व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उत्तम संवाद साधून आपले वैवाहिक बंधन मजबूत करा

उत्तम संवाद साधून आपले वैवाहिक बंधन मजबूत करा

“रुपेरी करंड्यात सोन्याची फळे, तसे समयोचित भाषण होय.”—नीति. २५:११.

१. उत्तम संवादामुळे विवाहित जोडप्यांना कशा प्रकारे फायदा झाला आहे?

 कॅनडात राहणाऱ्‍या एका बांधवाने म्हटले, “इतर कोणाहीपेक्षा मी माझ्या पत्नीच्या सहवासात वेळ घालवणं पसंत करेन. मी तिच्यासोबत असतो तेव्हा जीवनातला कोणताही आनंद दुप्पट होतो अन्‌ कोणतंही दुःख हलकं झाल्यासारखं वाटतं.” ऑस्ट्रेलियातील एका पतीने असे लिहिले: “११ वर्षं सोबत घालवल्यानंतर मला असा एकही दिवस आठवत नाही जेव्हा मी माझ्या पत्नीशी बोलायचं थांबवलं असेन. आमच्या विवाहबंधनाबाबत आम्हा दोघांच्याही मनात कोणत्याच प्रकारची असुरक्षितता किंवा चिंता नाही. आम्ही सतत एकमेकांशी करत असलेला अर्थपूर्ण संवाद हेच यामागचं गुपीत आहे.” कोस्टा रिका येथे राहणारी एक बहीण म्हणाली: “उत्तम संवादामुळं आमचं वैवाहिक जीवन आनंदी तर झालंच, पण यामुळं आम्ही यहोवाच्या आणखी जवळ आलो आहोत, अनेक मोहपाशांपासून आमचं संरक्षण झालं आहे, एक जोडपं या नात्यानं आमच्यातलं ऐक्य वाढलं आहे आणि एकमेकांवर असलेलं आमचं प्रेमही वाढत गेलं आहे.”

२. कोणत्या गोष्टी सुसंवादात अडथळा आणू शकतात?

तुम्ही व तुमचा विवाह जोडीदार एकमेकांशी मनमोकळा संवाद साधता का, की एकमेकांशी अर्थपूर्ण संभाषण करणे तुम्हाला कठीण जाते? प्रत्येक विवाहात समस्या निर्माण होणे साहजिक आहे; कारण, विवाहामुळे दोन वेगवेगळ्या व्यक्‍तिमत्त्वांच्या अपरिपूर्ण व्यक्‍ती एकत्र येतात. शिवाय, त्या दोघांच्या विशिष्ट संस्कृतींमुळे किंवा कौटुंबिक पार्श्‍वभूमींमुळेही त्यांच्या काही सवयी एकमेकांपेक्षा वेगळ्या असू शकतात. (रोम. ३:२३) तसेच, आपले विचार व भावना व्यक्‍त करण्याच्या दोघांच्या पद्धतीदेखील वेगवेगळ्या असू शकतात. म्हणूनच, विवाह या विषयावर संशोधन करणारे तज्ज्ञ जॉन एम. गॉटमन आणि नॅन सिल्व्हर म्हणतात: “विवाहबंधन टिकवून ठेवण्यासाठी धैर्य, दृढनिश्‍चय व जुळवून घेण्याची वृत्ती यांसारख्या गुणांची गरज आहे.”

३. अनेक जोडप्यांना त्यांचे विवाहबंधन मजबूत करण्यास कशामुळे साहाय्य मिळाले आहे?

खरोखर, विवाह यशस्वी होण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. पण अशी मेहनत घेतल्यामुळे विवाहित जोडप्यांना जीवनात निस्सीम आनंद अनुभवणे शक्य होते. जे जोडीदार एकमेकांवर प्रेम करतात ते खऱ्‍या अर्थाने सुखी सहजीवन अनुभवू शकतात. (उप. ९:९) इसहाक व रिबका यांच्या विवाहाचा विचार करा. (उत्प. २४:६७) त्यांचा विवाह होऊन बराच काळ लोटल्यावरही त्यांचे एकमेकांवरचे प्रेम कमी झाल्याचे बायबलमध्ये कोठेही सुचवलेले नाही. आजही अनेक जोडप्यांबद्दल असे म्हणता येईल. त्यांच्या आनंदाचे रहस्य काय? हेच, की त्यांनी समंजसपणा, गाढ आदर आणि नम्रता यांसारखे गुण विकसित करण्याद्वारे व ते प्रदर्शित करण्याद्वारे, आपले विचार व भावना प्रामाणिकपणे पण त्याच वेळी प्रेमळपणे व्यक्‍त करण्याचे शिकून घेतले आहे. तर आता आपण पाहू या, की कशा प्रकारे हे महत्त्वाचे गुण वैवाहिक जीवनात मनमोकळा संवाद साधण्यास हातभार लावतात.

समंजसपणा दाखवा

४, ५. समंजसपणा कशा प्रकारे एका विवाहित जोडप्याला साहाय्य करू शकतो? उदाहरणे द्या.

नीतिसूत्रे १६:२० (NW) म्हणते, “जो समंजसपणा दाखवतो त्याचे भले होईल.” विवाह व कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत ही गोष्ट नक्कीच खरी आहे. (नीतिसूत्रे २४:३ वाचा.) देवाचे वचन समंजसपणा व बुद्धी मिळवण्याचा सर्वात उत्तम स्रोत आहे. उत्पत्ति २:१८ आपल्याला सांगते की देवाने स्त्रीला पुरुषाची साहाय्यक होण्याकरता बनवले होते, त्याची प्रतिकृती नव्हे. म्हणूनच, स्त्रिया सहसा आपले विचार व भावना पुरुषांपेक्षा वेगळ्या पद्धतीने व्यक्‍त करतात. अर्थात, व्यक्‍ती तितक्या प्रकृती असतात. पण सर्वसामान्यपणे स्त्रियांना आपल्या भावनांबद्दल, लोकांबद्दल व नातेसंबंधांबद्दल बोलायला आवडते. प्रेमळ शब्दांत, व अगदी मनापासून केलेले संभाषण त्यांना भावते, कारण त्यामुळे आपल्यावर कोणीतरी प्रेम करते याचे आश्‍वासन त्यांना मिळते. दुसरीकडे पाहता, बहुतेक पुरुष आपल्या भावनांबद्दल उघडपणे बोलण्यास उत्सुक नसतात. ते सहसा कामकाजाबद्दल, समस्यांबद्दल व त्यांवरील तोडग्यांबद्दल बोलतात. तसेच, आपला आदर केला जावा अशीही पुरुषांची इच्छा असते.

ब्रिटनमध्ये राहणाऱ्‍या एका बहिणीने म्हटले, “माझे पती, माझं पूर्णपणे ऐकून घेण्याआधीच कोणतीही समस्या लगेच सोडवायला पाहतात.” ती सांगते की यामुळे तिची खूप चिडचिड होते कारण त्यांनी आपले ऐकून घ्यावे आणि आपल्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा इतकीच तिची इच्छा असते. एका पतीने लिहिले: “आमच्या लग्नाच्या सुरुवातीच्या काळात माझ्या पत्नीला कोणतीही समस्या आली, की लगेच त्यावर उपाय सुचवण्याची माझी सवय होती. पण लवकरच माझ्या लक्षात आलं की मी तिचं शांतपणे ऐकून घ्यावं इतकंच तिला हवं असतं.” (नीति. १८:१३; याको. १:१९) एक समजदार पती आपल्या पत्नीच्या भावनांची दखल घेतो आणि त्यानुसार तिच्याशी वागतो. त्याच वेळी तो तिला याचे आश्‍वासन देतो की तिचे विचार व भावना त्याच्याकरता महत्त्वाच्या आहेत. (१ पेत्र ३:७) पत्नीदेखील आपल्या पतीचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करते. पती व पत्नी बायबलमध्ये सांगितल्यानुसार आपापली भूमिका समजून घेतात, तिची कदर करतात आणि ती पार पाडतात तेव्हा त्यांच्या नात्यातील वीण आणखी घट्ट होते. तसेच, त्या दोघांना सोबत मिळून कार्य करणे आणि जीवनात उत्तम निर्णय घेणेही शक्य होते.

६, ७. (क) उपदेशक ३:७ यातील तत्त्व विवाह जोडीदारांना समजूतदारपणे वागण्यास कशा प्रकारे साहाय्य करू शकते? (ख) एक पत्नी कशा प्रकारे समजूतदारपणा दाखवू शकते आणि पतीने कोणता प्रयत्न केला पाहिजे?

एक समजदार जोडपे हेदेखील ओळखते की “मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो.” (उप. ३:१, ७) दहा वर्षांपासून विवाहित असलेल्या एका बहिणीने म्हटले, “आता मला जाणीव झाली आहे की काही असे प्रसंग असतात जेव्हा एखाद्या समस्येबद्दल उल्लेख करणं योग्य नसतं. माझे पती कामामुळं किंवा इतर जबाबदाऱ्‍यांमुळं तणावाखाली असतात तेव्हा मी त्या वेळी काही न बोलता नंतर त्या समस्यांबद्दल त्यांना सांगते. यामुळं सहसा आम्हाला अगदी मनमोकळेपणानं संवाद करणं शक्य होतं.” समजदार पत्नी विचारशीलपणे बोलते. तिला याची जाणीव असते की तिने विचारपूर्वक शब्द निवडल्यास व योग्य वेळी ते बोलल्यास तिच्या पतीला तिचे ऐकून घेण्यास आनंद होईल आणि तो तिच्या शब्दांची कदर करेल.—नीतिसूत्रे २५:११ वाचा.

छोट्याछोट्या गोष्टींचा विवाहात मोठा वाटा असतो

एका ख्रिस्ती पतीने आपली भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी आपल्या पत्नीचे बोलणे लक्षपूर्वक ऐकून घेण्यासोबतच स्वतःच्या भावना स्पष्टपणे व्यक्‍त करण्याचाही प्रयत्न केला पाहिजे. २७ वर्षांपासून विवाहित असलेले व मंडळीत वडील म्हणून सेवा करणारे एक बंधू म्हणतात: “माझ्या मनात खोलवर असलेल्या भावना माझ्या पत्नीला सांगण्यासाठी मला जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागतो.” २४ वर्षांपासून विवाहित असलेले आणखी एक बंधू म्हणतात: “मला माझ्या भावना मनातच ठेवण्याची सवय आहे. मी असा विचार करतो, की ‘या समस्येवर काहीच चर्चा केली नाही, तर थोड्या दिवसांनी ती समस्या आपोआपच नाहीशी होईल.’ पण आता मला जाणीव झाली आहे, की भावना व्यक्‍त करणं हे काही दुबळेपणाचं लक्षण नाही. मला माझ्या भावना बोलून दाखवणं कठीण जातं तेव्हा मी प्रार्थना करतो आणि माझ्या तोंडून योग्य शब्द, योग्य प्रकारे निघावेत म्हणून देवाला मदत मागतो. मग एक खोल श्‍वास घेऊन मी बोलायला सुरुवात करतो.” बोलण्यासाठी योग्य वेळ निवडल्यामुळेही सुसंवाद साधण्यास बरीच मदत मिळू शकते. उदाहरणार्थ, दैनिक वचन वाचताना किंवा बायबलचे वाचन करताना पती-पत्नी दोघंच असतात तेव्हा ते एकमेकांशी बोलू शकतात.

८. आपल्या विवाहास यशस्वी बनवण्याकरता ख्रिस्ती जोडप्यांना आणखी कोणत्या गोष्टीमुळे प्रेरणा मिळू शकते?

पती व पत्नी दोघांनीही प्रार्थना करणे आणि आपले संवादकौशल्य सुधारण्यास उत्सुक असणे गरजेचे आहे. हे खरे आहे की जुन्या सवयींवर मात करणे सोपे नाही, आणि बऱ्‍याच जणांना तसे करण्याची इच्छाही नसते. पण जेव्हा पती-पत्नीचे यहोवावर प्रेम असते, आणि जेव्हा ते त्याचा पवित्र आत्मा मिळावा म्हणून विनंती करतात, तसेच, आपल्या विवाहबंधनास पवित्र मानतात तेव्हा त्यांना स्वतःमध्ये बदल करण्याची प्रेरणा मिळते. २६ वर्षे विवाहित असलेल्या एका पत्नीने असे लिहिले: “विवाहाबद्दल यहोवाच्या दृष्टिकोनाकडे मी व माझे पती अतिशय गांभीर्यानं पाहतो; त्यामुळं एकमेकांपासून विभक्‍त होण्याची आम्ही कल्पनाही करू शकत नाही. समस्या येतात तेव्हा आम्ही एकमेकांशी चर्चा करून त्या सोडवण्याचा जास्त जाणीवपूर्वक प्रयत्न करतो.” विवाहित जोडपी अशा प्रकारची एकनिष्ठा आणि आध्यात्मिक मनोवृत्ती दाखवतात तेव्हा देवाला आनंद होतो आणि तो त्यांना अनेक आशीर्वाद देतो.—स्तो. १२७:१.

आपसातील प्रेम वाढवा

९, १०. कोणत्या व्यावहारिक मार्गांनी एक जोडपे आपला नातेसंबंध आणखी घनिष्ठ बनवू शकतात?

प्रेम “पूर्णता करणारे बंधन” आहे, आणि यशस्वी विवाहाकरता आवश्‍यक असलेला सर्वात महत्त्वाचा गुण आहे. (कलस्सै. ३:१४) एकमेकांना एकनिष्ठ असलेले पती-पत्नी एकत्र मिळून जीवनाचा प्रवास करतात आणि जीवनातील आनंदाच्या व खडतर वळणांवर एकमेकांना साथ देतात तेव्हा एकमेकांवर असलेले त्यांचे खरे प्रेम वाढत जाते. ते एकमेकांचे अगदी घनिष्ठ मित्र बनतात आणि एकमेकांचा सहवास त्यांना मोलाचा वाटू लागतो. अशा प्रकारचा घनिष्ठ नातेसंबंध हा प्रसार माध्यमांत दाखवला जातो त्याप्रमाणे, पती-पत्नीने एकमेकांकरता एखाद्या वेळी केलेल्या मोठ्या व विशेष कृत्यांमुळे नव्हे, तर असंख्य लहानलहान कृतींमुळे निष्पन्‍न होतो. आपल्या जोडीदाराला प्रेमाने जवळ घेणे, प्रेमाचे दोन शब्द बोलणे, विचारशीलपणे आपल्या जोडीदारासाठी काहीतरी करणे, प्रेमळ स्मितहास्यातून आपल्या भावना व्यक्‍त करणे किंवा नुसतेच, “तुझा दिवस कसा गेला?” असे विचारणे. या छोट्याछोट्या गोष्टींचा सुखी व यशस्वी विवाहात मोठा वाटा असतो. १९ वर्षांचे आनंदी सहजीवन अनुभवलेले एक पती-पत्नी सांगतात, की आजही ते फक्‍त “कसं काय चाललं आहे” हे विचारण्यासाठी एकमेकांना फोन करतात किंवा एसएमएस पाठवतात.

१० तसेच, एकमेकांवर प्रेम करणारे पती-पत्नी लग्नाला अनेक वर्षे झाल्यानंतरही आपल्या जोडीदाराला आणखी चांगल्या प्रकारे जाणून घेण्याचा प्रयत्न करत राहतात. (फिलिप्पै. २:४) असे केल्यामुळे, एकमेकांचे अवगुण माहीत असूनही त्यांचे प्रेम वाढत जाते. यशस्वी विवाहात पती-पत्नीच्या नातेसंबंधात साचलेपणा येत नाही, उलट त्यांचे नाते दिवसागणिक समृद्ध व घनिष्ठ होत जाते. तेव्हा, तुम्ही विवाहित असल्यास पुढील प्रश्‍नांवर विचार करा: ‘मी माझ्या जोडीदाराला किती चांगल्या प्रकारे ओळखतो किंवा ओळखते? कोणत्याही विषयावर माझ्या जोडीदाराच्या भावना व विचार मी समजून घेतो किंवा घेते का? मी किती वेळा माझ्या जोडीदाराबद्दल विचार करतो किंवा करते; त्याच्या किंवा तिच्या कोणत्या गुणांनी मला सर्वप्रथम आकर्षित केले होते?’

जोडीदाराचा आदर करायला शिका

११. यशस्वी विवाहासाठी पती-पत्नीने एकमेकांचा आदर करणे महत्त्वाचे का आहे? उदाहरण देऊन स्पष्ट करा.

११ सर्वात सुखी विवाहदेखील परिपूर्ण नसतात. एकमेकांवर नितांत प्रेम करणाऱ्‍या जोडप्यांमध्येही मतभेद होतात. अब्राहाम व सारा यांच्यातही मतभेद झाले. (उत्प. २१:९-११) पण, या मतभेदांमुळे त्यांनी आपल्या नातेसंबंधाला तडा जाऊ दिला नाही. का नाही? कारण ते एकमेकांशी आदराने वागायचे. उदाहरणार्थ, अब्राहामाने साराशी बोलताना “मी तुला विनंती करतो” असे म्हटले. (उत्प. १२:११, १३, पं.र.भा.) दुसरीकडे पाहता, सारा अब्राहामाच्या सांगण्यानुसार वागली आणि त्याच्याविषयी विचार करतानाही ती त्याला “धनी” म्हणून संबोधत असे. (उत्प. १८:१२) जेव्हा एखाद्या जोडप्याला एकमेकांबद्दल आदर नसतो, तेव्हा ते एकमेकांना जे बोलतात त्यावरून, इतकेच नव्हे तर ते ज्या शब्दांत आणि ज्या आविर्भावात एकमेकांशी बोलतात त्यावरून हे स्पष्टपणे दिसून येते. (नीति. १२:१८) यामागील मूळ समस्येकडे त्यांनी लक्ष न दिल्यास त्यांच्या वैवाहिक जीवनाचा दुःखद शेवट होऊ शकतो.—याकोब ३:७-१०, १७, १८ वाचा.

१२. नवविवाहितांनी एकमेकांशी आदरपूर्वक बोलण्याचा विशेष प्रयत्न का केला पाहिजे?

१२ नवविवाहितांनी एकमेकांशी प्रेमळपणे व आदरपूर्वक बोलण्याचा विशेष प्रयत्न केला पाहिजे. यामुळे, मोकळ्या व प्रामाणिक संवादाकरता पोषक वातावरण तयार होईल. एका पतीने आपला अनुभव आठवून म्हटले, “लग्नाची सुरुवातीची वर्षं आनंददायक तर असतात, पण कधीकधी त्याच सुरुवातीच्या काळात खूप मनस्तापही होऊ शकतो. तुम्ही एकमेकांच्या भावनांशी, सवयींशी व गरजांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा कधीकधी थोडा तणाव निर्माण होतो! पण तुम्ही दोघांनीही समजूतदारपणा दाखवला, लहानसहान गोष्टी मनाला लावून न घेता नम्रता व सहनशीलता यांसारखे गुण प्रदर्शित केले व यहोवावर विसंबून राहिलात, तर तुम्हा दोघांना एकमेकांशी जुळवून घेणं सोपं जाईल.” हे शब्द किती खरे आहेत!

खरी नम्रता दाखवा

१३. एका सुदृढ व आनंदी वैवाहिक नातेसंबंधात नम्रता दाखवणे महत्त्वाचे का आहे?

१३ विवाहातील उत्तम संवाद हा एखाद्या बागेतून संथपणे वाहणाऱ्‍या झऱ्‍यासारखा असतो. हा झरा अडथळ्याविना वाहत राहण्यासाठी, पती-पत्नीने “नम्र मनाचे” असणे अत्यंत गरजेचे आहे. (१ पेत्र ३:८) अकरा वर्षांपासून विवाहित असलेल्या एका बांधवाने म्हटले, “मतभेद लवकरात लवकर सोडवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे नम्रपणा दाखवणे. कारण तुम्ही नम्र असाल, तर ‘माझं चुकलं’ असं म्हणायला तुम्ही मागंपुढं पाहणार नाही.” २० वर्षांपासून आनंदी वैवाहिक जीवन अनुभवत असलेल्या एका वडिलांनी असे म्हटले: “‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ यापेक्षा ‘माझं चुकलं’ हे म्हणणं कधीकधी जास्त महत्त्वाचं असतं.” पुढे त्यांनी म्हटले: “नम्रपणा दाखवण्याकरता सर्वात सोपा उपाय म्हणजे प्रार्थना करणं. माझी पत्नी व मी दोघं मिळून यहोवाला प्रार्थना करतो, तेव्हा आम्हाला स्वतःच्या अपरिपूर्णतेची आणि देवानं आपल्या सर्वांना दाखवलेल्या अगाध कृपेची आपोआपच आठवण होते. आणि यामुळं मला योग्य दृष्टिकोनानं विचार करण्यास साहाय्य मिळतं.”

आपल्या विवाह जोडीदाराशी उत्तम संवाद साधा

१४. गर्विष्ठपणामुळे वैवाहिक नातेसंबंधावर कोणता परिणाम होऊ शकतो?

१४ पण गर्विष्ठ मनोवृत्तीमुळे कधीही समस्या सुटत नाहीत. उलट, त्यामुळे सुसंवादात अडथळा निर्माण होतो कारण गर्विष्ठ व्यक्‍तीला आपली चूक कबूल करण्याची इच्छा नसते आणि तसे करण्याचे धैर्यही नसते. “माझं चुकलं, मला क्षमा कर,” असं नम्रपणे म्हणण्याऐवजी अशी व्यक्‍ती निमित्ते सांगते. आपले दोष पदरी घेण्याचे धैर्य दाखवण्याऐवजी, गर्विष्ठ व्यक्‍ती दुसऱ्‍याच्या व्यक्‍तिमत्त्वातील दोष दाखवते. तिचे मन दुखावल्यास शांती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी ती व्यक्‍ती कठोर शब्दांत आपला राग व्यक्‍त करते किंवा मग अबोला धरते. (उप. ७:९) खरोखर, गर्विष्ठपणा वैवाहिक नातेसंबंधाला मारक ठरू शकतो. “देव गर्विष्ठांना विरोध करितो, आणि लीनांवर कृपा करितो,” हे नेहमी आठवणीत ठेवणे गरजेचे आहे.—याको. ४:६.

१५. इफिसकर ४:२६, २७ यातील तत्त्वाचे पालन केल्यामुळे एका विवाहित जोडप्याला त्यांच्यात निर्माण होणारे मतभेद सोडवणे कशा प्रकारे शक्य होईल हे स्पष्ट करा.

१५ अर्थात, पती व पत्नी कधीच गर्विष्ठपणे प्रतिक्रिया दाखवणार नाहीत असे नाही. गर्विष्ठपणा ओळखून लगेच त्यावर मात करण्यासाठी पाऊल उचलणे गरजेचे आहे. पौलाने आपल्या ख्रिस्ती बांधवांना असे सांगितले: “तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये, आणि सैतानाला वाव देऊ नका.” (इफिस. ४:२६, २७) पती-पत्नीने देवाच्या वचनातील सल्ल्याचे पालन न केल्यास ते स्वतःहून आपल्यावर दुःख ओढवून घेतील. एक बहीण खेदाने म्हणते, “काही प्रसंगी मी व माझ्या पतीनं इफिसकरांस ४:२६, २७ यातील शब्दांचं पालन केलं नाही. मला आठवतं, जेव्हा जेव्हा असं घडलं तेव्हा तेव्हा मी संपूर्ण रात्र झोपू शकले नाही!” त्याऐवजी, संबंध पुन्हा सुरळीत करण्याचा उद्देश समोर ठेवून लगेच आपसात चर्चा करणे किती चांगले ठरेल! अर्थात, तुमचे मन शांत होण्यासाठी तुम्हाला एकमेकांना थोडा वेळ द्यावा लागेल. तसेच, पती व पत्नीने नम्र मनोवृत्ती दाखवण्यास मदत करावी म्हणून यहोवाला प्रार्थनाही केली पाहिजे. यामुळे त्या दोघांना केवळ स्वतःच्याच भावनांचा विचार न करता, झालेला मतभेद सोडवण्यावर लक्ष केंद्रित करणे शक्य होईल.—कलस्सैकर ३:१२, १३ वाचा.

१६. नम्र मनोवृत्तीमुळे पती व पत्नीला आपल्या कौशल्यांबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगणे कसे शक्य होईल?

१६ नम्रता व विनयशीलता हे गुण एका विवाहित व्यक्‍तीला तिच्या जोडीदाराच्या चांगल्या गुणांची कदर करण्यास साहाय्य करतील. उदाहरणार्थ, एका पत्नीमध्ये काही विशेष गुण असतील ज्यांमुळे सबंध कुटुंबाला फायदा होतो. जर तिचा पती नम्र व विनयशील असेल, तर तो तिला आपला प्रतिस्पर्धी मानणार नाही. उलट, तो तिला तिच्या चांगल्या गुणांचा उपयोग करण्याचे प्रोत्साहन देईल. अशा प्रकारे तो दाखवून देईल की त्याचे तिच्यावर मनापासून प्रेम आहे आणि त्याच्या दृष्टीने ती खूप मौल्यवान आहे. (नीति. ३१:१०, २८; इफिस. ५:२८, २९) त्याच प्रकारे, एक नम्र व विनयशील पत्नीदेखील कधीही स्वतःच्या कौशल्यांबद्दल फुशारकी मारणार नाही किंवा आपल्या पतीला हिणवणार नाही. काही झाले, तरी ती दोघे “एकदेह” आहेत, आणि त्यामुळे जी गोष्ट एकाला दुखावते, ती साहजिकच दुसऱ्‍यालाही दुखावेल.—मत्त. १९:४, ५.

१७. विवाह आनंदी होण्यासाठी व त्यामुळे यहोवाचा महिमा होण्यासाठी कोणत्या गोष्टी साहाय्य करू शकतात?

१७ तुमचा विवाह अब्राहाम व सारा किंवा इसहाक व रिबका यांच्या विवाहासारखा—खऱ्‍या अर्थाने आनंदी व टिकाऊ असावा आणि त्यामुळे यहोवाचा महिमा व्हावा असे तुम्हालाही वाटत नाही का? तर मग, विवाहाबाबत नेहमी देवाच्या दृष्टिकोनाला जडून राहा. समंजसपणा व बुद्धी मिळवण्याकरता त्याच्या वचनाचा अभ्यास करा. एकमेकांच्या चांगल्या गुणांची कदर करा, ज्यामुळे तुमचे आपसातील प्रेम दिवसेंदिवस वाढत जाईल. (गीत. ८:६) नम्रता उत्पन्‍न करण्यास झटा. तुमच्या सोबत्याशी आदराने वागा. जर तुम्ही या गोष्टी केल्या, तर तुमच्या विवाहामुळे तुम्हालाच नव्हे तर तुमच्या स्वर्गीय पित्यालाही आनंद होईल. (नीति. २७:११) सत्तावीस वर्षांपासून विवाहित असलेल्या एका बांधवाने म्हटले: “माझ्या पत्नीशिवाय जीवन जगण्याची मी कल्पनाही करू शकत नाही. आमचं यहोवावर प्रेम असल्यामुळं आणि आम्ही सतत एकमेकांशी मोकळेपणानं संवाद करत असल्यामुळं आमचं नातं दिवसेंदिवस आणखी घनिष्ठ होतंय.” तुमचेही विवाहबंधन इतकेच घनिष्ठ बनू शकते!