व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खचून जाऊ नका

खचून जाऊ नका

“चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये.”—गलती. ६:९.

१, २. यहोवाच्या विश्‍वव्यापी संघटनेविषयी विचार केल्यामुळे आपला भरवसा कशा प्रकारे वाढतो?

 आपण एका विश्‍वव्यापी संघटनेचा भाग आहोत हा खरोखरच एक विस्मयकारक विचार आहे. यहेज्केल पुस्तकातील १ ला अध्याय आणि दानीएल पुस्तकातील ७ वा अध्याय यांत नमूद असलेल्या दृष्टान्तांत, यहोवा आपल्या उद्देशाच्या पूर्णतेकरता कशा प्रकारे कार्य करत आहे हे चित्रित करण्यात आले आहे. येशू आज यहोवाच्या संघटनेच्या पृथ्वीवरील भागाचे नेतृत्व करत आहे. तो सुवार्तेच्या प्रचार कार्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी; हे कार्य करणाऱ्‍यांची आध्यात्मिक रीत्या काळजी घेण्यासाठी; आणि यहोवाच्या खऱ्‍या उपासनेचा प्रसार करण्यासाठी या संघटनेचे मार्गदर्शन करत आहे. हे जाणून घेतल्यामुळे यहोवाच्या संघटनेवरील आपला भरवसा अनेकपटीने वाढत नाही का?—मत्त. २४:४५.

पण आपल्या व्यक्‍तिगत जीवनात आपण या अद्‌भुत संघटनेचे अनुकरण करत आहोत का? सत्याबद्दल आपल्याला असलेला आवेश दिवसेंदिवस वाढत चालला आहे, की तो कमी होऊ लागला आहे? अशा प्रश्‍नांवर विचार करताना कदाचित आपल्या लक्षात येईल की काही प्रमाणात का होईना, पण आपला आवेश कमी झाला आहे. पहिल्या शतकातसुद्धा, काही ख्रिस्ती बांधवांचा उत्साह मंदावला होता. म्हणूनच, प्रेषित पौलाला येशूच्या आवेशी उदाहरणावर मनन करण्याचे प्रोत्साहन त्या बांधवांना द्यावे लागले. पौलाने म्हटले की त्यांची “मने खचून [ते] थकून जाऊ नये” म्हणून येशूचे उदाहरण त्यांना साहाय्य करेल. (इब्री १२:३) याआधीच्या लेखात आपण पाहिले की यहोवाची संघटना आज किती अद्‌भुत कार्य साध्य करत आहे. येशूच्या उदाहरणाने ज्या प्रकारे पहिल्या शतकातील बांधवांना साहाय्य केले त्याच प्रकारे या माहितीचे काळजीपूर्वक परीक्षण केल्यामुळे, आज आपल्यालाही बरेच साहाय्य मिळू शकते.

३. थकून न जाण्यासाठी आपण काय करणे गरजेचे आहे, आणि या लेखात आपण काय पाहणार आहोत?

पण, पौलाने सांगितले की थकून न जाण्यासाठी आणखीही काहीतरी आवश्‍यक आहे. त्याने म्हटले की आपण “चांगले” ते करण्यात तत्पर असले पाहिजे. (गलती. ६:९) तर आता आपण अशा पाच गोष्टींचा विचार करू, ज्या आपल्याला विश्‍वासात खंबीर राहण्यास आणि यहोवाच्या संघटनेचे अनुकरण करत राहण्यास साहाय्य करू शकतात. या गोष्टींवर विचार करताना, आपल्याला व्यक्‍तिशः किंवा कुटुंब या नात्याने यांपैकी कोणत्या गोष्टींकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे हे आपण स्वतः ठरवू शकतो.

प्रोत्साहन व उपासना यांकरता सभांना उपस्थित राहा

४. एकत्र मिळणे हा खऱ्‍या उपासनेचा एक महत्त्वाचा पैलू आहे असे का म्हणता येईल?

यहोवाच्या सेवकांकरता, एकत्र मिळणे हे पूर्वीपासूनच अतिशय महत्त्वाचे होते. स्वर्गात, देवदूत वेळोवेळी यहोवासमोर एकत्र जमतात. (१ राजे २२:१९; ईयो. १:६; २:१; दानी. ७:१०) प्राचीन इस्राएल राष्ट्रालाही एकत्र जमण्यास सांगण्यात आले होते, जेणेकरून “ते ऐकून शिकतील.” (अनु. ३१:१०-१२) पहिल्या शतकात यहुद्यांची, सभास्थानांत जाऊन शास्त्रवचने वाचण्याची प्रथा होती. (लूक ४:१६; प्रे. कृत्ये १५:२१) ख्रिस्ती मंडळीची स्थापना झाल्यानंतरही एकत्र मिळण्यावर भर देणे सुरूच राहिले आणि आजही हा आपल्या उपासनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. खरे ख्रिस्ती “प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष” देतात. यहोवाचा दिवस जसजसा जवळ येतो तसतसे आपण एकमेकांना अधिकच प्रोत्साहन देत राहण्याची गरज आहे.—इब्री १०:२४, २५.

५. सभांमध्ये आपण कशा प्रकारे एकमेकांना प्रोत्साहन देऊ शकतो?

एकमेकांना प्रोत्साहन देण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे सभांमध्ये सहभाग घेणे. हे आपण कसे करू शकतो? सभांमध्ये आपला विश्‍वास जाहीर रीत्या व्यक्‍त करण्यासाठी आपण छापील प्रश्‍नाचे उत्तर देऊ शकतो; एखादे वचन कसे लागू करता येईल हे स्पष्ट करू शकतो; बायबलमधील तत्त्वांचे पालन करणे कशा प्रकारे हितकारक आहे हे दाखवणारा एखादा संक्षिप्त अनुभव सांगू शकतो किंवा इतर मुद्दे सांगू शकतो. (स्तो. २२:२२; ४०:९) तुम्हीही नक्कीच या गोष्टीशी सहमत व्हाल, की आपण कितीही वर्षांपासून सभांना उपस्थित राहत असलो, तरी आजही आपल्या बंधुभगिनींची, मग ते तरुण असोत वा वृद्ध, त्यांची मनःपूर्वक उत्तरे ऐकणे अतिशय स्फूर्तिदायक असते!

६. सभांमुळे आपल्याला कशा प्रकारे आध्यात्मिक रीत्या उत्साही राहण्यास साहाय्य मिळते?

आणखी कोणत्या कारणांमुळे यहोवा देव आपल्या नियमितपणे एकत्र मिळण्यावर इतका भर देतो? ख्रिस्ती सभा, संमेलने व अधिवेशने आपल्याला निर्भयतेने साक्ष देण्यास मदत करतात. तसेच, क्षेत्रांतील लोक विरोध करतात किंवा आस्था दाखवत नाहीत तेव्हादेखील प्रचार कार्य करत राहण्याचे धैर्य या सभांद्वारे आपल्याला मिळते. (प्रे. कृत्ये ४:२३, ३१) सभांमध्ये होणाऱ्‍या बायबल आधारित चर्चांमुळे आपला विश्‍वास आणखी दृढ होतो. (प्रे. कृत्ये १५:३२; रोम. १:११, १२) उपासनेकरता एकत्र मिळण्याद्वारे आपल्याला बरेच काही शिकायला मिळते आणि एकमेकांना प्रोत्साहन देणे शक्य होते. यामुळे आपल्याला खरा आनंद आणि “विपत्काली आराम” अनुभवायला मिळतो. (स्तो. ९४:१२, १३) नियमन मंडळाची शिक्षण समिती जगभरातील यहोवाच्या लोकांना आध्यात्मिक शिक्षण देण्याकरता निरनिराळ्या सभांमधील कार्यक्रमांची आखणी करते. वर्षभरात दर आठवडी आपल्याला सभांतून प्रोत्साहनदायक शिक्षणाचा आनंद घेणे शक्य व्हावे म्हणून ज्या तरतुदी केल्या जातात त्यांबद्दल आपण खरोखर किती कृतज्ञ आहोत!

७, ८. (क) मंडळीच्या सभांमागील सर्वात महत्त्वाचा उद्देश कोणता आहे? (ख) सभांमुळे तुम्हाला आध्यात्मिक रीत्या कोणते साहाय्य मिळते?

पण, सभांतून मिळणाऱ्‍या या वैयक्‍तिक फायद्यांव्यतिरिक्‍त एकत्र मिळण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. एकत्र मिळण्यामागे आपला सर्वात महत्त्वाचा उद्देश यहोवाची उपासना करणे हा आहे. (स्तोत्र ९५:६ वाचा.) यहोवा देवाची स्तुती करणे हा आपल्याकरता किती मोठा बहुमान आहे! (कलस्सै. ३:१६) नियमित रीत्या सभांना उपस्थित राहून व त्यांत सहभाग घेऊन आपण यहोवाची जी उपासना करतो त्याकरता तो योग्य आहे. (प्रकटी. ४:११) म्हणूनच, आपल्याला हे प्रोत्साहन दिले जाते, की “आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे” सोडू नये.—इब्री १०:२५.

यहोवा या दुष्ट जगाचा नाश करेल, तोपर्यंत आपल्याला धीर धरण्यास साहाय्य करण्याकरता ख्रिस्ती सभांची तरतूद करण्यात आली आहे, असा दृष्टिकोन आपण बाळगतो का? असा दृष्टिकोन बाळगल्यास, सभा आपल्या जीवनातील “श्रेष्ठ” किंवा अधिक महत्त्वाच्या गोष्टी असतील आणि आपल्या धकाधकीच्या जीवनातही आपण त्यांच्याकरता वेळ काढू. (फिलिप्पै. १:१०) अगदीच महत्त्वाचे कारण असल्याशिवाय, आपण आपल्या बांधवांसोबत एकत्र येण्याची व यहोवाची उपासना करण्याची एकही संधी चुकवू नये.

प्रामाणिक मनाच्या लोकांना शोधा

९. प्रचार कार्य महत्त्वाचे आहे हे आपल्याला कसे कळते?

प्रचार कार्यात उत्साहाने सहभाग घेतल्यामुळेदेखील आपल्याला यहोवाच्या संघटनेच्या बरोबरीने पाऊल टाकण्यास मदत मिळते. येशूने पृथ्वीवर असताना या कार्याचा पाया घातला होता. (मत्त. २८:१९, २०) तेव्हापासून, राज्याच्या प्रचाराचे व शिष्य बनवण्याचे कार्य हे यहोवाच्या संपूर्ण संघटनेचे सर्वात प्रमुख कार्य आहे. आधुनिक काळातील बरेच अनुभव हे दाखवून देतात की प्रचाराच्या कार्यात देवदूत आपल्या पाठीशी आहेत आणि योग्य मनोवृत्तीच्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी ते आपले मार्गदर्शन करत आहेत. (प्रे. कृत्ये १३:४८; प्रकटी. १४:६, ७) खरेतर, आज यहोवाच्या संघटनेचा पृथ्वीवरील भाग हे महत्त्वाचे कार्य सुसंघटित रीत्या पार पाडण्यासाठीच अस्तित्वात आहे. आपल्या वैयक्‍तिक जीवनात आपणसुद्धा सेवाकार्याला सर्वात जास्त महत्त्व देतो का?

१०. (क) सत्याकरता असलेला आवेश आपण कसा टिकवून ठेवू शकतो हे उदाहरण देऊन स्पष्ट करा. (ख) सेवाकार्यामुळे तुम्हाला कशा प्रकारे खचून न जाण्यास साहाय्य मिळाले आहे?

१० सेवाकार्यात पुरेपूर सहभाग घेतल्यामुळे सत्याबद्दल आपला आवेश टिकवून ठेवण्यास आपल्याला साहाय्य मिळते. बऱ्‍याच काळापासून वडील व सामान्य पायनियर म्हणून सेवा करणाऱ्‍या मिचल यांनी काय म्हटले ते विचारात घ्या. ते म्हणतात: “लोकांना सत्याबद्दल सांगायला मला खूप आवडतं. टेहळणी बुरूज किंवा अवेक! यात आलेल्या एखाद्या नव्या लेखाचा मी विचार करतो, तेव्हा प्रत्येक अंकातील माहितीतून किती सुज्ञपणा, विचारशीलता व सुरेख समतोल दिसून येतो हे पाहून मी थक्क होतो! ही माहिती वाचल्यावर लोकांची काय प्रतिक्रिया असेल हे पाहण्याकरता आणि त्यांची आस्था जागृत करण्याकरता मी सेवेला जायला उत्सुक असतो. सेवाकार्यात सहभागी झाल्यामुळेच मला जीवनात महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देणं शक्य होतं. मी कोणत्याही कामाला सेवेकरता राखून ठेवलेल्या वेळेत अडथळा बनू देत नाही.” आपणसुद्धा, आपल्या पवित्र सेवेत स्वतःला झोकून दिल्यास, या शेवटल्या काळात विश्‍वासात खंबीर राहण्यास आपल्याला साहाय्य मिळेल.—१ करिंथकर १५:५८ वाचा.

आध्यात्मिक तरतुदींचा फायदा घ्या

११. आपण यहोवाकडून मिळणाऱ्‍या आध्यात्मिक अन्‍नाचा पुरेपूर फायदा का घेतला पाहिजे?

११ आपल्याला आध्यात्मिक रीत्या बळकट करण्यासाठी यहोवाने लिखित स्वरूपातील आध्यात्मिक अन्‍न विपुल प्रमाणात उपलब्ध करून दिले आहे. तुम्हाला नक्कीच असा एखादा प्रसंग आठवत असेल, जेव्हा एखादे प्रकाशन वाचल्यानंतर तुमच्या मनात असा विचार आला असेल, ‘याच माहितीची तर मला गरज होती! जणू यहोवानं ही माहिती केवळ माझ्यासाठीच दिली आहे!’ हा काही योगायोग नाही. या तरतुदींद्वारे खरोखरच यहोवा आपल्याला शिकवतो आणि आपले मार्गदर्शन करतो. त्याने असे म्हटले आहे: “मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन.” (स्तो. ३२:८) तर मग, आपल्याला पुरवली जाणारी सर्वच प्रकाशने वाचून आपण त्यांच्यावर मनन करतो का? असे केल्यास, आपल्याला देवाच्या सेवेत प्रगती करत राहण्यास आणि आध्यात्मिक रीत्या आवेशी राहण्यास साहाय्य मिळेल.—स्तोत्र १:१-३; ३५:२८; ११९:९७ वाचा.

१२. आध्यात्मिक तरतुदींकडे दुर्लक्ष न करण्यासाठी आपल्याला कोणती गोष्ट साहाय्य करेल?

१२ आपल्याला आरोग्यदायक आध्यात्मिक अन्‍न नियमितपणे मिळत राहावे यासाठी किती परिश्रम घेतले जातात याबद्दल विचार करणे फायदेकारक आहे. नियमन मंडळाची लेखन समिती आपल्या छापील साहित्यात, तसेच आपल्या वेब साईटवर प्रकाशित केल्या जाणाऱ्‍या माहितीचे संशोधन करण्यापासून, लेखन, मुद्रितशोधन, चित्रे घालणे, व भाषांतर करण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची देखरेख करते. नंतर, मुद्रण करणाऱ्‍या शाखा कार्यालयांतून हे साहित्य जवळच्या व दूरदूरच्या मंडळ्यांना पाठवले जाते. हे सर्व काम कशासाठी? यहोवाच्या लोकांचे चांगल्या प्रकारे आध्यात्मिक पोषण व्हावे यासाठी. (यश. ६५:१३) तेव्हा, यहोवाच्या संघटनेकडून मिळणाऱ्‍या सर्वच आध्यात्मिक अन्‍नाचा फायदा घेण्याकरता आपण तत्पर राहू या.—स्तो. ११९:२७.

संघटनेद्वारे केल्या जाणाऱ्‍या व्यवस्थांना पाठिंबा द्या

१३, १४. स्वर्गात यहोवाच्या संघटनेला कोण पाठिंबा देत आहेत, आणि तसाच पाठिंबा आपण पृथ्वीवर कसा देऊ शकतो?

१३ प्रेषित योहानाला देण्यात आलेल्या दृष्टान्तात त्याने येशूला पाहिले जो एका पांढऱ्‍या घोड्यावर बसून यहोवाविरुद्ध बंड करणाऱ्‍यांवर विजय प्राप्त करण्यास पुढे वाटचाल करत होता. (प्रकटी. १९:११-१५) येशूच्या मागे-मागे विश्‍वासू देवदूत आणि स्वर्गीय जीवनासाठी पुनरुत्थान झालेले अभिषिक्‍त जनदेखील स्वारी करत आहेत हे पाहून आपला विश्‍वास किती मजबूत होतो! (प्रकटी. २:२६, २७) यहोवाच्या संघटनेला पाठिंबा देण्याचे किती उत्तम उदाहरण!

१४ त्याचप्रमाणे, आज मोठा लोकसमुदाय ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त बांधवांपैकी जे अजूनही पृथ्वीवर आहेत आणि संघटनेत पुढाकार घेत आहेत त्यांच्या कार्याला संपूर्ण पाठिंबा देतो. (जखऱ्‍या ८:२३ वाचा.) तर मग, आपण यहोवाच्या संघटनेला वैयक्‍तिक रीत्या पाठिंबा देत आहोत हे आपण कसे दाखवू शकतो? असे करण्याचा एक मार्ग म्हणजे संघटनेत पुढाकार घेणाऱ्‍यांच्या अधीन राहणे. (इब्री १३:७, १७) आणि याची सुरुवात आपण आपल्या मंडळीपासूनच करू शकतो. आपल्या मंडळीतील वडिलांबद्दल आपण जे काही बोलतो त्यामुळे इतरांना वडिलांचा व त्यांच्या अधिकाराचा आदर करण्याचे प्रोत्साहन मिळते का? आपण आपल्या मुलांना या विश्‍वासू पुरुषांचा आदर करण्याचे व त्यांचा सल्ला घेण्याचे उत्तेजन देतो का? याच्या व्यतिरिक्‍त, जगभरात चाललेल्या कामाला आर्थिक हातभार कसा लावता येईल याची आपण कुटुंब मिळून चर्चा करतो का? (नीति. ३:९; १ करिंथ. १६:२; २ करिंथ. ८:१२) राज्य सभागृह नीटनेटके ठेवण्याचा जो सुहक्क आपल्याला लाभला आहे त्याला आपण महत्त्वाचा मानतो का? अशा प्रकारचा आदर व ऐक्य जेथे असते तेथे यहोवाचा आत्मा मुक्‍तपणे संचार करतो. त्या आत्म्याद्वारे, या शेवटल्या दिवसांत आपण खचून जाऊ नये म्हणून आपल्याला निरंतर साहाय्य मिळते.—यश. ४०:२९-३१.

आपल्या संदेशाच्या अनुरूप जीवन जगा

१५. यहोवाच्या श्रेष्ठ उद्देशानुरूप जीवन जगण्यासाठी आपण सतत संघर्ष का केला पाहिजे?

१५ शेवटी, यहोवाच्या संघटनेसोबत धीराने वाटचाल करत राहण्यासाठी, आपण जो संदेश इतरांना सांगतो त्याच्या अनुरूप जीवन जगले पाहिजे. त्यासाठी आपले आचरण “प्रभूला . . . संतोषकारक आहे” याची आपण खातरी केली पाहिजे. (इफिस. ५:१०, ११) आपल्या अपरिपूर्णतेमुळे आणि सैतान व त्याच्या दुष्ट जगाच्या प्रभावामुळे आपल्याला सतत वाईट गोष्टींशी संघर्ष करावा लागतो. प्रिय बंधुभगिनींनो, तुमच्यापैकी काही जणांना यहोवासोबतचा नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी दररोज प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. पण, तुमच्या या प्रयत्नांमुळेच तुम्ही यहोवाला अतिशय प्रिय आहात. तेव्हा, हार मानू नका! यहोवाच्या उद्देशानुरूप जीवन जगल्याने आपल्याला मोठे समाधान मिळेल आणि आपली उपासना व्यर्थ ठरणार नाही.—१ करिंथ. ९:२४-२७.

१६, १७. (क) आपल्या हातून एखादे गंभीर पाप घडल्यास आपण काय केले पाहिजे? (ख) ॲनच्या उदाहरणावरून आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?

१६ पण, आपल्या हातून एखादे गंभीर पाप घडल्यास आपण काय केले पाहिजे? लवकरात लवकर मदत मिळवा. पाप लपवून ठेवल्याने परिस्थिती आणखीनच चिघळेल. दाविदाला आठवा. त्याने म्हटले, की तो गप्प राहिला तेव्हा “सतत कण्हण्यामुळे” त्याची “हाडे जीर्ण झाली.” (स्तो. ३२:३) पाप लपवून ठेवल्याने आपण भावनात्मक व आध्यात्मिक रीत्या खचून जाऊ शकतो. पण, आपण आपले पाप “कबूल करून सोडून देतो” तेव्हा आपल्यावर “दया होते.”—नीति. २८:१३.

१७ ॲनचे * उदाहरण घ्या. सतरा-अठरा वर्षांची असताना ती पायनियर म्हणून सेवा करत होती. पण, नंतर ती दुटप्पी जीवन जगू लागली. याचा तिच्यावर खूप वाईट परिणाम झाला. ती म्हणते: “माझा विवेक मला बोचू लागला. मी नेहमी दुःखी व निराश असायचे.” मग तिने काय केले? ती म्हणते, की एके दिवशी मंडळीच्या सभेत याकोब ५:१४, १५ या वचनांवर चर्चा सुरू होती. आपल्याला मदतीची गरज आहे याची ॲनला जाणीव झाली आणि तिने वडिलांची मदत मागितली. ती आठवून सांगते: “आध्यात्मिक रीत्या बरं होण्यासाठी ही वचनं जणू यहोवानं दिलेल्या औषधांप्रमाणे आहेत. औषध कडू असलं, तरी त्यामुळं आध्यात्मिक आरोग्य सुधारतं. या वचनांत देण्यात आलेल्या सल्ल्याचं मी पालन केलं, आणि त्याचा मला फायदा झाला.” या गोष्टीला आता काही वर्षे उलटून गेली आहेत. ॲन पुन्हा एकदा चांगल्या विवेकाने व आवेशाने यहोवाची सेवा करत आहे.

१८. आपला निर्धार काय असला पाहिजे?

१८ या दुष्ट जगाच्या शेवटल्या काळात राहत असताना आपल्याला यहोवाच्या अतुलनीय संघटनेचा भाग बनण्याचा किती मोठा सुहक्क मिळाला आहे! तेव्हा, आपल्याला मिळालेल्या बहुमानाला कधीही तुच्छ न लेखण्याचा आपण निर्धार करू या. त्याऐवजी, एक कुटुंब या नात्याने यहोवाची उपासना करण्याकरता, आपल्या क्षेत्रातील प्रामाणिक मनाच्या लोकांना शोधण्याकरता, आणि नियमितपणे आपल्याला मिळणाऱ्‍या आध्यात्मिक अन्‍नाचा फायदा घेण्याकरता परिश्रम करू या. तसेच, संघटनेत पुढाकार घेणाऱ्‍यांना पाठिंबा देऊ या आणि आपण लोकांना जो संदेश सांगतो त्यानुसार जीवन जगू या. असे केल्यास, आपण यहोवाच्या संघटनेच्या बरोबरीने चालत तर राहूच, शिवाय चांगले ते करण्याच्या बाबतीत आपण कधीही खचून जाणार नाही!

^ नाव बदलण्यात आले आहे.