व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

मत्तय १९:१०-१२ मधील येशूच्या शब्दांतून असे सूचित होते का, की जे लोक अविवाहित राहण्याची निवड करतात त्यांना हे दान रहस्यमय रीत्या प्राप्त होते?

▪ अविवाहित राहण्याच्या बाबतीत येशूने कोणत्या विशिष्ट परिस्थितीत उल्लेख केला होता त्याकडे लक्ष द्या. परूश्‍यांनी त्याच्याकडे येऊन घटस्फोटाविषयी त्याचे मत विचारले, तेव्हा त्याने विवाहाच्या बाबतीत यहोवाचा स्तर काय आहे हे स्पष्ट केले. एखाद्याच्या पत्नीची “वागणूक अनुचित” असल्यामुळे तिला घटस्फोट देण्याची अनुमती मोशेच्या नियमशास्त्रात दिली असली, तरी सुरुवातीपासून असे नव्हते. (अनु. २४:१, २) नंतर येशूने म्हटले: “जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या कारणाशिवाय टाकून दुसरी करतो तो व्यभिचार करतो.”—मत्त. १९:३-९.

हे ऐकून त्याच्या शिष्यांनी म्हटले: “बायकोच्या बाबतीत पुरुषाची गोष्ट अशी असली तर लग्न न केलेले बरे.” प्रत्युत्तरात येशू म्हणाला: “सर्व जण हे वचन स्वीकारू शकत नाहीत; पण ज्यांना हे दान दिले आहे तेच स्वीकारू शकतात. कारण आईच्या उदरी जन्मलेले असे नपुंसक आहेत, माणसांनी केलेले असेही नपुंसक आहेत, आणि स्वर्गाच्या राज्यासाठी ज्यांनी आपणास नपुंसक करून घेतले असे नपुंसक आहेत. ज्याला हे स्वीकारता येते त्याने स्वीकारावे.”—मत्त. १९:१०-१२.

खरोखरच्या नपुंसकांपैकी काही जन्मतःच नपुंसक होते, काही अपघातामुळे नपुंसक बनले, तर काहींना जबरदस्तीने नपुंसक बनवले गेले. पण, असेही काही लोक होते जे खरोखर नपुंसक नसले, तरी त्यांनी स्वेच्छेने स्वतःला नपुंसक बनवले. ते विवाह करू शकत असले, तरी त्यांनी आत्मसंयम बाळगला आणि “स्वर्गाच्या राज्यासाठी” ते अविवाहित राहिले. येशूप्रमाणेच, राज्याशी संबंधित कार्यात स्वतःला झोकून देता यावे म्हणून त्यांनी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. त्यांना जन्मतःच हे दान मिळाले नव्हते किंवा त्यांना हे दान देण्यात आले नव्हते. खरेतर त्यांनी स्वतःहून हे दान स्वीकारले, म्हणजे त्यांनी जाणीवपूर्वक हे दान प्राप्त केले.

येशूने जे म्हटले होते त्याच्या आधारावर प्रेषित पौलाने पुढे स्पष्ट केले की सर्वच ख्रिस्ती यहोवाची सेवा स्वीकारयोग्य रीतीने करू शकतात, मग ते अविवाहित असोत वा विवाहित; पण, आपल्या अविवाहित स्थितीविषयी “अंतःकरणाने स्थिर” असलेले लोक “अधिक बरे” करतात. ते कसे? विवाहित लोकांना आपला काही वेळ व शक्‍ती आपल्या साथीदाराला आनंदित ठेवण्यासाठी व त्याची काळजी घेण्यासाठी खर्च करावी लागते. पण दुसरीकडे पाहता, अविवाहित ख्रिश्‍चनांवर ही जबाबदारी नसल्याने ते प्रभूच्या सेवेत व्यस्त राहू शकतात. ते आपल्या अविवाहित स्थितीला देवाकडील “दान” असे लेखतात.—१ करिंथ. ७:७, ३२-३८.

अशा रीतीने, बायबल आपल्याला सांगते की एका ख्रिश्‍चनाला अविवाहित राहण्याचे दान रहस्यमय रीत्या मिळत नाही. तर, कोणत्याही प्रकारे विचलित न होता राज्याशी संबंधित कार्यांना चालना देता यावी म्हणून अविवाहित राहण्याद्वारे तो हे दान वाढीस लावतो. आज अनेकांनी याच कारणामुळे अविवाहित राहण्याचा निर्धार केला आहे, आणि इतरांनी त्यांना नक्कीच प्रोत्साहन दिले पाहिजे.