व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

इस्राएली लोक गुन्हेगारांना स्तंभावर लटकवून त्यांना मृत्यूदंड द्यायचे का?

प्राचीन काळातील बरीच राष्ट्रे विशिष्ट प्रकारच्या गुन्हेगारांना स्तंभावर किंवा खांबावर खिळण्याद्वारे त्यांना मृत्यूदंड द्यायची. रोमी लोक अशा व्यक्‍तीला स्तंभावर बांधायचे किंवा खिळायचे. ती व्यक्‍ती बरेच दिवस त्याच अवस्थेत जिवंत राहायची. मग शारीरिक यातना, तहान, भूक असह्‍य झाल्यामुळे आणि ऊन, वारा, पावसात उघड्यावर राहिल्यामुळे शेवटी तिचा मृत्यू व्हायचा. स्तंभावर खिळण्याच्या शिक्षेला रोमी लोक लज्जास्पद मानायचे. ही शिक्षा अतिशय घोर गुन्हा करणाऱ्‍या व्यक्‍तीलाच दिली जायची.

इस्राएल राष्ट्राविषयी काय? ते गुन्हेगाराला स्तंभावर लटकवून त्यांना मृत्यूदंड द्यायचे का? मोशेच्या नियमशास्त्रात म्हणण्यात आले होते: “जर कोणा मनुष्याने मरणास योग्य असा अपराध केला व त्याला जिवे मारले, आणि तू त्याला झाडावर टांगले, तर त्याचे शरीर सारी रात्र झाडावर राहू नये; पण तू त्याच दिवशी त्याला अवश्‍य पुरावे.” (अनु. २१:२२, २३, पं.र.भा.) तर मग, स्पष्टच आहे, की इब्री शास्त्रवचने लिहिली गेली त्या काळात, ज्या व्यक्‍तीला मृत्यूदंडाची शिक्षा व्हायची तिला आधी जिवे मारले जायचे आणि मग स्तंभावर किंवा झाडावर लटकवले जायचे.

याच संदर्भात लेवीय २०:२ म्हणते: “इस्राएल लोकांपैकी अथवा इस्राएल लोकांमध्ये राहणाऱ्‍या परदेशियांपैकी कोणी आपले अपत्य मोलखास अर्पिले तर त्याला अवश्‍य जिवे मारावे; आपल्या देशाच्या लोकांनी त्याला दगडमार करावा.” शिवाय “पंचाक्षरी अथवा चेटूक” करणाऱ्‍यालासुद्धा जिवे मारले जायचे. कसे? दगडमार करून.—लेवी. २०:२७.

अनुवाद २२:२३, २४ यात म्हटले आहे: “वाग्दत्त कुमारी एखाद्या पुरुषाला गावात आढळली आणि त्याने तिच्याशी गमन केले, तर त्या दोघांनाही त्या गावाच्या वेशीकडे आणून मरेपर्यंत दगडमार करावा—तिने गावात असून आरडाओरड केली नाही म्हणून तिला आणि त्याने आपल्या शेजाऱ्‍याची स्त्री भ्रष्ट केली म्हणून त्याला. ह्‍या प्रकारे तू आपल्यामधून ह्‍या दुष्टाईचे निर्मूलन करावे.” सुरुवातीच्या इस्राएल लोकांमध्ये, घोर गुन्हा केलेल्या गुन्हेगाराला दगडमार करणे ही मृत्यूदंडाची एक मुख्य पद्धत होती. *

स्पष्टच आहे, की इब्री शास्त्रवचने लिहिली गेली त्या काळात, ज्या व्यक्‍तीला मृत्यूदंडाची शिक्षा व्हायची तिला आधी जिवे मारले जायचे आणि मग स्तंभावर किंवा झाडावर लटकवले जायचे

अनुवाद २१:२३ यात म्हटले आहे: “टांगलेल्या मनुष्यावर देवाचा शाप असतो.” “देवाचा शाप” असलेल्या दुष्ट व्यक्‍तीचा मृतदेह इस्राएली लोकांसमोर लटकवल्यामुळे याचा त्यांच्यावर नक्कीच परिणाम व्हायचा. खरे पाहिल्यास, मृत्यूदंड झालेल्या व्यक्‍तीचा मृतदेह स्तंभावर किंवा झाडावर टांगलेला पाहून इतरांना चेतावणी मिळायची.

^ अनेक विद्वान असे मानतात, की नियमशास्त्रानुसार, गुन्हेगाराला आधी जिवे मारले जायचे आणि मग त्याचे शरीर झाडावर लटकवले जायचे. पण, पुरावा दाखवतो, की पहिल्या शतकाच्या सुरुवातीपासून यहुदी लोक काही गुन्हेगारांना स्तंभावर जिवंत खिळायचे आणि नंतर स्तंभावर त्यांचा मृत्यू व्हायचा.