाधिकार देऊ केला होता! दुसऱ्‍या शब्दांत, ते देवाला आज्ञाधारक राहिल्यास देव सर्व मानवजातीला आशीर्वादित करण्यासाठी त्यांचा एक याजकराज्य या नात्याने वापर करणार होता. कालांतराने, यहोवाने इस्राएल राष्ट्राच्या संदर्भात जे केले होते त्यासंबंधी म्हटले: “मी शपथ वाहून तुजबरोबर करार केला.”—यहे. १६:८.

११. देवाचे निवडलेले लोक या नात्याने त्याच्यासोबत एक खास संबंध कायम करण्याच्या निमंत्रणाला इस्राएल लोकांनी कसा प्रतिसाद दिला?

११ आपण देवाला आज्ञाधारक राहू अशी शपथ वाहण्यास यहोवाने इस्राएलांना भाग पाडले नाही; तसेच त्याच्यासोबत हा खास संबंध जोडण्याचीही त्याने त्यांच्यावर जबरदस्ती केली नाही. उलट, त्यांनी स्वेच्छेने असे म्हटले: “परमेश्‍वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू.” (निर्ग. १९:८) तीन दिवसांनंतर, यहोवाने त्याचे निवडलेले राष्ट्र या नात्याने इस्राएलांना कोणत्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील हे त्यांना सांगितले. सर्वप्रथम, त्यांना दहा आज्ञा सांगण्यात आल्या. त्यानंतर, मोशेने त्यांना देवाच्या इतर आज्ञा सांगितल्या, ज्या निर्गम २०:२२ ते २३:३३ यांत नमूद आहेत. यावर इस्राएल लोकांची काय प्रतिक्रिया होती? “सर्व लोक एका आवाजात म्हणाले की, जी वचने परमेश्‍वराने सांगितली त्या सगळ्यांप्रमाणे आम्ही करू.” (निर्ग. २४:३) मग, मोशेने देवाचे नियम कराराच्या पुस्तकात लिहून काढले व सबंध राष्ट्राला ते पुन्हा मोठ्याने वाचून दाखवले. त्यानंतर लोकांनी तिसऱ्‍यांदा ही शपथ घेतली: “जे काही परमेश्‍वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू आणि त्याच्या आज्ञेत राहू.”—निर्ग. २४:४, ७, ८.

१२. यहोवाने व त्याच्या निवडलेल्या लोकांनी आपसांतील कराराला कशा रीतीने प्रतिसाद दिला?

१२ नियमशास्त्राच्या करारातील आपली बाजू पूर्ण करण्यासाठी यहोवाने लगेच पावले उचलण्यास सुरुवात केली. पापी मानवांना त्याची उपासना करणे शक्य व्हावे म्हणून त्याने उपासनेच्या मंडपाची व याजकवर्गाची व्यवस्था केली. दुसरीकडे पाहता, इस्राएल लोक देवाला केलेले समर्पण लगेच विसरले आणि त्यांनी “इस्राएलाच्या पवित्र परमेश्‍वराला खूप दुःख दिले.” (स्तो. ७८:४१, ईझी-टू-रीड व्हर्शन) उदाहरणार्थ, देवाकडून पुढील सूचना घेण्याकरता मोशे सीनाय पर्वतावर गेला असताना, इस्राएल लोक अधीर झाले आणि देवावरील त्यांचा विश्‍वास डळमळू लागला. मोशे आपल्याला सोडून निघून गेला आहे असा विचार ते करू लागले. त्यामुळे त्यांनी सोन्याचे एक वासरू तयार केले आणि लोकांना म्हणाले: “हे इस्राएला, ज्या देवांनी तुला मिसर देशातून आणिले आहे तेच हे तुझे देव.” (निर्ग. ३२:१, ४) यानंतर, आपण “परमेश्‍वराप्रीत्यर्थ उत्सव” करत आहोत असे म्हणून त्यांनी हाताने निर्मिलेल्या त्या मूर्तीची पूजा केली व तिला बली अर्पण केले. हे पाहून यहोवाने मोशेला सांगितले: “ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञापिले होते तो मार्ग इतक्यातच सोडून ते बहकून गेले आहेत.” (निर्ग. ३२:५, ६, ८) दुःखाची गोष्ट म्हणजे, तेव्हापासून इस्राएल राष्ट्राच्या लोकांनी अनेकदा देवाला शपथ वाहिली आणि ती मोडली.—गण. ३०:२.

आणखी दोन शपथा

१३. देवाने दावीद राजाला कोणती शपथ वाहिली आणि तिचा प्रतिज्ञात संततीशी कसा संबंध आहे?

१३ दावीद राजा राज्य करत असलेल्या काळात यहोवाने त्याच्या आज्ञांचे पालन करणाऱ्‍या सर्वांच्या लाभाकरता आणखी दोन शपथा वाहिल्या. पहिली शपथ देवाने दाविदाला हे सांगण्यासाठी वाहिली, की त्याचे राज्यशासन कायम टिकेल. (स्तो. ८९:३५, ३६; १३२:११, १२) याचा अर्थ, प्रतिज्ञात संततीला “दावीद ह्‍याचा पुत्र” म्हटले जाणार होते. (मत्त. १:१; २१:९) दाविदाने नम्रपणे आपल्या या भावी वंशजाला “प्रभू” असे संबोधले कारण ख्रिस्ताला एक श्रेष्ठ पद दिले जाणार होते.—मत्त. २२:४२-४४.

१४. यहोवाने प्रतिज्ञात संततीच्या संदर्भात कोणती शपथ वाहिली आणि आपल्याला त्यापासून कशा प्रकारे लाभ होतो?

१४ दुसऱ्‍यांदा, यहोवाने दाविदाला असे भाकीत करण्यास प्रेरित केले की त्याच्या वंशातून येणार असलेला हा अनोखा राजा मानवजातीसाठी महायाजक या नात्यानेही कार्य करेल. इस्राएल राष्ट्रात राजपद आणि याजकपद हे एकमेकांपासून अगदीच वेगळे होते. याजक हे लेवीय वंशातील, तर राजे यहूदा वंशातील असायचे. पण दाविदाने भविष्यात येणार असलेल्या आपल्या अतिशय खास अशा उत्तराधिकाऱ्‍याबद्दल असे भाकीत केले: “माझ्या प्रभूला परमेश्‍वर म्हणतो, ‘मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस.’ परमेश्‍वराने शपथ वाहिली आहे आणि ती तो बदलणार नाही; ती अशी की, ‘मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस.’ ” (स्तो. ११०:१, ४) या भविष्यवाणीची पूर्णता झाली, कारण प्रतिज्ञात संतती, अर्थात येशू ख्रिस्त आज स्वर्गात राज्य करत आहे. तसेच, पश्‍चात्तापी मनोवृत्तीच्या लोकांना देवासोबत चांगला नातेसंबंध जोडण्यास मदत करण्याद्वारे तो मानवजातीकरता एक महायाजक म्हणूनदेखील कार्य करत आहे.—इब्री लोकांस ७:२१, २५, २६ वाचा.

देवाचे नवे इस्राएल

१५, १६. (क) बायबलमध्ये कोणत्या दोन इस्राएलांविषयी सांगितले आहे आणि आज कोणत्या इस्राएलावर देवाचा आशीर्वाद आहे? (ख) येशूने शपथ वाहण्यासंबंधी आपल्या अनुयायांना कोणती आज्ञा दिली?

१५ येशू ख्रिस्ताला नाकारल्यामुळे इस्राएल राष्ट्र शेवटी देवाची मर्जी गमावून बसले. तसेच, “याजकराज्य” बनण्याच्या संधीलाही ते कायमचे मुकले. येशूने यहुदी पुढाऱ्‍यांना म्हटले होते: “देवाचे राज्य तुम्हापासून काढून घेतले जाईल व जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल.” (मत्त. २१:४३) ती नवी प्रजा किंवा राष्ट्र इ.स. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी अस्तित्वात आले, जेव्हा जेरूसलेममध्ये एकत्रित झालेल्या १२० शिष्यांवर देवाचा आत्मा ओतण्यात आला. त्यांना “देवाचे इस्राएल” म्हणण्यात आले आणि लवकरच, तेव्हाच्या जगातील सर्व राष्ट्रांतून आलेल्या हजारो लोकांची त्यांच्यात भर पडली.—गलती. ६:१६.

१६ देवाचे नवे आत्मिक राष्ट्र हे प्राचीन इस्राएल राष्ट्रापेक्षा फार वेगळे आहे कारण या नव्या राष्ट्राने आजपर्यंत देवाला आज्ञाधारक राहण्याद्वारे सातत्याने चांगले फळ उत्पन्‍न केले आहे. या राष्ट्राचे सदस्य ज्या आज्ञांचे पालन करतात त्यांपैकी एक आज्ञा शपथ वाहण्यासंबंधी आहे. येशू पृथ्वीवर असताना, शपथ घेण्याच्या तरतुदीचा गैरफायदा घेतला जात होता. लोक खोटी शपथ वाहायचे किंवा क्षुल्लक गोष्टींसाठी शपथ वाहायचे. (मत्त. २३:१६-२२) येशूने आपल्या अनुयायांना असे शिकवले: “शपथ वाहूच नका . . . तर तुमचे बोलणे, होय तर होय, नाही तर नाही, एवढेच असावे; ह्‍याहून जे अधिक ते वाइटापासून आहे.”—मत्त. ५:३४, ३७.

१७. पुढील अभ्यास लेखात कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा केली जाईल?

१७ पण याचा अर्थ, शपथ वाहणे नेहमीच अयोग्य असते का? याहून महत्त्वाचे म्हणजे, आपले बोलणे होय तर होय एवढेच असावे याचा काय अर्थ होतो? पुढील अभ्यास लेखात या प्रश्‍नांची चर्चा केली जाईल. देवाच्या वचनावर आपण जितके जास्त मनन करतो, तितकीच आपल्याला त्याच्या आज्ञांचे पालन करण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे. मग, यहोवादेखील शपथ वाहून दिलेल्या त्याच्या अभिवचनांनुसार आपल्याला सदैव आशीर्वादित करेल.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२६ पानांवरील संक्षिप्त आशय]

यहोवाची अभिवचने नेहमीच पूर्ण होतात

[२४ पानांवरील चित्र]

लवकरच अब्राहाम, यहोवाची अभिवचने पूर्ण झालेली पाहील