व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला माहीत होते का?

तुम्हाला माहीत होते का?

इ.स. ७० नंतर जेरूसलेमचे मंदिर कधी बांधण्यात आले होते का?

येशूने म्हटले होते की यहोवाच्या मंदिराचा चिऱ्‍यावर चिरा राहणार नाही. रोमी सेनापती टायटस याच्या नेतृत्वाखाली रोमन सैन्याने इ.स. ७० मध्ये जेरूसलेमचा नाश केला तेव्हा ही भविष्यवाणी पूर्ण झाली. (मत्त. २४:२) नंतर, सम्राट ज्युलियन याने मंदिर पुन्हा बांधण्याचे ठरवले.

ज्युलियन हा रोमचा शेवटचा मूर्तिपूजक सम्राट होता असे म्हटले जाते. तो कॉन्सटंटीन महान याचा पुतण्या होता आणि त्याला ख्रिस्ती रीतिरिवाजांचे शिक्षण मिळाले होते. तरीसुद्धा, इ.स. ३६१ मध्ये त्याला सम्राट घोषित केल्यानंतर, त्याने त्याला मिळालेल्या शिक्षणाचा व त्याच्या काळातील भ्रष्ट ख्रिस्ती धर्माचा धिक्कार केला आणि मूर्तिपूजेचा स्वीकार केला. इतिहासाच्या पुस्तकांत या सम्राटाचा उल्लेख “धर्मत्यागी” असा करण्यात आला आहे.

ज्युलियन ख्रिस्ती धर्माचा द्वेष करायचा. याचे कारण हे असावे की तो सहा वर्षांचा होता तेव्हा ख्रिस्ती धर्माचे प्रतिनिधित्व करणाऱ्‍यांनी त्याच्या वडिलाचा व इतर नातेवाइकांचा खून केला होता. चर्च इतिहासकारांनुसार, ज्युलियनने यहुद्यांना मंदिर पुन्हा बांधण्यासाठी प्रोत्साहित केले होते. त्याने असा विचार केला, की यामुळे येशू खोटा संदेष्टा होता हे सिद्ध होईल. *

ज्युलियनने मंदिराची पुनर्बांधणी करण्याची योजना केली होती यात तर काही शंका नाही. पण, त्याने बांधकामाला सुरुवात केली की नाही, आणि केली असल्यास, ते कशामुळे मधेच थांबवण्यात आले याविषयी इतिहासकारांमध्ये वाद आहे. एक गोष्ट मात्र नक्की. सम्राट बनल्याच्या दोन वर्षांच्या आतच ज्युलियन मारला गेला आणि मंदिर बांधण्याची त्याची योजना ठप्प झाली.

मंदिराच्या सध्याच्या ठिकाणावर, येशूच्या काळात ते कसे दिसत असावे हे दाखवण्यात आले आहे

^ मंदिर कधीही पुन्हा बांधण्यात येणार नाही असे येशूने म्हटले नव्हते. तर, त्याने म्हटले होते की मंदिर नाश होईल, आणि इ.स. ७० मध्ये तसेच घडले.