व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या क्षमाशीलतेचा तुम्हाला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो?

यहोवाच्या क्षमाशीलतेचा तुम्हाला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो?

यहोवाच्या क्षमाशीलतेचा तुम्हाला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो?

यहोवा “दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, . . . अन्याय, अपराध व पाप ह्‍यांची क्षमा करणारा [आहे].”—निर्ग. ३४:६, ७.

या प्रश्‍नांची उत्तरे शोधा

दावीद व मनश्‍शे यांनी पातके केली तेव्हा यहोवाने त्यांच्याशी कशा प्रकारे व्यवहार केला आणि का?

यहोवाने एक राष्ट्र या नात्याने इस्राएलचा त्याग का केला?

यहोवाची क्षमा मिळवण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

१, २. (क) इस्राएल राष्ट्रासोबत व्यवहार करताना यहोवाने कशा प्रकारचा देव असल्याचे दाखवून दिले? (ख) या लेखात आपण कोणता प्रश्‍न विचारात घेणार आहोत?

 नहेम्याच्या काळात सर्व लोकांसमोर प्रार्थना करताना काही लेव्यांनी, आपल्या पूर्वजांनी वारंवार यहोवाच्या आज्ञा “मानण्याचे नाकारले” असल्याचे कबूल केले. पण यहोवाने पुनःपुन्हा तो “क्षमाशील, कृपाळू, दयामय, मंदक्रोध व अतिकरुणामय देव” असल्याचे दाखवून दिले. नहेम्याच्या काळात, बंदिवासातून मायदेशी परतलेल्या त्या इस्राएलांना यहोवा पूर्वीप्रमाणेच अगाध कृपा दाखवत होता.—नहे. ९:१६, १७.

व्यक्‍तिशः आपल्यापैकी प्रत्येक जण हा प्रश्‍न विचारू शकतो, ‘यहोवाच्या क्षमाशीलतेचा मला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो?’ या महत्त्वपूर्ण प्रश्‍नाचे उत्तर मिळवण्याकरता आपण यहोवाच्या क्षमाशीलतेचा ज्यांना फायदा झाला अशा दोन मनुष्यांचे उदाहरण पाहू या आणि देवाने त्यांच्याशी कशा प्रकारे व्यवहार केला याचे परीक्षण करू या. ते दोघे म्हणजे राजा दावीद व राजा मनश्‍शे.

दाविदाने केलेली गंभीर पातके

३-५. दावीद कशा प्रकारे गंभीर पापात गोवला गेला?

दावीद हा देवाला भिऊन वागणारा माणूस होता. पण त्याच्या हातूनही गंभीर पातके झाली. यांपैकी दोन गंभीर पातके उरीया व बथशेबा या विवाहित जोडप्याशी संबंधित होती. या पातकांचे दुष्परिणाम सर्व संबंधित व्यक्‍तींकरता अतिशय दुःखदायक ठरले. तरीसुद्धा, यहोवाने ज्या प्रकारे दाविदाचे ताडन केले त्यावरून आपण त्याच्या क्षमाशीलतेविषयी बरेच काही शिकू शकतो. नेमके काय घडले ते आधी पाहू या.

दाविदाने इस्राएलच्या सैन्याला अम्मोन्यांची राजधानी राब्बा या नगरास वेढा घालण्याकरता पाठवले. हे शहर जेरूसलेमच्या पूर्वेला, यार्देन नदीपलीकडे सुमारे ८० किमी (५० मैल) अंतरावर वसलेले होते. इकडे जेरूसलेमेत, दाविदाने आपल्या राजमहालाच्या छतावरून बथशेबा या विवाहित स्त्रीला स्नान करताना पाहिले. तिचा पती सैन्यासोबत गेलेला होता. बथशेबाला पाहिल्यावर दाविदाच्या भावना इतक्या उत्तेजित झाल्या की त्याने तिला आपल्या महालात बोलावून घेतले आणि तिच्यासोबत व्यभिचार केला.—२ शमु. ११:१-४.

बथशेबा गरोदर असल्याचे दाविदाला कळले तेव्हा त्याने उरीयाला जेरूसलेमला परत आणण्याचा हुकूम दिला. उरीया बथशेबासोबत संबंध ठेवेल अशी त्याची अपेक्षा होती. पण उरीया तर आपल्या घरात प्रवेश करण्यासही तयार झाला नाही. दाविदाने त्याला बरेच प्रोत्साहन देऊनही तो बधला नाही. तेव्हा, राजाने गुप्तपणे आपल्या सेनापतीला पत्र पाठवून उरीयाला आघाडीवर, लढाईच्या अत्यंत धोक्याच्या जागी ठेवण्याचा आणि त्याच्यासोबत असलेल्या सैनिकांना त्याला सोडून मागे हटण्याचा हुकूम दिला. दाविदाच्या मनासारखेच घडले. युद्धात उरीया शत्रूंना सहजासहजी बळी पडला. (२ शमु. ११:१२-१७) अशा रीतीने, व्यभिचाराच्या गंभीर पापासोबतच आता दावीद राजाने एका निर्दोष मनुष्याची हत्याही घडवून आणली.

दाविदाच्या मनाचे परिवर्तन

६. दाविदाने गंभीर पातके केल्यानंतर देवाने काय केले, आणि यावरून आपल्याला यहोवाविषयी काय कळते?

साहजिकच, यहोवाने घडलेला सगळा प्रकार पाहिला होता. त्याच्या नजरेतून काहीही सुटू शकत नाही. (नीति. १५:३) दावीद राजाने नंतर बथशेबाशी लग्न केले असले, तरी “दावीदाने जे कृत्य केले होते ते यहोवाच्या दृष्टीने वाईट होते.” (२ शमु. ११:२७, पं.र.भा.) तर मग, दाविदाने ही गंभीर पातके केल्यानंतर देवाने काय केले? क्षमाशील देव असल्यामुळे, यहोवा दाविदाला क्षमा करण्यास उत्सुक होता. पण, दाविदाने खरोखरच मनापासून पश्‍चात्ताप केला आहे किंवा नाही हे त्याला जाणून घ्यायचे होते. म्हणून, त्याने नाथान या आपल्या संदेष्ट्याला दाविदाकडे पाठवले. यहोवाने दाविदाशी ज्या पद्धतीने व्यवहार केला ते पाहून तुम्हाला दिलासा मिळत नाही का? देवाने दाविदाला त्याची पातके कबूल करण्यास भाग पाडले नाही. तर दाविदाची कृत्ये किती वाईट होती हे त्याच्या लक्षात यावे म्हणून यहोवाने नाथानाला दावीद राजास एक गोष्ट सांगण्यास लावले. (२ शमुवेल १२:१-४ वाचा.) तो नाजूक प्रसंग हाताळण्याची ही पद्धत अतिशय परिणामकारक ठरली!

७. नाथानाने सांगितलेली गोष्ट ऐकल्यावर दाविदाची प्रतिक्रिया काय होती?

नाथानाने सांगितलेली गोष्ट ऐकल्यावर दाविदाच्या आत दडलेला न्यायाधीश जागा झाला. नाथानाच्या गोष्टीतल्या श्रीमंत मनुष्यावर त्याचा कोप भडकला आणि त्याने नाथानाला म्हटले: “परमेश्‍वराच्या जीविताची शपथ, ज्या मनुष्याने हे काम केले तो प्राणदंडास पात्र आहे.” शिवाय, जो मनुष्य अशा अन्यायाला बळी पडला असेल, त्याच्या नुकसानाची भरपाई केली जावी असेही तो म्हणाला. पण त्या क्षणी नाथानाने एक धक्कादायक खुलासा केला, “तो मनुष्य तूच आहेस.” यानंतर त्याने दाविदाला सांगितले की त्याच्या कृत्यांच्या परिणामस्वरूप, “तरवार” त्याच्या घराचा पिच्छा सोडणार नाही आणि त्याच्या घराण्यावर संकटे कोसळतील. तसेच, त्याच्या पापांमुळे लोकांसमोर त्याची बेअब्रू होईल. आपण केलेली पातके खरोखर किती गंभीर आहेत याची दाविदाला जाणीव झाली आणि त्याने नम्रपणे कबूल केले: “मी परमेश्‍वराविरुद्ध पातक केले आहे.”—२ शमु. १२:५-१४.

दाविदाची प्रार्थना आणि देवाची क्षमा

८, ९. स्तोत्र ५१ यातून दाविदाच्या मनातील गहिऱ्‍या भावना कशा प्रकारे स्पष्ट होतात आणि या स्तोत्रातून यहोवाबद्दल आपल्याला काय शिकायला मिळते?

यानंतर दावीद राजाने जे गीत रचले त्यातील शब्दांतून त्याला झालेल्या मनःपूर्वक पश्‍चात्तापाची कल्पना येते. ५१ व्या स्तोत्रात, दाविदाने यहोवाला केलेल्या हृदयस्पर्शी याचना आपण वाचू शकतो. आणि त्यांवरून दिसून येते की त्याने केवळ वरवर आपल्या चुकांची कबुली दिली नाही, तर आपल्या पापांबद्दल मनापासून पश्‍चात्ताप केला. दाविदाला सर्वात जास्त जर कशाची काळजी होती, तर ती होती देवासोबतच्या त्याच्या नातेसंबंधाची. म्हणूनच त्याने कबूल केले, “तुझ्याविरुद्ध, तुझ्याविरुद्धच मी पाप केले आहे.” त्याने यहोवाला याचना केली: “माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्‍न कर; माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. . . . तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे; आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर.” (स्तो. ५१:१-४, ७-१२) यहोवाला आपल्या चुकांविषयी सांगताना तुम्हीही इतक्याच उत्कटतेने व प्रामाणिकपणे आपल्या भावना व्यक्‍त करता का?

दाविदाच्या पापांमुळे घडून आलेले दुःखदायक परिणाम यहोवाने काढून टाकले नाहीत. हे दुष्परिणाम दाविदाला त्याच्या उरलेल्या आयुष्यभर भोगावे लागणार होते. पण, दाविदाने मनापासून केलेल्या पश्‍चात्तापाची यहोवाने दखल घेतली. त्याचे “भग्न व अनुतप्त हृदय” पाहून यहोवाने त्याला क्षमा केली. (स्तोत्र ३२:५ वाचा; स्तो. ५१:१७) सर्वसमर्थ देव पाप करणाऱ्‍या व्यक्‍तीची खरी मनोवृत्ती आणि तिचे हेतू समजू शकतो. मानवी न्यायाधीशांना मोशेच्या नियमशास्त्रानुसार दावीद व बथशेबा यांस प्राणदंडास पात्र ठरवू देण्याऐवजी, यहोवाने दयाळूपणे मध्ये पडून दावीद व बथशेबा यांचे प्रकरण स्वतः हाताळले. (लेवी. २०:१०) इतकेच काय, तर देवाने त्यांचा मुलगा शलमोन याला इस्राएलचा पुढचा राजादेखील बनवले.—१ इति. २२:९, १०.

१०. (क) दाविदाला क्षमा करण्यासाठी यहोवाला कोणता आधार सापडला असावा? (ख) कोणत्या गोष्टींमुळे यहोवा एखाद्या व्यक्‍तीला क्षमा करण्यास प्रवृत्त होतो?

१० यहोवाने दाविदाला क्षमा करण्यामागचे आणखी एक कारण हे असावे की स्वतः दाविदानेही शौलाशी दयाळूपणे व्यवहार केला होता. (१ शमु. २४:४-७) येशूने स्पष्ट केल्याप्रमाणे आपण इतरांशी ज्याप्रमाणे वागतो त्याचप्रमाणे यहोवा आपल्याशी व्यवहार करतो. येशूने म्हटले, “तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल.” (मत्त. ७:१, २) आपल्या हातून घडणाऱ्‍या पातकांची, मग ती व्यभिचार किंवा हत्येसारखी गंभीर पातके असली, तरीसुद्धा यहोवा त्यांची क्षमा करेल हे जाणून आपल्याला किती दिलासा मिळतो! जर आपली क्षमाशील मनोवृत्ती असली; जर आपण यहोवासमोर आपली पातके कबूल केली; आणि जर आपल्या वाईट कृत्यांबद्दल आपली मनोवृत्ती बदलली असल्याचे आपण दाखवले, तर यहोवा आपल्याला क्षमा करेल. ज्यांच्या हातून पातके घडतात ते प्रामाणिकपणे पश्‍चात्ताप करतात तेव्हा त्यांना यहोवाकडून “विश्रांतीचे समय” अनुभवायला मिळतात.—प्रेषितांची कृत्ये ३:१९ वाचा.

गंभीर पातके करणारा मनश्‍शे पश्‍चात्ताप करतो

११. मनश्‍शे राजाने देवाच्या दृष्टीने जे वाईट ते कशा प्रकारे केले?

११ यहोवा किती क्षमाशील आहे हे स्पष्ट करणारा बायबलमधील आणखी एक अहवाल पाहू या. दाविदाने राज्य करण्यास सुरुवात केल्यावर सुमारे ३६० वर्षांनी मनश्‍शे यहुदाचा राजा बनला. त्याच्या ५५ वर्षांच्या कारकीर्दीत त्याने अनेक दुष्ट कृत्ये केली, आणि त्याच्या या घृणित कृत्यांबद्दल यहोवाने त्याला दोषी ठरवले. उदाहरणार्थ, मनश्‍शेने बआल देवतेकरता वेद्या बांधल्या; त्याने “नक्षत्रगणांची” पूजा केली; त्याने आपली मुले अग्नीत होम करून अर्पिली आणि भूतविद्येच्या अनेक प्रथांना प्रोत्साहन दिले. अशा रीतीने त्याने “परमेश्‍वराच्या दृष्टीने वाईट असे पुष्कळ” केले.—२ इति. ३३:१-६.

१२. मनश्‍शे कशा प्रकारे यहोवाकडे वळला?

१२ कालांतराने, मनश्‍शेला त्याच्या मायदेशातून बंदी बनवून नेण्यात आले आणि बॅबिलोनमधील कारागृहात डांबण्यात आले. तेथे त्याला मोशेने इस्राएलांना बोललेले हे शब्द कदाचित आठवले असतील: “तू संकटात पडलास आणि ही सर्व अरिष्टे तुझ्यावर आली म्हणजे शेवटी तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्याकडे वळशील आणि त्याची वाणी ऐकशील.” (अनु. ४:३०) मनश्‍शे खरोखरच यहोवाकडे वळला. हे त्याने कसे केले? तो “देवासमोर फार दीन झाला” आणि (पृष्ठ २१ वर दाखवल्याप्रमाणे) देवाने “त्याची प्रार्थना केली.” (२ इति. ३३:१२, १३) मनश्‍शेने नेमक्या कोणत्या शब्दांत यहोवाला विनंती केली हे बायबलमध्ये सांगितलेले नाही. पण, त्याची प्रार्थनासुद्धा कदाचित स्तोत्र ५१ मध्ये दावीद राजाने केलेल्या प्रार्थनेसारखीच असावी. काहीही असो, मनश्‍शेचा पूर्णपणे हृदयपालट झाला.

१३. यहोवाने मनश्‍शेला क्षमा का केली?

१३ मनश्‍शेच्या प्रार्थनांना यहोवाने कशा प्रकारे प्रतिसाद दिला? मनश्‍शेने “त्याचा धावा केला तेव्हा त्याने त्याची विनंती” ऐकली. पूर्वी होऊन गेलेल्या दाविदाप्रमाणेच मनश्‍शेनेही आपल्या पातकांचे गांभीर्य ओळखले आणि खऱ्‍या अर्थाने पश्‍चात्ताप केला. म्हणूनच देवाने मनश्‍शेला क्षमा केली आणि त्याला पुन्हा जेरूसलेममध्ये आणून त्याचे राज्य त्याला परत दिले. अशा रीतीने, यहोवा “परमेश्‍वरच देव आहे असे मनश्‍शेस कळून आले.” (२ इति. ३३:१३) जे मनापासून पश्‍चात्ताप करतात त्यांना आपला दयाळू देव क्षमा करतो हे दाखवणारे आणखी एक उदाहरण पाहून आपल्याला खरोखर किती दिलासा मिळतो!

यहोवा नेहमीच पापांची क्षमा करतो का?

१४. पाप करणाऱ्‍या व्यक्‍तीला यहोवा क्षमा करेल किंवा नाही हे कशावर अवलंबून असते?

१४ आज देवाच्या लोकांपैकी फार कमी जणांवर दावीद व मनश्‍शेइतक्या गंभीर पापांसाठी क्षमा मागण्याची वेळ येईल. तरीसुद्धा, यहोवाने त्या दोन राजांना क्षमा केली यावरून आपल्याला हे कळून येते की पाप करणाऱ्‍या व्यक्‍तीने खरा पश्‍चात्ताप दाखवल्यास आपला देव अगदी गंभीर स्वरूपाच्या पातकांचीही क्षमा करण्यास तयार असतो.

१५. यहोवा सर्व मानवांच्या पापांची नेहमीच क्षमा करत नाही हे कशावरून दिसून येते?

१५ अर्थातच, यहोवा सर्व मानवांच्या पापांची नेहमीच क्षमा करतो असे समजणे योग्य ठरणार नाही. या बाबतीत, आपण दावीद व मनश्‍शे यांच्या मनोवृत्तीची तुलना, गैरमार्गाला लागलेल्या इस्राएल व यहुदा येथील लोकांच्या मनोवृत्तीशी करू या. देवाने नाथानाला दाविदाकडे पाठवले आणि दाविदाला त्याची मनोवृत्ती बदलण्याची संधी दिली. दाविदाने कृतज्ञतेने ही संधी स्वीकारली. मनश्‍शेवर संकटे आली तेव्हा तो मनःपूर्वक पश्‍चात्ताप करण्यास प्रेरित झाला. पण इस्राएल व यहुदाच्या रहिवाशांनी मात्र अनेकदा, पश्‍चात्तापी मनोवृत्ती दाखवण्यास नकार दिला. त्यामुळे, यहोवाने त्यांना क्षमा केली नाही. उलट त्यांच्या वाईट वागणुकीबद्दल आपला दृष्टिकोन काय आहे हे सांगण्यासाठी त्याने वारंवार आपल्या संदेष्ट्यांना त्यांच्याकडे पाठवले. (नहेम्या ९:३० वाचा.) बॅबिलोनमधील बंदिवान आपल्या मायदेशी परतल्यानंतरही यहोवाने एज्रा याजक व संदेष्टा मलाखी यांच्यासारख्या विश्‍वासू निरोप्यांना आपल्या लोकांकडे पाठवले. जेव्हा जेव्हा यहोवाचे लोक त्याच्या इच्छेनुसार वागले तेव्हा तेव्हा त्यांना मोठा आनंद अनुभवण्यास मिळाला.—नहे. १२:४३-४७.

१६. (क) अपश्‍चात्तापी मनोवृत्ती दाखवण्याचा एक राष्ट्र या नात्याने इस्राएलवर कोणता परिणाम झाला? (ख) वैयक्‍तिक स्तरावर प्राचीन इस्राएल राष्ट्राच्या वंशजांना यहोवाने कोणती संधी उपलब्ध करून दिली आहे?

१६ पूर्वी इस्राएलात पशू बलिदाने दिली जायची. पण येशूला पृथ्वीवर पाठवण्यात आल्यानंतर आणि त्याने एकदाच परिपूर्ण खंडणी बलिदान अर्पण केल्यानंतर यहोवाने पशू बलिदाने स्वीकारण्याचे बंद केले. (१ योहा. ४:९, १०) मनुष्यरूपात असताना येशूने पुढील हृदयस्पर्शी शब्दांत आपल्या पित्याचा दृष्टिकोन प्रतिबिंबित केला: “यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणाऱ्‍ये, व तुझ्याकडे पाठविलेल्यांस धोंडमार करणाऱ्‍ये! जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकवटते, तसे तुझ्या मुलाबाळांना एकवटावयाची कितीदा तरी माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती!” म्हणून येशूने असे म्हटले, “पाहा, तुमचे घर तुम्हावर सोडले आहे.” (मत्त. २३:३७, ३८) अशा रीतीने एका पापपूर्ण व अपश्‍चात्तापी राष्ट्राची जागा आत्मिक इस्राएलाने घेतली. (मत्त. २१:४३; गलती. ६:१६) पण वैयक्‍तिक स्तरावर मूळ इस्राएल राष्ट्रातील लोकांबद्दल काय म्हणता येईल? देवावर व येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवण्याद्वारे, यहोवाच्या क्षमाशीलतेचा व दयाळूपणाचा फायदा करून घेण्याची संधी त्यांना उपलब्ध आहे. आपल्या पापांबद्दल पश्‍चात्ताप करण्याअगोदरच मरण पावलेल्या पण नंदनवन पृथ्वीवर पुनरुत्थान झालेल्या लोकांनादेखील ही संधी उपलब्ध करून दिली जाईल.—योहा. ५:२८, २९; प्रे. कृत्ये २४:१५.

यहोवाच्या क्षमाशीलतेचा फायदा करून घ्या

१७, १८. यहोवाच्या क्षमाशीलतेचा आपण कशा प्रकारे फायदा करून घेऊ शकतो?

१७ यहोवाच्या क्षमाशीलतेला आपण कशा प्रकारे प्रतिसाद दिला पाहिजे? आपण नक्कीच दावीद व मनश्‍शेसारखी मनोवृत्ती दाखवली पाहिजे. आपली पापपूर्ण प्रवृत्ती आहे हे आपण ओळखले पाहिजे, आपल्या चुकांबद्दल पश्‍चात्ताप केला पाहिजे, यहोवाकडे प्रामाणिकपणे क्षमेची याचना केली पाहिजे आणि आपल्यामध्ये एक शुद्ध हृदय उत्पन्‍न करण्याची त्याला विनंती केली पाहिजे. (स्तो. ५१:१०) जर आपल्या हातून गंभीर पाप घडले असेल तर आपण त्याविषयी वडिलांशी बोलले पाहिजे जेणेकरून ते आपल्याला साहाय्य करू शकतील. (याको. ५:१४, १५) आपल्या सर्वांची परिस्थिती वेगवेगळी असू शकेल. पण यहोवाने मोशेला स्वतःचे ज्या प्रकारे वर्णन करून सांगितले ते नेहमी आठवणीत ठेवणे आपल्याकरता सांत्वनदायक ठरेल. त्याने मोशेला आपण एक “दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हजारो जणांवर दया करणारा, अन्याय, अपराध व पाप ह्‍यांची क्षमा करणारा” देव असल्याचे सांगितले. आजही यहोवा बदललेला नाही.—निर्ग. ३४:६, ७.

१८ एक अतिशय प्रभावशाली उदाहरण देऊन, यहोवाने पश्‍चात्तापी इस्राएलांना हे आश्‍वासन दिले की त्यांची पातके “लाल” असली तरी ती “बर्फासारखी” पांढरी होतील; म्हणजेच त्यांची पातके पूर्णपणे पुसून टाकली जातील. (यशया १:१८ वाचा.) तर मग, यहोवाच्या क्षमाशीलतेचा आपल्याला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो? आपण कृतज्ञ व पश्‍चात्तापी मनोवृत्ती दाखवल्यास आपल्याला आपल्या पापांची व चुकांची पूर्णपणे क्षमा मिळू शकते.

१९. पुढील लेखात आपण काय पाहणार आहोत?

१९ यहोवाच्या क्षमाशीलतेचा लाभ घेणारे या नात्याने, एकमेकांशी व्यवहार करताना आपण कशा प्रकारे त्याचे अनुकरण करू शकतो? ज्यांच्या हातून गंभीर पाप झाले आहे, पण ज्यांनी मनःपूर्वक पश्‍चात्ताप दाखवला आहे अशांप्रती अक्षमाशील वृत्ती दाखवण्याचे आपण कसे टाळू शकतो? पुढील लेख आपल्या प्रत्येकाला स्वतःच्या हृदयाचे परीक्षण करण्यास मदत करेल, जेणेकरून आपल्याला आपल्या “उत्तम व क्षमाशील” पित्या यहोवाचे अधिकाधिक अनुकरण करता येईल.—स्तो. ८६:५.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२४ पानांवरील चित्र]

यहोवाच्या क्षमाशीलतेमुळे मनश्‍शे जेरूसलेममध्ये परत एकदा राज्य करू लागला