व्हिडिओ पाहण्यासाठी

बायबलने बदललं जीवन

बायबलने बदललं जीवन

“मला नेहमी प्रश्‍न पडायचा, की ‘आपण नेमकं कशासाठी जगतो?’”​—रोसालिंड जॉन

  • जन्म: १९६३

  • देश: ब्रिटन

  • पार्श्‍वभूमी: मोठ्या पदाची नोकरी आणि उच्च जीवनशैली

माझं आधीचं जीवन:

माझा जन्म साऊथ लंडनच्या क्रॉयडनमध्ये झाला. नऊ भावंडांपैकी मी सहावी होते. माझे आईबाबा मूळचे सेंट व्हिन्सेंट या कॅरिबियन बेटावरचे होते. आई मेथोडिस्ट चर्चला जायची. मला देवाबद्दल जाणून घ्यायची इतकी आवड नव्हती पण मला नवनवीन गोष्टींबद्दल माहिती घ्यायला खूप आवडायचं. सहसा सुट्ट्यांमध्ये मी लायब्ररीतून भरपूर पुस्तकं आणायचे आणि घराजवळ असलेल्या एका तलावाजवळ बसून ती वाचायचे.

शाळेचं शिक्षण संपल्यावर मला नेहमी वाटायचं की मी गोरगरिबांसाठी काहीतरी काम करावं. म्हणून मी रस्त्यांवर राहणाऱ्‍या निराधार लोकांसाठी तसंच शारीरिक आणि मानसिक दुर्बलता असलेल्यांसाठी काम करू लागले. मग मी विद्यापीठातून आरोग्य विज्ञानाचा कोर्स केला. पदवी मिळाल्यावर मला मोठमोठ्या पदांवर नियुक्‍ती मिळाली. मी याची अपेक्षाही केली नव्हती. भरपूर पगार असल्यामुळे मी खूप चैनीत राहू लागले. मी फ्रीलांस मॅनेजमेंट कंसल्टंट (व्यवस्थापनाच्या क्षेत्रात सल्लागार) आणि सामाजिक संशोधक म्हणून काम करत होते. माझ्या कामासाठी मला फक्‍त लॅपटॉप आणि इंटरनेट लागायचं. त्यामुळे मी बऱ्‍याचदा काही आठवड्यांसाठी परदेशात जायचे. तिथे मी सुंदर-सुंदर ठिकाणी असलेल्या माझ्या आवडीच्या हॉटेलमध्ये राहायचे. आणि तिथल्या वेगवेगळ्या सुविधा म्हणजे स्पा, जिम यांचा लाभ घ्यायचे. मी माझ्या आयुष्याचा पूर्ण आनंद घेत होते. पण मला अजूनही गोरगरिबांसाठी तितकीच तळमळ होती.

बायबलने जीवन कसं बदललं?

मला नेहमी प्रश्‍न पडायचा, की ‘आपण नेमकं कशासाठी जगतो?’ पण बऱ्‍याच वर्षांपासून हा प्रश्‍न असूनही मी बायबलमध्ये त्याचं उत्तर शोधायचा कधीच प्रयत्न केला नाही. मग १९९९ मध्ये एकदा माझी धाकटी बहीण मार्गरेट, जी यहोवाची साक्षीदार बनली होती ती आपल्या एका मैत्रिणीसोबत माझ्या घरी आली. तीसुद्धा साक्षीदार होती. ती माझ्याशी खूप आपलेपणाने वागली. तिने मला बायबल अभ्यास करायला आवडेल का, असं विचारलं तेव्हा मी तयार झाले. पण माझ्या कामामुळे आणि जीवनशैलीमुळे मी खूप व्यस्त राहायचे. त्यामुळे, मी बायबल अभ्यास करत होते तरी माझी हवी तशी प्रगती झाली नाही.

२००२ मध्ये मी इंग्लंडच्या दक्षिण-पश्‍चिम भागात राहायला गेले. तिथल्या विद्यापीठात मी उच्च शिक्षण घेऊ लागले. तसंच मी माझ्या लहान मुलासोबत राज्य सभागृहात नियमितपणे सभांना जायचा प्रयत्न करू लागले. विद्यापीठात मी जे शिक्षण घेत होते ते मला आवडत होतं. पण, बायबलमधून मी जे शिकत होते त्यामुळे मला जीवनातल्या समस्यांबद्दल आणि त्या कशा सोडवाव्यात याबद्दल जास्त चांगल्या प्रकारे समजून घेता आलं. मत्तय ६:२४ मध्ये जे सांगितलंय ते किती खरंय याची मला जाणीव झाली. त्यात म्हटलंय, की कोणीही दोन मालकांची सेवा करू शकत नाही. म्हणजे माणूस एकतर देवाची सेवा करू शकतो किंवा पैशाची. मला कळलं की माझ्या जीवनात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे हे मला ठरवावं लागेल.

एका वर्षाआधी मी साक्षीदारांच्या घरी लहान-लहान गटांमध्ये होणाऱ्‍या बायबल अभ्यासाला बऱ्‍याचदा गेले होते. तुमची काळजी करणारा निर्माणकर्ता आहे का?  a (इंग्रजी) या पुस्तकातून तो अभ्यास केला जायचा. यामुळे मला पक्की खात्री पटली की फक्‍त आपला निर्माणकर्ता यहोवाच मानवजातीच्या समस्या सोडवू शकतो. पण विद्यापीठात आम्हाला शिकवलं जायचं की जीवनाचा अर्थ समजण्यासाठी निर्माणकर्त्यावर विश्‍वास ठेवण्याची काहीच गरज नाहीए. हे कळलं तेव्हा मला खूपच राग आला. म्हणून मग मी विद्यापीठाचा कोर्स सुरू झाल्याच्या दोन महिन्यांतच तो सोडून दिला आणि देवासोबत माझं नातं घट्ट करण्यासाठी जास्त वेळ द्यायचं ठरवलं.

माझी जीवनशैली बदलण्यासाठी बायबलच्या काही वचनांमुळे मला मदत झाली. ती म्हणजे नीतिवचनं ३:५, ६. त्यांत म्हटलंय: “यहोवावर अगदी मनापासून भरवसा ठेव आणि स्वतःच्या समजशक्‍तीवर अवलंबून राहू नकोस. तुझ्या सर्व कार्यांत त्याची आठवण ठेव, म्हणजे तो तुझे मार्ग मोकळे करेल.” आपल्या प्रेमळ देवाबद्दल शिकल्यामुळे मला खूप आनंद झाला. असा आनंद मला पैसा, प्रतिष्ठा किंवा उच्च शिक्षण यांपैकी कोणत्याही गोष्टीने मिळाला नसता. पृथ्वीसाठी देवाचा काय उद्देश आहे आणि येशूने त्याचं जीवन आपल्यासाठी अर्पण केलं यांबद्दल मी जितकं जास्त शिकले, तितकं जास्त मला माझं जीवन देवाला समर्पित करावंसं वाटू लागलं. म्हणून एप्रिल २००३ मध्ये मी बाप्तिस्मा घेतला. त्यानंतर देवाची सेवा करण्यासाठी जास्त वेळ मिळावा म्हणून मी माझ्या जीवनशैलीत बरेच बदल केले.

मला झालेला फायदा:

यहोवा देवासोबतचं माझं नातं खूप मौल्यवान आहे. त्याला जाणून घेतल्यामुळे मला मनाची शांती आणि आनंद मिळालाय. तसंच, देवाच्या इतर खऱ्‍या उपासकांसोबत मैत्री केल्यामुळेही मी खूप खूश आहे.

आजही मला नवीन गोष्टी शिकून घ्यायची उत्सुकता आहे. आणि बायबल आणि ख्रिस्ती सभांमधून मी जे शिकते त्यामुळे मला समाधान मिळतं. माझ्या विश्‍वासाबद्दल इतरांना सांगतानाही मला खूप आनंद होतो. आज हे माझ्या जीवनातलं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. कारण यामुळे मला लोकांना आताचं जीवन सुधारायला आणि भविष्यासाठी सुंदर आशा मिळवायला मदत करता येते. जून २००८ पासून मी पायनियर सेवा करत आहे. आणि आज मी जीवनात खूप खूश आणि समाधानी आहे. शेवटी मला कळलंय की जीवनाचा खरा उद्देश काय आहे आणि यासाठी मी यहोवाची खूप आभारी आहे.

a यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.