व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती वडील—आपल्या “आनंदात साहाय्यकारी”

ख्रिस्ती वडील—आपल्या “आनंदात साहाय्यकारी”

“आम्ही . . . तुमच्या आनंदात साहाय्यकारी आहो.”—२ करिंथ. १:२४.

१. पौलाला करिंथमधील ख्रिश्‍चनांबद्दल कशामुळे आनंद झाला?

 वर्ष होते इ.स. ५५. प्रेषित पौल त्रोवस या बंदराच्या शहरात होता. पण, तो सतत करिंथबद्दल विचार करत होता. त्या वर्षाच्या सुरुवातीला, पौलाला हे ऐकून दुःख झाले होते, की तेथील बांधव आपसात वाद घालत होते. म्हणून एका काळजी करणाऱ्‍या पित्याप्रमाणे त्यांची सुधारणूक करण्यासाठी त्याने त्यांना एक पत्र पाठवले. (१ करिंथ. १:११; ४:१५) त्याने आपला सहकारी तीत यालादेखील त्यांच्याकडे पाठवले आणि तीताने त्रोवसमध्ये त्याच्याकडे माहिती आणावी अशी व्यवस्था केली. आता पौल त्रोवसमध्ये तीताची वाट पाहत होता आणि करिंथमधील बांधवांचे कसे काय चालले आहे हे ऐकण्याची त्याला उत्कंठा लागली होती. पण, तीत अजूनही त्रोवसला न आल्यामुळे पौल खूप निराश झाला. आता पौल काय करणार? तो जहाजाने मासेदोनियाला गेला, आणि तेथे त्याला तीत भेटला तेव्हा त्याला आनंद झाला. तीताने पौलाला सांगितले की करिंथकरांनी पौलाच्या पत्रातील सल्ला लागू केला आहे आणि ते पौलाला पाहण्यास अतिशय उत्सुक आहेत. पौलाने जेव्हा ही आनंदाची बातमी ऐकली तेव्हा त्याला “विशेष आनंद झाला.”—२ करिंथ. २:१२, १३; ७:५-९.

२. (क) पौलाने करिंथकरांना विश्‍वास व आनंद यांविषयी काय लिहिले? (ख) आपण कोणत्या प्रश्‍नांची चर्चा करणार आहोत?

याच्या थोड्याच काळानंतर, पौलाने करिंथकरांना दुसरे पत्र लिहिले. त्याने त्यांना असे सांगितले: “आम्ही तुमच्या विश्‍वासावर सत्ता गाजवितो असे नाही, तर तुमच्या आनंदात साहाय्यकारी आहो; तुमची स्थिती आहे ती विश्‍वासाने आहे.” (२ करिंथ. १:२४) पौलाच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? आणि आज मंडळीतील ख्रिस्ती वडील या शब्दांवरून काय शिकू शकतात?

आपला विश्‍वास आणि आनंद

३. (क) “तुमची स्थिती आहे ती विश्‍वासाने आहे,” या पौलाच्या शब्दांचा काय अर्थ होतो? (ख) आज मंडळीचे वडील कशा प्रकारे पौलाचे अनुकरण करतात?

पौलाने आपल्या उपासनेतील दोन आवश्‍यक पैलूंचा उल्लेख केला—विश्‍वास आणि आनंद. विश्‍वासाविषयी त्याने असे लिहिले होते: “आम्ही तुमच्या विश्‍वासावर सत्ता गाजवितो असे नाही, तर . . . तुमची स्थिती आहे ती विश्‍वासाने आहे.” या शब्दांद्वारे पौलाने हे मान्य केले, की करिंथमधील बांधव त्याच्यामुळे किंवा कोणा इतर मनुष्यामुळे नव्हे, तर देवावरील त्यांच्या स्वतःच्या विश्‍वासामुळे स्थिर आहेत. म्हणून, पौलाला त्याच्या बांधवांच्या विश्‍वासावर सत्ता गाजवण्याची गरज वाटली नाही, आणि तसे करण्याची मुळात त्याची इच्छाही नव्हती. पौलाला भरवसा होता, की ते विश्‍वासू ख्रिस्ती होते व योग्य ते करण्याची त्यांची इच्छा होती. (२ करिंथ. २:३) पौलाचे अनुकरण करण्याद्वारे, आज मंडळीतील वडील आपल्या बंधुभगिनींबद्दल असा भरवसा बाळगतात की ते देवाला विश्‍वासू आहेत आणि योग्य हेतूने त्याची सेवा करत आहेत. (२ थेस्सलनी. ३:४) त्यामुळे, मंडळीकरता कडक नियम बनवण्याऐवजी, वडील शास्त्रवचनांतील तत्त्वांवर आणि यहोवाच्या संघटनेच्या मार्गदर्शनावर अवलंबून राहतात. शेवटी, आजच्या काळातील वडील आपल्या बंधुभगिनींच्या विश्‍वासावर सत्ता गाजवत नाहीत.—१ पेत्र ५:२, ३.

४. (क) “आम्ही . . . तुमच्या आनंदात साहाय्यकारी आहो,” असे पौलाने जे लिहिले त्याचा काय अर्थ होता? (ख) आज वडील कशा प्रकारे पौलाच्या मनोवृत्तीचे अनुकरण करतात?

पौलाने असेही म्हटले: “आम्ही . . . तुमच्या आनंदात साहाय्यकारी आहो.” हे शब्द पौलाने स्वतःबद्दल व त्याच्या जवळच्या सहकाऱ्‍यांबद्दल म्हटले. आपण असे का म्हणू शकतो? कारण, त्याच पत्रात पौलाने करिंथकरांना त्याच्या सहकाऱ्‍यांपैकी दोघांची आठवण करून दिली. त्याने असे लिहिले: “देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्‍याची घोषणा आम्हाकडून म्हणजे मी, सिल्वान व तीमथ्य ह्‍यांच्याकडून, तुम्हामध्ये झाली.” (२ करिंथ. १:१९) शिवाय, पौलाने जेव्हाही त्याच्या पत्रांत “सहकारी” हा शब्द वापरला, तेव्हा त्याने नेहमीच तो शब्द अक्विला, अपुल्लोस, तीत, तीमथ्य, प्रिस्क आणि अशा इतर जवळच्या सहकाऱ्‍यांच्या संदर्भात वापरला. (रोम. १६:३, २१; १ करिंथ. ३:६-९; २ करिंथ. ८:२३) तेव्हा, “आम्ही . . . तुमच्या आनंदात साहाय्यकारी आहो” असे म्हणण्याद्वारे, पौलाने करिंथकरांना हे आश्‍वासन दिले की मंडळीतील सर्वांचा आनंद वाढीस लावण्यासाठी जे काही करता येईल ते सर्व करण्याची त्याची आणि त्याच्या साथीदारांची इच्छा आहे. आज, ख्रिस्ती वडिलांचीदेखील तीच इच्छा आहे. मंडळीतील बंधुभगिनींना “हर्षाने परमेश्‍वराची सेवा” करता यावी म्हणून त्यांची मदत करण्यासाठी जे काही करता येईल ते सर्व करण्याची इच्छा ते बाळगतात.—स्तो. १००:२; फिलिप्पै. १:२५.

५. आपण कोणत्या प्रश्‍नाची उत्तरे पाहणार आहोत, आणि आपण कशाविषयी विचार केला पाहिजे?

अलीकडेच, जगातील विविध भागांत राहणाऱ्‍या आवेशी बंधुभगिनींच्या एका गटाला पुढील प्रश्‍न विचारण्यात आला: “मंडळीतील वडिलांच्या कोणत्या शब्दांमुळे आणि कोणत्या कार्यांमुळे तुमच्या आनंदात भर पडली?” त्या बंधुभगिनींनी कोणते उत्तर दिले होते याची आता आपण चर्चा करणार आहोत. असे करताना, त्यांच्या ठिकाणी तुम्ही असता, तर तुम्ही काय म्हटले असते याचा विचार करा. त्यासोबतच, आपल्या स्थानिक मंडळीच्या आनंदाला आपण सर्व जण कशा प्रकारे हातभार लावू शकतो याचाही आपण विचार करू या. *

“प्रिय पर्सिस हिला सलाम सांगा”

६, ७. (क) वडील कोणत्या एका मार्गाने येशू, पौल व देवाच्या इतर सेवकांचे अनुकरण करू शकतात? (ख) बंधुभगिनींची नावे आठवणीत ठेवल्याने कशा प्रकारे त्यांच्या आनंदात भर पडते?

कित्येक बंधुभगिनींचे म्हणणे आहे की वडील जेव्हा त्यांच्यामध्ये वैयक्‍तिक आस्था दाखवतात तेव्हा त्यांचा आनंद द्विगुणित होतो. वडील प्रामुख्याने दावीद, अलीहू आणि येशू यांच्या उदाहरणांचे अनुकरण करण्याद्वारे बंधुभगिनींमध्ये वैयक्‍तिक आस्था दाखवतात. (२ शमुवेल ९:६; ईयोब ३३:१; लूक १९:५ वाचा.) यहोवाच्या या प्रत्येक सेवकाने, इतरांना त्यांच्या वैयक्‍तिक नावाने संबोधण्याद्वारे त्यांच्यामध्ये वैयक्‍तिक आस्था असल्याचे दाखवले. सहविश्‍वासू बंधुभगिनींची नावे आठवणीत ठेवणे आणि त्यांना नावाने संबोधणे किती महत्त्वाचे आहे याची जाणीव पौलालाही होती. त्याने आपल्या एका पत्राच्या शेवटी २५ बंधुभगिनींना त्यांच्या वैयक्‍तिक नावाने अभिवादन केले. त्यांपैकी एक ख्रिस्ती बहीण होती पर्सिस, जिच्याबद्दल पौलाने म्हटले: “प्रिय पर्सिस हिला सलाम सांगा.”—रोम. १६:३-१५.

काही वडिलांना इतरांची नावे आठवणीत ठेवणे खूप कठीण जाते. तरीसुद्धा, नावे आठवणीत ठेवण्यासाठी ते खास प्रयत्न करतात तेव्हा ते आपल्या सहविश्‍वासू बांधवांना जणू असे म्हणत असतात, ‘तुम्ही माझ्याकरता खूप महत्त्वाचे आहा.’ (निर्ग. ३३:१७) विशेषतः, टेहळणी बुरूज अभ्यासादरम्यान किंवा इतर सभांदरम्यान उत्तरे देणाऱ्‍या बंधुभगिनींना नावाने संबोधण्याद्वारे वडील त्यांच्या आनंदात भर घालू शकतात.—योहान १०:३ पडताळून पाहा.

“तिने प्रभूमध्ये फार श्रम केले”

८. पौलाने कोणत्या एका महत्त्वपूर्ण मार्गाने यहोवा व येशूच्या उदाहरणाचे अनुकरण केले?

पौलाने इतरांची प्रामाणिकपणे प्रशंसा करण्याद्वारे, त्यांच्याबद्दल त्याला वैयक्‍तिक आस्था असल्याचे दाखवले. असे करणे आपल्या सहविश्‍वासू बांधवांच्या आनंदात भर घालण्याचा आणखी एक मूलभूत मार्ग आहे. पौलाने ज्या पत्रात आपल्या बंधुभगिनींच्या आनंदासाठी कार्य करण्याची इच्छा व्यक्‍त केली होती, त्याच पत्रात त्याने असे लिहिले: “मला तुम्हाविषयी फार अभिमान आहे.” (२ करिंथ. ७:४) प्रशंसेच्या या शब्दांमुळे करिंथमधील बंधुभगिनींच्या मनाला नक्कीच उभारी मिळाली असेल. पौलाने इतर मंडळ्यांचीही अशाच रीतीने प्रशंसा केली. (रोम. १:८; फिलिप्पै. १:३-५; १ थेस्सलनी. १:८) खरेतर, पौलाने रोमच्या मंडळीला लिहिलेल्या पत्रात पर्सिसचा उल्लेख केल्यानंतर, पुढे असे म्हटले: “तिने प्रभूमध्ये फार श्रम केले.” (रोम. १६:१२) अशा प्रकारच्या कौतुकामुळे त्या विश्‍वासू बहिणीला किती प्रोत्साहन मिळाले असेल! इतरांची प्रशंसा करण्याच्या बाबतीत, पौलाने यहोवा व येशूच्या उदाहरणाचे अनुकरण केले.—मार्क १:९-११; योहान १:४७ वाचा; प्रकटी. २:२, १३, १९.

९. एकमेकांची प्रशंसा केल्यामुळे मंडळीच्या आनंदात भर का पडते?

आपल्या बंधुभगिनींबद्दल असलेल्या कृतज्ञतेच्या भावना शब्दांतून व्यक्‍त करणे खूप महत्त्वाचे आहे याची जाणीव आजच्या काळातील वडिलांनाही आहे. (नीति. ३:२७; १५:२३) वडील जेव्हा जेव्हा असे करतात, तेव्हा तेव्हा ते आपल्या बांधवांना असे म्हणतात: ‘तुम्ही केलेलं कार्य मी पाहिलं आहे. मी तुमची कदर करतो.’ आणि वडिलांच्या अशा आश्‍वासनदायक शब्दांची बंधुभगिनींना नक्कीच गरज आहे. पन्‍नाशीत असलेल्या एका बहिणीने अनेकांच्या भावना व्यक्‍त करत असे म्हटले: “कामाच्या ठिकाणी क्वचितच कुणी माझं कौतुक करतं. तिथलं वातावरण उदासीन व स्पर्धात्मक आहे. म्हणून, मंडळीसाठी मी केलेल्या एखाद्या गोष्टीसाठी एखादे वडील माझी प्रशंसा करतात तेव्हा मला मनापासून आनंद वाटतो व माझ्यामध्ये उत्साह निर्माण होतो! मला आश्‍वासन मिळतं, की माझ्या स्वर्गीय पित्याचं माझ्यावर प्रेम आहे.” एकटे पालक या नात्याने दोन मुलांचे संगोपन करणाऱ्‍या एका बांधवालादेखील असेच वाटले. अलीकडेच एका वडिलांनी त्या बांधवाची मनस्वी प्रशंसा केली. याचा त्या बांधवावर कसा प्रभाव पडला? बांधव म्हणतो: “त्या वडिलांच्या शब्दांमुळं मला अतिशय स्फूर्ती मिळाली!” खरेच, मंडळीचे वडील आपल्या सहविश्‍वासू बंधुभगिनींची मनापासून प्रशंसा करतात, तेव्हा त्यांना तजेला मिळतो व त्यांच्या आनंदात भर पडते. आणि परिणामस्वरूप, न थकता जीवनाच्या मार्गावर वाटचाल करत राहण्यास त्यांना आणखी बळ मिळते.—यश. ४०:३१.

देवाच्या मंडळीचे “पालन” करा

१०, ११. (क) मंडळीचे वडील कशा प्रकारे नहेम्याच्या उदाहरणाचे अनुकरण करू शकतात? (ख) मेंढपाळ भेटींद्वारे आध्यात्मिक कृपादान देण्यास कोणती गोष्ट एका वडिलाला साहाय्य करेल?

१० मंडळीचे वडील खासकरून कोणत्या एका आवश्‍यक मार्गाने आपल्या बंधुभगिनींमध्ये वैयक्‍तिक आस्था दाखवू शकतात आणि मंडळीच्या आनंदात भर घालू शकतात? तो मार्ग म्हणजे, ज्यांना प्रोत्साहनाची गरज आहे अशांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेणे. (प्रेषितांची कृत्ये २०:२८ वाचा.) असे करण्याद्वारे वडील, प्राचीन काळातील आध्यात्मिक मेंढपाळांचे अनुकरण करतात. उदाहरणार्थ, आपले काही यहुदी बांधव आध्यात्मिक रीत्या दुर्बल आहेत हे एक विश्‍वासू पर्यवेक्षक असलेल्या नहेम्याने पाहिले तेव्हा त्याने काय केले याकडे लक्ष द्या. अहवाल सांगतो की तो लगेच उठला आणि त्याने त्यांना प्रोत्साहन दिले. (नहे. ४:१४) आज, मंडळीच्या वडिलांनाही तसेच करण्याची इच्छा आहे. आपल्या बांधवांना विश्‍वासात दृढ राहण्यास मदत करण्यासाठी तेदेखील पुढाकार घेतात. असे वैयक्‍तिक प्रोत्साहन देण्यासाठी ते परिस्थिती अनुमती देत असल्यास आपल्या बंधुभगिनींच्या घरी जाऊन भेटी देतात. अशा मेंढपाळ भेटींच्या वेळी बंधुभगिनींना “काही आध्यात्मिक कृपादान” देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. (रोम. १:११) असे करण्यास वडिलांना कोणती गोष्ट साहाय्य करेल?

११ एखाद्याला मेंढपाळ भेट देण्याआधी वडिलाने सर्वप्रथम थोडा वेळ काढून त्या व्यक्‍तीविषयी विचार करणे आवश्‍यक आहे. ती व्यक्‍ती कोणत्या समस्यांचा सामना करत आहे? कोणत्या गोष्टींमुळे तिला प्रोत्साहन मिळू शकते? त्या व्यक्‍तीच्या परिस्थितीला कोणते वचन लागू होईल किंवा बायबलमधील कोणत्या व्यक्‍तीची परिस्थिती तिच्या परिस्थितीशी मिळतीजुळती आहे? ख्रिस्ती वडिलाने अशा प्रकारे आधीच मनन केल्यास, इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्याऐवजी अर्थपूर्ण संवाद साधणे शक्य होईल. मेंढपाळ भेटींच्या वेळी वडील आपल्या बंधुभगिनींना बोलण्याची संधी देतो आणि त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकून घेतो. (याको. १:१९) एका बहिणीने असे म्हटले: “वडील जेव्हा आपलं बोलणं लक्षपूर्वक ऐकतात तेव्हा खूप दिलासा मिळतो.”—लूक ८:१८.

पूर्वतयारी केल्यामुळे एका वडिलाला मेंढपाळ भेटीच्या वेळी “आध्यात्मिक कृपादान” देण्यास साहाय्य मिळते

१२. मंडळीत कोणाला प्रोत्साहनाची गरज असते, आणि का?

१२ मेंढपाळ भेटींमुळे कोणाला फायदा होऊ शकतो? पौलाने त्याच्या सोबतीच्या ख्रिस्ती वडिलांना असा सल्ला दिला: “कळपात . . . सर्वांकडे लक्ष द्या.” खरोखर, मंडळीतील सर्वच सदस्यांना प्रोत्साहनाची गरज असते. यात त्या प्रचारकांचा व पायनियरांचाही समावेश होतो जे वर्षानुवर्षे विश्‍वासूपणे सेवाकार्य करत आहेत. त्यांना आध्यात्मिक मेंढपाळांच्या आधाराची गरज का आहे? कारण, असे आध्यात्मिक रीत्या मजबूत बंधुभगिनीदेखील सैतानाच्या या दुष्ट जगाकडून येणाऱ्‍या दबावांमुळे खचून जाऊ शकतात. देवाच्या सेवेत मजबूत असलेल्या या बांधवांनाही कधीकधी एखाद्या सोबत्याच्या मदतीची गरज का पडू शकते हे जाणून घेण्यासाठी, आपण दावीद राजाच्या जीवनात घडलेल्या एका प्रसंगाचा विचार करू या.

“अबीशय याने दाविदाचा बचाव केला”

१३. (क) इशबी-बनोब याने दाविदाच्या कोणत्या परिस्थितीचा फायदा घेऊ पाहिला? (ख) अबीशय दाविदाच्या मदतीस का येऊ शकला?

१३ तरुण दाविदाचा राजा म्हणून अभिषेक करण्यात आल्याच्या थोड्याच काळानंतर, त्याने गल्याथाचा सामना केला. गल्याथ हा धिप्पाड लोकांच्या रेफाई वंशाचा होता. धाडसी दाविदाने महाकाय गल्याथाचा वध केला. (१ शमु. १७:४, ४८-५१; १ इति. २०:५, ८) याच्या कितीतरी वर्षांनंतर, पलिष्ट्यांसोबतच्या एका युद्धात दाविदाचा सामना पुन्हा एकदा एका धिप्पाड माणसाशी झाला. त्याचे नाव इशबी-बनोब होते व तोदेखील रेफाई वंशाचा होता. (२ शमु. २१:१६) पण, या वेळी मात्र या धिप्पाड माणसाने दाविदाला जवळजवळ मारूनच टाकले होते. का? आता दाविदाजवळ धाडस नव्हते म्हणून नव्हे, तर तो दुर्बल झाला होता त्यामुळे असे घडले. अहवाल सांगतो: “त्या प्रसंगी दावीद थकून गेला.” दावीद शारीरिक रीत्या थकून गेला आहे हे पाहताच इशबी-बनोब याने “दाविदास मारावयाचा बेत केला.” पण, तो धिप्पाड माणूस आपल्या भाल्याने दाविदाला ठार मारणार तेवढ्यात “सरूवेचा पुत्र अबीशय याने दाविदाचा बचाव केला.” (२ शमु. २१:१५-१७) दावीद थोडक्यात बचावला! अबीशयचे दाविदाकडे लक्ष होते आणि त्याचा जीव धोक्यात आहे हे पाहताच तो त्याच्या मदतीस धावून आला याबद्दल दाविदाला किती कृतज्ञ वाटले असेल! या अहवालावरून आपण काय शिकू शकतो?

१४. (क) ‘गल्याथासारख्या’ समस्यांवर आपण कशा प्रकारे मात करू शकतो? (ख) आपली शक्‍ती व आनंद पुन्हा प्राप्त करण्यास मंडळीतील वडील कशा प्रकारे मदत करू शकतात? एक उदाहरण द्या.

१४ आज सैतान व त्याचे प्रतिनिधी आपल्या सेवाकार्यात अडथळे आणत असूनही, यहोवाचे लोक या नात्याने आपण जगभरात आपले सेवाकार्य पार पाडत आहोत. आपल्यापैकी काहींना अतिशय मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला आहे. पण, यहोवावर पूर्ण भरवसा ठेवल्यामुळे आपण ‘गल्याथासारख्या’ या मोठमोठ्या समस्यांचा सामना केला आहे व त्यांवर विजय मिळवला आहे. तरीसुद्धा, या जगातील दबावांचा सतत सामना करताना, कधीकधी आपण थकून जातो व निरुत्साहित होतो. सामान्य स्थितीत आपण या दबावांना यशस्वी रीत्या तोंड देऊ शकतो, पण अशा कमजोर स्थितीत आपण या दबावांना बळी पडण्याची शक्यता वाढते. अशा प्रसंगी, योग्य वेळी मिळालेल्या एखाद्या वडिलाच्या मदतीमुळे आपण आपला आनंद व बळ पुन्हा मिळवू शकतो. हा अनुभव अनेकांना आला आहे. उदाहरणार्थ, साठीत असलेल्या एका पायनियर बहिणीने असे सांगितले: “काही काळाआधी, मला बरं वाटत नव्हतं, आणि क्षेत्रसेवेमुळं मी थकून जायचे. मी किती लवकर थकून जातेय हे एका वडिलांच्या लक्षात आलं आणि ते माझ्याशी याविषयी बोलले. आम्ही बायबलमधून एका प्रोत्साहनदायक उताऱ्‍यावर चर्चा केली. त्यांनी दिलेल्या सूचना मी अंमलात आणल्या आणि याचा मला फायदा झाला.” बहिणीने पुढे म्हटले: “त्या प्रेमळ वडिलांनी माझ्या दुर्बलतेकडे लक्ष दिलं आणि माझी मदत केली हे किती बरं झालं!” खरेच, मंडळीतील प्रेमळ वडिलांचे आपल्याकडे लक्ष असते आणि प्राचीन काळातील अबीशयप्रमाणेच ते आपल्या मदतीला धावून येण्यास तयार असतात हे जाणून आपल्याला खूप दिलासा मिळतो.

“माझी जी विशेष प्रीती आहे ती तुम्हाला कळून यावी”

१५, १६. (क) पौलाचे सहविश्‍वासू बांधव त्याच्यावर जिवापाड प्रेम का करायचे? (ख) आपली काळजी वाहणाऱ्‍या वडिलांवर आपण प्रेम का करतो?

१५ मेंढपाळाचे काम सोपे नाही, त्यात कठोर परिश्रम गोवलेले आहेत. बांधवांच्या काळजीने व्याकूळ होऊन वडील त्यांच्याकरता प्रार्थना करण्यासाठी व त्यांना आध्यात्मिक आधार देण्यासाठी कधीकधी रात्र-रात्र झोपत नाहीत. (२ करिंथ. ११:२७, २८) तरीसुद्धा, पौलाप्रमाणे तेदेखील आपली जबाबदारी पूर्णपणे व आनंदाने पार पाडतात. पौलाने करिंथकरांना असे लिहिले: “मी तुमच्या जिवांसाठी फार आनंदाने खर्च करीन व मी स्वतः सर्वस्वी खर्ची पडेन.” (२ करिंथ. १२:१५) खरोखर, पौलाला त्याच्या बांधवांप्रती प्रेम असल्यामुळे त्याने त्यांना बळकट करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले. (२ करिंथकर २:४ वाचा; फिलिप्पै. २:१७; १ थेस्सलनी. २:८) ते बांधव पौलावर जिवापाड प्रेम करायचे याचे आपल्याला आश्‍चर्य वाटू नये!—प्रे. कृत्ये २०:३१-३८.

१६ आज आपणही देवाचे सेवक या नात्याने आपली काळजी वाहणाऱ्‍या ख्रिस्ती वडिलांवर प्रेम करतो आणि त्यांची तरतूद केल्याबद्दल आपल्या वैयक्‍तिक प्रार्थनांत यहोवाचे आभार मानतो. वडील आपल्यामध्ये वैयक्‍तिक आस्था घेण्याद्वारे आपल्या आनंदात भर घालतात. त्यांच्या मेंढपाळ भेटींमुळे आपल्याला स्फूर्ती मिळते. शिवाय, या जगाच्या दबावांचा सामना करण्यास आपण असमर्थ आहोत असे जेव्हा आपल्याला वाटते, तेव्हा ते आपल्या मदतीला धावून येण्यास तयार असतात याबद्दल आपण त्यांचे आभारी आहोत. असे सतर्क ख्रिस्ती वडील खरेच आपल्या “आनंदात साहाय्यकारी” आहेत.

^ त्या बंधुभगिनींना असेही विचारण्यात आले होते: “वडिलांमध्ये कोणता गुण असणे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे असे तुम्हाला वाटते?” त्यांच्यापैकी बहुतेक जणांनी म्हटले: “मनमिळाऊपणा.” या महत्त्वाच्या गुणाविषयी या नियतकालिकाच्या पुढील एका अंकात चर्चा केली जाईल.