व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पालकांनो, मुलांनो—प्रेमळपणे संवाद साधा

पालकांनो, मुलांनो—प्रेमळपणे संवाद साधा

“प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असावा.”—याको. १:१९.

१, २. एकमेकांबद्दल आईबाबा आणि मुलांच्या भावना सहसा काय असतात, पण कधीकधी त्यांना कोणत्या समस्येला तोंड द्यावे लागते?

 अमेरिकेतील शेकडो मुलांना पुढील प्रश्‍न विचारण्यात आला होता: “समजा, तुम्हाला कुठूनतरी कळलं की तुमचे आईबाबा उद्या मरण पावणार आहेत, तर आज तुम्हाला त्यांना कोणती सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगाविशी वाटेल?” कोणत्याही समस्यांबद्दल किंवा मतभेदांबद्दल बोलण्याऐवजी, ९५ टक्के मुलांनी म्हटले की ते आपल्या पालकांना असे सांगतील: “माझं चुकलं” आणि “माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे.”—फॉर पॅरेन्ट्‌स ओन्ली, शॉन्टी फेल्डहॉन आणि लीसा राईस यांच्याद्वारे.

सर्वसाधारणत:, मुले आपल्या आईबाबांवर आणि आईबाबा आपल्या मुलांवर प्रेम करतात. खासकरून साक्षीदार कुटुंबांमध्ये हे पाहायला मिळते. असे असले, तरी कधीकधी त्यांना एकमेकांशी संवाद साधणे कठीण वाटू शकते. असे का घडते? पालक आणि मुले काही विषयांवर बोलण्याचे पूर्णपणे का टाळतात? उत्तम संवादातील काही अडथळे कोणते आहेत? त्यांवर मात कशी करता येईल?

विकर्षणे आणि एकाकीपणा या गोष्टींना तुमच्या कुटुंबातील संवादात अडथळा निर्माण करू देऊ नका

संवाद साधण्यासाठी वेळ काढा

३. (क) अनेक कुटुंबांना सुसंवाद साधणे कठीण का वाटते? (ख) प्राचीन इस्राएलमध्ये कुटुंबातील सदस्यांकरता एकमेकांसोबत वेळ घालवणे ही एक समस्या का नव्हती?

अनेक कुटुंबांना अर्थपूर्ण संवाद साधण्यासाठी पुरेसा वेळ काढणे कठीण वाटते. पण, असे नेहमीच नव्हते. मोशेने इस्राएल राष्ट्रातील वडिलांना असे सांगितले: “त्या [देवाने आज्ञा केलेल्या गोष्टी] तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता त्यांविषयी बोलत जा.” (अनु. ६:६, ७) त्या काळात, मुले दिवसभर एकतर आईसोबत घरी असायची किंवा वडिलांसोबत शेतात किंवा कामाच्या ठिकाणी असायची. एकमेकांच्या सान्‍निध्यात राहण्यासाठी आणि संभाषण करण्यासाठी आईबाबा व मुलांजवळ भरपूर वेळ असायचा. त्यामुळे, आईबाबांना आपल्या मुलांच्या गरजांविषयी, इच्छांविषयी आणि व्यक्‍तिमत्त्वाविषयी जाणून घेणे सोपे जायचे. त्याचप्रमाणे, आईबाबांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मुलांकडेही वेळ व भरपूर संधी असायच्या.

४. आज अनेक कुटुंबांमध्ये संवाद होताना का पाहायला मिळत नाही?

पण, आजची स्थिती किती वेगळी आहे! काही देशांमध्ये, मुले अगदी कोवळ्या वयातच बालवाडीत जायला लागतात; केव्हा केव्हा तर मुले दोन वर्षांची असतानाच. बरेच आईवडील घरापासून दूर असलेल्या ठिकाणी काम करतात. आईबाबा व मुले जो थोडासा वेळ सोबत घालवतात, तोदेखील सहसा टीव्ही पाहण्यात, कम्प्युटरवर काहीतरी करण्यात आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा उपयोग करण्यात जातो. अनेकांच्या बाबतीत पाहिल्यास, मुले व पालक स्वतंत्र जीवन जगतात; ते एकमेकांसाठी अक्षरशः अनोळखी व्यक्‍तींसारखे असतात. अशा कुटुंबांमध्ये अर्थपूर्ण संभाषण जवळजवळ होतच नाही.

५, ६. मुलांसोबत आणखी जास्त वेळ घालवता यावा म्हणून काही पालक कशा प्रकारे वेळ काढतात?

आपल्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवता यावा म्हणून तुम्ही इतर गोष्टींतून वेळ काढू शकता का? (इफिसकर ५:१५, १६ वाचा.) काही कुटुंबे टीव्ही पाहण्याच्या व कम्प्युटरचा वापर करण्याच्या वेळेत कपात करण्याचे ठरवतात. इतर कुटुंबे कमीत कमी एक वेळचे जेवण सोबत करण्याचा प्रयत्न करतात. आणि कौटुंबिक उपासनेच्या व्यवस्थेमुळे आईवडिलांना व मुलांना एकमेकांच्या आणखी जवळ येण्याची व आध्यात्मिक गोष्टींवर चर्चा करण्याची किती उत्तम संधी मिळते! कौटुंबिक उपासनेकरता दर आठवड्याला एक तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ काढणे चांगलेच आहे, पण मनमोकळेपणाने संवाद साधण्यासाठी आणखीही काही करणे गरजेचे आहे. त्यासाठी पालकांनी व मुलांनी एकमेकांशी नेहमी संवाद केला पाहिजे. तुमची लहान मुले शाळेत जायला निघण्याआधी त्यांच्याशी काहीतरी प्रोत्साहनदायक असे बोला, दैनिक वचनावर चर्चा करा, किंवा त्यांच्यासोबत प्रार्थना करा. असे केल्याने, तुमच्या मुलांचा दिवस खूप चांगला जाऊ शकतो.

आपल्या लहान मुलांसोबत जास्त वेळ घालवता यावा म्हणून काही पालकांनी जीवनात बरेच बदल केले आहेत. उदाहरणार्थ, दोन मुलांची आई असलेल्या लॉरा * हिने आपली पूर्ण वेळेची नोकरी सोडली. ती म्हणते: “रोज सकाळी आम्ही सर्व जण कामावर किंवा शाळेत जाण्यासाठी घाईघाईत घराबाहेर पडायचो. संध्याकाळी मी कामावरून परत यायचे तोपर्यंत आयानं मुलांना झोपवलेलं असायचं. मी नोकरी सोडल्यामुळं आम्हाला आता कमी पैशात भागवावं लागतं; पण मला वाटतं, की आता मी माझ्या मुलांचे विचार व समस्या चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकते. ते प्रार्थनेत काय म्हणतात ते मी लक्ष देऊन ऐकते आणि त्यामुळं मी त्यांचं मार्गदर्शन करू शकते, त्यांना प्रोत्साहन देऊ शकते आणि त्यांना शिकवू शकते.”

“ऐकावयास तत्पर” असा

७. मुले व पालक यांची एक सामान्य तक्रार कोणती आहे?

फॉर पॅरेन्ट्‌स ओन्ली या पुस्तकाच्या लेखकांनी अनेक मुलांच्या मुलाखती घेतल्या तेव्हा त्यांना उत्तम संवादातील आणखी एक अडथळा दिसून आला. ते म्हणतात: “मुलांची आपल्या आईबाबांबद्दल सर्वात मोठी तक्रार म्हणजे, ‘ते आमचं ऐकूनच घेत नाहीत.’” ही समस्या केवळ मुलांचीच नाही. आईवडीलदेखील आपल्या मुलांबद्दल वारंवार अशीच तक्रार करतात. तेव्हा, मनमोकळेपणाने संवाद साधता यावा यासाठी कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांचे म्हणणे खऱ्‍या अर्थाने ऐकून घेतले पाहिजे.—याकोब १:१९ वाचा.

८. पालक आपल्या मुलांचे म्हणणे खऱ्‍या अर्थाने कसे ऐकू शकतात?

पालकांनो, तुम्ही आपल्या मुलांचे बोलणे खरोखर ऐकता का? जेव्हा तुम्ही थकलेले असता किंवा संभाषण किरकोळ विषयांबद्दल आहे असे तुम्हाला वाटते तेव्हा मुलांच्या बोलण्याकडे लक्ष देणे तुम्हाला कदाचित कठीण जाऊ शकते. पण, जो विषय तुम्हाला किरकोळ वाटतो तो तुमच्या मुलांकरता कदाचित खूप महत्त्वाचा असेल. तेव्हा, “ऐकावयास तत्पर” असणे याचा अर्थ, तुमचा मुलगा किंवा मुलगी काय बोलत आहे याकडे लक्ष देणे इतकाच होत नाही, तर तो किंवा ती आपल्या भावना कशा प्रकारे व्यक्‍त करत आहे त्याकडेही लक्ष देणे असा होतो. तुमच्या मुलाला कसे वाटते ते त्याच्या किंवा तिच्या बोलण्यावरून आणि हावभावांवरून दिसून येऊ शकते. त्यांना प्रश्‍न विचारणेदेखील महत्त्वाचे आहे. बायबल म्हणते: “माणसाच्या मनातले विचार खोल पाण्यासारखे असतात. समंजस माणूस मात्र ते बरोबर बाहेर काढतो.” (नीति. २०:५, मराठी कॉमन लँग्वेज) तुम्ही अशा एखाद्या विषयावर चर्चा करत असाल ज्याबद्दल बोलायला तुमची मुले कचरत असतील, तर खासकरून अशा वेळी तुम्हाला समंजसपणे व बुद्धीने त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यावे लागेल.

९. मुलांनी आईबाबांचे म्हणणे का ऐकले पाहिजे?

मुलांनो, तुम्ही आपल्या आईबाबांच्या आज्ञांचे पालन करता का? देवाचे वचन म्हणते: “माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको.” (नीति. १:८) लक्षात असू द्या, तुमचे आईबाबा तुमच्यावर प्रेम करतात, आणि तुमचे भले व्हावे असे त्यांना मनापासून वाटते; म्हणून त्यांचे म्हणणे ऐकणे आणि त्यांच्या आज्ञांचे पालन करणे सुज्ञपणाचे आहे. (इफिस. ६:१) जेव्हा आईबाबांसोबत तुमचा चांगला संवाद होतो आणि ते आपल्यावर प्रेम करतात हे तुम्ही लक्षात ठेवता, तेव्हा तुम्हाला त्यांच्या आज्ञांचे पालन करणे सोपे जाते. म्हणून, एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आपल्या आईबाबांना सांगा. असे केल्याने, तुमच्या मनात काय आहे हे समजून घेण्यास त्यांना मदत होईल. अर्थात, तुम्हीदेखील त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

१०. बायबलमधील रहबाम याच्या वृत्तान्तावरून आपण काय शिकतो?

१० तुमच्या वयाच्या मुलांचा सल्ला ऐकण्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. तुम्ही जे ऐकू इच्छिता तेच ते तुम्हाला सांगतील, पण कदाचित त्यांच्या सल्ल्याचा तुम्हाला मुळीच फायदा होणार नाही. उलट, त्यामुळे तुमचे नुकसानच होऊ शकते. लहान मुलांजवळ मोठ्यांप्रमाणे बुद्धी व अनुभव नसल्यामुळे, त्यांच्याजवळ दूरदृष्टी नसते आणि त्यामुळे एखादी गोष्ट केल्याने त्याचे दूरगामी परिणाम काय होऊ शकतात हे ते कदाचित समजू शकणार नाहीत. शलमोन राजाचा मुलगा रहबाम याचे उदाहरण आठवा. तो इस्राएलचा राजा बनला तेव्हा त्याने वयोवृद्ध लोकांचा सल्ला ऐकला असता तर किती बरे झाले असते! त्याऐवजी, त्याने त्याच्यासोबत लहानाचे मोठे झालेल्या तरुणांचा मूर्ख सल्ला ऐकला. आणि त्यामुळे त्याने त्याच्या राज्यातील बहुतेक लोकांचा पाठिंबा गमावला. (१ राजे १२:१-१७) तेव्हा, रहबामाच्या निर्बुद्ध मार्गाचे अनुकरण करण्याऐवजी, तुमच्या आईवडिलांसोबत मनमोकळा संवाद साधण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनातील विचार त्यांना कळू द्या. त्यांच्या सल्ल्याचे पालन करा आणि त्यांच्या सुज्ञतेपासून शिका.—नीति. १३:२०.

११. आईवडील मुलांचे ऐकण्यास तयार नसल्यास काय घडू शकते?

११ पालकांनो, तुमच्या मुलांनी सल्ल्याकरता समवयस्कांकडे पाहू नये अशी तुमची इच्छा असेल, तर कोणत्याही विषयावर तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलण्यास त्यांना वाव द्या. एका किशोरवयीन बहिणीने असे लिहिले: “मी एखाद्या मुलाचं नाव जरी घेतलं की आईबाबा लगेच अस्वस्थ होतात. त्यामुळं मला अवघडल्यासारखं होतं आणि पुढं बोलावसंच वाटत नाही.” आणखी एका तरुण बहिणीने लिहिले: “अनेक किशोरवयीन मुलांना आपल्या पालकांचा सल्ला हवा असतो, पण पालकांनी त्यांच्या बोलण्याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही, तर जे त्यांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकतील अशा कुणाकडेही ते सल्ल्यासाठी जातील, मग त्यांच्याजवळ अनुभव नसला तरीही.” तुमच्या मुलांना तुमच्याशी कोणत्याही विषयावर बोलायचे असो, जर तुम्ही प्रेमळपणे आपल्या मुलांचे ऐकण्यास तयार असाल, तर ते तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलतील आणि तुमचे मार्गदर्शन स्वीकारण्यास तयार असतील.

“बोलावयास” धीमे असा

१२. पालक ज्या प्रकारे प्रतिक्रिया व्यक्‍त करतात त्यामुळे मुलांसोबतच्या संवादात कशा प्रकारे अडथळा निर्माण होऊ शकतो?

१२ मुले पालकांना जे काही सांगतात त्यावर पालकांची प्रतिक्रिया भावनात्मक आणि नकारात्मक असेल, तर ही गोष्टदेखील सुसंवादात एक अडथळा निर्माण करू शकते. ख्रिस्ती आईवडील आपल्या मुलांचे संरक्षण करू इच्छितात ही गोष्ट समजण्याजोगी आहे. कारण, या “शेवटल्या” दिवसांत मुलांच्या आध्यात्मिकतेला धोका निर्माण करणाऱ्‍या अनेक गोष्टी आहेत. (२ तीम. ३:१-५) पण, ज्या गोष्टी मुलांच्या संरक्षणासाठी आहेत असे आईवडिलांना वाटते, त्या मुलांना बंधनकारक वाटू शकतात.

१३. पालकांनी आपले मत तडकाफडकी व्यक्‍त करण्याविषयी सावध का असले पाहिजे?

१३ पालकांनी त्यांचे मत तडकाफडकी व्यक्‍त करण्याविषयी सावध असले पाहिजे. हे खरे आहे, की जेव्हा तुमची मुले तुम्हाला एखाद्या चिंताजनक गोष्टीविषयी सांगतात तेव्हा शांत राहणे नेहमीच सोपे नसते. पण, काहीही बोलण्याआधी त्यांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकणे महत्त्वाचे आहे. बुद्धिमान राजा शलमोन याने लिहिले: “ऐकून घेण्यापूर्वी जो उत्तर देतो त्याचे ते करणे मूर्खपणाचे व लज्जास्पद ठरते.” (नीति. १८:१३) तुम्ही जर शांत राहून आपल्या मुलांचे बोलणे ऐकले, तर ती मनमोकळेपणाने बोलतील. त्यांना मदत करायची असेल, तर तुम्ही त्यांचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घेणे गरजेचे आहे. त्यांच्या हृदयात घालमेल चालली असेल आणि त्यामुळे त्यांचे “बोलणे मर्यादेबाहेर गेले” असेल. (ईयो. ६:१-३) तेव्हा प्रेमळ पालक या नात्याने तुमच्या मुलांचे लक्षपूर्वक ऐका आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा; असे केल्याने, तुम्हाला त्यांच्याशी अशा रीतीने बोलता येईल ज्यामुळे त्यांना मदत मिळेल.

१४. मुलांनी बोलावयास धीमे का असले पाहिजे?

१४ मुलांनो, तुम्हीदेखील बोलावयास धीमे असा. तुमच्या पालकांच्या बोलण्यावर लगेच आक्षेप घेऊ नका. कारण, तुम्हाला शिक्षण देण्याची जबाबदारी त्यांना देवाकडून मिळाली आहे. (नीति. २२:६) तुम्ही ज्या परिस्थितीतून सध्या जात आहात, त्या परिस्थितीतून कदाचित ते स्वतः गेले असतील. शिवाय, तरुण असताना त्यांनी ज्या चुका केल्या असतील त्यांबद्दल आता त्यांना वाईट वाटत असेल, आणि त्या चुका तुमच्या हातून घडू नयेत म्हणून तुमचे संरक्षण करण्याची त्यांची मनस्वी इच्छा असेल. तेव्हा, तुमचे आईवडील तुमचे शत्रू नव्हेत, तर तुमचे मित्र आणि मार्गदर्शक आहेत या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहा. (नीतिसूत्रे १:५ वाचा.) आपल्या आईवडिलांचा आदर करा आणि जसे त्यांचे तुमच्यावर प्रेम आहे, तसेच तुमचेही त्यांच्यावर प्रेम आहे हे त्यांना दाखवा. असे केल्याने, यहोवाच्या “शिस्तीत व शिक्षणात” तुम्हाला वाढवणे त्यांना सोपे जाईल.—इफिस. ६:२, ४.

“रागास मंद” असा

१५. आपल्या प्रियजनांसोबत सहनशीलतेने वागण्यास व शांत राहण्यास आपल्याला कोणती गोष्ट मदत करेल?

१५ आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यासोबत नेहमीच सहनशीलतेने वागतो असे नाही. “कलस्सै येथील पवित्र जनांस म्हणजे ख्रिस्तातील विश्‍वास ठेवणाऱ्‍या बंधूंस” प्रेषित पौलाने असे लिहिले: “पतींनो, तुम्ही आपआपल्या पत्नीवर प्रीती करा, व तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका; आणाल तर ती खिन्‍न होतील.” (कलस्सै. १:१, २; ३:१९, २१) पौलाने इफिसकरांना असे प्रोत्साहन दिले: “सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही, अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येवोत.” (इफिस. ४:३१) आपण देवाच्या आत्म्याच्या फळाचे पैलू अर्थात सहनशीलता, सौम्यता आणि संयम हे गुण विकसित केल्यास, तणावपूर्ण स्थितीतही शांत राहण्यास आपल्याला साहाय्य मिळेल.—गलती. ५:२२, २३.

१६. येशूने त्याच्या शिष्यांची सुधारणूक कशी केली, आणि हे उल्लेखनीय का आहे?

१६ येशूने आपल्या प्रेषितांसोबत शेवटले भोजन केले त्या रात्री तो किती तीव्र तणावातून जात होता याची कल्पना करा. येशूला माहीत होते की काही तासांतच त्याला वेदनादायक मृत्यूचा सामना करावा लागेल. त्याच्या पित्याच्या नावाचे पवित्रीकरण आणि संपूर्ण मानवजातीचे तारण त्याच्या विश्‍वासू राहण्यावरच अवलंबून होते. पण, त्या शेवटल्या भोजनाच्या वेळी “आपणामध्ये कोण मोठा मानला जात आहे” याविषयी “[त्याच्या प्रेषितांमध्ये] वाद झाला.” त्या वेळी येशू त्यांच्यावर खेकसला नाही किंवा त्यांच्याशी कटुतेने वागला नाही. त्याऐवजी, त्याने शांतपणे त्यांच्याशी तर्क केला. येशूने त्यांना आठवण करून दिली की परीक्षेच्या काळात ते त्याला जडून राहिले होते. सैतान त्यांची परीक्षा घेणार असला, तरी ते विश्‍वासू राहतील असा भरवसा त्याने व्यक्‍त केला. शिवाय, त्याने त्यांच्यासोबत एक करारदेखील केला.—लूक २२:२४-३२.

पालकांनो, तुम्ही मुलांचे बोलणे लक्ष देऊन ऐकता का?

१७. शांत राहण्यास मुलांना कोणती गोष्ट मदत करेल?

१७ मुलांनीदेखील शांत राहणे गरजेचे आहे. खासकरून मुले जेव्हा किशोरवयात पदार्पण करतात तेव्हा त्यांना वाटू शकते की आईवडिलांचा आपल्यावर भरवसा नसल्यामुळे आपल्याला ते सूचना देत असतात. असे कधी वाटल्यास, आठवणीत ठेवा की तुमच्या पालकांचे तुमच्यावर प्रेम आहे आणि त्यामुळे त्यांना तुमची काळजी वाटते. तुम्ही त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतल्यास आणि त्यांना सहकार्य केल्यास, ते तुमचा आदर करतील व त्यांच्या दृष्टीत तुम्ही एक जबाबदार व्यक्‍ती बनाल. त्यामुळे, तुमचे आईबाबा काही बाबतींत तुम्हाला आणखी जास्त स्वातंत्र्य देतील. म्हणून संयम बाळगण्यातच सुज्ञपणा आहे हे लक्षात ठेवा. एका नीतिसूत्रात असे म्हटले आहे: “मूर्ख आपल्या मनातील सर्व क्रोध व्यक्‍त करितो, पण सुज्ञ तो मागे आवरून ठेवितो.”—नीति. २९:११.

१८. प्रेमामुळे सुसंवाद कशा प्रकारे शक्य होतो?

१८ म्हणून, प्रिय पालकांनो आणि मुलांनो, तुमच्या कुटुंबात जर तुम्हाला वाटतो तसा मनमोकळा संवाद होत नसेल, तर निराश होऊ नका. त्यासाठी मेहनत करा आणि सत्याच्या मार्गावर चालत राहा. (३ योहा. ४) नवीन जगात, सर्व लोक परिपूर्ण असतील, तेव्हा त्यांच्यामध्ये कोणतेही गैरसमज व मतभेद नसतील, आणि त्यांच्यातील संवादही परिपूर्ण असेल. पण, सध्या तरी आपण सर्वच जण अशा गोष्टी करतो ज्यांचा नंतर आपल्याला पस्तावा होतो. म्हणून माफी मागण्यास मागेपुढे पाहू नका. एकमेकांना मनापासून क्षमा करा. “प्रेमाने . . . एकमेकांशी बांधले” जा. (कलस्सै. २:२) प्रेमात खूप ताकद आहे. प्रेम “सहनशील आहे, परोपकारी आहे.” ते “चिडत नाही, अपकार स्मरत नाही.” ते “सर्व काही सहन करिते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते.” (१ करिंथ. १३:४-७) तेव्हा, प्रेम विकसित करण्यासाठी झटत राहा. असे केल्यास, तुमच्यातील सुसंवाद आणखीनच बहरेल आणि त्यामुळे तुमचे कुटुंब आनंदी बनेल व यहोवाची स्तुती होईल.

^ नाव बदलण्यात आले आहे.