व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

उत्पत्ति ६:२,  मध्ये सांगितल्याप्रमाणे, जलप्रलयाआधी हयात असलेले “देवपुत्र” कोण होते?

पुराव्यांवरून स्पष्ट होते की हे देवपुत्र देवाचे आत्मिक पुत्र आहेत. पण कोणते पुरावे?

वर उल्लेख केलेल्या पहिल्या वचनात असे म्हटले आहे: “मानवकन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले, व त्यांतल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या.”—उत्प. ६:२.

इब्री शास्त्रवचनांत, ‘देवपुत्र’ आणि ‘देवकुमार’ हे शब्द मूळ भाषेत उत्पत्ति ६:२, ४; ईयोब १:६; २:१; ३८:७ आणि स्तोत्र ८९:६ या वचनांत आढळतात. ही शास्त्रवचने देवपुत्रांबद्दल काय सूचित करतात?

ईयोब १:६ मध्ये उल्लेख करण्यात आलेले “देवपुत्र” हे नक्कीच आत्मिक प्राणी होते जे देवासमोर उपस्थित राहिले होते. त्यांच्यात सैतानदेखील होता जो “पृथ्वीवर इकडेतिकडे हिंडून फिरून” आला होता. (ईयो. १:७; २:१, २) त्याचप्रमाणे, ईयोब ३८:४-७ मध्ये आपण देवकुमारांविषयी वाचतो. देवाने पृथ्वीची कोनशिला बसवली तेव्हा या देवकुमारांनी “जयजयकार केला.” हे देवकुमार नक्कीच देवदूत असावेत कारण तोपर्यंत मानवांची सृष्टी झाली नव्हती. स्तोत्र ८९:६ मध्ये उल्लेखिलेले “देवपुत्र,” ज्यांचे द होली बायबल मराठीआर. व्ही. यात ‘दिव्यदूत’ असे अचूक भाषांतर करण्यात आले आहे ते नक्कीच देवाच्या सहवासात असलेले आत्मिक प्राणी आहेत, मानव नव्हे.

तर मग, उत्पत्ति ६:२, ४ मध्ये उल्लेख करण्यात आलेले “देवपुत्र” कोण आहेत? वर चर्चा केलेल्या बायबलमधील पुराव्यांच्या आधारे असा निष्कर्ष काढणे तर्कशुद्ध आहे की हा अहवाल देवाच्या आत्मिक पुत्रांना सूचित करतो जे या पृथ्वीवर आले होते.

काही लोकांना यावर विश्‍वास ठेवणे कठीण जाते की देवदूतांना लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा असेल. मत्तय २२:३० मध्ये दिलेल्या येशूच्या शब्दांवरून असे सूचित होते की स्वर्गामध्ये विवाह आणि लैंगिक संबंध यांना काहीच स्थान नाही. असे असले, तरी काही प्रसंगी देवदूतांनी मानवी शरीरे धारण करून मानवांबरोबर खाणेपिणे केल्याचा अहवाल आहे. (उत्प. १८:१-८; १९:१-३) म्हणून असे म्हणणे तर्कसंगत आहे की मानवी शरीर धारण करून ते स्त्रियांसोबत लैंगिक संबंध ठेवू शकत होते.

काही देवदूतांनी नेमके असेच केले हे मानण्यासाठी अनेक कारणे बायबलमध्ये आहेत. यहूदा ६, ७ मध्ये, अस्वाभाविक लैंगिक संबंधांच्या मागे जाणाऱ्‍या सदोमातील माणसांच्या पापाची तुलना त्या देवदूतांशी करण्यात आली आहे ज्यांनी “आपले अधिकारपद न राखता आपले वसतिस्थान सोडले.” ते देवदूत आणि सदोमची माणसे यांच्यातील एक समान गोष्ट म्हणजे त्यांनी “जारकर्म करून अन्यकोटीतील अंगांशी संग केला.” १ पेत्र ३:१९, २० मध्ये दिलेल्या अशाच उताऱ्‍यात आज्ञा न मानणाऱ्‍या देवदूतांचा संबंध नोहाच्या दिवसांशी जोडला गेला आहे. (२ पेत्र २:४, ५) त्या अर्थी, नोहाच्या दिवसांत आज्ञा न मानणाऱ्‍या देवदूतांनी जो मार्ग पत्करला त्याची तुलना सदोम आणि गमोरातील लोकांच्या पापाशी केली जाऊ शकते.

या पुराव्यांवरून स्पष्ट होते की उत्पत्ति ६:२, ४ मध्ये उल्लेख करण्यात आलेले “देवपुत्र” ते देवदूत होते ज्यांनी मानवी शरीरे धारण केली व स्त्रियांशी अनैतिक संबंध ठेवले.

बायबल म्हणते की येशूने “तुरुंगातील आत्म्यांना घोषणा केली.” (१ पेत्र ३:१९) याचा काय अर्थ होतो?

हे आत्मे कोण आहेत ते प्रेषित पेत्र आपल्याला सांगतो. तो म्हणतो की “हे आत्मे म्हणजे नोहाच्या दिवसांत . . . देव सहन करत वाट पाहत होता त्या वेळी ज्यांनी त्याची आज्ञा अवमानली तेच ते होत.” (१ पेत्र ३:२०) स्पष्टच आहे की पेत्र त्या आत्मिक प्राण्यांविषयी सांगत होता ज्यांनी सैतानासोबत मिळून देवाविरुद्ध बंड केले. यहूदा म्हणतो, “ज्या देवदूतांनी आपले अधिकारपद न राखता आपले वसतिस्थान सोडले” त्यांना देवाने “निरंतरच्या बंधनात, निबिड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरता राखून ठेवले.”—यहू. ६.

नोहाच्या दिवसांत आत्मिक प्राण्यांनी देवाची आज्ञा कशी मोडली होती? जलप्रलयाआधी, या दुष्ट आत्म्यांनी मानवी शरीरे धारण केली, पण त्यांनी असे करावे हा देवाचा उद्देश नव्हता. (उत्प. ६:२, ४) मानवी शरीरे धारण करून या देवदूतांनी स्त्रियांसोबत लैंगिक संबंध ठेवले. त्यांचे असे करणे अनैसर्गिक होते. देवाने त्यांना स्त्रियांसोबत लैंगिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने बनवलेच नव्हते. (उत्प. ५:२) या दुष्ट व अवज्ञाकारी देवदूतांचा देवाच्या नियुक्‍त वेळी नाश केला जाईल. पण तोपर्यंत, यहूदाने म्हटले त्याप्रमाणे, या देवदूतांची दशा “निबिड काळोखामध्ये” म्हणजेच आध्यात्मिक तुरुंगात असल्याप्रमाणे आहे.

येशूने केव्हा व कसे “तुरुंगातील आत्म्यांना” घोषणा केली? पेत्राने लिहिले की येशू “आत्म्यात जिवंत केला गेला” त्यानंतर हे घडले. (१ पेत्र ३:१८, १९) तसेच हेही लक्षात घ्या की येशूने “घोषणा केली” असे पेत्र म्हणतो. यावरून हे सूचित होते की पेत्राने त्याचे पहिले पत्र लिहिले त्याआधी ही घटना घडली होती. यावरून असेही दिसते, की येशूने त्याच्या पुनरुत्थानानंतर कधीतरी या दुष्ट आत्म्यांना त्यांच्यावर येणाऱ्‍या उचित न्यायदंडाची घोषणा केली. या घोषणेद्वारे येशू त्यांना काही आशा देत नव्हता. उलट तो त्यांना न्यायदंडाचा संदेश घोषित करत होता. (योना १:१, २) येशू मृत्यूपर्यंत विश्‍वासू व एकनिष्ठ राहिला आणि त्यानंतर त्याचे पुनरुत्थान करण्यात आले; अशा प्रकारे त्याने हे दाखवून दिले की सैतानाचा त्याच्यावर काहीच ताबा नाही. म्हणूनच, येशू न्यायदंडाची ही घोषणा करू शकला.—योहा. १४:३०; १६:८-११.

भविष्यात लवकरच येशू सैतानाला व त्या देवदूतांना बांधून अथांग डोहात टाकून देईल. (लूक ८:३०, ३१; प्रकटी. २०:१-३) पण तोपर्यंत, हे अवज्ञाकारी आत्मे आध्यात्मिकदृष्ट्या निबिड अंधारात आहेत आणि त्यांचा कायमचा नाश निश्‍चित आहे.—प्रकटी. २०:७-१०.