व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

स्वतःच्या व इतरांच्या लाभाकरता देवाच्या वचनाचा उपयोग करा

स्वतःच्या व इतरांच्या लाभाकरता देवाच्या वचनाचा उपयोग करा

“सर्व बाबींसंबंधाने तुझे सर्व विधी यथायोग्य आहेत असे मी मानितो.”—स्तो. ११९:१२८.

१. आपल्याला देवाच्या वचनावर पूर्ण भरवसा असणे का महत्त्वाचे आहे?

 बायबल अभ्यास करत असलेली एखादी व्यक्‍ती क्षेत्र सेवाकार्यात सहभाग घेण्यास पात्र आहे किंवा नाही हे ठरवताना वडील स्वतःला हा प्रश्‍न विचारतात, ‘बायबल देवाचं वचन असल्याचं ही व्यक्‍ती मानते असं तिच्या बोलण्यावरून दिसून येतं का?’ * राज्य प्रचारक बनू इच्छिणाऱ्‍या व्यक्‍तीला, खरेतर देवाच्या सर्वच सेवकांना बायबल हे देवाचे वचन आहे याविषयी खातरी असणे अत्यावश्‍यक आहे. का बरे? कारण आपल्याला देवाच्या वचनावर पूर्ण भरवसा असेल आणि सेवाकार्यात त्याचा निपुणतेने वापर करता येत असेल, तरच इतरांना यहोवाला जाणून घेण्यासाठी व तारण मिळवण्यासाठी मदत करणे आपल्याला शक्य होईल.

२. आपण ज्या गोष्टी शिकलो त्यांस “धरून” राहणे इतके महत्त्वाचे का आहे?

देवाच्या वचनाच्या महत्त्वावर भर देत प्रेषित पौलाने तीमथ्याला असे लिहिले: “तू तर ज्या गोष्टी शिकलास व ज्यांविषयी तुझी खातरी झाली आहे त्या धरून राहा.” पौलाने “ज्या गोष्टी” असे जे म्हटले ते बायबलमधील सत्यांच्या संदर्भात होते. या सत्यांमुळे तीमथ्य सुवार्तेवर विश्‍वास ठेवण्यास प्रवृत्त झाला होता. आज आपल्यावरही या सत्यांचा असाच प्रभाव पडला आहे. आणि ही सत्ये आपल्याला “तारणासाठी ज्ञानी” राहण्यास साहाय्य करत आहेत. (२ तीम. ३:१४, १५) पौलाने पुढे जे म्हटले त्याचा उपयोग आपण सहसा, बायबल देवाचे वचन आहे हे इतरांना दाखवण्यासाठी करतो. पण त्या शब्दांतून, म्हणजेच २ तीमथ्य ३:१६ (वाचा.) यांतील शब्दांतून व्यक्‍तिशः आपल्याला आणखी एक फायदा होऊ शकतो. तर आता आपण या वचनाचे थोडे बारकाईने परीक्षण करू या. असे केल्यामुळे, यहोवाच्या सर्व शिकवणी “यथायोग्य” आहेत याविषयीचा आपला भरवसा आणखीनच दृढ होईल.—स्तो. ११९:१२८.

“सद्‌बोध . . . ह्‍याकरिता उपयोगी”

३-५. (क) पेन्टेकॉस्टच्या दिवशी पेत्राचे भाषण ऐकल्यावर लोकांच्या एका जमावाने काय केले, आणि का? (ख) थेस्सलनीका येथे अनेकांनी कशामुळे सत्य स्वीकारले? (ग) आज आपल्या सेवाकार्यात बरेच लोक कशामुळे प्रभावित होतात?

इस्राएल राष्ट्राला येशूने असे सांगितले: “मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी लोक आणि शिक्षक पाठवीत आहे.” (मत्त. २३:३४, ईझी-टू-रीड व्हर्शन) येशू या ठिकाणी आपल्या शिष्यांविषयी बोलत होता, ज्यांना त्याने सेवाकार्यात शास्त्रवचनांचा उपयोग करण्यास शिकवले होते. या शिक्षकांपैकी एक असलेल्या प्रेषित पेत्राने इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टला जेरूसलेममध्ये एका मोठ्या जमावाला उद्देशून भाषण दिले. त्या भाषणात त्याने इब्री शास्त्रवचनांतील कित्येक उताऱ्‍यांचा उल्लेख केला. पेत्राने शास्त्रवचनांचा अर्थ स्पष्ट करून सांगितला तेव्हा ऐकणाऱ्‍यांपैकी अनेकांच्या “अंतःकरणास चुटपुट लागली.” त्यांनी आपल्या पूर्वीच्या पापी आचरणाबद्दल पश्‍चात्ताप केला. त्यांपैकी सुमारे तीन हजार जणांनी देवाकडे क्षमेची याचना केली आणि ते ख्रिस्ती बनले.—प्रे. कृत्ये २:३७-४१.

आणखी एक शिक्षक होता प्रेषित पौल. त्याने जेरूसलेममध्येच नव्हे तर दूरदूरच्या अनेक भागांत सुवार्तेची घोषणा केली. उदाहरणार्थ, मासेदोनियातील थेस्सलनीका या शहरात तो यहुदी सभास्थानात उपासना करत असलेल्या काही लोकांशी बोलला. तीन शब्बाथांपर्यंत पौलाने “त्यांच्याबरोबर शास्त्रावरून वादविवाद केला. त्याने शास्त्राचा उलगडा करून असे प्रतिपादन केले की, ख्रिस्ताने दुःख सोसावे व मेलेल्यांमधून पुन्हा उठावे ह्‍याचे अगत्य होते.” याचा काय परिणाम झाला? “[यहुद्यांपैकी] काही जणांची खातरी होऊन” त्यांनी सुवार्तेचा स्वीकार केला. तसेच, “हेल्लेणी ह्‍यांचा मोठा समुदाय”देखील त्यांना येऊन मिळाला.—प्रे. कृत्ये १७:१-४.

देवाचे सेवक ज्या प्रकारे बायबलचा वापर करतात ते पाहून आज अनेक लोक प्रभावित होतात. उदाहरणार्थ, स्वित्झर्लंड येथे आपल्या एका बहिणीने घरमालकाला एक शास्त्रवचन वाचून दाखवले तेव्हा त्याने तिला विचारले: “तुम्ही कोणाकडून आला आहात?” तिने उत्तर दिले: “आम्ही यहोवाचे साक्षीदार आहोत.” त्याने म्हटले: “मी हे आधीच ओळखायला हवं होतं. कारण यहोवाच्या साक्षीदारांशिवाय आणखी कोण माझ्या घरी येऊन बायबल वाचेल?”

६, ७. (क) मंडळीत ज्यांच्यावर शिकवण्याची जबाबदारी आहे ते बायबलचा चांगल्या प्रकारे वापर कसा करू शकतात? (ख) बायबल अभ्यास चालवताना शास्त्रवचनांचा प्रभावी रीत्या वापर करणे इतके महत्त्वाचे का आहे?

लोकांना शिकवताना आपल्याला बायबलचा वापर आणखी चांगल्या प्रकारे कसा करता येईल? जर तुम्हाला स्टेजवरून मंडळीला शिकवण्याचा विशेषाधिकार मिळालेला असेल, तर शिकवताना बायबलमधील वचनांचा स्पष्टपणे उल्लेख करा. मुख्य शास्त्रवचनांचा नुसताच सारांश सांगण्याऐवजी किंवा कंप्युटर प्रिंटाउटमधून अथवा एखाद्या इलेक्ट्रॉनिक उपकरणातून वाचून दाखवण्याऐवजी, बायबल उघडून त्यातून वचने वाचा आणि श्रोत्यांनाही असेच करण्याचे प्रोत्साहन द्या. तसेच, वचने कशी लागू करावीत हे स्पष्ट करताना, श्रोत्यांना यहोवाच्या आणखी जवळ येण्यास मदत मिळेल हा तुमचा प्रयत्न असावा. तेव्हा, गुंतागुंतीची उदाहरणे व केवळ मनोरंजन करणारे अनुभव सांगण्याऐवजी, तोच वेळ देवाच्या वचनावर आणखी प्रकाश टाकण्यासाठी उपयोगात आणा.

बायबल अभ्यास चालवताना आपण कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत? ख्रिस्ती प्रकाशनांच्या साहाय्याने अभ्यास घेताना शास्त्रवचनांकडे दुर्लक्ष होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. विद्यार्थ्याला परिच्छेदात उल्लेखलेली वचने वाचण्याचे आपण प्रोत्साहन दिले पाहिजे आणि त्यांचा अर्थ समजून घेण्यास त्याला मदत केली पाहिजे. हे आपण कसे करू शकतो? अभ्यासादरम्यान प्रत्येक शास्त्रवचनाचा अर्थ समजावण्यासाठी आपण लांबलचक भाषण देऊ नये. त्याऐवजी, आपण विद्यार्थ्याला त्याचे विचार व्यक्‍त करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. काय मानावे किंवा कसे वागावे हे विद्यार्थ्याला सांगण्याऐवजी, आपण विचारपूर्वक निवडलेल्या प्रश्‍नांचा वापर करून त्याला योग्य निष्कर्षांवर पोचण्यास साहाय्य केले पाहिजे. *

“दोष दाखवणे . . . ह्‍याकरिता उपयोगी”

८. पौलाला स्वतःशीच कोणता संघर्ष करावा लागला?

“दोष दाखवणे” असे म्हणताच, हे ख्रिस्ती वडिलांचे काम आहे असा सहसा आपला दृष्टिकोन असतो. आणि खरोखरच मंडळीतील पर्यवेक्षकांवर, पाप करणाऱ्‍यांना त्यांचे दोष दाखवण्याची जबाबदारी आहे. (१ तीम. ५:२०; तीत १:१३) पण आपण स्वतःचे दोष ओळखणेही महत्त्वाचे आहे. पौल हा शुद्ध विवेकाने देवाची सेवा करणारा एक अनुकरणीय ख्रिस्ती होता. (२ तीम. १:३) तरीसुद्धा, त्याने लिहिले: “माझ्या अवयवांत मला निराळाच नियम दिसतो; तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवांतील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करितो.” या शब्दांच्या आधीच्या काही वचनांचे परीक्षण केल्यास, पौलाला त्याच्या पापपूर्ण प्रवृत्तींवर नियंत्रण मिळवण्याकरता कशा प्रकारे संघर्ष करावा लागला असेल हे आणखी चांगल्या प्रकारे समजून घेणे आपल्याला शक्य होईल.— रोमकर ७:२१-२५ वाचा.

९, १०. (क) पौलाला कदाचित त्याच्या कोणत्या अवगुणांवर मात करण्यासाठी संघर्ष करावा लागला असेल? (ख) पापपूर्ण प्रवृत्तींवर मात करण्यासाठी पौलाने काय केले असेल?

पौलाला कोणत्या अवगुणांवर मात करण्यासाठी संघर्ष करावा लागला? त्याने त्यांचा स्पष्टपणे उल्लेख केलेला नाही. तरीसुद्धा, पूर्वी आपण “हिंसक” होतो असे त्याने तीमथ्याला लिहिले होते. (१ तीम. १:१३, ईझी-टू-रीड व्हर्शन) पौलाचे परिवर्तन होण्याआधी त्याच्या मनात ख्रिश्‍चनांविरुद्ध अतिशय तीव्र क्रोध होता. ख्रिस्ताच्या अनुयायांप्रती आपल्या भावनांबद्दल बोलताना, “त्यांच्यावर अतिशय पिसाळून जाऊन” त्यांचा छळ केल्याचे त्याने कबूलही केले. (प्रे. कृत्ये २६:११) पौलाने नंतर आपल्या क्रोधावर ताबा मिळवला असला, तरीही काही वेळा त्याला त्याच्या भावनांवर व शब्दांवर नियंत्रण करणे कदाचित कठीण गेले असेल. (प्रे. कृत्ये १५:३६-३९) तर मग, या अवगुणावर मात करण्यास कोणत्या गोष्टीने त्याला साहाय्य केले?

१० स्वतःचे दोष ओळखून त्यांवर मात करण्यासाठी पौलाने काय केले याविषयी करिंथ येथील ख्रिश्‍चनांना लिहिताना त्याने वर्णन केले. (१ करिंथकर ९:२६, २७ वाचा.) त्याने आपल्या अपरिपूर्ण मानवी स्वभावाशी लाक्षणिक अर्थाने मुष्टियुद्ध केले. नक्कीच, पौलाने मार्गदर्शक मुद्दे शोधण्यासाठी शास्त्रवचनांचा अभ्यास केला असेल; हे मुद्दे अमलात आणण्यासाठी यहोवाकडे मदतीची विनंती केली असेल आणि स्वतःमध्ये बदल करण्याचा कसोशीने प्रयत्न केला असेल. * पौलाच्या उदाहरणाचा आपल्यालाही फायदा होऊ शकतो, कारण त्याच्याप्रमाणे आपल्यालाही पापपूर्ण प्रवृत्तींशी संघर्ष करावा लागतो.

११. आपण सत्यात चालत आहोत याची खातरी करण्यासाठी कशा प्रकारे स्वतःची “परीक्षा” करत राहू शकतो?

११ उपासनेच्या बाबतीत आपण कधीही आत्मसंतुष्ट मनोवृत्ती बाळगू नये. त्याउलट, आपण सत्याच्या मार्गात खरोखरच चालत आहोत किंवा नाही याची खातरी करण्यासाठी आपण स्वतःची “परीक्षा” करत राहिली पाहिजे. (२ करिंथ. १३:५) कलस्सैकर ३:५-१० यांसारखी शास्त्रवचने वाचताना आपण स्वतःला विचारू शकतो: ‘माझ्या पापपूर्ण प्रवृत्तींना जिवे मारण्याचा मी खरोखरच प्रयत्न करत आहे का, की नैतिक रीत्या मी हळूहळू कमजोर बनत आहे? इंटरनेटचा वापर करताना अचानक एखादी अश्‍लील साइट स्क्रीनवर आल्यास मी ती लगेच बंद करतो का, की मी स्वतःहून अशा अश्‍लील वेबसाइट्‌सचा शोध घेतो?’ अशा प्रकारे अतिशय वैयक्‍तिक स्वरूपात देवाच्या वचनातील सल्ला लागू केल्यास आपल्याला “जागे व सावध” राहणे शक्य होईल.—१ थेस्सलनी. ५:६-८.

“सुधारणूक . . . ह्‍याकरिता उपयोगी”

१२, १३. (क) “सुधारणूक” करताना आपले ध्येय काय असले पाहिजे आणि याबाबतीत आपण येशूच्या उदाहरणाचे कशा प्रकारे अनुकरण करू शकतो? (ख) इतरांची “सुधारणूक” करताना कशा प्रकारे बोलण्याचे आपण टाळले पाहिजे?

१२ “सुधारणूक” असे भाषांतर केलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ, “व्यवस्थित करणे, दुरुस्त करणे, बिघडलेली गोष्ट पुन्हा नीट किंवा योग्य करणे” असा होतो. कधीकधी, आपल्या बोलण्यामुळे किंवा वागण्यामुळे एखाद्या व्यक्‍तीला गैरसमज होतो, तेव्हा आपल्याला असे पाऊल उचलावे लागते. उदाहरणार्थ, यहुदी धर्मपुढाऱ्‍यांनी अशी तक्रार केली की येशू “जकातदार व पापी लोक” यांच्याशी दयाळूपणे वागतो. तेव्हा येशूने उत्तर दिले, “निरोग्यांना वैद्याची गरज नाही तर दुखणाइतांना आहे. ‘मला दया पाहिजे, यज्ञ नको’ ह्‍याचा अर्थ काय, हे जाऊन शिका.” (मत्त. ९:११-१३) त्याने सहनशीलपणे व दयाळूपणे सर्वांना देवाच्या वचनांचा अर्थ समजावला. परिणामस्वरूप, नम्रजनांना यहोवा देवाची ओळख घडली आणि तो “दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर” आहे हे त्यांना कळले. (निर्ग. ३४:६) देवाच्या पुत्राने त्यांची “सुधारणूक” करण्यासाठी जे प्रयत्न केले, त्यांना प्रतिसाद देऊन अनेकांनी सुवार्तेवर विश्‍वास ठेवला.

१३ इतरांना कशा प्रकारे मदत करावी यासंबंधी येशूच्या उदाहरणावरून आपण धडा घेऊ शकतो. एखादी व्यक्‍ती कदाचित रागाच्या भरात दुसऱ्‍याची सुधारणूक करण्याचा प्रयत्न करेल. पण, २ तीमथ्य ३:१६ यात असे करण्याचे सुचवलेले नाही. देवाचे वचन आपल्याला इतरांची अपमानास्पद शब्दांत टीका करण्याचा अधिकार देत नाही. अशा प्रकारची टीका “तरवार भोसकावी” त्याप्रमाणे इतरांच्या मनावर घाव करू शकते आणि सहसा त्यामुळे कोणतेही चांगले परिणाम निघत नाहीत.—नीति. १२:१८.

१४-१६. (क) “सुधारणूक” करताना वडील कशा प्रकारे इतरांना त्यांच्या समस्यांवर मात करण्यास साहाय्य करू शकतात? (ख) मुलांचे संगोपन करताना बायबलच्या साहाय्याने “सुधारणूक” करणे इतके महत्त्वाचे का आहे?

१४ तर मग, आपण सहनशीलपणे व दयाळूपणे “सुधारणूक” कशी करू शकतो? समजा एखाद्या विवाहित जोडप्याने, त्यांच्यात सतत भांडणे होत असल्यामुळे एखाद्या वडिलाकडे मदत मागितली आहे. वडिलाने काय करावे? दोघांपैकी कोणाचीही बाजू न घेता, वडील त्यांच्यासोबत बायबलमधील तत्त्वांवर चर्चा करू शकतो. उदाहरणार्थ, कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य या पुस्तकातील ३ ऱ्‍या अध्यायातील तत्त्वांचा तो उपयोग करू शकतो. वडील त्या जोडप्यासोबत चर्चा करत असताना, आपण कोणत्या सल्ल्याचे आणखी चांगल्या प्रकारे पालन केले पाहिजे याची कदाचित पती व पत्नीला जाणीव होईल. काही काळाने, वडील त्यांच्या कुटुंबाचे कसे काय चालले आहे हे त्यांना विचारू शकतो आणि गरज असल्यास त्यांना आणखी मदत देऊ शकतो.

 १५ आईवडील आपल्या मुलांना आध्यात्मिक रीतीने दृढ करण्याच्या हेतूने त्यांची “सुधारणूक” कशी करू शकतात? तुमच्या किशोरवयीन मुलीने एका नवीन मुलीशी मैत्री केली आहे अशी कल्पना करा. पण या मुलीची चालचलणूक ठीक नाही असे तुम्हाला वाटते. सर्वप्रथम, तुम्ही या मैत्रिणीबद्दल जास्त माहिती काढली पाहिजे. यानंतरही तुम्हाला काळजी वाटत असल्यास तुम्ही तुमच्या मुलीशी बोलू शकता. तरुण लोकांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे या प्रकाशनातील मुद्द्‌यांचा तुम्ही वापर करू शकता. पुढील काही दिवसांत तुम्ही आपल्या मुलीसोबत जास्तीतजास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करू शकता. तसेच, क्षेत्र सेवेत असताना व कुटुंबासोबत करमणूक करताना तिच्या मनोवृत्तीचे तुम्ही निरीक्षण करू शकता. तुम्ही सहनशीलपणा व दयाळूपणा दाखवल्यास तुमच्या मुलीला याची जाणीव होईल की तुमचे तिच्यावर खरोखर प्रेम आहे आणि तुम्हाला तिची काळजी आहे. यामुळे तुम्ही दिलेल्या सल्ल्याचे पालन करण्याची तिला प्रेरणा मिळेल आणि स्वतःवर संकट ओढवण्यापासून तिचे संरक्षण होईल.

आपल्या मुलांची “सुधारणूक” करताना प्रेमळपणे बायबलचा उपयोग करण्याद्वारे आईवडील बऱ्‍याच दुःखद परिणामांपासून त्यांचे रक्षण करू शकतात ( १५ वा परिच्छेद पाहा)

१६ त्याच प्रकारे, जे आरोग्याच्या समस्यांमुळे काळजीत आहेत, नोकरी गेल्यामुळे निराश आहेत किंवा बायबलच्या विशिष्ट शिकवणींमुळे गोंधळलेले आहेत त्यांनाही आपण सहनशीलपणे व दयाळूपणे साहाय्य करू शकतो. “सुधारणूक” करण्यासाठी देवाच्या वचनाचा वापर केल्यामुळे यहोवाच्या लोकांना अनेक फायदे मिळतात.

“नीतिशिक्षण . . . ह्‍याकरिता उपयोगी”

१७. आपल्याला दिले जाणारे ताडन आपण कृतज्ञतेने का स्वीकारले पाहिजे?

१७ “कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते.” तरीसुद्धा, “ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्त्व व शांतिकारक फळ देते.” (इब्री १२:११) बहुतेक ख्रिस्ती हे कबूल करतात की सत्यात असलेल्या आईवडिलांकडून मिळालेल्या शिक्षणामुळे प्रौढपणी त्यांना फायदा झाला आहे. आणि जेव्हा आपण ख्रिस्ती वडिलांच्या माध्यमाने मिळणारे यहोवाकडील नीतिशिक्षण स्वीकारतो, तेव्हा आपल्याला जीवनाच्या मार्गावर टिकून राहण्यास मदत मिळते.—नीति. ४:१३.

१८, १९. (क) नीतिसूत्रे १८:१३ यातील सल्ला “नीतिशिक्षण” देण्याकरता इतका महत्त्वाचा का आहे? (ख) पातक केलेल्या व्यक्‍तीशी व्यवहार करताना वडील सौम्यतेने व प्रेमाने वागतात तेव्हा सहसा कोणता परिणाम घडून येतो?

१८ प्रभावीपणे ताडन करण्याकरता किंवा शिक्षण देण्याकरता कौशल्याची गरज आहे. यहोवाने ख्रिश्‍चनांना “नीतिशिक्षण” देण्यास सांगितले. (२ तीम. ३:१६) म्हणूनच, आपण बायबलमधील मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून शिक्षण दिले पाहिजे. अशा प्रकारचे एक तत्त्व नीतिसूत्रे १८:१३ यात सापडते: “ऐकून घेण्यापूर्वी जो उत्तर देतो त्याचे ते करणे मूर्खपणाचे व लज्जास्पद ठरते.” उदाहरणार्थ, गंभीर पातक केल्याचा आरोप असलेल्या व्यक्‍तीशी वडिलांना बोलावे लागते, तेव्हा या वचनात सांगितल्यानुसार त्यांनी खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी सर्व संबंधित बाबींचे कसून परीक्षण केले पाहिजे. (अनु. १३:१४) तेव्हाच ते “नीतिशिक्षण” देऊ शकतील.

१९ शिवाय, देवाचे वचन ख्रिस्ती वडिलांना “सौम्यतेने” इतरांचे ताडन करण्यास सांगते. (२ तीमथ्य २:२४-२६ वाचा.) हे खरे आहे की गंभीर पातक केलेल्या व्यक्‍तीने कदाचित यहोवाच्या नावाला कलंक लावला असेल, तसेच निर्दोष लोकांचे नुकसानही केले असेल. तरीसुद्धा, अशा एखाद्या व्यक्‍तीचे ताडन करताना वडील तिच्याशी रागाने बोलल्यास ते त्या व्यक्‍तीला मदत करू शकणार नाहीत. पण, वडील जेव्हा देवाच्या ममतेचे अनुकरण करतात तेव्हा ते चुकलेल्या व्यक्‍तीला पश्‍चात्ताप करण्यास प्रवृत्त करू शकतात.—रोम. २:४.

२०. मुलांना वळण लावताना आईवडिलांनी कोणत्या तत्त्वांचे पालन केले पाहिजे?

२० “प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात” आपल्या मुलांचे संगोपन करताना आईवडिलांनी बायबलमधील तत्त्वांचे पालन केले पाहिजे. (इफिस. ६:४) आपल्या मुलाने गैरवर्तणूक केल्याचे एखाद्या पित्याच्या कानावर येते, तेव्हा त्याने केवळ एकच बाजू ऐकून मुलाला शिक्षा करण्याचे टाळले पाहिजे. आणि रागाच्या भरात मारहाण करणे यासारखा प्रकार ख्रिस्ती कुटुंबात कधीच घडू नये. यहोवा “फार कनवाळू व दयाळू आहे” आणि लहान मुलांना वळण लावण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनीही याच प्रेमळ गुणांचे अनुकरण केले पाहिजे.—याको. ५:११.

यहोवाने आपल्याला दिलेली अनमोल देणगी

२१, २२. स्तोत्र ११९:९७-१०४ यांतील कोणत्या शब्दांतून यहोवाच्या वचनाप्रती तुमच्या वैयक्‍तिक भावना सर्वात अचूक रीत्या व्यक्‍त होतात?

२१ एका देवभीरू मनुष्याने त्याला यहोवाचे नियमशास्त्र प्रिय का वाटते याविषयी एकदा आपल्या भावना व्यक्‍त केल्या. (स्तोत्र ११९:९७-१०४ वाचा.) शास्त्रवचनांचा अभ्यास केल्यामुळे या स्तोत्रकर्त्याला सुज्ञता, समंजसपणा व समजबुद्धी प्राप्त झाली. त्यातील मार्गदर्शनाप्रमाणे चालल्यामुळे त्याला असे चुकीचे मार्ग टाळता आले ज्यांवर चालून इतर अनेकांना दुःखद परिणाम भोगावे लागले होते. या स्तोत्रकर्त्याला शास्त्रवचनांचा अभ्यास केल्यामुळे आनंद व समाधान मिळाले आणि त्यांचे पालन केल्याने त्याला जीवनात अनेक फायदे मिळाले. त्यामुळे त्याने जीवनभर देवाच्या आज्ञांचे पालन करण्याचा निर्धार केला.

२२ तुम्हालाही “प्रत्येक शास्त्रलेख” अर्थात देवाचे वचन मौल्यवान वाटते का? देव त्याचा उद्देश अवश्‍य पूर्ण करेल यावरचा तुमचा विश्‍वास देवाच्या वचनाच्या साहाय्याने तुम्ही दृढ करू शकता. त्यातील देवप्रेरित मार्गदर्शनामुळे पापी आचरणाचे भयानक दुष्परिणाम टाळणे तुम्हाला शक्य होईल. आणि इतरांना ते निपुणतेने समजावून सांगण्याद्वारे तुम्ही त्यांनादेखील जीवनाच्या मार्गावर चालण्यास व त्यावर टिकून राहण्यास साहाय्य करू शकाल. तेव्हा, सर्वात बुद्धिमान व प्रेमळ देव यहोवा याची सेवा करत असताना आपण त्याच्या प्रेरित शास्त्रवचनांचा पुरेपूर उपयोग करू या.

^ यहोवा की इच्छा पूरी करने के लिए संगठित, पृष्ठ ७९ पाहा.

^ लोकांना शिकवताना येशू अनेकदा, “तुम्हाला काय वाटते?” असे त्यांना विचारायचा. मग तो त्यांच्या उत्तरासाठी थांबायचा.—मत्त. १८:१२; २१:२८; २२:४२.

^ पापपूर्ण प्रवृत्तींवर मात करण्यासंबंधी पौलाच्या पत्रांमध्ये बरेच प्रोत्साहन देण्यात आले आहे. (रोम. ६:१२; गलती. ५:१६-१८) पौलाने इतरांना जो सल्ला दिला त्याचे पालन त्याने स्वतः नक्कीच केले असेल असा निष्कर्ष काढणे रास्त आहे.—रोम. २:२१.