व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही कशा प्रकारचा ‘आत्मा’ दाखवता?

तुम्ही कशा प्रकारचा ‘आत्मा’ दाखवता?

तुम्ही कशा प्रकारचा ‘आत्मा’ दाखवता?

“आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुम्ही दाखवत असलेल्या आत्म्याबरोबर असो.” —फिले. २५, NW.

तुम्ही उत्तर देऊ शकता का?

आपण दाखवत असलेल्या मनोवृत्तीकडे आपण लक्ष का दिले पाहिजे?

आपण कोणकोणत्या प्रकारच्या मनोवृत्ती टाळू इच्छितो, आणि ते आपण कसे करू शकतो?

मंडळीत प्रोत्साहनदायक मनोवृत्ती दाखवण्यासाठी आपण काय करू शकतो?

१. पौलाने आपल्या सहविश्‍वासू बांधवांना लिहिताना कोणती आशा व्यक्‍त केली?

 प्रेषित पौलाने आपल्या सहविश्‍वासू बांधवांना लिहिताना, वारंवार ही आशा व्यक्‍त केली की मंडळ्या ज्या प्रकारचा आत्मा दाखवतात त्यास देवाची व ख्रिस्ताची मंजूरी असेल. उदाहरणार्थ, गलतीकरांस त्याने असे लिहिले: “आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्‍याची कृपा तुम्ही दाखवत असलेल्या आत्म्याबरोबर असो. आमेन.” (गलती. ६:१८, NW) “तुम्ही दाखवत असलेल्या आत्म्याबरोबर,” असे पौलाने म्हटले तेव्हा त्याच्या म्हणण्याचा काय अर्थ होता?

२, ३. (क) पौलाने काही वेळा ‘आत्मा’ हा शब्द, कोणत्या अर्थाने वापरला? (ख) आपण दाखवत असलेल्या मनोवृत्तीविषयी आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचारले पाहिजेत?

पौलाने या संदर्भात ‘आत्मा’ हा शब्द, एक प्रेरक शक्‍ती किंवा वृत्ती या अर्थाने वापरला आहे, जी आपल्याला विशिष्ट प्रकारे बोलण्यास अथवा वागण्यास लावते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्‍ती सौम्य, विचारशील, नम्र, उदार किंवा क्षमाशील असू शकते. “सौम्य व शांत आत्मा” आणि “शांत” वृत्ती असणे चांगले असल्याचे बायबल सांगते. (१ पेत्र ३:४; नीति. १७:२७) दुसरीकडे पाहता, आणखी एखादी व्यक्‍ती टोमणे मारणारी, भौतिकवादी, सहज वाईट मानणारी किंवा स्वतंत्र वृत्तीची असू शकते. याहूनही वाईट म्हणजे, काही लोक अशुद्ध, अवज्ञाकारी, इतकेच काय तर बंडखोर मनोवृत्ती दाखवतात.

त्याअर्थी, तुम्ही “दाखवत असलेल्या आत्म्याबरोबर प्रभू असो” असे जेव्हा पौलाने म्हटले, तेव्हा तो आपल्या बांधवांना देवाच्या इच्छेच्या व ख्रिस्ताच्या व्यक्‍तिमत्त्वाच्या सामंजस्यात असलेली मनोवृत्ती दाखवण्याचे प्रोत्साहन देत होता. (२ तीम. ४:२२, NW; कलस्सैकर ३:९-१२ वाचा.) आज आपण स्वतःला असे विचारले पाहिजे: ‘मी कशा प्रकारची मनोवृत्ती दाखवत आहे? देवाला आनंद होईल अशी मनोवृत्ती आणखी चांगल्या प्रकारे मला कशी दाखवता येईल? मंडळीच्या एकंदर सकारात्मक मनोवृत्तीला हातभार लावण्याच्या बाबतीत मला आणखी सुधारणा करता येईल का?’ उदाहरणार्थ, सूर्यफुलांच्या शेताचा विचार करा. शेताच्या एकंदरीत सौंदर्यात प्रत्येक फुलाचा वाटा असतो. त्या फुलांप्रमाणे, आपणही आपल्या मंडळीच्या एकंदरीत सौंदर्यात भर घालतो का? आपण नक्कीच तसे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर मग, देव ज्या मनोवृत्तीमुळे आनंदित होतो ती दाखवण्यासाठी आपण काय करू शकतो हे आता पाहू या.

या जगाचा आत्मा टाळा

४. “जगाचा आत्मा” काय आहे?

बायबल असे सांगते: “आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे.” (१ करिंथ. २:१२) “जगाचा आत्मा” काय आहे? या आत्म्याविषयी इफिसकरांस २:२ मध्येदेखील सांगितले आहे: “तुम्ही पूर्वी . . . ह्‍या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्‍या लोकांत आता कार्य करणाऱ्‍या आत्म्याचा अधिपती ह्‍याच्या धोरणाप्रमाणे चालत होता.” हा “आत्मा” किंवा मनोवृत्ती आपल्या सभोवताली असलेल्या हवेप्रमाणे सर्वत्र पसरलेली आहे. उदाहरणार्थ, ‘मी काय करावं हे मला कुणीही सांगण्याची गरज नाही’ किंवा ‘स्वतःचे हक्क हिसकावून घ्या’ अशा वृत्तींतून सहसा हा जगाचा आत्मा दिसून येतो. अशी मनोवृत्ती दाखवणारे लोक सैतानाच्या जगातील “आज्ञा मोडणाऱ्‍या” लोकांना सूचित करतात.

५. इस्राएलमध्ये काहींनी कोणती वाईट मनोवृत्ती दाखवली?

अशा प्रकारच्या मनोवृत्ती फार पूर्वीपासूनच लोकांमध्ये पाहायला मिळतात. मोशेच्या दिवसांत, कोरह इस्राएल लोकांमध्ये अधिकाराच्या पदावर असलेल्यांविरुद्ध उठला. कोरहने विशेषतः अहरोन व त्याच्या मुलांना आपले लक्ष्य बनवले, ज्यांना इस्राएलमध्ये याजक या नात्याने सेवा करण्याचा विशेषाधिकार मिळाला होता. त्याने कदाचित त्यांच्या व्यक्‍तिमत्त्वातील दोष पाहिले असावेत. किंवा त्याने असा तर्क केला असावा की मोशे केवळ आपल्याच नातेवाइकांवर सेवेचे विशेषाधिकार सोपवत आहे. ते काहीही असो, कोरहने मानवी दृष्टिकोनातून विचार केला आणि यहोवाने ज्यांना नेमले होते त्यांच्याविरुद्ध तो बोलला. त्याने अनादराने असे म्हटले: “तुमचे आता फारच झाले. . . . तर तुम्ही मग परमेश्‍वराच्या मंडळीवर वर्चस्व का गाजविता?” (गण. १६:३) त्याच प्रकारे, मोशे आपल्यावर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करत आहे अशी तक्रार दाथान आणि अबीराम यांनी मोशेविरुद्ध केली. त्यांना मोशेपुढे उपस्थित राहण्यास सांगण्यात आले तेव्हा त्यांनी उद्धटपणे असे उत्तर दिले: “आम्ही येत नाही.” (गण. १६:१२-१४) त्यांच्या मनोवृत्तीमुळे यहोवाला नक्कीच आनंद झाला नाही. यहोवाने सर्व बंडखोरांचा नाश केला.—गण. १६:२८-३५.

६. पहिल्या शतकातील काहींनी कशा प्रकारे वाईट मनोवृत्ती दाखवली, आणि यामागचे कारण काय असू शकते?

पहिल्या शतकातदेखील, काहींनी मंडळीत अधिकाराच्या पदावर नेमलेल्यांची टीका करण्याद्वारे “प्रभुत्व तुच्छ” लेखले. (यहू. ८) हे लोक कदाचित स्वतःजवळ असलेल्या विशेषाधिकारांत संतुष्ट नसावेत. आणि जे नियुक्‍त बांधव मंडळीत देवाकडून मिळालेली कार्ये मनापासून करत होते अशांचा विरोध करण्यास त्यांनी इतरांवरही प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला.—३ योहान ९, १० वाचा.

७. आज मंडळीत कोणत्या बाबतीत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे?

ख्रिस्ती मंडळीत अशा मनोवृत्तीला स्थान नाही हे स्पष्टच आहे. म्हणूनच, या बाबतीत सावधगिरी बाळगण्याची अत्यंत गरज आहे. ज्याप्रमाणे, मोशेच्या दिवसांतील वडील जन आणि योहानाच्या काळातील वडील जन परिपूर्ण नव्हते, त्याचप्रमाणे आजही मंडळीतील वडील परिपूर्ण नाहीत. वडिलांच्या हातून चुका होऊ शकतात आणि त्यांचा त्रास वैयक्‍तिकपणे आपल्याला भोगावा लागू शकतो. असे घडल्यास, या जगातील लोकांप्रमाणे मंडळीच्या कोणत्याही सदस्याने “मला न्याय मिळालाच पाहिजे” किंवा “या बंधूचं काहीतरी केलंच पाहिजे”! अशी प्रतिक्रिया व्यक्‍त करणे किती अनुचित ठरेल! यहोवा देव छोट्या-छोट्या चुकांकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवू शकतो. तर मग, आपणही तसेच करू नये का? गंभीर अपराध करणारे काही जण वडिलांच्या विशिष्ट गोष्टी आवडत नसल्यामुळे, त्यांना मदत करण्यासाठी नेमलेल्या वडिलांच्या समितीपुढे उपस्थित राहण्यास नकार देतात. याची तुलना अशा एका रुग्णाशी केली जाऊ शकते, जो त्याला देण्यात येणाऱ्‍या उपचाराचा स्वीकार केवळ या कारणामुळे करत नाही, की त्याला उपचार करणाऱ्‍या डॉक्टरच्या काही गोष्टी आवडत नाहीत.

८. मंडळीत पुढाकार घेणाऱ्‍यांबद्दल उचित दृष्टिकोन बाळगण्यास कोणती वचने आपल्याला साहाय्य करू शकतात?

अशा प्रकारची मनोवृत्ती टाळण्यासाठी, आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की येशूच्या “उजव्या हातात सात तारे” आहेत असे बायबलमध्ये सांगितले आहे. हे “तारे” अभिषिक्‍त वडिलांना आणि पर्यायाने मंडळ्यांतील सर्वच वडिलांना सूचित करतात. येशूला योग्य वाटेल त्याप्रमाणे तो आपल्या हातातील ताऱ्‍यांचे मार्गदर्शन करू शकतो. (प्रकटी. १:१६, २०) अशा प्रकारे येशू, ख्रिस्ती मंडळीचे मस्तक असल्यामुळे वडील वर्गावर त्याचे पूर्णपणे नियंत्रण आहे. या वर्गातील कोणाला खरोखरच सुधारणुकीची गरज असेल, तर ज्याचे “डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे” आहेत तो, म्हणजे येशू ठरलेल्या वेळी आणि त्याच्या पद्धतीने तसे करेल. (प्रकटी. १:१४) पण तोपर्यंत, आपण पवित्र आत्म्याद्वारे नेमण्यात आलेल्यांबद्दल उचित आदर बाळगला पाहिजे. कारण पौलाने असे लिहिले: “आपल्या अधिकाऱ्‍यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा; कारण आपणास हिशेब द्यावयाचा आहे हे समजून ते तुमच्या जिवांची राखण करितात; ते त्यांना आनंदाने करता यावे, कण्हत नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही.”—इब्री १३:१७.

९. (क) एखाद्या ख्रिश्‍चनाची सुधारणूक केली जाते किंवा त्याला ताडन दिले जाते तेव्हा कशा प्रकारे त्याची परीक्षा होते? (ख) ताडन मिळाल्यास कशी प्रतिक्रिया दाखवणे सर्वोत्तम आहे?

एका ख्रिस्ती व्यक्‍तीची सुधारणूक करण्यात येते किंवा मंडळीतील तिचे विशेषाधिकार काढून घेतले जातात तेव्हादेखील तिच्या मनोवृत्तीची परीक्षा होऊ शकते. एका तरुण बांधवाला मंडळीच्या वडिलांनी हिंसक व्हिडिओ गेम्स खेळण्याच्या संदर्भात व्यवहारकुशलतेने सल्ला दिला. दुःखाची गोष्ट म्हणजे त्याने सल्ला स्वीकारला नाही. आणि सेवा सेवकांसाठी बायबलमध्ये असलेल्या पात्रता आता तो पूर्ण करत नसल्यामुळे, त्याला या जबाबदारीतून कमी करण्यात आले. (स्तो. ११:५; १ तीम. ३:८-१०) त्यानंतर, त्या बांधवाने आपण वडिलांशी सहमत नसल्याचे इतरांमध्ये पसरवले. त्याने वडिलांची टीका करत अनेकदा शाखा कार्यालयाला पत्रे लिहिली; इतकेच काय, तर मंडळीतील इतरांनाही अशी पत्रे लिहिण्यास त्याने प्रभावित केले. पण, आपलेच खरे करण्याच्या प्रयत्नात संपूर्ण मंडळीची शांती धोक्यात आणल्याने खरोखरच काही फायदा होईल का? त्या उलट, आपल्याला मिळालेले ताडन हे आपल्या व्यक्‍तिमत्त्वात असलेले दोष लक्षात आणून देण्याचा एक मार्ग आहे असा दृष्टिकोन बाळगून निमूटपणे सुधारणूक स्वीकारणे कितीतरी चांगले ठरेल.—विलापगीत ३:२८, २९ वाचा.

१०. (क) याकोब ३:१६-१८ मधून आपण चांगल्या आणि वाईट मनोवृत्तीविषयी काय शिकू शकतो ते स्पष्ट करा. (ख) “वरून येणारे ज्ञान” प्रदर्शित केल्याने काय साध्य होते?

१० मंडळीत कशा प्रकारची मनोवृत्ती दाखवणे अयोग्य आहे आणि कशा प्रकारची मनोवृत्ती दाखवणे योग्य आहे या बाबतीत याकोब ३:१६-१८ मध्ये आपल्याला चांगले मार्गदर्शन मिळते. तेथे असे म्हटले आहे: “जेथे मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तेथे अव्यवस्था व प्रत्येक कुकर्म आहे. वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते; शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फले ह्‍यांनी पूर्ण, अपक्षपाती, निर्दंभ असे आहे; पण शांती करणाऱ्‍यांसाठी नीतिमत्त्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते.” जेव्हा आपण वरून येणाऱ्‍या ज्ञानाच्या सामंजस्यात कार्य करतो, तेव्हा देवाच्या गुणांचे अनुकरण केल्यामुळे आपल्याला मंडळीतील चांगल्या मनोवृत्तीला हातभार लावणे शक्य होईल.

मंडळीत आदरपूर्ण मनोवृत्ती दाखवा

११. (क) योग्य मनोवृत्ती बाळगल्याने आपल्याला काय करण्याचे टाळता येईल? (ख) दाविदाच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो?

११ आपण हे लक्षात ठेवले पाहिजे, की यहोवाने त्याच्या मंडळीचे “पालन” करण्यासाठी वडिलांना नेमले आहे. (प्रे. कृत्ये २०:२८; १ पेत्र ५:२) त्यामुळे, देवाने केलेल्या व्यवस्थेचा आदर करण्यातच सुज्ञपणा आहे याची आपण जाणीव बाळगली पाहिजे; मग, आपण मंडळीत वडील म्हणून सेवा करत असू किंवा नसू. उचित मनोवृत्ती टिकवून ठेवल्यास, मंडळीत अधिकार किंवा जबाबदारीचे पद मिळवण्यास आपण जास्त महत्त्व देणार नाही. दाविदाकडून आपल्या राजपदाला धोका आहे असे शौल राजाला वाटले, तेव्हा त्याने “दाविदावर डोळा ठेविला.” (१ शमु. १८:९) शौल राजाने वाईट मनोवृत्ती विकसित केली आणि दाविदाला मारून टाकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा, शौलाप्रमाणे आपल्या पदाविषयी जास्त चिंता करण्याऐवजी, दाविदासारखी मनोवृत्ती बाळगणे किती चांगले ठरेल. दाविदावर सर्व प्रकारे अन्याय झाला, तरीही देवाने ज्याला राजा म्हणून नियुक्‍त केले होते त्याच्याविषयी त्याने नेहमी आदर बाळगला.—१ शमुवेल २६:२३ वाचा.

१२. मंडळीच्या ऐक्याला कशामुळे हातभार लागेल?

१२ प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असल्यामुळे, कधीकधी मंडळीत चिडचिड होण्याची शक्यता असते. असे मंडळीच्या वडिलांमध्येही घडू शकते. या बाबतीत बायबलचा सल्ला आपल्याला साहाय्यक ठरू शकतो: “तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्‍याला आदराने आपणापेक्षा थोर माना,” आणि “स्वतःला शहाणे समजू नका.” (रोम. १२:१०, १६) आपलेच म्हणणे योग्य आहे असा अट्टहास करण्याऐवजी, आपण ही गोष्ट मान्य केली पाहिजे की एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचे अनेक उचित मार्ग असू शकतात. आपण इतरांच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केल्यास, आपण मंडळीच्या ऐक्याला हातभार लावू शकतो.—फिलिप्पै. ४:५.

१३. स्वतःच्या मतांकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे, आणि हे बायबलमधील कोणत्या उदाहरणावरून दिसून येते?

१३ तर मग, मंडळीतील एखाद्या गोष्टीत सुधारणुकीची गरज आहे असे आपल्या पाहण्यात आल्यास, त्याविषयी आपले मत मांडणे चुकीचे आहे असा याचा अर्थ होतो का? नाही. पहिल्या शतकात एका गोष्टीवरून खूप वादविवाद झाला होता. तेव्हा “पौल व बर्णबा ह्‍यांनी व त्यांच्यापैकी इतर काहींनी ह्‍या वादासंबंधाने यरुशलेमेतले प्रेषित व वडीलवर्ग ह्‍यांच्याकडे जावे” अशी बांधवांनी व्यवस्था केली. (प्रे. कृत्ये १५:२) या विषयावर प्रत्येक बांधवाचे वेगळे मत होते आणि वाद कसा सोडवावा याविषयी सर्वांना काही ना काही सुचवायचे होते यात काही शंका नाही. पण, प्रत्येकाने आपले विचार व्यक्‍त केल्यानंतर पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने एक निर्णय घेतला गेला, तेव्हा त्या बांधवांनी आपली वैयक्‍तिक मते त्यानंतर पुढे मांडली नाहीत. या निर्णयाविषयीचे पत्र मंडळ्यांना पाठवण्यात आले, तेव्हा “त्यातला बोध वाचून त्यांना आनंद झाला” आणि “मंडळ्या विश्‍वासात स्थिर झाल्या.” (प्रे. कृत्ये १५:३१; १६:४, ५) त्याचप्रमाणे आज, एखादी गोष्ट जबाबदार बांधवांच्या लक्षात आणून दिल्यानंतर, आपण पूर्ण भरवसा बाळगला पाहिजे, की ते त्याविषयी प्रार्थनापूर्वक विचार करून निर्णय घेतील.

एकमेकांसोबतच्या व्यवहारात चांगली मनोवृत्ती दाखवा

१४. वैयक्‍तिक स्तरावर आपण कशा प्रकारे चांगली मनोवृत्ती दाखवू शकतो?

१४ वैयक्‍तिक रीत्या, चांगली मनोवृत्ती दाखवण्याच्या अनेक संधी आपल्याला मिळतात. इतर जण आपले मन दुखावतात तेव्हा क्षमाशील मनोवृत्ती दाखवल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. देवाचे वचन आपल्याला सांगते: “एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्‍हाणे असल्यास आपसात क्षमा करा; प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा.” (कलस्सै. ३:१३) “कोणाचे गाऱ्‍हाणे असल्यास” या शब्दांवरून सूचित होते, की काही वेळा इतरांवर चिडण्याची उचित कारणे असू शकतात. पण, लहान-सहान चुकांकडे लक्ष देऊन मंडळीची शांती धोक्यात घालण्याऐवजी, आपण यहोवाचे अनुकरण करून त्यांना क्षमा केली पाहिजे आणि एकत्र मिळून त्याची सेवा करत राहिले पाहिजे.

१५. (क) क्षमा करण्याविषयी आपण ईयोबाकडून काय शिकू शकतो? (ख) चांगली मनोवृत्ती दाखवण्यास प्रार्थना कशा प्रकारे आपल्याला मदत करू शकते?

१५ क्षमाशील असण्याविषयी आपण ईयोबाकडून बरेच काही शिकू शकतो. त्याच्या तीन खोट्या सांत्वनकर्त्यांनी चांगले-वाईट बोलून त्याचे मन दुखावले. तरीसुद्धा, ईयोबाने क्षमाशील मनोवृत्ती दाखवली. कशी? त्याने “आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली.” (ईयो. १६:२; ४२:१०) इतरांसाठी प्रार्थना केल्यास त्यांच्याप्रती असलेली आपली मनोवृत्ती बदलू शकते. आपल्या सर्व ख्रिस्ती बंधुभगिनींसाठी प्रार्थना केल्यास, ख्रिस्तासारखी मनोवृत्ती उत्पन्‍न करण्यास आपल्याला साहाय्य मिळते. (योहा. १३:३४, ३५) आपल्या बंधुभगिनींसाठी प्रार्थना करण्यासोबतच आपण पवित्र आत्म्याकरता प्रार्थना केली पाहिजे. (लूक ११:१३) इतरांसोबत व्यवहार करताना खरे ख्रिस्ती गुण दाखवण्यास देवाचा आत्मा आपल्याला साहाय्य करेल.—गलतीकर ५:२२, २३ वाचा.

देवाच्या संघटनेत चांगल्या मनोवृत्तीला हातभार लावा

१६, १७. “तुम्ही दाखवत असलेल्या” आत्म्याविषयी, वैयक्‍तिक रीत्या तुम्ही काय करण्याचा निर्धार केला आहे?

१६ मंडळीत चांगल्या मनोवृत्तीला हातभार लावणे हे मंडळीच्या प्रत्येक सदस्याचे लक्ष्य असले पाहिजे. असे केल्यास किती उत्तम परिणाम मिळू शकतात! वरील सर्व गोष्टी विचारात घेतल्यावर, आपल्याला कदाचित वाटेल की प्रोत्साहनदायक मनोवृत्ती दाखवण्याच्या बाबतीत आपण वैयक्‍तिक रीत्या आणखी सुधार करू शकतो. असे असल्यास, देवाच्या वचनाच्या प्रकाशात स्वतःचे परीक्षण करण्यास आपण कचरू नये. (इब्री ४:१२) पौल मंडळ्यांसाठी चांगले उदाहरण मांडू इच्छित होता. त्याने म्हटले: “जरी माझे मन माझ्याविरुद्ध मला साक्ष देत नाही, तरी तेवढ्यावरून मी निर्दोषी ठरतो असे नाही; माझा न्यायनिवाडा करणारा प्रभू आहे.”—१ करिंथ. ४:४.

१७ आपण स्वतःच्या मतांचा अट्टहास न करता किंवा आपल्या जबाबदारीच्या पदांचा जास्त विचार न करता वरून येणाऱ्‍या ज्ञानाच्या सामंजस्यात कार्य केल्यास, आपण मंडळीत चांगल्या मनोवृत्तीला हातभार लावू शकतो. क्षमाशील मनोवृत्ती दाखवण्याद्वारे आणि इतरांविषयी सकारात्मक विचार करण्याद्वारे, आपण सहविश्‍वासू बंधुभगिनींसोबत शांतीपूर्ण संबंधांचा आनंद अनुभवू शकतो. (फिलिप्पै. ४:८) या सर्व गोष्टी करत असताना, आपण हा भरवसा बाळगू शकतो, की आपण “दाखवत असलेल्या” आत्म्यामुळे यहोवाला आणि येशू ख्रिस्ताला आनंद होईल.—फिले. २५.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१४ पानांवरील चित्र]

येशूच्या भूमिकेवर मनन केल्याने तुम्ही सल्ल्याप्रती दाखवत असलेल्या प्रतिक्रियेवर कसा प्रभाव पडतो?