व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“पाहा, . . . मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे”

“पाहा, . . . मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे”

“पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”—मत्त. २८:२०.

१. (क) गहू आणि निदणाचा दाखला थोडक्यात सांगा. (ख) येशूने या दाखल्याचा काय अर्थ सांगितला?

 देवाच्या राज्यासंबंधी दिलेल्या एका दाखल्यात येशू, गव्हाचे चांगले बी पेरणाऱ्‍या शेतकऱ्‍याचे आणि गव्हाच्या चांगल्या पिकात निदण पेरणाऱ्‍या वैऱ्‍याचे वर्णन करतो. गव्हाच्या तुलनेत निदण जोमाने वाढते. पण, “कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या” अशी आज्ञा शेतकरी आपल्या दासांना देतो. कापणीच्या वेळी, निदण नष्ट केले जाते, तर गहू गोळा करून साठवला जातो. या दाखल्याचा अर्थ काय होतो ते खुद्द येशूनेच सांगितले. (मत्तय १३:२४-३०, ३७-४३ वाचा.) या दाखल्यावरून काय दिसून येते? ( “गहू आणि निदण” हा तक्‍ता पाहा.)

२. (क) शेतकऱ्‍याच्या शेतात घडणाऱ्‍या घटना काय चित्रित करतात? (ख) दाखल्यातील कोणत्या भागाची आपण चर्चा करणार आहोत?

त्या शेतकऱ्‍याच्या शेतात घडणाऱ्‍या घटनांवरून, येशू मानवजातीतून संपूर्ण गहू वर्गाला अर्थात त्याच्या राज्यात त्याच्यासोबत राज्य करणाऱ्‍या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना कसे आणि केव्हा गोळा करेल हे स्पष्ट होते. पेरणीचे काम इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टपासून सुरू झाले. या युगाच्या समाप्तीच्या वेळी जिवंत असलेल्या अभिषिक्‍त जनांवर शेवटचा शिक्का मारला जाईल आणि मग त्यांना स्वर्गात घेतले जाईल तेव्हा गोळा करण्याचे काम संपेल. (मत्त. २४:३१; प्रकटी. ७:१-४) जसे उंच डोंगरावरून सभोवतालचे संपूर्ण दृश्‍य स्पष्टपणे दिसते, अगदी तसेच या दाखल्यावरून सुमारे २,००० वर्षांच्या कालावधीदरम्यान घडणाऱ्‍या घडामोडींचे दृश्‍य आपल्याला विस्तृतपणे दिसते. काळाच्या ओघात आपण जेथे आहोत तेथून राज्यासंबंधी कोणत्या घडामोडी आपल्याला स्पष्टपणे दिसतात? दाखल्यात पेरणीच्या, वाढीच्या आणि कापणीच्या काळाचे वर्णन करण्यात आले आहे. पण, या लेखात आपण प्रामुख्याने कापणीच्या काळावर लक्ष केंद्रित करणार आहोत. *

येशूच्या सावध देखरेखीखाली

३. (क) पहिल्या शतकानंतर काय घडले? (ख) मत्तय १३:२८ नुसार, कोणता प्रश्‍न विचारण्यात आला, आणि तो कोणी विचारला? (टीपसुद्धा पाहा.)

निदण केव्हा दिसू लागले? इ.स. दुसऱ्‍या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा जगाच्या शेतात नकली ख्रिश्‍चन दिसू लागले तेव्हा हे घडले. (मत्त. १३:२६) चौथ्या शतकापर्यंत, निदणासमान असलेल्या ख्रिश्‍चनांची संख्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांपेक्षा झपाट्याने वाढली. हे आठवणीत आणा की दाखल्यातील दासांनी धन्याला निदण उपटून टाकण्याची परवानगी मागितली. * (मत्त. १३:२८) त्यावर धन्याने काय उत्तर दिले?

४. (क) धन्याने अर्थात येशूने दिलेल्या उत्तरावरून काय दिसून येते? (ख) गव्हासमान ख्रिश्‍चन केव्हा स्पष्टपणे दिसू लागले?

गहू आणि निदणाविषयी बोलताना येशूने म्हटले: “कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या.” या आज्ञेवरून स्पष्टपणे दिसून येते, की पहिल्या शतकापासून आजपर्यंत, गव्हासमान असलेल्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांपैकी काही जण नेहमीच पृथ्वीवर होते. येशूने नंतर आपल्या शिष्यांना जे म्हटले त्याच्या आधारावर आपण हा निष्कर्ष काढू शकतो. त्याने म्हटले: “पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” (मत्त. २८:२०) याचा अर्थ, येशू शेवटपर्यंत, अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचे रक्षण करणार होता. पण, निदणाच्या तुलनेत त्यांची संख्या कमी असल्यामुळे, त्या दीर्घ काळादरम्यान नेमके कोण गहू वर्गातले होते हे आपण निश्‍चितपणे सांगू शकत नाही. परंतु, कापणीचा काळ सुरू होण्याच्या काही दशकांआधी गहू वर्ग स्पष्टपणे दिसू लागला. हे कसे शक्य झाले?

निरोप्या मार्ग तयार करतो

५. मलाखीची भविष्यवाणी पहिल्या शतकात कशी पूर्ण झाली?

येशूने गहू आणि निदणाचा दाखला दिला त्याच्या कितीतरी शतकांआधी, यहोवाने मलाखी संदेष्ट्याला अशा घटनांविषयी भाकीत करण्यास प्रेरित केले ज्यांच्याविषयी आपण येशूच्या दाखल्यात वाचतो. (मलाखी ३:१-४ वाचा.) “मार्ग तयार” करणारा निरोप्या बाप्तिस्मा देणारा योहान होता. (मत्त. ११:१०, ११) इ.स. २९ मध्ये तो आला तेव्हा इस्राएल राष्ट्रावर न्यायदंड बजावण्याचा काळ जवळ आला होता. येशू दुसरा निरोप्या होता. त्याने दोन वेळा जेरूसलेममधील मंदिर शुद्ध केले. पहिल्यांदा आपल्या सेवाकार्याच्या सुरुवातीला आणि दुसऱ्‍यांदा आपल्या सेवाकार्याच्या शेवटी. (मत्त. २१:१२, १३; योहा. २:१४-१७) यावरून स्पष्टपणे दिसून येते की येशूने केलेले शुद्धीकरणाचे कार्य दीर्घ काळापर्यंत चालले.

६. (क) मलाखीच्या भविष्यवाणीची मोठ्या प्रमाणात पूर्णता केव्हा झाली? (ख) येशूने आध्यात्मिक मंदिराची पाहणी कोणत्या काळादरम्यान केली? (टीपसुद्धा पाहा.)

मलाखीच्या भविष्यवाणीची मोठ्या प्रमाणात पूर्णता केव्हा झाली? १९१४ च्या आधीच्या काही दशकांदरम्यान, सी. टी. रस्सल आणि त्यांचे निकटवर्ती यांनी बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानासारखे कार्य केले. त्यात, बायबलची सत्ये उजेडात आणणे हे महत्त्वाचे कार्य गोवलेले होते. या बायबल विद्यार्थ्यांनी ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाचा खरा अर्थ काय तो शिकवला, नरकाग्नीची खोटी शिकवण उघडकीस आणली आणि विदेश्‍यांच्या काळाची लवकरच समाप्ती होणार असल्याची घोषणा केली. पण, ख्रिस्ताचे अनुयायी असल्याचा दावा करणारे आणखीनही बरेच धार्मिक गट त्या वेळी होते. म्हणून, एका महत्त्वाच्या प्रश्‍नाचे उत्तर मिळणे खूप गरजेचे होते. तो म्हणजे: या गटांपैकी गहू कोण होते? तो प्रश्‍न निकालात काढण्यासाठी, १९१४ मध्ये येशू आध्यात्मिक मंदिराची पाहणी करू लागला. मंदिराची पाहणी करण्याचे आणि त्याचे शुद्धीकरण करण्याचे काम दीर्घकाळ म्हणजे १९१४ पासून ते १९१९ च्या सुरुवातीच्या काळापर्यंत चालले. *

पाहणी व शुद्धीकरण करण्याचा काळ

७. १९१४ मध्ये येशूने पाहणी करण्यास सुरुवात केली तेव्हा त्याला काय आढळून आले?

येशूने पाहणी करण्यास सुरुवात केली तेव्हा त्याला काय आढळून आले? त्याला आढळून आले, की आवेशी बायबल विद्यार्थ्यांच्या एका लहानशा गटाने एक जोरदार प्रचार मोहीम राबवण्यासाठी ३० पेक्षा अधिक वर्षांपासून आपली शक्‍ती आणि धनसंपत्ती खर्च केली होती. * निदणाच्या तुलनेत अतिशय कमी, पण कणखर असलेल्या गव्हाच्या त्या कांड्यांची वाढ सैतानाच्या निदणामुळे खुंटली नव्हती हे पाहून येशूला आणि देवदूतांना किती आनंद झाला असेल! असे असले, तरी “लेवीच्या वंशजांस (अभिषिक्‍त जनांस) शुद्ध” करणे जरुरीचे होते. (मला. ३:२, ३; १ पेत्र ४:१७) ते का?

८. १९१४ नंतर कोणत्या घटना घडल्या?

सन १९१४ हे वर्ष संपत आले तेव्हा काही बायबल विद्यार्थी निराश झाले, कारण स्वर्गात जाण्याची त्यांची आशा पूर्ण झाली नव्हती. सन १९१५ ते १९१६ या काळादरम्यान, संघटनेच्या बाहेरून विरोध होत असल्यामुळे प्रचाराचे कार्य मंदावले. त्याहून वाईट म्हणजे, ऑक्टोबर १९१६ मध्ये बंधू रस्सल यांचे निधन झाल्यानंतर संघटनेच्या आतून विरोध उसळला. वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीच्या सात संचालकांपैकी चौघांनी बंधू रदरफोर्डच्या नेतृत्वाला विरोध केला. त्यांनी बांधवांमध्ये फुटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण, ऑगस्ट १९१७ मध्ये त्यांनी बेथेल सोडून दिल्यामुळे एका अर्थाने शुद्धीकरणच घडले! तसेच, काही बायबल विद्यार्थी मनुष्याच्या भीतीला बळी पडले. पण, एक समूह या नात्याने येशूच्या शुद्धीकरणाच्या कार्याला त्यांनी स्वेच्छेने प्रतिसाद दिला आणि आवश्‍यक बदल केले. त्यामुळे येशूने त्यांचा, गहू म्हणजे खरे ख्रिश्‍चन म्हणून न्याय केला, तर सर्व नकली ख्रिश्‍चनांना त्याने नाकारले; यात ख्रिस्ती धर्मजगतातील निरनिराळ्या गटांत असलेल्या सर्वांचा समावेश होता. (मला. ३:५; २ तीम. २:१९) त्यानंतर काय घडले? ते पाहण्यासाठी आपण पुन्हा एकदा गहू आणि निदणाचा दाखला विचारात घेऊ या.

कापणीचा काळ सुरू झाल्यावर काय होते?

९, १०. (क) आता आपण कापणीच्या काळाबद्दल काय पाहणार आहोत? (ख) कापणीच्या काळादरम्यान सगळ्यात प्रथम काय घडले?

येशूने म्हटले, की “कापणी ही युगाची समाप्ती आहे.” (मत्त. १३:३९) कापणीचा तो काळ १९१४ मध्ये सुरू झाला. येशूने भाकीत केल्याप्रमाणे, त्या काळात घडणाऱ्‍या पाच घडामोडींचा आपण विचार करू या.

 १० पहिली घटना, निदण गोळा करणे. दाखल्यात येशू म्हणतो: “कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्‍यांस सांगेन की, पहिल्याने निदण गोळा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा.” १९१४ नंतर, देवदूत निदणासमान असलेल्या ख्रिश्‍चनांना राज्याच्या अभिषिक्‍त पुत्रांपासून वेगळे करण्याद्वारे त्यांना “गोळा” करू लागले.—मत्त. १३:३०, ३८, ४१.

११. आजपर्यंत, कोणत्या गोष्टीमुळे खरे ख्रिश्‍चन नकली ख्रिश्‍चनांपेक्षा वेगळे ठरले आहेत?

११ जसजसे गोळा करण्याचे काम वाढत गेले तसतसा दोन्ही गटांतील फरक अधिकाधिक स्पष्ट होऊ लागला. (प्रकटी. १८:१, ४) १९१९ पर्यंत हे स्पष्ट झाले की मोठी बाबेल पडली आहे. खासकरून कोणत्या गोष्टीमुळे खरे ख्रिश्‍चन नकली ख्रिश्‍चनांपेक्षा वेगळे ठरले? त्यांच्या प्रचार कार्यामुळे. बायबल विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व करणारे, राज्य प्रचाराच्या कार्यात वैयक्‍तिक सहभाग घेण्याच्या महत्त्वावर भर देऊ लागले. उदाहरणार्थ १९१९ मध्ये प्रकाशित झालेल्या, टू हूम द वर्क इझ एन्ट्रस्टेड या पुस्तिकेद्वारे सर्व अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना घरोघर जाऊन प्रचार करण्याचा आर्जव करण्यात आला. पुस्तिकेत म्हटले होते: “हे कार्य अफाट वाटत असले, तरी ते प्रभूचे कार्य आहे आणि त्याच्या बळावर आपण ते करू शकतो. त्यात सहभाग घेण्याची सुसंधी तुम्हाला आहे.” याला कसा प्रतिसाद मिळाला? १९२२ मध्ये द वॉचटावर नियतकालिकाने म्हटले, की तेव्हापासून बायबल विद्यार्थी उत्साहाने प्रचार कार्य करू लागले. काही काळातच, घरोघरचे प्रचार कार्य हे त्या विश्‍वासू ख्रिश्‍चनांचे ओळखचिन्ह बनले आणि आजही आहे.

१२. गहू वर्गाला केव्हापासून गोळा करण्यात आले?

 १२ दुसरी घटना, गहू साठवणे. येशू देवदूतांना आज्ञा देतो: “गहू माझ्या कोठारात साठवा.” (मत्त. १३:३०) १९१९ पासून, अभिषिक्‍त जनांना पुनःस्थापित ख्रिस्ती मंडळीत गोळा करण्यात आले आहे. जे अभिषिक्‍त ख्रिश्‍चन युगाच्या समाप्तीपर्यंत जिवंत राहतील त्यांचे शेवटचे साठवले जाणे हे त्यांना स्वर्गीय प्रतिफळ मिळाल्यानंतर घडेल.—दानी. ७:१८, २२, २७.

१३. ख्रिस्ती धर्मजगत व कळवंतीण किंवा मोठी बाबेल यांच्या सध्याच्या प्रवृत्तीबद्दल प्रकटीकरण १८:७ काय म्हणते?

 १३ तिसरी घटना, रडणे व दात खाणे. देवदूत निदणाच्या पेंढ्या बांधतात त्यानंतर काय घडते? निदण वर्गाच्या स्थितीविषयी बोलताना येशू म्हणतो: “तेथे रडणे व दात खाणे चालेल.” (मत्त. १३:४२) हे आत्ता घडत आहे का? नाही. कळवंतिणीचा भाग असलेले ख्रिस्ती धर्मजगत अजूनही स्वतःबद्दल असे म्हणते: “मी राणी होऊन बसले आहे; मी काही विधवा नाही; मी दु:ख पाहणारच नाही.” (प्रकटी. १८:७) खरेच, सगळे काही आपल्याच हातात आहे असे ख्रिस्ती धर्मजगताला वाटते. आपण राजकीय नेत्यांच्या वर्गावर ‘राणी होऊन बसलो आहोत’ अशी घमेंड ख्रिस्ती धर्मजगत बाळगते. सध्या, निदणाला सूचित करणारे रडत नाहीत, तर ते शेखी मिरवत आहेत. पण, हे चित्र लवकरच बदलणार आहे.

ख्रिस्ती धर्मजगताची राजकीय नेत्यांसोबत असलेली सलगी लवकरच संपुष्टात येईल ( परिच्छेद १३ पाहा)

१४. (क) नकली ख्रिश्‍चन केव्हा आणि का ‘दात खातील’? (ख) मत्तय १३:४२ बद्दलची आपली समज आणि स्तोत्र ११२:१० मध्ये जे म्हटले आहे ते कसे मिळतेजुळते आहे? (टीप पाहा.)

१४ मोठ्या संकटादरम्यान, सर्व संघटित खोट्या धर्मांचा नाश झाल्यानंतर, त्यांचे पूर्वीचे अनुयायी आश्रयासाठी इकडे-तिकडे धावतील, पण त्यांना कोठेच आसरा मिळणार नाही. (लूक २३:३०; प्रकटी. ६:१५-१७) मग, नाशापासून आपली मुळीच सुटका नाही याची त्यांना जाणीव होईल. आणि यामुळे त्यांची घोर निराशा होऊन ते रडतील व क्रोधित होऊन ‘दात खातील.’ मोठ्या संकटाबद्दल येशूने दिलेल्या भविष्यवाणीत म्हटल्याप्रमाणे त्या अंधाऱ्‍या क्षणी ते “ऊर बडवून घेतील.” *मत्त. २४:३०; प्रकटी. १:७.

१५. निदणाचे काय केले जाईल, आणि ती घटना केव्हा घडेल?

 १५ चौथी घटना, अग्नीच्या भट्टीत टाकले जाणे. निदणाच्या पेंढ्यांचे काय केले जाते? देवदूत “त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील.” (मत्त. १३:४२) याचा अर्थ, कायमचा नाश. म्हणजे, खोट्या धार्मिक संघटनांच्या पूर्वीच्या अनुयायांचा मोठ्या संकटाच्या अंतिम भागात म्हणजे हर्मगिदोनात नाश केला जाईल.—मला. ४:१.

१६, १७. (क) येशूने आपल्या दाखल्यात उल्लेख केलेली शेवटची घटना कोणती? (ख) त्या घटनेची पूर्णता होणे अद्यापही बाकी आहे असे का म्हणता येईल?

 १६ पाचवी घटना, सूर्यासारखे प्रकाशणे. येशू आपल्या भविष्यवाणीच्या शेवटी म्हणतो: “तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील.” (मत्त. १३:४३) हे केव्हा आणि कोठे घडेल? या शब्दांची पूर्णता होणे अद्याप बाकी आहे. येशूने, सध्या पृथ्वीवर चालू असलेल्या एखाद्या कार्याविषयी नव्हे, तर भविष्यात स्वर्गात घडणाऱ्‍या एका घटनेविषयी भाकीत केले. * असा निष्कर्ष काढण्याची दोन कारणे आहेत.

१७ एक कारण म्हणजे, ती घटना घडण्याची “वेळ.” येशूने म्हटले: “तेव्हा नीतिमान . . . सूर्यासारखे प्रकाशतील.” “तेव्हा” हा शब्द येशूने नुकत्याच उल्लेख केलेल्या घटनेला सूचित करतो. ती घटना म्हणजे ‘निदणाला अग्नीच्या भट्टीत टाकले’ जाणे. ही घटना मोठ्या संकटाच्या अंतिम भागात घडते. त्यामुळे, अभिषिक्‍त जनांचे ‘सूर्यासारखे प्रकाशणे’ हेदेखील भविष्यातील त्याच वेळी घडेल. दुसरे कारण म्हणजे, ती घटना घडण्याचे “ठिकाण.” येशूने म्हटले, की नीतिमान “राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील.” याचा काय अर्थ होतो? मोठ्या संकटाचा पहिला भाग होऊन गेल्यानंतर अद्याप पृथ्वीवर असलेल्या सर्व विश्‍वासू अभिषिक्‍त जनांवर शेवटचा शिक्का मारण्यात आलेला असेल. मग, मोठ्या संकटाबद्दल येशूने दिलेल्या भविष्यवाणीत सूचित केल्याप्रमाणे ते स्वर्गात साठवले किंवा जमा केले जातील. (मत्त. २४:३१) तेथे ते “आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील.” आणि हर्मगिदोनाचे युद्ध संपल्यावर लगेच येशूची आनंदी वधू या नात्याने ते ‘कोकऱ्‍याच्या लग्नात’ सामील होतील.—प्रकटी. १९:६-९.

आपल्याला काय फायदा होतो?

१८, १९. येशूने गहू आणि निदणाचा जो दाखला दिला तो समजून घेतल्यामुळे वैयक्‍तिकपणे आपल्याला कसा फायदा होतो?

१८ या दाखल्यावरून ज्या निरनिराळ्या घटनांचे दर्शन घडते त्याचा वैयक्‍तिकपणे आपल्याला काय फायदा होतो? याचा तीन मार्गांनी आपल्याला फायदा होतो. पहिला म्हणजे, त्यामुळे आपली समज आणखी गहन होते. यहोवाने कोणत्या महत्त्वाच्या कारणासाठी अद्याप दुष्टाईचा अंत केला नाही ते या दाखल्यातून आपल्याला समजते. ‘दयेची पात्रे’ अर्थात गहू वर्ग तयार करण्यासाठी त्याने ‘क्रोधाच्या पात्रांना’ सहन केले. * (रोम. ९:२२-२४) दुसरा म्हणजे, त्यामुळे आपला विश्‍वास बळावतो. जसजसा अंत जवळ येतो तसतसे आपले वैरी आपला अधिकाधिक विरोध करतील. पण आपल्यावर “त्यांचा वरचष्मा होणार नाही.” (यिर्मया १:१९ वाचा.) ज्याप्रमाणे यहोवाने आजपर्यंत गहू वर्गाचे रक्षण केले त्याचप्रमाणे आपला स्वर्गीय पिता येशूच्या व देवदूतांच्या द्वारे पुढेही “सर्व दिवस” आपल्याबरोबर राहील.—मत्त. २८:२०.

१९ तिसरा मार्ग म्हणजे, या दाखल्यामुळे आपल्याला गहू वर्गाची ओळख पटते. गहू वर्गाची ओळख पटणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे का म्हणता येईल? गव्हासमान ख्रिश्‍चन कोण आहेत हे ओळखल्यामुळे येशूने शेवटल्या दिवसांबद्दल दिलेल्या विस्तारित भविष्यवाणीत जो प्रश्‍न उपस्थित केला होता त्याचे उत्तर मिळणे शक्य होते. त्याने विचारले: “ज्या विश्‍वासू व बुद्धिमान दासाला धन्याने . . . नेमले आहे असा कोण?” (मत्त. २४:४५) याचे समाधानकारक उत्तर पुढच्या दोन लेखांत दिले जाईल.

 

^ परिच्छेद २: दाखल्यातील इतर भागांचा काय अर्थ होतो हे आठवणीत आणण्यासाठी १५ मार्च २०१० च्या टेहळणी बुरूज अंकातील, “नीतिमान सूर्यासारखे प्रकाशतील” हा लेख वाचण्याचे प्रोत्साहन आम्ही तुम्हाला देतो.

^ परिच्छेद ३: हे दास देवदूतांना चित्रित करतात असे म्हणता येईल कारण तोपर्यंत येशूच्या प्रेषितांचा मृत्यू झाला होता आणि पृथ्वीवर उरलेल्या अभिषिक्‍त जनांना दास म्हणून नव्हे, तर गहू म्हणून चित्रित करण्यात आले होते. दाखल्यात पुढे, निदणाची कापणी करणाऱ्‍या दासांची ओळख देवदूत म्हणून करण्यात आली आहे.—मत्त. १३:३९.

^ परिच्छेद ६: ही सुधारित समज आहे. आधी आपण असा विचार करायचो की येशूने १९१८ मध्ये मंदिराची पाहणी केली होती.

^ परिच्छेद ७: सन १९१० ते १९१४ पर्यंत, बायबल विद्यार्थ्यांनी जवळजवळ ४०,००,००० पुस्तके आणि २०,००,००,००० हून अधिक पत्रिका आणि पुस्तिका वाटल्या.

^ परिच्छेद १४: मत्तय १३:४२ बद्दल ही सुधारित समज आहे. पूर्वी, आपल्या प्रकाशनांत असे सांगण्यात आले होते, की ‘राज्याच्या पुत्रांनी’ नकली ख्रिश्‍चनांना “दुष्टाचे पुत्र” म्हणून उघड केले असल्यामुळे नकली ख्रिश्‍चन गेल्या अनेक दशकांपासून ‘रडत व दात खात’ आहेत. (मत्त. १३:३८) पण, आता याची नोंद घेण्यात यावी, की दात खाणे हे नाशाशी संबंधित आहे.—स्तो. ११२:१०.

^ परिच्छेद १६: दानीएल १२:३ म्हणते, की “जे सुज्ञ असतील ते [अभिषिक्‍त ख्रिश्‍चन] अंतराळीच्या प्रकाशासारखे झळकतील.” पृथ्वीवर असताना ते आपल्या प्रचार कार्याद्वारे झळकतात. पण, मत्तय १३:४३ त्या काळाकडे आपले लक्ष वेधते जेव्हा ते स्वर्गीय राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. आधी आपण असा विचार करायचो की ही दोन्ही वचने एकाच कार्याला अर्थात प्रचार कार्याला सूचित करतात.

^ परिच्छेद १८: यहोवा के करीब आओ, पुस्तकातील पृष्ठे २८८-२८९ पाहा.