व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव”

“तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव”

“तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव”

“तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव; कारण तू माझा देव आहेस.” —स्तो. १४३:१०.

आठवणीत ठेवण्याजोगे मुख्य मुद्दे

यहोवाचा दृष्टिकोन जाणून घेण्यास दावीद उत्सुक होता हे त्याच्या जीवनातील कोणत्या घटनांवरून स्पष्ट होते?

देवाची इच्छा काय आहे हे समजून घेण्यास दाविदाला कशामुळे मदत मिळाली?

आपल्या वागणुकीने नेहमी यहोवाला आनंदित करण्यास आपल्याला कशामुळे साहाय्य मिळेल?

१, २. देवाची इच्छा विचारात घेतल्यामुळे आपल्याला कोणता फायदा होईल आणि या बाबतीत आपण दावीद राजाकडून काही शिकू शकतो का?

 कल्पना करा, तुम्ही डोंगराळ भागातून पायी चालत आहात. अचानक तुम्ही अशा एका ठिकाणी येता, जेथे रस्त्याला दोन फाटे फुटतात. कोणत्या वाटेने जावे? तुम्हाला प्रश्‍न पडतो. तुम्ही जवळच्या एखाद्या उंच खडकावर चढून खाली पाहिल्यास, दोन्ही रस्ते कोठे जातात आणि कोणता रस्ता घेणे योग्य ठरेल हे तुम्हाला कळू शकेल. जीवनात महत्त्वाचे निर्णय घेतानाही हेच तत्त्व लागू करता येईल. आपल्या निर्माणकर्त्याच्या उदात्त किंवा अतिशय उच्च दृष्टिकोनातून गोष्टींकडे पाहण्याचा प्रयत्न केल्यास, यहोवाला ज्यामुळे आनंद वाटेल असा “मार्ग” निवडण्यास आपल्याला मदत मिळेल.—यश. ३०:२१.

दावीद राजाने त्याच्या जवळजवळ सबंध जीवनभर, देवाची इच्छा विचारात घेऊन निर्णय घेण्याबाबत एक उत्कृष्ट उदाहरण मांडले. आता आपण यहोवा देवाकडे पूर्णपणे मन लावणाऱ्‍या या मनुष्याच्या, अर्थात दाविदाच्या जीवनातील काही घटनांचे परीक्षण करू या; आणि त्याच्याकडून आपण काय शिकू शकतो याकडे लक्ष देऊ या.—१ राजे ११:४.

यहोवाच्या नावाला दाविदाने मौल्यवान लेखले

३, ४. (क) गल्याथाचा सामना करण्यास दाविदाला कशामुळे प्रेरणा मिळाली? (ख) देवाच्या नावाबद्दल दाविदाने कसा दृष्टिकोन बाळगला?

पलिष्टी योद्धा गल्याथ याचा सामना करण्यास दावीद गेला होता, त्या प्रसंगाचा विचार करा. जवळजवळ साडेनऊ फूट (२.९ मी.) उंचीच्या या हत्यारबंद राक्षसाला आव्हान देण्याची प्रेरणा कोवळ्या वयाच्या दाविदाला कशामुळे मिळाली? (१ शमु. १७:४) तो मुळातच धैर्यवान असल्यामुळे? की, देवावरील त्याच्या विश्‍वासामुळे? त्याच्या धाडसी कृत्यामागे या दोन्ही गुणांचे महत्त्वाचे योगदान होते. पण सर्वांहून जास्त, यहोवाबद्दल व त्याच्या थोर नावाबद्दल दाविदाला आदर असल्यामुळेच त्याला महाकाय गल्याथाला सामोरे जाण्याची प्रेरणा मिळाली. दाविदाने संतप्त होऊन विचारले: “हा बेसुंती पलिष्टी कोण आहे की त्याने जिवंत देवाच्या सैन्याला तुच्छ लेखावे?”—१ शमु. १७:२६, पं.र.भा.

दाविदाने निर्भयपणे गल्याथासमोर जाऊन असे घोषित केले: “तू तरवार, भाला व बरची घेऊन मजवर चढून आला आहेस; पण इस्राएली सैन्यांच्या देवाला तू तुच्छ लेखिले आहेस; त्या सेनाधीश परमेश्‍वराच्या नामाने मी तुजकडे आलो आहे.” (१ शमु. १७:४५) खऱ्‍या देवावर पूर्ण भरवसा ठेवून, दाविदाने त्या पलिष्टी योद्ध्‌याला गोफणीतल्या एकाच दगडाने जमिनीवर पाडले. दाविदाने केवळ त्याच प्रसंगी नव्हे, तर आपल्या सबंध जीवनभर यहोवावर भरवसा ठेवला आणि त्याच्या नावाला अत्यंत मौल्यवान लेखले. इतकेच काय, तर दाविदाने आपल्या इस्राएली बांधवांना यहोवाच्या “पवित्र नामाचा अभिमान बाळगा” असे प्रोत्साहन दिले.—१ इतिहास १६:८-१० वाचा.

५. गल्याथाने ज्या प्रकारे इस्राएल लोकांना ललकारले होते, त्याच प्रकारची परिस्थिती तुमच्यासमोर कशी येऊ शकते?

तुम्हाला यहोवाचे उपासक असण्याचा अभिमान वाटतो का? (यिर्म. ९:२४) शेजारीपाजारी, सहकर्मचारी, वर्गसोबती किंवा नातेवाईक यहोवाबद्दल अनादराने बोलतात किंवा त्याच्या साक्षीदारांची थट्टा करतात तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असते? यहोवाच्या नावाची निंदा केली जाते तेव्हा त्याच्यावर पूर्ण भरवसा ठेवून तुम्ही त्याच्या बाजूने बोलता का? “मौन धरण्याचा समय” असतो हे मान्य आहे, पण यहोवाचे साक्षीदार व येशूचे अनुयायी या नात्याने आपण कधीही त्यांच्या वतीने बोलण्यास लाजू नये. (उप. ३:१, ७; मार्क ८:३८) हे खरे, की सुवार्तेप्रती योग्य मनोवृत्ती नसलेल्या लोकांशी आपण विचारशीलपणे व आदरपूर्वक वागले पाहिजे; पण, गल्याथाचे ललकार ऐकल्यावर ज्यांचे “धैर्य खचले” आणि जे “फार भयभीत झाले” अशा इस्राएल लोकांप्रमाणे आपण कधीही होऊ नये. (१ शमु. १७:११) त्याऐवजी, यहोवा देवाचे नाव पवित्र करण्यासाठी आपण निर्णायक पाऊल उचलू या. यहोवा देव खरोखर कसा आहे हे समजून घेण्यास आपण लोकांना साहाय्य करू इच्छितो. त्यासाठी, आपण बायबलचा उपयोग करतो, आणि देवाच्या जवळ येणे किती महत्त्वाचे आहे हे समजून घेण्यास त्यांना साहाय्य करण्याचा प्रयत्न करतो.—याको. ४:८.

६. गल्याथाचा सामना करण्यामागे दाविदाचा मुख्य हेतू काय होता आणि आपल्याला कशाविषयी सर्वात जास्त काळजी असली पाहिजे?

दावीद व गल्याथाच्या या अहवालावरून आपण आणखी एक महत्त्वाचा धडा शिकतो. दावीद धावत सैन्याकडे आला तेव्हा त्याने विचारले: “या पलिष्ट्यास मारून इस्राएलाची अप्रतिष्ठा दूर करणाऱ्‍या मनुष्यास काय मिळेल?” तेव्हा लोकांनी आधी जे म्हटले होते ते दाविदाला पुन्हा सांगितले: “जो कोणी [गल्याथाला] ठार मारील त्यास राजा बहुत धन देऊन संपन्‍न करील व आपली कन्या त्यास देईल.” (१ शमु. १७:२५-२७) पण, बक्षिसाच्या रूपात धनसंपत्ती मिळवण्याची दाविदाला सर्वात जास्त काळजी नव्हती. त्याच्या मनात यापेक्षा एक महत्त्वाचा हेतू होता. दाविदाला खऱ्‍या देवाचे गौरव करायचे होते. (१ शमुवेल १७:४६, ४७ वाचा.) आपल्या बाबतीत काय? या जगात नाव, प्रसिद्धी, पैसा व प्रतिष्ठा मिळवण्याचीच आपल्याला सर्वात जास्त काळजी आहे का? आपण नक्कीच दाविदाप्रमाणे होऊ इच्छितो, ज्याने स्तोत्रात म्हटले: “तुम्ही माझ्याबरोबर परमेश्‍वराची थोरवी गा; आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णू या.” (स्तो. ३४:३) आपणही, देवावर भरवसा ठेवून स्वतःच्या नावापेक्षा त्याच्या नावाचे गौरव करू या.—मत्त. ६:९.

७. सुवार्तेला चांगला प्रतिसाद न देणारे लोक भेटतात तेव्हा सेवाकार्यात टिकून राहण्यासाठी लागणारा भक्कम विश्‍वास आपण कसा विकसित करू शकतो?

गल्याथाचा धैर्याने सामना करण्यासाठी दाविदाला यहोवावर पूर्ण विश्‍वास ठेवण्याची गरज होती. दावीद वयाने लहान असला, तरी त्याचा देवावर दृढ विश्‍वास होता. एक मेंढपाळ या नात्याने काम करताना देवावर विसंबून राहण्याद्वारे दाविदाने हा विश्‍वास विकसित केला होता. (१ शमु. १७:३४-३७) आपल्यालाही सातत्याने सेवाकार्य करत राहण्यासाठी भक्कम विश्‍वासाची गरज आहे. विशेषतः, सुवार्तेला चांगला प्रतिसाद न देणारे लोक भेटतात तेव्हा. असा विश्‍वास आपण दैनंदिन कार्यांत देवावर विसंबून राहण्याद्वारे विकसित करू शकतो. उदाहरणार्थ, सार्वजनिक वाहनांतून प्रवास करताना आपल्या शेजारी बसलेल्या लोकांसोबत आपण संभाषण सुरू करू शकतो. तसेच, घरोघरचे सेवाकार्य करताना रस्त्यावरून ये-जा करणाऱ्‍या लोकांशीही बोलण्यास काय हरकत आहे?—प्रे. कृत्ये २०:२०, २१.

दाविदाने सहनशीलपणे यहोवावर भरवसा ठेवला

८, ९. शौल राजाशी व्यवहार करताना दावीद कशा प्रकारे देवाच्या इच्छेनुसार वागला?

दावीद यहोवावर भरवसा ठेवण्यास तयार होता हे दाखवणारे आणखी एक उदाहरण, इस्राएलचा पहिला राजा शौल याच्याशी संबंधित होते. मत्सराने पेटलेल्या शौलाने तीन वेळा भाला फेकून दाविदाला ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण तिन्ही वेळा दाविदाने त्याचा नेम चुकवला आणि त्याच्यावर सूड उगवण्याचा प्रयत्न केला नाही. सरतेशेवटी त्याने शौलापासून पळ काढला. (१ शमु. १८:७-११; १९:१०) तेव्हा, शौलाने सर्व इस्राएलातून ३,००० निवडक माणसांना घेतले आणि दाविदाला शोधण्यास अरण्यात गेला. (१ शमु. २४:२) काही काळाने, नकळतपणे शौल नेमक्या अशा गुहेत गेला जेथे दावीद व त्याची माणसे होती. आपल्या जिवावर उठलेल्या या राजाचा काटा काढण्यासाठी दावीद या संधीचा सहज उपयोग करू शकला असता. नाहीतरी, शौलाच्या ठिकाणी दाविदाने इस्राएलचा राजा बनावे ही खुद्द देवाचीच इच्छा होती. (१ शमु. १६:१, १३) दाविदाच्या साथीदारांनीही त्याला, शौलास जिवे मारण्याचा सल्ला दिला. पण दाविदाने त्यांचे ऐकले नाही. त्याने म्हटले: “मी आपल्या स्वामीवर, परमेश्‍वराच्या अभिषिक्‍तावर, आपला हात टाकावा अशी गोष्ट परमेश्‍वर मजकडून न घडवो.” (१ शमुवेल २४:४-७ वाचा.) शौल अद्यापही देवाचा अभिषिक्‍त राजा होता. यहोवाने अजून त्याला त्याच्या पदावरून काढून टाकलेले नव्हते. त्यामुळे, दाविदाला त्याच्याकडून राजपद काढून घेण्याची इच्छा नव्हती. दाविदाने शौलाच्या झग्याचा केवळ काठ कापून टाकण्याद्वारे दाखवले की शौलाला कोणतीही हानी पोचवण्याचा त्याचा इरादा नव्हता.—१ शमु. २४:११.

दाविदाने शेवटच्या वेळी शौलाला पाहिले तेव्हा पुन्हा एकदा त्याने देवाच्या अभिषिक्‍ताबद्दल आदर असल्याचे दाखवून दिले. त्या प्रसंगी, दावीद व अबीशय अशा ठिकाणी पोचले जेथे शौलाने तळ ठोकला होता आणि तेथे तो त्यांना झोपलेला आढळला. अबीशयने लगेच निष्कर्ष काढला की देवानेच दाविदाच्या शत्रूला त्याच्या हाती दिले आहे. त्याने तर भाल्याने शौलाला मारून टाकण्याची इच्छाही व्यक्‍त केली, पण दाविदाने त्याला तसे करण्याची परवानगी दिली नाही. (१ शमु. २६:८-११) दाविदाने सतत देवाचे मार्गदर्शन स्वीकारल्यामुळेच यहोवाच्या इच्छेनुसार वागण्याचा त्याचा निर्धार कधीही कमकुवत झाला नाही, आणि अबीशयने बराच आग्रह केला तरीही तो डळमळला नाही.

१०. आपल्याला व्यक्‍तिशः कोणत्या दबावाला तोंड द्यावे लागू शकते आणि त्याला तोंड देण्यास कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

१० अशा प्रकारची आव्हानात्मक परिस्थिती आपल्यासमोरही येऊ शकते. आपले साथीदार, यहोवाच्या इच्छेनुसार वागण्यास आपल्याला साहाय्य करण्याऐवजी त्यांच्या मानवी तर्काचे अनुसरण करण्याचा आपल्यावर दबाव आणू शकतात. अबीशयप्रमाणे त्यांच्यापैकी काही जण, एखाद्या गोष्टीसंबंधी यहोवाची इच्छा काय आहे हे विचारात न घेताच पाऊल उचलण्याचे प्रोत्साहन कदाचित आपल्याला देतील. पण, आपण यहोवाचा दृष्टिकोन स्पष्टपणे मनात बाळगला आणि त्याच्या मार्गांत चालत राहण्याचा निर्धार केला तर आपल्याला अशा दबावाला तोंड देणे शक्य होईल.

११. स्वतःच्या अथवा इतरांच्या विचारांपेक्षा देवाच्या इच्छेवर अवलंबून राहण्याविषयी तुम्हाला दाविदाकडून काय शिकायला मिळाले?

११ दाविदाने यहोवा देवाला अशी प्रार्थना केली: “तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव.” (स्तोत्र १४३:५, ८, १० वाचा.) स्वतःच्या विचारांवर अवलंबून राहण्याऐवजी किंवा दुसऱ्‍या कोणाच्या आग्रहापुढे नमते घेण्याऐवजी दावीद देवाचे मार्गदर्शन मिळवण्यास उत्सुक होता. त्याने यहोवाच्या “सर्व कृत्यांचे मनन” केले आणि त्याच्या “हातच्या कृतीचे चिंतन” केले. आपणसुद्धा शास्त्रवचनांचा सखोल अभ्यास करण्याद्वारे आणि यहोवाने कशा प्रकारे मानवांशी व्यवहार केला, याविषयीच्या अनेक बायबल अहवालांवर मनन करण्याद्वारे देवाची आपल्याकरता काय इच्छा आहे हे जाणून घेऊ शकतो.

नियमशास्त्रातील तत्त्वांची दाविदाने कदर केली

१२, १३. दाविदाच्या माणसांनी त्याच्यासाठी आणलेले पाणी त्याने जमिनीवर का ओतले?

१२ नियमशास्त्रातून व्यक्‍त होणाऱ्‍या तत्त्वांबद्दल दाविदाला असलेली कदर आणि जीवनात त्यांचा अवलंब करण्याची त्याची इच्छादेखील अनुकरण करण्याजोगी आहे. दाविदाने “बेथलेहेमाच्या वेशीजवळील विहिरीचे पाणी” पिण्याची इच्छा व्यक्‍त केली तेव्हा काय घडले हे लक्षात घ्या. दाविदाच्या माणसांपैकी तिघांनी, त्या वेळी पलिष्ट्यांच्या ताब्यात असलेल्या शहरात घुसून दाविदासाठी पाणी आणले. पण “तो ते पिईना. त्याने ते परमेश्‍वराच्या नामाने ओतले.” का? याचे कारण स्पष्ट करत दावीद म्हणाला: “हे माझ्या देवा, असे कृत्य माझ्याकडून न घडो; जे आपल्या प्राणावर उदार झाले त्यांचे हे रक्‍त मी प्यावे काय? कारण त्यांनी आपला जीव धोक्यात घालून हे आणले आहे.”—१ इति. ११:१५-१९.

१३ नियमशास्त्राच्या आधारावर, रक्‍ताचे सेवन करणे योग्य नाही, ते जमिनीवर ओतले पाहिजे हे दाविदाला माहीत होते. तसेच, असे का केले पाहिजे याचीही त्याला जाणीव होती. दाविदाला माहीत होते, की “शरीराचे जीवन . . . रक्‍तात असते.” पण, हे तर पाणी होते, रक्‍त नव्हे. मग ते पिण्यास दाविदाने नकार का दिला? त्याने नियमशास्त्राच्या आदेशामागील तत्त्व ओळखले होते. दाविदाच्या दृष्टिकोनात ते पाणी त्याच्या तीन माणसांच्या रक्‍ताइतकेच मोलवान होते. त्यामुळे ते पाणी पिण्याचा विचारही तो करू शकत नव्हता. ते पिण्याऐवजी जमिनीवर ओतले पाहिजे असा निष्कर्ष त्याने काढला.—लेवी. १७:११; अनु. १२:२३, २४.

१४. दाविदाला यहोवाच्या दृष्टिकोनाने विचार करण्यास कशामुळे मदत मिळाली?

१४ दाविदाने देवाच्या नियमशास्त्राला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचा प्रयत्न केला. एका भजनात तो म्हणतो: “हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे, तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.” (स्तो. ४०:८) दाविदाने देवाच्या नियमशास्त्राचा अभ्यास केला आणि त्यावर सखोल चिंतन केले. यहोवाचे आदेश सुज्ञ आहेत याविषयी त्याला पूर्ण भरवसा होता. त्यामुळे, मोशेच्या नियमशास्त्रातील कायदेकानूनच नव्हेत, तर त्यामागील तत्त्वांचेही पालन करण्यास तो उत्सुक होता. त्याच प्रकारे, बायबलचा अभ्यास करताना आपण जे काही वाचतो त्यावर मनन करून ते आपण आपल्या हृदयात साठवले पाहिजे, जेणेकरून कोणताही निर्णय घेताना यहोवाला ज्यामुळे आनंद वाटेल असा मार्ग आपल्याला निवडता येईल.

१५. शलमोनाने कशा प्रकारे देवाच्या नियमशास्त्राप्रती आदर दाखवला नाही?

१५ दाविदाचा पुत्र शलमोन याच्यावर यहोवा देवाची खास कृपादृष्टी होती. पण कालांतराने, शलमोनाने देवाच्या नियमशास्त्राबद्दल आदर दाखवला नाही. इस्राएलच्या राजाने “पुष्कळ बायका करू नयेत” या यहोवाच्या आदेशाचे त्याने पालन केले नाही. (अनु. १७:१७) उलट, शलमोनाने कित्येक विदेशी स्त्रियांशी विवाह केला. त्याच्या वृद्धापकाळी “त्याच्या बायकांनी त्याचे मन अन्य देवांकडे वळविले.” शलमोनाने कशा प्रकारे तर्क केला असेल हे आपल्याला माहीत नाही. एवढे मात्र खरे, की “परमेश्‍वराच्या दृष्टीने जे वाईट ते शलमोनाने केले; त्याचा बाप दावीद याच्याप्रमाणे तो परमेश्‍वराला पूर्णपणे अनुसरला नाही.” (१ राजे ११:१-६) तेव्हा, देवाच्या वचनात सापडणाऱ्‍या नियमांचे व तत्त्वांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे! उदाहरणार्थ, लग्नाचा विचार करताना.

१६. विवाह करू इच्छिणाऱ्‍यांनी “केवळ प्रभूमध्ये” विवाह करण्याविषयीच्या आदेशामागील तत्त्व ओळखल्यास ते काय करतील?

१६ यहोवाच्या उपासकांपैकी नसलेल्या एखाद्या व्यक्‍तीने आपल्याशी विवाह करण्याची इच्छा प्रदर्शित केल्यास, आपला दृष्टिकोन दाविदासारखा असेल की शलमोनासारखा? खऱ्‍या उपासकांना “केवळ प्रभूमध्ये” विवाह करण्यास सांगण्यात आले आहे. (१ करिंथ. ७:३९) एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीने विवाह करण्याचा निर्णय घेतल्यास, त्याने किंवा तिने यहोवाच्या उपासकांपैकी असलेल्या व्यक्‍तीशीच विवाह केला पाहिजे. आणि बायबलच्या या आदेशामागील तत्त्व आपण ओळखले, तर आपण सत्यात नसलेल्या व्यक्‍तीशी विवाह तर करणार नाहीच, पण अशा व्यक्‍तीने आपल्याप्रती व्यक्‍त केलेल्या प्रणयभावनांनाही आपण कधी प्रतिसाद देणार नाही.

१७. अश्‍लील साहित्याच्या पाशात अडकण्यापासून कोणती गोष्ट आपले रक्षण करू शकते?

१७ देवाचे मार्गदर्शन मिळवण्यास उत्सुक असण्याबाबत दाविदाने मांडलेले उदाहरण, अश्‍लील चित्रे पाहण्याच्या मोहाचा प्रतिकार करण्यास आपल्याला कशा प्रकारे मदत करू शकते याचाही विचार करा. पुढील शास्त्रवचने वाचा, त्यांतील तत्त्वांविषयी विचार करा आणि या बाबतीत यहोवाची इच्छा काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. (स्तोत्र ११९:३७; मत्तय ५:२८, २९; कलस्सैकर ३:५ वाचा.) यहोवाच्या उच्च स्तरांवर मनन केल्यास अश्‍लील साहित्याच्या पाशात आपण कधीही अडकणार नाही.

देवाचा दृष्टिकोन नेहमी मनात बाळगा

१८, १९. (क) अपरिपूर्ण असूनही दावीद कशा प्रकारे आपल्या वागणुकीने यहोवाला आनंदित करू शकला? (ख) तुम्ही कोणता निश्‍चय केला आहे?

१८ अनेक बाबतींत दाविदाचे उदाहरण अनुकरणीय असले, तरीही त्याने बरीच गंभीर पातके केली होती. (२ शमु. ११:२-४, १४, १५, २२-२७; १ इति. २१:१, ७) पण दाविदाच्या हातून पाप घडले तेव्हा त्याने खरा पश्‍चात्ताप दाखवला. तो नेहमी देवासमक्ष “सरळतेने” चालला. (१ राजे ९:४) असे आपण का म्हणू शकतो? कारण दाविदाने यहोवाच्या इच्छेनुसार वागण्याचा प्रयत्न केला.

१९ अपरिपूर्ण असूनही आपण आपल्या वागणुकीने यहोवाला आनंदित करू शकतो. याकरता, आपण देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी मेहनत घेण्याचा; त्यातून आपण जे काही शिकतो त्यावर मनन करण्याचा; आणि ज्या शिकवणी आपण आपल्या हृदयात साठवल्या आहेत त्यांनुसार खंबीरतेने पाऊल उचलण्याचा निश्‍चय करू या. असे केल्यास, आपलीही यहोवाला स्तोत्रकर्त्यासारखीच ही नम्र प्रार्थना असेल: “तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव.”

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[५ पानांवरील चित्र]

संधी मिळूनही दाविदाने शौलाला ठार का मारले नाही?

[६ पानांवरील चित्र]

दाविदाने त्याच्या माणसांनी आणलेले पाणी पिण्यास नकार दिला यावरून आपण काय शिकू शकतो?