व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

योग्य निवडी करून तुमचा वारसा सुरक्षित ठेवा

योग्य निवडी करून तुमचा वारसा सुरक्षित ठेवा

“वाइटाचा वीट माना; बऱ्‍याला चिकटून राहा.”—रोम. १२:९.

१, २. (क) देवाची सेवा करण्याचा निर्णय तुम्ही कोणत्या आधारे घेतला? (ख) आपल्या आध्यात्मिक वारशासंबंधी आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचारू शकतो?

 आपल्यापैकी लक्षावधी लोकांनी आयुष्यभर यहोवा देवाची सेवा करण्याची आणि येशू ख्रिस्ताच्या पाऊलखुणांचे अनुसरण करण्याची योग्य निवड केली आहे. (मत्त. १६:२४; १ पेत्र २:२१) यहोवाला केलेल्या या समर्पणाला आपण मुळीच हलके समजत नाही. कारण यहोवाची सेवा करण्याची आपली निवड काही मोजक्या शास्त्रवचनांच्या उथळ ज्ञानावर नव्हे, तर देवाच्या वचनाच्या सखोल अभ्यासावर आधारित होती. या अभ्यासामुळे, यहोवा देवाबद्दलचे आणि येशू ख्रिस्ताबद्दलचे अचूक ज्ञान घेणाऱ्‍यांसाठी देवाने जो वारसा राखून ठेवला आहे त्याबद्दलचे अनेक तपशील आपण शिकलो आणि आपला विश्‍वास आणखी दृढ झाला.—योहा. १७:३; रोम. १२:२.

ख्रिस्ती या नात्याने विश्‍वासात टिकून राहण्यासाठी आपण जीवनात नेहमी अशा निवडी केल्या पाहिजेत ज्यांमुळे आपला स्वर्गीय पिता खूश होईल. त्यामुळे या लेखात आपण पुढील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे पाहणार आहोत: काय आहे आपला वारसा? त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे? काहीही झाले तरी आपण आपला वारसा गमावणार नाही याची खातरी आपण कशी बाळगू शकतो? जीवनात योग्य निवडी करण्यास कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

काय आहे आपला वारसा?

३. (क) अभिषिक्‍त जन आणि (ख) “दुसरी मेंढरे” यांच्यासाठी कोणता वारसा राखून ठेवला आहे?

ख्रिश्‍चनांपैकी काही मूठभर जण, “अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन” मिळवण्याची म्हणजे ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करण्याचा बहुमोल विशेषाधिकार प्राप्त करण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. (१ पेत्र १:३, ४) हा वारसा मिळवण्यासाठी त्यांनी “नव्याने” जन्म घेणे आवश्‍यक आहे. (योहा. ३:१-३) पण, राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यात अभिषिक्‍त जनांना साथ देणाऱ्‍या येशूच्या दुसऱ्‍या मेंढरांपैकी असलेल्या लक्षावधी लोकांसाठी कोणता वारसा राखून ठेवला आहे? (योहा. १०:१६) या दुसऱ्‍या मेंढरांना तो वारसा मिळेल जो आदाम आणि हव्वेला कधीही मिळाला नाही; तो म्हणजे नंदनवन पृथ्वीवरील सार्वकालिक जीवन ज्यात दुःख, मरण किंवा शोक नसेल. (प्रकटी. २१:१-४) आणि म्हणूनच, येशूच्या शेजारी वधस्तंभावर खिळलेल्या गुन्हेगाराला येशू असे अभिवचन देऊ शकला: “मी तुला आज खचित सांगतो, की तू माझ्याबरोबर नंदनवनात असशील.”—लूक २३:४३, NW.

४. आजसुद्धा आपण कोणते आशीर्वाद अनुभवतो?

भविष्यात मिळणाऱ्‍या या वारशाचे अनेक आशीर्वाद आपण आजही अनुभवत आहोत. जसे की, ख्रिस्त येशूच्या “खंडणी” बलिदानावर विश्‍वास दाखवल्यामुळे आपल्याला मनाची शांती मिळते आणि देवाबरोबर आपण घनिष्ठ नातेसंबंध जोडू शकतो. (रोम. ३:२३-२५) तसेच, देवाच्या वचनात दिलेल्या अनेक अनमोल अभिवचनांबद्दल आपल्याला सुस्पष्ट समज प्राप्त झाली आहे. शिवाय, आपण एका प्रेमळ आंतरराष्ट्रीय बंधुसमाजाचा भाग आहोत ही विलक्षण आनंदाची गोष्ट आहे. आणि यहोवाचे साक्षीदार असण्याचा किती मोठा बहुमान आपल्याला लाभला आहे! साहजिकच, आपल्या वारशाची आपण मनापासून कदर करतो.

५. देवाच्या लोकांसंबंधी सैतानाने नेहमीच काय करण्याचा प्रयत्न केला, आणि कोणती गोष्ट आपल्याला सैतानाच्या डावपेचांपुढे टिकाव धरण्यास मदत करू शकते?

पण, आपला हा अद्‌भुत वारसा सुरक्षित ठेवण्यासाठी आपण सैतानाच्या डावपेचांसंबंधी सदैव जागरूक असले पाहिजे. देवाचे लोक आपला वारसा गमावून बसतील अशा निवडी करण्यास सैतानाने नेहमीच त्यांना प्रवृत्त केले आहे. (गण. २५:१-३, ९) सैतानाचा अंत जवळ आहे हे ओळखून तो आपल्याला मार्गभ्रष्ट करण्यासाठी जीव ओतून प्रयत्न करत आहे. (प्रकटीकरण १२:१२, १७ वाचा.) सैतानाच्या डावपेचांपुढे आपल्याला “टिकाव धरता यावा म्हणून” आपण आपला वारसा नेहमी बहुमोल समजला पाहिजे. (इफिस. ६:११) या बाबतीत कुलपिता इसहाकाचा ज्येष्ठ पुत्र एसाव याचे इशारेवजा उदाहरण आपल्यासमोर आहे. त्याच्यापासून आपण कोणते धडे शिकू शकतो?

एसावासारखी निवड करू नका

६, ७. एसाव कोण होता, आणि त्याला कोणता वारसा मिळणार होता?

जवळजवळ ४,००० वर्षांपूर्वी इसहाक आणि रिबका यांना एसाव आणि याकोब ही जुळी मुले झाली. ही मुले जुळी असली तरी त्यांचा स्वभाव, त्यांच्या आवडीनिवडी फार वेगळ्या होत्या. बायबल म्हणते: “एसाव हा रानात फिरणारा हुशार पारधी झाला; व याकोब हा साधा मनुष्य असून तंबूंत राहत असे.” (उत्प. २५:२७) बायबल अनुवादक रॉबर्ट ऑल्टर यांच्या मते, “साधा” असे भाषांतरित केलेल्या मूळ हिब्रू शब्दाचा अर्थ, “सात्विक किंवा निष्पाप” असा होतो.

एसाव आणि याकोब १५ वर्षांचे असताना त्यांचा आजोबा अब्राहाम मरण पावला. पण, अब्राहामाला दिलेले अभिवचन यहोवा विसरला नाही. पुढे यहोवाने तेच अभिवचन इसहाकाला दिले. पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे अब्राहामाच्या संततीद्वारे आशीर्वादित होतील असे यहोवाने इसहाकाला सांगितले. (उत्पत्ति २६:३-५ वाचा.) त्या अभिवचनावरून स्पष्ट झाले की मशीहा—उत्पत्ति ३:१५ मध्ये सांगितलेली विश्‍वासू “संतती”—अब्राहामाच्या वंशातून येणार होता. एसाव हा इसहाकाचा ज्येष्ठ पुत्र होता. त्याअर्थी, या अभिवचनावर त्याचा कायदेशीर हक्क होता. एसावाला किती अद्‌भुत वारसा मिळणार होता! पण, त्याने त्याची कदर केली का?

तुमचा आध्यात्मिक वारसा धोक्यात घालू नका

८, ९. (क) एसावाने आपल्या वारशासंबंधी कोणती निवड केली? (ख) पुढे अनेक वर्षांनंतर, एसावाने केलेल्या निवडीबद्दल त्याला काय कळून चुकले, आणि त्याची काय प्रतिक्रिया होती?

एकदा एसाव रानातून थकूनभागून घरी आला तेव्हा याकोब “वरण शिजवत” असल्याचे त्याने पाहिले. तो याकोबाला म्हणाला, “ते तांबडे दिसते ना, त्यातले काही मला चटकन खाऊ घाल, मी अगदी गळून गेलो.” त्यावर याकोब त्याला म्हणाला: “पहिल्याने तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क मला मोबदला दे.” एसावाने कोणती निवड केली? आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे तो म्हणाला: “मला आपल्या ज्येष्ठत्वाच्या हक्काचा काय उपयोग?” होय, केवळ एकवेळच्या जेवणासाठी एसावाने आपला ज्येष्ठत्वाचा हक्क देऊन टाकला. या सौद्याला कायदेशीर रूप देण्यासाठी याकोबाने असा आग्रह धरला: “आताच्या आता मजशी शपथ वाहा.” तेव्हा, एसावाने एका क्षणाचाही विचार न करता आपला ज्येष्ठत्वाचा हक्क त्याला देऊन टाकला. त्यानंतर, “याकोबाने एसावाला भाकर व मसुरीचे वरण दिले; तो खाऊनपिऊन उठला व चालता झाला; ह्‍याप्रमाणे एसावाने आपला ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ लेखिला.”—उत्प. २५:२९-३४.

पुढे अनेक वर्षांनंतर इसहाकाला जाणवले, की आपण आता जास्त दिवस जगणार नाही. त्या वेळी रिबकेने अशी एक योजना केली जेणेकरून एसावाने स्वतःच्या हाताने घालवलेला ज्येष्ठत्वाचा हक्क याकोबालाच मिळेल. आपण केलेली निवड किती चुकीची होती हे एसावाला कळून चुकले तेव्हा त्याने इसहाकाकडे हात पसरले: “बाबा, मलाही आशीर्वाद द्या. . . . आपण मजसाठीही काही आशीर्वाद राखून ठेविला नाही काय?” याकोबाला दिलेला आशीर्वाद आपण बदलू शकत नाही असे इसहाकाने एसावाला सांगितले तेव्हा: “एसाव हेल काढून रडला.”—उत्प. २७:३०-३८.

१०. एसाव आणि याकोब यांच्याकडे देवाने कोणत्या नजरेने पाहिले, आणि का?

१० एसावाच्या स्वभावातील कोणती गुणलक्षणे शास्त्रवचनांतून ठळकपणे दिसून येतात? एक म्हणजे, एसावाने दाखवून दिले की त्याच्या वारशाद्वारे त्याला मिळणाऱ्‍या आशीर्वादांपेक्षा शारीरिक इच्छा तृप्त करणे त्याच्यासाठी जास्त महत्त्वाचे होते. एसावाने आपल्या ज्येष्ठत्वाच्या हक्काची कदर केली नाही आणि त्यावरून त्याने दाखवून दिले की देवावरही त्याचे प्रेम नव्हते. दुसरे म्हणजे, आपल्या कृत्याचा पुढे आपल्या मुलाबाळांवर काय परिणाम होईल याचा त्याने विचार केला नाही. पण याच्या अगदी उलट, याकोबाने आपल्या वारशाची मनापासून कदर केली. उदाहरणार्थ, पत्नीची निवड करण्याच्या बाबतीत त्याच्या आईवडिलांनी दिलेल्या सल्ल्याचे त्याने तंतोतंत पालन केले. (उत्प. २७:४६–२८:३) त्यासाठी त्याला बराच धीर धरावा लागला, अनेक त्याग करावे लागले. त्यामुळे तो मशीहाचा पूर्वज बनला. एसाव आणि याकोब यांच्याकडे देवाने कोणत्या नजरेने पाहिले? त्यांच्याबद्दल मलाखी संदेष्ट्याद्वारे यहोवाने म्हटले: “मी याकोबावर प्रीती केली; एसावाचा द्वेष केला.”—मला. १:२, ३.

११. (क) एसावाचे उदाहरण आज ख्रिश्‍चनांसाठी लाभदायक का आहे? (ख) एसावाच्या कृत्याविषयी बोलताना पौलाने जारकर्माचा उल्लेख का केला?

११ बायबलमध्ये एसावाबद्दल जे सांगितले आहे त्याचा आज ख्रिश्‍चनांना काही फायदा होतो का? नक्कीच होतो. प्रेषित पौलाने आपल्या ख्रिस्ती बांधवांना असा सावधगिरीचा सल्ला दिला: “कोणी जारकर्मी होऊ नये, किंवा ज्याने एका जेवणासाठी आपले ज्येष्ठपण विकले त्या एसावासारखे कोणी ऐहिक बुद्धीचे होऊ नये, म्हणून ह्‍याकडे लक्ष द्या.” (इब्री १२:१५, १६) तो इशारा आजही ख्रिश्‍चनांना लागू होतो. जीवनात शारीरिक इच्छांना सर्वाधिक महत्त्व देऊन आपण आपला आध्यात्मिक वारसा गमावून बसू नये म्हणून पवित्र गोष्टींबद्दल आपण नेहमी मनस्वी कदर बाळगली पाहिजे. पण, एसावाच्या कृत्याविषयी बोलताना पौलाने जारकर्माचा उल्लेख का केला? कारण आपण जर एसावासारखी दैहिक मनोवृत्ती दाखवली, तर पवित्र गोष्टींचा त्याग करून आपण जारकर्मासारखे गंभीर पाप करण्याची जास्त शक्यता आहे.

आत्ताच मनाची तयारी करा

१२. (क) सैतान कशा प्रकारे आपल्या मार्गात प्रलोभने आणतो? (ख) आपल्यावर प्रलोभने येतात तेव्हा बायबलमधील कोणती उदाहरणे आपल्याला मदत करू शकतात?

१२ यहोवाचे सेवक असल्यामुळे, आपण जाणूनबुजून स्वतःला अशा परिस्थितीत घालणार नाही ज्यामुळे अनैतिक वर्तणूक करण्यास आपण प्रवृत्त होऊ. उलट, कोणी आपल्यावर अशा गोष्टी करण्याचे प्रलोभन आणले तर त्यास बळी पडू नये म्हणून आपण यहोवा देवाला प्रार्थना करतो. (मत्त. ६:१३) पण, नैतिकतेच्या बाबतीत रसातळाला गेलेल्या या जगात आपण यहोवाला विश्‍वासू राहण्याचा प्रयत्न करत असताना सैतान सतत आपल्या आध्यात्मिकतेवर घाला घालण्याचा प्रयत्न करतो. (इफिस. ६:१२) सैतान या दुष्ट जगाचा देव आहे; त्यामुळे आपल्या मार्गात प्रलोभने आणण्यासाठी आपल्या शारीरिक इच्छांचा वापर कसा करायचा हे त्याला चांगले ठाऊक आहे. (१ करिंथ. १०:८, १३) उदाहरणार्थ, अशी कल्पना करा की अनैतिक मार्गाने एखादी विशिष्ट इच्छा पुरी करण्याची संधी तुमच्यापुढे येते. अशा वेळी तुम्ही कोणती निवड करणार? एसावाप्रमाणे तुम्ही लगेच त्या प्रलोभनाला बळी पडून आपली इच्छा तृप्त करणार का? की याकोबाचा पुत्र योसेफ याच्याप्रमाणे त्या प्रलोभनाचा प्रतिकार करून तेथून पळ काढणार?—उत्पत्ति ३९:१०-१२ वाचा.

१३. (क) आपल्यापैकी अनेक जण कशा प्रकारे योसेफाप्रमाणे वागले, आणि काही जण एसावाप्रमाणे कसे वागले? (ख) एसावाप्रमाणे वागायचे नसल्यास काय करणे अत्यंत महत्त्वाचे आहे?

१३ आपल्या अनेक बंधुभगिनींपुढे असे प्रसंग आले जेव्हा एसावासारखे वागावे की योसेफासारखे, अशी निवड त्यांना करावी लागली. अनेकांनी योग्य निवड केली आणि यहोवाचे मन आनंदित केले. (नीति. २७:११) पण, आपले काही बंधुभगिनी एसावाप्रमाणे वागले आणि असे करण्याद्वारे त्यांनी आपला आध्यात्मिक वारसा धोक्यात घातला. किंबहुना, दर वर्षी ख्रिस्ती मंडळ्यांमध्ये ज्या अनेक न्यायिक कारवाया केल्या जातात आणि बहिष्कृत करण्याची जी अनेक प्रकरणे घडतात ती मुळात अनैतिक वर्तणुकीमुळेच घडतात. तेव्हा, आत्ताच म्हणजे आपल्या विश्‍वासाची परीक्षा घेणारे प्रसंग आपल्यावर ओढवण्याआधीच आपल्या मनाची तयारी करणे किती महत्त्वाचे आहे! (स्तो. ७८:८) प्रलोभनांचा प्रतिकार करण्यास आणि योग्य निवडी करण्यास आपल्याला मदत करतील अशा कमीतकमी दोन गोष्टी आपण करू शकतो.

विचार करा व प्रतिकार करण्यास सज्ज असा

यहोवाच्या बुद्धीचा शोध करून आपण प्रलोभनांचा प्रतिकार करण्याची आपली क्षमता वाढवतो

१४. कोणत्या प्रश्‍नांवर मनन केल्याने “वाइटाचा वीट” मानण्यास आणि “बऱ्‍याला चिकटून” राहण्यास आपल्याला मदत मिळेल?

१४ पहिली गोष्ट म्हणजे, आपल्या कृत्यांचे पुढे काय परिणाम होतील याचा विचार करणे. आपल्याला आध्यात्मिक वारसा देणारा यहोवा आहे. त्या वारशाची आपल्याला किती कदर आहे ते यहोवावरील आपल्या प्रेमावर अवलंबून आहे. कारण आपले जर एखाद्या व्यक्‍तीवर जिवापाड प्रेम असेल, तर तिचे मन दुखावण्याचा विचारसुद्धा आपण करणार नाही. उलट, आपण तिचे मन जिंकण्याचा प्रयत्न करू. तेव्हा, एखाद्या अशुद्ध दैहिक इच्छेला बळी पडल्यामुळे आपल्या स्वतःवर व इतरांवर कोणते परिणाम होतील याचा विचार करणे जरुरीचे आहे. आपण स्वतःला असे विचारले पाहिजे: ‘माझ्या स्वार्थी कृत्यामुळे यहोवासोबतच्या माझ्या नातेसंबंधावर काय परिणाम होईल? माझ्या कुटुंबावर त्याचा काय परिणाम होईल? माझ्या अशा वागण्यामुळे मंडळीतील माझ्या बंधुभगिनींवर काय परिणाम होईल? ते अडखळतील का?’ (रोम. १४:२१) आपण स्वतःला असेही विचारू शकतो: ‘दोन घडीची मजा करून आयुष्यभर पस्तावा करण्यात काही अर्थ आहे का? मला माझी अवस्था एसावाप्रमाणे करून घ्यायची आहे का, जो भानावर आल्यावर हेल काढून रडला?’ (इब्री १२:१७) अशा प्रश्‍नांवर आपण मनन केले तर “वाइटाचा वीट” मानण्यास आणि “बऱ्‍याला चिकटून” राहण्यास आपल्याला नक्कीच मदत मिळेल. (रोम. १२:९) खासकरून, यहोवावर आपले प्रेम असेल, तर आपण आपल्या वारशाला जडून राहू.—स्तो. ७३:२८.

१५. प्रलोभनांचा प्रतिकार करण्याची आपली क्षमता वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी आपल्याला मदत करतील?

१५ दुसरी गोष्ट म्हणजे, प्रलोभनांचा प्रतिकार करण्याची आपली क्षमता वाढवणे. आपल्या आध्यात्मिकतेला धोका निर्माण करणाऱ्‍या गोष्टींचा आपल्याला प्रतिकार करता यावा म्हणून यहोवाने आपल्यासाठी बऱ्‍याच तरतुदी केल्या आहेत. त्यात बायबल अभ्यास, ख्रिस्ती सभा, क्षेत्र सेवा आणि प्रार्थना या सर्व गोष्टी समाविष्ट आहेत. (१ करिंथ. १५:५८) आपण ज्या ज्या वेळी प्रार्थनेद्वारे यहोवापुढे आपले मन मोकळे करतो आणि क्षेत्र सेवेत उत्साहाने सहभाग घेतो त्या त्या वेळी प्रलोभनांचा प्रतिकार करण्याची आपली क्षमता आपण वाढवतो. (१ तीमथ्य ६:१२, १९ वाचा.) आपली ही क्षमता बऱ्‍याच प्रमाणात आपल्या प्रयत्नांवर अवलंबून असते. (गलती. ६:७) ही गोष्ट, नीतिसूत्रे पुस्तकाच्या दुसऱ्‍या अध्यायात सांगितली आहे.

त्याचा “शोध” करत राहा

१६, १७. योग्य निवडी करण्याची क्षमता आपण कशी प्राप्त करू शकतो?

१६ नीतिसूत्रे पुस्तकाच्या दुसऱ्‍या अध्यायात आपल्याला सुज्ञान आणि विचारशक्‍ती मिळवण्याचे प्रोत्साहन देण्यात आले आहे. या देणग्यांमुळे आपण बऱ्‍या-वाइटातला फरक ओळखू शकतो, स्वतःला शिस्त लावू शकतो आणि स्वार्थी इच्छा-आकांक्षांना काबूत ठेवू शकतो. पण, आपण प्रयत्न करण्यास तयार असलो तरच आपण यशस्वी होऊ शकतो. या मूलभूत सत्याला बायबल दुजोरा देते. ते म्हणते: “माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारिशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेविशील, आपला कान ज्ञानाकडे देशील, आणि आपले मन सुज्ञानाकडे लावशील, जर तू विवेकाला हाक मारिशील, सुज्ञतेची आराधना करिशील, जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध करिशील, व गुप्त निधीप्रमाणे त्याला उमगून काढिशील, तर परमेश्‍वराच्या भयाची तुला जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल, कारण ज्ञान परमेश्‍वर देतो; त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात.”—नीति. २:१-६.

१७ यावरून स्पष्ट होते, की जीवनात योग्य निवडी करण्याची क्षमता प्राप्त करण्यासाठी नीतिसूत्रे पुस्तकात सांगितलेल्या अटी आपण पूर्ण केल्या पाहिजेत. जर आपण यहोवाच्या शिकवणींचे पालन करून आपल्या आंतरिक व्यक्‍तिमत्त्वाला आकार दिला, जर देवाच्या मार्गदर्शनासाठी निरंतर प्रार्थना केली आणि गुप्त रत्ने शोधतात त्याप्रमाणे जर देवाचे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत राहिलो, तरच प्रलोभनांचा ठामपणे प्रतिकार करण्यात आपण यशस्वी होऊ शकतो.

१८. तुम्ही काय करत राहण्याचा दृढ निश्‍चय केला आहे, आणि का?

१८ ज्ञान, समजशक्‍ती, बुद्धी व सुज्ञता या गोष्टी मिळवण्यासाठी जे झटतात त्यांना यहोवा मदत करतो. आपण जितके अधिक या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करू व त्यांचा दैनंदिन जीवनात उपयोग करू तितके अधिक आपण यहोवाच्या सान्‍निध्यात जाऊ. आपल्यावर एखादे प्रलोभन आले तर यहोवा देवासोबतचा आपला हा घनिष्ठ नातेसंबंध आपले संरक्षण करेल. आपण यहोवाशी जवळीक साधली आणि त्याच्याबद्दल आदरयुक्‍त भय बाळगले तर चुकीचे कृत्य करण्यापासून आपले रक्षण होईल. (स्तो. २५:१४; याको. ४:८) तेव्हा, आपण सर्व जण यहोवासोबतची आपली मैत्री टिकवून ठेवू या आणि त्याच्या सुज्ञ मार्गदर्शनाचे पालन करू या. असे केल्याने, आपल्याला जीवनात नेहमी अशा निवडी करता येतील ज्यांमुळे यहोवाचे मन आनंदित होईल आणि आपला वारसा सुरक्षित राहील.