व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवन कथा

यहोवाच्या आज्ञांचं पालन केल्यानं अनेक आशीर्वाद लाभले

यहोवाच्या आज्ञांचं पालन केल्यानं अनेक आशीर्वाद लाभले

“नोहाकडून आपल्याला किती चांगला धडा शिकायला मिळतो!” असं माझे बाबा म्हणायचे. “नोहानं यहोवाच्या आज्ञांचं पालन केलं आणि त्याच्या कुटुंबावरही त्याचं प्रेम होतं. त्याचं संपूर्ण कुटुंब तारवात गेल्यामुळं ते सर्व जण जलप्रलयातून सुखरूप वाचले.”

लहानपणी बाबांनी सांगितलेली ही गोष्ट मला अजूनही आठवते. ते प्रामाणिक आणि मेहनती होते. जे योग्य आहे त्याबद्दल त्यांना आवड होती, आणि त्यामुळं १९५३ मध्ये त्यांनी बायबलचा संदेश ऐकला तेव्हा ते लगेच या संदेशाकडे आकर्षित झाले. ते जे काही शिकायचे ते सर्व आम्हा मुलांना सांगण्यासाठी जिवापाड प्रयत्न करायचे. माझी आई सुरुवातीला कॅथलिक रीतिरिवाज सोडण्यास तयार नव्हती. पण, नंतर तिनंही बायबलच्या शिकवणी स्वीकारल्या.

आईला तितकं लिहिता-वाचता येत नसल्यामुळं आणि बाबा दिवसभर शेतात मेहनत करत असल्यामुळं आम्हा मुलांसोबत बायबलचा अभ्यास करणं त्यांना कठीण जायचं. केव्हाकेव्हा तर बाबा इतकं थकून जायचे की अभ्यासादरम्यान त्यांना डुलकी लागायची. पण त्यांनी घेतलेली मेहनत सार्थकी लागली. आम्हा भावंडांमध्ये मी सर्वात मोठी होते, त्यामुळं माझ्या लहान बहीण-भावांसोबत मी बायबलचा अभ्यास करायचे. लहानपणी बाबा आम्हाला नेहमी हे सांगायचे की नोहाचं त्याच्या कुटुंबावर खूप प्रेम होतं आणि तो देवाला आज्ञाधारक होता. आणि हीच गोष्ट मीसुद्धा माझ्या लहान भावंडांना शिकवायचे. बायबलमधला हा अहवाल मला फार आवडायचा. लवकरच, आम्ही सर्व जण इटलीच्या ॲड्रियाटिक समुद्रकिनाऱ्‍याजवळ असलेल्या रोझेटो डेलयी ऑबरूट्‌सी इथल्या राज्य सभागृहात होणाऱ्‍या सभांना जाऊ लागलो.

सन १९५५ मध्ये मी फक्‍त ११ वर्षांची होते तेव्हा मी आणि आई अनेक डोंगर पार करून रोममधल्या आमच्या सर्वात पहिल्या अधिवेशनाला उपस्थित राहिलो. तेव्हापासून, अशा मोठ्या मेळाव्यांना उपस्थित राहणं माझ्या ख्रिस्ती जीवनातल्या सर्वात सुखद अनुभवांपैकी एक आहे.

सन १९५६ मध्ये माझा बाप्तिस्मा झाला आणि त्यानंतर लगेच मी पूर्णवेळची सेवा सुरू केली. मी १७ वर्षांची झाले तेव्हा मला रोमच्या दक्षिणेकडे असलेल्या लाटीना शहरात खास पायनियर म्हणून नेमण्यात आलं. हे शहर माझ्या घरापासून सुमारे ३०० किमी दूर होतं. हे एक नवीन शहर असल्यामुळं, आपण जर बायबलचा संदेश ऐकला तर आजूबाजूचे लोक काय म्हणतील याची लोकांना भीती नव्हती. मी आणि माझ्या पायनियर सोबतिणीनं मिळून अनेक बायबल प्रकाशनं वाटली. या कार्यात आम्हाला अतिशय आनंद व्हायचा. पण लहान असल्यामुळं मला घरची खूप आठवण यायची. असं असलं, तरी यहोवानं मला जी नेमणूक दिली होती ती पूर्ण करण्याची माझी इच्छा होती.

आमच्या लग्नाच्या दिवशी

सन १९६३ मध्ये होणाऱ्‍या “सार्वकालिक सुवार्ता” आंतरराष्ट्रीय संमेलनाची तयारी करण्यात हातभार लावण्यासाठी मला मिलान इथं नेमण्यात आलं. अधिवेशनादरम्यान मी बऱ्‍याच बंधुभगिनींसोबत स्वयंसेवक म्हणून काम केलं. स्वयंसेवकांमध्ये फ्लॉरेन्स या शहरातून आलेला पाओलो पीचोली नावाचा एक तरुण बांधव होता. अधिवेशनाच्या दुसऱ्‍या दिवशी, अविवाहित राहण्याविषयी त्यानं एक जोरदार भाषण दिलं होतं. ते भाषण ऐकून, ‘हा बांधव केव्हाही लग्न करणार नाही’ असा विचार केल्याचं मला आठवतं. पण अधिवेशनानंतर आम्ही एकमेकांना पत्र लिहू लागलो आणि आमच्या लक्षात आलं की आमच्यात बरंच साम्य आहे, जसं की आमची ध्येयं, यहोवावरील आमचं प्रेम आणि त्याच्या आज्ञांचं पालन करण्याची आमची मनस्वी इच्छा. शेवटी, १९६५ मध्ये आम्ही लग्न केलं.

पाळकांसोबत झालेल्या चर्चा

मी फ्लॉरेन्समध्ये दहा वर्षं सामान्य पायनियर म्हणून सेवा केली. मंडळ्यांमध्ये वाढ होताना पाहून खूप आनंद व्हायचा, खासकरून तरुणांना प्रगती करताना पाहून खूप चांगलं वाटायचं. मला आणि पाओलोला या तरुणांसोबत आध्यात्मिक गोष्टींवर चर्चा करण्यास आणि करमणूक करण्यास खूप आवडायचं. पाओलो त्यांच्यासोबत सहसा फुटबॉल खेळायचा. पाओलोनं माझ्यासोबत जास्त वेळ घालवावा असं मला वाटायचं, पण मला याचीही जाणीव होती की मंडळीतल्या तरुणांना आणि कुटुंबांना त्याच्या प्रेमळ मदतीची आणि वेळेची फार गरज आहे.

एकेकाळी आम्ही किती बायबल अभ्यास चालवायचो याचा विचार केला तरी मला खूप आनंद होतो. आम्ही ऑड्रीआना नावाच्या एका मुलीसोबत अभ्यास करायचो. ती जे काही शिकायची त्याविषयी ती इतर दोन कुटुंबांना जाऊन सांगायची. त्या कुटुंबातल्या सदस्यांनी त्रैक्य आणि अमर आत्मा यांसारख्या चर्चच्या शिकवणींवर चर्चा करण्यासाठी एका पाळकाला बोलवलं. त्या चर्चेसाठी तीन पाळक आले. त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण खूप गुंतागुंतीचं होतं आणि त्यात काहीच ताळमेळ नव्हता. आमच्या बायबल विद्यार्थ्यांनी चर्चच्या शिकवणींची तुलना बायबलच्या स्पष्ट शिकवणींशी केली तेव्हा चर्चच्या शिकवणींत काहीच ताळमेळ नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. परिणामस्वरूप, या दोन कुटुंबांतले १५ सदस्य यहोवाचे साक्षीदार बनले.

अर्थात, आज आपण खूप वेगळ्या पद्धतीनं प्रचार करतो. त्या वेळी पाळकांसोबत बायबल शिकवणींविषयी चर्चा करण्यात पाओलो खूप तरबेज झाला होता आणि अशा अनेक चर्चा त्याने केल्या होत्या. एकदा पाओलोनं, यहोवाचे साक्षीदार नसलेल्या जमावासमोर अशीच एक चर्चा केल्याचं मला आठवतं. विरोधकांनी आधीच जमावातल्या काहींना पाओलोला उलटसुलट प्रश्‍न विचारण्यास सांगितलं होतं हे आमच्या लक्षात आलं. पण, पाळकांच्या योजनेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत. जमावातल्या एकानं विचारलं की ‘अनेक शतकांपासून चर्च राजकारणात जी लुडबुड करतंय ती योग्य आहे का?’ आता मात्र पाळक मोठ्या संकटात सापडले. अचानक लाइट गेली आणि सभा बरखास्त करण्यात आली. काही वर्षांनंतर आम्हाला कळलं, की चर्चा जर पाळकांच्या इच्छेप्रमाणे झाली नाही तर लाइट बंद करण्याची योजना पाळकांनीच केली होती.

सेवेचे नवीन पैलू

आमच्या लग्नाच्या १० वर्षांनंतर आम्हाला विभागीय कार्य करण्याचं आमंत्रण देण्यात आलं. ही नेमणूक स्वीकारणं सोपं नव्हतं, कारण त्या वेळी पाओलो एक चांगली नोकरी करत होता. पण, प्रार्थनापूर्वक विचार केल्यानंतर, ती स्वीकारण्यास आम्ही तयार झालो. विभागीय कार्य करत असताना आम्ही ज्या कुटुंबांसोबत राहायचो त्यांच्यासोबत वेळ घालवायला आम्हाला खूप आवडायचं. संध्याकाळी आम्ही सोबत मिळून बायबल अभ्यास करायचो, आणि नंतर पाओलो कुटुंबातल्या मुलांना त्यांचा शाळेचा अभ्यास पूर्ण करण्यात, खासकरून गणिताचा अभ्यास करण्यात मदत करायचा. या शिवाय, पाओलो अवांतर वाचन करायचा आणि त्यानं ज्या चांगल्या आणि उत्तेजनात्मक गोष्टी वाचल्या होत्या त्या तो उत्साहानं सगळ्यांना सांगायचा. सहसा सोमवारी आम्ही, यहोवाचे साक्षीदार नसलेल्या शहरांत प्रचाराला जायचो आणि त्या संध्याकाळी असलेल्या जाहीर भाषणासाठी लोकांना आमंत्रित करायचो.

मला आणि पाओलोला तरुणांसोबत वेळ घालवायला खूप आवडायचं. पाओलो त्यांच्यासोबत सहसा फुटबॉल खेळायचा

दोन वर्षं विभागीय कार्य केल्यानंतर आम्हाला रोममधल्या बेथेलमध्ये सेवा करायला बोलावण्यात आलं. पाओलोला कायदा विभागात आणि मला नियतकालिक विभागात नेमण्यात आलं. हा आमच्यासाठी एक मोठा बदल होता, त्यामुळं जुळवून घेणं सोपं नव्हतं. पण आम्ही यहोवाला आज्ञाधारक राहण्याचा दृढनिश्‍चय केला होता. शाखेतल्या कार्याचा विस्तार पाहून आणि इटलीतल्या बंधुभगिनींची वाढती संख्या पाहून खरंच खूप आनंद व्हायचा. त्या वेळी इटलीत यहोवाच्या साक्षीदारांना एक धर्म या नात्यानं कायदेशीर ओळख देण्यात आली. या सेवेत आम्ही खरंच खूप खूश होतो.

पाओलोला बेथेलमधलं काम खूप आवडायचं

बेथेलमध्ये सेवा करत असताना, रक्‍तासंबंधी असलेल्या आपल्या बायबल आधारित भूमिकेमुळं इटलीत एक वाद निर्माण झाला. १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला यासंबंधी न्यायालयात खटला चालवण्यात आला, ज्यामुळं बरीच खळबळ माजली. यहोवाचे साक्षीदार असलेल्या एका जोडप्यावर, आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी कारणीभूत असल्याचा खोटा आरोप लावण्यात आला. खरं पाहता तिचा मृत्यू, भूमध्य प्रदेशात सहसा आढळणाऱ्‍या रक्‍तासंबंधित एका गंभीर रोगामुळं झाला होता. या ख्रिस्ती पालकांच्या वतीनं लढणाऱ्‍या वकिलाला बेथेल कुटुंबातल्या बंधुभगिनींनी खूप मदत केली. एक लहानशी पत्रिका आणि अवेक! या नियतकालिकाच्या एका खास आवृत्तीमुळं लोकांना त्या प्रकरणाची खरी माहिती आणि रक्‍ताविषयी बायबलचा दृष्टिकोन समजण्यास मदत मिळाली. त्या महिन्यांदरम्यान पाओलो सलग सोळा-सोळा तास काम करायचा. या महत्त्वाच्या कामात मी त्याला माझ्या परीनं पूर्ण पाठिंबा दिला.

जीवनातला आणखी एक बदल

लग्नाला २० वर्षं उलटण्यानंतर आमच्या जीवनात एक अनपेक्षित गोष्ट घडली. मला दिवस गेलेत असं मला जाणवलं, त्या वेळी मी ४१ तर पाओलो ४९ वर्षांचा होता. पाओलोनं त्या दिवसाविषयी त्याच्या डायरीत असं लिहिलं होतं: “प्रार्थना: यहोवा बापा, जर ही बातमी खरी असेल तर पूर्णवेळच्या सेवेत राहण्यास, आध्यात्मिक रीत्या सुस्त न होण्यास आणि चांगले आईबाबा होण्यास आम्हाला मदत कर. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागील ३० वर्षांत मी स्टेजवरून ज्या गोष्टी शिकवल्या त्यांपैकी निदान एक टक्का तरी मला माझ्या जीवनात लागू करण्यास मदत कर.” आज मागं वळून पाहिल्यावर जाणवतं की यहोवानं पाओलोच्या प्रार्थनेचं उत्तर दिलंय—आणि माझ्याही.

ईलारीयाच्या जन्मानंतर आमचं जीवन पार बदलून गेलं. नीतिसूत्रे २४:१० म्हणते: “संकटकाली तुझे धैर्य खचले तर तुझी शक्‍ती अल्प होय.” यात सांगितल्याप्रमाणे केव्हाकेव्हा आम्हीही निराश झालो. पण, आम्ही एकमेकांना आधार दिला. आम्हाला याची जाणीव होती की एकमेकांना उत्तेजन देणं किती महत्त्वाचं आहे.

पूर्णवेळच्या सेवेत व्यस्त असलेल्या साक्षीदार कुटुंबात आपला जन्म झाला याचा ईलारीयाला खूप आनंद होतो. आपली कोणी काळजी घेत नाही असं तिला कधीच जाणवलं नाही; ती चारचौघांसारख्या कुटुंबात लहानाची मोठी झाली. मी दिवसभर तिच्यासोबत वेळ घालवायचे. संध्याकाळी पाओलो घरी यायचा तेव्हा सहसा त्याला काम असायचं, पण तरीही तो तिच्यासोबत खेळायचा आणि शाळेच्या अभ्यासात तिला मदत करायचा. काम पूर्ण करण्याकरता कधीकधी पहाटे दोन-तीन वाजेपर्यंत त्याला जागं राहावं लागायचं तरीसुद्धा तो तिच्यासोबत वेळ घालवायचा. ईलारीया नेहमी म्हणायची: “बाबा माझा बेस्ट फ्रेंड आहे.”

ईलारीयानं ख्रिस्ती मार्गावर टिकून राहावं म्हणून आम्हाला तिला शिस्त लावावी लागली, केव्हाकेव्हा तर कडक शिस्तही द्यावी लागली. मला एक प्रसंग आठवतो जेव्हा ईलारीया तिच्या मैत्रिणीसोबत खेळताना चुकीचं वागली. तिनं तसं का वागू नये याविषयी आम्ही तिला बायबलमधून समजावलं. आम्ही तिला आमच्यासमोर तिच्या मैत्रिणीची माफी मागण्यासही सांगितलं.

ईलारीया आनंदानं सांगते की प्रचार कार्यासाठी तिच्या आईबाबानं दाखवलेल्या प्रेमाबद्दल तिला मनस्वी कदर वाटते. आता तिचं लग्न झाल्यानंतर तिला आणखी चांगल्या प्रकारे समजतं की यहोवाच्या आज्ञांचं आणि त्याच्या मार्गदर्शनाचं पालन करणं किती महत्त्वाचं आहे.

दुःखी प्रसंगांतसुद्धा आज्ञाधारक

सन २००८ मध्ये पाओलोला कर्करोग झाल्याचं कळलं. सुरुवातीला वाटलं की पाओलो या आजारातून बाहेर पडेल. त्या वेळी त्यानं मला खूप आधार दिला. पाओलोला सर्वात उत्तम उपचार मिळावा यासाठी मी आणि ईलारीयानं प्रयत्न तर केलाच, शिवाय भविष्याचा सामना करण्यास मदत करण्यासाठी तास न्‌ तास यहोवाला प्रार्थनाही केली. एकेकाळी धडधाकट, उत्साही असलेल्या पाओलोला आता हळूहळू कमजोर होताना मी पाहत होते. २०१० मध्ये तो वारला तेव्हा मला जबरदस्त धक्का बसला. पण, आम्ही ४५ वर्षं सोबत मिळून यहोवाच्या सेवेत किती काही साध्य केलं त्याचा विचार केल्यावर मला खूप सांत्वन मिळतं. आम्ही दोघांनी जिवेभावे यहोवाची सेवा केली. मला माहीतंय, आम्ही केलेली सेवा कधीच व्यर्थ जाणार नाही. आणि मी त्या काळाची आतुरतेनं वाट पाहत आहे जेव्हा योहान ५:२८, २९ मध्ये सांगितल्यानुसार नवीन जगात पाओलोचं पुनरुत्थान होईल.

“मनानं मी अजूनही त्या लहान मुलीसारखी आहे जिला नोहाची गोष्ट खूप आवडायची. आजही माझा तोच निर्धार आहे”

मनानं मी अजूनही त्या लहान मुलीसारखी आहे जिला नोहाची गोष्ट खूप आवडायची. आजही माझा तोच निर्धार आहे. मला कोणत्याही परिस्थितीत यहोवाच्या आज्ञांचं पालन करायचंय. आपला प्रेमळ पिता आपल्यावर आशीर्वादांचा जो वर्षाव करतो त्याची तुलना, आपल्यासमोर येणाऱ्‍या अडथळ्यांशी, त्यागांशी किंवा आपण जे काही गमावलंय त्याच्याशी करणं शक्य नाही. हे मी स्वतः अनुभवलंय. यहोवाच्या आज्ञांचं पालन केल्याचा मला कधीच पस्तावा झाला नाही आणि तुम्हालाही कधीच होणार नाही याची खातरी मी देऊ शकते.