व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाला “ओळखणारे हृदय” तुमच्याजवळ आहे का?

यहोवाला “ओळखणारे हृदय” तुमच्याजवळ आहे का?

“मी परमेश्‍वर आहे असे मला ओळखणारे हृदय मी त्यांस देईन; ते माझे लोक होतील.”—यिर्म. २४:७.

१, २. काही लोकांना अंजिरांविषयी जाणून घ्यायला का आवडेल?

 तुम्हाला ताजे किंवा सुकवलेले अंजीर खायला आवडतात का? पुष्कळ लोकांना आवडतात. म्हणूनच तर जगभरात अनेक ठिकाणी अंजिरांची लागवड केली जाते. प्राचीन यहुदी लोक अंजिरांना फार महत्त्व द्यायचे. (नहू. ३:१२; लूक १३:६-९) अंजिरांमध्ये तंतुमय घटक, अँटिऑक्सिडंट्‌स आणि खनिजे आढळतात; त्यामुळे काहींचे म्हणणे आहे, की अंजीर हृदयासाठी चांगले असतात.

यहोवाने एकदा अंजिरांचा संबंध हृदयाशी जोडला. येथे देव अंजीर खाण्याचे काय फायदे आहेत याचे वर्णन करत नव्हता. तो लाक्षणिक अर्थाने बोलत होता. त्याने यिर्मया संदेष्ट्याच्या द्वारे जे म्हटले त्याचा तुमच्या व तुमच्या प्रियजनांच्या हृदयाशी संबंध आहे. त्याने काय म्हटले याची चर्चा करत असताना, याचा ख्रिश्‍चनांना कसा फायदा होतो याविषयी विचार करा.

३. यिर्मयाच्या २४ व्या अध्यायात ज्या अंजिरांबद्दल सांगितले आहे ते कोणास सूचित करतात?

सर्वात आधी आपण यिर्मयाच्या दिवसांत देवाने अंजिरांविषयी काय म्हटले होते ते पाहू या. इ.स.पू. ६१७ मध्ये यहुदा राष्ट्राची आध्यात्मिक स्थिती फार वाईट होती. भविष्यात काय घडेल याविषयी देवाने यिर्मयाला एक दृष्टान्त दिला. त्यात त्याने दोन प्रकारचे अंजीर म्हणजे “फार चांगले अंजीर” आणि “फार वाईट अंजीर” यिर्मयाला दाखवले. (यिर्मया २४:१-३ वाचा.) वाईट अंजीर हे सिद्‌कीया राजा आणि त्याच्यासारख्या इतर जणांना सूचित करत होते ज्यांना नबुखद्‌नेस्सर राजाकरवी व त्याच्या सैन्याकरवी अतिशय क्रूर वागणूक दिली जाणार होती. पण, आधीपासूनच बॅबिलोनमध्ये असलेल्या यहेज्केल, दानीएल व त्याच्या तीन साथीदारांबद्दल आणि काही यहुदी ज्यांना लवकरच तेथे नेले जाणार होते त्यांच्याबद्दल काय म्हणता येईल? ते चांगल्या अंजिरांप्रमाणे होते. त्यांच्यापैकी काही शेषजन जेरूसलेम व त्यातील मंदिराची पुनर्बांधणी करण्यासाठी जेरूसलेमला परतणार होते, आणि कालांतराने तसेच घडले.—यिर्म. २४:८-१०; २५:११, १२; २९:१०.

४. देवाने चांगल्या अंजिरांबद्दल जे म्हटले त्यावरून आपल्याला कोणते प्रोत्साहन मिळते?

जे चांगल्या अंजिरांना सूचित करत होते त्यांच्याविषयी यहोवाने असे म्हटले: “मी परमेश्‍वर आहे असे मला ओळखणारे हृदय मी त्यांस देईन; ते माझे लोक होतील.” (यिर्म. २४:७) हे या लेखाचे मुख्य वचन आहे, आणि या वचनामुळे आपल्याला किती उत्तेजन मिळते! देव लोकांना, त्याला “ओळखणारे हृदय” देण्यास उत्सुक आहे. या संदर्भात “हृदय” हे एखाद्याच्या मनोवृत्तीला सूचित करते. तर मग, असे हृदय मिळवण्याची व देवाच्या लोकांपैकी एक होण्याची इच्छा तुम्ही नक्कीच बाळगत असाल. त्यासाठी देवाच्या वचनाचा अभ्यास करणे व शिकलेल्या गोष्टी जीवनात लागू करणे, पश्‍चात्ताप करून वाईट मार्गातून फिरणे, देवाला आपले जीवन समर्पित करणे आणि पिता, पुत्र व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेणे गरजेचे आहे. (मत्त. २८:१९, २०; प्रे. कृत्ये ३:१९) कदाचित तुम्ही ही पावले आधीच उचलली असतील, किंवा नियमितपणे यहोवाच्या साक्षीदारांसोबत संगती करण्याद्वारे, तुम्ही अलीकडेच ही पावले उचलण्यास सुरुवात केली असेल.

५. यिर्मयाने मुख्यतः कोणाच्या हृदयाविषयी लिहिले?

आपण यांपैकी काही किंवा सर्वच पावले उचलली असली, तरीसुद्धा आपण अजूनही आपल्या मनोवृत्तीकडे आणि आचरणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. असे का, हे यिर्मयाने हृदयाविषयी पुढे जे लिहिले त्यावरून तुमच्या लक्षात येईल. यिर्मयाच्या पुस्तकातील काही अध्याय यहुदाच्या आसपासच्या राष्ट्रांविषयी असले, तरी हे पुस्तक मुख्यतः पाच राजांच्या काळातील यहुदा राष्ट्राचे वर्णन करते. (यिर्म. १:१५, १६) त्याअर्थी, मुळात यिर्मयाने यहोवासोबत एक खास नातेसंबंध असलेले पुरुष, स्त्रिया आणि मुले यांच्याबद्दल लिहिले होते. त्यांच्या पूर्वजांनी स्वतःहून यहोवासोबत हा खास नातेसंबंध जोडला होता. (निर्ग. १९:३-८) आणि यिर्मयाच्या दिवसांत लोकांनी याला पुष्टी दिली, की ते देवाचे समर्पित लोक आहेत. त्यांनी म्हटले: “आम्ही तुजकडे वळतो, कारण तू परमेश्‍वर आमचा देव आहेस.” (यिर्म. ३:२२) पण, त्यांच्या हृदयाची स्थिती कशी होती?

हृदयाची लाक्षणिक शस्त्रक्रिया करणे गरजेचे?

६. देवाने हृदयाविषयी जे म्हटले ते जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक का असले पाहिजे?

आजच्या काळातील डॉक्टर अत्याधुनिक उपकरणांचा उपयोग करून एखाद्याच्या हृदयाची स्थिती कशी आहे आणि हृदय कशा प्रकारे कार्य करत आहे हे पाहू शकतात. पण, यहोवा कोणत्याही डॉक्टरपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे हृदयाची स्थिती पाहू शकतो, जसे त्याने यिर्मयाच्या दिवसांत केले होते. हृदयाची स्थिती पाहण्यास यहोवा जास्त पात्र आहे हे त्याने जे म्हटले होते त्यावरून आपल्याला समजते. त्याने म्हटले: “हृदय सर्वात कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो? प्रत्येकास ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्‍वर हृदय चाळून पाहतो.” (यिर्म. १७:९, १०) पण, “हृदय चाळून” पाहण्यासाठी आपल्या खरोखरच्या हृदयाचे वैद्यकीय परीक्षण करणे गरजेचे नाही, ज्याचे ७० किंवा ८० वर्षांच्या काळात जवळजवळ ३०० कोटी वेळा ठोके पडतात. यहोवा येथे लाक्षणिक हृदयाविषयी बोलत होता. येथे “हृदय” जे म्हटले आहे ते एका व्यक्‍तीच्या संपूर्ण आंतरिक व्यक्‍तिमत्त्वाला सूचित करते, ज्यात तिच्या इच्छा, विचार, भावना, मनोवृत्ती व ध्येये यांचा समावेश होतो. तुमच्याजवळही असे एक हृदय आहे. देव त्याचे परीक्षण करू शकतो, आणि काही प्रमाणात तुम्हीदेखील आपल्या हृदयाचे परीक्षण करू शकता.

७. यिर्मयाने त्याच्या दिवसांतील बहुतेक यहुद्यांच्या हृदयाच्या स्थितीचे वर्णन कशा प्रकारे केले?

या परीक्षणाच्या आधी आपण असे विचारू शकतो, ‘यिर्मयाच्या दिवसांतील बहुतेक यहुद्यांच्या लाक्षणिक हृदयाची स्थिती कशी होती?’ याचे उत्तर जाणून घेण्यासाठी, यिर्मयाने वापरलेल्या एका असाधारण वाक्यांशाकडे लक्ष द्या: “इस्राएलाचे सर्व घराणे हृदयाने बेसुनत आहे.” तो येथे यहुदी पुरुषांच्या सामान्य सुंतेविषयी बोलत नव्हता. कारण त्याने म्हटले: “परमेश्‍वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की सुंती, पण वास्तविक बेसुनत अशा सर्व लोकांना मी शासन करीन.” अशा प्रकारे, सुंता झालेले यहुदी पुरुषदेखील “हृदयाने बेसुनत” होते. (यिर्म. ९:२५, २६) याचा अर्थ काय होता?

८, ९. हृदयाच्या बाबतीत बहुतेक यहुद्यांनी काय करणे गरजेचे होते?

“हृदयाने बेसुनत” याचा अर्थ काय आहे हे देवाने यहुद्यांना जे करण्यास आर्जवले होते त्यावरून सूचित होते. त्याने म्हटले: “अहो यहुदातल्या मनुष्यांनो व यरुशलेमेतल्या राहणाऱ्‍यांनो . . . आपल्या हृदयांची अग्रत्वचा काढून टाका; नाहीतर तुमच्या कर्मांच्या दुष्टपणामुळे माझा क्रोध अग्नीसारखा निघून तो कोणाच्याने विझवणार नाही.” पण, त्यांच्या दुष्ट कृत्यांची सुरुवात कोठून झाली? त्यांच्या आतून, म्हणजे त्यांच्या हृदयातून. (मार्क ७:२०-२३ वाचा.) खरेच, यहुद्यांच्या दुष्ट कृत्यांचा स्रोत काय आहे याचे देवाने यिर्मयाद्वारे अगदी अचूकपणे निदान केले. त्यांचे हृदय हट्टी व बंडखोर बनले होते. त्यांचे हेतू व त्यांची विचारसरणी देवाला स्वीकृत नव्हती. (यिर्मया ५:२३, २४; ७:२४-२६ वाचा.) देवाने त्यांना असे सांगितले: “यहोवासाठी तुम्ही आपली सुंता करा व आपल्या हृदयांची अग्रत्वचा काढून टाका.”—यिर्म. ४:४, पं.र.भा.; १८:११, १२.

तेव्हा, मोशेच्या काळातील इस्राएल लोकांप्रमाणेच यिर्मयाच्या दिवसांतील यहुद्यांनाही त्यांच्या हृदयाची लाक्षणिक शस्त्रक्रिया—“हृदयाची सुंता” करणे गरजेचे होते. (अनु. १०:१६; ३०:६) “हृदयांची अग्रत्वचा काढून” टाकण्याचा अर्थ, त्या यहुद्यांनी देवाच्या विचारसरणीच्या विरोधात असलेले विचार, भावना, किंवा हेतू आपल्या हृदयातून काढून टाकायचे होते. कारण, अशा गोष्टींमुळे त्यांचे हृदय देवाच्या विचारसरणीला प्रतिसाद देत नव्हते.—प्रे. कृत्ये ७:५१.

आज देवाला “ओळखणारे हृदय”

१०. दाविदाप्रमाणे आपली कोणती इच्छा असली पाहिजे?

१० देव आपल्याला आपल्या लाक्षणिक हृदयाचे परीक्षण करण्यास सांगतो याबद्दल आपण किती कृतज्ञ असू शकतो! ‘पण, आज यहोवाच्या साक्षीदारांनी याबद्दल काळजी का केली पाहिजे?’ असा प्रश्‍न काहींना पडू शकतो. आज मंडळ्यांतील अनेक ख्रिस्ती वाईट मार्गांत चालत आहेत किंवा अनेक जण यिर्मयाच्या दिवसांतील वाईट अंजिरांसारखे बनत आहेत असे नाही. उलट, आज देवाचे सेवक त्याची एकनिष्ठपणे सेवा करणारे शुद्ध लोक आहेत. तरीसुद्धा, दाविदाने यहोवाला केलेल्या विनंतीचा विचार करा. त्याने म्हटले: “हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण; मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठायी दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पाहा.”—स्तो. १७:३; १३९:२३, २४.

११, १२. (क) आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःच्या हृदयाचे परीक्षण का केले पाहिजे? (ख) देव काय करणार नाही?

११ यहोवाची अशी इच्छा आहे, की आपल्यापैकी प्रत्येक जण त्याला स्वीकारयोग्य अशा स्थितीत असावे. यिर्मयाने नीतिमान व्यक्‍तीबद्दल म्हटले, की सेनाधीश परमेश्‍वर यहोवा “धार्मिकांचे सत्व” पाहतो, त्यांचे “अंतर्याम व हृदय” पारखतो. (यिर्म. २०:१२) सर्वशक्‍तिमान देव यहोवा नीतिमानांच्याही हृदयाचे परीक्षण करतो, तर आपण स्वतःचे प्रामाणिकपणे परीक्षण करू नये का? (स्तोत्र ११:५ वाचा.) असे करताना कदाचित आपल्याला दिसून येऊ शकते की आपल्यामध्ये अशी एखादी मनोवृत्ती, ध्येय, किंवा खोलवर रुजलेली भावना आहे ज्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. आपल्या हृदयाची संवेदनशीलता कमी करणारी एखादी गोष्ट, जणू हृदयाच्या अग्रत्वचेप्रमाणे आपल्यामध्ये आहे हे कदाचित आपल्या लक्षात येईल आणि ती आपण काढून टाकली पाहिजे याची आपल्याला जाणीव होईल. असे करणे हृदयाची लाक्षणिक शस्त्रक्रिया करण्यासारखे आहे. आपल्या लाक्षणिक हृदयाचे परीक्षण करणे हे चांगलेच आहे याच्याशी जर तुम्ही सहमत असाल, तर हृदयाचे परीक्षण करताना तुम्ही कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे? आणि काही सुधार करण्याची गरज असल्यास ते सुधार तुम्ही कसे करू शकता?—यिर्म. ४:४.

१२ एक गोष्ट मात्र नक्की: आवश्‍यक ते सुधार करण्यास यहोवाने आपल्याला बळजबरी करावी अशी अपेक्षा आपण करू नये. त्याने चांगल्या अंजिरांबद्दल म्हटले होते, की त्याला “ओळखणारे हृदय” तो त्यांना देईल. तो बळजबरीने त्यांचे हृदय परिवर्तन करेल असे त्याने म्हटले नाही. त्यांनी स्वतः एक संवेदनशील हृदय प्राप्त करण्याची इच्छा बाळगणे गरजेचे होते, ज्यातून दिसून येणार होते की देवाला ओळखण्याची त्यांची इच्छा आहे. आपणही तशीच इच्छा बाळगण्याची गरज नाही का?

हृदयाचे परीक्षण केल्याने आणि अनुचित इच्छा मनातून काढून टाकल्याने आपल्याला अनेक आशीर्वाद मिळतील

१३, १४. एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीचे हृदय तिला हानी पोचवू शकते ते कोणत्या अर्थाने?

१३ येशूने म्हटले: “अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्‍या, खोट्या साक्षी, शिव्यागाळी ही निघतात.” (मत्त. १५:१९) यावरून स्पष्टच आहे, की एखाद्या बांधवाच्या असंवेदनशील हृदयाने त्याला व्यभिचार करण्यास किंवा विवाहबाह्‍य लैंगिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केले असेल आणि त्याबद्दल त्याने पश्‍चात्ताप केला नसेल, तर तो देवाची स्वीकृती कायमची गमावू शकतो. पण, एखाद्या व्यक्‍तीने असे चुकीचे कृत्य केले नसले, तरी ती आपल्या हृदयात अशी अयोग्य इच्छा वाढीस लावण्याची शक्यता आहे. (मत्तय ५:२७, २८ वाचा.) अशा वेळी, आपल्या हृदयाचे परीक्षण केल्यास आपल्याला मदत होऊ शकते. तुम्ही स्वतःच्या हृदयाचे परीक्षण केल्यास, तुमच्या हृदयात विरुद्धलिंगी व्यक्‍तीबद्दल अनुचित भावना किंवा गुप्त इच्छा आढळतील का? देव अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकत नाही आणि त्यामुळे त्या हृदयातून काढून टाकणे गरजेचे आहे.

१४ किंवा एखाद्या बांधवाने खरोखर “खून” केला नसेल, पण तो आपल्या सहविश्‍वासू बांधवाविरुद्ध हृदयात इतका राग बाळगेल की तो कदाचित त्याचा द्वेष करेल. (लेवी. १९:१७) ज्या भावनांमुळे त्याचे हृदय कठोर बनू शकते अशा भावना हृदयातून काढून टाकण्यासाठी तो प्रयत्न करेल का?—मत्त. ५:२१, २२.

१५, १६. (क) एक ख्रिस्ती कशा प्रकारे “हृदयाने बेसुनत” असू शकतो याचे एक उदाहरण द्या. (ख) “बेसुनत” हृदयामुळे यहोवाला आनंद होत नाही असे तुम्हाला का वाटते?

१५ आनंदाची गोष्ट म्हणजे बहुतेक ख्रिश्‍चनांना ‘हृदयाचा असा त्रास’ नाही. तरीसुद्धा, येशूने म्हटले की हृदयातून “वाईट विचार” निघतात. ही अशी मते किंवा प्रवृत्ती आहेत ज्यांचा जीवनातील अनेक पैलूंवर वाईट परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, नातेवाइकांप्रती एकनिष्ठ राहणे म्हणजे काय याचा एक व्यक्‍ती चुकीचा अर्थ लावू शकते. अर्थात, ख्रिस्ती आपल्या नातेवाइकांप्रती ममता किंवा आपुलकी दाखवू इच्छितात. ते अशा अनेकांप्रमाणे होऊ इच्छित नाहीत ज्यांना या “शेवटल्या काळी” इतरांबद्दल आपुलकी वाटत नाही. (२ तीम. ३:१, ३) पण, आपुलकी दाखवण्याच्या बाबतीत टोकाची भूमिका घेतली जाण्याची देखील शक्यता असते. अनेकांना वाटते की ‘रक्‍ताचे नाते हे घट्ट असते.’ त्यामुळे ते कोणत्याही परिस्थितीत आपल्या नातेवाइकांचा पक्ष घेतात किंवा त्यांचे समर्थन करतात आणि एखाद्या नातेवाइकाचे मन दुखावले गेल्यास, ते स्वतःच्या मनाला लावून घेतात. अशा प्रकारच्या तीव्र भावनांमुळे दीनाच्या भावांनी काय केले याचा विचार करा. (उत्प. ३४:१३, २५-३०) आणि अबशालोमाच्या हृदयात काय होते याची जरा कल्पना करा, ज्यामुळे तो आपला सावत्र भाऊ अम्नोन याचा वध करण्यास प्रवृत्त झाला. (२ शमु. १३:१-३०) अशा कृत्यांमागे “वाईट विचार” होते हे या घटनांवरून दिसून येत नाही का?

१६ साहजिकच, खरे ख्रिस्ती कोणाचा खून करणार नाहीत. पण, हृदयात तीव्र राग बाळगण्याविषयी काय? त्यांच्या नातेवाइकाशी एखादा बंधू किंवा बहीण वाईटपणे वागल्यास; किंवा अशी वाईट वागणूक देण्यात आली आहे असा ते विचार करत असल्यास, ते त्या बंधुभगिनीविरुद्ध हृदयात असा तीव्र राग बाळगण्याची शक्यता आहे का? अमुक बंधुभगिनीने आपल्या नातेवाइकाला वाईट वागणूक दिली असे त्यांना वाटून ते कदाचित त्या बंधुभगिनीकडून आतिथ्याचा स्वीकार करणार नाहीत किंवा ते कदाचित त्याला किंवा तिला कधीच आतिथ्य दाखवणार नाहीत. (इब्री १३:१, २) अशा तीव्र नकारात्मक भावना आणि आतिथ्य दाखवण्याची अनिच्छा यांतून प्रेमाचा अभाव दिसून येतो आणि या गोष्टी क्षुल्लक समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ही अवस्था “बेसुनत” हृदयामुळे आहे असे निदान हृदयांचे परीक्षण करणारा देव करू शकतो. (यिर्म. ९:२५, २६) यहोवाने ज्या लोकांना “आपल्या हृदयांची अग्रत्वचा काढून टाका,” असे म्हटले होते त्यांची आठवण करा.—यिर्म. ४:४.

देवाला “ओळखणारे हृदय” उत्पन्‍न करा आणि टिकवून ठेवा

१७. यहोवाची भीती बाळगल्यास जास्त संवेदनशील हृदय उत्पन्‍न करण्यास कशा प्रकारे आपल्याला मदत मिळेल?

१७ तुमच्या लाक्षणिक हृदयाचे परीक्षण केल्यावर, ते यहोवाच्या सल्ल्याप्रती जितके संवेदनशील असायला हवे तितके नाही आणि काही प्रमाणात ते “बेसुनत” आहे असे तुम्हाला आढळल्यास काय? तुमच्या हृदयात मनुष्याचे भय आहे; प्रतिष्ठा किंवा सुखविलास मिळवण्याची इच्छा आहे; किंवा हट्टीपणाकडे वा स्वातंत्र्य मिळवण्याकडे त्याचा कल आहे हे कदाचित तुम्हाला आढळून आले असेल. अशा गोष्टी अनुभवणारे तुम्हीच सर्वात पहिले नाहीत. (यिर्म. ७:२४; ११:८) यिर्मयाने लिहिले की त्याच्या दिवसांतील अविश्‍वासू यहुद्यांचे “हृदय हट्टी व फितुरी” होते. त्याने पुढे म्हटले: “जो परमेश्‍वर आमचा देव आम्हास पाऊस देतो, योग्य समयी आगोठीचा व वळवाचा पाऊस वर्षितो, . . . त्याचे भय आम्ही धरू, असे ते आपल्या मनात म्हणत नाहीत.” (यिर्म. ५:२३, २४) यावरून हे सूचित होत नाही का, की ‘हृदयाची अग्रत्वचा’ काढून टाकण्यासाठी यहोवाचे भय धरणे आणि त्याच्याबद्दल कृतज्ञ मनोवृत्ती बाळगणे आवश्‍यक आहे? अशा सुदृढ भीतीमुळे आपल्यापैकी प्रत्येकाला, देवाचा सल्ला स्वीकारणारे संवेदनशील हृदय उत्पन्‍न करण्यास मदत मिळेल.

१८. नव्या करारात असलेल्यांना यहोवाने कोणते अभिवचन दिले?

१८ यहोवा आपल्याला त्याला “ओळखणारे हृदय” देतो तेव्हा आपण त्याच्याशी सहकार्य करू शकतो. खरेतर, यहोवाने अभिषिक्‍त जनांना त्याला ओळखणारे हृदय देण्याचे अभिवचन दिले आहे: “मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन; मी ते त्यांच्या हृदयपटलावर लिहीन; मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील.” आणि त्याला खरोखर ओळखण्याविषयी काय? त्याने पुढे म्हटले: “यापुढे कोणी आपल्या शेजाऱ्‍यास, कोणी आपल्या बंधूस, परमेश्‍वराला ओळखा, असा बोध करणार नाहीत; कारण लहानापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील; मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही.”—यिर्म. ३१:३१-३४. *

१९. खऱ्‍या ख्रिश्‍चनांना कोणती अद्‌भुत आशा आहे?

१९ तुम्ही स्वर्गात या नव्या करारापासून सार्वकालिक फायदे प्राप्त करण्याची आशा बाळगत असा किंवा पृथ्वीवर, यहोवाला जाणून घेण्याची आणि त्याच्या लोकांपैकी असण्याची तुमची इच्छा असली पाहिजे. असे फायदे प्राप्त करून घ्यायचे असतील, तर ख्रिस्ताच्या खंडणीच्या आधारावर तुमच्या पापांची क्षमा होणे आवश्‍यक आहे. तुमच्या पापांची क्षमा होऊ शकते या जाणिवेमुळे तुम्हाला इतरांना क्षमा करण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे. इतकेच काय, तर तुम्ही अशा लोकांच्या पापांचीदेखील क्षमा केली पाहिजे ज्यांच्याबद्दल तुम्ही आपल्या मनात राग बाळगत आहात. तुमच्या हृदयात जर वाईट विचार असतील, तर ते हृदयातून काढून टाकण्याची तयारी तुम्ही दाखवल्यास हे तुमच्या हृदयासाठी चांगले आहे. यावरून, यहोवाची सेवा करण्याची तुमची इच्छा आहे हेच नव्हे, तर त्याला आणखी चांगल्या प्रकारे ओळखण्याची तुमची इच्छा आहे हेही दिसून येते. यहोवाने यिर्मयाद्वारे त्याच्या काळातील लोकांना जे म्हटले ते तुमच्या बाबतीतही खरे ठरेल: “तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जिवेभावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेन.”—यिर्म. २९:१३, १४.

^ नव्या कराराविषयी टेहळणी बुरूज, १ फेब्रुवारी १९९८ अंकातील पृष्ठे १३-१८ वरील “नव्या कराराकरवी मोठे आशीर्वाद” या लेखात चर्चा करण्यात आली आहे.