व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाची शिस्त स्वीकारून तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाला आकार द्या

यहोवाची शिस्त स्वीकारून तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाला आकार द्या

“तू बोध करून मला मार्ग दाखवशील आणि त्यानंतर गौरवाने माझा स्वीकार करशील.”—स्तो. ७३:२४.

१, २. (क) यहोवासोबत जवळचा नातेसंबंध राखण्यासाठी कोणत्या गोष्टी करणे जरुरीचे आहे? (ख) लोकांनी देवाच्या शिस्तीला जो प्रतिसाद दिला त्याविषयीच्या अहवालांचे परीक्षण केल्याने आपल्याला कसा फायदा होईल?

 “माझ्याविषयी म्हटले तर देवाजवळ जाणे यातच माझे कल्याण आहे; मी प्रभू परमेश्‍वराला आपले आश्रयस्थान केले आहे.” (स्तो. ७३:२८) असे म्हणण्याद्वारे स्तोत्रकर्त्याचा देवावर भरवसा होता हे त्याने दाखवून दिले. पण, कोणत्या गोष्टीमुळे तो असे म्हणू शकला? दुष्ट लोक आनंदी आहेत हे पाहून सुरुवातीला स्तोत्रकर्ता खूप अस्वस्थ झाला. इतका की त्याने दुःखाने म्हटले: “मी आपले मन स्वच्छ राखले, आपले हात निर्दोषतेने धुतले, खचित हे सगळे व्यर्थ.” (स्तो. ७३:२, ३, १३, २१) पण, “देवाच्या पवित्रस्थानात” गेल्यानंतर मात्र तो आपली विचारसरणी बदलू शकला आणि देवासोबतचा आपला घनिष्ठ नातेसंबंध टिकवून ठेवू शकला. (स्तो. ७३:१६-१८) या अनुभवामुळे हा देवभीरू माणूस एक अतिशय महत्त्वाचा धडा शिकला. तो म्हणजे: यहोवासोबत जवळचा नातेसंबंध राखण्यासाठी नेहमी त्याच्या लोकांमध्ये असणे आणि त्याचा सल्ला स्वीकारून तो लागू करणे खूप जरुरीचे आहे.—स्तो. ७३:२४.

आपणसुद्धा खरा व जिवंत देव, यहोवा याच्याशी घनिष्ठ नातेसंबंध राखू इच्छितो. त्यासाठी आपण त्याचा सल्ला, त्याची शिस्त स्वीकारली पाहिजे. असे केल्यास, आपल्या व्यक्‍तिमत्त्वाला योग्य आकार मिळेल आणि आपण यहोवाच्या मनासारखे बनू. प्राचीन काळी, देवाने काही लोकांना आणि राष्ट्रांना त्याच्या शिस्तीला प्रतिसाद देण्याची संधी देऊन त्यांना दया दाखवली. त्यांनी कशा प्रकारे प्रतिसाद दिला याचे अहवाल आपल्या “शिक्षणाकरता” आणि “जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी” बायबलमध्ये नमूद करण्यात आले आहेत. (रोम. १५:४; १ करिंथ. १०:११) या अहवालांचे बारकाईने परीक्षण केल्याने आपल्याला यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वाची झलक मिळेल. तसेच, त्याची शिस्त स्वीकारल्यामुळे आपल्या व्यक्‍तिमत्त्वाला कसा आकार मिळेल हेदेखील आपण शिकू.

कुंभार आपला अधिकार कसा गाजवतो?

३. यहोवा मानवांवर अधिकार गाजवतो हे दाखवण्यासाठी यशया ६४:८ आणि यिर्मया १८:१-६ या वचनांत कोणते उदाहरण वापरण्यात आले आहे? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)

यहोवा लोकांवर आणि राष्ट्रांवर अधिकार कसा गाजवतो हे बायबलमध्ये एक उदाहरण देऊन सांगण्यात आले आहे. यशया ६४:८ म्हणते: “हे परमेश्‍वरा, तू आमचा पिता आहेस; आम्ही माती आहो, तू आमचा कुंभार आहेस; आम्ही सर्व तुझ्या हातची कृती आहो.” मातीच्या गोळ्यापासून हवे ते पात्र बनवण्याचा पूर्ण अधिकार कुंभाराजवळ असतो. त्यावर मातीचा काहीच अधिकार नसतो. हीच गोष्ट, मानव आणि देव यांच्या बाबतीतही खरी आहे. आपल्यापासून कोणते पात्र बनवावे हे ज्याप्रमाणे माती कुंभाराला सांगू शकत नाही, त्याचप्रमाणे आपल्याला कसा आकार द्यावा हे देवाला सांगण्याचा हक्क मानवाला नाही.—यिर्मया १८:१-६ वाचा.

४. देव जोरजबरदस्ती करून लोकांना किंवा राष्ट्रांना आकार देण्याचा प्रयत्न करतो का? स्पष्ट करून सांगा.

एक कुंभार जसा मातीच्या गोळ्याला आकार देतो तसेच यहोवानेसुद्धा इस्राएल राष्ट्राला आकार देण्याचा प्रयत्न केला. पण, मानवी कुंभारामध्ये आणि यहोवामध्ये खूप फरक आहे. कुंभार मातीच्या गोळ्यापासून जमेल तसे पात्र बनवतो. पण, यहोवा वाटेल तसे लोकांना किंवा राष्ट्रांना घडवतो का, म्हणजे काहींना चांगले तर काहींना वाईट? नाही. यहोवाने मानवांना एक अनमोल देणगी दिली आहे. ती म्हणजे, इच्छा-स्वातंत्र्य. आणि या देणगीचा यहोवा आदर करतो. तो सर्वोच्च अधिकारी असला तरी मानवांवर जोरजबरदस्ती करत नाही. निर्माणकर्ता या नात्याने यहोवा मानवांना आकार देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कसा प्रतिसाद द्यावा हे ठरवणे त्याने त्यांच्यावर सोडले आहे.—यिर्मया १८:७-१० वाचा.

५. मानवांना आकार देण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी योग्य प्रतिसाद दिला नाही, तर यहोवा आपला अधिकार कसा गाजवतो?

महान कुंभार, यहोवा मानवांना आकार देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांनी प्रतिसाद दिला नाही, अडेलपणा दाखवला तर काय? अशा वेळी सर्वोच्च अधिकारी या नात्याने तो आपला अधिकार कसा गाजवतो? कुंभार मातीच्या गोळ्यापासून एक विशिष्ट पात्र घडवण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या हातातली माती योग्य वळण घेत नसेल, तर त्या मातीचे काय केले जाते याचा विचार करा. अशा वेळी कुंभार मातीच्या त्या गोळ्यापासून एकतर दुसरे एखादे पात्र घडवेल किंवा तो गोळाच टाकून देईल. माती निरुपयोगी होते तेव्हा सहसा दोष कुंभाराचाच असतो. पण, आपल्या महान कुंभाराच्या बाबतीत असे मुळीच म्हणता येणार नाही. (अनु. ३२:४) यहोवा एखाद्या व्यक्‍तीला आकार देतो तेव्हा तिने जर योग्य प्रतिसाद दिला नाही तर दोष सर्वस्वी त्या व्यक्‍तीचा असतो, यहोवाचा नाही. यहोवा लोकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन त्यांच्यासोबतच्या आपल्या व्यवहारांत बदल करतो. जे योग्य प्रतिसाद देतात त्यांना तो अशा प्रकारे आकार देतो जेणेकरून ते त्याच्यासाठी उपयुक्‍त बनतात. उदाहरणार्थ, अभिषिक्‍त ख्रिस्ती ‘दयेची पात्रे’ असून त्यांना “उत्तम कामासाठी” असलेली पात्रे म्हणून घडवण्यात आले आहे. दुसरीकडे पाहता, जे अडेलपणा दाखवून देवाचा विरोध करतात ते “नाशासाठी सिद्ध” झालेली ‘क्रोधाची पात्रे’ बनतात.—रोम. ९:१९-२३.

६, ७. दावीद राजाने आणि शौल राजाने देवाच्या सल्ल्याला कसा प्रतिसाद दिला?

  यहोवा सल्ला देण्याद्वारे किंवा शिस्त लावण्याद्वारे लोकांना आकार देतो. असे करताना तो लोकांवर अधिकार कसा गाजवतो हे जाणून घेण्यासाठी आपण इस्राएलच्या पहिल्या दोन राजांचे अर्थात शौल आणि दावीद यांचे उदाहरण विचारात घेऊ या. दावीद राजाने बथशेबाशी व्यभिचार केला तेव्हा त्याला स्वतःला आणि इतरांनाही त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले. दावीद राजा असला तरी त्याला कडक शिस्त लावण्याच्या बाबतीत यहोवाने मागेपुढे पाहिले नाही. देवाने नाथान संदेष्ट्याद्वारे दाविदाला एक जळजळीत संदेश सुनावला. (२ शमु. १२:१-१२) दाविदाने कसा प्रतिसाद दिला? तो संदेश त्याच्या जिव्हारी लागला आणि त्याने मनापासून पश्‍चात्ताप केला. आणि त्यामुळे देवाने त्याला दया दाखवली.—२ शमुवेल १२:१३ वाचा.

  पण याच्या अगदी उलट, दाविदाच्या आधी शासन करणाऱ्‍या शौल राजाने यहोवाच्या सल्ल्याला योग्य प्रतिसाद दिला नाही. यहोवाने शमुवेल संदेष्ट्याद्वारे त्याला स्पष्ट शब्दांत सांगितले होते, की त्याने अमालेकी लोकांचा आणि त्यांच्या गुराढोरांचा संहार करावा. पण, शौलाने देवाच्या या आज्ञेचे उल्लंघन केले. त्याने अगाग राजाला आणि काही निवडक प्राण्यांना जिवंत ठेवले. का? त्याचे एक कारण म्हणजे तो स्वतःचा गौरव करू इच्छित होता. (१ शमु. १५:१-३, ७-९, १२) त्याबद्दल देवाने त्याला कडक सल्ला दिला तेव्हा त्याने तो नम्रपणे स्वीकारायला हवा होता; त्याने तसे केले असते तर महान कुंभार त्याला योग्य आकार देऊ शकला असता. पण, त्याने यहोवाला तसे करू दिले नाही. उलट, आपण जे केले ते योग्य आहे हे पटवून देण्याचा शौलाने प्रयत्न केला. त्याने असा तर्क केला की जिवंत ठेवलेल्या प्राण्यांचा बलिदानासाठी उपयोग केला जाऊ शकतो, त्यामुळे आपण जे केले त्यात गैर असे काहीच नाही. असे म्हणण्याद्वारे शौलाने शमुवेल संदेष्ट्याचा सल्ला तुच्छ लेखला. त्यामुळे यहोवाने राजा म्हणून शौलाला नाकारले आणि शौल पुन्हा कधीच खऱ्‍या देवासोबत चांगला नातेसंबंध जोडू शकला नाही.१ शमुवेल १५:१३-१५, २०-२३ वाचा.

शौलाने यहोवाचा सल्ला तुच्छ लेखला. त्याने यहोवाची शिस्त स्वीकारली नाही! ( परिच्छेद ७ पाहा)

देवाचा जळजळीत संदेश दाविदाच्या जिव्हारी लागला आणि त्याने पश्‍चात्ताप केला. त्याने यहोवाची शिस्त स्वीकारली. तुमच्याबद्दल काय? ( परिच्छेद ६ पाहा)

देव पक्षपाती नाही

८. यहोवाने इस्राएल राष्ट्राला आकार देण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी जो प्रतिसाद दिला त्यावरून आपण काय शिकतो?

यहोवा केवळ व्यक्‍तींनाच नव्हे, तर राष्ट्रांनासुद्धा आकार देतो आणि त्यांनाही योग्य प्रतिसाद देण्याची संधी देतो. उदाहरणार्थ इ.स.पू. १५१३ मध्ये, इस्राएल लोक इजिप्तच्या गुलामगिरीतून बाहेर आले तेव्हा यहोवाने त्यांच्याशी एक करार केला. त्याचे निवडलेले राष्ट्र या नात्याने इस्राएल लोकांना जणू महान कुंभाराच्या चाकावर आकार मिळण्याचा विशेषाधिकार होता. पण, ते वाईट कृत्ये करतच राहिले. त्यांनी तर सभोवतालच्या राष्ट्रांतील दैवतांची उपासना करण्याइतपत मजल मारली. त्यांना भानावर आणण्यासाठी यहोवाने वारंवार आपले संदेष्टे त्यांच्याकडे पाठवले, पण त्यांनी त्यांचे ऐकले नाही. (यिर्म. ३५:१२-१५) त्यांच्या या हट्टीपणामुळे, यहोवाला त्यांना कडक शिस्त लावावी लागली. ते नाशासाठी सिद्ध झालेल्या पात्रांप्रमाणे बनले. अश्‍शूरी लोकांनी इस्राएलच्या उत्तरेकडील दहा-वंशांच्या राज्याचा पराभव केला; तर इस्राएलच्या दक्षिणेकडील दोन-वंशांच्या राज्याचा बॅबिलोनी लोकांनी पराभव केला. यावरून आपल्याला एक जोरदार धडा शिकायला मिळतो. तो म्हणजे, यहोवा आपल्याला आकार देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण योग्य प्रतिसाद दिला तरच आपल्याला त्यापासून फायदा होईल.

९, १०. निनवेच्या लोकांनी देवाकडील ताकिदीला कसा प्रतिसाद दिला?

यहोवाने अश्‍शूरची राजधानी असलेल्या निनवे शहरातील लोकांनाही आपल्या ताकिदीला प्रतिसाद देण्याची संधी दिली होती. यहोवाने योनाला सांगितले: “ऊठ, त्या मोठ्या निनवे शहरास जा व त्याच्याविरुद्ध आरोळी कर; कारण त्याची दुष्टता मजपुढे आली आहे.” यहोवाच्या नजरेत निनवे शहर नाशास पात्र होते.—योना १:१, २; ३:१-४.

१० पण, योनाने निनवे शहरात न्यायदंडाचा संदेश घोषित केला तेव्हा “निनवेतील लोकांनी देवावर श्रद्धा ठेवली, त्यांनी उपास नेमला आणि श्रेष्ठापासून कनिष्ठापर्यंत सर्व गोणताट नेसले.” त्यांचा राजाही “आपल्या आसनावरून उठला व आपल्या अंगातला झगा काढून गोणताट नेसून राखेत बसला.” यहोवाने निनवेच्या लोकांना आकार देण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि मनापासून पश्‍चात्ताप केला. त्यामुळे यहोवाने त्यांचा नाश करण्याचा आपला विचार बदलला.—योना ३:५-१०.

११. यहोवा इस्राएल लोकांशी आणि निनवेच्या लोकांशी जसा वागला त्यावरून त्याचा कोणता एक गुण ठळकपणे समोर येतो?

११ इस्राएल राष्ट्र हे देवाचे निवडलेले राष्ट्र असले तरी यहोवाने त्यांना शिस्त लावली. दुसरीकडे पाहता, यहोवाने निनवेच्या लोकांसोबत कोणताही करार केला नव्हता. तरीसुद्धा, यहोवाने त्यांना न्यायदंडाचा संदेश घोषित केला. पण, ते कुंभाराच्या हातातील मऊ मातीप्रमाणे बनले तेव्हा त्याने त्यांना दया दाखवली. या दोन उदाहरणांवरून, स्पष्टपणे दिसून येते की आपला देव यहोवा “कोणाचा पक्षपात करत नाही.”—अनु. १०:१७.

यहोवा समजूतदार व जुळवून घेणारा

१२, १३. (क) यहोवा लोकांना आकार देतो तेव्हा जे योग्य प्रतिसाद देतात त्यांच्या बाबतीत तो आपला विचार का बदलतो? (ख) शौलाच्या बाबतीत यहोवाला “पस्तावा” झाला आणि निनवेकरांच्या बाबतीत तो “अनुताप” पावला याचा काय अर्थ होतो?

१२ यहोवा ज्या प्रकारे आपल्याला आकार देऊ इच्छितो त्यावरून त्याचा समजूतदारपणा व जुळवून घेण्याची वृत्ती दिसून येते. तो लोकांच्या बाबतीत काही निर्णय घेतो, पण त्यांचा प्रतिसाद लक्षात घेऊन तो आपला निर्णय बदलण्यास तयार असतो. उदाहरणार्थ, इस्राएलचा पहिला राजा शौल याच्याविषयी बायबल म्हणते की त्याला राजा बनवले याचा यहोवाला “पस्तावा” झाला. (१ शमु. १५:११) निनवेच्या लोकांनी पश्‍चात्ताप करून आपला वाईट मार्ग सोडला तेव्हा देवाला कसे वाटले त्याविषयी बायबल म्हणते: “त्यांच्यावर अरिष्ट आणीन असे जे [देव] म्हणाला होता त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्यांजवर ते आणले नाही.”—योना ३:१०.

१३ “पस्तावा” झाला किंवा “अनुताप पावला” असे भाषांतर केलेल्या इब्री शब्दाचा अर्थ, दृष्टिकोन किंवा इरादा बदलणे असा होतो. यहोवाने शौलाला राजा बनवले तेव्हा त्याच्याबद्दल यहोवाचा जो दृष्टिकोन होता तो नंतर बदलला आणि त्याने त्याला नाकारले. शौलाची निवड करण्यात यहोवाने चूक केली होती म्हणून त्याने आपला दृष्टिकोन बदलला असे नाही. तर, शौलाने यहोवाच्या आज्ञेचे उल्लंघन केले म्हणून त्याने त्याला नाकारले. निनवेच्या लोकांबद्दल खऱ्‍या देवाला पस्तावा झाला याचा अर्थ, त्यांच्या बाबतीत त्याचा जो इरादा होता तो त्याने बदलला. खरेच, आपला महान कुंभार, यहोवा समजूतदार आणि परिस्थितीशी जुळवून घेणारा आहे; तो प्रेमळ आणि दयाळू आहे; लोक आपला चुकीचा मार्ग सोडून सुधारणा करतात तेव्हा तो आपला विचार बदलण्यास तयार असतो ही किती दिलासा देणारी गोष्ट आहे!

यहोवाची शिस्त कधीच नाकारू नका

१४. (क) आज यहोवा कशा प्रकारे आपल्याला आकार देतो? (ख) यहोवा आपल्याला आकार देतो तेव्हा आपण कसा प्रतिसाद दिला पाहिजे?

१४ आज यहोवा प्रामुख्याने त्याचे वचन बायबल याद्वारे आणि त्याच्या संघटनेद्वारे आपल्याला आकार देतो. (२ तीम. ३:१६, १७) तेव्हा, या माध्यमांतून मिळणारा सल्ला किंवा शिस्त स्वीकारणे योग्यच नाही का? आपला बाप्तिस्मा होऊन कितीही वर्षे झाली असली किंवा आपल्याजवळ सेवेचे कितीही विशेषाधिकार असले, तरी आपण नेहमी यहोवाचा सल्ला स्वीकारला पाहिजे आणि तो आपल्याला मानाचे पात्र बनण्याकरता घडवतो तेव्हा आपण योग्य प्रतिसाद दिला पाहिजे.

१५, १६. (क) शिस्त लावल्यामुळे सेवेचे विशेषाधिकार गमवावे लागतात तेव्हा मनात कोणत्या नकारार्थी भावना येऊ शकतात? उदाहरण द्या. (ख) कोणती गोष्ट अशा नकारार्थी भावनांवर मात करण्यास आपल्याला मदत करू शकते?

१५ काही वेळा, यहोवा शिक्षणाद्वारे किंवा आपली विचारसरणी बदलण्यास मदत करण्याद्वारे आपल्याला शिस्त लावतो. पण इतर वेळा, आपण काहीतरी चुकीचे केल्यामुळे आपल्याला शिस्तीची गरज असेल. अशा वेळी कदाचित आपल्याला सेवेचे विशेषाधिकारही गमवावे लागतील. डेनिस * नावाच्या एका बांधवाचा विचार करा जो एकेकाळी मंडळीत वडील म्हणून सेवा करत होता. बिझनेसमध्ये योग्य निर्णय न घेतल्यामुळे त्याच्या हातून एक चूक झाली आणि त्याबद्दल त्याला खासगीत ताडन देण्यात आले. ज्या दिवशी मंडळीत घोषणा करण्यात आली की डेनिस आता वडील नाही त्या रात्री डेनिसला कसे वाटले? तो म्हणतो: “मी अपयशी ठरलो असं मला वाटलं. गेल्या ३० वर्षांत मला सेवेचे अनेक विशेषाधिकार मिळाले होते. मी एक सामान्य पायनियर होतो, बेथेलमध्ये सेवा केली होती, पुढे सेवा सेवक बनलो आणि नंतर एक वडील. शिवाय, नुकतंच एका प्रांतीय अधिवेशनात मी माझं पहिलं भाषणसुद्धा दिलं होतं. पण, एका झटक्यात सगळं हातून गेलं. मला स्वतःची खूप लाज नि शरम वाटू लागली; संघटनेत आता मला काहीच स्थान नाही असं मला वाटलं.”

१६ डेनिसला आपली चूक सुधारावी लागली. पण, कोणत्या गोष्टीने त्याला आपल्या नकारार्थी भावनांवर मात करण्यास मदत केली? तो म्हणतो: “मी ठरवलं होतं, काहीही झालं तरी आपली आध्यात्मिकता टिकवून ठेवायची. या शिवाय, मला ख्रिस्ती बंधुभगिनींच्या आधाराचा आणि प्रकाशनांतून मिळणाऱ्‍या उत्तेजनाचाही खूप फायदा झाला. टेहळणी बुरूज, १५ ऑगस्ट २००९ या अंकातल्या एका लेखाचं शीर्षक होतं: ‘एके काळी तुमच्याजवळ असलेला विशेषाधिकार तुम्ही पुन्हा मिळवू शकता का?’ हा लेख वाचल्यावर असं वाटलं जणू यहोवानं खास मला पत्र लिहून माझ्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. त्या लेखात दिलेला एक सल्ला मला विशेष आवडला जो म्हणतो, ‘आता तुमच्यावर मंडळीत जास्तीच्या जबाबदाऱ्‍या नसताना आध्यात्मिकदृष्ट्या अधिक सुदृढ होण्याकडे लक्ष द्या.’” देवाच्या या शिस्तीचा डेनिसला कसा फायदा झाला? काही वर्षांनंतर त्याने म्हटले, “यहोवाच्या आशीर्वादानं मला पुन्हा सेवा सेवक बनण्याचा विशेषाधिकार मिळाला.”

१७. अपराध करणाऱ्‍या व्यक्‍तीला बहिष्कृत केल्यामुळे ती योग्य मार्गावर कशी येऊ शकते? उदाहरण द्या.

१७ काही वेळा, बहिष्कृत करण्याद्वारेदेखील यहोवा आपल्याला शिस्त लावतो. एखाद्याला बहिष्कृत केल्यामुळे वाईट प्रभावापासून मंडळीचे रक्षण होते आणि अपराध करणाऱ्‍या व्यक्‍तीला योग्य मार्गावर येण्यास मदत मिळते. (१ करिंथ. ५:६, ७, ११) रॉबर्टचे उदाहरण विचारात घ्या. जवळजवळ १६ वर्षांपर्यंत तो बहिष्कृत होता. त्या काळात त्याच्या आईवडिलांनी आणि भावंडांनी ठामपणे व विश्‍वासूपणे देवाच्या वचनातील सल्ल्याचे पालन केले, ज्यात म्हटले आहे, की आपण अपराध करणाऱ्‍यांची संगत धरू नये व त्यांना नमस्कारही करू नये. काही वर्षांनंतर, रॉबर्टचा ख्रिस्ती मंडळीत पुन्हा स्वीकार करण्यात आला आणि आता तो चांगली आध्यात्मिक प्रगती करत आहे. इतक्या वर्षांनंतर यहोवाकडे आणि त्याच्या लोकांकडे परत येण्याचा निर्णय त्याने कसा घेतला असे विचारले असता त्याने म्हटले, की त्याच्या कुटुंबाने जी ठाम भूमिका घेतली होती त्याचा त्याच्या मनावर खोल परिणाम झाला. तो म्हणतो: “माझ्या कुटुंबानं केवळ माझी विचारपूस करण्यासाठी जरी माझ्याशी संबंध ठेवला असता, तर त्यांच्या सहवासाची कमीच मला भासली नसती आणि मी कधीच यहोवाकडे परत आलो नसतो.”

१८. महान कुंभार आपल्याला आकार देतो तेव्हा आपण कसा प्रतिसाद दिला पाहिजे?

१८ आपल्याला कदाचित इतक्या कडक शिस्तीची गरज भासणार नाही. पण, महान कुंभार शिस्त लावण्याद्वारे आपल्याला आकार देतो तेव्हा आपण कसा प्रतिसाद देऊ? आपण शौलासारखा प्रतिसाद देऊ की दाविदासारखा? महान कुंभार आपला पिता आहे. “जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला, तसा परमेश्‍वर ज्याच्यावर प्रीती करतो त्याला शासन करतो” हे कधीच विसरू नका. तेव्हा, परमेश्‍वराचे शिक्षण तुच्छ मानू नका आणि त्याच्या शासनाला कंटाळू नका.—नीति. ३:११, १२.

^ नावे बदलण्यात आली आहेत.