व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवन कथा

कसा लाभला आमच्या जीवनाला खरा अर्थ?

कसा लाभला आमच्या जीवनाला खरा अर्थ?

माझा मुलगा गॅरी याचा १९५८ मध्ये जन्म झाल्यावर मला लगेचच जाणवलं की तो इतर मुलांसारखा नाही. पण त्याच्या आजाराचं निदान डॉक्टरांनी तब्बल दहा महिन्यांनंतर केलं आणि लंडनच्या तज्ज्ञांनी त्या निदानाला पुष्टी द्यायला आणखी पाच वर्षं लावली. गॅरीच्या जन्मानंतर नऊ वर्षांनी माझ्या मुलीचा, लवीझचा जन्म झाला. तिच्या शरीरातही त्याच आजाराची, पण गॅरीपेक्षाही गंभीर स्वरूपाची लक्षणं दिसून आली तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली.

डॉक्टरांनी मला अगदी शांतपणे सांगितलं, “तुमच्या दोन्ही मुलांना एलएमबीबी * नावाचा आजार झालाय आणि दुःखाची गोष्ट म्हणजे यावर कोणताही उपाय नाही.” या क्वचितच आढळणाऱ्‍या आनुवंशिक रोगाबद्दल त्या वेळी कुणाला फारसं माहीत नव्हतं. या रोगामध्ये सहसा दृष्टिदोष आणि त्यामुळं येणारं अंधत्व, लठ्ठपणा, हाताला किंवा पायाला जास्तीची बोटं असणं, मुलांची वाढ मंदगतीनं होणं, शरीराच्या हालचाली नीट न होणं, मधुमेह, ऑस्टिओआर्थरायटिस (हाडांचा व सांध्यांचा विकार) आणि मूत्रपिंडांच्या कार्यात बिघाड यांसारखी लक्षणं दिसून येतात. त्यामुळं माझ्या मुलांना वाढवणं मला अत्यंत कठीण जाणार होतं. अलीकडच्या एका अभ्यासातून असं दिसून आलं की ब्रिटनमध्ये १,२५,००० लोकांमागे १ जण या व्याधीनं ग्रस्त असून, आणखी कित्येकांत या रोगाची सौम्य स्वरूपाची लक्षणं असू शकतात.

यहोवा बनला आमचा “उच्च दुर्ग”

माझ्या लग्नाच्या थोड्याच काळानंतर मला यहोवाच्या साक्षीदारांपैकी एकीशी बोलण्याची संधी मिळाली आणि तिनं मला जे सांगितलं तेच सत्य आहे याची मला लगेच खातरी पटली. पण माझ्या पतीला या विषयात जराही रस नव्हता. त्यांच्या नोकरीमुळं आम्हाला सतत एका गावाहून दुसऱ्‍या गावी राहायला जावं लागायचं. यामुळं मला मंडळीसोबत सहवास करणं शक्य नव्हतं. तरीपण, मी बायबल वाचणं आणि यहोवाला प्रार्थना करणं चालूच ठेवलं. “परमेश्‍वर पीडितासाठी उच्च दुर्ग आहे; तो संकटसमयी उच्च दुर्ग आहे” आणि “जे [त्याचा] शोध करितात त्यांस [त्याने] टाकिले नाही” हे शब्द बायबलमध्ये वाचल्यावर मला खूप सांत्वन मिळालं.—स्तो. ९:९, १०.

गॅरीला डोळ्यांनी अंधूक दिसायचं, त्यामुळं तो सहा वर्षांचा असताना त्याच्यासारख्या खास गरजा असलेल्या मुलांना शिक्षण देणाऱ्‍या एका बोर्डिंग शाळेत त्याला पाठवण्यात आलं. ही शाळा इंग्लंडच्या दक्षिणेकडील समुद्रकिनाऱ्‍याजवळ होती. गॅरी नियमितपणे मला फोन करायचा आणि त्याला ज्या गोष्टींविषयी चिंता वाटायची त्या तो मला सांगायचा. फोनवरून मी त्याला बायबलच्या मूलभूत तत्त्वांविषयी समजावून सांगायचे. लवीझचा जन्म झाल्यावर काही वर्षांनी मी स्वतः आजारी पडले. मला मल्टिपल स्क्लेरोसिस (मेंदू आणि मज्जारज्जूशी संबंधित विकार) आणि फायब्रोमायाल्जिया (संधिवाताचा एक प्रकार) या व्याधींनी ग्रासलं. गॅरी सोळा वर्षांचा झाला तेव्हा तो बोर्डिंग शाळेतून परत आला. पण त्याची दृष्टी दिवसेंदिवस क्षीण होत चालली होती आणि १९७५ मध्ये डॉक्टरांनी तो पूर्णपणे अंधळा झाल्याचं सांगितलं. १९७७ मध्ये माझे पती आम्हाला वाळीत टाकून निघून गेले.

गॅरी घरी परतल्यानंतर काही काळातच आम्ही एका प्रेमळ मंडळीसोबत सहवास राखण्यास सुरुवात केली आणि १९७४ साली माझा बाप्तिस्मा झाला. मंडळीतल्या वडिलांपैकी एकानं गॅरीला किशोरवयात होणाऱ्‍या शारीरिक बदलांविषयी समजावून सांगितलं आणि त्यांना तोंड देण्यास साहाय्य केलं याबद्दल मला खरोखर खूप कृतज्ञता वाटते. इतर बंधुभगिनी मला घरातल्या कामांत मदत करायचे. कालांतरानं सरकारी समाजकल्याण कार्यालयानं त्यांपैकी पाच जणांना आमच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी पगारी सेवक म्हणून नेमलं. ही व्यवस्था खरोखर आमच्याकरता एक आशीर्वाद ठरली आहे!

गॅरीनं सत्यात उत्तम प्रगती केली आणि १९८२ मध्ये त्याचा बाप्तिस्मा झाला. त्याला साहाय्यक पायनियर सेवा करण्याची मनस्वी इच्छा होती. त्यामुळं, मी त्याला या कार्यात साथ देण्याचं ठरवलं आणि कित्येक वर्षं आम्ही दोघांनी मिळून सेवा केली. काही काळानंतर आमच्या विभागीय पर्यवेक्षकांनी, “गॅरी, तू रेग्युलर पायनियरिंग का नाही सुरू करत?” असं माझ्या मुलाला विचारलं, तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. गॅरीला खरंतर याच प्रोत्साहनाची गरज होती आणि १९९० मध्ये त्याला सामान्य पायनियर म्हणून नेमण्यात आलं.

गॅरीच्या दोन वेळा हिप रीप्लेस्मेंट (कंबरेच्या सांध्याची शस्त्रक्रिया) झाल्या आहेत, पहिल्यांदा १९९९ मध्ये आणि पुन्हा २००८ मध्ये. पण लवीझच्या आरोग्यविषयक समस्या कितीतरी पटीनं जास्त गंभीर होत्या. ती जन्मतःच पूर्णपणे अंधळी होती आणि जेव्हा मला तिच्या एका पायाला जास्तीचं बोट दिसलं तेव्हा मला जाणीव झाली की तिलाही एलएमबीबी हा विकार आहे. तपासण्या केल्यावर, तिच्या शरीरातल्या इतर अवयवांतही गंभीर दोष असल्याचं आढळलं. मागील वर्षांत तिच्यावर अनेक मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यांपैकी पाच शस्त्रक्रिया तिच्या मूत्रपिंडांवर करण्यात आल्या. गॅरीसारखाच तिलासुद्धा मधुमेह आहे.

शस्त्रक्रियेच्या वेळी समस्या उद्‌भवू शकतात याची जाणीव असल्यामुळं लवीझ आधीच सर्जन्स, भूल देणारे तज्ज्ञ आणि तिची काळजी घेणारे इतर वैद्यकीय कर्मचारी यांच्याशी बोलते; आपण रक्‍त का घेऊ शकत नाही याबद्दल आणि रक्‍तविरहित वैद्यकीय उपचारांबद्दल ती त्यांना सांगते. यामुळं तिच्या शारीरिक समस्यांची उत्तम रीत्या काळजी घेणाऱ्‍या सर्वांशी तिचे मैत्रीचे संबंध निर्माण झाले आहेत.

आम्ही अर्थपूर्ण जीवन जगत आहोत

घरात आम्ही सहसा यहोवाच्या उपासनेशी संबंधित असलेल्या कोणत्या ना कोणत्या कार्यात गुंतलेलो असतो. अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणं उपलब्ध होण्याआधी मी तास न्‌ तास गॅरी आणि लवीझसाठी वाचन करायचे. आता निरनिराळ्या सीडी, डीव्हीडी आणि www.pr418.com या साईटवर ध्वनिमुद्रणं उपलब्ध झाली असल्यामुळं, आम्ही सर्व जण आठवड्यासाठी नेमलेल्या बायबल अभ्यासाचा वेगवेगळ्या वेळी आनंद घेऊ शकतो. तसंच, यामुळं ख्रिस्ती सभांमध्ये अर्थपूर्ण उत्तरं देणंही आम्हाला शक्य झालं आहे.

यहोवाच्या प्रेरित वचनात असलेल्या सत्यांबद्दल आम्ही किती कृतज्ञ आहोत!

कधीकधी गॅरी तोंडपाठ करून उत्तरं देतो आणि ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत त्याला भाषण नेमण्यात आलं असेल, तर ते तो आपल्या शब्दांत सादर करतो. १९९५ मध्ये त्याला सेवा सेवक म्हणून नेमण्यात आलं. राज्य सभागृहात तो नेहमीच, सभांना येणाऱ्‍यांचं स्वागत करण्यात आणि साऊंड सिस्टमच्या व्यवस्थेत हातभार लावण्यात व्यस्त असतो.

मंडळीतील बंधुभगिनी गॅरीसोबत सेवाकार्याला जातात. आर्थरायटिसमुळं गॅरीला व्हीलचेअर वापरावी लागते; त्यामुळं त्याच्यासोबत सेवेला जाणाऱ्‍या बांधवांना सहसा त्याची व्हीलचेअर ढकलावी लागते. एका बांधवाच्या साहाय्यानं गॅरीनं एका आस्थेवाईक व्यक्‍तीसोबत बायबल अभ्यास चालवला. तसंच, २५ वर्षांपासून अक्रियाशील असलेल्या एका बहिणीला प्रोत्साहन देण्यातही गॅरीला यश आलं. आज या दोन्ही व्यक्‍ती नियमितपणे ख्रिस्ती सभांना येतात.

नऊ वर्षांची असताना लवीझनं तिच्या आजीकडून विणकाम शिकून घेतलं आणि मी व तिची काळजी घेणाऱ्‍या एका बहिणीनं मिळून तिला भरतकाम शिकवलं. तिला विणकाम मनापासून आवडत असल्यामुळं ती लहान बाळांसाठी, तसंच मंडळीतल्या वयस्क सदस्यांसाठी रंगीबेरंगी ब्लँकेट्‌स विणते. शिवाय, लहान स्टिकर्सचा वापर करून ती ग्रीटिंग कार्ड्‌ससुद्धा बनवते. ही कार्ड्‌स ज्यांना पाठवली जातात ते ती प्रेमळपणे जपून ठेवतात. लवीझ तेरा-चौदा वर्षांची होती तेव्हा तिनं संगणकाच्या कीबोर्डचं टायपिंग शिकून घेतलं. आता एका खास बोलणाऱ्‍या कंप्युटरच्या साहाय्यानं ती ईमेलद्वारे आपल्या मित्रमैत्रिणींच्या संपर्कात राहते. १७ वर्षांची असताना लवीझचा बाप्तिस्मा झाला. प्रचाराच्या खास मोहिमांदरम्यान आम्ही दोघी मिळून साहाय्यक पायनियर सेवा करतो. गॅरीसारखंच लवीझसुद्धा शास्त्रवचनं तोंडपाठ करून देवानं दिलेल्या अभिवचनावर तिचा विश्‍वास व्यक्‍त करते; एका अशा जगाचे अभिवचन, ज्यात “अंधांचे नेत्र उघडतील,” आणि “मी रोगी आहे असे एकही रहिवासी म्हणणार नाही.”—यश. ३३:२४; ३५:५.

यहोवाच्या प्रेरित वचनात असलेल्या सत्यांबद्दल आम्ही किती कृतज्ञ आहोत! आमच्या मंडळीतल्या बांधवांच्या प्रेमळ साहाय्याबद्दल आभार व्यक्‍त करण्यासाठी आमच्याकडे शब्दच नाहीत; कारण आज आम्ही जे काही करतो ते त्यांच्या साहाय्याशिवाय शक्य झालं नसतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यहोवाचं साहाय्य, कारण त्यामुळंच आमच्या जीवनाला खरा अर्थ लाभला आहे.

^ लॉरेन्स-मून-बार्डे-बीडल सिंड्रोम हे नाव या आनुवंशिक विकाराचा शोध लावणाऱ्‍या चार डॉक्टरांवरून पडलं. आई व वडील दोघांतही या विकाराची जनुके असतात तेव्हा मुलांना हा विकार होतो. आज सर्वसामान्यपणे या विकाराला बार्डे-बीडल सिंड्रोम म्हणतात. यावर कोणताही औषधोपचार नाही.