व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या उदारतेची आणि समंजसपणाची कदर करा

यहोवाच्या उदारतेची आणि समंजसपणाची कदर करा

“परमेश्‍वर सगळ्यांना चांगला आहे; त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे.”—स्तो. १४५:९.

१, २. यहोवाच्या मित्रांसमोर कोणती संधी आहे?

 मोनिका नावाची एक ख्रिस्ती बहीण म्हणते: “आमच्या लग्नाला ३५ वर्षं झाली आहेत. आम्ही दोघं एकमेकांना खूप चांगलं ओळखतो. पण, अजूनसुद्धा एकमेकांबद्दल कितीतरी गोष्टी आम्ही शिकतच आहोत.” अनेक विवाहित जोडपी व जिवलग मित्रही असेच म्हणतील यात शंका नाही.

आपण ज्यांच्यावर जिवापाड प्रेम करतो त्यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यास आपण उत्सुक असतो. पण, यहोवाबद्दल जाणून घेण्याचा आनंद काही वेगळाच आहे; कारण त्याच्यासोबतची आपली मैत्री इतर कोणत्याही मैत्रीपेक्षा खास आहे. तरीसुद्धा, ‘यहोवाबद्दल मला सर्वकाही माहीत आहे’ असे आपण कधीच म्हणू शकणार नाही. (रोम. ११:३३) यहोवाच्या गुणांबद्दल जाणून घेण्याच्या व त्यांबद्दल मनस्वी कदर दाखवण्याच्या असंख्य संधी अनंतकाळापर्यंत आपल्यासमोर असतील.—उप. ३:११.

३. या लेखात आपण कशाची चर्चा करणार आहोत?

यहोवा निःपक्षपाती आहे आणि आपण त्याच्याकडे निःसंकोचपणे जावे असे त्याला वाटते याबद्दल आपण आधीच्या लेखात पाहिले होते. आता आपण यहोवाच्या आणखी दोन अप्रतिम गुणांविषयी जाणून घेऊ या. ते म्हणजे, त्याची उदारता आणि त्याचा समंजसपणा. त्याच्या या गुणांबद्दल जाणून घेतल्याने आपली खातरी पटेल की “परमेश्‍वर सगळ्यांना चांगला आहे; त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे.”—स्तो. १४५:९.

यहोवा उदार आहे

४. उदारतेचा अर्थ काय आहे?

उदार असणे याचा काय अर्थ होतो? या प्रश्‍नाचे उत्तर, प्रेषितांची कृत्ये २०:३५ यात येशूने जे म्हटले त्यात मिळते. त्याने म्हटले: “घेण्यापेक्षा देणे यात जास्त धन्यता आहे.” या साध्याशा वाक्यातून उदारतेचा नेमका अर्थ काय होतो ते येशूने स्पष्ट केले. उदार मनाची व्यक्‍ती दिलदारपणे आपला वेळ, श्रम आणि आपली साधनसंपत्ती इतरांच्या भल्यासाठी खर्च करते. आणि हे ती मोठ्या आनंदाने करते. खरेच, एक व्यक्‍ती उदार आहे की नाही हे तिच्या भेटवस्तूवरून नव्हे, तर ती कोणत्या भावनेने भेटवस्तू देते त्यावरून दिसून येते. (२ करिंथकर ९:७ वाचा.) आपला आनंदी देव यहोवा याच्यापेक्षा उदार दुसरा कोणीच नाही.—१ तीम. १:११.

५. यहोवा उदार आहे हे कशावरून दिसून येते?

यहोवा उदार आहे हे कशावरून दिसून येते? यहोवा सर्वांच्या, अगदी त्याची उपासना न करणाऱ्‍या लोकांच्या गरजाही तृप्त करतो. खरोखर, तो “सगळ्यांना चांगला आहे.” तो “वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो.” (मत्त. ५:४५) आणि म्हणूनच, यहोवाची उपासना न करणाऱ्‍या लोकांशी बोलताना प्रेषित पौल असे म्हणू शकला की यहोवाने “उपकार केले, आकाशापासून पर्जन्य व फलदायक ऋतू तुम्हाला दिले, आणि अन्‍नाने व हर्षाने तुम्हाला मन भरून तृप्त केले.” (प्रे. कृत्ये १४:१७) स्पष्टच आहे, की यहोवा सर्व मानवांना उदारता दाखवतो.—लूक ६:३५.

६, ७. (क) कोणाच्या गरजा तृप्त करण्यात यहोवाला विशेष आनंद होतो? (ख) यहोवा आपल्या विश्‍वासू सेवकांच्या गरजा तृप्त करतो याचे एक उदाहरण द्या.

आपल्या विश्‍वासू उपासकांच्या गरजा तृप्त करण्यात यहोवाला विशेष आनंद होतो. दावीद राजाने म्हटले: “मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, तरी नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही.” (स्तो. ३७:२५) यहोवाच्या या प्रेमळ काळजीचा त्याच्या अनेक विश्‍वासू सेवकांनी व्यक्‍तिगतपणे अनुभव घेतला आहे. याचे एक उदाहरण विचारात घ्या.

काही वर्षांपूर्वी, पूर्ण-वेळ सेवा करणाऱ्‍या नॅन्सी नावाच्या एका ख्रिस्ती बहिणीसमोर एक मोठी समस्या आली होती. त्या प्रसंगाची आठवण करून ती सांगते: “दुसऱ्‍याच दिवशी मला माझं घरभाडं भरायचं होतं. घरभाडं ६६ डॉलर इतकं होतं. पण, तितके पैसे माझ्याजवळ नव्हते. पैशाची सोय कशी करायची समजत नव्हतं. मी त्याबद्दल यहोवाला प्रार्थना केली आणि कामावर गेले. त्या वेळी मी एका रेस्टॉरंटमध्ये वेट्रेस म्हणून काम करत होते. आठवड्याच्या त्या दिवशी रेस्टॉरंटमध्ये सहसा जास्त लोक येत नसत. पण, त्या दिवशी कधी नव्हे इतके लोक रेस्टॉरंटमध्ये आले. काम संपल्यावर मी मिळालेले टिप्स मोजले तर काय आश्‍चर्य, बरोबर ६६ डॉलर इतके टिप्स मला मिळाले होते!” या अनुभवावरून नॅन्सीची खातरी पटली की यहोवाने तिची नेमकी गरज उदारपणे तृप्त केली.—मत्त. ६:३३.

८. यहोवाने मोठ्या उदारतेने दिलेली सगळ्यात मोठी देणगी कोणती आहे?

यहोवाने मोठ्या उदारतेने दिलेली सगळ्यात मोठी देणगी म्हणजे त्याच्या पुत्राचे खंडणी बलिदान. येशूने म्हटले: “देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहा. ३:१६) या ठिकाणी ‘जग’ असे जे म्हटले आहे ते सबंध मानवजातीला सूचित करते. यावरून स्पष्ट होते, की जे या देणगीचा स्वीकार करू इच्छितात त्या सर्वांना ती उपलब्ध आहे. येशूवर विश्‍वास दाखवणाऱ्‍या सर्वांना “विपुलपणे” जीवन मिळेल. दुसऱ्‍या शब्दांत, त्यांना सार्वकालिक जीवन मिळेल. (योहा. १०:१०) यहोवा उदार आहे यापेक्षा मोठा पुरावा आणखी कोणता असू शकतो?

यहोवाच्या उदारतेचे अनुकरण करा

इस्राएल लोकांना यहोवाच्या उदारतेचे अनुकरण करण्याचे प्रोत्साहन देण्यात आले होते ( परिच्छेद ९ पाहा)

९. आपण यहोवाच्या उदारतेचे अनुकरण कसे करू शकतो?

  आपण यहोवाच्या उदारतेचे अनुकरण कसे करू शकतो? यहोवा “आपल्या उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो.” त्यामुळे, आपणही उदार मनाने इतरांना देणग्या देऊन त्यांच्या आनंदात भर घालू शकतो. (१ तीम. ६:१७-१९) आपल्या प्रेमाच्या माणसांना व गरजवंताना मदत करण्यासाठी आपण मोठ्या आनंदाने आपल्या साधनसंपत्तीचा उपयोग करतो. (अनुवाद १५:७ वाचा.) पण, आपण स्वतःला उदार असण्याची आठवण कशी करून देऊ शकतो? काही जण असे करतात: त्यांना कोणी काही भेटवस्तू दिली की ते लगेच दुसऱ्‍या कोणालातरी भेटवस्तू देण्याची संधी शोधतात. उदारतेचा आत्मा दाखवणारे असंख्य बंधुभगिनी ख्रिस्ती मंडळीत आहेत ही किती आनंदाची गोष्ट आहे!

१०. उदारता दाखवण्याचा एक उल्लेखनीय मार्ग कोणता?

१० उदारता दाखवण्याचा एक सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे इतरांना मदत करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या वेळेचा व श्रमाचा उपयोग करणे. (गलती. ६:१०) या बाबतीत आपण उदार आहोत का हे पाहण्यासाठी आपण स्वतःला असे विचारू शकतो: ‘इतर जण काही सांगतात तेव्हा त्यांचं ऐकण्यासाठी मी वेळ देतो का? कोणी काही मदत मागितली तर मदत करायला मी तयार असतो का? मी माझ्या कुटुंबातल्या सदस्यांची किंवा ख्रिस्ती बंधुभगिनींची मनापासून स्तुती करतो का?’ अशा प्रकारे इतरांना देण्याची वृत्ती आपण बाळगली तर यहोवासोबत आणि आपल्या मित्रांसोबत आपले नाते आणखी दृढ होईल.—लूक ६:३८; नीति. १९:१७.

११. आपण कोणत्या मार्गांनी यहोवाला उदारता दाखवू शकतो?

 ११ आपण यहोवालासुद्धा उदारता दाखवू शकतो. बायबल आपल्याला असे प्रोत्साहन देते: “तू आपल्या द्रव्याने [“मौल्यवान वस्तूंनी,” NW] . . . परमेश्‍वराचा सन्मान कर.” (नीति. ३:९) ‘मौल्यवान वस्तू’ असे जे म्हटले आहे त्यात आपला वेळ, श्रम आणि साधनसंपत्ती या गोष्टी येतात. या गोष्टींचा आपण यहोवाच्या सेवेत मुक्‍तहस्ते उपयोग करू शकतो. अगदी लहान मुलेसुद्धा यहोवाला उदारता दाखवू शकतात. जेसन नावाचा एक पिता म्हणतो: “कुटुंब या नात्यानं राज्य सभागृहात अनुदान टाकायचं असतं तेव्हा आम्ही आमच्या मुलांना त्यांच्या हातानं दानपेटीत दान टाकायला सांगतो. मुलांनाही हे खूप आवडतं कारण त्यामुळं ‘आपण यहोवाला काही तरी देतोय’ असं त्यांना वाटतं.” जी मुले लहानपणापासूनच आनंदाने यहोवाला दान देतात ती मोठी होऊन सहसा उदार मनाची बनतात.—नीति. २२:६.

यहोवा समंजस आहे

१२. समंजस असणे याचा काय अर्थ होतो?

१२ यहोवाचा आणखी एक अप्रतिम गुण म्हणजे त्याचा समंजसपणा. समंजस असणे याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ, “सौम्यपणे वागणे” किंवा “नमते घेणे” असा होतो. (तीत ३:१, २) जी व्यक्‍ती समंजस असते ती नेहमी नियमांचे शब्दशः पालन करण्यावर अडून राहत नाही; ती अवाजवीपणे कडक, कठोर किंवा रूक्ष नसते. याउलट, ती इतरांची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्याशी सौम्यतेने वागण्याचा प्रयत्न करते. एक समंजस व्यक्‍ती इतरांचे म्हणणे ऐकण्यास तयार असते; शक्य तेथे इतरांच्या मनासारखे होऊ देते व आपल्या अपेक्षांमध्ये फेरबदल करण्यासही तयार असते.

१३, १४. (क) यहोवाचा समंजसपणा कशावरून दिसून येतो? (ख) यहोवा लोटाशी जसा वागला त्यावरून त्याच्या समंजसपणाबद्दल आपण काय शिकू शकतो?

१३ यहोवा समंजस आहे हे कशावरून दिसून येते? तो आपल्या सेवकांच्या भावना प्रेमळपणे विचारात घेतो आणि बरेचदा त्यांच्या मनासारखे होऊ देतो. उदाहरणार्थ, नीतिमान पुरुष लोट याच्याशी यहोवा कसा वागला ते विचारात घ्या. यहोवाने सदोम आणि गमोरा या शहरांचा नाश करण्याचे ठरवले तेव्हा त्याने लोटाला अगदी स्पष्ट शब्दांत सांगितले होते, की त्याने डोंगरांकडे पळून जावे. पण, काही कारणास्तव, लोटाने दुसरीकडे पळून जाण्याची परवानगी यहोवाला मागितली. जरा विचार करा! या ठिकाणी लोट यहोवाला अक्षरशः आपल्या सूचना बदलायला सांगत होता!—उत्पत्ति १९:१७-२० वाचा.

१४ काहींना कदाचित असे वाटेल, की लोट दुबळा होता किंवा त्याने देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केले. अर्थात, यहोवाने कसेही करून लोटाला जिवंत ठेवले असते यात कोणतीच शंका नाही. त्यामुळे लोटाला घाबरण्याचे काहीच कारण नव्हते. पण, तरीसुद्धा त्याच्या मनात भीती होती आणि यहोवाने ती गोष्ट समजून घेतली. यहोवाने लोटाला अशा एक शहरात पळून जायला सांगितले ज्याचा खरेतर तो नाश करणार होता. (उत्पत्ति १९:२१, २२ वाचा.) यावरून स्पष्टपणे दिसून येते, की यहोवा कठोर नाही किंवा तो आपल्या भूमिकेवर अडून राहत नाही, तर तो नमते घेतो आणि समंजसपणा दाखवतो.

१५, १६. मोशेच्या नियमशास्त्रातून यहोवाचा समंजसपणा कसा दिसून आला? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा)

१५ यहोवाच्या समंजसपणाचे आणखी एक उदाहरण मोशेच्या नियमशास्त्रातून दिसून येते. एखादा इस्राएली गरीब असेल आणि कोकरा किंवा बकरा अर्पण करायची त्याची ऐपत नसेल, तर तो दोन होले किंवा दोन पारवे अर्पण करू शकत होता. पण, एखादा इस्राएली खूपच गरीब असून दोन पारवेही देण्याची त्याची ऐपत नसल्यास काय? अशी व्यक्‍ती यहोवाला काही पीठ अर्पण करू शकत होती. पण, या बाबतीत सांगितलेली एक महत्त्वपूर्ण गोष्ट विचारात घ्या: अर्पण केले जाणारे पीठ कोणत्याही प्रतीचे नव्हे, तर “सपीठ” किंवा उत्तम प्रतीचे पीठ असायला हवे होते. अशा प्रकारचे पीठ, खास पाहुणे आल्यावरच वापरले जायचे. (उत्प. १८:६) अर्पण केले जाणारे पीठ उत्तम प्रतीचे असावे ही गोष्ट इतकी उल्लेखनीय का आहे?लेवीय ५:७, ११ वाचा.

१६ अशी कल्पना करा की तुम्ही एक खूप गरीब इस्राएली आहात. यहोवाला अर्पण करण्यासाठी तुम्ही थोडेसे पीठ घेऊन निवासमंडपाजवळ येता तेव्हा इतर श्रीमंत इस्राएली लोक अर्पण करण्यासाठी पशू घेऊन येत असल्याचे तुम्हाला दिसते. त्यांच्या तुलनेत यहोवाला अर्पण करण्यासाठी आपल्याजवळ फक्‍त थोडेसे पीठ आहे या विचाराने तुमच्या मनात कदाचित कमीपणाची भावना निर्माण होते. पण, लगेचच तुमच्या लक्षात येते की यहोवाच्या नजरेत तुमचे अर्पण खूप मौल्यवान आहे. का? कारण यहोवाच्या अपेक्षेप्रमाणे तुम्ही उत्तम प्रतीचे पीठ अर्पण करत आहात. अर्पण केले जाणारे पीठ उत्तम प्रतीचे असावे अशी अपेक्षा करण्याद्वारे यहोवा गरीब इस्राएल लोकांना जणू असे म्हणत होता: ‘मी समजू शकतो, की तुम्ही इतरांसारखी मोठमोठी अर्पणं देऊ शकत नाहीत, पण तुम्ही जे काही देता ते तुमच्या परीनं उत्तम प्रतीचं आहे याची मला जाणीव आहे.’ खरेच, यहोवा आपल्या सेवकांच्या मर्यादा आणि त्यांची परिस्थिती विचारात घेऊन समंजसपणा दाखवतो.—स्तो. १०३:१४.

१७. यहोवा कोणत्या प्रकारची उपासना स्वीकारतो?

 १७ यहोवा समंजस असल्यामुळे, आपण जिवेभावे त्याची जी सेवा करतो ती तो आनंदाने स्वीकारतो हे जाणून आपल्याला खूप दिलासा मिळतो. (कलस्सै. ३:२३) काँस्टंस नावाची इटलीतील एक बहीण म्हणते: “आपल्या सृष्टिकर्त्याबद्दल इतरांना सांगणं मला खूप आवडतं. त्यामुळं प्रचार करणं आणि बायबल अभ्यास चालवणं मी सोडूच शकत नाही. काही वेळा, तब्येत साथ देत नसल्यामुळं मी या कार्यात जास्त करू शकत नाही या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतं. पण मला जाणीव आहे, की यहोवा माझी समस्या समजू शकतो आणि त्याच्या सेवेत मी जे काही करू शकते त्याची तो कदर करतो आणि माझ्यावर प्रेम करतो.”

यहोवाच्या समंजसपणाचे अनुकरण करा

१८. कोणत्या एका मार्गाने पालक यहोवाच्या उदाहरणाचे अनुकरण करू शकतात?

१८ आपण यहोवाच्या समंजसपणाचे अनुकरण कसे करू शकतो? यहोवा लोटाशी कसा वागला याची पुन्हा एकदा आठवण करा. यहोवाला हुकूम देण्याचा अधिकार होता; तरीसुद्धा, लोटाने आपल्या भावना व्यक्‍त केल्या तेव्हा यहोवाने त्याचे शांतपणे ऐकून घेतले आणि त्याला त्याच्या मनासारखे करू दिले. तुम्ही जर पालक असाल तर तुम्ही यहोवाच्या या उदाहरणाचे अनुकरण करू शकता का? तुम्ही तुमच्या मुलांचे म्हणणे शांतपणे ऐकून, शक्य असेल तेव्हा त्यांना त्यांच्या मनासारखे करू देता का? कुटुंबासाठी काही नियम बनवताना आईवडील मुलांचे मत कसे विचारात घेऊ शकतात याबद्दल टेहळणी बुरूज, १ सप्टेंबर २००७ च्या अंकात काही सल्ला देण्यात आला होता. उदाहरणार्थ, मुलांनी संध्याकाळी किती वाजता घरी आले पाहिजे हे ठरवण्याचा आईवडिलांना अधिकार आहे. तरीसुद्धा, ठरवलेल्या वेळेबद्दल ते आपल्या मुलांचे म्हणणे विचारात घेऊ शकतात. काही वेळा, कोणत्याही बायबल तत्त्वांचे उल्लंघन होत नसेल तर आईवडील मुलांचे म्हणणे विचारात घेऊन ठरवलेल्या वेळेत फेरबदल करू शकतात. अशा प्रकारे, मुलांना चर्चेत गोवून घेतल्यामुळे अमुक नियम बनवण्यामागचा उद्देश काय तो मुलांना कळतो आणि त्याचे पालन करण्यास ते अधिक उत्सुक असतात.

१९. ख्रिस्ती वडील यहोवाच्या समंजसपणाचे अनुकरण कसे करू शकतात?

१९ ख्रिस्ती वडीलसुद्धा मंडळीतील बंधुभगिनींची परिस्थिती लक्षात घेऊन यहोवाच्या समंजसपणाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. यहोवाने गरिबातल्या गरीब इस्राएली व्यक्‍तीचेही अर्पण स्वीकारले याची आठवण करा. त्याचप्रमाणे, काही बंधुभगिनी आपल्या तब्येतीमुळे किंवा वयोमानामुळे यहोवाच्या सेवेत फारसे काही करू शकत नाहीत. त्यांच्या या मर्यादांमुळे हे प्रिय जन मनाने खचून जात असल्यास काय? ख्रिस्ती वडील त्यांना आश्‍वासन देऊ शकतात, की ते त्यांच्या परीने यहोवाच्या सेवेत जे काही करत आहेत त्याची तो मनापासून कदर करतो व त्यांच्यावर प्रेम करतो.—मार्क १२:४१-४४.

२०. समंजस असणे याचा अर्थ देवाची सेवा करण्यापासून अंग चोरणे असा होतो का? स्पष्ट करा.

२० अर्थात, समंजस असणे याचा अर्थ स्वतःवर ‘दया’ करण्यासाठी देवाच्या सेवेतून अंग चोरणे असा होत नाही. (मत्त. १६:२२) यहोवाच्या सेवेत जास्त करणे शक्य असूनही आपण फक्‍त नावापुरती त्याची सेवा करण्यात समाधान मानणार नाही. याउलट, राज्याच्या कार्याला हातभार लावण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने “नेटाने यत्न” केला पाहिजे. (लूक १३:२४) त्यामुळे आपण योग्य समतोल राखला पाहिजे. आपण जिवेभावे यहोवाची सेवा केली पाहिजे आणि त्याच वेळी हेही लक्षात ठेवले पाहिजे, की तो कधीच आपल्याकडून वाजवीपेक्षा जास्त अपेक्षा करत नाही. असे केल्यास, यहोवाला नक्कीच आनंद होईल याची खातरी आपण बाळगू शकतो. आपली कदर करणाऱ्‍या अशा समंजस देवाची सेवा करणे खरेच किती आनंदाची गोष्ट आहे! पुढच्या लेखात आपण यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वाचे आणखी दोन अप्रतिम गुण विचारात घेऊ, ज्यामुळे यहोवाच्या अधिक जवळ जाणे आपल्याला शक्य होईल.—स्तो. ७३:२८.

“तू आपल्या मौल्यवान वस्तूंनी . . . परमेश्‍वराचा सन्मान कर.”—नीति. ३:९ ( परिच्छेद ११ पाहा)

“जे काही तुम्ही करता ते . . . जिवेभावे करा.”—कलस्सै. ३:२३ ( परिच्छेद १७ पाहा)