व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशूने नम्रतेचा कित्ता घालून दिला

येशूने नम्रतेचा कित्ता घालून दिला

येशूने नम्रतेचा कित्ता घालून दिला

“जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे.”—योहा. १३:१५.

तुमचे उत्तर काय असेल?

मानव म्हणून पृथ्वीवर येण्याआधी देवाच्या पुत्राने कशा प्रकारे नम्रता दाखवली?

मानव या नात्याने, येशूने कशा प्रकारे नम्रता दाखवली?

येशूच्या नम्रतेमुळे कोणते फायदे मिळाले आहेत?

१, २. पृथ्वीवर येशूच्या जीवनाच्या शेवटल्या रात्री, त्याने आपल्या प्रेषितांना कोणता व्यवहारोपयोगी धडा शिकवला?

 येशूच्या पृथ्वीवरील जीवनाची शेवटली रात्र आहे. आणि तो ही रात्र आपल्या प्रेषितांसोबत जेरूसलेममध्ये माडीवरच्या एका खोलीत घालवतो. भोजन करत असताना, येशू उठतो आणि आपली बाह्‍यवस्त्रे काढून बाजूला ठेवतो. तो आपल्या कंबरेला एक रुमाल बांधतो. नंतर, तो एका गंगाळात पाणी घेतो आणि आपल्या शिष्यांचे पाय धुऊन रुमालाने पुसतो. त्यानंतर तो आपली बाह्‍यवस्त्रे पुन्हा घालतो. येशूने हे नम्र कृत्य का केले होते?—योहा. १३:३-५.

येशूने स्वतःच स्पष्ट केले: “मी तुम्हाला काय केले आहे हे तुम्हाला समजले काय? . . . मी प्रभू व गुरू असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे.” (योहा. १३:१२-१५) असे कमी दर्जाचे कृत्य करण्याची तयारी दाखवण्याद्वारे, येशूने त्याच्या प्रेषितांना एक व्यवहारोपयोगी धडा दिला. हा धडा त्यांच्या मनांत खोलवर कोरला जाणार होता आणि त्यामुळे त्यांना येणाऱ्‍या दिवसांत नम्र असण्याचे प्रोत्साहन मिळणार होते.

३. (क) येशूने दोन प्रसंगी नम्रतेच्या महत्त्वावर कशा प्रकारे जोर दिला? (ख) या लेखात कशाची चर्चा केली जाईल?

पण, येशूने नम्रतेच्या मूल्याविषयी प्रेषितांना सांगण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. याआधी एका प्रसंगी जेव्हा येशूच्या प्रेषितांनी चढाओढीची वृत्ती दाखवली, तेव्हा त्याने एका लहान मुलाला आपल्याजवळ उभे केले आणि त्यांना म्हटले: “जो कोणी ह्‍या बाळकाचा माझ्या नावाने स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो आणि जो कोणी माझा स्वीकार करतो तो ज्याने मला पाठविले त्याचा स्वीकार करतो; कारण तुम्हा सर्वांमध्ये जो कनिष्ठ आहे तोच श्रेष्ठ आहे.” (लूक ९:४६-४८) परूशी श्रेष्ठ पदाची हाव बाळगतात हे येशूला माहीत होते, त्यामुळे नंतर त्याच्या सेवाकार्यादरम्यान त्याने असे म्हटले: “जो कोणी आपणाला उंच करतो तो नमविला जाईल; व जो आपणाला नमवितो तो उंच केला जाईल.” (लूक १४:११) यावरून स्पष्टच आहे, की आपल्या अनुयायांनी नम्र असावे, म्हणजे त्यांनी मनाचे लीन असावे आणि त्यांच्यात गर्व व अहंकार नसावा अशी येशूची इच्छा आहे. तेव्हा, नम्रतेच्या बाबतीत त्याचे अनुकरण करण्याच्या दृष्टीने आपण त्याने मांडलेल्या उदाहरणाचे काळजीपूर्वक परीक्षण करू या. तसेच, जे नम्रतेचा गुण प्रदर्शित करतात त्यांनाच नव्हे, तर इतरांनाही कसा फायदा होतो तेदेखील आपण पाहणार आहोत.

“मी . . . मागे फिरलो नाही”

४. मानव म्हणून पृथ्वीवर येण्याआधी देवाच्या एकुलत्या एका पुत्राने कशा प्रकारे नम्रता दाखवली?

देवाच्या एकुलत्या एका पुत्राने पृथ्वीवर येण्याआधीदेखील नम्रता दाखवली होती. मानव म्हणून पृथ्वीवर येण्याआधी येशूने असंख्य वर्षे त्याच्या स्वर्गीय पित्याच्या सान्‍निध्यात घालवली होती. पुत्र व पिता यांचा किती घनिष्ठ नातेसंबंध होता याविषयी यशयाच्या पुस्तकात सांगितले आहे. त्यात असे म्हटले आहे: “प्रभू परमेश्‍वराने मला सुशिक्षितांची जिव्हा दिली आहे; तो रोजरोज सकाळी मला जागे करतो; शिष्याप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडतो. प्रभू परमेश्‍वराने माझे कान उघडले आहेत; मी फितूर झालो नाही, मागे फिरलो नाही.” (यश. ५०:४, ५) देवाच्या पुत्राने नम्र वृत्ती दाखवली आणि यहोवा जे शिकवत होता त्याकडे त्याने पूर्ण लक्ष दिले. खऱ्‍या देवाकडून शिकण्यास तो उत्सुक व तयार होता. पापी मानवांना दया दाखवताना यहोवाने जी नम्रता दाखवली त्याचे येशूने किती जवळून निरीक्षण केले असेल!

५. आद्यदेवदूत मीखाएल या नात्याने, सैतानाशी व्यवहार करताना येशूने नम्रता व विनयशीलता दाखवण्याच्या बाबतीत कशा प्रकारे एक उत्तम उदाहरण मांडले?

स्वर्गातील प्रत्येकच प्राण्याची मनोवृत्ती देवाच्या एकुलत्या एका पुत्राप्रमाणे नव्हती. याचे उदाहरण म्हणजे दियाबल सैतान बनलेला देवदूत. त्याने यहोवाकडून शिकण्याची इच्छा बाळगण्याऐवजी स्वतःवर नम्रतेच्या विरुद्ध असलेल्या गुणांचा—महत्त्वाकांक्षा आणि गर्व—यांचा प्रभाव होऊ दिला आणि त्याने यहोवाविरुद्ध बंड केले. त्याउलट, येशू स्वर्गातील आपल्या स्थानाविषयी समाधानी होता; आणि त्याने त्याच्याजवळ असलेल्या अधिकाराचा गैरवापर करण्याचा विचारही केला नाही. आद्यदेवदूत मीखाएल या नात्याने, येशूने मोशेच्या शरीरासंबंधाने सैतानाशी “वाद घातला” तेव्हा त्याने आपल्या अधिकाराची मर्यादा ओलांडली नाही. त्याऐवजी, देवाच्या पुत्राने नम्रता व विनयशीलता प्रदर्शित केली. या विश्‍वाचा सर्वोच्च न्यायाधीश यहोवा, त्याच्या ठरलेल्या वेळी आणि त्याच्या पद्धतीने गोष्टी हाताळेल असा भरवसा त्याने बाळगला.—यहूदा ९ वाचा.

६. मशीहा या नात्याने सेवा करण्याची नेमणूक स्वीकारताना येशूने नम्रता कशी दाखवली?

मानव म्हणून पृथ्वीवर येण्याआधी येशू ज्या गोष्टी शिकला त्यात पृथ्वीवर मशीहा या नात्याने त्याचे जीवन कसे असेल याविषयी तपशीलवारपणे सांगणाऱ्‍या भविष्यवाण्यांचाही समावेश होता यात शंका नाही. त्याअर्थी, पृथ्वीवर त्याला वाईट वागणूक दिली जाईल हेही बहुधा त्याला माहीत असावे. तरीसुद्धा, येशूने पृथ्वीवर जगण्याची आणि प्रतिज्ञात मशीहा या नात्याने मरण पावण्याची नेमणूक स्वीकारली. का? देवाच्या एकुलत्या एका पुत्राच्या नम्रतेविषयी स्पष्ट करताना प्रेषित पौलाने असे लिहिले: “तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्‍त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले.”—फिलिप्पै. २:६, ७.

मानव या नात्याने, “त्याने स्वतःला लीन केले”

७, ८. येशूने त्याच्या लहानपणी आणि पृथ्वीवरील त्याच्या सेवाकार्यादरम्यान कोणत्या मार्गांनी नम्रता दाखवली?

प्रेषित पौलाने लिहिले: “मनुष्यप्रकृतीचे असे प्रगट होऊन [येशूने] मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.” (फिलिप्पै. २:८) येशूने त्याच्या लहानपणापासूनच नम्रतेच्या बाबतीत आपल्या सर्वांकरता एक कित्ता घालून दिला. त्याचे संगोपन जरी अपरिपूर्ण पालकांनी—योसेफ आणि मरीया—यांनी केले असले, तरी तो “त्यांच्या आज्ञेत राहिला.” (लूक २:५१) लहान मुलांकरता त्याने किती उत्तम उदाहरण मांडले! लहानग्यांनी आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहण्याची तयारी दाखवली, तर देव त्यांना आशीर्वाद देईल.

मोठा झाल्यावर, येशूने स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर यहोवाच्या इच्छेप्रमाणे करण्यास प्राधान्य देण्याद्वारे नम्रता दाखवली. (योहा. ४:३४) येशू ख्रिस्ताने आपल्या सेवाकार्यादरम्यान देवाच्या वैयक्‍तिक नावाचा वापर केला आणि प्रामाणिक मनाच्या लोकांना यहोवाच्या गुणांविषयी व मानवजातीकरता त्याचा काय उद्देश आहे याविषयी अचूक ज्ञान घेण्यास मदत केली. येशूने यहोवाविषयी जे शिकवले त्यानुसार तो स्वतःदेखील जगला. उदाहरणार्थ, आदर्श प्रार्थनेत येशूने उल्लेख केलेली पहिली गोष्ट होती: “हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो.” (मत्त. ६:९) अशा प्रकारे येशूने त्याच्या अनुयायांना शिकवले, की त्यांनी यहोवाच्या नावाच्या पवित्रीकरणाला सर्वात जास्त महत्त्व द्यावे. तो स्वतः त्यानुसार जगला. येशू पृथ्वीवरील आपल्या सेवाकार्याच्या शेवटीशेवटी प्रार्थनेत यहोवाला असे म्हणू शकला: “मी तुझे नाव त्यांस [प्रेषितांस] कळविले आहे आणि कळवीन.” (योहा. १७:२६) शिवाय, पृथ्वीवरील आपल्या सेवाकार्यादरम्यान येशूने जे काही साध्य केले त्याचे श्रेय त्याने यहोवाला दिले.—योहा. ५:१९.

९. जखऱ्‍याने मशीहाविषयी कोणती भविष्यवाणी केली, आणि येशूने ती भविष्यवाणी कशा प्रकारे पूर्ण केली?

मशीहाविषयी जखऱ्‍याने भविष्यसूचक शब्दांत असे लिहिले: “सीयोनकन्ये, जोराने आनंदाचा गजर कर; यरुशलेमकन्ये, गजर कर; पाहा, तुझा राजा तुजकडे येत आहे; तो न्यायी व यशस्वी आहे; तो लीन आहे; गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे.” (जख. ९:९) इ.स. ३३ सालच्या वल्हांडण सणापूर्वी येशूने जेरूसलेममध्ये प्रवेश केला तेव्हा ही भविष्यवाणी पूर्ण झाली. लोकांनी त्याच्या वाटेत आपली बाह्‍यवस्त्रे, तसेच झाडांच्या फांद्या पसरल्या. त्याने शहरात प्रवेश केला तेव्हा अक्षरशः संपूर्ण शहर गजबजले होते. लोकांनी येशूचा एका राजाप्रमाणे जयजयकार केला तेव्हादेखील त्याने नम्रता दाखवली.—मत्त. २१:४-११.

१०. येशूने त्याच्या मृत्यूपर्यंत आज्ञाधारक राहण्याची तयारी दाखवली यावरून काय सिद्ध झाले?

१० पृथ्वीवर असताना येशू ख्रिस्ताने त्याच्या मृत्यूपर्यंत नम्रता व आज्ञाधारकता दाखवली. अशा प्रकारे त्याने अगदी पूर्णपणे हे सिद्ध केले, की मानव अतिशय कठीण परीक्षेतही यहोवाला एकनिष्ठ राहू शकतात. मानव स्वार्थापोटी यहोवाची सेवा करतात हा सैतानाचा दावा खोटा असल्याचेही येशूने दाखवून दिले. (ईयो. १:९-११; २:४) ख्रिस्ताने पूर्ण सचोटी राखण्याद्वारे, केवळ यहोवाच या विश्‍वावर आधिपत्य गाजवण्यास योग्य आहे व त्याचे आधिपत्य न्याय्य आहे याचे समर्थन केले. आपल्या पुत्राची अढळ एकनिष्ठा पाहून यहोवाचे मन नक्कीच आनंदित झाले असेल.—नीतिसूत्रे २७:११ वाचा.

११. येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानामुळे विश्‍वासू मानवजातीला कोणकोणत्या आशा मिळाल्या?

११ येशूने वधस्तंभावरील मृत्यूद्वारे, मानवजातीसाठी खंडणी बलिदानाचे मूल्यदेखील दिले. (मत्त. २०:२८) यामुळे नीतिमत्त्वाची अपेक्षा पूर्ण होण्यासोबतच पापपूर्ण मानवांना सदासर्वकाळ जगण्याची संधी मिळाली. पौलाने लिहिले: “नीतिमत्त्वाच्या एकाच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्त्व प्राप्त होते.” (रोम. ५:१८) येशूच्या मृत्यूमुळे आत्म्याने अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना स्वर्गात अमर जीवनाची, तर दुसऱ्‍या मेंढरांना पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाची आशा मिळाली.—योहा. १०:१६; रोम. ८:१६, १७.

मी मनाचा “लीन आहे”

१२. अपरिपूर्ण मानवांसोबत व्यवहार करताना येशूने कशा प्रकारे नम्रता व लीनता दाखवली?

१२ येशूने सर्व “कष्टी व भाराक्रांत” लोकांना त्याच्याकडे येण्याचे आमंत्रण दिले. त्याने म्हटले: “मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल.” (मत्त. ११:२८, २९) नम्रता व लीनता या गुणांमुळे येशूला अपरिपूर्ण मानवांसोबत दयेने आणि भेदभाव न करता व्यवहार करण्याची प्रेरणा मिळाली. त्याने आपल्या शिष्यांकडून अवाजवी अपेक्षा केल्या नाहीत. येशूने त्यांची प्रशंसा केली व त्यांना प्रोत्साहन दिले. आपण अकार्यक्षम किंवा अयोग्य आहोत असे त्याच्या शिष्यांना विचार करायला त्याने लावले नाही. येशू त्यांच्याशी कठोरतेने वागला नाही किंवा त्याने त्यांच्यावर जुलूम केला नाही. उलट, त्याने आपल्या शिष्यांना हे आश्‍वासन दिले की त्यांनी त्याच्यासोबत घनिष्ठ नाते जोडून त्याच्या शिकवणी अंमलात आणल्यास त्यांना विसावा मिळेल; कारण त्याचे जू सोयीचे व त्याचे ओझे हलके होते. स्त्री-पुरुषांना व लहान-मोठ्या सर्वांनाच त्याच्या सान्‍निध्यात असायला आवडायचे.—मत्त. ११:३०.

१३. येशूने कशा प्रकारे दुर्लक्षितांना सहानुभूती दाखवली?

१३ इस्राएलातील सर्वसामान्य लोक दुर्लक्षित होते. त्यामुळे येशूने त्यांच्यासोबत सहवास करताना त्यांना सहानुभूती दाखवली आणि प्रेमळपणे त्यांच्या गरजांकडे लक्ष पुरवले. यरीहोजवळ त्याची भेट बार्तीमय नावाच्या एका अंधळ्या भिकाऱ्‍याशी व त्याच्या अनामिक साथीदाराशी झाली. त्यांनी येशूकडे वारंवार मदतीची विनंती केली. पण, जमावाने त्यांना गप्प राहावे म्हणून धमकावले. येशू त्या अंधळ्या मनुष्यांच्या विनंतीकडे सहजासहजी दुर्लक्ष करू शकला असता! त्याऐवजी, येशूने त्यांना त्याच्याकडे आणण्यास सांगितले, आणि त्याला त्यांचा कळवळा येऊन त्याने त्यांची दृष्टी परत दिली. खरेच, येशूने नम्रता व पापपूर्ण मानवांना दया दाखवण्याद्वारे आपल्या पित्याचे, यहोवाचे अनुकरण केले.—मत्त. २०:२९-३४; मार्क १०:४६-५२.

“जो कोणी स्वतःला नमवील तो उंच केला जाईल”

१४. येशूच्या नम्रतेमुळे कोणते फायदे मिळाले आहेत?

१४ येशू ख्रिस्ताने नम्रता दाखवली त्याचा आपल्याला आनंद होतो आणि त्याच्या नम्रतेचा आपल्याला खूप फायदा होतो. यहोवाला हे पाहून आनंद झाला, की त्याच्या प्रिय पुत्राने त्याची इच्छा नम्रपणे स्वीकारली. येशूच्या सौम्यतेमुळे व मनाच्या लीनतेमुळे त्याच्या प्रेषितांना व शिष्यांना विसावा मिळाला. त्याचे उदाहरण, त्याच्या शिकवणी, आणि त्याची प्रेमळ प्रशंसा यांमुळे त्यांना आध्यात्मिक रीत्या प्रगती करण्याचे उत्तेजन मिळाले. येशूच्या नम्रतेमुळे सर्वसाधारण लोकांना फायदा झाला, कारण त्यांना त्याच्याकडून मदत, मार्गदर्शन, आणि प्रोत्साहन मिळाले. खरेतर, येशूच्या खंडणी बलिदानामुळे, तारण होण्यास योग्य असलेल्या सर्व मानवांना दीर्घकालिक फायदे मिळतील.

१५. नम्र असल्यामुळे येशूला कसा फायदा झाला?

१५ येशूबद्दल काय म्हणता येईल? त्याच्या नम्रतेमुळे त्याला फायदा झाला का? हो, कारण येशूने आपल्या शिष्यांना असे सांगितले: “जो कोणी स्वतःला नमवील तो उंच केला जाईल.” (मत्त. २३:१२) हे शब्द त्याच्या बाबतीत खरे ठरले. पौल याविषयी स्पष्ट करतो: “देवाने [येशूला] अत्युच्च केले, आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले; ह्‍यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.” पृथ्वीवर असताना येशूने नम्रता व विश्‍वासूपणा दाखवल्यामुळे, यहोवा देवाने आपल्या पुत्राला स्वर्गातील व पृथ्वीवरील प्राण्यांवर अधिकार देण्याद्वारे अत्युच्च केले.—फिलिप्पै. २:९-११.

“सत्य, नम्रता” यांच्या प्रीत्यर्थ येशू स्वारी करेल

१६. देवाचा पुत्र आपल्या कार्यांतून पुढेही नम्रता दाखवत राहील हे कशावरून दिसते?

१६ देवाचा पुत्र आपल्या कार्यांतून पुढेही नम्रता दाखवत राहील. स्वर्गातील आपल्या उच्च स्थानातून येशू कशा प्रकारे आपल्या शत्रूंविरुद्ध पावले उचलेल याविषयी भाकीत करताना स्तोत्रकर्त्याने असे गायिले: “सत्य, नम्रता व न्यायपरायणता ह्‍यांच्या प्रीत्यर्थ प्रतापाने स्वारी करून विजयशाली हो.” (स्तो. ४५:४) येशू ख्रिस्त हर्मगिदोनाच्या वेळी, सत्य आणि न्यायीपण यांच्यासोबतच नम्रतेच्या प्रीत्यर्थही स्वारी करेल. आणि मशीही राजाने हजार वर्षांच्या शासनाच्या शेवटी “सर्व आधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ्यही नष्ट केल्यावर” काय घडेल? तेव्हादेखील तो नम्रता दाखवील का? हो, कारण तो “देवपित्याला राज्य सोपून देईल.”—१ करिंथकर १५:२४-२८ वाचा.

१७, १८. (क) नम्रतेच्या बाबतीत येशूने घालून दिलेल्या कित्त्याचे यहोवाच्या सेवकांनी पालन करणे का महत्त्वाचे आहे? (ख) पुढील लेखात कशाची चर्चा केली जाईल?

१७ आपल्याबद्दल काय? आपला आदर्श येशू याने घालून दिलेल्या कित्त्याचे आपण अनुकरण करणार का आणि नम्रता दाखवणार का? येशू ख्रिस्त हर्मगिदोनाच्या वेळी न्यायदंड बजावण्यास येईल तेव्हा आपले काय होईल? तो ज्याप्रीत्यर्थ स्वारी करतो त्यावरून दिसते की तो केवळ नम्र व नीतिमान लोकांचा बचाव करेल. तर मग, आपला बचाव व्हावा म्हणून आपण नम्रता विकसित करणे अत्यावश्‍यक आहे. शिवाय, ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताने दाखवलेल्या नम्रतेमुळे त्याला व इतरांना फायदा झाला, त्याचप्रमाणे आपण नम्रता दाखवल्यास, हे अनेक मार्गांनी फायदेकारक ठरेल.

१८ येशूने नम्रतेच्या बाबतीत घालून दिलेल्या कित्त्याचे अनुकरण करण्यास आपल्याला कशामुळे साहाय्य मिळेल? समस्यांचा सामना करावा लागला तरीही आपण कशा प्रकारे नम्र बनण्याचा प्रयत्न करू शकतो? या प्रश्‍नांची चर्चा पुढील लेखात केली जाईल.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१२ पानांवरील चित्रे]

नम्रतेच्या बाबतीत येशूच्या उदाहरणामुळे आपल्याला कसा फायदा होतो?

[१३ पानांवरील चित्र]

येशूने दाखवलेली सहानुभूती अनुकरणीय आहे