व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अधिक महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या

अधिक महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या

“जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे.”—फिलिप्पै. १:१०.

१, २. येशूचे शिष्य शेवटल्या दिवसांविषयीच्या कोणत्या भविष्यवाणीविषयी जाणून घेण्यास उत्सुक होते, आणि का?

 पेत्र, याकोब, योहान आणि अंद्रिया आपल्या प्रभूसोबत एकांतात आहेत. येशूने नुकतेच मंदिराच्या नाशाविषयी जे म्हटले होते त्याविषयीचे विचार अजूनही त्यांच्या मनात घोळत आहेत. (मार्क १३:१- ४) म्हणून, ते येशूला असे विचारतात: “ह्‍या गोष्टी केव्हा होतील, आणि आपल्या येण्याचे व ह्‍या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय, हे आम्हास सांगा.” (मत्त. २४:१-३) येशूने त्यांना अशा घटनांविषयी किंवा परिस्थितींविषयी सांगण्यास सुरुवात केली, ज्यांमुळे जगात मोठे बदल घडणार होते. शिवाय, या घटनांमुळे सैतानाच्या दुष्ट जगाच्या शेवटल्या दिवसांची ओळख पटणार होती. यांपैकी एका विशिष्ट घटनेविषयी जाणून घेण्यास येशूच्या शिष्यांना नक्कीच उत्सुकता असावी. युद्धे, अन्‍नटंचाई आणि दिवसेंदिवस वाढत जाणारी अराजकता यांसारख्या दुःखद गोष्टींविषयी सांगितल्यानंतर, येशूने शेवटल्या दिवसांत घडणाऱ्‍या एका चांगल्या घटनेविषयीही सांगितले. त्याने म्हटले: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.”—मत्त. २४:७-१४.

येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी त्याच्यासोबत मिळून राज्याच्या सुवार्तेचा आनंदाने प्रचार केला होता. (लूक ८:१; ९:१, २) त्यांना कदाचित त्याने म्हटलेली ही गोष्ट आठवली असावी: “पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत; म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावे म्हणून त्याची प्रार्थना करा.” (लूक १०:२) पण, त्यांना “सर्व जगात” प्रचार करणे आणि “सर्व राष्ट्रांस” साक्ष देणे कसे शक्य होणार होते? यासाठी कामकरी कोठून येणार होते? त्या दिवशी येशूसोबत बसलेले असताना त्यांना भविष्यात घडणाऱ्‍या गोष्टी पाहता आल्या असत्या तर! मत्तय २४:१४ मध्ये नमूद असलेल्या या शब्दांची पूर्तता होताना पाहून ते नक्कीच थक्क झाले असते.

३. लूक २१:३४ मध्ये असलेल्या भविष्यवाणीची पूर्तता आज कशी होत आहे, आणि आपण कोणते आत्मपरीक्षण केले पाहिजे?

आज आपण येशूच्या भविष्यवाणीची पूर्तता होत असलेल्या काळात जगत आहोत. सबंध जगात राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याच्या कार्यात लाखो लोक सहभागी झाले आहेत. (यश. ६०:२२) पण, येशूने सूचित केले होते की शेवटल्या दिवसांत काहींना या कार्यावर लक्ष केंद्रित करणे आव्हानात्मक वाटेल. हे लोक आपल्या कामांमध्ये व्यस्त असतील आणि “भारावून” जातील. (लूक २१:३४ वाचा.) आज आपण या शब्दांचीही पूर्तता होताना पाहत आहोत. देवाच्या लोकांपैकी काहींचे लक्ष विचलित होत आहे. नोकरी, उच्च शिक्षण आणि धनसंपत्ती गोळा करण्याच्या बाबतीत ते घेत असलेल्या निर्णयांवरून, तसेच खेळ खेळण्यात व करमणूक करण्यात ते जितका वेळ घालवतात त्याच्यावरून हे दिसून येते. इतर जण दबावांमुळे आणि दैनंदिन जीवनातील चिंतांमुळे देवाच्या सेवेत मंदावले आहेत. तेव्हा, स्वतःला विचारा: ‘माझ्याबद्दल काय? माझ्या निर्णयांवरून मी देवाच्या सेवेला पहिल्या स्थानी ठेवतो हे दिसून येते का?’

४. (क) पौलाने फिलिप्पै येथील ख्रिश्‍चनांसाठी कोणती प्रार्थना केली, आणि का? (ख) या आणि पुढील लेखात आपण कशाचे परीक्षण करणार आहोत, आणि कोणत्या हेतूने?

पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना आध्यात्मिक गोष्टींना जीवनात प्राधान्य देण्यासाठी परिश्रम करावे लागले होते. म्हणूनच, प्रेषित पौलाने फिलिप्पै मधील ख्रिश्‍चनांनी “जे श्रेष्ठ ते . . . पसंत करावे,” म्हणजे जे अधिक महत्त्वाचे आहे त्याला प्राधान्य द्यावे अशी प्रार्थना केली. (फिलिप्पैकर १:९-११ वाचा.) प्रेषित पौलाप्रमाणेच, त्या काळच्या अनेक ख्रिश्‍चनांनी “देवाचे वचन निर्भयपणे सांगावयास अधिक धाडस केले.” (फिलिप्पै. १:१२-१४) त्याच प्रकारे, आजही बरेच ख्रिस्ती मोठ्या धैर्याने देवाच्या वचनाचा प्रचार करतात. तरीसुद्धा, आज यहोवाची संघटना काय साध्य करत आहे याचे परीक्षण केल्याने, आज अधिक महत्त्वाचे असलेले प्रचार कार्य जास्त आवेशाने करण्यास आपल्याला साहाय्य मिळेल का? नक्कीच! या लेखात आपण, मत्तय २४:१४ मध्ये असलेल्या भविष्यवाणीची पूर्तता घडवून आणण्यासाठी यहोवाने केलेल्या तरतुदीचे परीक्षण करू या. यहोवाची संघटना काय करत आहे, आणि त्याविषयी जाणून घेतल्याने आपल्याला व आपल्या कुटुंबांना कशा प्रकारे प्रेरणा मिळेल? धीराने प्रचार कार्य करण्यास आणि यहोवाच्या संघटनेच्या बरोबरीने चालत राहण्यास आपल्याला काय मदत करेल हे आपण पुढील लेखात पाहणार आहोत.

यहोवाच्या संघटनेचा स्वर्गीय भाग पुढे वाटचाल करत आहे

५, ६. (क) यहोवाने त्याच्या संघटनेच्या स्वर्गीय भागाचे दृष्टान्त का दाखवले? (ख) यहेज्केलाने दृष्टान्तात काय पाहिले?

यहोवाने त्याच्या लिखित वचनात कितीतरी गोष्टींविषयीची माहिती समाविष्ट केलेली नाही. उदाहरणार्थ, मेंदूच्या किंवा या विश्‍वाच्या कार्याविषयीची माहिती जरी आपल्याकरता अतिशय रोचक ठरली असती, तरी त्याने ही माहिती बायबलमध्ये दिली नाही. त्याऐवजी, यहोवाने आपल्याला तीच माहिती पुरवली जी त्याच्या उद्देशांविषयी समजून घेण्यास आणि त्यांनुसार जीवन जगण्यास गरजेची आहे. (२ तीम. ३:१६, १७) हे लक्षात घेता, यहोवाने बायबलमध्ये त्याच्या संघटनेच्या अदृश्‍य भागाविषयीची माहिती समाविष्ट केली ही किती विलक्षण गोष्ट आहे! यशया, यहेज्केल आणि दानीएल यांनी लिहिलेले वृत्तान्त, तसेच योहानाने लिहिलेल्या प्रकटीकरणाचा वृत्तान्त यांत आपण यहोवाच्या संघटनेच्या स्वर्गातील भागाविषयी वाचतो तेव्हा आपण रोमांचित होतो. (यश. ६:१-४; यहे. १:४-१४, २२-२४; दानी. ७:९-१४; प्रकटी. ४:१-११) जणू यहोवाने पडदा वर उचलून स्वर्गात डोकावण्याची आपल्याला अनुमती दिली आहे असे वाटते. का पुरवली आहे त्याने ही माहिती?

आपण यहोवाच्या विश्‍वव्यापी संघटनेचा भाग आहोत हे आपण कधीही विसरू नये अशी त्याची इच्छा आहे. यहोवाच्या उद्देशांच्या पूर्ततेसाठी आज बरेच काही घडत आहे जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही. उदाहरणार्थ, यहेज्केल संदेष्ट्याने यहोवाच्या संघटनेला चित्रित करणारा एक विशाल रथ पाहिला. तो रथ अतिशय वेगाने पुढे जाऊ शकत होता आणि क्षणार्धात दिशा बदलू शकत होता. (यहे. १:१५-२१) चाकांच्या एका फेऱ्‍यात रथ बरेच मोठे अंतर कापू शकत होता. दृष्टान्तात, यहेज्केलाने रथाच्या स्वाराचीही एक झलक पाहिली. यहेज्केलाने असे म्हटले: “सर्वत्र तृणमण्याच्या तेजासारखा अग्नीचा भास मला झाला. . . . परमेश्‍वराच्या तेजाचे हे दर्शन होते.” (यहे. १:२५-२८) हा दृष्टान्त पाहून यहेज्केल किती विस्मित झाला असेल! यहोवाची संघटना कशी पूर्णपणे त्याच्या नियंत्रणात आहे आणि त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे तो कशा प्रकारे तिचे मार्गदर्शन करत आहे हे यहेज्केलाला पाहण्यास मिळाले. सातत्याने पुढे वाटचाल करत असलेल्या यहोवाच्या संघटनेच्या स्वर्गीय भागाचे किती अद्‌भुत चित्रण!

७. दानीएलाला दाखवण्यात आलेल्या दृष्टान्तामुळे कशा प्रकारे आपला विश्‍वास बळकट होतो?

दानीएलानेदेखील एक दृष्टान्त पाहिला ज्यामुळे आपला विश्‍वास बळकट होतो. त्याने “पुराणपुरुष” यहोवाला पाहिले, जो अग्निज्वालामय आसनावर आरूढ होता. त्याचे आसन चक्रांवर होते. (दानी. ७:९) यहोवाची संघटना पुढे वाटचाल करत आहे आणि त्याचा उद्देश पूर्ण करत आहे हे दानीएलाने पाहावे अशी त्याची इच्छा होती. तसेच, दानीएलाला “मानवपुत्रासारखा कोणी” दिसला. हा येशू होता आणि त्याला यहोवाच्या संघटनेच्या पृथ्वीवरील भागाची देखरेख करण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे दानीएलाने पाहिले. ख्रिस्ताचे परिपूर्ण शासन केवळ थोड्याच वर्षांसाठी नसेल. तर, “त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे; त्याचे राज्य अविनाशी आहे.” (दानी. ७:१३, १४) या माहितीमुळे आपण यहोवावर भरवसा ठेवण्यास व तो काय साध्य करत आहे याची जाणीव बाळगण्यास प्रवृत्त होतो. त्याने “प्रभुत्व, वैभव व राज्य” आपला पुत्र येशू यास दिले आहे, ज्याने सर्व प्रकारच्या परीक्षांना तोंड देऊन आपला विश्‍वासूपणा सिद्ध केला. यहोवाला त्याच्या पुत्रावर भरवसा आहे. त्यामुळे, आपणदेखील येशूच्या नेतृत्वावर भरवसा ठेवू शकतो.

८. यहोवाकडून मिळालेल्या दृष्टान्तांचा यहेज्केल आणि यशया यांच्यावर कसा प्रभाव पडला, आणि आपल्यावर कसा प्रभाव पडला पाहिजे?

यहोवाच्या संघटनेच्या स्वर्गीय भागाचे दर्शन घडवणाऱ्‍या या दृष्टान्तांचा आपल्यावर कसा प्रभाव पडला पाहिजे? यहोवा जे साध्य करत आहे ते पाहून यहेज्केलप्रमाणेच आपल्याही मनात यहोवाप्रती श्रद्धा व आदर दाटून येतो. (यहे. १:२८) यहोवाच्या संघटनेविषयी मनन केल्याने यशयाप्रमाणे आपल्यालाही यहोवाची अधिकाधिक सेवा करण्याची प्रेरणा मिळू शकते. यहोवा जे साध्य करत आहे त्याविषयी इतरांना सांगण्याची संधी यशयासमोर आली तेव्हा त्याने लगेच ती संधी स्वीकारली. (यशया ६:५,  वाचा.) यशयाला भरवसा होता की यहोवाच्या साहाय्याने तो कोणत्याही आव्हानावर यशस्वी रीत्या मात करू शकतो. यहोवाच्या संघटनेच्या अदृश्‍य भागाची झलक पाहून आपल्याही मनात यहोवाप्रती श्रद्धा निर्माण झाली पाहिजे आणि आपल्याला पावले उचलण्याची स्फूर्ती मिळाली पाहिजे. यहोवाची संघटना सातत्याने पुढे वाटचाल करत आहे आणि त्याच्या उद्देशांची पूर्तता करण्यावर संघटनेचे लक्ष केंद्रित आहे यावर मनन करणे नक्कीच प्रेरणादायक आहे.

यहोवाच्या संघटनेचा पृथ्वीवरील भाग

९, १०. यहोवाच्या संघटनेचा एक दृश्‍य भाग असणे का गरजेचे आहे?

यहोवाने आपल्या पुत्राच्या द्वारे या पृथ्वीवर एक व्यवस्था केली आहे, जी त्याच्या संघटनेच्या अदृश्‍य भागासोबत मिळून कार्य करते. मत्तय २४:१४ मध्ये वर्णन केलेले कार्य साध्य करण्यासाठी पृथ्वीवरील या दृश्‍य व्यवस्थेची गरज का आहे? याची तीन कारणे पाहू या.

१० पहिले, येशूने म्हटले होते की त्याचे शिष्य “पृथ्वीच्या शेवटापर्यंत,” म्हणजे पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यात प्रचार करतील. (प्रे. कृत्ये १:८) दुसरे, या कार्यात सहभाग घेणाऱ्‍यांना आध्यात्मिक अन्‍न पुरवण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी व्यवस्था करण्याची गरज असेल. (योहा. २१:१५-१७) तिसरे, सुवार्तेचा प्रचार करणाऱ्‍यांना यहोवाची उपासना करण्याकरता एकत्र जमण्यासाठी आणि प्रचार कसा करायचा ते शिकवण्यासाठी काही तरतुदी करण्याची गरज असेल. (इब्री १०:२४, २५) ही ध्येये आपोआप साध्य होणार नव्हती. या कार्यात यशस्वी होण्यासाठी ख्रिस्ताच्या अनुयायांनी ते सुसंघटित रीत्या करणे गरजेचे होते.

११. यहोवाच्या संघटनेने केलेल्या व्यवस्थांना आपला पाठिंबा आहे हे आपण कसे दाखवू शकतो?

११ यहोवाच्या संघटनेने केलेल्या व्यवस्थांना आपला पाठिंबा आहे हे आपण कसे दाखवू शकतो? असे करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे, प्रचार कार्यात आपले नेतृत्व करणाऱ्‍या बांधवांवर भरवसा ठेवणे. या बांधवांवर यहोवाचा आणि येशूचा भरवसा आहे, आणि त्यांच्यावर आपलाही भरवसा असला पाहिजे. हे बांधव जगातील समस्या सोडवण्यासाठी आपला वेळ व शक्‍ती खर्च करू शकले असते. पण, त्यांनी तसे केले नाही. यहोवाच्या दृश्‍य संघटनेने आपले लक्ष सातत्याने कशावर केंद्रित केले आहे ते आता आपण पाहू या.

अधिक महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित

१२, १३. ख्रिस्ती वडील त्यांच्यावर असलेली जबाबदारी कशा प्रकारे पार पाडतात, आणि त्यामुळे तुम्हाला प्रोत्साहन का मिळते?

१२ जगभरातील अनुभवी वडिलांना, ते ज्या देशात सेवा करतात तेथे राज्याच्या सुवार्तेच्या प्रचार कार्याची देखरेख करण्यासाठी आणि ते कार्य जलदगतीने पार पाडण्यासाठी नियुक्‍त करण्यात आले आहे. एखादा निर्णय घेताना हे बांधव देवाच्या वचनाला त्यांच्या पावलांकरता दिव्यासारखे व मार्गावरील प्राकाशासारखे माणून त्यातून मार्गदर्शन घेतात आणि यहोवाला कळकळीने प्रार्थना करतात.—स्तो. ११९:१०५; मत्त. ७:७, ८.

१३ पहिल्या शतकात प्रचार कार्याचे नेतृत्व करणाऱ्‍यांप्रमाणेच आज प्रचार कार्याची देखरेख करणारे ख्रिस्ती वडीलही “वचनाच्या” सेवेला प्राधान्य देतात. (प्रे. कृत्ये ६:४) स्थानिक मंडळ्यांत व जगभरात सुवार्तेच्या प्रचार कार्यात जी प्रगती होत आहे त्याविषयी त्यांना खूप आनंद होतो. (प्रे. कृत्ये २१:१९, २०) देवाच्या लोकांसाठी असंख्य नियम बनवण्याऐवजी, ते सुवार्तेचा प्रसार करण्यासाठी बायबलच्या व पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार जरूरी असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात. (प्रेषितांची कृत्ये १५:२८ वाचा.) असे करण्याद्वारे, नेतृत्व करणारे हे बांधव मंडळीतील सर्वांसमोर उत्तम उदाहरण मांडतात.—इफिस. ४:११, १२.

१४, १५. (क) जगभरात सुवार्तेच्या प्रचार कार्याला पाठिंबा देण्यासाठी कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत? (ख) राज्याच्या सुवार्तेच्या प्रचार कार्याला पाठिंबा देण्याच्या तुमच्या सहभागाविषयी तुम्हाला काय वाटते?

१४ आपल्या प्रकाशनांसाठी, सभांसाठी आणि अधिवेशनांसाठी आध्यात्मिक अन्‍न तयार करण्याकरता बरीच मेहनत केली जात आहे. आपल्या साहित्याचे सुमारे ६०० भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी हजारो स्वयंसेवक अथकपणे कार्य करत आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत देवाच्या महत्कृत्यांविषयी शिकता येईल. (प्रे. कृत्ये २:७-११) आपल्या साहित्याची छपाई व बाईंडिंग करण्यासाठी तरुण बंधुभगिनी जलदगतीने छपाई करणाऱ्‍या मुद्रण यंत्रांवर आणि बाईंडिंग यंत्रांवर काम करतात. नंतर, हे साहित्य सर्व मंडळ्यांना, पृथ्वीवरील दुर्गम भागांतील मंडळ्यांनासुद्धा पाठवले जाते.

१५ आपल्याला स्थानिक मंडळीसोबत मिळून सुवार्तेचा प्रचार करता यावा म्हणून अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, राज्य सभागृहांच्या आणि संमेलनगृहांच्या बांधकामात सहकार्य करण्यासाठी, नैसर्गिक विपत्तींमुळे प्रभावित झालेल्यांना किंवा तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज असलेल्यांना मदत करण्यासाठी, संमेलनांचे आणि अधिवेशनांचे आयोजन करण्यासाठी, विविध प्रशालांमध्ये शिकवण्यासाठी, आणि अशाच इतर कार्यांत मदत करण्यासाठी हजारो बंधुभगिनी स्वेच्छेने पुढे येतात. या सर्व गोष्टी करण्यामागचा उद्देश काय आहे? सुवार्तेच्या प्रचार कार्यात मदत करणे, हे कार्य करणाऱ्‍यांच्या आध्यात्मिक गरजांकडे लक्ष पुरवणे आणि अधिकाधिक लोकांना खरी उपासना करण्यास साहाय्य करणे. यहोवाच्या संघटनेच्या पृथ्वीवरील भागाने अधिक महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे का? हो, नक्कीच!

यहोवाच्या संघटनेचे अनुकरण करा

१६. तुमच्याकरता किंवा तुमच्या कुटुंबाकरता बायबल अभ्यासाचा कोणता उपक्रम उत्तम ठरेल?

१६ यहोवाची संघटना कशा प्रकारे कार्य करते याविषयी मनन करण्यासाठी आपण अधूनमधून वेळ काढतो का? काही जण कौटुंबिक उपासनेदरम्यान किंवा वैयक्‍तिक अभ्यासादरम्यान संघटनेच्या कार्यांविषयी संशोधन करतात व त्यांवर मनन करतात. यशया, यहेज्केल, दानीएल आणि योहान यांना देण्यात आलेल्या दृष्टान्तांचा अभ्यास करणे रोचक असू शकते. जेहोवाज विट्‌नेसेस—प्रोक्लेमर्स ऑफ गॉड्‌स किंग्डम या पुस्तकात आणि इतर प्रकाशनांत किंवा तुमच्या भाषेत उपलब्ध असलेल्या डीव्हीडींमध्ये संघटनेबद्दल तुम्हाला रोचक माहिती मिळू शकते.

१७, १८. (क) या लेखाच्या चर्चेमुळे तुम्हाला कसा फायदा झाला आहे? (ख) आपण कोणत्या प्रश्‍नांविषयी विचार केला पाहिजे?

१७ यहोवा त्याच्या संघटनेद्वारे काय-काय साध्य करत आहे यावर मनन करणे आपल्याकरता फायदेकारक ठरू शकते. यहोवाच्या अद्‌भुत संघटनेसोबत, आपणही अधिक महत्त्वाच्या गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार करू या. असे केल्याने, आपला निश्‍चयदेखील प्रेषित पौलाप्रमाणेच दृढ असेल, ज्याने असे लिहिले: “आम्हावर झालेल्या दयेनुसार ही सेवा आम्हाला देण्यात आली आहे, म्हणून आम्ही धैर्य सोडीत नाही.” (२ करिंथ. ४:१) पौलाने त्याच्या सहकाऱ्‍यांनाही असे प्रोत्साहन दिले: “चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.”—गलती. ६:९.

१८ आपल्याला अधिक महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देता यावे म्हणून व्यक्‍तिगत रीत्या किंवा कुटुंब या नात्याने दैनंदिन जीवनात काही फेरबदल करण्याची गरज आहे का? सर्वात जास्त महत्त्वाचे असलेल्या प्रचार कार्याला प्राधान्य देण्यासाठी आपण आपले जीवन साधे ठेवू शकतो का किंवा लक्ष विचलित करणाऱ्‍या अनावश्‍यक गोष्टी टाळू शकतो का? पुढील लेखात आपण, अशा पाच गोष्टींची चर्चा करणार आहोत, ज्या यहोवाच्या संघटनेच्या बरोबरीने वाटचाल करण्यास आपल्याला साहाय्य करतील.